Monday, 1 April 2019

💐मनातलं जनांत💐

💐मनातलं जनांत💐
             फोन स्वतःकडे असणं ही आता प्रत्येकाची अत्यावश्यक बाब झालेली आहे. त्यातही हा फोन आपल्या हातात सतत असावयास हवा ! नाहीतर आपण मागासलेले--अडाणी ठरतो !
             हा फोनज्वर आज पुऱ्या देशभर/भारतभर पसरलाय. दररोज प्रवास करताना-लोकल ट्रेन मध्ये, दूरवरच्या प्रवासात मेल/एक्सप्रेसमध्ये, रस्त्यात, ऑफिसमध्ये, रेल्वे प्लॅटफॉर्मवर, गाडी चालविताना, अगदी टॉयलेटमध्ये सुद्दा हातातला फोन बाजूस ठेवणे अवघड जाते या फोनबहाद्दरना !
             मला याविषयीच अशा फोनबहाद्दरांशी थोडं बोलायचं आहे.....
 💐हातात ' फोन ' स्मार्ट ' , पण बुद्दी आहे  ' माठ ' !.........

                जवळपास ८० टक्क्यांहून अधिक मोबाईलफोन धारक अध्य यावत व महागडा फोन हाताळतात, पण त्या फोनचा ' स्मार्टनेस'  काही आत्मसात करून घेत नाहीत. या फोनमध्ये ज्ञान देणाऱ्या व तुमच्या मेंदूला चालना देणाऱ्या एवढ्या गोष्टी उपलब्ध असतात की, आपण त्या बहुगुणी फोनचा पुरेपूर वापर करायला हवा. पण तसे होत नाही.
                ही ८० टक्के (?) मंडळी व्हाट्स ऍप, फेसबुक, यु ट्यूब, इन्स्टाग्राम, गेम ऍप, या प्रकरणात  एवढी  हरवलेली असतात, की त्यांना  इतर चांगली ऍप्स लक्षातही येत नाहीत ! हरतऱ्हेची माहिती व रंजन देणारे सारे काही प्ले स्टोर/युट्यूब वर उपलब्ध असते. पण ही मंडळी त्याकडे फारसे  गंभीरपणे लक्ष न देता निरर्थक व्हिडीओज बघत असतात अथवा गेम्स खेळण्यात धन्यता मानतात.
                वास्तविक, हा बहुगुणी स्मार्टफोन तुम्हाला चारही बाजूनी ज्ञान देत असतो. अभ्यास करणारे विद्यार्थी, छंदीष्ट-भटके, गिर्यारोहक, इतिहासप्रेमी, चित्रपटांचे अभ्यासू, खेळाडू, कलावंत, साहित्यप्रेमी, आरोग्य आणि औषध उपचारांची माहिती घेणारे,  स्वयंपाक करण्यात रुची दाखविणारे गृहस्थ-गृहिणी,  नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छिणारे, आगळावेगळा ध्यास घेऊन त्याविषयीची माहिती मिळविणारे जिज्ञासू, .....ही यादी थोडीथोडकी नाही ! या सगळ्यांना  आपल्या हातात सगळं जग दाखवून सज्ञान करणारा हा स्मार्टफोन असतो.
                 मात्र 'माठ' मंडळी काय बघत असतात माहितेय ? स्वतःचे काढलेले आडवे तिडवे स्टाईलमधील फोटो, टुकार व्हिडीओज, डोकेदुखी वाढविणारे गेम्स, व्हाटस ऍप-फेसबुक -इन्स्टाग्रामवर फॉरवर्ड झालेले फोटो, माहिती, अन व्हिडिओज !
                काही तरी पाहावे म्हणून पहायचे डोके रिकामे ठेवून ! खरेतर या मंडळींनी हे पहायला हवेय, ठरवायला हवेय की, आपल्या या बहुगुणी फोनमध्ये काय साठवायला हवेय आणि काय टाकून द्यायला हवेय, आपल्यासाठी काय आणि किती उपयुक्त आहे ?
                माझी या तमाम ८० टक्के मंडळींना विनंतीआहे की,  तुम्ही हा बहुगुणी स्मार्टफोन वापरताना पुढील सूत्रे अंमलात आणा आणि खरेखुरे स्मार्ट व्हा :--

