Wednesday, 1 May 2019

💐संस्थात्मक💐

💐संस्थात्मक💐
                  आयुष्यभराच्या वाटचालीत ज्या  दहाबारा संस्था-संघटना आणि चळवळींशी संबंध आला, तेथे सामान्य कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून सहभाग घेतला आणि काम करीत राहिलोय. आता, याचा लेखाजोखा काढण्याची इच्छा झाली, व लिहायचे ठरवले.
                     काही ठिकाणी जबाबदारीचे पद मिळाले, तर कोठे सर्वसामान्य स्वयंसेवक-कार्यकर्ता म्हणून काम करीत राहिलोय. शैक्षणिक, सामाजिक, गिर्यारोहण, अध्यात्मिक, गृहनिर्माण, अशा विविधतेने विस्तारलेल्या क्षेत्रात वाररून तेथील वास्तव चित्र राजकारणासह आणि राजकारणाशिवाय, या दोन्ही कोनातून पाहायला मिळाले. त्याचे संपूर्ण निरीक्षण-परीक्षण करणे व त्यावर लिहिणे हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय होईल.
                    या ठिकाणी मी मांडलेला लेखाजोखा संक्षिप्त स्वरूपात आहे.......

               
💐राजकारण कुठे नाही ?...........

●शैक्षणिक-सामाजिक संघटना-

 ●एनएसएस -  
               कॉलेजचे शिक्षण सुरू झाले आणि एन.एस.एस.ची ओळख झाली. फक्त ' आपण ' आणि ' आपलेच ' या चाकोरीतून बाहेर पडणे, समाजात मिसळणे, संवाद साधणे, आणि सेवेच्या भावनेने आपले सामाजिक योगदान देणे ही एन.एस.एस.ची प्रमुख उद्दिष्टे आहेत. विद्यापीठाच्या अधिपत्याखालील ही एक स्वायत्त संस्था आहे.
               या संस्थेच्या सामाजिक योगदानात आपण एक सामान्य स्वयंसेवक बनून खारीचा वाटा उचललाय, याचा सदैव अभिमान आहे. मुंबईतल्या एक प्रतिष्ठित कॉलेजमधून शिक्षण घेताना चार वर्षे एन.एस.एस.मधून कार्यरत राहिलो.एका गावातील शाळेची विहीर बांधणे, मान्यवर संघटनेच्या रौप्यमहोत्सवी सोहोळ्याचे नियोजन करणे, अनाथ,बालगुन्हेगार व दुर्दैवी महिलांना आधार देणाऱ्या संस्थेच्या कामात अल्पकाळ का होईना, मदत करणे,गरीव वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या समाजोपयोगी कार्यात मदत करणे, अशी कितीतरी चांगली कामे एनएसएसच्या माध्यमातून आमचे कॉलेज करीत होते. त्यात सक्रिय राहिलो, याचाही आनंद आहे.
★लेखाजोखा--
              'एनएसएस' पु्वीप्रमाणे आजही राजकारणापासून अलिप्त राहून काम करीत आहे. माझ्या प्रमाणे मुलालाही  
एनएसएसचा परिवार आवडलाय. तो त्यातून स्वतःला घडवतोय.
                                                         ....................
●विद्यार्थी संघटना--
              शालेय-महाविद्यालयीन स्तरावर कार्य करणारी  ही मोठी संघटना आहे. या संघटनेने सर्वदूर भारतभर शाखा स्थापीत केलेल्या आहेत. बुद्धिमान तरुणांचा समावेश असलेली ही एक अभ्यासू विद्यार्थीप्रिय संघटना आहे. विद्यार्थी आपले शिक्षण घेत असताना त्यांना सामाजिक आणि राजकीय  क्षेत्राची ओळख व्हावी, आर्थिक प्रश्न व शैक्षणिक प्रश्न कोणते ? ते कसे प्रभावीपणे सोडविता येतील, याबाबत दक्ष राहायला शिकविणारी ही  संघटना आहे.
               मी माध्यमिक शिक्षण घेत असताना हिच्या संपर्कात आलो. या संघटनेची ध्येय धोरणे मला पटली व तीच्या कार्यात सहभागी झालो. विभागातील माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींच्या संपर्कात येऊन त्यांच्या बैठकी आयोजित होत असत. या बैठकी कोणा एका कार्यकर्त्याच्या घरी व्हायच्या. तेथे लेक्चर व्हायची. आपल्या बुद्धीला जागृत करणे, त्याद्वारे शैक्षणिक विकास, सामाजिक आणि आर्थिक प्रश्न सोडविणे, याकरीता आपण तरुण किती ताकदवान आहोत, याविषयी बैठकीत चर्चा व्हायच्या.
               याचबरोबर, माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षेत शाळेत ्प्रथम येणारे गुणी विद्यार्थी शोधून त्यांना प्रोत्साहित  करणे आणि त्यांचे जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्याचे कार्य ही संघटना करीत होती, विद्यार्थ्यांची विविध शिबिरे व्हायची. सुट्टीच्या काळात गरजूंना नोकरी मिळवुन द्यायचे कार्यही संघटना करायची.
               आमच्या विभागात मी दोन वर्षे कार्यरत होतो. त्यावेळी, माझा सिनिअर त्याच्या सिनिअरला घेऊन घरी यायचा. तासदोन तासांच्या चर्चा आणि बौध्दिकं व्हायची. दोघेही हुशार व तडफदार होते ! त्यांच्या सानिध्याचा प्रभाव माझ्यावर पडला. मी माझ्यापरीने त्यांचा सहाय्यक म्हणून कार्य करीत राहिलो. या कामामुळे माझा आत्मविश्वास देखील वाढला.
               नोकरी आणि शिक्षण करीत माझे कौटुंबिक व्याप सांभाळताना मात्र संघटनेच्या कामात मला सहभागी होणे कठीण जाऊ लागले. मग हळूहळू माझा या संघटनेशी संपर्क कमी झाला व नंतर थांबला तो थांबलाच.

