Thursday, 1 November 2018

💐चित्रपट गप्पा💐


💐चित्रपट गप्पा💐

                प्रभात चित्रपट मंडळाच्या माध्यमातून सिनेमे पाहायला लागल्यापासून एक वेगळी आणि सजग दृष्टी लाभलीय. मात्र ही समिक्षकाच्या नजरेतून नव्हे, तर रसिक नजरेतून पाहणारी दृष्टी आहे. यापूर्वी तुमच्याशी चित्रपट गप्पा मारल्यात.. आताही आठवणीत राहिलेल्या तीन चित्रपटांविषयी?तुमच्याशी बोलायचेय.......

😘आगंतुक---दिग्दर्शन--सत्यजित रे

                   एका सुशिक्षित कुटुंबात, एक आगंतुक पाहुणा आठवडाभरासाठी राहायला येणार आहे. या पाहुण्याविषयी कुटुंबात निर्माण झालेले प्रश्न, शंका, संशय, झालेली कुचंबणा, इत्यादी घटनांचे सुंदर चित्रण ' आगंतुक ' मध्ये आहे. पस्तीस वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला, कुटुंब प्रमुखाच्या पत्नीचा-अनिलाचा हा छोटा मामा. तो जर्मनीहून भारतात, दिल्लीला येतो. तेथून आपल्या जवळच्या एकमेव नातेवाईकाकडे राहायची त्याची इच्छा असते. तसे त्याचे पत्र या कुटुंबास येते.

                    भाची अनिला आनंदीत होते. तीला नीट आठवत नाही, की हा आपला छोटा मामा कधी बरे गेला घर सोडून ? आठवू लागते, पण अंधुकच ! मन सांशक होते. मात्र ती मामाला भेटायला अधीर झालीय.

                   अनिलाचा नवरा वेगळीच शंका घेतो. हा कोण हीचा मामा ? हा इतकी वर्षे होता कुठं ? आताच बरे मामाला भाचीची आठवण झाली ? हा मामा बोगस तर नसेल ना ? हो, या एवढया आपल्या मोठ्या घरात राहायला म्हणून येईल आणि जाताना घरातले जडजवाहीर गपचूप घेऊन जाईल, काय नेम ?

                 पाहुणा येतो. तेथे राहातो. त्याचा स्वभाव मोकळाढाकळा आहे. त्या्प्रमाणे तो घरात वावरतो. त्याचे आयुष्य जग भटकंतीत गेलेय. जगभरात फिरताना जुन्या आध्य जनजातीमध्ये राहून-वावरून त्यांच्या जीवनाचा अभ्यास करणे हा याचा छंद ! नोकरी करीत तो आपला छंद जोपासतो. नंतर तो नोकरीही सोडतो. अभ्यासातून त्याला परदेशी मान्यवर संस्थांकडून चांगले अर्थार्जनहोत असते. 5त्याला या लोकांबद्दल विलक्षण जिव्हाळा आहे. घरातील माणसांना तो हे सगळे हिरीरीने सांगतो. पण त्याला जाणवते, की ही माणसं आपलं बोलणं वरवर ऐकताहेत. मुळात त्यांना आपल्याबद्दल काही देणे घेणे नाही ! उलट आपल्याबद्दल घरच्यांना संशय आहे.

                 अनिलाचा नवरा गप्प बसलेला नाही. मामाला तो बोलतं करून आडून आडून विचारत राहातो. शिवाय, आपल्या मित्रमंडळींना ओळख-गप्पांच्या निमित्ताने घरी आणतो. त्यांचे मार्फत मामावर प्रश्नांचे भडिमार करतो. पण हवी ती माहिती हाती लागत नाही. शेवटी एके दिवशी मित्रमार्फत  स्पष्टच विचारतो.......' सांगा, तुम्ही खरे कोण आहेत ? का आलात इथे ? काय ते खरं सांगा. नाही तर इथून आधी निघून जा पाहू. '......मामाला हे खूप जिव्हारी लागते. दुसऱ्या दिवशी तो आपली सगळी आवराआवर करतो आणि तेथून निघून जातो.

                छोटा मामा घरातून निघून गेल्याचे समजल्यावर अनिलाला वाईट वाटते. तीचा छोटा मुलगा सत्यकीही कोड्यात पडतो. असे कसे निघून गेले आपले आजोबा ? कुठे गेले ?

