Thursday, 2 March 2023

💐💐मनभावन गीतं, गाणी अन कविता💐💐

            खट्याळ शब्दात लिहिलेले एक सुंदर बालगीत माझ्या संग्रहात आहे. भाऊ तोरसेकर या मुंबईकर पत्रकार, साहित्यिकाने हे बडबडगीत लिहिले. १९८०- ९५ च्या काळात त्यांनी भरपूर लिखाण केले. मार्मिक साप्ताहिकाच्या संपादन विभागात ते जबाबदार पदावर कार्यरत होते. त्यांची काही प्रवासगीतं आजही कित्येक ट्रीपमध्ये गायली जातात.

                हे बडबडगीत वाचताना आपणही लहान होऊन शाळेत जाऊया……………..

💐दप्तरात भांडण💐

 

वसुदच्या पेनला झालं पडसं, दिसेना काही नाकापुढचं

निबातून शाई होती गळत, फाऊंटन पेनला नाही कळत.

 

कोऱ्या कागदावरती डाग, सुंदर वहीला आला राग

पुस्तक म्हणालं हसत हसत, आता बसा शाई पुसत.

 

पेन्सिल टोचून म्हणते कशी, शाई अशी जाईल कशी ?

खोडरब्बर मध्येच घुसला, शाईसंगे भांडत बसला.

 

पेन बिचारं घाबरलं, त्याने टोपण पांघरलं

कंपास पेटी गुणाची बेटी, तिने काढली युक्ती मोठी.

 

वॉटर बॅगला मारून हाक, म्हणाली शाई पुसून टाक

वहीवर पाणी पसरलं, पुढच्या पानावर घसरलं.

 

आता वहीला आलं रडू, धावत धावत आला खडू

म्हणतो चटकन पाणी पितो. मीच तेवढा फळ्याला भितो.

 

फळा म्हणाला पोरांनो, खूप भांडलात चोरांनो

सरकत म्हणते लंबू पट्टी, भांडता कसले करू गट्टी.

 

दप्तर आलं रांगत रांगत, नाही कुणाचं नाव सांगत

गडबड थोडी कमी करा, आपली आपली जागा धरा.

 

दुखतो बाबा माझा घसा, हळूहळू आत बसा

वसुद आली तयार होऊन, शाळेत गेली दप्तर घेऊन.

 

                                                     --भाऊ तोरसेकर.      

 

                                      ::::::::::::::::::::::::::

 

Wednesday, 1 March 2023

💐💐चित्रपट गप्पा💐💐

           प्रभात चित्र मंडळाने काही वर्षांपूर्वी एक उपक्रम सुरू केला होता. दिग्दर्शक, लेखक आणि या क्षेत्रातले जाणकार सभासदांसमोर त्यांची आवडती  सेलिब्रिटी  फिल्म सादर करायचे. त्यात एकदा पुरुषोत्तम बेर्डे यांनी अमेरिकन फिल्म दाखवली होती.

                मनोरुग्णांचे भावविश्व त्यात चित्रित झाले होते. विविध अकॅडमी पुरस्कार मिळालेली ही फिल्म होती.  मनोरुग्ण व्यक्तीच्या समस्या, इतरांशी त्याचे वागणे बोलणे याविषयी मुक्त भाष्य करणारा तो विलक्षण चित्रपट होता.

                त्याबद्दल इथे लिहीत आहे………….

💐वन फ्ल्यू ओव्हर कुकुज (१९७५-अमेरिका)💐

दिग्दर्शकमिलोस फॉर्मन, प्रमुख कलावंतजॅक निकलसन, केन केसी यांच्या याच नावाच्या प्रसिध्द कादंबरीवर आधारित चित्रपट.

           पुरुषोत्तम बेर्डे यांनी प्रथम या फिल्मविषयी माहिती दिली. वेड्यांचे जग, मनोरुग्ण कैदी त्यांना सुधारण्यासाठी निर्माण केलेले मनोरुग्णालय(Mental Asylum). तेथे साऱ्या घटना घडतात. हे रुग्णालय सांभाळणारी जबाबदार माणसे रुग्ण बरा व्हावा यासाठी झटत आहेत. पण त्यांचे प्रयत्न पुरेसे आणि प्रामाणिक आहेत का ? हे प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो. आपल्या दृष्टीने त्यांच्या जगण्याला काही अर्थ नाही. ते भावना शून्य आहेत.

                रुग्णालयात बहुतेक रुग्ण वयस्कर आहेत. दोन - तीनच तरुण आहेत.  यांच्यात बलात्कार प्रकरणातील एक तरुण आरोपी येतो. नंतर एक पत्रकार दाखल होतो, ज्याने वेडा असल्याचे नाटक केलेय !

                या सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेला स्टाफ म्हणजे हेड नर्स, सुरक्षा रक्षक  इत्यादींचे वागणे त्याचप्रमाणे  प्रत्येक रुग्णाच्या भावभावनांचे चित्रण या चित्रपटात केलेले आहे. ते बघताना आपण अस्वस्थ होतो.     

