Saturday, 1 June 2019

💐निवडणूक धमाल-२💐

💐निवडणूक धमाल-२💐
                       भारतीय प्रजासत्ताकातील लोकसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरचा उत्साही माहोल आज सर्वत्र आहे.  जे जिंकलेत ते आनंदात असले तरी पुढच्या चिंतेत आहेत. आणि  हरलेले, ‘आता कुठेतरी आसऱ्याला जायला हवे, नाहीतर ना घरका ना घाटका, अशी स्थिती होईल, तेव्हा काय करावे ? इकडे की तिकडे ? ’ या संभ्रमात आहेत.
                 आज, सर्वसामान्य झालेला  मतदार राजा, ’ सुटलो बुवा एकदाचा या ‘ निवड’णुकीच्या जबाबदारीतून,’ असे म्हणून काहीसा निश्चिंत झालाय. ‘एक दिवस राजा अन पाच वर्ष सजा’, हे त्याचे भूत-भविष्य, आणि वर्तमान असल्याची जाणीव त्याला आहे. कुणाचीही सत्ता आली तरी त्याच्या दैनंदिन जगण्यावर विशेष फरक पडणार नाही. भीत भीत तो जगणार आहे आणि वावरणार आहे.
                           भीतीच्या या ‘ मी ‘ ला कविवर्य स्वर्गीय मंगेश पाडगावकरांनी एका कवितेमध्ये शब्दबद्द केलेय. ही कविता आजच्या परिस्थितीत तुम्ही वाचायला हवी, असे मला वाटतेय…...........


💐भीतीचं व्याकरण……………..        
           गल्लीतल्या दादाला मी भितो.
           रस्त्यावरच्या दादाला मी भितो.
           पक्षाच्या कार्यालयात बसलेल्या दादाला मी भितो.

           दिल्लीच्या बड्या दादाला मी भितो.
           लाखोंच्या गर्दीसमोर व्यासपीठावरून
           त्वेष,द्वेष ओकणाऱ्या दादाला मी भितो.
           कामगारांना हाकलणाऱ्या दादाला मी भितो.
           फोटो, आणि फालतू भाषणे सतत छापून
           वृत्तपत्रांनी प्रचंड मोठा केलेल्या दादाला मी भितो.
           झोडणाऱ्या, फोडणाऱ्या, मोडणाऱ्या दादांना मी भितो.
            …………………
       
           माझ्या आत्मसन्मानासाठी
           निर्भय असणं ही सुद्दा
           माझी मानसिक गरज आहे.
           आणि म्हणून कुठल्याही प्रामाणिक माणसाला
           मी भीत नाही;
           जो भ्रष्टाचार करीत नाही
           त्याला मी भीत नाही;
           जात,धर्म,प्रांत,भाषा यांचा उपयोग करून
     भीतीचं यशस्वी राजकारण खेळत नाही,
           त्याला मी भीत नाही,
           कुठल्याही सज्जनाला मी भीत नाही !
           ………………
           पुढल्या निवडणुकीत तिकीट मिळण्याची
           मी आता खात्रीपूर्वक वाट बघतो आहे.
           किंवा कदाचित मी नवा पक्षसुद्दा काढीन !
           भीतीच्या भाषेचं व्याकरण असतं धमक्याचं;
           धमक्यांच्या फटाक्यांचा प्रचंड मोठा साठा
           भाषणांच्या मैदानी गोदामात
     आतापासून करून ठेवायला मी सुरुवात केलीय.

                                                    ----मंगेश पाडगांवकर.

(ही कविता महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात ५ एप्रिल २००९ मध्ये प्रसिद्द झाली होती.)
                                              ::::::::::::::::::::::::::::::::::::


💐परिसर💐


💐परिसर💐
               सर्वदूर महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले शेगाव दूर विदर्भात वसलेले आहे. श्री गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भाविकांचे हे तीर्थक्षेत्र आहे  बुलढाणा जिल्ह्यामध्ये.
               वर्षभर येथे भाविक-यात्रेकरूंची वर्दळ असते, पण शिस्तप्रिय असलेले संस्थानचे प्रशासन आपल्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने पूर्ण परिसराची काळजी घेते. शिर्डी क्षेत्री असलेला काहीसा विस्कळीतपणा येथे नाहीये.
               अमरावतीमध्ये काम करीत असताना शेगावला जायचा योग आला, म्हणजे तशी इच्छा झाली आणि मी शेगावी जाऊन आलो


