Wednesday, 1 January 2020

💐मनातलं जनात💐


💐मनातलं जनात💐


               महाराष्ट्रातील प्रसिध्द असलेली मॅजेस्टिक प्रकाशन संस्था, मुंबई यांनी विविध विषयांवरची हस्तलिखिते प्रकाशनपूर्व तपासणीसाठी मागविण्याची एक योजना जाहीर केली होती. हस्तलिखित साहित्य प्रकाशनयोग्य आहे अथवा नाही प याची तपासणी अभ्यासू व चिकित्सक, जाणकारांमार्फत होणार होती.
                आपण पुस्तक लिहिण्याएवढे कोणी लेखक-साहित्यिक नाही. आपण छंद म्हणून लिहितो.  त्यामुळे मनात असलेले दैनंदिनीत येते. व्यक्तही होता येते. दैनंदिनीचे अशा लिहिण्याला श्रेणी कोणती असेल ? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी तपासणी आवश्यक वाटली, शिवाय, या दरम्यान भटकंती आणि इतर विषयांवरील काही लेख प्रसिद्द होत होते  साप्ताहिक, मासिक, आणि नियतकालिकांत.
                त्यामुळे तज्ञ साहित्यिकाच्या निरीक्षणानंतर आपल्याला ज्ञात होईल की आपण नेमके कुठे उभे आहोत ! हे विचार मनी धरून मी दैनंदिनीचा एक भाग प्रकाशकांकडे पाठविला. त्यात सगळे स्पष्ट केले होते.
               काही महिन्यांनंतर सविस्तर टिप्पणीसहीत एक पत्र मला प्राप्त झाले. ते वाचले. मनी गंभीर झालो. नेमक्या उणीवा समजल्या. यापुढे दैनंदिनी लिहिताना सुधारणा करायची, असे ठरवून लिखाणात सुधारणा करीत राहिलो. एकदम नाही पण हळूहळू वळणे घेत लिहीत राहीलो.
               आज या दैनंदिनी लिखाणात सातत्य नसले तरी लिहिणे थांबलेले नाही. उलट दररोजच्या घडामोडी आणि भवतालचे वास्तव अधिक लिहिते करीत आहे.
               आपल्या सरधोपट दैनंदिनी लिखाणावर मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेसारख्या जाणत्या प्रकाशकांनी अभ्यासपूर्ण टिप्पणी करून अभिप्राय द्यावा, हे मी भाग्य समजतो.
               आज ही टिप्पणी जशीच्या तशी तुमच्यापुढे अशासाठी ठेवीत आहे, यदाकदाचित माझ्यासारख्या कोणी सहप्रवाशाला(छंदिष्ठ लेखन करणाऱ्या) त्याचा उपयोग होईल.
💐प्राध्यापक वि. रा. जोग यांची समीक्षण टिप्पणी—
             ‘’  ‘मॅजेस्टिक प्रकाशना’ कडे पाठविलेले, आपल्या दैनंदिनीचे सुमारे दीडशे पृष्ठांचे हस्तलिखित वाचले. गेली सुमारे पंधरा वर्षे आपण जी दैनंदिनी लिहित आहात त्यातील ४/८/८६ ते २०/११/८७ या काळावधीतील ही पाने !
लिखाणावरून कळते की आपण (एक) मनस्वी आयुष्य जगता……ज्यात पोटासाठी चाकरी आहे, आईबाप-बहीण असे आप्त आहेत मुख्य म्हणजे आपला गिर्यारोहकांचा मेळा(ग्रुप) आहे आणि त्यातल्या अनेक तरुण-तरुणींसह तुम्ही कितीएक दुर्गभ्रमणादि मोहिमा केवळ छंद म्हणून पदर मोडून केल्या आहेत. तुमच्या यानिमित्ताने होणाऱ्या ओळखी-पाळखी आणि जुळत-तुटत जाणारे स्नेहबंध हाच तुमच्या या दैनंदिनीचा गाभा आहे. लिहिता लिहिता स्वतःचे हताशपण, उदासी, एकाकीपण व क्वचित तृप्तीही तुम्ही नोंदवता. या अशा भटकंतीच्या हौसेबरोबरच भिन्न भाषी चित्रपट पाहणे आणि त्याबद्दलच्या स्वतःच्या प्रतिक्रिया नोंदवणे तुम्हाला आवडते. वडीलधाऱ्यांच्या आपलं संगतीचेही तुम्हाला आकर्षण आहे. थोरांच्या मुलाखती घेऊन शक्यतर छायाचित्रासह त्या कुठल्या ना कुठल्या नियतकालिकात प्रकाशित व्हाव्यात अशीही तुमची आस आहे. तुमच्यात एक इहवादीही दडला आहे. म्हणून पूजा अर्चा- ह्यात तुम्ही गुंतत नाही. यौवक ऑन तुमच्या या दैनंदिनीत राजकारण मात्र जराही न यावं हे आश्चर्याचं वाटतं (अर्थात आजच राजकारण उबग आणणारं नकोसंच आहे म्हणा !) आणि एक….विवाह-बंधनातबद्दल तुम्ही मुग्ध का ? का हा एक गंड आहे.
             अर्थात या साऱ्यात केंद्रस्थानी आहे तो तुमचा पदभ्रमणाचा सळाळता, चेतनदायी छंद. त्यासाठी तुम्ही तुमचे बजेट कोसळवता, आप्तांच्या ‘ओव्या’ झेलता, गृपच्या मिटिंगसाठी आणि इतर संपर्कासाठी कितीतरी पायपिटी करता…..का केवळ हा छंद म्हणून.
             ‘तुमचं लेखन’ आणि ‘लेखनातील तुम्ही’ याबद्दल लिहिलं तर बरंच तरीही थोडं…….लिखाण-‘लेखन’ म्हणून

