Friday, 1 February 2019

💐धार्मिक पण मार्मिक💐

💐धार्मिक पण मार्मिक💐
               संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबा रायांच्या वास्तव्याने पावन झालेले पुण्याजवळील आळंदी, हे माझे आवडते ठिकाण. एकट्याने तेथे जाऊन निवांत राहाणे हा एक वेगळा व विलक्षण अनुभव आहे, आणि त्याचा लाभ मी अधूनमधून घेतो आहे.
               नुकतंच आळंदीला जाणं झालं, त्याविषयी तुमच्याशी हा मार्मिक संवाद.........


💐दशक्रिया समारंभ,श्रीक्षेत्र आळंदी.........
           याक्षणी इंद्रायणी नदीच्या घाटावर मी निवांत बसलोय. वेळ आहे सकाळची. इंद्रायणीचे पात्र पुरेसे भरलेले नाही. तीचा जलप्रवाह शांतपणे वाहात आहे. घाटावर चहू दिशेला पायऱ्या आहेत. उजवीकडे एक गाडीरस्ता आहे पुलाचा. डावीकडे असलेल्या एका छोट्या सिमेंट पुलावरून समोरच्या काठावर(म्हणजे घाटावर) जा ये करता येतेय. इथे कोठेही बसता येतेय.
            कोवळ्या उन्हाची तिरीप सर्वत्र पसरलीय. मोसम थंडीचा असल्याने कोवळी उन्हे छान अंग शेकताहेत.
         या नयनरम्य घाटाचा परिसर न्याहाळावा, थोडावेळ पायऱ्यांवर-चौथऱ्यावर बसावे. भवतालची वर्दळ निरखावी ही इच्छा आहे.
          पण याक्षणी हे काय चाललेय ?  समोरच्या बाजूला एक ह.ब.प. महाराज प्रवचनात्मक  किर्तन करताहेत !  त्यांच्या समोर जवळपास शंभर सव्वाशेचा जमाव श्रोतूवर्गाच्या रूपात बसलेला आहे.  किर्तनकार आहेत, भास्कराचार्य आदिनाथ महाराज. ते आपल्या रसाळ वाणीने उपस्थितांना प्रबोधनाचे चार शब्द सांगताहेत. त्यांचे वाक्य न वाक्य जगण्याचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगत आहे. कान देऊन ऐकणारात, माझ्यासह तिथले  उपस्थित यात्रिक सहभागी आहेत. वातावरणात आता शांतताही आहे आणि गंभीरताही !
                 महाराज सांगताहेत-'  आज तुम्ही सारेजण इथं श्रीमती मुक्ताबाई गेनूभाऊ ठाकूर यांच्या दशक्रिया  विधीसाठी जमला आहात.  त्या आता आपल्यात नाहीत. पण त्यांना या मृत्यूनंतर दुसरा जन्म मिळालाय ना  !  त्यांचे  जीवन दुसऱ्या नवीन  रूपात  सुरू झालेले आहे बरं. आणि तुम्ही आम्ही सुद्धा या चक्रातून जाणारआहोत. मग या जन्मात आपण तरी काय करीत आहोत ? काय केले आहे ? तर या मुक्ताबाईंनी जसे जीवनाचे सार्थक केले,  तसे करायला हवेय.हिने कधी कोणाला दुखविले नाही, भांडली नाही. उलट चार माणसं जोडीत मुक्ताबाई गेली. हसत आनंदात दुसरा जन्म घेतला. तेव्हा मंडळी, कोणाला न दुखवता जगा. सर्वांशी चांगले वागा. या आयुष्याचा निरोप आनंदाने घ्या. आणि शेवटी श्रीरामाचे-देवाचे नाम ओठी असू द्या. बघा, पुढचा जन्मदेखील आनंदी होईल. '
                 आदिनाथ महाराजांचे हे शब्द ' आत ' शिरलेत. आपण भारावून गेलो आहोत. किर्तनाचा समारोप होतोय. महाराजांच्या आवाहनानंतर दोन मिनिटं स्तब्ध राहुन स्वर्गीय मुक्ताबाईंना श्रद्दांजली वाहिली जाते.
             नंतर एक निवेदक हाती माईक घेऊन सांगू लागतो, '  मातोश्री मुक्ताबाईंचे सगळे नातेवाईक आणि परिवार इथं जमलाय. त्यांना मी विनंती करीत आहे. आता इथं मी ज्यांची नावे घेणार आहे त्यांनी इथं स्टेजपाशी या.'  तो एकेकाची नाव पुकारायला लागतो- ' श्री. .........यांनी आता देणगी द्यायला पुढं यायचं आहे. देणगी घ्यायला श्री...................यांनी इथं यायचं आहे. नावाचा पुकारा होतो. ती माणसं चटकन पुढे येतात. देवाण-घेवाण सुरू  होते.
               हे संपल्यावर एक तरुण येऊन माईक हाती घेतो- ' दिवंगत मुक्ताबाईंवर तो आईच्या मायेने बोलू लागतो. बोलता बोलता तालासुरात एक कविता म्हणू लागतो, ' तुझ्या शीतल छायेमध्ये मी जगेन गं..... आई माझी मायेचा सागर गं, दिला  तिनं जीवनाला आकार गं.......' ही कविता तो मनापासून आळवल्याचे जाणवते. याक्षणी आपल्या आईचीही आठवण येतेय.