               या परिसराविषयी तुमच्याशी छोटेसे हितगुज……..
💐शेगांवी मुक्कामी……………
              संत परंपरेत आध्य स्थानी असलेल्या श्री गजानन महाराजांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेणारे श्रद्धाळू, आणि आध्यात्मिक शांती मिळावी म्हणून काही काळ चिंतन-मनन करण्यासाठी कित्येक सज्जन माणसं शेगावला वेळ काढून जातात, राहतात, आणि प्रसन्न मनाने परत येतात.  मला जावेसे वाटले शेगावला. गेलो आणि त्याची अनुभुती घेतली.
              अमरावतीहून दुपारी सव्वाएकला एक पॅसेंजर गाडी सुटते भुसावळसाठी. तीला पुढे गर्दी होते. बडनेरामार्गे भुसावळला निघालेली ही गाडी सुमारे साडे चारपावणेपाचला शेगावला पोहोचते. उतरल्यावर पूर्व बाजूस बस,रिक्षा मिळतात. तसे चालत जाण्याजोगे अंतर आहे. संस्थानने निशुल्क बससेवा ठेवलीय,पण ठराविक वेळेत बसेस आहेत.
               हा प्रवास पूर्ण करीत मी शेगावी प्रवेश केला. तेथे  मुक्कामही करायचा होता. त्यामुळे प्रथम संस्थानच्या भक्तनिवासासाठी ऑफिसमध्ये संपर्क साधला. मात्र एकट्याला भक्त निवास मिळत नाही, अशी माहिती मिळाली. रात्री मंदिराच्या आवारात मुक्काम करता येईल, बिछाने वगैरे मिळतील, पण रात्री आठनंतर, असेही समजले. बाहेर जवळपासच्या हॉटेल/लॉज मध्ये चौकशी केली. एका हॉटेलला साधी पण ऐसपैस अशी डॉरमेटरी उपलब्ध होती.  तेथे छानसा मुक्काम करायचे ठरवले.  
                  सायंकाळ झाली होती. समाधीमंदिर दर्शनासाठी प्राकारात शिरलो. या ठिकाणी  शिस्तबद्ध अन शांत असे वातावरण आहे.  पायऱ्या उतरून खाली जावे लागते. येथे व्हेंटिलेशनची व्यवस्था केलेली आहे. एसीमध्ये असल्याने कोंडल्यागत वाटत नाही.
                    या समाधीस्थळी श्रीगजानन महाराजांची तीन-चारफुटांची संगमरवरी सुबक मूर्ती आहे. हसतमुख चेहेऱ्याची व  भाळी केशरी टिळा लावलेली ही फेटेधारी मुर्ती आपल्याला भारावून टाकते. त्यांची आपली नजरानजर होते  फक्त क्षणभरासाठी ! कारण, गर्दी असल्याने थांबणे अवघड असते.
            दर्शनानंतर, आपण प्रसन्न मनाने बाहेर येतो.  विस्तीगर्ण आवारातील राम मंदिर पाहातो.  ध्यानगृहही आपले लक्ष वेधून घेते. जवळच असलेल्या नारायण महाराज व बाळाभाऊ महाराजांच्या समाधी मंदिरापाशी आपण येऊन थांबतो.
            आता सुर्यास्त होतोय. ही आरतीची वेळ. मी इथल्या डेरेदार वटवृक्षाखाली उभा राहिलोय. वर असंख्य साळुंके पक्षी एकत्र जमलेत. खाली गाभाऱ्यात आरतीसाठी गर्दी झालीय.   संपूर्ण आवारात, जमेल तिथे भाविक उभे आहेत.
               बरोब्बर सात वाजता आरतीचा घंटानाद सुरू होतो. बाजूला उभे राहिलेले एक सद्गृहस्थ हळूच सांगतात- ‘ आता बघा ही आरती सुरू झाली, की किती गलका करतील ही पाखरं ! आरतीचा आवाज ऐकून आजूबाजूस गेलेली पाखरं सुद्दा इथल्या झाडावर जमा होतील.
