Saturday, 1 May 2021

💐💐अद्भुत💐💐

           मुंबई हे बहुरंगी, बहुढंगी शहर आहे, म्हणजे पूर्वीपासून ते असेच आहे.

              अशा या शहरात चांगल्या माणसांप्रमाणे लफंगे आणि भामटेही राहतात. ते सर्वत्र वावरत आपले सावज निरखत असतात. आपण थोडे जरी बेसावध किंवा गाफील राहिलो, तरी आपल्यावर ते कधी नजरबंदी करून(म्हणजे नजरेला नजर देऊन), नाहीतर हलकासा स्पर्श करून भुरळ घालतील, क्षणात आपल्याजवळची  मौल्यवान वस्तू लुबाडून घेऊन पसार होतील याचा काही नेम नसतो.

               हा संमोहनाचा प्रकार असतो. लफंगे यात हुशार असतात. 

               गोड बोलत भूरळ घालून संमोहित करून असे लुटमारीचे पूर्वी घडलेले चार प्रसंग सांगताना, एक संमोहन प्रयोग मला कसा अद्भुतआणि प्रबोधनपर वाटला तेही नंतर सांगणार आहे………..  

*प्रसंग पहिला-

               दर शुक्रवारी भरणाऱ्या मुंबईतल्या चोर बाजारात एकदा मित्रासह फेरफटका मारायला गेलो होतो. तेथे एका गल्लीत फिरत असताना आमच्या मागे एक तरूण येऊन अगदी दिनवाणा चेहेरा करीत, ‘ घडी चाहीये ? लेलो, लेलो, रिकोकी घडी है,…..’ असे म्हणत मागे मागे येऊ लागला.

               आम्ही त्याला, ‘ नही चाहीए घडी हमे ‘, असे उत्तर देत कटवत होतो.

               तो चिवट होता, ‘ देखोना, रिको की घडी है, मै कम करुंगा दाम ’, असे हात लावून आम्हाला विनवू लागला.

               अखेर त्याने आमचे लक्ष त्याच्याकडे वळवले. दोघेही त्याच्या मागे चालू लागलो. चालताना आमचे बोलणे सुरू झाले- ‘ कितनेमे देगा घडी ?’.

                  अडायसो रुपये ‘.

                  नही चाहीये ‘,

                  लेकिन देखो तो ? घडी रिको कंपनी की है ‘.

                  मगर हमे नही लेना है.

                  अरे साहब, देखो तो सही ‘.

                  ठीक है, मगर बहुत महंगी है. लास्ट कितनेमे दोगे बोलो ?’  

                   अडीचशे, दोनशे, दिडशे, शंभर असे करीत होता. आम्ही त्या घड्याळाची किंमत वीस रुपयांपर्यंत खाली आणली !

                  आता पैसे देऊन घडयाळ घ्यायला आम्ही खिशात हात घालणार, तोच त्या तरुणाने घाबरा चेहरा करीत आम्हाला म्हटले,

                 रुको, रुको, पैसे यहा मत निकालो ‘, थोडे साईडमे चलो, उधर मै पैसे लेकर आपको घडी देता हूं ‘,

                 मग त्याने आम्हाला दुसऱ्या गल्लीत नेले.

                 तेथे आम्ही प्रथम ते घडयाळ मागितले. त्याने एका पुडीमध्ये ते बांधून ठेवले होते. ती पुडी उघडून दाखवली. आम्ही लगेच पैसे दिले पुडी हाती घेतली.

                 मी ती लगेच उघडायला लागलो तेव्हा त्याने आम्हाला, ‘ नही, नही पुडी इधर मत खोलो.  बादमे खोलो. इधर कोई देखेगा……’ हे सांगून तो पटकन निघून गेला !

                 अडीचशे रुपयाचे रिको कंपनीचे घड्याळ केवळ वीस रुपयात विकत घेतल्याचा आनंद व्यक्त करीत आम्ही दोघे बस स्टॉपवर पोहोचलो. लगेच आलेली डबलडेकर बस पकडली. वरच्या डेकवर बसलो, तिकिटे काढली आणि मग उत्सुकतेने घड्याळाची पुडी उघडली तेव्हा आम्हाला धक्काच बसला ! त्या पुडीमध्ये दोन दगडाच्या कपरी निघाल्या !

