Wednesday, 1 April 2020

💐💐समाज संवेदना💐💐


💐💐
                    मिडीया’, ज्याला आपण मराठी भाषेत प्रसार माध्यम म्हणतो,  हे  प्रसार माध्यम पार गावपातळीपासून ते थेट जगभरातल्या घडामोडी  आणि  बित्तमबातम्या  तुमच्यापुढे  पूर्वीपासून मांडत आलेय. पूर्वी फक्त वर्तमानपत्र आणि आकाशवाणी ही दोन माध्यमं कार्यरत होती. आज मिडीया परिवार मोठा झालाय. उपग्रहाच्या मदतीने टीव्ही, इंटरनेट आणि अध्ययावत प्रसार माध्यमे आज जगभरातील घराघरांत परिचित झालेली आहेत.
                    या प्रसार माध्यमांमध्ये आजही अग्रणी प्रभावी असणारी  दैनंदिन वृत्तपत्रे  प्रत्येक जागत्या तसेच जिज्ञासू  वाचकाच्या  आयुष्यात जवळीक ठेवून आहेत..
                   अशा या प्रभावी प्रसारमाध्यमात  म्हणजेच  वृत्तपत्रात,  स्वेच्छेने  पत्र  लिहून सामाजिक समस्या आपल्या परीने मांडणाऱ्या आणि  त्या सोडविण्याचा प्रयत्न करणारे काही  प्रामाणिक वृत्तपत्र लेखक  येथे भेटणार आहेत……….......