★लेखाजोखा--
               ही विद्यार्थी संघटना आजही विद्यार्थीप्रिय आहे.  ती देशभर चांगली पसरलीय. आता तीला भक्कम राजाश्रय मिळालाय. पूर्वीचे कार्यकर्ते आता राजकीय पक्षाचे मोठे उच्च पदस्थ झालेत.आज, माझा सिनिअर राज्याच्या कॅबिनेट मिनिस्टरपदी विराजमान झालाय, तर त्याचा सिनिअर सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय समितीत उच्च पदावर बसलाय ! ही संघटना राजकीय पक्षाशी संबंधित असली तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तीला चांगली जाण आहे, असे माझे निरीक्षण आहे.
                                                           ............................


●समाजसेंवी संस्था--
              पूर्व उपनगरातील एक सुप्रसिद्द अशी ही समाजसेवी संस्था आहे. कितीतरी चांगले उपक्रम वर्षभर राबून ते यशस्वी करणारी, सामाजिक सेवेचा वसा घेतलेली ही संस्था सर्व वयोगटातील व्यक्तींना  'आपली' वाटते, असे माझे प्रामाणिक मत आहे.
              मी या संस्थेचा सभासद नाही. पण, दरवर्षी आयोजित होणाऱ्या गिरिप्रेमीे संमेलनाच्या पूर्वतयारी निमित्ताने संस्थेच्या संपर्कात आलोय. महाराष्ट्रात विखुरलेल्या संघटनांना एकत्र आणून दोन दिवसांची वारी घडवून आणणे ही साधीसोपी गोष्ट नव्हे. दरवर्षी जुलै महिन्यात या संघटनेच्या भव्य वास्तूमध्ये संमेलन हाऊसफुल्ल उत्साहात भरतेय. आज सतरा वर्षे होऊन गेलीत. भटक्या पंथातील गिरिप्रेमींना इतकी वर्षे संमेलनानिमित्ताने बांधून ठेवण्याचे, म्हणजेच संघटित ठेवण्याचे सगळे क्रेडिट या जाणत्या संस्थेचे आहे.
             दोन दिवस पूर्णपणे आपली दोन मोठी सभागृहे संमेलनासाठी मोकळी ठेऊन आर्थिक भुर्दंड ही संस्था सोसते. पूर्वतयारीसाठी जवळपास  सहा महिने अगोदर सुरू झालेल्या साप्ताहिक बैठकांसाठी आपली जागा ही संस्था उपलब्ध करते. संस्थेचे पदाधिकारी उत्साहाने या नियोजनात असतात.प्रत्यक्ष समेलनात देखील कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून राबतात, हे तमाम गिरिप्रेमींना प्रेरणादायी आहे.

★लेखाजोखा--संस्थेची  वाटचाल यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी पदाधिकाऱ्यांची असते. ते सुसंस्कृत हवेत. चांगले अभ्यासू हवेत. निस्वार्थ भावनेने कार्य करणारे हवेत. त्यांना खुर्ची-सत्तेचा लोभ नसावा. त्यांच्यात कल्पकता व संघटन  कौशल्यही हवे. त्यांनी राजकारण्यांना चार हात दूर ठेवायला हवे.
                  या सगळ्या गुण वैशिष्ट्यात पूर्णतः बसणारी ही चांगली संघटना आहे, आणि म्हणून तीची इतक्या वर्षांची घोडदौड यशस्वी झालीय.
                                              ...............................

