Wednesday, 3 March 2021

💐💐भटकंती मनसोक्त💐💐

             गिर्यारोहण करताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील कठीण सुळके-कडे आणि प्रस्तर, भिंतींवर आरोहण करण्याची कधी संधी मिळाली तर, अनुभवी सिनिअर्स मंडळीनी केलेले नेतृत्व आपल्याला जवळून पहायला मिळते. त्यांनी दिलेले मोलाचे धडे  पुढील मोहिमांत उपयोगी ठरतात. आपली साहस वृत्ती वाढत असताना मनोबलही वाढत असते. या शिवाय, कठीण परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्याची कुवत निर्माण होते.

                मात्र प्रत्येक चढाईची  मोहिम आपली कसोटी घेत असते. मोहिमेत क्षणोक्षणी धोके समोर येत असतात. अशा स्थितीत कधी आपल्या किंवा सहकाऱ्याच्या हातून क्षुल्लक चुक घडली, तरी गंभीर अपघात घडतो अन सारेच संपते !

                कधी आरोहण करताना अथवा उतरताना आपली नजर सहज जरी खाली गेली, तरी डोके भिरभिल्यागत होते ! समोर मृत्यू  दिसू लागतो. मन पार डळमळीत होते. अशावेळी अखंड सावध राहावे लागते. आपली अशी अवस्था आपल्या नवीन सहकाऱ्याने पाहिली तर ? तर परिस्थिती आणखी बिकट होते.

                 चढाई मोहिमेत सावध राहूनही कधी अपघात घडतात. अर्थात, हे अपघात फक्त मानवी चुकीमुळे घडतात असे नाही. शिखर, प्रस्तर-भिंती चढता-उतरताना अकस्मात एखादा छोटासा दगड-चिरा किंवा छोटी दगडी कपार निखळते, किंवा माती, मुरूमाच्या भूसभूशीतपणामुळे(scree)  आपला पाय निसटतो ! कधी जोरदार वाऱ्याने अथवा कुठल्याही कारणाने अंगावर दगड नाहीतर दरड कोसळते !

                 साप, विंचू, मधमाशी यांच्या हल्ल्यामुळे देखील बिथरायला होते घात घडतो !

                 अशाच एका शिखर चढाईची आठवण माझ्या त्यावेळच्या मनस्थितीसह येथे सांगत आहे………

 💐मांगी तुंगीचा थरार………

              नाशिक सटाणा परिसरात ताहराबाद मार्गावर दोन उत्तुंग शिखरे दूरवरून दिसतात. त्यांचं नाव मांगीतुंगी”. या जोड शिखरांवर वर्षातून एकदा उत्सवाचे वेळी ध्वजारोहण करायला त्या भागातले भाविक जातात. जैन धर्मियांचे एक जुने देवालय मांगीतुंगीच्या पायथ्याशी आहे. दरवर्षी तेथे मोठा उत्सव साजरा होतो.

             याच मांगीतुंगी शिखरांचे सुळके चढायचे आम्ही ठरवले. अशोक शेणवी हा अनुभवी गिर्यारोहक आमच्या मोहिमेचा नेता होता. आजवरच्या चढाई केलेल्या सूळक्यांत जास्त उंच आणि चॅलेंजिंग अशी ही मोहिम होती. नाना पाताडे, अमिता चव्हाण, महेंद्र वर्षा नार्वेकर आणि स्वतः अशोक शेणवी असे आम्ही एकूण सहाजण यात सहभागी होतो.

              प्रथम तुंगीवर वर्षा, अमिता, महेंद्र. असे तीघेजण निघाले. तत्पूर्वी चढाईच्या वाटेत अगोदरच्या टीमने लावलेले जवळपास पस्तीस एक्सपान्शन बोल्टस अशोकने स्वतः तपासले.

