Monday, 1 October 2018

💐मनातलं जनात💐

💐मनातलं जनात💐
              दररोज प्रवास करताना अन स्वैरपणे भटकताना नित्यनवे अनुभव मिळतात. त्यासाठी आपण ' जागे ' असणे मात्र महत्वाचे आहे.......

💐कान प्रामाणिक असतात.........                  चर्चगेटकडे निघालेली गोरेगांव लोकल कशीबशी पकडली. रोजच्याप्रमाणे आडोसा पाहून उभा राह्यलो. प्रथम जोगेश्वरी, मग अंधेरी, त्यानंतर थेट वांद्रे स्टेशन येते. मग उतरायचे. संपला आपला सकाळचा रेल्वे प्रवास ! धक्काबुक्कीची आता सवय झालीय. पिट्टू सॅकवाले हैराण करतात या गर्दीत. सॅक सरळ हातात घेऊन ती खाली धरण्याऐवजी हे अक्कलवंत पुढे स्वतःच्या पोटावर लावतात ! त्यामुळे जागा व्यापते. पुढच्यालाही ती लागते, टोचते. मीही सॅक वापरतो. पण नेहेमी गर्दीत ती हाती घेऊन खाली धरून प्रवास करतो.
                  आजही तेच ! गर्दी होतीच.  या गर्दीत टपोरे खूप असतात. वांद्रे स्टेशनला या गर्दीतून उतरायला सोयीचे व्हावे म्हणून एका बाजूस मी उभा होतो. तेथे एकजण दरवाजाला दांडी पकडून  उभा राह्यलेला नीळ्या डोळ्यांचा तरुण प्रवाशी हातातला टचस्क्रीन मोबाईल पाहत होता. त्याची बोटं मोबाईलवरून फिरू लागली.
                       अगदी दरवाजाजवळ बिनधास्तपणे भान हरपून मोबाईल हाताळणाऱ्या या वेड्या तरुणांना रोखणार कोण ? मनात आपण फक्त चरफड करायची ! लोकल धडाडत पुढे चालली होती. आता ' त्या ' तरुणाने मोबाईलवरची बोटं थांबवली आणि तो सॅकमध्ये ठेवला !
                 तो एका हाताने दांडी धरून बाहेर पाहू लागला. नंतर क्षणात त्याच्या गळ्यातून
' रफी 'चे जुने गीत ऐकायला येऊ लागले ! गीताचे मंदस्वर जवळच्या गर्दीत पसरले अन वातावरण बदलून स्वरमयी झाले......' नींदने क्या क्या ख्वाब दिखाए....... दिनमे सपने टुट गये.......' माझ्यासह आजूबाजूच्या रसिक प्रवाशांना भुलविणारे स्वर्गीय महंमद रफीचे स्वर या गर्दीत ऐकणे, तेही रेडिओमधून नव्हे तर कुणाच्या गळ्यातून समक्ष ऐकणे हा आनंदाचा अनुभव नव्हे ?
                आपले डोळे  ' त्या ' लटकेश्वर तरुणाच्या मोबाईलप्रेमावर रागावलेत. पण कान ? आपले कान मात्र स्वप्नातली रात्र आणि दिवसा तुटलेले वास्तव दर्दभऱ्या गीतातून मला ऐकवत होते !
                 आता हा  ' नीळा रफी ' आपले स्वप्नगीत संपवून दुसरे गीत म्हणायला लागला ! पण
 हाय ! मला आता उतरायचे होते वांद्रयाला ! गाडी थांबली. क्षणभर त्या निळ्या स्वरमयीला पाहात  मी खाली उतरलो, माझ्या प्रामाणिक कानांना घेऊन ! पाऊले ऑफिसच्या वाटेकडे निघाली. कान मात्र त्याच माहोलमध्ये माझी सोबत करू लागले.....................

                   -------------------------------------

💐आठवणीतली व्याख्याने💐

💐आठवणीतली व्याख्याने💐.
                      मुंबईतील प्रसिद्द विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची  विवेकानंद व्याख्यानमाला  ज्ञानदानाचे कार्य अखंडितपणे करीत आहे. मी  त्याचा लाभ वेळोवेळी घेतलेला आहे. त्यातून काही मान्यवरांच्या व्याख्यानांची नोंद डायरीत घेऊन आज तुमच्यापुढे एका व्याख्यानाची आठवण सांगत आहे.
💐एक आख्यान, सासुसूनेमधील नात्याचं........


