Saturday, 1 February 2020

💐मनभावन कविता💐

💐मनभावन कविता💐
        स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील बहुजनांचे प्रेरणास्थान मानले जाते. राज्यातच नव्हे तर  देशभरात आणि परदेशातही  शिवप्रेमी विखुरलेले आहेत, त्यामुळे  दरवर्षी   शिवजयंती सर्वत्र मोठया उत्साहात साजरी होते. या महिन्यात १९ तारखेला (इंग्रजी महिन्याप्रमाणे) शिवजयंती सोहोळा संपन्न  होईल.
   
             विख्यात बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ  टागोर(ठाकूर)  यांनी छत्रपती शिवरायांवर एक सुंदर कविता रचली आहे. महाराजांना त्रिवार वंदन करून मी ही  श्रवणीय कविता सादर करीत आहे :-

   
             

   💐शिवाजी राजा………….
त्या अनोळखी प्रदेशात  केव्हातरी
           घनदाट अरण्यानं  वेढलेल्या किल्ल्यांच्या परिसरात हिंडताना
मानवेन्द्रा, शिवाजी राजा,
           तुझ्या मनात विचार चमकला असेल :
शतखंड झालेल्या भारताच्या या तुकड्या तुकड्यांना
           एका विचारानं मी  भारून टाकीन,
श्रींचं राज्य उभारीन.                                                                   १
     
           तुझा संदेश आजही दऱ्याखोऱ्यांतून  गुंजतो आहे.
तुझे नेत्र अजूनही अनगताला न्याहाळताहेत.
           ते स्वप्न काय असेल  ?
हे मानवी देहधारी साधुपुरुषा,
          तुझी तपस्या, ध्येय, कार्य
जणु चिरंतनाला आव्हान देत आहेत.                                            २

           तुझे झेंडे आता फडकताना दिसत नाहीत.
तुझे ते मावळे, ते तानाजी, ते बाजी, ती भवानी, ते विजयी  अश्व
           सारे काळाच्या उदरात नष्ट झालेत.
पण अजूनही आकाशातून देववाणीसारखे  शब्द उमटतात
          ‘ हर हर महादेव ‘
युगे युगे तुझं नाव मानव जात उच्चारील, पावन होण्यासाठी.             ३
   
                                                                 —रवींद्रनाथ ठाकूर                                         

                                                                     -------------------

💐वाचन छंद💐

💐वाचनछंद💐
                    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचेविषयी थोर साहित्यिक आणि नाटककार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना अतीव आदर होता. सावरकरांची देशाविषयीची तळमळ व त्यापायी केलेला त्याग, सोसलेला तुरुंगवास यातून आचार्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी सावरकरांचे बहुतेक साहित्य वाचून काढले.          
                    अभ्यासू साहित्यिक-नाटककार-कवी, थोर स्वातंत्र्य सेनानी, दृष्टे समाजसुधारक  आणि भाषाप्रेमी, अशी वैशिष्ट्ये लाभलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषेचे शुद्धीकरण किती महत्वाचे आहे, हे समाजास पटवून दिले. शुद्ध देवनागरी-मराठी लिपी व भाषेच्या प्रचारार्थ त्यांनी केलेले आंदोलन व प्रयत्नांची माहिती आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी संपादन केलेल्या व परचुरे प्रकाशनाने प्रसिद्द केलेल्या  पुस्तकामधील एका प्रकरणात वाचावयास मिळाली.  ‘क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर’ असे या संपादित पुस्तकाचे नाव आहे.
                    सावरकर यांच्या पुण्यस्मृतीला(स्मृतिदिन दि.२६  फेब्रुवारी) अभिवादन करून मी या माहितीपूर्ण पुस्तकाचा मला झालेला परिचय आपणास करून देत आहे……..

 