                  चतुर लफंग्याने आम्हाला संमोहित करून लुटले होते.

*प्रसंग दुसरा-

                 माझी धाकटी बहीण एकदा दळण आणायला जवळच्या पीठ गिरणीवर गेली होती. तासभर झाला तरी ती आली नाही, म्हणून आईने मला बघायला बाहेर पाठविले. मी निघालो. वाटेत आमच्या शेजारचे एक काका बहिणीला घेऊन येताना मला दिसले ! हातात दळणाचा भरलेला डब्बा आणि नजर भरकटलेली असा बहिणीचा चेहरा झाला होता !

                 काका म्हणाले, ‘ अरे, मी येताना ही गल्लीत अशीच डब्बा घेऊन उभी राहिलेली बघितली. तीला विचारल्यावर रडायलाच लागली. माझ्या कानातले रिंग काढले कोणी तरी ‘, असे म्हणत होती. तसाच तीला घेऊन तुमच्याकडे निघालो…..’

                 घरी आईने बहिणीचा चांगलाच समाचार घेतला. नॉर्मल झाल्यावर बहिणीने सारी घटना सांगितली. पीठ गिरणीतून बाहेर पडल्यावर तीला एक भामटा भेटला. गोड गोड बोलत त्याने , ‘ अग मुली तू कानात दागिने घालून बाहेर का पडलीस ? कोणी तुला पळवले तर ? तू अजून लहान आहेस ना ?’, असे म्हटले तीला धीर दिला.

                 तीला त्याची भुरळ पडली. तीने कानातल्या सोनाच्या रिंगा लगेच काढून त्या लफंग्याच्या हाती ठेवल्या तीला तेथेच थांबायला सांगून भामटा सटकला. खूप वेळ ती तशीच उभी राहिली डब्बा हाती घेऊन !

                 हा प्रसंग जुना असला तरी अजून माझ्या लक्षात राहिलाय.

*प्रसंग तिसरा-

                 मुंबईतील वेस्टर्न रेल्वेमार्गावरचे वर्दळीचे स्टेशन मालाड. आम्ही तिघे मित्र त्या स्टेशनबाहेर भेटायचे ठरले होते. दोघे अगोदर येऊन तिसऱ्या मित्राची वाट पाहू लागलो. स्टेशन बाहेर स्टीलच्या मोठ्या रेलिंग्स लावलेल्या आहेत. तेथे बरेच ग्रुप उभे होते. आम्ही पण तेथे उभे राहिलो गप्पा मारू  लागलो.

                 काही वेळाने अचानक एक हसतमुख तरुण आमच्या जवळ आला. माझ्या मित्राच्या खांद्यावर हात मारून त्याने अरे, इथे कधी तुम्ही आलात ?’ असे विचारीत विचारीत आग्रहाने त्याने मित्राला नेले ते नेलेच ! इकडे मी मित्राची वेड्यासारखी वाट पाहात राहिलो.

                 अर्धा तास झाला तरी मित्राचा पत्ता नव्हता, मी इथली जागा सोडूपण शकत नव्हतो. इतका वेळ झाला तरी त्यामित्राने या मित्राला अजून सोडले कसे नाही ? याचे मला कोडे पडले. आमचा तिसरा मित्रही अजून आला नव्हता.

                 एक तासानंतर मित्र येऊन माझ्यापाशी येऊन उभा राहिला. त्याला मी,’  इतका वेळ तुम्ही कुठे होतात ? ‘ हे विचारल्यावर मित्राने हतबल होऊन सगळी स्टोरी मला ऐकवली.

                 तो लफंगा मित्राचा कोणी दोस्त वगैरे नव्हता. केवळ बोलण्यात भुरळ घालून दोघांची दोस्ती असल्याचे त्याने भासविले आणि, ‘ हे सोन्याचे दागिने असल्या ठिकाणी गळ्यात कशाला घालता तुम्ही ?’, असे सांगून कधी गळ्यातून त्याने सोन्याची  चेन काढून घेतली येतो लगेच ‘, असे म्हणून निघून गेला ते मित्राला उमगलेच नाही !

                मी लुटला गेलोय रे……माझी साडेतीन तोळ्यांची जाडी चैन होती रे…… ‘,  मित्राप्रमाणे मलाही शॉक बसला होता. त्याला मी खोटा खोटा धीर देत शांत केले. काही वेळाने आमचा तिसरा मित्र आल्यावर पोलिसात या लुटीची माहिती देऊन आम्ही रीतसर तक्रार केली.