              कविता वाचन संपते. त्यानंतर कोणी नातेवाईक येऊन उभा राहातो. आभाराचे भाषण सुरू होते. ' आमची माता चालती बोलती गेली. ती चांगल्या स्वभावाची होती. तिचे नावही संत मुक्ताबाईचे. इतर भावंडांची नावं पण, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, अशी.....थोर संतमंडळीचं घर आमचं.........'
              हे संपल्यावर, एवढावेळ तिथं उपस्थित असलेले माजी महापौर आणि विध्यमान नगरसेवक प्रतिक शेळके,की काडगे भाषण सुरू करतात. अगदी थोडक्या शब्दांत बोलून ते मुक्ताबाईंना श्रद्धांजली  वाहतात. मग हा कार्यक्रम संपल्याचे निवेदक जाहीर करतो.
             या दशक्रियेचा समारोप होतो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने !
            याक्षणी  वर अवकाशात राहून दिवंगत मुक्ताबाईच्या आत्म्याला ही दशक्रिया किती प्रसन्न वाटत असेल, नाही !
            या भावपूर्ण वातावरणात घाटावर एका कोपऱ्यात एकत्र बसलेल्या काही बायका मात्र  आपले दुःख आक्रोश व्यक्त करीत दिवंगत मुक्ताबाईला श्रद्धांजली वाहात आहेत.

                                           :::::::::::::::::::::::;;;

           

       

💐कथाघर💐

💐कथाघर💐
               ही एक लघुकथा आहे, एका संस्कारक्षम कुटुंबातील मुलाला त्याचे भले-बुरे काय हे सांगून, त्याला चांगले वळण लागावे म्हणून प्रयत्न करणे किती महत्वाचे आहे, हा बोध या कथेतून मिळतो. अर्थात, मी काही जाणता लेखक नाही. त्यामुळे या कथेचा बरा वाईट दर्जा सुज्ञ वाचकांनीच ठरवावा.
💐या वळणावर........
                       आमच्या शेजारचा सुनिल साखरदांडे मूळचा पुण्याचा. त्याचे वडील एस.टी.त मोठे अधिकारी. त्यामुळे त्यांची दोन-तीन वर्षांनी बदली व्हायची.
                       आता सुनिलच्या वडीलांची बदली सावंतवाडी डेपोला झाली होती. तेथून फार लांब नाही आणि अगदी जवळही नाही, असे आमचे तुळसगाव. साखरदांडेंचे सारे कुटुंब आमच्या गावात आता राहायला आले. सुनिलचे वडील आणि आमचे अण्णा एकमेकांचे जुने स्नेही. त्यामुळे आमच्या घराजवळ असलेल्या एका छानशा टुमदार घरात हे कुटुंब भाड्याने राहण्यासाठी, अण्णांनी शेजाऱ्यांना विनंती केली. ते राहायचे दूर मुंबईला. त्यांनी अण्णांचे ऐकले आणि साखरदांडे कुटुंबास हे घर भाड्याने राहायला दिले.
                   तर, या नव्या शेजारच्यांशी आमची चांगली गट्टी जमली. त्यांची दोन मुले-थोरली माधुरी व धाकटा सुनिल. हे आमच्याकडे खेळायला नेहेमी येत. वाडीतील इतर पोरांचा गोतावळा दिवसभर खेळायच्या निमित्ताने आमच्या भल्या मोठ्या खळ्यात गोंधळ घालायचा, त्यात या माधुरी-सुनीलची भर पडली !
                मला सुनिल बापूदादा म्हणत असे. मी पोलीस खात्यात कामाला. म्हणून तो मला थोडा टरकायचा. मला मात्र त्याच्याबद्दल खुप प्रेम वाटायचे. शाळेची सहावी इयत्ता पूर्ण केलेली, दुडू दुडू धावणारी सुनिलची छोटीशी मूर्ती. काहीसा जाड, डोळे टपोरे आणि घारुले.असा हा छोकरा शाळा असो व नसो, शाळेच्या खाकी-सफेद युनिफॉर्म मध्ये आमच्याकडे वावरायचा !
पोरांच्या गोतावळ्यात धिंगाणा घालून सुनिल कंटाळला की माझ्याकडे यायचा. मला शोधायचा. जणू काय आम्ही एकमेकांचे जुने दोस्तच. !
               मला कामावरून घरी आल्यावर खूप थकवा यायचा. बहुतेकदा मी घरी खोलीत निवांत आराम करीत असे. इथे हा सुनिल हजर व्हायचा. म्हणायचा-' बापूदादा, ओ बापूदादा,.......',हे हेल काढून हाक मारणे खूप मजेदार होते. फेरीवाला कसा ओरडतो ? तसा सुनिल ओरडायचा. हे ओरडणे आमच्या आईच्या कानी पडले की, ती सुनिलवर लटक्या रागाने डोळे वटारे ! त्याला ओरडे. हा आपला खळाळा हसे ! ' अरे लबाडा, आमचा बापूदादा झोपलाय बरं का. दमून येतो बाबा तो कामावरून. तुझ्यासारखा दिवसभर खेळत बसत नाही....'