१) फोनवर नोट बुक/बायोडाटा नोंदण्याची छान सोय असते. तातडीच्या कामात उपयोगी ठरेल म्हणून आपले नाव, संपर्क पत्ता, रक्तगट, फोटो, जवळचे नातेवाईक व मित्र यांची माहिती नोदवा.
२) आपली महत्वाची कागदपत्रे/दस्तऐवज हरवले किंवा गहाळ झाले तर ?  तत्पूर्वीच खबरदारी म्हणून सारे काही या स्मार्टफोनमध्ये स्कॅन करून, सेव्ह करा. कुठे सबमिट करताना ते उपयोगी ठरेल. झेरॉक्ससाठीही कधी सोयीचे होईल. (मात्र सुरक्षेसाठी ते लॉक करा).
३) आपल्या नोकरीच्या ठिकाणी हा स्मार्टफोन खुप उपयोगी आहे. टायपिंग करणे, आकडेवारीचे काम करणे/तपासणे, आवश्यक प्रेझेन्टेशन सादर करणे, अशासाठी  चांगले ऍप्स वापरून व्यवस्थित तयारी करता येते. तेव्हा तुम्ही फोनचा  ऑफिससाठी उपयोग करा.
४) तुमच्या फोनमध्ये मेमरी कार्डवर उगीच साठवुन(सेव्ह-डाउनलोड केलेली) ठेवलेली माहिती काढून फोन हलका करा, जेणेकरून फ्रेश महत्वाची माहिती त्यात साठविता येईल.
५) रस्त्यात चालताना किंवा प्रवासात असताना कानात हेअर/हेड फोन ठेवुन बोलत/ऐकत राहू नका,. ते तुमच्यासाठी धोक्याचे आहे व इतरांसाठी देखील.
६) बस/रेल्वे मध्ये चढता उतरताना कोणाचा फोन आला तरी घेऊ नका. तेही तुमच्यासाठी धोक्याचे आहे. शिवाय मोबाईलचोर याचवेळी सहजपणे फोन चोरतात.
७) साधी खुशाली व नेहेमीचे विषय बोलण्यासाठी खरेतर फोन नव्हे, प्रत्यक्ष भेटून संवाद करण्याची गरज असते. प्रत्यक्ष संपर्क  साधून केलेल्या गप्पा आणि विचारपूस यात किती जिव्हाळा  असतो आणि खरे प्रेम-आत्मीयता असते हे जुन्याजाणत्यांकडून  जाणून घ्या, आणि त्यातून मिळणाऱ्या निर्मळ आनंदाची अनुभुती घ्या.
८) दुचाकी किंवा इतर कुठलेही वाहन चालवताना फोन बिलकुल वापरू नका. यात दुर्लक्ष केलेत, तर, ' जरासी भी नजर हठी, तो दुर्घटना घठी...'  हा मंत्र प्रत्यक्षात अवतरेल !
९)  तुमचे दूरवर असलेले घर किंवा खोली तेथे कोणी राहत नसल्यामुळे बंद असेल, त्याठिकाणी महत्वाच्या वस्तू वगैरे असतील तर ? सुरक्षेच्या दृष्टीने तेथे एखाद दुसरा सीसी कॅमेरा ठेवा आणि एका ऍपच्या मदतीने कुठूनही तुमच्या फोनवरून  ' तेथे ' नजर ठेवा.
१०) आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे. रस्त्यात आपल्या फोनचा वापर शक्यतो करू नका. त्यामुळे तुमची चाल मंदावते. आपल्या मूळ कामाचे विस्मरण होते. मन भरकटते. आपली मान, कान अन हात हे शरीराचे महत्वाचे अवयव अवघडून जातात. कमजोर होतात. आपले लक्ष फोनच्या संभाषणात असल्याने अपघाताला आमंत्रण असते. त्यामुळे समोर येणाऱ्या आपत्ती आणि दुःखास तोंड द्यायची पाळी आपल्या कुटुंबियांवर येते हे कायम लक्षात ठेवा व तसे न  व्हावे म्हणून खबरदारी घ्या.
                     मी या मोबाईल प्रेमींना( आहारी गेलेल्या)  यापेक्षा जास्त काय बरे सांगु  ?   त्यांनीच ठरवावे,  की आपल्या स्मार्टफोनसारखे 'स्मार्ट' बनावे, की आपण 'माठ'च राहावे  ते !