1) लेखन स्वान्तसुखाय एवढ्याच हेतूने असेल तर ते निश्चितपणे समाधानकारक झाले आहे.
2) ते आहे अशा स्वरूपात प्रकाशित व्हावे असे वाटत असेल तर….
1) दैनंदिनीत ‘तुम्ही’ आरपार प्रकटायला हवेत, तुमची मतं-मनोगत-मतांतरं अजून रोखठोक सुस्पष्ट व टोकदार हवीत. मग तुमची चीड असेल तर एखाद्याविषयीचे ममत्व असेल अथवा अन्यही ..
ब) पदभ्रमण म्हणजे निसर्गसाहचर्य आणि इतिहासाशी गुजगोष्ट…पण      
       तुमच्या या ‘लेखना’त या दोन्हीचा इतका अभाव कसा ?
1) तुमचे मित्र  तुमच्या मैत्रिणी हाही या दैनंदिनीतील एक अविभाज्य घटक. तुम्ही मित्रांबद्दल लिहिता बरेचदा. मनःपुतही पण तरुण मैत्रिणींचा सहवास त्यांचं दिसणं-असणं, त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती याबद्दल लिखाणात तुम्ही पुरेसे मोकळे होत नाही. हातचे राखता. असे का ? मनुज-निसर्ग नातं, माणूस आणि त्याचे आप्त, मानव व देव या नात्यां इतकच स्त्री-पुरुष, सखा-सखी नातं अनुभवण्याजोगं हृदय आणि रमणीय असतं असं नाही का आपल्याला वाटत ?
            असो, वरील गोष्टी मी मनापासून मांडल्या आहेत. आता खेळी तुमच्याकडे.’’

प्रा. जोग यांनी लिहिलेल्या या निरीक्षण टिप्पणीशी मी सहमत आहे. आता त्यातून मी काय घेतले,  काय मिळवले, याविषयी थोडक्यात सांगायचे तर ही तपासणी मला ब्लॉगसह, सर्वच लेखनाकरीता उपयोगी ठरली आहे.
माझ्या लेखनात पुरेसे मोकळेपण नव्हते.  पण नंतर थोडे मोकळे होऊन मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय.
आपण कधीही आपली दैनंदिनी पुस्तक रुपात प्रसिद्द करणार नाही,  असा मनी
निश्चय केलाय.
बऱ्याच प्रसंगी दैनंदिनीत पूर्वी व नंतर लिहिलेली माहिती-घटना-संदर्भ खूपदा प्रसिद्दी-लेखनासाठी मला उपयोगी ठरत आहेत.
दैनंदिनी लेखनात प्रा. जोग यांच्या टिप्पणीनुसार शक्य तेवढया सुधारणा करीत, हे लिखाण सातत्य ठेवले आहे. त्यामुळे आंतरिक समाधान मिळत आहे.