              मात्र सुनिलवर याचा परिणाम होत नसे. त्याचे हाक मारणे सुरूच  असे. मी मग उठून बसे. त्याला दम द्यावासा वाटे, पण मला ते जमणारे नव्हते. ' ओ बापूदादा, काय एवढे काम करता हो तुम्ही ? आम्ही दिवसभर खेळतो एवढे, नाही ना दमत ? मग ?
' अरे बाबा सुनिल, तुला नेतो तेथे माझे काम दाखवायला. मग तुला समजेल....'
             ' बापूदादा, न्याना मला एकदा तुमच्या बरोबर. मला तुमची ती गन बघायचीय. किती मोठी असते हो ती ? '. हे ऐकून मी खो खो हसत सुटे.' मला हातात तर द्याल ना तुम्ही गन ? '. हे असले आमचे संवाद आमच्या घरच्यांना पाठ झाले होते.
              सातवीत गेलेल्या सुनिलचे डोके मात्र तेज होते. कधीकधी तो कठीण प्रश्न विचारून मला हैराण करायचा. सुनिलचे वडील आबा साखरदांडे कडक शिस्तीचे होते. सायंकाळी सारे घरीच असावेत, घरातील प्रत्येक लहान-थोराने देवाची पूजा दररोज करावी, निरर्थक भटकू नये, आणि बडबडूही नये, असे त्यांना वाटे.
              सुनिल-माधुरी ही दोन मुलं आबांच्या शिस्तीच्या साच्यात न बसणारी ! नववीत शिकणारी माधुरी माझ्या धाकट्या बहिणीची-अनिताची वर्ग मैत्रीण. दोघी अगदी मन लावून अभ्यास करायच्या. सुनिल मात्र अभ्यासू नव्हता. त्याचे लक्षनेहेमी खेळ आणि हुंदडण्याकडे.!
             अलिकडे मात्र तो आमच्या घरी कमी येऊ लागल्याचे मला जाणवले.  मी एकदा हे त्याच्या आईस विचारल्यावर ती मला म्हणाली,' अहो, त्याची सहामाही परीक्षा जवळ आलीय ना, तो त्या सारंग वकिलांच्या मुलाकडे जातो हल्ली अभ्यासाला. दोघेही जोरात अभ्यास करतात म्हणे !'.
            अलिकडे सुनिल उशिरा घरी येई. माझ्याकडे तो आल्यावर, ' काय रे ?  जोरात अभ्यास करतोस म्हणे तू ? '
हे विचारल्यावर सुनिल चटकन उत्तर द्यायचा-'  बापूदादा, तो रवी सारंग आहे ना, तेथे त्याच्या घरी आम्ही दोघे अभ्यास करतो. आता परीक्षा जवळ आलीय ना '. हे बोलून सुनिल चटकन निघून जायचा.
             अखेर त्याची परीक्षा आटोपली. त्याच दिवशी संध्याकाळी तो मला शोधीत घरी आला. ' बापूदादा, ओ बापूदादा,..' ही नेहेमीची हाक मी ऐकली. मी नाईट ड्युटीवर जायची तयारी करीत होतो. पोलीसाची वर्दी मी चढवली आणि त्याचेकडे पाहात स्मित केले. ' बापूदादा, काय छान दिसताय हो तुम्हो. बापूदादा, मला पण करा ना पोलीस तुम्ही, एकदा तरी..? 'त्यावर मला हसूच फुटले. ' सुनिल, अरे अजून खूप वेळ आहे रे. तू आधी शाळेतला अभ्यास कर. खूप शीक. परीक्षा पास हो. मग....' माझे बोलणे मध्येच अडवीत तो मला म्हणाला, ' बापूदादा, किती शिकायचे हो त्यासाठी ? '
             याला आता काय सगळे सांगणार ?   ' हसताय का बापूदादा ? पोलीस झालो की मला असलाच ड्रेस मिळणार ना ? ' हो, हो, नक्की मिळेल तुला असला ड्रेस. तू नको काळजी करुस. तू आधी शाळेच्या सगळ्या परिक्षा दे. खुप अभ्यास करून परिक्षा दे. मग चांगला पास  होशील, आणि हो, तू चांगला धडधाकट व हुशार पण व्हायला हवेय बरं का ? '
           ' म्हणजे कसा ? ' सुनिलचा भाबडा प्रश्न ! ' म्हणजे कोणाला घाबरायचे नाही. आळस नाही करायचा. चोराला पण पकडायची तयारी हवी...'
          ' काय ? खुप मजा येईलना मग ? ' हे बोलताना सुनिलची नजर माझ्या शिट्टीकडे गेली.  ' बापूदादा, मला असली शिट्टी हवीय ! ' कशाला रे ? मी म्हणालो. ' मला रस्त्यातल्या सगळ्या गाड्या थांबवायच्यात. ' अरेच्या ? असं आहे काय ? देऊया आणून शिट्टी तुला. पण सुनिल, आता मला उशीर होतोय बघ. मी निघतो आता, ' मी त्याला उत्तर दिले.
          ' हो, हो, पण उद्या आणाल ना तसली शिट्टी ? मी हो हो केले, तसा सुनिल खुशीत निघून गेला ! काही दिवसांनंतर सुनिलच्या परीक्षेचा निकाल लागला. त्याची बहीण माधुरी आमच्या घरी आली. ' बापूदादा, आमचा सुनिल या परीक्षेत नापास झालाय की रे ! 'मला आश्चर्यच वाटले !  ' माधुरी, काय सांगतेस काय तू ? ' सुनिल जोरात अभ्यास करीत होता ना ? मग ?
