Friday, 1 June 2018

💐आठवणीतली व्याख्याने💐

💐आठवणीतली व्याख्याने💐
                  गेल्याच महिन्यात( मे )थोर साहित्यिक आणि वक्ते, चित्रपटकथा लेखक आणि नाटककार स्वर्गीय विजय तेंडुलकर  यांचा जन्मदिन होता. वृत्तपत्र आणि दूरदर्शन वाहिन्यांवर त्यांच्याविषयी मान्यवरांकडुन खूप वाचायला अन पाहायला मिळाले. असे हे दिग्गज साहित्यिक-व्याख्याते विजय तेंडलुकर यांनी एका व्याख्यामालेत मांडलेले वास्तव विचार मी येथे शब्दबद्द केलेले आहेत.

💐ऑपरेशन शेपूट.........
                   विजय तेंडुलकर म्हटले की आठवते, हे तर मोठे लेखक-नाटककार आहेत. कितीतरी गाजलेल्या चित्रपटांच्या कथांची निर्मिती त्यांनी केलीय. बेधडक पण वास्तव जगाचे निरीक्षण ते आपल्या साहित्यातून नोंदवितात.
                आणि असे हे विजय तेंडुलकर ' हिंसाचार ' या विषयावर आपल्याला काय बरे व्याख्यान देणार ? शिवाय व्याख्यानाचे शिर्षक-' हिंसाचार,ऑपरेशन शेपूट ' असे वाचलेय. डोक्यात पडलेले हे कोडे त्यांच्या व्याख्यानाला गेल्याशिवाय नाही उलगडणार, असे स्वतःस समजावले आणि या व्याख्यानास हजर राहिलो.
                तेंडुलकरांनी विषयाचे सुरुवातीला सर्व श्रोत्यांना एक गोष्ट सांगितली. "एका गावात एक वाघ घुसतो. तो गुरं खातो. बकऱ्या खातो. हळूहळू माणसेही त्याला मिळू लागतात. गावकरी हवालदिल होतात. एक शिकारी हे आव्हान स्विकारतो. गावकरी त्याच्यावर खुश होतात. मात्र त्यांना एक शंका येते. त्या शिकाऱ्याला लोक विचारतात.-' तुम्ही एकटे कसे काय मारणार या खतरनाक वाघाला ?
               शिकारी उत्तर देतो-' त्याची तुम्ही नका काळजी करू. मी त्या वाघाची बरोबर शिकार करीन. हां, पण तुम्ही कोणी अजिबात फिरकू नका बरं बाहेर....मला कोणी मदतीला सुद्दा नकोय.'
               थोड्याच दिवसात तो गावकऱ्यांना सांगतो-' या,बघा,मी तो वाघ मारलाय ! ' गावकरी खुश होतात. खुण म्हणून वाघाची शेपूट तो शिकारी सगळयांना दाखवितो.!  मात्र वाघ काही मेलेला नसतो. तो जिवंतच आहे !
              सारांश, आज जिकडेतिकडे वाघाऐवजी त्याच्या शेपटाचीच शिकार होतेय. मूळ आजार किंवा मूळ विषय, समस्या, आपत्ती आहे तशीच आहे ! आपण फक्त शेपटाइतका संक्षिप्त उपाय करतो आहोत. या उपायांचा देशापुढे,राष्ट्रापुढे काहीच उपयोग नाही.
               विजय तेंडुलकरांनी दिल्लीच्या नेहरू शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ' हिंसाचार ' या विषयावर सखोल संशोधनपर अभ्यास केलाय. भाषणात ते याची खूप उदाहरणे देत होते.
               हिसाचाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवीय. तो मोडल्याशिवाय राष्ट्र पुढे जाणार नाही. बळकट होणार नाही. नवनिर्माण होणार नाही.  हा हिंसाचार चटकन संपण्यासारखा विषय नाही  व पटकन संपण्यासारखी समस्या नाही. याच्या मुळाशीच घाव घालायला हवाय. हिंसाचाराची मूळ कारणे कोणती त्याचा विचार व्हायला हवाय. नंतर पुढे मार्गक्रमण करता येईल.
           या हिंसाचाराचे मूळ कारण म्हणजे प्रचंड बेकारी, गरिबी, भयानक वाढलेली लोकसंख्या. आणि हे विषय चटकन
सोडविण्यासारखे  नाहीत. पण चांगले प्रयत्न झाले तर त्याचे दूरगामी परिणाम होतील व हिंसाचार थांबेलही.