                अनिलाचा नवरा सावध होतो. तो आगंतुक मामा नेमका गेला कुठे याचा शोध सुरू करतो. जेव्हा त्याला समजते की, इथल्या एका इस्टेटीमध्ये त्याची काही भाग मालकी आहे. त्या व्यवहाराबद्दल तो इथं आलाय. इस्टेटीचे मुखत्यारपत्र ज्या माणसाकडे आहे, त्याचेकडे हा पोहोचतो.  तेथे पोहोचल्यावर कळते की मामा तिथून निघून गेलाय. शांतीवनातील आदिवासी बांधवांसमवेत काही दिवसांसाठी राहायला गेलाय. तेथून तो परस्पर परदेशात जाईल.

                अनिलासह सगळे कुटुंब अस्वस्थ होते. लगबग करून शांतीवनात ते पोहोचतात. मामा तेथे आनंदात वावरत असतो. ही माणसं त्याची क्षमा मागतात. चूक झाली आमची, असे म्हणतात परत घरी चालण्याचा आग्रह करतात. मामा चतुर आहे. तो हे आमंत्रण उडवून लावतो. इतर विषय काढून गप्पा सुरु करतो. या शांतीवनात त्यावेळी कुठल्याशा कार्यक्रम निमित्ताने नृत्याचा कार्यक्रम  सुरू होतो. ते आदिवासी बांधव उस्फूर्तपणे नृत्य करू लागतात. इतर काहीजण त्यांच्या नृत्यात सहभागी होतात. अनिलाला तीचा नवरा आग्रह करतो. मग सगळेच ती नृत्य धमाल पाहु लागतात. वातावरण आनंदी होते.

                     त्यावेळी संधी साधून अनिलाचे सगळे कुटुंब मामाला घरी चलण्याचा पुन्हा आग्रह करतात. मामा नाही म्हणत नाही. मग घरी आल्यावर छोट्या मामाचा चांगला पाहुणचार होतो. नंतर मामा तेथून प्रसन्न होऊन निघतो. निघताना एक बंद पाकीट अनिलाच्या हाती देतो   तीला सांगतो,' हे पत्र मी इथून गेल्यावर वाचा. आधी नाही......'

                  छोटा मामा निघताना सारेच गहिवरतात.  तो गेल्यावर त्याने दिलेल्या पत्राचे वाचन होते. '  माझ्या मुलीहून जवळची माझी भाची अनिला आहे. तेव्हा माझ्या  वाटणीतले पाच लाख मी तीलाच सुपूर्द करीत आहे. '   आता अनिला आणि तीच्या नवऱ्याला खूप वाईट वाटते. स्वतःविषयी पश्चाताप होतो. .........इथेच चित्रपट संपतो.

                कुटुंबाचे नातेसंबंध वास्तवात व्यवहारी असतात. मात्र त्यापलीकडेही चांगुलपणा ल्यालेली  माणसं या जगात आहेत. याची जाणीव करून  देणारा 'आगंतुक ' चित्रपट मला कायम लक्षात राहील.

                                           -------------------

😘जर्नी ऑफ होप(Journey of Hope)स्वित्झर्लंड-दिग्दर्शन-झेविअर कॉलर.

         विशेष परदेशी फिल्म ऑस्कर पुरस्कार-१९९०. इतरही जागतिक पुरस्कार प्राप्त  चित्रपट.

              माणसाची जगण्यासाठी केवढी धडपड चालू असते हे या सुंदर चित्रपटात दाखवलेय.

१९८८ मध्ये डायरेक्टरला पेपरमध्ये एक बातमी वाचायला मिळाली. स्वित्झर्लंड मध्ये चरितार्थासाठी आलेल्या एका तुर्की जोडप्याच्या सात वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला. आपल्या गरीब देशातून मोठे होण्यासाठी अमीर देशात आलेले जोडपे इटलीमध्ये एक स्मगलरच्या तावडीत सापडले होते. त्या टोळीने बाराजणांना स्विस पर्वतराजीत इटली-रोमच्या बॉर्डर जवळ ओसाड पण बर्फाळलेल्या भागात सोडून दिले होते. ही बातमी डायरेक्टरच्या डोक्यात भरली. त्या बातमीतून ' जर्नी ऑफ होप ' तयार झालाय.

