Monday, 1 June 2020

💐आठवणीतील व्याख्याने💐

💐आठवणीतील व्याख्याने💐

                 स्वातंत्र्य पूर्व काळातील थोर नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी एक विशेष व्याख्यानमाला चिपळूण(जिल्हा रत्नागिरी) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केली होती. त्यातले पहिलेच व्याख्यान प्रत्यक्ष ऐकण्याचा योग मला आला. लोकमान्य टिळकांनी आयुष्यात देशाच्यास्वातंत्र्य लढ्यात योगदान देताना वैयक्तिक आयुष्यात किती वेदना सहन केल्या. गाजावाजा करता किती पुण्यकर्म केले, या विषयी टिळक कुटुंबाची पूर्वकहाणी लोकमान्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यांच्या गुणदोषांसह सांगणारी ही विशेष व्याख्यानमाला चिपळूणमधीलच एक अभ्यासू लोकप्रिय प्राध्यापक धनंजय चितळे यांनी श्रोत्यांपुढे सादर केली.

                 लोकमान्य टिळकांनी वर्गात, ’ मी शेंगा खाल्ल्या नाहीत, म्हणून मी काही शिक्षा भोगणार नाही ‘, अशा स्पष्ट शब्दात आपल्या शिक्षकांना उत्तर दिले. तसेच, ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनच.’  असे बाणेदार उद्गार काढले होते. या दोन घटना टिळकांच्या कर्तुत्वाविषयी प्रसिद्ध असणाऱ्या घटना आहेत. मात्र या पलीकडेही त्यांच्या आयुष्यात काही घटना घडल्यात, की ज्या तुम्हा-आम्हाला माहिती होणे आवश्यक आहे.

                मला पहिल्या एकाच व्याख्यानातून लोकमान्यांच्या अपरिचित स्वभावाची माहिती प्रभावित करून गेलीय. हे व्याख्यान तुम्हीसुद्धा ऐकावे, अशी इच्छा आहे………..

 

💐अलौकिक लोकमान्य टिळक💐

 व्याख्याते-प्राध्यापक धनंजय चितळे(चिपळूण).

                    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व यावर जवळपास पस्तीस अभ्यासकांनी ग्रंथ लेखन केलेले आहे. त्यात संस्कृत, आणि ओवीबद्ध लिखाणाचाही समावेश आहे. प्रा. ..पाठक, ना.सी.फडके, गंगाधर गाडगीळ, सदानंद मोरे, पेंडसे, जयवंत दळवी या दिग्गजां व्यतिरिक्त इतर मान्यवर लेखक या यादीमध्ये आहेत.

                   प्राध्यापक चितळे यांनी हे ग्रंथ अभ्यासून टिळकांचे अलौकिकत्व श्रोत्यांना आपल्या व्याख्यानात ऐकविले. टिळक ही  कशी  विलक्षण वल्ली  होती, याची अपरिचित माहिती चितळे यांनी सर्वाना ओघवत्या भाषेत  ऐकवली.       

                   पोहोण्यात वाकबगार, स्वयंपाक करण्याची आणि होडी चालवण्याची आवड असणारा , हिशेब आणि पाठांतर करण्यात  मात्तबर, कोणतीही जाहिरात करता आपले सर्वस्व दान करणारा दाता, शिवप्रभूंविषयी अपार प्रेम असणारा निष्ठावंत, आकाशातील ग्रह-नक्षत्रांचा विलक्षण अभ्यासु, अवघड अशी गणितं सोडविण्यात माहीर असणारा विद्यार्थी, स्पष्टवक्ता   निर्भीड पत्रकार, एवढंच नव्हे तर वाहन चालवायची आवड, अशी कितीतरी वैशिष्ट्ये ल्यालेली व्यक्ती म्हणजे आपले लोकमान्य टिळक !          

                    टिळक  कुटुंबातील असामान्य व्यक्ती आणि त्यांनी केलेली विविध कर्तुत्वे  हे पण सर्वांना माहिती असायला हवेय.

                   लोकमान्यांच्या पणजोबांचे नाव-केशवपंत. हे पणजोबा पेशवाईच्या उत्तर काळात मोठ्या हुद्यावर होते. त्यांना कोकणातल्या अंजनवेल गावचे वतन इनाम म्हणून मिळाले होते. पण नंतर ते वतन गेले.