           सामान्यतः हिंसाचारी व्यक्तींमध्ये तरुणवर्ग अधिक आहे. या तरुणांकडे शारीरिक क्षमता जास्त असते. त्याचा उपयोग सरकार,राष्ट्रांकडून होत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष होतेय. असे हे तरुण मग चरितार्थासाठी धडपड करू लागतात. सहज कोठे नोकरी मिळत नाही पण वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे व राष्ट्राचे  त्यांचेवर लक्ष असते.ते त्यांना आपल्यात आणतात. त्यांचा वापर करून घेतात.            
             याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काश्मीर, पंजाब व सीमेकडे इतर राज्यांचे प्रश्न. तेथील आंदोलकांत तरुण अधिक आहेत. आपला देश या तरुणांवर विश्वास ठेवतच नाही. त्यांना खानदानी हिसाचारीच मानतो !  मग कारवाई सुरू होते. या तरुनवर्गत मग राष्ट्राविषयी द्वेष निर्माण होऊ लागतो. शत्रूराष्ट्र यात खतपाणी घालतात.
             आज काश्मीरमध्ये बरीच मंडळी ' भारत ' आमचा नाहीच म्हणून सांगताहेत. सीमेकडे प्रदेशातील बऱ्याच नागरिकांकडे सरकारचे दुर्लक्ष होतेय. मोठमोठ्या योजना-प्रकल्प, विकासाची कामे या प्रदेशांत व्हायला हवीत. शासनकर्ते फक्त मध्यवर्ती ठिकाणीच लक्ष केंद्रित करतात.
             तेंडुलकरांनी पंजाबमधील एक परिषद अटेंड केली. तेव्हा त्यावेळचे कोणी मुख्यमंत्री अभ्यासपूर्ण बोलले. त्यांनी इतर राजकीय नेत्यांचे पंजाब समस्येवर उपाय ऐकून सांगितले की, ' तुम्हा सर्वांचे म्हणणे आहे की, पंजाबमधील  दहशतवाद थांबायला हवा. होय, मी हेंच म्हणेन. पण एक ध्यानात घ्यायला हवे की,  या पंजाबात राहणारे बहुतेक नागरिक दहशतवादी आहेत का ? आणि त्यांना गोळ्या घालून ठार केले तर ?
                 तर पंजाब समस्या चुटकीसरशी सुटेल ? यावर माझे ऊत्तर आहे, ' नाही '.  मी पंजाबात अनेक रोजगाराभिमुख योजना राबवून त्याचा पाठपुरावा केलाय व करतोय. त्यात यश मिळतेय. यात बळकटी आली तर बेकार तरुण हिंसाचाराचा मार्ग सोडून आपल्याला येऊन मिळतील.
                 तेंडुलकर अभ्यासाच्या निमित्ताने बरेच भटकलेत. त्यांनी तऱ्हेतऱ्हेच्या खतरनाक गुंडांशी बातचीत केलीय. फाशी देण्याची कार्यपद्धती पाह्यलीय. फाशी होणाऱ्या व्यक्तीला ते भेटलेत. सुपारी घेऊन माणसं मारणारा गुंडही त्यांनी जवळून पाहिलाय. हा गुंड सर्वसामान्यांसारखा दिसतो ! कोणी म्हणणार नाहीत की याने असंख्य मुडदे पाडलेत म्हणून !  तो म्हणतो की ऑर्डर आली की मी त्या व्यक्तीला संपवतो. किती माणसं मारलीत याची मोजदाद त्याचेकडे नाही, इतकी  संख्या जास्त आहे !
                ह्या माणसाला कोणती  समस्या आहे माहीत आहे ? स्वतःचा बेकार मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरीस लागावा, त्याला आपल्या मार्गाची सावलीही पडू नये !
               मुंबईतील रस्त्यावर रहाणारी माणसं, गलिच्छ वस्त्या, झोपडपट्टी, तेथली गरीब माणसं, हे देखील तेंडुलकरांच्या अभ्यास-विषयात होते. या लोकांना काही हौस नाही रस्त्यावर राहण्याची, अर्धपोटी झोपण्याची ! पण ते जगतात. कसेबसे आपले आयुष्य पुढे रेटतात. त्यांनाही चांगल्या ठिकाणी जावेसे वाटते, राहावेसे वाटते. मात्र पैशाअभावी ते शक्य नाही
            आपण घरदार असलेले लोक त्यांना तुच्छ मानतो. ते फुकटचे खातात. फुकटचे राहातात. सरकार याना सोयी सवलती देतेय, याची आपल्याला चीड येते. पण या लोकांची संख्या कमी नाही. त्यांना संडास करायला रस्त्यावर जावे लागतेय. ही  संडास सुविधा सरकार सर्वाना आज तरी पुरवू शकत नाही. या वस्त्या गलिच्छ होत राहतात. या अशा वातावरणातून हिसाचारही वाढतात.
