Thursday, 1 October 2020

💐भटकंती मनसोक्त💐

 

💐भटकंती मनसोक्त💐

               मनसोक्त  भटकंती करताना मिळणारा आनंद  आणि अनुभुती ही आपल्या आयुष्यातली महत्वाची ठेव असते, असे मी मानतो. या भटकंतीमध्ये आपल्याला फक्त निसर्गाचेच नाही, तर पक्षी आणि माणसांचे देखील अनोखे दर्शन घडते. त्यांचे भावविश्व निरखण्याची संधी मिळते.

             मात्र यात काही अपवाद आहेत. कायम आठवणीत राहणाऱ्या चांगल्या घटना भटकंतीत घडतात, तसा वाईट अनुभवसुद्दा आपल्या गाठीशी पडतो. काही वेळा जीवघेण्या प्रसंगाला अचानक सामोरे जावे लागते,तर काही प्रसंग अंगावर काटा आणतात. काही क्षण आपल्याला चांगला विचार देऊन जातात, आणि काही घटना आपल्याला भीती घालून आपला ताण वाढवतात. असे बरे-वाईट अनुभव मला तुम्हाला सांगायचे आहेत.

             मला आठवते, कर्नाळ्यातून तिन्ही सांजेला किल्ला उतरताना वाटेत अंगावर आलेला जखमी रानडुक्कर. हेही आठवते, की कास-सज्जनगड ट्रेकच्या वेळी रात्रीच्या मुक्कामात स्थानिक गुंडांनी हैदोस घालून उडविलेली झोप. हिमालयाच्या दुर्गम रस्त्याच्या कडेला, अती थंड वातावरणात पोत्यांच्या ढिगाऱ्यात काढलेली भयावह रात्रसुद्दा आठवतेय मला. गोव्याच्या जंगलात आणि गोपालगड ट्रेकमध्ये अचानकपणे वाटेत आलेला काळसर्प ! वानरलिंगी सुळक्याच्या पायथ्याशी मुक्कामाची वाट सापडल्याने उघड्या जंगल-झाडीत भयभीत अवस्थेत काढलेली रात्र ! अशा खूप काही आठवणी सांगता येती.

             आज मात्र मी एका तरुण बंगाली साधूच्या समवेत मारलेल्या गप्पा गोष्टी ट्रेकसोबत ऐकवीत आहे.........

💐कळसुबाईच्या वाटेवरील बंगाली बाबा💐   

            मध्यंतरी इगतपुरीचा ट्रेक केला. त्यानंतर कळसुबाई आणि ट्रिन्गलवाडी ट्रेकला जाणे झाले. महेंद्र, मराठे, अमिता, आणि विवेक, असे पाचजण होतो. कळसूबाई करून विवेक परतला. पाचव्यांदा की सहाव्यांदा कळसुबाईला जाणे झाले असावे. पण हा सीजन चांगला वाटला. मात्र घसरण वाटोवाट असल्याने चालताना खूप काळजी घ्यावी लागत होती. त्यात पाऊस भरपूर पडला. आता वरच्या वाटेत लोखंडी शिड्या तीन/चार ठिकाणी लावल्या आहेत. साखळी लावलेली डावीकडील वाट बरी वाटते. या ट्रेकमध्ये बारी सोडल्यानंतर वाटेत एक वस्ती लागते. ती पाठी गेल्यावर छोटी चढण लागते. त्यापुढे एक वळण पार केल्यानंतर एक छोटेसे मंदिर लागते. मुक्कामास उत्तम असे हे ठिकाण आहे. एक दिवस हाताशी होता, म्हणून कळसूबाई करून परतताना येथे राहायचे ठरविले.

             पावसाचे दिवस असल्याने जवळ छोटासा खडकाळ  नाला वाहात होता. इथे स्वयंपाक करताना सुकी लाकडे लागणार होती. भांडीही नव्हती. पण अवचित एक भला माणूस समोर आला. हा या मंदिरात राहणारा  बंगाली साधू.  त्याचे वय असावे ३५-४० वर्षे ! जवळचे गांवकरी त्याला 'बाबा'  म्हणतात !

            सुरुवातीला अबोल वाटणाऱ्या या बाबाने आमच्याशी  बऱ्याच गप्पा मारल्या. त्याच्या डोक्यावरील काही केसांच्या जाड जठा झाल्यात. या बाबाकडे मी बंगालचा विषय काढला, तसा तो भडाभडा बोलू लागला. बांगला देशातला हा मूळचा माणूस. भटकंती करीत करीत  तो इकडे आला आणि येथे राहिला.  दरवर्षी वस्तीचे ठिकाण तो बदलतो. यापूर्वी तो अंजनेरीच्या किल्ल्यावर होता. महाराष्ट्रात तो खूप फिरलाय. कोकण, दक्षिण भारत, उत्तर भारत, नेपाळ, तिबेट, आसाम, नागालँड, अशा कितीतरी ठिकाणच्या हकीकती बाबाने मला ऐकवल्या. या बाबाची  बोलण्याची ढबही काहीशी बंगाली होती.