                   टिळकांच्या आजोबांचे नाव रामचंद्रपंत. वडिलांचे नाव गंगाधरपंत. त्यांचे गाव दापोली. वडील गंगाधरपंत व्यासंगी ग्रंथकार होते. त्यांनी विविध विषयांवर लेखन केले होते. टिळक पंचांग त्यांनी सुरू केले. दैनंदिन व्यवहारातील जवळपास तीन हजार नवीन शब्द त्यांनी तयार निर्माण केले होते. त्यांचा स्वभाव काहीसा फटकळ होता. चिपळूण येथील शाळेमध्ये ते शिक्षक होते.              

                 लोकमान्यांच्या आईचे नाव-पार्वतीबाई. त्यांना तीन मुली झाल्या. आपल्याला आता मुलगा व्हावा म्हणून आईने आदित्य व्रत केले. कालांतराने एका असामान्य बाळाला तीने जन्म दिला. ही माऊली टिळक दहा वर्षाचे असतानाच देवाघरी गेली.

                 हे बाळ वाढत होते. लहानपणापासून जिज्ञासू वृत्ती आणि शिकण्याची आवड असलेले हे गुणी बाळ संस्कृत भाषा शिकू लागले, विविध श्लोक रचना पाठ करू लागले. गणिते शिकताना अवघड वाटणारी गणिते लीलया सोडविणारा हा हुशार विद्यार्थी एकदा वडिलांना म्हणाला, ‘मला बाणभट्टांची कादंबरी वाचायचीय, मिळेल ना मला ? तात्काळ वडिलांनी बाळला उत्तर दिले, ‘ हो हो देईन तुला ते पुस्तक, पण त्यासाठी मी तुला एक गणित देईन ते सोडवून द्यावे लागेल, काय ? ’ बाळ लगेच तयार झाला !  वडिलांनी दिलेले  अवघड गणित टिळकांनी तीन दिवस मेहेनत घेऊन सोडवुब दाखविले !

               लोकमान्यांना ग्रह, नक्षत्रांबद्दल कुतूहल होते. त्यांनी या कुतूहलापोटी अभ्यास सुरू केला  आणि त्यावर लिहिले देखील ! मात्र त्यांना पत्रिका अथवा त्यावर आधारित भाकीतं, व्रतवैकल्ये यांमध्ये स्वारस्य नव्हते.   

               टिळकांचे शालेय शिक्षण सिटी स्कुलमध्ये झाले. शाळेत अतिशय हुशार पण खट्याळ स्वभाव असणारा हा विद्यार्थी पाठांतर करण्यात सर्वात पुढे असायचा. वयाच्या दहाव्या वर्षी टिळकांनी काही ग्रंथ तोंडपाठ केले होते ! किचकट आकडेमोड करायला ते कधी मागे नसायचे.आपले शिक्षण घेत ते कायद्याचे पदवीधर झाले.

               स्वराज्य मिळविणे हा प्रत्येकाचा हक्क आहे हे मान्य, पण नुसता हक्क मान्य करून नेमके काय मिळणार ? प्रथम सर्वांनी शिक्षण घ्यायला हवे, चांगले शिक्षित व्हायला हवे, राज्य असो  किंवा संस्था चालविणे असो, त्यासाठी शिक्षण घ्यायला हवे, असा  लोकमान्य टिळकांचा आग्रह होता.

              यातूनच पुढे  शिक्षण संस्था निर्माण करून शाळा काढण्याची योजना  त्यांनी आगरकर    चिपळूणकर यांच्यासमोर मांडली.   

              या त्रयींच्या संकल्पेनेतून पुण्यात सन १८८० साली न्यू इंग्लिश स्कुल सुरू झाले. या शाळेत विद्यार्थी मार खाणार नाही, शाळेचे इन्स्पेक्षन नसेल. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये  मनमोकळी प्रश्नोत्तरे होतील. अशी विध्यार्थीप्रिय धोरणे ठरविण्यात आली. ही शाळा लवकरच लोकप्रिय झाली. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या  वाढू लागली.

             खासगी शाळा  नेहेमी स्वतंत्र राहाव्यात. शालेय शिक्षण मातृभाषेतून व्हावे, देशातील जाणकार लोकांचे सहाय्य शालेय पुस्तके लिहिताना आवर्जून घेण्यात यावे, असा आग्रह या तिघा  दिग्गजांनी  ब्रिटिश सरकारकडे धरला.

            ब्रिटिश गव्हर्नर जेम्स फर्गसन हे शिक्षणप्रेमी होते. टिळक-चिपळूणकर-आगरकरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिक्षण आणि उच्चशिक्षणाविषयी सरकारी धोरण स्पष्ट व्हावे, अशी मागणी केली. या जेम्स फर्गसननीच टिळकांना त्यांची शाळा विस्तार करण्याची सूचना केली. स्वतः देणगी सुद्दा जाहीर केली, आणि Unity is strength हा लोगो धारण केलेली  डेक्कन एज्युकेशन सोसायटी  स्थापन झाली. गव्हर्नर फर्गसन यांनी पहिली देणगी दिलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे   फर्गसन कॉलेज पुण्यातील मध्यवर्ती भागात उभे राहिले.