            अर्थात नीटपणे विचार केला तर, यांचे साठी योग्य योजना आखल्या, उद्योगपतींनी हातभार लावला, तर हे लोक नीटपणे राहू लागतील.जगू शकतील. समाजव्यवस्था सुधारेल.
            तेव्हा, हिंसाचार थांबवायला गोळ्या हेच उत्तर नाही, तर अशा लोकांना विश्वासात घेऊन नीट मार्गी लावायला हवेय.
हे नाही  झाले तर आपण फक्त शेपूट मारीत बसू. वाघ फिरतच राहील.
           भाषणाच्या ओघात तेंडुलकरांनी सांगितले की, सध्या ' दहशतवाद,दहशतवाद ' हे शब्द आपण सगळीकडे वाचतोय. पण हा दहशतवाद नवीन नाही. पूर्वीदेखील होता. पूर्वी राजकीय पक्ष या जोरावरच निवडणुका लढवीत. आज तेच होतेय. कितीतरी उदाहरणं  सांगितली त्यांनी. आता त्यामानाने  स्थिती बरी आहे. पूर्वी  भीतीदायक परिस्थिती होती. दादरला तर, संध्याकाळ झाली की इमारतीच्या खाली उतरायला माणसं घाबरायची. कारण मवाली टोळकी मुक्तपणे तेथे वावरायची. प्रसंगी खुन,हाणामारी सारख्या घटना तेथे घडलेल्या आहेत.
            आपण या सर्व बाबी नीट लक्षात घ्यायला हव्यात आणि त्या मार्गाने हिंसाचार थांबवायला हवा. नुसती शस्त्र व गोळ्यांचा वापर करून हिंसाचार थांबणार नाही...........असे सांगत विजय तेंडुलकरांनी व्याख्यानाचा समारोप केला.

                                                              ................................................

💐इतिहासात....💐                इतिहास म्हटला की, ऐतेहासिक घटना आल्या,स्थळे आली, शूर वीर अन योध्याच्या कहाण्याही आल्या.
अशा या इतिहासात सर्व काळ आपण रममाण झालो तर ?
               तर वर्तमानातील वाटचालीचे काय ?  मात्र पुढची वाटचाल करताना प्रेरणा आणि बळ देणारा इतिहास आपल्या आयुष्यात जरूर हवा.
               मी दुर्गप्रेमी आहे. माझा सगळ्यात आवडता गड राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी. स्वराज्य संस्थापक शिवप्रभूंच्या कार्य कर्तृत्वाची अनुभूती घेतलेला हा गड, पुणे-वेल्हे-तोरणा परिसरात अजूनही भक्कम स्थितीत उभा आहे.
               तुम्ही इतिहासाचे दर्दी असाल तर छानच. नसलात तरी इतिहासाचे हे ' पान ' जरूर वाचा.........

💐अवतरली शिवशाही तेथे.............
                 स्वराज्य भूषण छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा  साजरा झाल्याला आता तीनशे वर्षे लोटलीत. हा योग साधून मुंबईच्या यंग झिंगारो ट्रेकर्स(वाय. झेड.) या गिर्यारोहण संस्थेने ठरविले की पुणे येथील दुर्गम राजगडावर त्रिशताब्दी आगळ्या वेगळ्या रीतीने साजरी करायची. तेथे गड जागरण करायचे ! हे ठरल्यावर वाय. झेड. परिवार उत्साहित झाला.
                 पुणे सातारा महामार्गावर नसरापूर फाटा लागतो. तेथून वेल्हे येथे जाणारा गाडीरस्ता आहे. वाटेत विंझर, मार्गासणी गांवे लागतात. तेथून राजगडाकडे जाणारी एक वाट आहे. गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींना मोहात पाडील असा हा राजगड सहजसाध्य नाही. त्यासाठी दोन तीन तासांची पायपीट करावी लागते.
               या राजगडावर लांबच लांब पसरलेली सुवेळा माची, दुहेरी तटबंदीची संजीवनी माची, अभेद्य  हत्ती खडक, झुंजार बुरुज, देखणा गुंजण दरवाजा, पाली दरवाजा, पद्मवतीदेवीचे मंदिर, उत्तुंग असा बालेकिल्ला, स्वच्छ नितळ व खोल पाण्याची विस्तीर्ण पसरलेली पाण्याची टाकी हे सगळे आपल्याला भारावुन टाकते.
              अशा या सुंदर गडावर त्यावेळच्या पोशाखात वावरावे, रोज पालखी निघावी, मशाली जाग्या व्हाव्यात, अष्टोप्रहर पहारे लागावेत, भालदार-चोपदार गडावर वावरावेत, ऐतेहासिक सदर उभी रहावी, अशी संस्थेची इच्छा होती.