●चळवळ घरासाठी--
                  गरीब आणि मध्यम वर्गीय शहरी लोकांना स्वतःचे छोटेसे एक घर तरी असावे, हे स्वप्न साकार करायला प्रामाणिक, तत्वनिष्ठ नेतेमंडळी पुढे आली आणि घरासाठी मोठी चळवळ उभी राहिली. हजारोंच्या संख्येने एकत्र आलेले शहरी बांधव विश्वासाने या चळवळीत उत्साहाने सामील झाले. जवळपास, वीस वर्षे सत्याग्रही मार्गाने संघर्ष करून सरकार आणि सत्ताधाऱ्यांकडे पाठपुरावा करून अखेर मोठी जमीन या चळवळीने मिळविली. मग मोठा वास्तू प्रकल्प  उभा राहिला. अडचणी येतच राहिल्या. पण त्यांच्यावर मात करीत  भव्य अशी वसाहत उभी राहिली.  आज तेथे कित्येक कुटुंब-कबिले राहात आहेत. या  चळवळीमध्ये  गरजू बांधवांचा ग्रुप करून त्यांच्यासह सहभाग घेतला. विविध आंदोलनाचे अनुभव मिळाले.
★लेखाजोखा--
                 घरांसाठी हाती घेतलेली चळवळ यशस्वी झाली.आज मोठी गृहनिर्माण वसाहत शहरात दिमाखात उभी राहिलीय.  कित्येकांचे संसार या वसाहतीमध्ये नांदताहेत. हा कायमचा आसरा देण्याचे सारे श्रेय दोघांकडे जातेय- प्रामाणिक-तत्वनिष्ठ  नेतेमंडळी आणि चिकाटीने, विश्वासाने एकत्र येऊन, नेत्यांच्या निर्देशाप्रमाणे लढलेले सभासद.
                आज मात्र परिस्थितीत बदल घडलाय. नेतृत्व आणि सभासदांमध्ये एकमेकांबद्दल पूर्वी असलेला विश्वास आता कमी झालाय. सुसंवाद थांबलेत. दुही माजलीय. मोठे व्यावहारिक निर्णय पुरेशा पारदर्शीपणे झालेले नाहीत यावरून आरोप- प्रत्यारोप होऊन, न्यायालयीन वाद सुरू  झालेत. संकुलाचे खरे मालक कोण ? या प्रश्नाचे नेमके उत्तर सभासदांना अजून  सापडलेले नाही.
             
               या चळवळीत कुठे कावेबाज राजकारणी होते ? ते नव्हते, मग आज ही स्थिती का निर्माण झालीय ?
याला कारण आहे-  महत्वाचे निर्णय घेताना सर्वसामान्य सभासदांना नेतृत्वाने अंधारात ठेवणे. यामुळे भविष्यात, सध्या असलेल्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
                                                   ..........................

●भूकंपानंतर--
               १९९३ साली महाराष्ट्रात, किल्लारीत मोठा भूकंप झाला. या दुर्घटनेमध्ये उस्मानाबाद, नळदुर्ग भागातील असंख्य गावे-वस्त्या नामशेष झाल्या. त्यावेळी  मुंबईतील रथीमहारथी समाज सेवी,पत्रकार,आणि सेलिब्रिटी मंडळींनी एकत्र येऊन या आपत्तीत सापडलेल्या दुःखीग्रामस्थांना मदतीचा हात देण्यासाठी गिर्यारोहकांच्या व  कार्यकर्त्यांच्या सहभागाने एक मोहीम आखली होती.
             या आपत्तीनंतर, उजाड झालेली गावं आणि निर्जन वस्ती तेथे जाऊन पाहिली. लष्कराचे जवान  मृत-जखमींचा शोध घेत होते. मोठमोठाले मातीचे ढीग कोशल्याने उपसीत होते. त्यांच्या कामांत मदत करणाऱ्या पथकात स्वयंसेवक म्हणून कार्य करायला मिळाले. सरकारी यंत्रणा, कितीतरी स्वयंसेवी देशी-विदेशी संस्था,राजकीय पक्ष, पत्रकार आणि धार्मिक संस्था, आपले मतभेद विसरून एकदिलाने येथे धावून आले. मदत, पुनर्वसनाचे कार्य आपापल्या क्षमतेने करू  लागले. हे कार्य साधेसोपे नव्हते, पण संवेदनशील माणसं आणि संस्था, राजकारणी, असे सारे एकत्र आल्यामुळे दुःखी ग्रामस्थांना भक्कम आधार मिळाला.

★लेखाजोखा--
                या आपत्तीत, दुःखीत गरीब-श्रीमंत ग्रामस्थांना आधार मिळाल्यामुळे, ते पुन्हा उभे राहिलेत.आज, नव्या उमेदीने पुढे चाललेत. संकटात  सारे मतभेद आणि स्वार्थी राजकारण बाजूस ठेवल्यामुळे हे शक्य झालेय, असे मला वाटते.
                                               ..................................