              खरंतर बोल्ट शिवाय क्लाईम्बिंग करणे खरे चॅलेंजिंग असते. अजिंक्य सुळके-कडे चढाई करताना आवश्यक ठिकाणी या बोल्टसचा  वापर गिर्यारोहक करतात ते सुरक्षिततेच्या दृष्टीने. नंतर त्यावर चढाई करणाऱ्या टीमला ते उपयोगी ठरतात, मात्र ते सुरक्षित असल्याची आधी खात्री करून घ्यावी लागते.

              कठीण चढाई करताना झुमार हे दोरखंडात अडकवलेले असते. ते आपण हाताने व्यवस्थित वर केले की आपली पावले सुलभपणे वर सरकतात. चढता उतरताना अत्यंत जरुरीचा असणारा बिले रोप(Belay Rope) प्रत्येकाला सुरक्षित ठेवतो.

              आमच्या नेत्याने चढाई करताना बोल्टसची खात्री करून घेतली. झुमार आणि बिले रोप्स देखील तयार ठेवले. त्यानंतर त्याने तीघांना झुमार आणि फिक्स रोपची मदत घेऊन चढाईच्या सूचना दिल्या.

              दुसऱ्या टप्प्यापर्यंत तीघांची चढाई झाल्यानंतर आलेला ट्रॅव्हर्स(वळण घेणारी तिरकी चढाई) कठीण होता. खूप प्रयत्न करूनही पुढे होणे त्यांना शक्य होत नव्हते.                        

                पुढच्या एका टप्प्यात झुमार क्लाईम्बिंग सुरू झाले. त्यावेळी ट्रॅव्हर्सच्या पुढे एका अरुंद असलेल्या ठिकाणी  झुमार पुढे सरकावताना अमिताला प्रॉब्लेम झाला. तीने झुमार क्रॅबच्या पुढे टाकायचा तो मागे टाकला. पुढे गेल्यावर हॅन्ड होल्ड कमी राह्यल्यामुळे अमिता फसली काही फूट खाली आली ! तीच्या वजनाचा भार महेंद्रवर आला, कारण त्याने खालून तीला बिले रोप दिला होता. तीचा फॉल झाला तेव्हा त्या हिसक्याने महेंद्रच्या पोटाजवळ ताण आला. आता अमिता कोसळलेल्या अवस्थेत एका ठिकाणी अडकून पडली होती ! पाय, हात रॉकच्या छोट्या होल्डला धरताना तीचे हाल झाले. सर्वांना त्यामुळे टेन्शन आले.

              आम्ही खालून काही करू शकत नव्हतो. नाना, अशोक खूप वरती चढून गेले होते. आवाज त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता. अखेर नानाला सारे मोठ्या आवाजात सांगितल्यावर बिचारा धावपळ करीत त्याखालच्या  टप्प्यावर उतरून आला. तो विचारात पडला होता. मग त्याने वरून बिलेची मदत घेऊन अमिताला वर नेण्याचा प्रयत्न सुरू केला. ते जमेना तेव्हा खालच्या पॅच पर्यंत तीला आणायचे प्रयत्न सुरू झाले. मात्र अडकलेल्याझुमारची अडचण येऊ लागली. अखेर नाना अशोकने सारे व्यवस्थित पार पाडले अमिताला सुरक्षित केले.

              महेंद्र आणि माझी सुद्दा या ट्रॅव्हर्सजवळ वाट लागली होती. दोन तीनदा आमचे प्रयत्न झाले. मग थकलो आम्ही. त्या ट्रॅव्हर्सजवळ चढताना हाताचा होल्ड सेफ नव्हता. प्रेस होल्ड घ्यायला जजमेंट नव्हती. शिवाय पुढे सरकताना शरीराचा तोल डावीकडे जात होता. तेथे मोठा फॉल होता !  मग थोडा वेळ तेथेच विश्रांती घेतली फ्रेश होऊन चढाई सुरू केली. त्यानंतर वरच्या टप्प्यात पोहोचलो !