                  सुदैव म्हणजे पोलिसांनी त्या परिसरात अशा प्रकारे लुटीच्या घटना घडत असल्याचे सांगून बारीक लक्ष ठेवले. काही महिन्यानंतर एका टोळीला पोलीसांनी पकडले. नंतर मित्राला त्याच्या गेलेल्या सोन्यापैकी काही सोने पोलिसांनी मिळवून दिले.

* प्रसंग चौथा-

               ही अलीकडच्या सहा महिन्यातली घटना आहे. आमच्या बिल्डिंगमधील एक साठी गाठलेला रहिवाशी काही कामासाठी नेहेमीप्रमाणे सकाळी दहा अकराच्या सुमाराला बाहेर पडला. रस्त्यात त्यावेळी तुरळक माणसे होती.  

               याच्या गळ्यात सोन्याची चेन होती. एक चोरटा त्यांच्यावर पाळत ठेवून होता. मग तो गोड बोलत  त्यांचेजवळ आला. गप्पा मारत त्यांच्या बरोबर चालत राहिला. त्यानंतर त्या लफंग्याने बोलण्यात भुरळ घालून या माणसाची सोन्याची चेन काढून घेतली. या गृहस्थाला आपल्या घरी पाऊल टाकेपर्यंत हे समजलेच नाही !

               या चार प्रसंगांत एकच लुटीचे तत्व वापरले गेले होते, ते म्हणजे माणसाला भुरळ पाडणे, मोहिनी घालणे म्हणजेच संमोहित करणे.

               असे लुटीचे प्रसंग तुमच्यापैकी काहींनी अनुभवले असतील. आपल्या अवती भवती असे प्रसंग यापुढेही घडू शकतात. गाफील असलेल्या एकट्या व्यक्तीला संमोहित करून अगदी कमी वेळात त्याच्याकडील जोखमीची, मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करण्यात असे गुन्हेगार माहीर असतात.

               वास्तविक संमोहन ही चांगली कला आहे. तीचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हायला हवाय. मात्र तसे घडत नाही. त्याचा दुरुपयोग जास्त होतो.

               योगायोगाने मला संमोहनाची ओळख एका स्टेज कार्यक्रमातून झाली. तो संमोहनप्रयोग मला अद्भुत वाटला. तुम्हाला जर हे अदभुत ज्ञान (माहिती नसेल तर) ज्ञात व्हावे असे मला वाटते…………

 

💐संमोहन कला : वापर आणि गैरवापर💐

             दादर येथील एका मोठ्या हॉलमध्ये संमोहनाची ओळख प्रात्यक्षिक प्रयोग, अशा स्वरूपाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याची जाहिरात मी पेपरला वाचली होती.

                 मनोहर नाईक ही महाराष्ट्रातील सुपरिचित अशी तज्ञ व्यक्ती संमोहन या विषयावर सर्वत्र जाहीर कार्यक्रम करायची. त्यांचाच हा स्टेज शो होता. मी मुद्दाम वेळ काढून मित्र आईसह त्या कार्यक्रमास हजर राहिलो. हा संमोहन प्रयोग मला आवडला. विशेष म्हणजे तो प्रबोधनपर होता.   

                 स्टेजवर मनोहर नाईक यांनी सुरुवातीला संमोहन हे शास्त्र असल्याचे सांगून त्याची सोप्या शब्दांत ओळख करून दिली. संमोहनाचा गैरवापर का कसा होतो, त्यामुळे आपले फायदे कोणते होतात, हे शिकण्याचे मार्ग कोणते ते सर्वांना सांगितले. त्यानंतर मुख्य प्रयोगाला त्यांनी सुरुवात केली.

                 स्टेजवर १२ ते ८० वयापर्यंतचे स्त्री पुरुष यावेत. त्यांचेवर संमोहनाचे प्रयोग केले जातील, मात्र कोणालाही त्याचा त्रास होणार नाही, असे जाहीर आश्वासन मनोहर नाईक यांनी दिले. त्यांच्या आवाहनानंतर ६०/७० जणांची झुंडच्या झुंड स्टेजकडे निघाली !