                       ' नातं सासू सुनेचं असं होतं असं बिघडतं ! ' हे प्रसिद्द विदुषी विद्या बाळ यांचं व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला जायचे ठरवले. लालबागच्या विवेकानंद व्याख्यानमालेचे  यावर्षी  हे पहिलेच व्याख्यान होते.
                पटांगणात भरपूर श्रोते बसलेले होते. रात्रीची वेळ असूनही महिला व तरुणी सर्वत्र दिसत होत्या. विषयच तसा लक्षवेधी होता ना !
                विद्या बाळ ह्या अभ्यासू साहित्यिक. त्यांचे महिलांविषयी आणि सामाजिक जाणिवांचे लिखाण स्त्री, किर्लोस्कर  मासिकातून तसेच वर्तमानपत्रातून प्रसिद्द होत असते. आपणही त्यांचे लेख वाचलेले आहेत.
                त्या म्हणतात - सासू सुना दोन्हीजणी स्त्रीयाच असतात. दोघांचं कार्यक्षेत्र असतं स्वयंपाकघर ! एकीची असते मोनोपॉली. तर दुसरी असते नवखी ! सध्याचा काळ स्त्रीला मुक्ती मिळाल्याची सुरुवातीची पायरी असली, तरी स्वयंपाकघर काही त्यांना अखेरपर्यंत सुटत नाही. तेव्हा तेथे मक्तेदारी होतेच !
                दुसरा मुद्दा म्हणजे अपत्य म्हणून मुलगा होणे, ही आपली मोक्षप्राप्ती हे धर्म सांगतो ! मुलगी झाली की सारे हेलावतात. मात्र ' मुलगा झाला ' हे ऐकताना साऱ्यांचा आनंद गगनात मावत नाही ! मुलगा न झालेली बाई धार्मिक विधी, समारंभात पुढंपुढं करू शकत नाही. ओटी भरण्यासाठी तीला पाठी खेचले जाते ! मुलगा झाला की त्याचे बालपणीच कोडकौतुक सुरू होते. या कौतुकाला काळाच्या मर्यादा राहात नाहीत. अठरा वर्षे पूर्ण झाली तरी ते चालूच असते ! आईला या कौतुकाच्या कालावधीत कधी समजत नाही की आता मुलाचे लग्न केल्यावर त्याला एकांत हवा. स्वतःची एक स्त्रीदेखील त्याला लाभणार आहे. आपण मुलासाठी कोठेतरी मुरुड घालावयास हवीय, हेच ती विसरून जाते !  यातून मग सासुसूनेचे वाद सुरू होतात. मुलगा शहाणा असला तर गप्प राहतो. तो बाजू  कोणाची घ्यायची ह्या संभ्रमात असतो ! तो बावळट असला तर आईच्या सुरात सूर मिसळवून बायकोला मारहाण करायला प्रसंगी मागेपुढे पाहात नाही.
                   बायकाच बायकांच्या शत्रू असतात, हा मुद्दा काही अंशी खरा असल्याचे त्या मांडतात. तरीही स्त्री अद्याप पूर्णपणे मुक्त न झाल्यामुळे सासुसुनांचे हे वाद होतात. याला आपली पुरुषप्रधान संस्कृतीही जबाबदार आहे.....
                याच व्याख्यानात त्यांनी स्त्रीयांना सध्याच्या काळात अगदी शिकल्या-सवरलेल्या समाजकडून कशी दुय्यम वागणूक मिळतेय, ते उदाहरणे देऊन सांगितले.
                   शेवटी सासुसूनेच्या नात्याचे रूपांतर आई व मुलीत होऊन त्यांच्यात माया निर्माण होईल, तेव्हाच ते नाते टिकून अवघा संसार सुखाचा होईल, असे भाष्य करीत या विषयाचा समारोप केला.