                                          ::;::::::::::::::::::::::::::::::

💐निवडणुक धमाल💐

💐निवडणुक धमाल💐
                      जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक म्हणून ख्याती असलेला आपला भारत देश ६८ वर्षांची वाटचाल करून पुढे पुढे जात आहे.                 
                      पाच वर्षांतून एकदा होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपले अमूल्य मत देऊन लोक नियुक्त सरकार स्थापन करणारी ही लोकशाही आता प्रगल्भ झालीय, की फक्त  नामधारी लोकशाही आहे ? याचे खरे उत्तर जाणकार व जागरूक भारतीय मतदार जरूर देतील.   
                      मी देखील एक मतदार आहे, आणि माझ्या नजरेतून भोवतालचे राजकीय वातावरण न्याहाळताना, माझ्या मतदार राजाला चार शब्द मला सांगावेसे वाटतात, राजाने त्यावर जरूर विचार करावा...........     

        

💐मतदार राजा जागा हो...............
                     पाच वर्षातून एकदा होणाऱ्या निवडणुकीत आता सगळयाच पक्षांचे  'लक्ष्य' आहे सत्तेची खुर्ची मिळविणे. आणि त्यासाठी प्रत्येक पक्षाचा उमेदवार ' मतदार राजा 'ला आंजारतोय-गोंजारतोय. एकदा का सत्तेची खुर्ची मिळाली, की हा राजाकडे पाठ दाखविणार हे आता सगळ्यांना माहित झालेय.
                      कोणत्या कामासाठी यांचेकडे जावे तर यांची प्रथम अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ती मिळाल्यावर त्यांच्या वेळेत जावे तर, ' साहेब अजून आलेले नाहीत ' हे ऐकावे लागते. त्यांची वाट पाहात तिष्ठत राहावे लागते. साहेब आले की आधी आपल्या खास लोकांना भेटणार, मग आपली वेळ गेली खड्यात ! पाच वर्षे अशीच यांचे मागे मागे लागून कामं करून घ्यावी लागतात मतदार राजाला !
                       आज पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत मतदार राजाचे मौल्यवान असे मत घ्यायला हाच 'शिकारी' उमेदवाराच्या रूपात राजाच्या दारात याचका सारखा येतोय. तेव्हा, हे मतदार राजा, तू त्याची शिकार न होता तुझे डोळे व कां नीट उघडे ठेव आणि त्याला नीट सामोरे जा.
                       नेहेमी छान-छान परीट घडीचे कोट/सफारी आणि किंवा कुडता पायजमा घालणारी ही नेते-उमेदवार मंडळी आता तुमच्या दारी साधे पांढरे पोशाख घालून, वाकत, अदबीने येतील. तुला हात मिळवतील. तुमच्या घरातील जीर्ण-जर्जर झालेल्या वयोवृद्ध  मंडळींच्या पायाला हात लावतील. पाया पडतील. त्यावेळी हे मतदार राजा, तू स्वतःला धन्य झालो असे म्हणशील ! एवढया मोठ्या माणसानं माझ्या दारी यावे ? माझ्या म्हाताऱ्या माणसांचे पाय धरावे ? मला हात मिळवावेत !
                      अशा वेळी हे मतदार राहा, तू भावनाप्रधान होऊ नकोस. हीच वेळ आहे, तुला तुझे लोकशाहीतले हक्काचे हत्यार उपसण्याची. हे हत्यार आहे मतदानाचे. तू मतदान कर. आपले मत निर्धास्तपणे योग्य उमेदवारालाच दे. त्यासाठी बुद्धीचा  वापर कर. सगळे उमेदवार जरी तुझ्या दारी-घरी आले आणि भरपूर स्तुती  करून त्यांनी तुझ्यावर आश्वासनांची खैरात केली तरी बावरू नकोस.     
                     तुझे मत एक असले तरी ते ' बहुमोल ' असे मत आहे हे लक्षात घे. ते देण्यापूर्वी खालील प्रश्न स्वतःलाच विचार. त्यांची उत्तरे स्वतःच जाणून घे. नीट पडताळणी कर आणि मग मतदानाला सामोरं जा--