●कामगार संघटना--
              पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ आठवा. मुंबई शहरात खूप कापड गिरण्या होत्या. कामगारांचे प्रश्न सोडविणाऱ्या प्रमुख संघटना राजकीय नियंत्रणाखाली काम करीत होत्या. नेते आणि कार्यकर्ते कामगारांचे प्रश्न सोडवीत होते. मग असे काय घडले की आज ती कापड गिरणीच अस्तित्वात राहिलेली नाही ? कामगार आहेत कुठे ? त्यांचे काय झालेय ?
              मी एका कापड गिरणीत कामाला होतो. कर्मचारी होतो. १९८२ च्या ऐतेहासिक गिरणी कामगार संपाची झळ मला बसलीय. पुन्हा उभे राहताना त्रास सोसावा लागलाय.
              संपानंतर सगळ्यांचीच वाताहात झाली.  कामगार चळवळ तर आज मृतवत झालीय.

★लेखाजोखा--
              या मृत चळवळीचा लेखाजोखा तरी काय सांगणार ? पण ते सांगणे गरजेचे वाटते.
           गिरणी कामगारांच्या न्याय्य प्रश्नांवर आंदोलन करून संप पुकारणाऱ्या प्रामाणिक संघटनेला काही राजकीय नेत्यांनी मालकवर्ग आणि मालकधार्जिण्या यंत्रणांना हाताशी धरून चळवळ पूर्णतः चिरडून टाकलीय. कापड गिरण्यांच्या जागेवर ऐसपैस मॉल्स उभे राहिलेले आहेत.
           आज, निदान आपल्या कुटूंबाच्या निवाऱ्यासाठी घर-जमीन मिळावी म्हणून सरकारदरबारी उंबरे झिजवत वयोवृद्द कामगार आणि त्यांचे वारस निकराने प्रयत्न करीत आहेत. त्यांना अजूनही अपेक्षित यश मिळालेले नाही.

           गिरणी आणि कामगार वर्गाची, चळवळीची  स्मृती राहावी म्हणून लवकरच,  शहरातील एका गिरणीच्या आवारात भव्य असे संग्रहालय उभारण्याचा संकल्प झालाय. गिरणी कामगारांचा व एकूणच त्यांच्या चळवळीचा हा गौरव ठरेल, की त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार ?  हे भविष्यात दिसून येईल.
                                                        ....................................
●गिर्यारोहण संघटना--

                  डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला पोटासाठी नोकरी शोधू लागलो. ती मिळाल्यावर कामातील छंदिष्ट गिरिप्रेमींशी परिचय झाला. तो वाढला अन एका चांगल्या गिर्यारोहण संस्थेचा सभासद झालो. आता मनसोक्तपणे भटकायला मिळाले. सह्याद्रीतील दऱ्या खोऱ्यात, जंगलात भटकंती करण्याची आणि दुर्गम दुर्ग-कड्यांवर आरोहण करण्याची हौस भागवून घेतली. दूरवर असलेली हिमशिखरे साद देत होती. प.बंगालमधील आध्य संस्था-एच.एम.आय.(दार्जिलिंग) मध्ये गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले. त्याचा लाभ प्रत्यक्ष गिर्यारोहण करताना झाला.

                 हे अनुभव घेताना, फक्त आपला छंदच नव्हे, तर आपली संस्था कशी पुढे न्यावी, याचे धडे दुसऱ्यांकडून घेत होतो. या क्षेत्रात वावरताना काही राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी संबंध आला. कुठे सचिवपदी, तर कुठे प्रशासनिक जबाबदारीचे काम करीत राहिलो..

                 दुसरी एक राज्यभरात आघाडीची संस्था कार्यरत आहे. या संस्थेत जबाबदार पदावर काम करण्याची संधी वारंवार मिळालीय. आपल्या वैयक्तिक व्यापातून वेळ काढीत, येथे काम करताना कसरत करायला लागायची.
.
                 संपूर्ण राज्यात विखुरलेल्या कितीतरी गिर्यारोहण-पदभ्रमण संस्था जोमात कार्य करीत आहेत. त्या संघटित व्हाव्यात व साहसी क्षेत्रापुढे येणाऱ्या आकस्मिक अडचणींना एकत्रितपणे सामोरे जावे. सुरक्षेच्या दृष्टीने संस्थांवर येणारी नवनवी कायदेशीर बंधने नीट अभ्यासून, आपले साहसी छंद जोपासताना संस्थांनी आवश्यक बंधने पाळावीत, हा प्रमुख हेतू डोळ्यासमोर ठेऊन सर्व संस्थांना सहकार्य करण्याच्या हेतूने एक शिखर संस्था पूर्वीपासून कार्य करीत आहे.
             