' तर काय, बापूदादा,  आमचे आबा एवढे रागावलेत म्हणून सांगू ? उद्या ते त्याच्या शाळेत जाणार म्हणालेत. सुनिल घरात गप्प बसलाय आता '. माधुरीने मला माहिती दिली.
            वाईट वाटले मला. एवढा अभ्यास करत होता ना तो ? मग ?.....
          दुसऱ्या दिवशी सायंकाळी मला सुनिल त्याच्या घरात जोरात रडत असल्याचे ऐकायला आले. मी चक्रावलो. त्याच्या घरी निघालो. घरामध्ये हातात काठी घेऊन कोपऱ्यात बसलेल्या सुनिलवर त्याचे रागावलेले आबा ती काठी आपटीत होते. हात उगारीत होते. ' बोल, जाशील का पुन्हा त्या सारंगकडे परत ? ' सुनिल रडत ओरडत त्यांना सांगीत होता-' मी नाही जाणार, नाही जाणार तिथे...' मी पटकन पुढे झालो आणि आबांना शांत केले. आबा क्षणभर शांत झाले. मग त्यांनी हातातली काठी बाजूस फेकली. मला म्हणाले- ' बापू, काय सांगू तुला ? या सुनिलचे प्रताप पाहिले नाहीस तू. सहामाहीत नापास झालाय कळल्यावर थेट शाळेत जाऊन आलो, तर याचे सर म्हणाले की, तुमचा सुनिल शाळेत अलिकडे रोज येत नाही !आणि सारंग बरोबर दोस्ती केलीय त्याने. त्याचे बरोबर कुठे कुठे आणि काय काय थेरं करतोय तो. दोघांच्या कथा सांगितल्यात सरांनी. ' आबा खुप काही सांगू लागले....
            मला डोळ्यापुढे गावातले प्रसिद्द सारंग वकील दिसू लागले. त्यांचाच हा मूलगा ! आमच्या तालुक्यात प्रसिद्द असलेल्या सारंग वकिलांचा पोरगा रवी सारंग उपद्दव्यापी होता. घरातून गुपचूप तो पैसे घ्यायचा. कोठल्या रिक्षावाल्याची मदत घेऊन थेट सावंतवाडी पर्यंत जायचा ! तिथल्या एक सिनेमा थिएटरला आलेला नवीन सिनेमा हा पाहणारच ! नंतर एका रिक्षावाल्याबरोबर भटकत असायचा. रिक्षाची दोनचार भाडी केली की, त्या रिक्षावाल्याची  दिवसभराची कमाई झाली ! तोपर्यंत हा रवी सारंग एकटाच सावंतवाडीच्या बाजारात आणि कुठे कुठे टाइमपास करीत फिरे म्हणे !

           हल्ली सुनिल त्याचेबरोबर राहू लागला.'. एवढ्या मोठ्या वकिलाला आपला मुलगा काय करतोय, कुठे असतो, कुठे कुठे जातो, हे माहिती नको का ? सांग ? ', सुनिलच्या बाबांनी मला हे विचारले, आणि उत्तरही दिले ! ' आमच्या डेपोचा कंडक्टर गावडे आमच्या घरी येतो जातो, त्याने सुनिलला पाह्यलंय कितीतरी वेळा. कालच रवीबरोबर सुनिल सावंतवाडीत फिरत होता. आता फक्त सातवीत असलेली ही पोरं एवढी पुढं गेलीत ? हा प्रश्न, मी पोलीस खात्यात असूनही मला पडला. !
          सुनिल अजूनही हमसून हमसून रडत होता.त्याचे बाबा मला पुढे सांगू लागले, ' त्या रवी सारंगच्या संगतीत हा सुनिल असतो. शाळेत नेहेमी येत नाही तो. अभ्यासात त्याचे लक्षण ठीक नाही. तुम्ही आता त्याचेवर नीट लक्ष ठेवा.नववी-दहावीत खूप मेहेनत घ्यायची आहे तुम्हाला त्याच्यासाठी., ' असे त्याच्या सरांनी मला शाळेत बोलावून सांगीतलेय '. त्यांनी मला खूप सूनावलेय. अरे बापू त्याच दिवशी मी थेट त्या सारंग वकीलाच्या घरी गेलो . तर तेथे हा दिवटा आणि तो रवी ! कसल्याशा मासिकातली घाण चित्र बघत, खिदळताना मी पाह्यलंय. आता सातवीतून आठवीत जाणारी ही पोरं, पुढं काय दिवे लावतील सांग बापू ? तेथे कानाला धरून यास थेट घरी घेऊन आलोय मी....'
               सुनिलची आई रडवेली होऊन हे सगळे पाहात गप्प बसून होती. तिला खुप धक्का बसल्याचे जाणवले. पण सुनिलच्या बाबांचा राग पाहून ती गप्प राह्यली. मी आबांना कसेबसे समजावीत शांत केले. मग सुनिल कडे वळलो- हे बघ, सुनिल, अरे इकडे पहा तरी,...' तो मान वर करेना ! तसे आबा कडाडले, ' काय रे, कान बहिरे झालेत की काय तुझे ? ' तसा सुनिल घाबरून माझ्याकडे पाहू  लागला ' सुनिल, अरे, तुला रोज शाळेत जायला नको का ? सांग. तुला पोलीस व्हायचे म्हणालास ना माझ्यासारखे ? मग तुला अभ्यास नको करायला ?
