Tuesday, 1 December 2020

💐थिएटरमध्ये💐

💐थिएटरमध्ये💐

             एका मराठी टीव्ही वाहिनीवर सध्या एक मालिका सुरू झाली आहे. ती अधून मधून पाहताना मला एका मराठी नाटकाची आठवण झाली. आम्ही ते १९९६ साली पाहिलंय. त्या नाटकाचे नाव होते-कुसुम मनोहर लेले.

                   चतुर लबाड विधुर तरुणाकडून  फसवणूक झालेल्या एका तरुण महिलेची नंतर किती फरफट होते, हे दाखविणारे ते नाटक आज आठवले, तरी मनी अस्वस्थता येते. इतकी लबाड  माणसे जगात असतात ? स्वार्थासाठी एवढी खालची पातळी ती गाठु शकतात ?

                   हे सगळे भयंकर आहे.

                   मला या गंभीर विषयावरील नाटकाचं कथानक तुम्हाला सांगायचंय, तुम्हीही अस्वस्थ व्हाल………..


💐कुसुम मनोहर लेले💐

दिग्दर्शक-विनय आपटे, लेखन-अशोक समेळ.

कलावंत-सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, गिरीश ओक, मंदा देसाई,  बाळ कर्वे.

                हे मराठी नाटक  नाटककाराने सत्य घटनेवर लिहिलेले आहे.

                    एका विवाह संस्थेमार्फत विधूर तरुण मनोहर लेले आणि सुजाता(नंतरची कुसुम) नावाच्या तरुणीचे लग्न जमते. ते दोघे फिरतात आणि एका भेटीत ती तरुणी त्याला शरीर देऊन बसते. नंतर तीची प्रेग्नन्सी जवळ येते. तीचा भावी पती मनोहर लेले कुसुमला धीर देतो. तीला पुण्याहून दूर औंधला बाळंतपणासाठी आणून ठेवतो. कुसुम बाळंत होते. तीला मुलगा होतो. दोघेही आनंदी होतात. लहान मुलासह दोघे नवीन घरी येतात. घरी चांगले वातावरण आहे. तीच्या सेवेला एक मोलकरीण सदैव हजर असते. ही मोलकरीण लहान बाळाची तीची चांगली काळजी घेतेय.

                   एके दिवशी मात्र  किरकोळ विषयावरून वाद होतो आणि कुसुमला चक्क घराबाहेर काढले जाते, तेही मूल तीच्याकडून हिसकावून घेऊन !  तेव्हा कुसुम वेडीपीशी होते. गयावया करते, रडते. पण दोघे ढिम्म असतात ! घरातली मोलकरीण मनोहर लेलेची लग्नाची पत्नी असते ! मूल होत नाही म्हणून त्या  दोघा पती-पत्नीनी हा घाणेरडा प्लॅन अगोदरच रचलेला असतो !

                  फसलेली कुसुम हतबल होऊन मानसिकरीत्या कोसळते. विवाह मंडळाच्या संचालिकेस हे कळल्यावर ती देखील दुःखी होते. मग ते  महिला मंडळामार्फत कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू करतात. पण लबाड मनोहर लेलेने अगदी पद्धतशीरपणे एकही पुरावा बाकी ठेवलेला नसतो ! 

                  या सर्व घटनांकडे लक्ष ठेवणारा, विवाह संस्थेच्या संचालिकेचा सज्जन नवरा एक बेत ठरवतो. भालचंद्र खोटे नावाचा उनाडटप्पू  तरुण आहे. तो स्वतःचे लग्न जमवण्यासाठी यांच्या संस्थेकडे वारंवार येत-जात असतो. संचालिकेचा नवरा भाळचंद्रला विश्वासात घेऊन सगळी घटना सांगतो. असेही सांगतो  की, ‘ त्या तरुणीचे मूल तू मिळवून दे, तुझे लग्न आम्ही संस्थेमार्फत नक्की जुळवून देऊ. भालचंद्राला हे आश्वासन मिळाल्यावर तो चॅलेंज अंगावर घेतो !

                  पोलीस इन्स्पेक्टरच्या वेशात भालचंद्र एकदा लेलेच्या घरी टपकतो. मनोहर लेलेला जाब विचारतो. लेलेची घाबरगुंडी उडते ! पण अजीजीने तो, ‘ मी सगळे काही कायदेशीरपणे केलेय हो, मी गुन्हेगार नाही ‘, असे इन्स्पेक्टरला साळसूदपणे सांगतो. भालचंद्र(इन्स्पेक्टर)चा नाईलाज होतो. तो तसाच परततो.

                  मग गुंड बनून भालचंद्र चाकूच्या जोरावर लेलेच्या  घरी धडकतो ! त्याला शेवटचा इंगा  दाखवतो. तेव्हा,  काही उपायच नसल्याने, मनोहर लेले त्या लहान मुलाला परत करतो.

                  हे मूल परत सुजाता(कुसुम)च्या ताब्यात देण्याचे वेळी तीला उमगते की,  भालचंद्र दुसरा तीसरा कोणी नसून तीचा पहिला पती सदानंदच आहे. त्याच्या दारुडेपणामुळे सुजाताने घटस्फोट घेतलेला असतो. नंतर पश्चाताप झालेला सदानंद सुजाताचा शोध घेतो. आपल्यामुळे उध्वस्त झालेल्या सुजाताचे आयुष्य पुन्हा विस्कटू नये म्हणून या मार्गाने तो सुजाताच्या मदतीला येतो. अखेर सुजाता आणि सदानंद यांचा समेट होतो.

                    प्रेक्षक हे नाटक बघून अस्वस्थ होतात. नाटक संपल्यावर प्रेक्षकांना सत्य स्थितीच्या स्लाईड्स दाखविल्या जातात. ते सत्य पाहून थिएटरबाहेर पडणारा प्रेक्षक अधिक अस्वस्थ होतो.

                    पुण्यात प्रत्यक्ष घडलेल्या या हकीकतीचा शेवट नाटकात खरा दाखविलेला नाही. नाटकातील शेवट सुखांत आहे. वास्तवात ती तरुणी अजूनही भ्रमिष्टावस्थेत वर्ध्याच्या आश्रमात राहात आहे (ही स्थिती आहे १९९६ ची). पुष्कळ संस्था व्यक्तींनी प्रयत्न करून देखील मनोहर लेलेला धडा बसलेला नाही. तो सहीसलामत त्या मुलासह सुखाने वावरतोय. आता तो मुलगा मोठा झाला असल्याने त्याला स्वतःचा भूतकाळ माहीतही नसेल.

                    थिएटरमधून बाहेर पडताना डोक्यात झिणझिण्या येत असतात. चांगली वाटणारी माणसे इतकी स्वार्थी असतात ? ती इतक्या थराला जातात ? असे प्रश्न मनात वारंवार येत राहातात.

                    हे नाटक वास्तवता दाखवते आणि माणसातली खालची पातळीही पुढे आणते.

            

                                              ::::::::::::::::::::::::::::::::::