              मग भराभर सारे तयारीस लागले. संस्थेचे कार्यकर्ते मुंबई पुण्यात भरपूर होते. त्यांनी कार्यक्रमासाठी मदत,देणग्या गोळा करायला सुरुवात केली. प्रतिसादही चांगला मिळू लागला.
              यात  मी एक सामान्य सदस्य होतो. गिरगावातल्या स.का.पाटील उद्यानात सगळे एकत्र जमत. तेथे मी जाऊ लागलो. काही कामे अंगावर घेतली. जमेल तसा धावू लागलो.
              या अपूर्व अशा गड जागरण सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी राजमाता विजयराजे शिंदे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो.नि. दांडेकर, शिवभक्त साबीर शेख(माजी मंत्री) ,इत्यादि मान्यवर व्यक्ती राजगडावर येणार होत्या.
              यापकी फक्त गो.नि.दांडेकर आणि साबीरभाई शेख उपस्थित राहिले. महाराष्ट्राचे प्रसिद्द शिल्पकार अण्णा सहस्रबुद्वे  यांचेकडून आम्ही छत्रपती शिवरायांचा एक दिमाखदार पुतळा तयार करून घेतला. सिहासनाधी्ष्ट ब्रॉंझच्या वर्णाचे हे  ' शिल्प' 'खूप सुंदर होते.
            स्वराज्यात राजगडावर ज्या ठिकाणी जरीपटका फडकत असे,तेथे आमचा मुख्य सोहोळा झाला. गो. नि. दांडेकरांनी जरीपटका फडकाऊन गडजागरण सोहोळयाचे औपचारिक उदघाटन केले. बोलताना ते भारावून गेले आणि म्हणाले, ' आज कित्येक वर्षांनी हा ध्वज येथे फडकतोय, तो राजा धन्य होईल तुमच्यावर.'
            आमच्या संस्थेचे संक्षिप्त नाव होते ' वाय झेड ' ते त्यांना विचित्र वाटले असावे. म्हणाले, ' एवढं चांगलं कृत्य करणारी तुमची संस्था, तुम्ही हे नाव प्रथम बदलायला हवं.   बोला, बदलणार ? ' भारावलेल्या बहुतेकांनी त्या समयी होकार दिला. पण आमची ही संस्था आज ' वायझेड ' म्हणूनच कार्यरत आहे. महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या या गिर्यारोहण संस्थेचे ५०० हुन अधिक ' यंग झिंगारो' आहेत.
             राजगडावरील सोहळा पाच दिवस चालला होता. या काळात गडावर रोज पालखी निघायची. त्यावेळच्या वेशातील मानकरी मंडळी-भालदार, चोपदार, तुतारी वाजविणारे, लालकेशरी पागोटी आणि ढाल-तलवारी घेतलेल्या मराठमोळे मावळे, नऊवारीे साड्या ल्यालेल्या गृहिणी, लेझीमवाले,.......... असा सारा जामानिमा पालखीबरोबर असायचा.
             ही पालखी पद्मावती माचीवरून निघायची आणि सुवेळामाचीच्या दिशेने जायची. परत वाजतगाजत पद्मावतीवर यायची. राजगडावर वासुदेवाची देखील फेरी व्हायची.
            देखण्या अशा राजगडावर पुन्हा शिवशाही अवतरलीय याचा प्रत्यय आम्ही दररोज घेत होतो.गडावरील ' सदर ' पुण्याच्या मित्रांनी छान सजवली होती. हे सारे कलावंत होते. सदर दरबारातील सिहासन, इतर बैठका, कलाकुसर, रंगरंगोटी, याकडे तात्या ताम्हणकर विशेष लक्ष देत होता. येथे शिवराज्याभिषेक सोहळा उभारण्यात आला. संस्थेने यावेळची आठवण म्हणून सुंदर कॅलेंडर्स काढली होती.
                  राजगडाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे पद्मावती माची. येथे बहुतेक कार्यक्रम होत असत. या माचीवर वारा मात्र भयंकर ! जेवणावळीच्या पत्रावळी उडून जातील एवढा वारा इथं यायचा !
                गड जागरण सोहळा नीट पार पडावा म्हणून सिनिअर मंडळीनी कामाची वाटणी करून दिली होती. तरी काही प्रमाणात गोंधळ व्हायचा. ड्रेस,ढाली,तलवारी,भाले,पगडी,कर्णफुले आणि माळा, इतर दागिने, हे सारे भाड्याने आणलेले होते. काही मावळे या वस्तू व्यवस्थित पणे न ठेवता गोंधळ घालीत ! दिवसभर पहाऱ्याची व इतर कामे करून मावळे थकायचे. मग रात्री तंबूत आल्यावर अंगावरचा वेश, तलवार, पगडी काढावी त्यांच्या जीवावर येई ! ऊशाला पगडी ठेऊन बिचारे तसेच झोपेच्या अधीन व्हायचे !