              'आता सुनिलला थोडे हलके वाटले. तो माझ्याकडे पाहात मुळुमुळु रडत राह्यला. त्याच्या खांद्याला धरीत मी शांत केले. जवळ आलो. ' अभ्यास करायचाय ना तुला ? आता त्या रवीकडे जाणार तू ? त्यावर पटकन त्याने उत्तर दिले,' नाही, नाही, जाणार नाही पुन्हा त्याच्याबरोबर..'
            मग आबांना मी सांगीतले ' याला उद्या माझ्याकडे पाठवा तुम्ही. मी त्याला सांगतो समजावून. ' होहो, जारे सुनिल, उद्या यांच्याकडे, काय ? ' आबांनी त्याला फर्मावले. मग मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी सुनिल  शाळेत वेळेवर गेल्याचे कळले. आबाही घरी येऊन मला भेटले. म्हणाले,' बापू, आमचा सुनिल कसा वागतोय ते कळले ना तुला ? ' त्यावर मी त्यांना समजावले- ' आबा, आता नका टेन्शन घेऊ तुम्ही सुनिलचे. मी लक्ष ठेवतो त्याचेवर.', '  बरे वाटले मला बापू ', निघतो मी, आणि त्याला देतो तुझ्याकडे पाठवून. ' आबा घरी गेले व काही वेळाने सुनिल घरी आला.
            सुनिल बिचकत बिचकत बोलत होता. मी त्याला बोलते केले. थोडया गप्पाही मारल्या, तेव्हा तो नॉर्मल झाला. '  आता मी खूप अभ्यास करणार बापूदादा. तुमच्या सारखा पोलीस होणार मी.' मी म्हणालो, ' छान, छान, अरे, पण त्यासाठी अभ्यासात लक्ष द्यायला हवेय.' त्यावर सुनिल म्हणतो-' मी करणारच आहे आता अभ्यास...'
          त्या दिवसानंतर मी अधूनमधून सुनिलच्या शाळेत जाऊ लागलो. आबांनी त्याचेवर लक्ष द्यायला सांगितले होतेच. सुनिलही आता नियमाने शाळेत जात होता. शाळा सुटताना एकदा मी त्याचे शाळेत गेलो. सुनिलचे सर भेटल्यावर मला नमस्कार करून म्हणाले, ' तुमच्याबद्दल तो आदराने बोलतो हो. अभ्यास पण सुनिलचा सुधारलाय आता. मात्र तुमचे लक्ष असू द्या त्याचेवर.'  मी हसत हो म्हणालो. शाळा सुटल्यानंतर सुनिलसह घरी निघालो. रस्त्यात चालता चालता मुलांच्या एका घोळक्यात असलेल्या जाडजूड मुलाकडे बोट दाखवीत सुनिल मला म्हणाला, ' बापूदादा, बापूदादा, तो पहा रवी सारंग. ' मी तिकडे पाहू लागलो. मिसरूड फुटलेला एक थोराड पोरगा त्या घोळक्यातून आमच्याकडे येत होता. तोच रवी सारंग होता तर !
            त्याला सूनवायचे का ? असा मनाशी विचार करीत असतानाच तो माझ्यासमोर आला. मला नमस्कार करीत म्हणाला, ' नमस्कार करतो बापूदादा.' मी त्याला खालीवर पाहातच राहिलो ! हा रवी चतुर दिसतोय तर ! आता सुनिल माझ्याकडे आणि रवीकडे आळीपाळीने पाहू लागला. त्याला माझी भिती वाटल्याचे जाणवले.
            हाच रवी आमच्या सुनिलला बिघडवीत होता काय ? आता चांगला तावडीत सापडलाय. बघतोच आता, असे मी मनात म्हणत उघडपणे त्या रवीशी हसत बोललो, ' वा, तूच काय तो सारंगांचा रवी ? काय रे, सातवीत कितीवेळा परीक्षा दिल्यास बरं ? ' त्यावर त्याने उत्तर दिले, ' नाही बापूदादा, यावेळी शेवटची परिक्षा देणार मी. आता मला कळलेय की जोरात अभ्यास करायचा आणि तुमच्यासारखे पोलीस व्हायचे '. हा तर मला मोठा धक्काच होता ! मी खोखो हसत सुटलो. रागावण्याऐवजी मी आश्चर्यात पडलो होतो ! सुनिल माझ्याकडे पहात होता. पण तो गप्पच होता. रवी पुढे बोलला, ' बापूदादा, अहो मला सुनिलला त्याच्या आबांनी खुप मारल्याचे कळले. खूप वाईट वाटले त्या दिवशी. हा माझ्याशी बोलायचा पण बंद झाला हो. त्यानंतर मी ठरवले की, सुनिलच्या संगतीत राहायचे आणि खूप अभ्यास करायचा. इकडे तिकडे भटकायचे नाही. चांगले तेच करायचे...' मी शांत पणे सारे ऐकत होतो. मला या रवीची दया आली. ' रवी, अरे तुला माहीत आहे ? तुझे बाबा केवढे मोठे वकील आहेत ते ? ते एवढे मोठे कसे झाले रे ? लहानपणी त्यांनी खुप अभ्यास केलाय म्हणूनच ना ?  आणि आज तू ...? ' नाही, नाही, बापूदादा, आता मी ते वागणे, वाईट नाद सोडलेत.....'