१) ' त्या ' उमेदवाराने एखादे तरी सामाजिक कार्य केलेय का ?  तुझ्या भागातले,  गावाचे -परिसराचे
    कोणते प्रश्न त्याला माहित आहेत ? आणि त्यांनी ते सोडवलेत ? त्यासाठी प्रामाणिकपणे
    प्रयत्न केलेत ? एक तरी उदाहरण आठव.
२) उमेदवार किती शिकलाय ?  तो स्थानिक आहे की बाहेरून आलेला ?
३) उमेदवार घराणेशाहीचा वारसदार, म्हणजेच त्याचे/तीचे आजोबा-आजी, सासू-सासरे, पती-पत्नी,   
    काका-काकू,आई-वडील,  अशा परंपरेनुसार  पक्षाच्या मेहेरबानीने तिकीट मिळविलेला तर  नाही
    ना ?   
४) एका पक्षातून दुसऱ्या पक्षात,  दुसऱ्यातून तीसऱ्या पक्षात, पुन्हा कोलांट्या उड्या मारीत
    पहिल्या किंवा दुसऱ्या पक्षात आलेल्या दलबदलू आणि विश्वासघातकी उमेदवाराला तर तू
    मतदान करणार नाहीस ना ?  तसे असेल तर तू स्वतःच स्वतःला फसविणार आहेस हे लक्षात ठेव..
६) जो उमेदवार गुंड आहे, किंवा गुंडच त्याच्या अवती भवती असतात. दंगे-धोपे करण्यांत जो पुढे
    असतो, नाहीतर गुप्तपणे दंग्याचा सूत्रधार असतो. भ्रष्टाचारी पद्धतीने कामे करतो, पोलिसांत
    त्याच्याविरुद्ध  केसेस आहेत अशा उमेदवाराला तर तू आपले मत देत नाहीस ना ?
७) हा उमेदवार निवडून आल्यावर त्याने तुला आणि त्याच्या पक्षाला फसविले, वचने पाळली
    नाहीत, सगळ्या मतदारसंघाचा विश्वासघात केला तर, ' मी असे केले तर मिळालेल्या पदाचा
    पूर्णपणे त्याग करीन आणि पुन्हा कधीही कुठल्याही निवडणुकीला उभा राहाणार नाही. ' असे
    लेखी वचन तो तुला देईल ?
                        तर हे मतदार राजा, पाहा बुवा , सारे काही तुझ्यावर अवलंबून आहे. तू खरेतर राजा  नव्हे, महाराजा आहेस. पण फक्त एक दिवसाचा महाराजा ! आणि' तो ' निवडुन येणारा उमेदवार आहे पाच वर्षांचा सत्ताधीश ! पाच वर्षें तो तुझ्यावर राज्य करणार आहे.
                        आज फक्त ' त्या ' एका दिवसासाठी राज्य तुझे आहे. लोकशाही तुझी आहे. मताचा अधिकारदेखील तुझाच आहे. तेव्हा ' योग्य ' उमेदवाराला निवडुन आणायचे की पाडायचे हे तूच ठरव आणि योग्य निर्णय घे.