             माझी ड्युटी होती सुवेळा माचीवर. मला पोशाख मिळाला नव्हता. त्यामुळे मी सिव्हिल ड्रेसमध्ये फिरायचो. मला एका सरदाराबरोबर मदतीला राहावे लागे. सरदाराचं नाव अशोक गायकवाड. याला हिरवाजर्द पोशाख व दरबारी पगडी मिळाली होती. त्याला तो पोशाख छान दिसायचा.
             आम्ही दोघे जुने मित्र होतो. सुवेळामाचीवर दोघे बरोबरीने कामे करीत होतो. सुवेळावरील या पहाऱ्यात वयस्कर मंडळी कमी. चौदा-पंधरा वर्षाची मुलेच जास्त. त्यांचेकडून कामे करून घ्यावी लागत. यात गंमत म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये एक उत्साही मावळा होता. त्याचे वय असावे ३०,३२. स्वभाव थोडा विक्षिप्त !
                 त्या रात्रीचा मुक्काम सुवेळावरील एका छोट्या पठारावर करायचे ठरले. मुक्कामी तंबू ठोकायचे होते. प्रथम सारेजण त्या जागेकडे निघालो. एका उत्साही मावळ्याच्या पाठीवर त्यावेळी सॅक होती. चालताना स्वतःच्या पायातले हंटर शूज त्याने पाठी सॅकला लटकावले होते. ते शूज लोम्बकळत आणि त्याच्याच पाठीला लागत !
                 तिन्हीसांजेेची वेळ.त्या परिसरात झाडे झुडुपे होती. त्या वाटेने चालताना पोरं आधीच टरकलेली. त्यात हा मावळा म्हणायचा- माझ्या पाठीकडे कोणीतरी आहे. सारखे धक्का देतेय मला ! . झाले, सारी पोरं घाबरली !
                 मग कसेबसे सगळेजण त्या पठारावर पोहोचलो. तेथे तंबू लावताना जवळपास साप-विंचू येऊ नयेत म्हणून सफाई सुरू झाली. इतक्यात ह्या मावळ्याने तिथला एक दगड उचलला, त्याखाली विंचू ! सगळे  ' विंचू विंचू...'असे ओरडू लागले. पुन्हा पोरं घाबरली. मग आम्ही तेथले दगड,गवत, सारे बाजूला सारले. थोडा जाळ केला. चांगली साफसफाई केली. नंतर तंबू लावले. अशोकने त्या मावळ्याला दम दिला. पोरांनाही समजावले. मग गंमतीजमती, विनोद सुरू झाले. पोरं मूडमध्ये आली.
                 राजगडावर एकीकडे गाणे-पोवाड्याच्या तालमी होत होत्या. आमच्यातले सातआठ जण मुंबईत तयारी करून आले होते. गोंधळगीत, नमन, पोवाडे,महाराष्ट्र गीत, असा आमचा जंगी शाहिरी बेत होता.आमचे शाहीर बाळ(विजय) पंडित. हा माझा दोस्त. मुंबईतील त्याच्या रिकाम्या खोलीमध्ये आमच्या तालमी महिनाभर चालत होत्या.
                 शाहिरी कार्यक्रम पद्मावतीच्या देवळात रात्री सुरू झाला. सुरुवातीला साबीर भाईंनी शिवकालीन पोवाडे म्हटले. हा माणूस पक्का शिवभक्त. स्वराज्याचा इतिहास,गडकोटांची इत्यंभूत माहिती यांना तोंडपाठ ! ते किर्तनकारही होते.
                 मुंबईच्या त्यावेळच्या दूरदर्शन टीमचे प्रसिद्द कलावंत जयंत ओक यांनी एक आगळीवेगळी क्रिकेटची कॉमेंटरी  सादर केली.( ते चित्रीकरणासाठी राजगडावर आले होते.)
                या कार्यक्रमाचा शेवट गमतीशीर झाला. एवढ्या रात्री उशिरापर्यंत आमचा शाहिरी कार्यक्रम तल्लीनतेने लोकं ऐकतात म्हणजे काय ? त्यामुळे एकापाठोपाठ एक अशी गीतं सादर होऊ लागली.(मी सुद्दा काही गीतं म्हटली. ) यावेळी आमच्यातल्या काहीजणांनी जरा बारकाईने नजर मारली, तर काय! आम्हाला दाद देणारे हे दर्दी प्रेक्षक अंथरून पांघरूण घेऊन आले होते, कधी एकदा आमचा कार्यक्रम संपतोय याची ते वाट पाहत होते !  कारण त्यांना तिथेच पथारी पसरायची होती !