★लेखाजोखा--
                 एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. चांगले स्टेटस असणारी टिपटॉप मंडळी संस्थेच्या प्रशासनात स्थानापन्न आहेत. वजनदार आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये. संस्थाचालक बहुसंख्य वयस्कर सघटितअसल्याने संस्थेचे कामकाज व कार्यक्रम, यांची गती काहीशी धीमी झालीय. नवख्या उत्साही तरुणांवर विश्वासाने जबाबदारी टाकताना ही संस्था बिचकते. तर
' आतमध्ये '(म्हणजे प्रशासनात) घ्यायची बातच सोडा. एवढे असूनही आज ही संस्था टिकून आहे.
                 दुसरी संस्था आहे राष्ट्रीय स्तरावरची.भारतभरातील राज्य शाखांवर देखरेख आणि नियंत्रण ठेऊन वर्षभर कार्यक्रम राबवित असते. पण संस्थेच्या केंद्रीय बॉडीमध्ये ठराविक लॉबी पाहायला मिळते.राज्यातला कोणी उमदा, तडफदार महत्वाकांक्षी तरुण  उत्साहाने व 'त्यांच्या' आग्रहाने संस्थेत सामील होतो, जबाबदारीचे पद मिळते.तो तडफ दाखवून कामही करू लागतो.
                 मात्र, अल्पावधीतच त्याला तिथला 'माहोल' घुसमटून टाकतो. त्याची पावले बाहेर पडतात, मोकळा श्वास घेण्यासाठी !
                 अगदी प्रारंभी सामील झालो, ती संस्था अजूनही उत्साहाने कार्यक्रम करून नवनवे गिर्यारोहक तरुण तयार करतेय. कित्येकांना या संस्थेने साहसी, तसेच निसर्गप्रेमी करून समाजमानांशी सुसंवाद करायला शिकवलेय. इथे जुने नवे एकमेकांच्या विचाराने पुढे जात, संस्थेसही पुढे नेत आहेत. मी एक जुना सभासद म्हणून या संस्थेचा सदैव ऋणी आहे.

                 आणखी  एक राज्यभरात आघाडीची संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या स्थापनेत नव्हतो तरी,जुना सभासद म्हणून जमेल तसे कार्य करीत गिर्यारोहणाचा छंद देखील जोपासला.
                 या संस्थेत जबाबदार पदावर काम करण्याची संधी वारंवार मिळाली. आपल्या वैयक्तिक व्यापातून वेळ काढीत, येथे काम करताना कसरत करायला लागायची.
                 दरम्यान, आपण या महत्त्वाच्या पदावरून दूर व्हावे, म्हणून  संस्थेतील काही टॉप माणसं हालचाल करीत असल्याची कुणकुण लागली. खूप अस्वस्थ झालो. कामात मन लागेना. जी माणसं आपण जवळची मानतो,जी माणसं आपल्याला हिरिरीने पुढे आणतात व  संस्थेचे काम करायला प्रोत्साहित करतात, काम करून घेतात, त्यांनी आपल्याला दूर करण्यासाठी असे घाण राजकारण खेळावे ? मुळात आपण पद घेण्यासही इच्छुक नव्हतो. मग असे व्हावे ?    
                 पण ही सिनिअर मंडळी आहेत. संस्था त्यांनी स्थापलीय. आपल्या पेक्षा कोणी वरचढ होऊ नये याची खबरदारी म्हणून ते असे करू  शकतात. आपला गेम करू शकतात. आपल्यापेक्षा जुन्या-जाणत्यांच्या बाबतीत हे घडलेय. त्यांच्या तुलनेत आपण नगण्य आहोत.
                 हा सगळा विचार केला आणि तडक, जबाबदारीचे पद सोडले. आता मोकळे
पणाने वावरताना कोणता ताण नसल्याने छान वाटतेय.