 💐भाषाप्रेमी सावरकर💐
                 ‘क्रांतिकारकांचे कुलपुरुष’   या संपादित पुस्तकामध्ये  आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ‘मराठा’ दैनिकात लिहिलेल्या सावरकरांवरील निवडक लेखांचे संपादन केले आहे. सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीची खूप चांगली माहिती एका लेखामध्ये दिली आहे. याशिवाय, आचार्य अत्र्यांनी या पुस्तकात सावरकरांच्या विविधांगी व्यक्तित्वाचे पैलू वाचकांसमोर उलगडून दाखविले आहेत.            
              छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर राज्यकारभारात मराठी भाषा जास्तीत जास्त यावी,  म्हणून मराठी राज्यव्यवहारकोष तयार करण्याची जबाबदारी त्यांनी रघुनाथ पंडितांवर सोपविली. त्यावेळी राज्य कारभारात कितीतरी उर्दू-पारसी शब्द प्रचलित होते. त्याऐवजी जुने अस्सल मराठी शब्द, तसेच नवीन मराठी प्रतिशब्द कोशात आणले. ते शब्द आज देखील सर्वांच्या परिचित असतील. उदा. न्यायाधीश, अमात्य, प्रधान, सचिव, मंत्री, सुमंत, इ.
                 आपल्या  लिखाणात शुद्द लिपी व भाषेला महत्व देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा मिळाली. त्यांनी सन १९२४ साली भाषाशुद्दी मंडळांची स्थापना केली आणि जनजागृती सूरु केली. मात्र  सुरुवातीला त्यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, न.चिं. केळकर, आणि माधवराव पटवर्धन या तीन मान्यवरांच्या प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले ! या तीघांचा सावरकरांच्या भाषाशुद्दी चळवळीला तात्विक विरोध होता. पण सावरकरांनी आपले म्हणणे त्यांना व्यवस्थित पटवून दिल्यानंतर त्यांचे विरोध मावळले.
               सावरकरांचे आग्रहाचे म्हणणे होते की,  देवनागरी लिपी ही उर्दू-पारसीपेक्षा अधिक शास्त्रशुद्द आहे. आध्य भाषा संस्कृत प्रमाणे ती श्रवणीय आहे. जुन्या भारतीय भाषासुद्दा संस्कृत भाषेशी जवळीक साधणाऱ्या आपल्या भाषाभगिनी आहेत. मात्र जेथे परकीय शब्दाला प्रतिशब्दच नसेल, तर तो शब्द वापरण्यास हरकत नाही. उदा. बूट, कोट, जाकीट, गुलाब, जिलबी, टेबल टेनिस इ.
                 याशिवाय, जगातील कोणत्याही परकीय भाषेत एखादी शैली, प्रयोग किंवा मोड सरस वाटले तर ते आत्मसात करण्यास सावरकरांची आडकाठी नव्हती.  त्याकाळी मुद्रणालायत विशिष्ट प्रकारचे खिळे लागत. देवनागरी लिपी मुद्रण यंत्रावर सुटसुटीतपणे व कमी खिळे वापरून मुद्रित होऊ शकते हे सावरकरांनी  केलेल्या सुधारणेमुळे सर्वज्ञात झाले. ही लिपी मुद्रण यंत्रावर बसविणेही सुलभ झाले. सावरकरांच्या भाषाशुद्दी आणि लिपिशुद्धी आंदोलनाचे हे मोठे यश आहे.
           आज, महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय कामकाज करताना तसेच देशात इतरत्र सावरकरांनी निर्माण केलेले कितीतरी शब्द प्रचलित झाले आहेत. उदा.  महाविद्यालय, प्राचार्य, प्राध्यापक, वायुदल, दूरध्वनी, ध्वनिक्षेपक, विधिमंडळ, अर्थसंकल्प, चित्रपट, नेपथ्य, वेशभूषा, छायाचित्र, दिग्दर्शक, क्रमांक, दिनांक, वाचनालय, उपस्थित, महापौर, व्यंगचित्र, विशेषांक,लाभांश, संसद, लोकसभा, नगरपालिका, महापालिका, हुतात्मा, उच्चांक, नभोवाणी, सचिवालय, स्थानक, रुग्णालय, प्रमाणपत्र  इ. या भाषाशुद्दी व लिपी सुधारणेवर सावरकरांनी स्वतंत्र पुस्तकेदेखील लिहिली आहेत.
                 अशा थोर स्वातंत्र्यवीर तसेच भाषाप्रेमी विनायक दामोदर सावरकर यांचे पुण्यस्मरण करताना आपण मायबोली मराठी भाषेविषयी खरोखर किती आस्था दाखवतो आहोत ?, हा प्रश्न मला पडला आहे.  कारण, याच फेब्रुवारी महिन्यात २७ तारखेला मराठी भाषा दिन(जो कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस आहे) राज्यभर उत्साहात साजरा होईल.  परंतु त्याचवेळी, मान्यवर तत्वज्ञ आणि विद्वानांच्या मुंबईतील एका प्राचीन व भव्यतम हेरिटेज वास्तूचा दिमाखदार फलक अजूनही मायबोली मराठीऐवजी ‘Asiatic  Society of  Mumbai’  या आंग्ल भाषेत झळकलेला सर्वांना पाहायला मिळेल. या शहरातील रस्त्यांवर कित्येक जुन्या नव्या दुकानदार-व्यवसायिकांच्या  आणि कंपन्यांच्या पाट्या आजदेखील आंग्ल भाषेतच रंगविलेल्या पाहायला मिळतील !
                                                         -----------------------