              पुढील चढाईचे टप्पेही अवघड होते. मात्र हळूहळू कॉन्फिडन्स येत होता, त्यामुळे चढाई सुरू ठेवली आणि शेवटी तुंगी शिखरावर पोहोचलो. शिखरावरचा भाग मोठा आहे.

               तुंगासाठी सकाळी पावणे दहाला चढाईस प्रारंभ केला होता. ही चढाई पहिल्यांदा पूर्ण केली अशोकने. तो दुपारी बाराला १० कमी असताना वर पोहोचला होता.

                मांगीवर ज्या रूटने सुरुवात केली, तो रूट पुढे होल्ड नाही, म्हणून सोडून द्यावा लागला होता. नंतर रेग्युलर रूटवर आलो आणि चढाई यशस्वी झाली. तुंगी प्रमाणे या सूळक्यावरसुद्दा प्रशस्त जागा आहे. नेचर लव्हर्स या मुंबईतील संस्थेच्या मेम्बर्सनी ठेवलेल्या पादुकांची फरशी मांगीवर होती. गणपतीची छोटी मूर्ती देखील शिखरावर पाहिली.

               या दोन्ही उत्तुंग सूळक्यांवर मोठे लोखंडी पाईप्स झेंडयासाठी लावलेत. मात्र तुफान वाऱ्यामुळे मांगीचा लोखंडी पाईप वाकडा तिकडा होऊन पडला होता. आम्ही मांगीवर गावकऱ्यांनी दिलेला भगवा झेंडा फडकवला !

                मांगीवर चढताना पहिल्या टप्प्यावर एक चूक हातून घडली होती. नशीब त्यावेळी काही अपघात नाही झाला. पुढच्या बाजूस रोप लावून वर्षाला वर पाठवत होतो, तो ट्रॅव्हर्स अवघड होता. बाजूला खोल दरी होती ! त्यामुळे भयाण वाटायचे. रोप क्रॅबमधून पास केला व सेफ्टी म्हणून त्याला एक पीळा घातला होता. पण ती टेन्शनमध्ये आली तो ट्रॅव्हर्स रूट पाहून. चक्क रडायला लागली ! पुढे  जाता वर्षा परत फिरु लागली. परतताना तीचे लक्ष क्रॅबकडे गेले. तो ओपनझाला होता ! दोघांनाही शॉक बसला ! लगेच तीला आतल्या सुरक्षित बाजूस आणून बसवले. जर ती मागच्या बाजूला झुकली असती तर ? तर फॉल झाला असता तीचा. हाडपण मिळाले  नसते तीचे एवढया उंचावर आम्ही होतो.

                  थोड्या वेळाने तीला समजावून परत खाली पाठवायचे ठरवले. यावेळी महेंद्रने वरून बिले रोप दिला होता. तो बिले घेतला आणि क्रॅबमध्ये रोप टाकून तीला लॉक केले. आता ती सेफ होती. मात्र दोन पावले गेल्यावर ती गळून गेली !  पुन्हा रडायला लागली. तीला खूप समजावले. पण उपयोग झाला नाही. मग तीला रॅपलिंगने खाली बेसला पाठवायचे ठरले. रॅपलिंगलाही ती तयार होत नव्हती. अखेर अशोकने तीला रॅपलिंगने खाली बेसवर पाठविले.

                 मांगीतुंगीची चढाई मोहीम फत्ते करून आम्ही सारे सुरक्षितरित्या खाली गावात परतलो. तेथल्या गावकऱ्यांनी आमचे खूप कौतुक केले. त्यांचा भाबडा पाहुणचार घेऊन आम्ही परतीची वाट धरली मार्गस्थ झालो.

                 १९९१ साली झालेल्या या मोहिमेतील थरार आज इतक्या वर्षांनी देखील माझ्यासह सर्वांच्या लक्षात राहिलाय.                           

                                                         :::::::::::::::::::::::::::