              माणूस जगताना कसा आटापिटा करतो,आशावाद सोडता खड्यात कसा पडतो. याचे  वास्तव चित्रण चित्रपटात आहे. नायकाला एकूण सात मुलं असतात. शेती,शेळ्या मेंढी पालन करणाऱ्या या गरीब कुटुंबाची विशेष इस्टेट नसते. एकदा त्याला स्वित्झर्लंड मधील एका नातेवाईकाकडून पत्र येते की, तू इथे ये. इथे आलास तर तुझे करिअर घडेल. चार पैसे मिळतील. तुझ्या मेहेनतीचे चांगले फळ  मिळेल.

           नायक तयार होतो. जवळपास असलेली शेती, गुरं, बहुतेक मालमत्ता विकतो. मग पासपोर्ट बनवू घेतो. आपल्याबरोबर पोरांना नेणे परवडणारे नाही. तेव्हा नवराबायको दोघेच जायचे ठरवतात. मात्र  बायको तयार होत नाही. अखेर सातपैकी एका  मुलाला आपल्याबरोबर घेतात. हा मुलगा बोलायला चणुचुणीत आहे.

              मुलाचा पासपोर्ट बनवलेला नसतो. आता आयत्यावेळी कसा मिळणार ? अखेर मुलाला त्याच्या पासपोर्ट शिवाय नेण्याचे ठरवतात. त्यांचा प्रवास सुरू होतो.  स्वित्झर्लंडच्या दिशेने ते मार्गक्रमण करतात. प्रवासात पुरेशी कागदपत्रे नसल्याने ते सावध असतात. कधी बोटीच्या कंटेनर आणि शिपमनच्या कॅबिनमधून त्यांची सफर होत असते. नंतर ट्रकने पुढे निघतात. या प्रवासात चेकपोस्टवर, दोनपेक्षा जास्त प्रवाशी बेकायदेशीर आहेत म्हटल्यावर त्यांना उतरावे लागते.ट्रक ड्रायव्हरला लहान मुलाच्या चुणचुणीत पणाचे कौतुक वाटते. पण हे कुटुंब इथेच उतरतेय म्हटल्यावर त्याला वाईट वाटते. तो आग्रहाने नायकाला काही रक्कम खर्चासाठी देतो.

              नंतर हे कुटुंब एका रेल्वे स्टेशनवर येते. दुसराही असाच एक प्रवाशी त्यांचे सोबत असतो. इथे एक गुंड टोळके त्यांचा ताबा घेते. सगळे पैसे ते हिसकावून घेतात. मग त्यांना एका व्हॅनमध्ये कोंबून दूरवर नेतात   बर्फाळ जंगलात त्यांना सोडतात अन निघून जातात.

             या सगळ्या बारा जणांना, ' आता पुढे काय करायचे कुठे जायचे, सुटका कशी करून घ्यायची ? '  हा गंभीर प्रश्न पडतो. मुक्काम शोधत असताना त्यांना एका ठिकाणी दूरवर मोठी इमारत दिसते. एकदोघे दबकत दबकत जवळ जातात.त्या इमारती जवळ मोठा पहारा असतो. इतक्यात तिथला कुत्रा भुंकू लागतो. त्याला या लोकांचा सुगावा लागतो. पोलीस कुत्र्याला घेऊन पाठलाग करतात. एकजण सापडतो. तो सारे सांगतो. मग इतर काहीजणांना पकडले जाते. सगळेच भीतीने अर्धमेले होतात. हे ठिकाण असे आहे की तिथून कुठे पळताही येत नाही.आपल्या जवळच्या चीजवस्तू तेथेच टाकून ही माणसं वाट फुटेल तिकडे निघतात. नायकाची बायको आधीच पकडली गेली असते.

               मात्र या आपत्तीमध्ये पोलिसच त्यांना मदतीचे हात देतात. कायद्याने ही माणसं गुन्हेगार असतील तरी नाईलाजाने त्यांचेकडून हे घडलेय. हा विचार करून पोलीस त्यांच्या ताब्यातील माणसांची काळजी घेतात. सापडलेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र  भ्यालेले इतर लपून राहतात.

                  नायक स्वतःच्या मुलाला घेऊन हरतऱ्हेचे प्रयत्न करीत पुढे निघतो. पण त्याला यश येत नाही. सगळ्या धावपळीमध्ये लहान मुलाचे हाल होतात. रस्त्यात एक गाडीची लिफ्ट मिळते. मुलाला त्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेतात. त्याचेवर उपचार सुरू होतात. पण उपयोग होत नाही.मुलगा जातो. हा धक्का नायकाला सहन होत नाही. पोलीस नायकाच्या पत्नीला हे सांगतात. तीलाही मुलाच्या मृत्यूचा धक्का बसतो. मयाच प्रसंगाने चित्रपट संपतो.