                                           ------------------------------------


💐इतिहासात💐

इतिहासात
                  मराठेशाहीचा इतिहास जाणून घेताना, वर्षारंभाचा ‘जानेवारी’ महिना आपण  विशेष लक्षात ठेवावा असा आहे. मराठी मासाप्रमाणे  पौष-माघ महिनेही जानेवारीत येतात.
                 स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या मातोश्री जिजाऊ यांचा जन्म पौष पौर्णिमेचा(सन-१५९६ म्हणजेच शके १५१८).  स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना याच जानेवारी महिन्यात घडल्या आहेत.
                शिवरायांच्या मोहिमकाळात जिजाऊ माता यांचेकडे राज्यकारभाराची सूत्रे असायची, मात्र वयोवृद्ध राजमातोश्रींच्या मदतीसाठी छत्रपतींनी शंभुराजांची निवड केली, तो दिवस होता २६ जानेवारी १६७१.शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती, ती जानेवारी महिन्यात(सन १६६४).
               कर्तृत्ववान शंभूराजांचा राज्याभिषेक याच महिन्यात(१६जानेवारी १६८१-माघ शुद्ध सप्तमी) झाला.       
               आपल्या संत सज्जनांच्या मांदियाळीत  श्रीसमर्थ रामदासस्वामी यांचे स्थान अग्रभागी आहे. देवभक्ती करताना आपल्या श्रद्धेला अंधत्व येऊ न देता, आपल्या परिवाराकरीता नेहेमी कर्तव्यदक्ष कसे राहावे आणि परिवाराचे हित जपताना भवतालचे जग हे देखील आपल्या परिवाराचे विस्तीर्ण रूप आहे, याची जाणीव मनी ठेवून समाजपरिवाराचे हितरक्षण करणे हे आपले परम कर्तव्य कसे आहे, हे आपल्या सुबोध ग्रंथ-साहित्यामधून  समर्थानी सर्वांपुढे ठेवले. याद्वारे समाज प्रबोधन करण्याचे, आणि अवघ्यांना सदैव दक्ष राहाण्याचे सत्कार्य समर्थ रामदास स्वामींनी केलेय. इंग्रजी तारखेप्रमाणे श्रीसमर्थांचा समाधीदिन २२ जानेवारी १६८२(माघ वद्य नवमी-शके १६०४)  हा आहे.        
               राज्याभिषेकानंतर चौदाव्या दिवशीच शंभुराजांनी उत्तर प्रदेशातील एक मोहीम फत्ते केली ! बुऱ्हाणपूर या मोगलांच्या वैभवशाली नगरीवर त्यांनी छापा टाकला. शंभूराजांनी या नगरीवर स्वारी करून मोगलांना जेरीस आणले.  या नगरीत मिळालेले जवळपास एक करोड होन इतके सुवर्णधन महाराजांनी स्वराज्यात आणले !  तो दिवस होता २८ जानेवारी १६८१.                                 
               शिवरायांच्या मृत्युनंतरचा काळ आणि शंभूराजांच्या कर्तृत्वाची भरारी  सज्जनगडावरून समर्थ रामदासस्वामी पाहात होते.  मात्र स्वराज्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल समर्थांना अस्वस्थ करीत होती.                
               छत्रपती शिवरायांनी ज्यांना गुरुस्थानी मानले, त्या समर्थ रामदासांनी, अशा विपरीत परिस्थितीत शंभुराजांनी किती सावधान राहिले पाहिजे, केव्हा  व कोणती कृती केली पाहिजे, याविषयी शंभुराजांशी पत्ररूपी संवाद केला होता.
               मार्मिक भाषेत समर्थांनी लिहिलेले हे पत्र म्हणजे ऐतेहासिक दस्तऐवज आहे :--

समर्थानी छत्रपती संभाजीराजे यांना लिहिलेले पत्र..
              