               सुनिल मला म्हणाला, ' बापूदादा, हा रवी माझ्याशिवाय कोणात मिसळत नव्हता. एकटा एकटा असायचा. हा वाईट वागतो म्हणून सगळे याला लांब ठेवायचे. पण माझ्याशी याची छान गट्टी जमलेय. मात्र मी याच्या संगतीत बिघडलो आणि सहामाहीत नापास झालो ! बापूदादा, त्यादिवशी आबांनी मला याचे घरी जाऊन आणले, त्या दिवशी त्याला खूप वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी तो शाळेत आल्यावर मला भेटायला आला होता. मी त्याच्याबरोबर भांडून सगळे सांगितले, सगळे तुझ्यामुळे झालेय हे म्हणालो. तसा रडू लागला हा रवी. म्हणाला, ' मी वाईट वागल्याने तुला त्रास झालाय ना ? मग आता बघ, मी आता सुधारणार. पुन्हा नाही वाईट वागणार. खूप खूप अभ्यास करणार मी. पण सुनिल, तू माझी दोस्ती सोडू नको ना, असेसुद्दा म्हणालाय हा. बापूदादा, हा रवी तसा चांगला आहे हो....'
              मी सगळे काही ऐकत होतो. दया येत होती मला  रवीची. घरच्या वाटेने चालताना दोघेही जिवलग मित्र एकमेकाविषयी चांगले बोलताना पाहिले व मनाला बरे वाटले. रवी मला विनवणी करीत बोलला, ' बापूदादा, प्लिज,  मला सुनिलशी दोस्ती अशीच चालू ठेवायचीय हो.माझे दुसरे कोणी मित्र-दोस्त नाहीत ना. हा सुनिल खूप प्रेमळ आहे. याचे गणित चांगले आहे. माझी कठीण गणितं हाच मला सोडवून द्यायचा. बापूदादा, हा बरोबर असताना मला बरे वाटते. '
' अरे, पण याच्या आबांना कळले ना, की तुझ्याच बरोबर सुनिल अजून असतो, तर तुम्हा दोघांची तंगडी मोडतील ते. त्याचे काय ? ' नाही नाही, बापूदादा, आता मी चांगलाच वागणार आहे हो, तुम्हाला प्रॉमिस देतो मी ! ' रवीचे हे बोलणे माझ्या मनात घुसले. हा पोरगा हुशार आहे. त्याची हुशारी आपण समजून घ्यायला हवी, त्याला चांगल्या वळणावर आणायला हवेय. हे जाणवल्यावर मी त्याला म्हणालो, ' रवी, बघू तू आता खरोखर कसा वागतोस ते. '
              आम्ही तिघेही आरामात घराकडे निघालो. रवीच्या घराची वाट डाव्या दिशेने जाणाऱ्या नेने आळीतून पुढे जाते. तेथून रवी घरी जाईल, आणि आम्ही सरळ आमच्या घरच्या रस्त्याने वळू, असा विचार होता. या ठिकाणी श्रीरवळनाथाचे जुने देऊळ सुद्दा आहे. थोडावेळ तेथे थांबलो. सुनिल रवीशी दबकत बोलू लागला, तसा पुढे झालो. ' अरे सुनिल, तू रोज मला विचारतोस ना? ? की तुमची शिट्टी मला द्या एक दिवस म्हणून ? ' त्यावर सुनिल म्हणाला, ' बापूदादा, होय. मला हवीय ती एकदा. पण इथे त्या शिट्टीचे काय काम ?' मी हसू लागलो. तसा  रवी चपापुन पाहात राहिला माझ्याकडे !
            ' अरे, माझ्यासमोर इथे तुम्ही चोरासारखे घाबरत घाबरत  गुपचुप काहीतरी बोलताय ना ? मग ? सुनिल आता चक्रावून गेला ! ' पण बापूदादा, आम्ही दोघे.....', ' मी ती शिट्टी इतक्यात  देणारच नाही. उलट तुमचे असे बोलणे बघितल्यावर जोरात शिट्टी मारून तुम्हाला पकडून नेणार ? काय ? '. दोघेही जोरात किंचाळले !
             ' घाबरलात लगेच तुम्ही ? अरे लबाडांनो ! मी जोरात हसायला सुरुवात केली, तसे दोघे पुन्हा बावरले !
        ' मी आता रोज तुमच्या शाळेजवळ येणार. लक्ष ठेवणार तुमच्यावर. या रवीवर.. काय ? ' ' बापूदादा, अहो......'  रवी आता घाबरून गेला होता ! त्याचे तोंडून शब्द फुटत नव्हते.