💐थिएटरमध्ये💐

💐थिएटरमध्ये(रंगभूमी)💐
                 आमच्या मुंबईतील दादरचे शिवाजी मंदिर, गिरगावचे भालेराव नाट्यगृह,  व्हीटीचे(आता सीएसएमटी) रंगभवन, आणि परळ-प्रभादेवीच्या दामोदर हॉल-रविंद्र नाट्य मंदिरामधून खूप चांगली नाटकं व्हायची. ती जमेल तेव्हा  पाहिली आहेत. थोर मोठे कलावंत जवळून बघितलेत, त्यांचे अभिनय पाहिलेत.
                    या सगळ्यात, लक्षात राहिलेली नाटकं आहेत-‘ वाहातो ही दुर्वांची जुडी, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, संशय कल्लोळ, गेला माधव कुणीकडे, रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, तरुण तुर्क म्हातारे अर्क, पुरूष, हिमालयाची सावली, काचेचा चंद्र, एखादी तरी स्मीत रेषा, फुलाला सुगंध मातीचा, उघडले स्वर्गाचे दार, बबनप्रभूंची दोन प्रसिद्ध नाटके,……. ही यादी वाढणारी आहे.        
                 गिरगाव येथे मुंबई मराठी साहित्य संघाचे एक छानसे नाट्यगृह आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी हे थिएटर नाट्यरसिकांनी गजबजलेले असायचे. आज मात्र ते सुनसान अवस्थेत आहे. क्वचित एकाद-दुसरा नाट्यप्रयोग येथे होतो.  कधी विभागीय हौशी/प्रायोगिक एकांकिका-नाट्य महोत्सव किंवा स्पर्धा असतील, तर तेवढ्यापुरते त्या ठिकाणी रसिक प्रेक्षकांची आणि स्पर्धकांची वर्दळ असते, एरव्ही ‘साहित्य संघात’ शांतताच पाहायला मिळते !
                   दक्षिण मुंबईतील या जुन्या व प्रतिष्ठित नाट्यगृहात कितीतरी नाटके पाहण्याची संधी मला मिळालीय. त्यापैकी लक्षात राहिलेल्या नाटकांमधील एक नाटक होते ‘ऑल दि बेस्ट ! १९९४-९५ मध्ये हे नाटक खूप गाजले होते. सुरुवातीला हे एकांकिका म्हणून गाजले. नंतर ते नाटकाच्या रुपात प्रेक्षकांसमोर आले. अजूनही ते रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात असेल.
                माझ्या नजरेतुन या ‘बेस्ट’ मराठी नाटकाविषयी चार शब्द तुमच्यासाठी………….


💐ऑल दि बेस्ट…..
 नाट्यलेखन व दिग्दर्शन - देवेंद्र पेम,  मुख्य कलावंत- भरत जाधव, संजय नार्वेकर, सुहास परांजपे……..
                या नाटकात तीन तरुण आहेत. एक मुका, दुसरा बहिरा व तीसरा अंध तरुण आहे. तीघेही प्रेमवीर आहेत.  त्यांच्या संपर्कात आलेली एक सुंदर व उत्साही तरुणी त्यांना आवडू लागलीय ! तीघे तीच्या भोवती पिंगा घालताहेत ! बिचारे हवालदिल झालेत.  ज्या पद्धतीने त्यांचे प्रेम व्यक्त होतेय, ते आपण ‘ऑल दी बेस्ट’ मध्ये पाहातो.
                या नाटकात विनोद आहे. दुःख आहे, सौम्य विडंबनदेखील आहे !  विशेष म्हणजे हे नाटक संवादापेक्षा हावभावातुन प्रेक्षकांशी जास्त बोलते !
               या  तीन तरुणांना स्वतःच्या काही भावना आहेत.  राग आहे. लोभ आहे. या सगळ्या भावना ते प्रेमवीर विविध प्रसंगात व्यक्त करतात. आता  त्यांचे तीच्यावरील प्रेम वाढू लागलेय. लग्न करायचे तर हीच्याशीच, अशी तीघांनी जिद्द केलीय !  परंतु हरतऱ्हेचे प्रयत्न करून देखील तीघे प्रेमवीर यशस्वी होत नाहीत.
               त्या तरुणीला या प्रेमवीरांची प्रेमभावना समजते. फील होते तीला. मात्र  ही उत्साही तरुणी खूप समंजस आहे. त्यांना ती नम्रतेने नकार देते तेव्हा ते पार कोसळतात ! निराश होतात. तीचा राग येवू लागतो त्यांना.
द्वेषही वाटू लागतो ! ती त्यांना नकाराचे कारण सांगते तेव्हा त्यांना आणखी धक्का बसतो ! त्यांचा राग,द्वेष निघून जातो, तीच्याकडे बघण्याचा त्यांचा भाव बदलतो.
               तीचे प्रेम एका अपंग तरुणावर असल्याचे ती सांगते ! ते लवकरच लग्नदेखील करणार आहेत. हे ऐकल्यावर तिघांना तीच्याविषयी आदर वाटतो ! नाटक येथे संपते.
               ‘ऑल दी बेस्ट’चा विषय ‘प्रेम’ हा आहे. या प्रेमात एकीकडे निर्मलता आहे, दुसरीकडे त्याग आहे. प्रेमात झोकून देताना त्याग करणे, समरस होणे याला जेवढे महत्व असते त्याहीपेक्षा समर्पण मोठे ठरते, हे या सुंदर नाटकात दाखविले गेलेय. नाटकाचा शेवट पाहताना भावनिक प्रेक्षक आतून ‘हलतो’, अस्वस्थ होतो.
                 ही एक चांगली नाट्यकृती होती, आज यात नवीन कलावंत  आहेत. आज इतक्या वर्षानंतरही हे नाटक थिएटरमध्ये नाट्यप्रेमींची गर्दी खेचतेय.
                                                                 --------------------------