              तसेच घडले ! आरतीचा नाद घुमू लागला आणि ईथुन तीथुन पाखरं या झाडावर जमा होऊ लागली. आरती संपेपर्यंत पाखरांचा लयबद्द कलकलाट  मी ऐकत राहिलो.
              शेगाव   संस्थानात जेवणाची माफक दरात व्यवस्था आहे. तेथे जेवण केले, आणि सरळ लॉजची डॉरमेटरी गाठली. छानसा मुक्काम झाला इथे.
              दुसऱ्या सकाळी,  आनंदसागर हे अध्यात्मिक क्षेत्र पहायला निघालो. तिकडे जाण्यासाठी बसेस आहेत,  अर्ध्या तासाच्या आत आपण तेथे पोहोचतो.  भव्य असे प्रवेशद्वार आहे. शुल्क भरल्यानंतर आपण आत प्रवेश करतो.  विस्तीर्ण जागेत पसरलेली ही वास्तू पाहायला दुरून दुरून यात्रिक येतात. आनंदसागर विसावा म्हणून मोठे भक्तनिवास येथे आहे, बरेच यात्रिक याठिकाणी राहातात.
         खरोखर, सगळा परिसर पाहून आपण प्रभावित होतो. या आनंदसागरामध्ये संतमहातम्यांचे वर्तुळाकार पद्धतीने मांडलेले पुतळे आहेत. ध्यानधारणा केंद्र आहे. शिवमंदिर आहे. स्वच्छ पाण्याचे सरोवर आहे. लहान, बागडणाऱ्या मुलांना बगीचे केलेत, झुले आहेत, डायनोसारची मोठी प्रतिकृती केलीय, ती मधूनच चित्कारते ! टॉय ट्रेनदेखील आहे ! खाण्या-नाश्त्याची मोठी सोय येथे आहे. त्यामुळे सगळे मनसोक्तपणे वावरत असतात. कोणाला येथे कंटाळा येत नाही.
               इथले पुतळे न्याहाळताना काही क्षण आपण थांबतो, कारण, तेथे कोरलेले सुविचार मनात
रेंगाळतात-
श्रीथिरुवर(तमिळनाडू)-पत्नीरूपातील लक्ष्मी ज्या घरी आनंदात राहात असते, तेथे ऐश्वर्य वाढते. ‘
‘माणिकप्रभु(महाराष्ट्र)- सभी धर्मोको अच्छी नजरसे देखो | इसमे जो अच्छा है उसका सत्वांश ग्रहण करो |
‘ताजुद्दीन बाबा(महाराष्ट्र)- मानवता धर्म महान है | क्या मै उसका आचरण करता हूं ? ‘
               अजूनही खूपकाही सुविचार वाचावयास मिळाले. ते सारे  वाचताना, निदान काहीजण तरी अंतर्मुख होत असतील ?
              मला ‘’ते‘ विचार भावले. आजच्या  धावपळीच्या जीवनात, एकमेकांवर कुरघोडी करीत आणि निष्कारण वाद घालीत आपले मूळचे प्रश्न तसेच साचून ठेवणाऱ्या या जगात, संतमहंतांचे वास्तव्य जरी आपणापाशी नसले, तरी त्यांचे सद्विचार तरी जगाला पुढे नेतील आणि शांती देतील, असे माझे प्रामाणिक मत आहे. मात्र तसे आमचे आचरण हवेय.
                            या आनंदसागरात दोन तास कसे गेले ते समजले नाही. निघण्यापूर्वी ध्यान-एकांती शांत,स्तब्ध बसण्यासाठी गोलाकार अन उंच अशी वास्तू दिसली. काही क्षण तेथे निवांतपणे बसलो. चित्त त्या वातावरणाने एकाग्र झाले. ही अनुभुती विलक्षण !
                           या ‘आनंद’,सागराचा निरोप घेताना, काही प्रेरणा घेऊन निघालो. सभोवतालचे जलसरोवर स्मित हास्य करीत, ‘ ये हं, पुन्हा इथे ‘’, असे म्हणत होते, तर लांबलचक हिरवा डायनोसार जोरदार आवाजात चित्कारत सांगत होता, ‘ पुन्हा येशील ना, तेव्हा घर-परिवारालाही घेऊन ये बरं ! ‘


                                                                        :::::::::::::::::::::::::::