                 राज्यस्तरावरील शिखर संस्था कार्यकर्त्यांच्या  कमतरतेमुळे आजतरी राज्यभरातील सर्व संस्थांशी संपर्क साधून संवाद साधण्यात असमर्थ आहे. मात्र या शिखर संस्थेशी स्वतःहून संपर्क साधून तीला बळकट करण्यांत या सर्व संघटनांचे हित निश्चित आहे.
                                                     .....................................
●आर्थिक संस्था-पतपेढ्या--
                   सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणी भागविण्याचे चांगले कार्य करणारी एखादी पतसंस्था  आपल्या आसपास सर्वत्र असते. कामगार-नोकरदार एकत्र येऊन पतपेढी निर्माण करतात. महिला एकत्र येतात आणि त्यांची पतपेढी स्थापली जाते. एखादा समाजगट, ज्ञाती, ग्रामस्थ,त्याचप्रमाणे  शहरी मध्यमवर्गीय बांधव याच हेतूने आपापल्या पतपेढ्या निर्माण करतात व गरजूंच्या आर्थिक अडचणी सोडवितानाच त्यांच्या परिवाराला शैक्षणिक-आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी मदतीचे हात देतात.
                 मात्र, या पतपेढ्यांच्या नोंदणीपासून तीच्या सर्व कारभारावर सरकारी नियंत्रण असते. कारभार नियमाप्रमाणे  व्हावा, आर्थिक विनियोगाची आवश्यक नोंद व्हावी, विशेषतः पतपुरवठा झाल्यानंतर कर्जदारांकडून वसुलीचे चांगले काम व्हावे आणि पतपेढ्या आर्थिक सक्षम राहाव्यात, यावर नियंत्रक कटाक्षाने नियंत्रण ठेवतात.
                 अशा परिस्थितीत योग्य कारभार करणाऱ्या पतपेढ्या देखील आहेत अन गडबड घोटाळे करून स्वतःबरोबर गुंतवणूकदार सभासदांना बुडविणाऱ्या पतपेढ्याही आहेत. सुदैवाने अशा पतपेढ्यांशी माझा जास्त संबंध कधी आला नाही. ज्यांचा सभासद झालो, त्या आर्थिकदृष्ट्या भक्कम पतपेढ्या होत्या, म्हणजे आताही आहेत.
                 अपवाद एक नामशेष झालेल्या पतपेढीचा. ही नवीन पतपेढी नव्हती. मध्यवर्ती शहरात तीचे ऑफिस होते.या पतपेढीने मोठी जाहिरात केली की, मुदतठेवीत पैसे गुंतवा. अल्पावधीत दुप्पट होतील ! बक्षीस म्हणून चांगली भांडीसुद्दा मिळतील ! मी त्वरित संपर्क साधला आणि तेथे मुदतठेवीत पैसे गुंतवले. जास्त नव्हे, पण त्याकाळी चारपांच हजारांची रक्कम थोडकी नव्हती. मुदत संपल्यावर पैसे घ्यायला पतपेढीच्या ऑफीसकडे निघालो तेव्हा धक्का बसला ! दिवाळखोरीत निघालेली ही पतपेढी माझ्यासारख्यांचे हजारो, लाखो पैसे घेऊन लापता झाली होती ! खूप शोधाशोध केली. पण उपयोग झाला नाही.
                  इतर पतपेढ्यांबाबत माझी कधी फसगत झाली नाही, आणि होणारही नाही. सर्वाना ह्या पतपेढ्या चांगली सेवा देत आहेत. त्यांच्या कारभाराविषयी विस्ताराने लिहायला हवेय.
                  एक आहे नोकरदारांची पतपेढी आहे. तीची आर्थिक उलाढाल मोठी. कर्जपुरवठा भरपूर. वसुलीदेखील त्या प्रमाणात जास्त आहे. कर्जासाठी अर्ज केल्यावर लवकरच कर्ज रक्कम हाती येणार हे पक्के. मात्र आवश्यक कागदपत्रे नियमानुसार हवीत. पण प्रक्रिया सुलभ आहे. हे कर्ज दिल्यानंतर वसुली कर्जदार सभासदाच्या पगारातून दरमहा होते. वसुलीचा ताप पतपेढीला नाही. कर्ज थकविणाऱ्या सभासदांचे प्रमाण अल्प आहे. या पतपेढीतून सातत्याने कर्ज काढायचो आणि कर्ज फेडायचो. एक कर्ज फेडले की दुसरे घ्यायचे ते फेडले की तिसरे......असा क्रम चालू होता. माझ्या आर्थिक अडचणीत ही पतपेढी वेळोवेळी धावून आलीय.
                 दुसरी एक  पतपेढी आहे. गरजू सभासदांच्या आर्थिक गरजा भागविते. गाव पातळीतील काही सुज्ञ एकत्र आले. त्यांनी पतपेढी सुरू  केलीय. इथे दररोज सभासद गर्दी करतात कर्ज घ्यायला. कोणी सोने तारण ठेवते तर काही आपली मालमत्ता तारण ठेवतात. यांची कर्जवसुली यंत्रणा योग्य पददतीने कर्ज  वसुली करते. त्यामुळे ती आज टिकून आहे.
                 तिसरी संस्था शहरातीलच आहे. तिची एकमेव शाखा आहे उपनगरात. या पतपेढीचे पदाधिकारी समाजात प्रतिष्टीत आहेत. बुद्धिमान आहेत. शिस्तप्रिय आहेत. नियमांचे उल्लंघन न करता सभासदांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा करणे, नफा वाजवी ठेवून सुरक्षित निधी उभारणे, कर्जदारांकडील वसुलीकडे काटेकोर लक्ष ठेऊन संस्थेची पत पातळी संतुलीत राखणे हे काम ही जेष्ठ पदाधिकारी मंडळी उत्साहाने करतात.  परिवारातील गुणी विद्यार्थ्यांचा गौरव  करून त्यांना आर्थिक उत्तेजन देण्याचे कामही संस्था करते आहे.  
               माझी किरकोळ गुंतवणूक या पतपेढीत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या वार्षिक सभेत मी दोनदा उपस्थित राहिलो होतो. त्यावेळचा अनुभव सांगण्यासारखा आहे--
               पतपेढीच्या वार्षिक सभेत मुख्य विषय असतो वार्षिक हिशेब अहवाल,जमाखर्च आणि ताळेबंदाचा. किचकट अशी आकडेमोड अत्यंत सोप्या शब्दांत व क्रमाक्रमाने जाहीरपणे मांडून त्याची व्यवस्थित फोड पदाधिकारी करतात. सभासदांना यासंदर्भात प्रश्न विचारून जागे करतात. त्यावर कोणी शंका काढली, प्रश्न उपस्थित केले की त्या सभासदाला प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करून सभासदांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करतात.
               एरव्ही इतर बहुसंख्य पतपेढ्या वार्षिक सभेत वादावादमध्येच जास्त रंगतात आणि  वेळकाढू व निरर्थक विषयांवर चर्चा करताना दिसतात.