                 मग मनोहर नाईक आणि त्यांच्या सहाय्यकांनी मुले, मुली वेगळे उभे केले. त्यांची नजर स्वतःच्या नाकावर स्थिर करून डोळे बंद करण्याच्या त्यांना सूचना दिल्या. साऱ्यांनी तसे केले. सर्वजण एकाच अवस्थेत उभे राहिले आणि ज्यांनी सूचना नीट फॉलो केल्या, ते  पुर्णतः संमोहित झाले !

                आता संमोहितांना सूचना मिळू लागल्या-‘ तुम्ही असे करा, तसे करा……’ लगेच सगळे तशी कृती करू लागले !

                बसणे, झोपणे, लहान मुलासारखे रांगणे, बोट चोखणे, बोबडे बोलणे, अशी बोलणी आम्ही समक्ष पाहू लागलो ! आपण मुली किंवा मुलगा झालो तर ? तर कसे वागू-बोलू, म्हातारपणी कसे वागू ? याविषयी जशा सूचना मिळायच्या, तसे हावभाव संवाद स्टेजवरची संमोहित व्यक्ती करीत होती !

               नाईक यांनी त्यांना आणखी काय काय करायला लावले माहीत आहे ?

               वक्ता झालात तर भाषण कसे देणार, नाचायचे कसे, भरतनाट्यम नृत्य कसे कराल, ढोलकी कशी वाजवायची, असे प्रश्न विचारले जायचे कृतीची सूचना मिळाली की, स्टेजवर तशी दृश्यं संमोहित व्यक्तींकडून सुरू व्हायची !

               हा अद्भुत प्रकार माझ्यासह संपूर्ण हॉलमधील प्रेक्षक अवाक होऊन बघत होते. ‘ पूर्व जन्मातील आठवण काढा ‘, असे म्हटल्यावर स्टेजवर कोणी मनोगत बोलायला लागायचे. आपली मनातली सुप्त इच्छा संमोहितांकडून प्रकट होताना मी प्रत्यक्ष इथे पाहात होतो !

               आपल्या स्वतःमध्ये संमोहनामुळे कशी ताकद येते, हे मनोहर नाईक यांनी सर्वाना या सामूहिक संमोहन प्रयोगानंतर सांगितले पुढील प्रयोग सुरु केला.

               त्यांनी प्रेक्षकांना जाहीर आवाहन करून स्टेजवर दोन व्यक्तींना बोलावले. त्यापैकी एक व्यक्तीला खुर्चीवर आडवे झोपण्यास सांगण्यात आले. तीच्या डोक्यापाशी एक खुर्ची, खाली मध्यभागी दुसरी पायापाशी एक, अशा तीन खुर्च्या ठेवल्या गेल्या. संमोहित झाल्यानंतर ती व्यक्ती लाकडासारखी ताट झाली !

               मग तीच्या खाली ठेवलेली मधली खुर्ची काढून टाकण्यात आली. नंतर दुसरी व्यक्ती त्या आडव्या ताट झालेल्या शरीरावर निर्धास्तपणे उभी राहिली ! हे सगळे अद्भुत दृश्य होते.

               संमोहन तज्ञ मनोहर नाईक या प्रयोगानंतर म्हणाले-‘ बरेच भोंदू साधू, भामटे-लफंगे या संमोहनाचा,  यातून मिळालेल्या ज्ञानाचा गैरवापर करतात, एकाकी लोकांना लुबाडतात. त्यामुळे आपण सदैव सावध राहून स्वतःचे इतरांचे संरक्षण केले पाहिजे.

                 लोकांनी यातून जागृत व्हावे म्हणून मनोहर नाईक यांनी कितीतरी प्रबोधनपर प्रयोग महाराष्ट्रभर करून संमोहनाचे ज्ञान कसे उपयुक्त ठरते, याचा प्रचार केला आहे. याविषयी त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्द असून संमोहनाच्या माध्यमातून विविध रुग्णांवर त्यांनी उपचार करुन त्यांना बरे केले आहे. संमोहनाचे प्रशिक्षण गरजू लोकांना देऊन त्यांनी मदत-मार्गदर्शनसुद्दा केलेले आहे.

                 तर स्नेही मंडळींनो, आपण सदैव सावध असावे, इतरांनाही सावध करावे, हेच आवाहन आपणास या निमित्ताने मी करीत आहे.

 

                                                                         ::::::::::::::::::::::::::