                 असा हा ' राजगड जागरण सोहळा ' यथासांग पार पडला. सगळे शिवप्रेमी दुर्गप्रेमी राजगडाच्या ऐतेहासिक आठवणी मनी घेऊन परतीच्या प्रवासाला लागले.
                  त्यानंतर,दोन तीनदा या राजगडावर जाणे झालेय.  तेथे गेले की सारे आठवते. ते ऐतेहासिक क्षण जागे होतात. राजगडही पुनः जागा होतो आणि म्हणतो- '' या माझ्या मराठमोळ्या मावळ्यांनो, राजगड तुमच्यासाठी सदैव सज्ज आहे.!
                 
             
                                        -----------------------------

💐भटकंती मनसोक्त💐

 
               भटक्या दोस्तांनो, आता पाऊस अगदी जवळ आलाय. तीव्र असा उन्हाळा कातडी भाजून काढतोय खरा, पण मध्येच आकाशात दिसणारे काळे-निळे ढग अन अवचित येणारा जोरदार वारा पाऊस जवळ आल्याची चाहूल देत आहेत.  अशावेळी  भटकंती करताना आपलं 'अवकाश'   आपल्याला किती सहाय्यभूत ठरते,  याविषयी  तुमच्याशी सुसंवाद...............
   
  💐पदभ्रमणात अवकाशाचे महत्व....

(टिप:-- हा महत्वपूर्ण लेख मी पूर्वी एका पुस्तकामध्ये वाचला होता.भटकंती करताना उपयोगी ठरेल म्हणून मी तो लिहून माझ्या संग्रही ठेवला होता.  या वाचनीय पुस्तकाचे नाव व लेखक मला नीट आठवत नाहीत. याबद्दल क्षमस्व. मात्र हे सर्व लेखनश्रेय त्या ज्ञानी लेखकाचे आहे.)


                   पदभ्रमण करताना आपला संबंध जमिनीशी येतो, आकाशाशी नव्हे. तरीही पदभ्रमणास आकाश वरून सहाय्य करते, ही मोठी गंमतीदार गोष्ट आहे. मात्र आकाश स्वतः हुन मदत करीत नाही, ती मागावी लागते. ही गोष्ट अनेक पर्यटकांच्या ध्यानी येत नाही. त्यामुळे ते आकाशाच्या मार्गदर्शनास मुकतात. पण आकाशाचे सहाय्य कसे घ्यावे हे ज्याला एकदा नीट समजले, त्याची भटकंती उत्तरोत्तर  अधिकाधिक चांगली होऊ शकते हे निश्चित समजावे.
                    पदभ्रमणात काही अडचणीचे प्रसंग उद्भवतात. संध्याकाळी मुक्कामावर पोहोचण्यापूर्वीचे अंधार पडणे, मुक्कामाचे ठिकाण न सापडल्याने रात्री उघड्यावर राहण्याची पाळी येणे, जंगलात अडकणे, दिशा न समजणे, यांसारखे कठीण प्रसंग प्रत्येक भटक्याच्या वाट्यास केव्हा ना केव्हा येतात. त्याप्रसंगी आकाशज्ञान उपयोगी पडते. सूर्य, चंद्र, आणि तारे मदतीस येतात. ते प्रकाश तर देतातच, शिवाय दिशाही दाखवतात. सूर्य,चंद्र,आणि चांदण्यांची मदत मिळवण्यासाठी फार मोठ्या खगोलशास्त्राची नव्हे, तर थोड्याशा आकाश निरीक्षणाची जरुरी लागते. तसेच पंचांगाचे जुजबी ज्ञान असावे लागते. दिशा दाखविणारे काही मोजके तारे ओळखता येणे पुरेसे असते, तसेच सुर्योदय व सूर्यास्ताची अंदाजी वेळ आणि त्या दिवसाची तिथी ठाऊक असली की काम भागते. त्यासाठी पंचांग उघडावे लागत नाही.भिंतीवरच्या दिनदर्शिकेत तारखेच्या आकड्याजवळ तिथी असते आणि पानामागे छापलेल्या कोष्टकात सुर्योदय-सूर्यास्त सापडतात. एवढ्या छोट्या भांडवलावर भटकंती कशी आखावी ते आता पाहू.
             संधिप्रकाश--सुर्यास्तानंतर एक तास संधिप्रकाश रेंगाळतो. सव्वा ते दीड तासानंतर पूर्ण काळोख होतो. मुक्कामावर पोहोचण्यापूर्वी एक तासात सूर्य मावळल्यास एका तासात मुक्काम गाठता येईल अशा बेताने पावलांची गती वाढवावी. जंगलात वाट सापडत नसल्यास व सूर्यास्त झाल्यास अधिक वेळ न दवडता मुक्कामासाठी त्यातल्यात्यात योग्य, अशी जागा शोधून संधिप्रकाश मावळण्याच्या आत पाणवठ्यावरुन पाणी आणावे व चुलीसाठी सरपण गोळा करावे.