    अखंड सावधान असावें |दुश्चित कदापि नसावें |
    तजवीजा करीत बसावें | एकांतस्थळी ||१||
   काहीं उग्रस्थिती सोडावी |कांहीं सौम्यता धरावी |
   चिंता लागावी परावी | अंतर्यामीं ||२||
   मागील अपराध क्षमा करावे | कारभारी हातीं धरावे |
   सुखी करून सोडावे |कामाकडे ||३||
   पाटवणी तुंब निघेना | तरी मग पाणी चालेना |
   तैसें जनांच्या मन | कळलें पाहिजे ||४||
  श्रेष्ठी जें जें मिळविलें | त्यासाठी भांडत बसले |
  तरी मग जाणावें फावलें | गलीमासी ||५||
  ऐसें सहसा करूं नये |  दोघे भांडतां तिसऱ्यासी जाये |
  धीर धरून महत्कार्य | समजून करावें ||६||
  सकळ लोक एक करावे | गलीम निवटोनि काढावे |
  येणें करितां कीर्ति धांवे | दिगंतरीं ||७||
  आधीं गाजवावे तडाखे | तरी मग भूमंडळ धाके |
  ऐसें न होतां धक्के |राज्यास होती ||८||
  बहुत लोक मिळवावे |एक विचारें भरावे |
  कष्टे करोनि घसरावें | म्लेंच्छ।वरी ||९||
  आहे तितुकें जतन करावें | पुढें आणिक मिळवावें |
  महाराष्ट्र राज्य करावें | जिकडे तिकडे ||१०||
  शिवरायाचें आठवावें रूप | शिवरायाचा आठवावा साक्षेप |
 शिवरायाचा आठवावा प्रताप | भूमंडळीं ||११||
  शिवरायाचे कैसें बोलणें |  शिवरायाचे कैसें चालणें |
  शिवरायाची सलगी देणें | कैसें असे ||१२||
  त्याहूनि करावें विशेष, तरीच म्हणवावें पुरुष |
  या उपरी आतां विशेष | काय लिहावें || १३ ||
             शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याचा विस्तार करताना आणि सर्व रयतेला संरक्षण कवच देताना शूर मावळ्यांच्या व इमानी सरदारांच्या सहाय्याने छत्रपती शंभाजी महाराजांनी पराक्रमाची शर्थ केली खरी, पण  जवळच्या आप्तांनी विश्वासघात केला. संभाजीराजे कैद झाले. 
             क्रूरकर्मा औरंगजेब बादशहाने कपट नीतीने आणि स्वराज्यातील दुफळी-फितुरीचा फायदा घेऊन शंभाजी महाराजांना जेरबंद केले, तो दुर्दैवी दिवस होता- १ फेब्रुवारी १६८९. या महापराक्रमी छाव्याचा अमानुष छळ करण्याचे दुष्कर्म कडव्या वृत्तीच्या औरंगजेब बादशहाने केले.
            त्यापुढच्या काळातील दुःखद घटना मन विषण्ण करणाऱ्या आहेत.
            थोर अशा  श्रीसमर्थांसह राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय आणि शंभूराजे, या सर्व स्वराज्य संस्थापक-रक्षक धुरीणांना मी शतशः वंदन करीत आहे.
                                                             
                     --------------------------

💐सुस्वागतम २०२०💐

सुस्वागतम २०२०

              सस्नेह नमस्कार व सर्वाना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा.
             ‘येस, लाईफ इज ब्युटीफ्युल, बट…….’ या ब्लॉग लेखनाला आज दोन वर्षे पूर्ण झालीत. आपले छंद जोपासताना लिहिणे व भटकणे व दरम्यान होणारे चिंतन-मनन मला आयुष्यभरात खूपदा उपयोगी ठरले आहे. कितीजण हे वाचत असतील ? याचा टीआरपी पाहिलात का ? हे ब्लॉग लिहून काय एवढे होणार ? असे प्रश्न काही आप्त-परिचितांकडून विचारले गेलेत. दिलेली उत्तरे त्यांना समाधानकारक वाटली असतील किंवा नसतील.  मला मात्र या ब्लॉग लेखनामुळे मोकळे झाल्यागत वाटते आहे.
              जुन्या आठवणी-साठवणी या निमित्ताने शब्दबद्द होऊन ‘अक्षर’ होत आहेत. मोजकेच वाचणारे ज्ञात-अज्ञात चेहरे असले, तरी  हे चेहरे मला पुढे लिहिण्याची ऊर्जा देत आहेत. मी त्याबद्दल ऋणी आहे.
             दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तीन-तीन याप्रमाणे स्वतंत्र विषयावर नियमित पणे मी लिहीत आहे. यापुढेही लिहीत राहीन, याकरीता आपला वाचन कृपालोभ असू द्यावा, अशी इच्छा याक्षणी व्यक्त करून, मी या नववर्षात तिसऱ्या वर्षाच्या ब्लॉग लेखनाचा शुभारंभ करीत आहे…………….

                           
    || सर्वाना नव्या वर्षाच्या पुनःश्च शुभेच्छा ||

    