                                                 ------------------------------------

💐वाचनछंद💐

💐वाचनछंद💐
              सध्या एक प्रसिद्द पण जुने पुस्तक मी वाचतोय. ते आहे आत्मचरित्र. याचे लेखक कोण माहीत आहे ? महात्मा गांधी !  यंदा देशभर गांधीजींची एकशे पन्नासावी जयंती साजरी होत आहे.
            तेव्हा मनात आले, आपण हे पुस्तक वाचून गांधीजींचं मन जाणून घेऊया.  जगभरात प्रसिद्द असलेली गांधीजींची ही आत्मकथा कित्येकांनी पूर्वीच वाचली असेल. पण आजही असंख्य वाचकांना ही आत्मकथा ज्ञात नसेल. त्यांचेशी मी आता संवाद साधणार आहे..........

💐मनकी बात, गांधीजींची..........
पुस्तकाचे शिर्षक--आत्मकथा किंवा माझे सत्याचे प्रयोग
लेखक-- मोहनदास करमचंद गांधी, मराठी अनुवाद--सीताराम पुरूषोत्तम पटवर्धन
्प्रकाशक--नवजीवन प्रकाशन मंदिर-अहमदाबाद
प्रथम प्रकाशन वर्ष- १९३०.                    हे पुस्तक खरेतर दोन तीन वर्षांपासून माझ्या संग्रही आहे. पण ते  वाचले नव्हते. कारण काय ?  तर हे जाड पुस्तक वाचणार तरी कधी ?  दररोज धावपळीच्या रगाड्यात असे पुस्तक वाचून पूर्ण करणे कठीण वाटले. यापेक्षा दैनंदिन घडामोडी सांगणारी वर्तमानपत्रे आणि छोटी पण वेधक पुस्तके  वाचणे ठीक वाटले.
              पण गांधी जयंती जवळ येऊ लागली आणि निश्चय करून हे पुस्तक वाचायला मी सुरुवात केली. पुस्तक वाचायला लागलो आणि ते खाली ठेवावेसे वाटेना ! पुढे पुढे जात वाचत राहिलो. मराठी अनुवाद पुस्तकाशी जवळीक वाढवत राहीला.
              या पुस्तकाचे लेखन का व कसे झाले याविषयी गांधीजींनी विस्ताराने लिहिलेय. सार्वजनिक जीवनात स्वतःला सर्वकाळ झोकून दिलेल्या या महात्म्याला एवढे लिहिण्यास वेळ कुठे होता ? पण जवळच्या जाणत्यांनी आग्रहाने ही आत्मकथा लिहून घेतली.
              या पुस्तकात आपण गांधी कुटुंब जवळून पाहातो. त्यावेळची सामाजिक स्थिती आणि परकीय ब्रिटिश राजवटीचे वास्तव यात आपण वाचतो. एकूण पाच खंड या पुस्तकात असून प्रत्येक लेख हा शिर्षकासह आपल्यापुढे येतो. जन्मापासून शिक्षणापर्यंत चा पहिला खंड, संसारप्रवेश ते वकिली आफ्रिकेतील वकिली धार्मिक वास्तवता, झेललेले अपमान दुसऱ्या खंडात आहेत. तिसऱ्या खंडामध्ये संघर्षमय जीवन दिसते. चवथ्या खंडातही संघर्षमय जीवन आहे, शिवाय ब्रिटिशांच्या बऱ्या वाईटाचे आलेले कितीतरी अनुभव आणि सत्याग्रहाची चुणूक यात वाचायला मिळतात. अखेरच्या पाचव्या खंडात-स्वदेशीच्या नावाने चालणारी खादीची चळवळ, त्यावर होणारी टीका, धर्माचा खरा अर्थ, राष्ट्रीय सभा, अहिंसा, याविषयी गांधीजी सत्यता मांडतात.

            आज या पुस्तकाला जवळपास अठ्याऐशी वर्षे झालीत. पण त्यातले सत्य  वाचकाला निश्चितपणे आकर्षून घेते. लेखकाची  प्रामाणिकता सांगते व हा महात्मा आपल्या जवळ येतो, आपला होतो. आज सर्वदूर राजकीयदृष्ट्या प्रदूषित वातावरणात सर्व जागत्या भारतीयांनी गांधीजीना जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक अवश्य वाचावे.

                                            ---------------------------------