                   सुर्यास्ताची वेळ जरी ठाऊक नसली तरी सूर्य मावळण्यास किती अवधी शिल्लक आहे हे सूर्याच्या उंचीवरून ठरविता येते. क्षितीजापासून सूर्याची उंची अंशात मोजावी. त्याचे माप आपल्याच हातात असते. हात कोपरापासून ताट करून तळवा आडवा धरला की चार बोटांची रुंदी सहा अंश भरते. प्रत्येक बोटांची रुंदी दीड अंश असते. सुर्य क्षितीजापासून किती बोटे उंच राहीला आहे हे मोजावे व प्रत्येक बोटास सहा मिनिटे(म्हणजे प्रत्येक अंशास चार मिनिटे) धरून हिशेब करावा. उदाहरणार्थ, सुर्य आणि क्षितिज यांच्यामध्ये तीन बोटे आडवी मावत असतील तर सुर्यास्तास अठरा मिनिटे बाकी आहेत असे समजावे.
                 संध्याकाळी डोंगराच्या पश्चिम उतारावर प्रकाश रेंगाळतो, पण पूर्व उतारावर खूपच लवकर अंधार पडतो. पूर्वेकडची दरी सुर्य मावळण्यापूर्वीच अंधारात डुंबते. ही गोष्ट डोंगर उतरताना ध्यानात घ्यावी. आपण पश्चिम उतारावर असु(उदा.प्रबळगड) तर सूर्य मावळला तरी संधिप्रकाशात पायथ्याचे गाव गाठता येते. पण जर आपण पुर्व उतारावर असलो(उदा.चंदेरी किंवा पेब किल्ला) तर सुर्य मावळण्याआधी पायथा गाठणे आवश्यक असते.
            पहाटेचा संधिप्रकाश सुर्योदयापूर्वी एक तास दिसु लागतो. हिमालयातील भटकंतीत पहाटे शक्य तितक्या लवकर प्रवासास प्रारंभ करणे योग्य ठरते(कारण दुपारनंतर हवा बिघडु शकते.) म्हणुन त्या दिवसाचा ठरलेला टप्पा लवकर गाठण्यासाठी सुर्योदयापूर्वी एक तास प्रयाण करावे.
            चंद्रप्रकाश--सुर्य मावळल्यावर प्रवाशास चंद्राचा आधार वाटतो. पौर्णिमेस चंद्राचा  ्प्रकाश रात्रभर मिळतो, तसा अन्य तिथीस मिळत नाही. शुक्ल पक्षात चंद्र सायंकाळी आकाशात असतो. तर कृष्ण पक्षात तो पहाटे आकाशात दिसतो.सह्याद्रीमधील पदभ्रमणासाठी शुक्लपक्ष निवडावा. कारण सह्याद्रीत चंद्रप्रकाश सायंकाळी हवाअसतो, तर हिमालयात तो पहाटे हवा असतो. सह्याद्रीतील भ्रमण सायंकाळी उशिरा पर्यंत चालते. हिमालयात प्रवास मात्र पहाटे लवकर सुरु  होतो.
             सायंकाळी चंद्र केव्हा मावळेल हे तिथीवर अवलंबून असते. शुक्ल अष्टमीचा चंद्र मध्यरात्री मावळतो.चतुर्थीची चंद्रकोर पूर्वरात्री मावळते, तर द्वादशीचा चंद्र उत्तररात्रीपर्यंत प्रका देतो. यासंबंधी ढोबळ नियम असा:- तिथीच्या आकड्याची पाऊण पट करावी. सुर्यास्तानंतर तेवढ्या वेळाने चंद्रास्त होतो. उदा.तृतीयेचा चंद्र सुर्यास्तानंतर सव्वादोन तासांनी मावळतो. शष्टीचा चंद्र सुर्यास्तानंतर साडेचार तासांनी मावळतो.
              पहाटे चंद्रोदय केव्हा होईल हे ठरविण्यासाठी जरा वेगळे गणित करावे. तिथी पंधरामधून वजा  करून येणाऱ्या आकड्याची पाऊण पट करावी. सुर्योदयापूर्वी जितके तास चंद्रोदय होईल असे समजावे. उदा.कृष्ण दशमीचा चंद्र सुर्योदयापूर्वी पावणेचार तास उगवतो. कृष्ण द्वादशीचा चंद्र सूर्योदयाच्या सव्वादोन तास अगोदर उगवतो.कृष्ण अष्टमीचा चंद्र मध्यरात्री उगवतो. मात्र कृष्ण एकादशीनंतर चंद्रकोर क्षीण झाल्याने पुरेसा प्रकाश देत नाही हे लक्षात ठेवावे. तसेच शुक्लपक्षात चतुर्थीपर्यंत पुरेसा चंद्रप्रकाश नसतो.