            उपास-तपासाविषयी विचारल्यावर बाबा म्हणाला-' मी शाकाहारी नाही. पथ्यपाणी पाळत नाही. रोज मांस मच्छी लागते मला. त्यामुळे ठराविक गावकऱ्यांच्या घरी मी जेवतो. उपास नसतात. फक्त ग्रहणात आणि काही ठराविक महिन्यातील एखाद्या दिवशी मी जेवण करीत नाही '.

            या बाबाच्या अंगात बऱ्याच कला आहेत. तंत्र मंत्र विद्या, सिद्धी अवगत आहेत. तो मूर्ती घडवितो. प्लॅस्टरच्या मूर्तीसाठी कोणते रसायन, चुना आणि माती  लागते, त्याचा मार्केटमधला भाव काय आहे, हे सारे बाबा उत्साहात ऐकवतो. या बाबाने मेस्त्रीकाम देखील केलेय !

           या बंगाली बाबाचा वर्ण काळा असुन खाकी कळकटलेली फाटकी पॅन्ट आणि वर साधा शर्ट, असा त्याचा पोशाख आहे ! बोलताना हा बाबा इथला मूळ गांवकरीच वाटतो.

           बाबाने आम्हाला स्वयंपाक करायला लाकडे दिली. काही भांडी दिली. इतर मदतही करू लागला. जेवायला ठेवू का ? ’,  म्हणून विचारल्यावर, ' मी गावात नेहेमीचे जेवण जेवून येतो. तुम्ही नका ठेऊ जेवण ', असे त्याने नम्रपणे सांगितले.

          रात्री सगळ्यांच्या डोळ्यावर झोप जास्त येत होती. पण बाबा गप्पा मारीत राहिला. मराठे, महेंद्र, कंटाळले असावेत. ते पाहून बाबाने आवरते घेतले. त्याने झोपण्यापूर्वी आम्हाला सांगितले,' झोपताना हे देऊळ चांगले लावून घ्या, जवळ जनावरे फिरतात. जंगली कुत्र्यांचा पण वावर आहे इथे….., '         

          बाबाने इथल्या जमिनीमध्ये नाचणी आणि इतर धान्याची पेरणी केलीय.' स्वतःच्या उपजीविकेसाठी हे करायला हवेय ',असे त्याचे म्हणणे.

          दुसऱ्या दिवशी बाबाचा निरोप घेतला अन निघालो. इगतपुरी परिसरातील  ट्रिन्गलवाडी किल्ला करायचा होता. इगतपुरीहुन पुढे ट्रेक सुरू केला. मात्र या ट्रेकने नाकी नऊ आणले. पूर्ण प्रदक्षिणा ट्रेक झाला !  पाऊस सारखा होता. तरी आमचे चालणे सुरू राहिले. ट्रेक रूटवर डावीकडून जी चढण लागते, ती चढून पाठच्या बाजूला आलो. भैरोबाचे देऊळ असलेला डोंगर गाठला. पहिल्यांदा वाटले हाच किल्ला. मग नर्व्हस झालो. किल्ला तर पुढेच होता. गांवकरी वाटेत भेटल्यावर हे समजले. एकदाचा किल्ला दिसला !.

               या  ट्रिन्गलवाडी गडावर तुटलेल्या काही पायऱ्या आहेत. सगळीकडे भरपूर गवत वाढलंय. दोन उध्वस्त वाड्याचे अवशेष पाहायला मिळाले. या गडाच्या सुरुवातीला उजवीकडे एक भुयार लागते. तेथे नास्ता केला आणि लगेच परतीची वाट धरली. ट्रिन्गलवाडी  उतरताना वाटेतली पांडवलेणी पाह्यली. या लेण्यात सुंदर कोरीव काम केले आहे. मात्र उशीर झाल्याने जास्त पाहाणे नाही जमले.  

            असा हा कळसूबाई-ट्रिन्गलवाडीचा भन्नाट ट्रेक बंगाली बाबा समवेत केलेल्या गप्पांमुळे आजदेखील माझ्या छान आठवणीत राहिलाय.  

 

                                                         ::::::::::::::::::::::::::::::::::