                                                  ::::::::::::::::::::::::::
💐वाचन छंद💐

💐वाचन छंद💐
                      अमरावतीत राहात होतो तेव्हाची गोष्ट आहे. 'लोकसत्ता'च्या नागपुर रविवार आवृत्तीमध्ये एकदा एक छान  लेख वाचनात आला. लिहिले होते सारंग दर्शने यांनी.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निकट काही काळ सहवास लाभलेल्या काहीजणांना भेटून योगीराज बागुल यांनी
' आठवणीतील बाबासाहेब '  हे पुस्तक लिहिलेय. ग्रंथालीने ते प्रकाशित केलेय.या पुस्तकाचे परिक्षण लेखात होते. त्याविषयी माझे शब्दांकन तुमच्यासाठी, बाबासाहेबांना वंदन करून--------💐स्वाभिमानी आणि शिस्तप्रिय बाबा.........
                   योगीराज बागुल या लेखकाने बाबांच्या सहवासात राहिलेल्या काही जुन्या-जाणत्या व्यक्तींशी संवाद साधून हे पुस्तक लिहिले आहे. ' बाबा ' कडक शिस्तीचे व स्वाभिमानी असूनही आतून किती मायाळू होते, याची जाणीव यातून आपल्याला होते.
                आपल्या ताटातील उष्टे खाणाऱ्या शिवराम जाधवच्या थोबाडीत मारून पुन्हा काही दिवसांनी त्याला बोलावून घेत,' असे कुणाच्या ताटातले उष्टे का खातोस  तू ? असे यापुढे करू  नकोस.  किती दिवस तू असे करणार ? '  हे बजावून बाबांनी शिवरामचा स्वाभिमान जागा केला.
                   शेगडीवर खीर बनवून घरापासून दूर राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला प्रेमाने खाऊ घातली. बाबांना व्हायोलिन वाजविण्याची आवड होती. साठे आडनावाचे गुरुजी त्यांना व्हायोलिन शिकवीत. त्यांना बाबांनी त्या काळात चारशे रुपयांची गुरुदक्षिणा दिली ! आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्याशिवाय लग्न करायचे नाही असाही त्यांनी निर्णय घेतला होता. धर्मांतराचे वेळी, ' संघम शरणम गच्छामि म्हणणार नाही ', असे म्हणून त्यांनी लोकांना ठणकावले होते.
                 एकदा प्रसिद्द सिनेनट दिलीपकुमार याला बाबांनी , ‘ जर चारित्र्य आणि नितीमत्तेची चाड बाळगा.......' असे म्हणून झापले सुद्दा होते !
                स्वतः निर्माण केलेल्या संस्था मेल्या तरी बेहत्तर, पण तुम्ही अनितीचा पैसा घेऊ नका.' अशा कडक शब्दांत त्यांनी  कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली होती. मात्र आपल्या प्रत्येक भाषणात बाबा ' प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रयींचा आग्रह धरायचे. अखेरच्या दिवसांत बाबांनी स्वतःच्या कुंचल्यात गौतमबुद्द रंगवून पूर्ण केला होता.
               लोकसत्ताच्या या स्मरणीय लेखाने मला बाबांच्या आणखी जवळ आणलेय
( त्यांना '  बाबासाहेब' म्हणण्याऐवजी 'बाबा' म्हणणे मला अधिक आवडते ).मात्र या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावाचा व तत्वांचा  वापर करीत घाणेरडे राजकारण करणारी मंडळी आज आपल्या समाजात उजळ माथ्याने वावरताना दिसली की, तळपायाची आग मस्तकात जाते.  आता निवडणुकीचे बिगुल वाजलेत, बहुजनांना आपल्या बोटावर नाचवू पाहणारे, देशातील अन राज्यातील काही नेते आता सक्रिय झाले आहेत. माझ्या माहितीतील असे काही लबाड नेते आपली पोळी भाजायला निघालेत.
                एक नेता टिपटॉप कपडे-कोट घातल्याशिवाय वावरतच नाही. त्याचा लोकसंपर्क फक्त पक्षश्रेष्टींशी असतो !  साहेब आता वयाने थकलेत. तेव्हा हे आपल्याच रक्तातल्या वारसाला तिकीट मिळवून देण्यात मग्न आहेत.


                दुसरी, मीच सगळ्यांची कैवारी म्हणवून घेणारी कर्तुत्ववान महिला पुतळे उभारण्यात स्वतःला धन्य मानते आहे. हाच आपला विकास आहे म्हणे ! करोडो रुपये या कार्यात घालवलेत या बयेनं.
                 तिसरा स्वतःस साहित्यिक समजतोय. दर तासाला ड्रेस बदलणारा हा चमकेश नेता आहे.  याच्यावर कोणीही टीका केली तरी त्याला काही फरक पडत नाही ! बिचारा मंत्रिमंडळात कुठेतरी असतोच असतो. पुरी पाच वर्षे ह्याचे मागणे एवढेच असते - एवढे जण आमचे मंत्री व्हायला हवेत. तेवढया जागा आमच्यासाठी यांनी सोडायला हव्यात आणि ही जागा आम्हालाच हवी. हा निवडणुकीत पडला तरी नाराज नसतो बरं का ! मागील दाराने हा खासदार होतो ! भाबडे बहुजन तरुण याला नेता मानतात. 
                 आणखी एक नेता आहे. त्यातल्या त्यात हुशार आहे. बाबांच्या आडनावामुळे हा नावारूपाला आलाय.  इथेही भाबडी व जुनी जाणती मंडळी याच्या कडे आशेनं पाहात आहे. मात्र याला सत्ता  हवीय !  त्यापायी कुठल्याही कडव्या पक्षाशी हा हात मिळवणी करेल ! आपल्याला फक्त  काही भागात जनाधार आहे, हे याला पटतच नाही. सगळे बहुजन माझेच, या भ्रमात हा नेता नेहेमी असतो.
                आणखी काही मंडळीही सक्रिय झालीत ती आहेत  - सरकारमधून निवृत्त झालेले काही उच्च अधिकारी. चांगले अभ्यासू अन अनुभवी आहेत हे मान्यवर ! शिक्षित व सक्षमही आहेत, पण यांना जनाधार फारसा नाही. 
               आता सांगा, अशा परिस्थितीत बहुजनांचे नेतृत्व करणारा सर्वगुणसंपन्न नेता कुठे आहे  ?  त्यासाठी पुन्हा, ' बाबा ' जन्माला यायला हवेत, नाही का ?


                                                     :::::::::::::::::::::::