               भरती-ओहोटी:--सागरतीरावरील भटकंतीत समुद्रस्नानाचे मोठे आकर्षण वाटते. परंतु भरती-ओहोटीचा विचार न करता समुद्रात शिरल्यास जीवावर बेतण्याचा संभव असतो. तसेच सागरी किल्ले बघताना भरती-ओहोटीच्या वेळा सांभाळाव्या लागतात. भरती-ओहोटी चंद्रावर अवलंबुन असते. चंद्र उगवताना तसेच मावळताना ओहोटी पूर्ण होते. चंद्र जेव्हा डोक्यावर येतो(तसेंच पायाखाली असतो) तेव्हा भरती पुर्ण होते. पौर्णिमा आणि अमावास्येला मध्यान्हवेळी तसेच मध्यरात्री भरती पुर्ण होते. अष्टमीस सुर्योदय-सुर्यास्ताच्यावेळी भरती असते. तिथीवरून भरतीची वेळ ठरविण्याचा ढोबळ नियम असा:-तिथीच्या आकड्याची पाऊण पट करावी. तितक्या वाजता भरती पुर्ण होते असे समजावे. उदा.चतुर्थीस दुपारी तीन वाजता आणि रात्री तीन वाजता भरती असते. शष्टीस दुपारी साडेचार वाजता तसेच पहाटे साडेचार वाजता भरती असते.

          दिशादर्शक तारे:-ध्रुवतारा नेहेमी उत्तरेस असतो हे सर्वांना ठाऊक आहे. सप्तर्षीवरून धृवतारा ओळखतात.ध्रुवताऱ्या व्यतिरिक्त  अन्य काही ताऱ्यांची दिशा ओळखण्यास मदत होते. अगस्तीचा ठळक तारा दक्षिणेस असतो. मित्र-मित्रक ताऱ्यांची जोडी दक्षिणेस दिसते. त्रिशंकूवरून दक्षिण दिशा ओळखावी. वृक्षिक रास जेव्हा उभी दिसते तेव्हा ती आग्नेय दिशेस असते. मात्र ती जेव्हा आडवी दिसते तेव्हा नैरेत्य दिशेस असते. सिंह राशीतील सिंहाचे डोके पश्चिमेकडे असते, तर शेपूट पूर्वेकडे असते. मृग नक्षत्रातील हरिणाचे पुढचे पाय उत्तरेकडे तर मागचे पाय दक्षिणेकडे असतात. एवढ्या नक्षत्रांची ओळख दिशा ओळखण्यास पुरेशी असते.
           पहाटे आणि सायंकाळी चंद्रकोरीवरून दिशा समजते. चंद्रकोर जेव्हा पहाटे दिसते तेव्हा ती पूर्व दिशेस असते. त्याउलट सायंकाळी दिसणारी चंद्रकोर पश्चिमेस असते. चंद्रकोरीची दोन टोके दक्षिणोत्तर दिशा दाखवितात.
               मध्यान्हवेळेस सुर्य डोक्यावर असल्याने दिशा ओळखणे कठीण जाते. परंतु वर्षातुन फार थोडे दिवस सुर्य बरोबर डोक्यावर येतो. मुंबई सारख्या ठिकाणी(उत्तर अक्षांश-१९)तो बहुधा दक्षिणेस असतो. मे महिन्याच्या मध्यापासून जुलैअखेर पर्यंत अडीच महिने वगळता अन्य काळात मुंबईत मध्यान्हवेळेस सुर्य दक्षिणेकडे झुकलेला असतो. त्यामुळे आपली सावली उत्तरेस पडते. अर्थातच सावलीवरून दिशा समजते.
              पदभ्रमणाची आखणी करताना तसेच पदभ्रमणातील कठीण प्रसंगी आकाशातील ज्योती       सहाय्य करतात हे तर खरेच, त्याशिवाय त्या प्रवाशाला अनोखा आनंदही देतात. तारकांनी खच्चुन भरलेले आकाश आपणांस एक वेगळीच अनुभूती देते.
              असे आकाशदर्शन शहरातून घडत नाही. धूळ,धूर, प्रदुषण आणि विजेच्या दिव्यांचा झगझगीत प्रकाश यांचेमुळे आकाशगंगा, तेजोमेघ आणि तारकापुंज यांचे दर्शन शहरांत कधीही घडत नाही. पदभ्रमणात ही संधी अनायासे प्राप्त होते.......

                                             ...........................................                                                          आपल्या प्रतिक्रियेसाठी--
                                                  yescharudatta@gmail.com
                                                         phn no.-7588727522.