            अरे, घाबरू नका असे. मी संध्याकाळी कामावरून येताना थेट शाळेत येईन. तुम्हाला घेऊनच घरी निघेन मी. काय समजले का ? त्यावर दोघेही ओरडले, 'हो हो, बापूदादा चालेल की आम्हाला.उलट रोज तुमच्याबरोबर यायला मिळणार. बोलायला मिळणार आम्हाला...' त्यांना आनंद झालेला दिसला !  ' पण एक लक्षात ठेवा बरं का, आता चांगलेच वागायचे कबूल केलेय तुम्ही . काय ? तरच मी बनणार तुमचा दोस्त. मंजूर आहे का ? शाळा अन अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही करणार ना ? '
 सुनिल-रवीने त्यांचे दोन्ही हात उंचावत म्हटले-' प्रॉमिस बापूदादा, प्रॉमिस !
           मला याचा खूप आनंद झाला. ' चला. आता निघुया घरी. उशीर झालाय. या सुनिलची घरी वाट बघत असतील. रवी तू पण निघ घरी.' रवी, ' बायबाय बापूदादा. बायबाय सुनिल ' ,म्हणत आनंदाने घरी निघाला.
          अम्ही दोघेपण घरी निघालो. इतक्यात रवी पुन्हा मागे फिरला. माझ्याकडे पहात त्याने विचारले, ' बापूदादा, प्लिज, तुम्ही आमच्या घरी या ना एकदा तरी. ' मला आश्चर्य वाटले ? पण हसून मी त्याला म्हणालो,' कशाला रे ? '
           ' नाही,, तुम्ही याच आमच्या घरी. ' याना एकदा...' त्यावर लांबूनच त्याला म्हणालो, ' बरं बरं, येईन मी तुझ्या घरी. पण आता घरी जा. उशीर झालाय आपल्याला आधीच.' मग रवी परत घराच्या दिशेने निघाला. आम्ही झपझप चालत एकदाचे घराजवळ आलो. सुनिलच्या घराबाहेर त्याचे बाबा उभे असल्याचे मी पाहयले. ते माझ्याजवळ येऊन म्हणाले, ' सुनिल पण आहे ना तुझ्याबरोबर ? मग मला कसली काळजी नाही.'
         ' सॉरी आबा, आज उशीर झाला आम्हाला यायला. ' तू आहेस ना ? मग झालं तर .'एवढं म्हणून आबांनी सुनिलच्या खांद्यावर हात ठेवला ! ' चल बाळ सुनिल.......' दोघे घरात गेले.
          मी आता आनंदात होतो. खूप हलके हलके वाटत होते. घरात पाऊल टाकले. तेव्हा आई म्हणाली, ' काय रे, त्या सुनिलच्या शाळेत तू कामावरून परस्पर जाणार ते अगोदर तरी सांगायचेस ना .' तीला काही उत्तर देणार इतक्यात आमचे अण्णा हसत उद्गारले-' बापू, तो सारंग वकील येऊन गेला. अर्धा तास घरी बसला होता तुझी वाट पाहात ! काय बरे एवढे काम घेऊन आलाय हा आमच्या बापूकडे ? मला मनात प्रश्न पडला बुवा ! ' त्यावर अण्णांना मी म्हटले, ' अण्णा, त्यांचा रवी आहे ना ? आज शाळेतून येताना...' मला थांबवीत अण्णा म्हणाले, ' बापू , ते सावकाश सांग आम्हाला. तू करशील त्यांचेसाठी ते चांगलेच करशील. पण बापू, आज तो एवढा मोठा वकील वेळ काढून आपल्याकडे आला होता ना तो खुप हळवा होऊन बोलत होता रे. आमच्याशी सगळे काही सांगीत होता आपल्या पोराचं गुण ! त्यास मी काही अनुभवाचे बोल सांगितलेत. त्याने निघताना, '  मोठा धीर दिलात मला तुम्ही...' असे शब्द वापरले बघ मला !
             मी हे  सगळे आश्चर्याने ऐकत होतो. ' काय म्हणता ? ' तर काय, आता आई सांगू लागली, ' तुझ्याबद्दल चांगले बोलत होते ते. म्हणाले-माझ्या या वकीलाच्या व्यापामुळे रवीकडे नीट लक्ष देता येत नाही हो मला. पण यापुढे मी नाही दुर्लक्ष करणार. मात्र तुमच्या बापूला आमच्या रवीवर सारखे लक्ष ठेवायला सांगा. बापूचे नीट ऐकतील दोन्ही पोरं....'
            आई-अण्णांचे हे बोलणे मला उमेद देत होते. आपण दोन उमद्या मुलांना एक चांगल्या वळणावर नेणार आहोत. आत्मविश्वासाने, छोटासा का होईना प्रयत्न करणार आहोत. हे चांगले वळण येईपर्यंत आपण निश्चितपणे त्यांचे पाठीशी राहू. आज त्यांच्यातले दोष इतरांप्रमाणे आपल्याला दिसलेत खरे, पण त्यांच्यातले गन व त्यांचा आपल्यावरचा विश्वास याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ? त्यांना नीटपणे घडवायला हवेय. हे कर्तव्य आपण यापुढेही पार पाडणार आहोत. कारण त्यामुळे आपल्याला मिळणारे समाधान खूप मोठे असेल, नाही का ?
                                       ......................................................    
