Friday, 1 October 2021

💐💐मन भावन गीत, गाणे आणि कविता💐💐

               बाळ कोल्हटकर हे माझे आवडते नाटककार. त्यांचे प्रत्येक संगीतमय नाटक नऊ अक्षरांच्या नावाने प्रसिद्ध व्हायचे. त्याचे कोडे मला अद्याप उमजले नाही. मात्र या मनस्वी कलाकर्मीचे प्रत्येक नाटक संवेदनशील रसिक प्रेक्षकांना भावायचे नाट्य प्रयोग हाऊसफुल्ल व्हायचे.

                      लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीन्ही जबाबदाऱ्या पेलणाऱ्या बाळ कोल्हटकरांच्या प्रत्येक नाटकामध्ये भावनेने ओथंबलेले  प्रदिर्घ संवाद असायचे, संस्कारशील कुटुंबे असायची. प्रसंगी डोळे भरून येणारे सीन्स असायचे.

                      त्यांचे नाटक संपताना कोणता ना कोणता संस्कारी संदेश घेऊन प्रेक्षक बाहेर यायचे. कोल्हटकरांची  दोन नाटके विशेष गाजली. एक-‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, दुसरे-‘दुरितांचे तिमिर जावो’.  दुर्वांची जुडीमधील वाया गेलेल्या भावास नेहेमी सावरून घेणारी ताई आणि  दुरितांचे…..’ मधील मन आणि पैशाने श्रीमंत असणारा भावनाशील तरुण नायक नाट्यप्रेमींच्या कायम स्मरणात राहील.

                     दुरितांचे……..’ मधील एक नाट्यपद आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त करीत प्रत्येक मातृप्रेमी माणसाला रडवेल इतके वास्तव शोकगीत आहे. ते ऐकताना आजही आपले डोळे भरून येतील आपल्या आईची मूर्ती समोर साकार होईल………..

💐आई तुझी आठवण येते…….

 

आई तुझी आठवण येते

सुखद स्मृतींच्या कल्लोळानी

काळीज काजळते…..

 

वात्सल्याचा कुठे उमाळा,

तव हातांचा नसे जिव्हाळा

हृदयांचे मम होऊन पाणी

नयनी दाटून येते…..

 

आई तुझ्याविण जगी एकटा,

पोरकाच मज म्हणति करंटा

व्यथा मनींची कुणास सांगू

काळीज तिळतिळ तुटते…..

 

हाक मारितो 'आई आई',

चुके लेकरू सुन्या दिशाही

तव बाळाची हाक माऊली,

का नच कानी येते……

 

सुकल्या नयनी नूरले पाणी,

सुकल्या कंठी उमटे वाणी

मुके पाखरू  पहा मनाचे,

जागी तडफड करते……

 

नको जीव हा नकोच जगणे,

आई वाचून जीवन मरणे

एकदाच मझ घेई जवळी,

पुसूनी लोचने माते.............

 

नाटक-दुरितांचे तिमिर जाओ, गीत-बाळ कोल्हटकर, दिगुच्या भूमिकेत-भालचंद्र पेंढारकर.

 

                                                  *******************