                 या चित्रपटाची कथा वेधक होती. कलावंत गुणी आणि कसलेले होते. आणखी एक विशेष सांगायचेय - या चित्रपटात प्रारंभी आणि शेवटी वापरलेली तुर्की संगीताची धून बराच वेळ कानात घुमत राहाते. सनईसारखा आवाज,अन त्याचे दुःखी स्वर वातावरण आणखी गंभीर करतात, प्रारंभीही आणि चित्रपट संपल्यावरही !

                                                        -------------------

😘दस्तक-संजीव कुमार,राधा सलूजा.

                   हा हिंदी चित्रपट गाजला होता त्याची कथा आणि दिग्दर्शन चांगले असल्यामुळे नव्हे, तर हॉट सीन्समुळे ! कथेमध्ये वास्तव जगणे, भवतालच्या समाजाची विकृत दृष्टी, आयुष्यात वारंवार स्विकाराव्या लागणाऱ्या तडजोडी, यातही एकमेकांबद्दची आस्था-काळजी, अन प्रेम...हे सारे  ' दस्तक ' मध्ये आपण पाहातो.

                  नुकताच विवाह झालेले एक तरुण मुस्लिम जोडपे भाड्यासाठी खोली शोधत असतात. कमी भाड्यात हवी तशी जागा प्रयत्न करूनही मिळत नाही.आणि मिळते ती नेमकी रेडलाईट एरियात ! या खोलीत पूर्वी कोणी कोठेवाली बाई राहात असते. त्याच्या खाणाखुणा अजूनही तेथे आहेत. तीची एक तसबीर आहे. काही सामानसुमानही राहिलेय.

                तरुण जोडपे तेथे राहायला लागते. वातावरण उदास आहे. पण काय करणार ?  नायक काहीसा समंजस आहे. परिस्थितीशी त्याने जुळवून घेतलेय. पण प्रसंगच असे घडतात की दोघांत वाद सुरू होतात. तणाव वाढत जातात. हे का घडते ?

                 नायिका छान गाते. नवऱ्याने छंद म्हणून आणलेली सतार तीला साद घालते. तीची स्वरमयी गाणी आजूबाजूच्या रसिक श्रोत्यांना डोलायला लावतात. मात्र तिचे गाणे ऐकणारांत आंबटशौकीन जास्त आहेत. तीचे गाणं ऐकायच्या निमित्ताने त्यांची ये-जा वाढू लागते. त्यांना हाकलताना दोघांना नाकीनऊ येते.

               दिवसभरासाठी नवरा कामावर गेला की, ती एकटी होते. तीचा अस्वस्थपणा वाढतो. तीला विरंगुळा म्हणून नवरा पिंजरा आणतो तोतामैनेचा. आता तीचा वेळ चांगला कारणी लागतो. पण  तीचे एकाकीपण संपलेले नाही. तीची आंघोळ बघायला,चोरून तीला न्याहाळायला आणि तिचे कपडे बदलताना तीला पाहाणे, हा आंबटशौकिनांचा दिनक्रम होऊन बसतो.

              एकदा ती वेळ घालवायला घरात ठेवलेली सिगारेट का कोण जाणे, ती ओढायला जाते. तीला जोराचा ठसका लागतो. या साऱ्यावर बारीक नजर ठेवणारी एक कोठेवाली बाई तीच्या माणसांच्या मदतीने पुढे होते. मदतीच्या, फसव्या मायेने नायिकेला जाळ्यात ओढण्याचा जोरदार प्रयत्न होतो. पण सावध झालेली नायिका स्वतःची सुटका करून घेते. यामुळेहीे नवराबायकोत वाद घडतात. दुरावा होतो. पण शेवटी एकमेकांना समजून घेत प्रेमाने परिस्थितीचा स्वीकार करीत दोघांत एकोपा होतो.

                ' दस्तक' ला संगीत दिले होते राजेश रोशन यांनी. गाणी गायली होती महंमद रफी, लता यांनी. गीतं लिहिली होती मजरुह,सुल्तानपुरी यांची.  हा चित्रपट त्यातील काही बोल्ड सीन्समुळे वादग्रस्त ठरला होता. पण त्यामुळे चित्रपटाचा दर्जा घसरल्याचे जाणवले नाही. यातील नायक-नायिका यांनी उत्तम काम केलंय. या साऱ्या गुणांमुळे ' दस्तक' लक्षात राहातो.

                                                             --------------------------------