★लेखाजोखा--वर वर्णन केलेल्या तीन पैकी नोकरदारांच्या श्रीमंत पतपेढीने रौप्यमहोत्सव साजरा केलाय. त्यावेळी, एक विख्यात कायदेतज्ज्ञ प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी जाहीरपणे या पतपेढीचे कौतुक करताना छानसा चिमटा संस्थेच्या टिपटॉप वेशातील पदाधिकाऱ्यांना काढला. ते म्हणाले होते-ही पतसंस्था आपल्या यशस्वी वाटचालीचा रौप्य महोत्सव आज साजरा करतेय.आनंद आहे. पण, पतपेढी मध्ये कर्जवसुली करण्याचे काम खूप कष्टाचे असते. मात्र आपल्या पत संस्थेची कर्जवसुली सहजसुलभ होत आहे. यामुळे संस्थेला विशेष कष्ट कुठे पडतात ? अशा पतसंस्था शतक महोत्सव सुद्दा सहज साजरा करतील. आणि या पदाधिकाऱ्यांकडे पाहून कोण म्हणेल यांना पदाधिकारी आहेत म्हणून ? हे  तर एखादया मोठया कंपनीचे डायरेक्टर्स वाटतात मला ! पाहुण्यांच्या या वाक्यांत संस्थेच्या 'मोठे'पणाचे सार आलेय.
                   आणि हो, येथे बहुतेक पदाधिकारी आपली लॉबी बनवून बळकट झालेत. मात्र, बहुसंख्य सभासद आपल्या गरजांकडे जास्त लक्ष देतात. त्यांना पदाधिकाऱ्यांच्या लॉबी-राजकारणाशी देणेघेणे नसते.
     
                  या तीन पतपेढ्यांच्या अनुभवावरून थोडक्यात सांगायचे झाले तर, मी म्हणेन- अपवाद सोडले तर,सरकारी अंकुश असूनही कित्येक पतपेढ्या संशयास्पद कारभार करतात. सत्ता दुसऱ्या हाती सहज जाऊ देत नाहीत. तरीही त्या संस्थांची पुढची वाटचाल चालूच असते.
                                                    ............................
●धार्मिक-अध्यात्मिक संघटना--

                नेहेमीच्या धावपळ-गडबडीतून मन संयमी व शांत राहावे, चित्तात एकाग्रता यावी. मनाची शक्ती वाढावी, देवावर असलेली आपली श्रध्दा डोळस  करून स्वतःला खंभीर करावे, म्हणून एका छोट्या संस्थेत गुरुकुल पद्धतीने मी सामील झालो. जमेल तसे ज्ञान जाणून घेऊ लागलो, शिबिरात सहभाग घेतला.
                ज्या गुरूंकडून दीक्षा घेत होतो, ते माझ्यासह इतर चौघाजणांना या क्षेत्रातले त्यांनी जमविलेले व पडताळलेले ज्ञान देऊ लागले. त्यांनी निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात अन एकांतात अगम्य,पण मोलाच्या अदभुत मंत्रशक्तीचा परिचय करून दिला. या गुरूंच्या सानिध्यात आम्ही हरतऱ्हेचे प्रयोग करून स्वतःला आजमावत होतो.
                त्यांच्या कसोटीला उतरल्यावर विविध शिबिरांचे आयोजन करण्याचे कार्यक्रम सुरू झाले. कामाच्या जबाबदाऱ्या स्वीकारीत कार्य करीत राहिलो. आजही शिबिरे चालू आहेत. हा परिवार वाढत आहे. त्यात सामील होणारे साधक स्वतःमधील आत्मविश्वास वाढवीत आहेत. या संघटनेचे कार्य गुरूंच्या नियंत्रणाखाली आजही चालू आहे.