       


         

💐चला कोकणात💐
                माझा जन्म कोकणातला. आता मुंबईकर असलो तरी माझे मन हिरव्यागार वनराई आणि समृद्ध  निसर्गाने नटलेल्या कोकणात जास्त रमतेय. भटकंती निमित्ताने, आणि माझे गाव कोकणात असल्याने कित्येकदा तिकडे सफर होतेय.
               मला तुम्हालाही कोकणची सफर घडवायचीय. मात्र तत्पूर्वी, या कोकणात कुठे कुठे काय आहे ? कोठल्या वास्तू कशासाठी  प्रसिद्द आहेत ?  याची सर्वसाधारण ओळख व्हावी, या हेतूने ही प्रश्नावली मालिका मी तुमच्यासमोर ठेवत आहे.
               माझ्या दृष्टीने काही कोकणप्रेमींना व कोकणवासीयांना ही प्रश्नावली विशेष वाटणार नाही.
               पण कोणी असेही नवखे, जिज्ञासू असतील, की ज्यांना यातून काही  नवीन प्राथमिक माहिती मिळेल. माझी प्रश्नावली खास करून त्यांचेसाठी............
💐कोकणकोडे...१/२०१९..........

१. कोकणात छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदिर कुठे आहे ?
२. थोर साहित्यिक वि.स.खांडेकरांचे गाव.
३. श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान कुठल्या जिल्ह्यात आहे ?
४. दलित चळवळीचे प्रेरणास्थान-चवदार तळे कुठे आहे ?
५. श्रीराऊळ महाराजांचा मठ.
६. श्रीसाईनाथांचे सर्वात जुने मंदिर कोकणात कुठे आहे ?
७. श्रीभालचंद्र महाराजांचा मठ.
८. कोकणरेल्वे मार्गावर गोव्याच्या दिशेने राज्यातले शेवटचे रेल्वे स्टेशन कोणते ?
९. विजयदुर्ग कोणी बांधला ?
१०. प्रसिध्द पर्यटन स्थळ-तारकर्ली कुठे आहे ?
११. जैतापूर कुठे आहे ?
१२. दिवेआगर येथील प्रसिद्द श्री सुवर्णगणेश मंदिर नेमके कुठे आहे ?
१३. ठाणे जिल्ह्यातील प्राचीन शिवमंदिर.
१४. श्रीक्षेत्र मारळेश्वर कुठे आहे ?
१५. प्रख्यात शिल्पकार करमरकर यांचे गाव.
१६. श्रीसमर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ कुठे लिहिला ?
१७. साने गुरुजींचे जन्मगाव ?
१८. छत्रपती शिवरायांचा मृत्यू कोणत्या किल्यावर झाला ?
१९. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन जवळच्या प्रसिद्द जलदुर्गाचे नाव ?
२०. श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर कुठे आहे ?
२१. श्रीभराडीदेवीचे देऊळ.
२२. श्रीक्षेत्र कणकेश्वर मंदिर कुठे आहे ?
२३. विजयदुर्ग जवळील खाडीचे नाव काय ?
२४. कुलाबा किल्ला.
२५. श्रीमलंगगड कोठे आहे ?
२६. चिपळूण मधून वाहणारी मुख्य नदीे.
२७. जिजाऊ माता यांचे समाधीस्थळ.
२८. जगप्रसिद्द  पक्षीतज्ञ सलीम अली यांचे गाव कोणते ?
२९. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे निधन स्थान आणि स्मारक कुठे आहे ?
३०. कोकणात प्रतिशीवश्रुष्टी  म्हणून प्रसिद्द असलेले ठिकाण.
३१. महाडमधून वाहणारी मुख्य नदी.
३२. श्रीधुतपापेश्वर देवस्थान कुठे आहे ?
३३.  ऐतेहासिक मोती तलाव.
३४. कर्तृत्ववान छत्रपती संभाजीराजांना फसवून मोगलांनी पकडले, ते ठिकाण.
३५.नटश्रेष्ठ काशिनाथ घाणेकरांचे गाव.

उत्तरे :--
१) सिंधुदुर्ग(किल्ला)
२) मालगुंड(गणपतीपुळे)
३) रत्नागिरी
४) महाड
५) पिंगुळी (कुडाळ)
६) काविळकाटे(कुडाळ)
७) कणकवली(सिंधुदुर्ग)
८) सावंतवाडी
९) शिलाहार राजा भोज
१०) मालवण(सिंधुदुर्ग)
११) देवगड
१२) बागमांडले(श्रीवर्धन)
१३) अंबरनाथ(ठाणे)
१४) देवरुख(रत्नागिरी)
१५) सासवणे(अलिबाग)
१६) श्रीसुंदरमठ-कुंभेशिवथर(महाड)
१७) पालगड(रत्नागिरी)
१८) रायगड
१९) सुवर्णदुर्ग
२०) देवगड(सिंधुदुर्ग)
२१) आंगणेवाडी(मालवण)
२२) चोंडी(अलिबाग)
२३) वाघोटण
२४)  अलिबाग
२५) कोणगाव(कल्याण)
२६) वाशिष्ठी
२७) पाचाड(रायगड)
२८) किहीम
२९) श्रीवर्धन(रायगड)
३०) डेरवण(चिपळूण)
३१) सावित्री
३२) राजापूर
३३) सावंतवाडी
३४) कसबा(संगमेश्वर)
३५) चिपळूण

                                    ------------------------