💐लिहू कशाला ?.......
               ही घटना आहे १९९३ मधली.  मराठी वृत्तपत्र लेखक संघया मुंबईतील प्रसिद्द संस्थेच्या  कार्यक्रमाला  मी गेलो  होतो. बरोबर एक मित्र होता. ‘वृत्तपत्रातील आपली अप्रकाशित पत्रे  या विषयावर बोलायची स्पर्धा होती. मित्र या स्पर्धेत भाग घेणार होता.
               पत्रलेखक मित्राने या स्पर्धेत त्याच्या अप्रकाशित पत्राबद्दलचे मत सांगितले. एका प्रसिद्द लेखिकेने महाभारतासंदर्भातील एका लेखात विदुरावर खालच्या पातळीवर टीका केली होती. हा लेखन प्रकार ठीक नव्हे, अशा आशयाचे मित्राने पाठविलेले पत्र वर्तमानपत्रात  छापले गेले नाही.
               आणखी एका पत्रलेखकाने आपला अनुभव ऐकवला- संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात जे १०५  हुतात्मे झाले, त्यांच्या स्मारकाचे काम महापालिका  करणार होती. याबाबत हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी जी १०५  नावे कोरली, त्यातील काही नावे चुकीची आहेत, आडनावं चुकीची आहेत, अशा आशयाचे पुराव्यासहीतचे पत्र एका मान्यवर वर्तमानपत्रास  त्यांनी प्रसिद्दीसाठी  पाठविले. त्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या ! वर, पत्रलेखकाने केलेल्या पाठपुराव्यास अपमान सोसावे लागले. पार  अत्रे, गडकरी यांच्यापर्यंत संपर्क साधला. पण वाद झाले. तरी  त्यांनी   प्रयत्न सोडले नाहीत. एक वर्षानंतर मात्र याची दखल घेतली गेली. योग्य  कार्यवाही झाली आणि  त्यांचे पत्रदेखील  छापले गेले !
              पुण्याजवळील एक थोर व्यक्तीच्या उतारवयातील आर्थिक हालाची कहाणी एका पत्र लेखकाने  वर्तमानपत्राला कळविली. सरकारने मानधन द्यावे हा हेतू होता. पण उपयोग झाला नाही. पण एक गंमत झाली !
             काही कालावधीनंतर याच आशयाची एक बातमी  त्यापेपरला आली. पत्रकारांनी त्या वयोवृद्ध व्यक्तीची मुलाखत वगैरे घेतली. पत्रकार परिषदही  झाली.  त्याव्यक्तीला अखेर  न्याय मिळाला ! या पत्रलेखकाला काहीच प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र त्याच्या पत्रलेखनाचे  सार्थक झाले.
             या  स्पर्धात्मक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रतापराव माने हे अनुभवी वक्ते होते. त्या  संघाचे मान्यवर  सदस्यही  होते. या विषयावर ते बरेच बोलले. २५० च्या वर पत्रे लिहिली आहेत त्यांनी  वर्तमानपत्रात !  ते व्याख्यानमालेत व्याख्यानही देतात.आपल्या भाषणात  ते म्हणाले  की,  ‘’आपल्या पत्रात नुसत्या तक्रारी नसाव्यात. इतर विषय सुद्दा असले पाहिजेत.’’
             ‘’ आपली पत्रं प्रसिद्द होत नाहीत, म्हणून नाराज कशाला व्हायचे ? माझी तर बरीच पत्रे प्रकाशित होत नाहीत. मला त्याचे काही वाईट वाटत नाही ! मध्यंतरी एका पेपरला चांगला एक लेख लिहुन पाठवला होता. तर माझ्याऐवजी रामकृष्ण बजाजानी लिहिलेले अगोदर छापले गेले ! माझे नंतर !’’
             हा  कार्यक्रम लक्षपूर्वक पाहात आणि ऐकत असताना माझ्या मनात सहज आले, की आपणसुद्दा वृत्तपत्रात काही पत्रलेखन  केलेय, त्यावर बोलूया. त्यानंतर आयोजकांना विनंती केली. त्यांनी बोलायला संधी दिली. त्यावेळी बोलताना दोन पत्रांचे संदर्भ दिले.
             १९९० च्या फेब्रुवारीत  .टा. मध्ये धावते जग या सदरात निसर्ग    पर्यावरणावर एक संक्षिप्त लेख प्रसिद्द झाला होता. शिर्षक होते गुदमरली गंगामैय्या ‘. पर्यटनाच्या निमित्ताने वर्दळ वाढलेले हिमालयाच्या कुशीतील गंगोत्रीहे प्रसिद्द तीर्थक्षेत्र पर्यावरणाच्या समतोलास अडथळा ठरेल, अशा आशयाचा हा लेख मी वाचला होता. त्यातील काही  माहिती अर्धवट चुकीची वाटली. म्हणून  .टा. ला  पत्र लिहिले की, ‘ प्रत्यक्षात, गंगोत्रीच्या पुढे गोमुखपर्यंत गाड्या इतर वाहने जात येत नाहीत. तशी परिस्थिती पण नाही. गंगोत्रीच्या पुढे वाहन जाण्यासारखा रस्ता अथवा वाट नाही. फक्त मिलिटरीच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड आहे. खेचर,गाढव,घोडे, डोली वाहून नेण्यासाठी कच्ची पायवाट आहे.’ हे पत्र छापले गेले नाही.
             वास्तविक, अशा अर्धवट माहितीच्या लेखांमुळे  नवख्या आणि अज्ञानी वाचकांची दिशाभूल होते. तेव्हा खरे काय ते वाचकांसमोर यायला नको ? 
             दुसरे पत्र  नवाकाळ या वर्तमानपत्रास  पाठविले होते. बसमध्ये एका कंडक्टरने नोटांवरून खालच्या पातळीवरचे भांडण  केले, त्याबाबतची तक्रार होती. ते छापले गेले नाही.
             आपल्याला ही  वर्तमानपत्रास पत्र पाठवण्याची पद्धतच बरोबर वाटत नव्हती. निदान त्या कार्यक्रमापूर्वी  तसे वाटत होते. मात्र  नंतर वाटू लागले, की ही लिहिलेली पत्रे खूप काही करू शकतात. आपण  फक्त, ‘ पेपरमध्ये प्रसिद्दी मिळून काय होणार ? समस्या प्रश्नांवर कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे त्यासाठी लिहूपत्र बित्र  ? ‘,  हीच भावना बाळगत होतो.
             पण यापुढेही आपण  पत्रे  लिहून  वृत्तपत्रांना पाठवायला हवीत. त्याद्वारे भोवतालच्या  समस्या-प्रश्नांना वाचा फोडायला हवीय, असे वाटू लागले  आणि  मग, ‘ लिहू कशालाम्हणणारा मी पुन्हा लिहिता झालो !..........

                                                            ----------------------------