           याच फर्गसन कॉलेजचा एक हुशार विद्यार्थी विनायक दामोदर सावरकर याने पुण्यातील प्रसिद्द लकडी पुलावर पहिली परदेशी कापडाची होळी केली. मात्र या कृत्यामुळे कॉलेजचे प्राचार्य रँग्लर शि.. परांजपे यांनी सावरकरांना रस्टीकेट केले. टिळकांनी रँग्लर परांजप्यांच्या या कारवाईवर टीका केली होती.

           स्वराज्यपूर्व काळात सर्वत्र प्रसिद्द असलेल्या  केसरी या नियतकालिकाची उपसंपादकीय जबाबदारी काकासाहेब म्हणजेच कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचेवर टिळकांनी सोपविली होती. सुरुवातीला ते साप्ताहिक होते, नंतर ते वार्तापत्र रुपात प्रसिद्द होऊ लागले. संपादकाने न्यायाधीशांप्रमाणे सर्वज्ञानी असावयास हवे, असे टिळकांचे  धोरण होते.

           मराठा हे नियतकालिकसुद्दा टिळकांनी सुरू केले. मराठा टिळक पहायचे, तर आगरकर केसरी सुरुवातीला सांभाळायचे. केसरी आणि मराठा या दोन्ही नियतकालिकांतील अग्रलेखांनी इंग्रजांची झोप उडवली होती. स्पष्ट आणि निर्भीड भाषेत प्रसिद्ध होणारे लेख स्वातंत्र्य पूर्व काळातील तरुण तसेच जागरुक वाचकांना प्रेरणा देत होते.

            संपादकाने न्यायाधीशांप्रमाणे सर्वज्ञानी असावयास  हवे, असे त्यांचे प्रामाणिक मत  होते.

            त्यांचे बरेच  अग्रलेख कायद्याच्या चौकटीत सापडले नाहीत.आपल्या अंकातील प्रत्येक लेखन-प्रकाशनात असणारी जबाबदारी लोकमान्यांनी स्वतःची मानली. त्यांना स्वलेखनाबद्दल नाही, तर दुसऱ्यांच्या लेखाबद्दल शिक्षा झाली  होती.

              टिळक एलएलबी होते. पण त्यांनी वकिली केली नाही. अपवाद अग्रलेख-संबंधातील खटल्यांचा. एका खटल्यात टिळक स्वतः  एकवीस तास दहा मिनिटे बचावाचे भाषण कोर्टात बोलले !  मात्र न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद अमान्य करीत त्यांना देशद्रोही ठरवून, सहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा त्यांना ठोठावली.  

             टिळकांना शिक्षा झाल्याचे कळताच त्यांचा लाडका पुतण्या ओक्साबोक्सी  रडला होता, पण टिळकांची पत्नी मात्र डोळ्यात टिपूस आणता खंबीर राहिली.

            १९५० ला बेळगाव येथे पत्रकारांचे अधिवेशनात बोलताना आचार्य अत्रे  यांनी, ‘ केसरीच्या लेखाबद्दल  लोकमान्य टिळकांना  राजद्रोहाची  जी शिक्षा झाली, ती पत्रकारांसाठी महत्वाची घटना होय ‘, असे उद्गार काढून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला होता.                 

            या थोर राष्ट्रपुरुषाची स्वराज्य संस्थापक शिवप्रभूंवर अपार श्रद्धा होती. रायगडावरील शिवसमाधीची  पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. भरघोस देणगीही दिली, स्वतः किल्ले रायगडावर जाऊन तेथील  समाधीस्थळ पाहिले. विस्तीर्ण अशा ऐतिहासिक गंगा सागर तलावात पोहून टिळकांनी  प्रदक्षिणादेखील मारली.

            लोकमान्यांनी मंडालेच्या तुरुंगवासात असताना आपले मृत्युपत्र  लिहुन ठेवले होते. त्यांनी आपल्या हयातीनंतर सारी स्थावर मालमत्ता आपल्या गावाला दान करून टाकली.

            अलौकिक लोकमान्य टिळकांच्या  कर्तृत्वाचे  पैलू  ऐकताना मी  भारावून गेलो होतो. आपणही भारावून गेला असाल……….

        

 

                                       ::::::::::::::::::::::::::::::::::