                त्यांच्या स्वैर वागण्यावर मुख्य नर्स नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करते. पण रुग्णांना ते असह्य होत असते. ते संतप्त होतात. त्यातुन ते सुटकेचा उपाय शोधतात.

                एकदा त्यांच्यातील एक तरुण ठरवून सगळ्यांना हॉस्पिटलबाहेर नेतो    नौकाविहार घडवून आणतो. नंतर एका रात्री स्त्रीसुखासाठी दोन तरुणींना  आत आणून मौजमजा करायचे प्रयत्नदेखील काही रुग्ण  करतात. यातून एक दुर्घटना घडते. एकदा इथल्या नर्सवर पेशंट हल्ला करून गळा दाबायचा प्रयत्न करतो. ती मरणारच असते, सुदैवाने हॉस्पिटलमधील स्टाफ येऊन तिची सुटका करतो.

                एकदा तर एका तरुण रुग्णाला लग्नानंतरचे सुख उपभोगायला बाहेरून तरुणी पुरवली जाते !  हॉस्पिटलच्या स्टाफला  हा प्रकार समजल्यावर मात्र त्या रुग्णाची वाताहात होते. तो घाबरतो. हेड नर्स त्याला म्हणते, ‘ तुझ्या आईला आता  सारे सांगते '. हे त्याला सहन होत नाही. तो आकांडतांडव करतो. नंतर जीव देतो !

               या मनोरुग्णांवर उपचारासाठी शास्त्राने जे उपचार ठेवलेत त्यात शॉक ट्रीटमेंटचे उपचारही आहेत. पण ते रोग्याला अर्धमेले करतात. काही काळ त्यांचा मेंदू  नॉर्मल होतो, नंतर ते पूर्ववत तसेच होतात.

               यांच्यातील एक चतुर  रुग्ण(कैदी) इतरांच्या मदतीने वॉर्डमध्ये मोठा गोंधळ माजवतो. त्यातुन तिघांना उपचार म्हणून शॉक द्यायला आणले जाते. त्या ट्रिटमेंटच्या वेळी पहिला आरडाओरडा करीत ते उपचार नाकारतो. मग जबरदस्तीने शॉक्स दिले जातात. बिचारा हतबल होतो. दुसरा जो खरा वेडा नसतो, तो उघडपणे शॉकचा उपचार स्विकारतो ! मनातून मात्र घाबरलेला असतो. ही ट्रीटमेंट त्याला सहन होत नाही. ट्रीटमेंटनंतर त्याला वॉर्डमध्ये आणले जाते. त्यावेळी त्याचा तिसरा पार्टनर(रेड इंडियन) जो शरीराने धिप्पाड बलवान असतो, त्याला याचा दुःखी  चेहरा पाहवत नाही. तो त्या तरुणाला म्हणतो, ‘ तुला या अवस्थेत बघणे मला शक्य नाही. त्यापेक्षा मी तुला मारून मुक्ती देतो ‘, असे म्हणून क्षणात त्याचा गळा दाबतो व त्याला संपवतो !

               हा चित्रपट लांबीचे मोठा होता. मध्येच काहीसा कंटाळवाणादेखील वाटला.

               हा चित्रपट बेर्डे यांनी बऱ्याचदा पाहिलाय. त्याचे कथानक, कलावंत, दिग्दर्शन, चित्रपटातले संवाद, हे सारे  त्यांना पाठ आहे.  ते म्हणाले,' माझी आई एक मानसिक रोगी होती. तिच्यावर उपचार चालू असायचे. मीही डॉक्टर म्हणून आईवर  उपचार केले आहेत. या मनोरुग्णांना सांभाळणे सोपे काम नाही. त्यांच्यासारखे होऊन त्यांचे जगणे सुकर करणे हेच त्यांच्यावर खरे उपचार असतात. शॉक ट्रीटमेंट हा काही योग्य उपचार नव्हे. हॉस्पिटलमध्ये मात्र अशा पेशंटमध्ये पूर्ण सुधारणा होईल ही अपेक्षाच करू नये.'

               अशा मनोरुग्णालयात शिस्त किती आणि कुणाकुणाला लावावी ? त्या सिनिअर नर्सला किती डीसिप्लीन हवाय ? मला आपल्या तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवण झाली. त्या अशाच शिस्तप्रिय होत्या. पण अखेरीस काय उपयोग झाला ? काय घडले पुढे ? मग उद्रेक का होऊ नये ? '

                 पुरुषोत्तम बेर्डे यांनी शेवटी सांगितले, ' आपल्या मराठीत पाठलाग, हिंदीत खामोश, खिलौना असे काही चित्रपट प्रदर्शित  झालेत. पण त्यामध्ये एकट्याचे अनुभव चित्रित झालेत.  वन फ्ल्यू ओव्हर…’ मधील अनुभव मात्र सामूहिक असे आहेत. शिवाय त्यात  संवादापेक्षा कृती जास्त आहे. त्यामुळे ते वास्तवाच्या जास्त जवळचे वाटतात.'       

                 तर, असा हा वेधक चित्रपट  तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा.

 

                                             ::::::::::::::::::::::::::::::::