★लेखाजोखा--
               आत्मिक शक्ती व श्रद्धा वाढविण्याचे चांगले ज्ञान ज्या शिबिरातून आम्ही घेतले जे गुरू आपल्याकडे असलेली  या क्षेत्रातली अदभुत माहिती देऊन, बरे काय वाईट काय, हे प्रयोगपद्धतीने सांगत होते. आम्हाला सज्ञान करीत होते, तीच सन्मान्य व्यक्ती प्रशासकीय कामात जास्त लक्ष देत आहे. मुख्य ज्ञानदानाच्या कार्याकडे यामुळे दुर्लक्ष होत आहे.
               त्यांनी प्रशासन कामात दखल घेऊ नये, शिष्य-साधकांना शिकविण्यात आपले लक्ष केंद्रित करावे, हे परोपरीने सांगून, समजावून उपयोग होईना. वाद घडू लागले. अखेर या परिवारापासून लांब राहायचे ठरविलेय.  हे गुरुकुल ज्ञानमंदिर व्हावे, प्रशासनाच्या चौकटीतील मठ होऊ नये, ही प्रामाणिक इच्छा आहे.
                                          .................................
●गृहनिर्माण संस्था--

                    प्रामुख्याने शहरी,निमशहरी भागांत एकत्र राहाणाऱ्या रहिवाशांच्या सहकारी तत्त्वावरील गृहनिर्माण संस्था  आपण सर्वत्र पाहतो.आपणदेखील एखादया गृहनिर्माण संस्थेचे सभासद म्हणून राहात असतो. सहकारी पददतीने राहाणे व सर्व कारभार चालविणे, ही एक अत्यंत चांगली संकल्पना आहे.
                    सभासद बांधवांमधील स्नेहभाव, नियमांची चांगली जाण, शिस्तीचे पालन करणारे प्रामाणिक पदाधिकारी व सभासद, हे महत्वाचे घटक ही संकल्पना प्रत्यक्षात आणतात.
                 मात्र,  ही संकल्पना पूर्णपणे प्रत्यक्षात आणून आपली सोसायटी पारिवारिक भावनेने एकत्र ठेवून ती ' आदर्शवत अन सुंदर सोसायटी ' केल्याची कितीशी उदाहरणे तुम्हाला अवती भवती
दिसतात ? यावर उत्तर आहे-अगदी कमी संख्येने अशा गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आहेत.

★लेखाजोखा--
                 मी अनुभवलेल्या एका सहकारी गृहनिर्माण संस्थांतील वास्तव सांगतो.
               या संस्थेत, जबाबदारीच्या पदावर काही जाणकार व सुसंस्कृत माणसांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे,  जास्तीत जास्त चांगली सेवा आमच्या कार्यकारिणीने सभासदांना दिलीय. पण शिस्तीला उडवून लावणाऱ्या काही चुकार सभासदांवर कारवाई सुरू केली, आणि वाद उद्भवू लागले. नियमांचे उल्लंघन कारणारावर कायद्याचा बडगा उगारला, तेव्हा तक्रारी व्हायला लागल्या ! सेवाभावनेतून चांगले काम करताना कठोर राहिले की दोषी रहिवाशी इतरांना खोटेनाटे सांगून स्वतःवरचे आरोप धडकावून लावतात ! बदनामी करतात. कुठलीही पातळी गाठतात. तोच प्रकार आमच्या संस्थेत झाला.या प्रसंगाचा गैरफायदा घेऊन काही सत्तालोभी सभासद सक्रिय होऊन कामकाजात अडथळे आणीत होते. तेसुद्धा तक्रार करायला लागले
                परिणामी, काम करणे नकोसे झाले. सहकारीही कंटाळले. कामाची उमेद कमी व्हायला लागली. कालावधी पूर्ण झाल्यावर मोकळा झालो.
                आता संस्थेचे पद नाही आणि जबाबदारीही  नाही. इतर कामे व छंदाकडे जास्त वेळ देता येतोय.
                  ही स्थिती आमच्या संस्थेपुरतीच मर्यादित नाही. बहुसंख्य सोसायट्यात काम करताना प्रामाणिक पदाधिकाऱ्यांना  अडथळे उभे राहात आहेत. कुठे  हाणामारीचे प्रसंग घडून, संस्था सरकारी प्रशासकांच्या नियंत्रणाखाली येत आहेत.
                सहकारी कायदा व नियम, तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कारभारासाठी बनविलेली मार्गदर्शक तत्वे आणि उपविधीं नीटपणे अभ्यासून आपली संस्था चालविणे, ही जबाबदारी पदाधिकाऱ्यांची आहे, त्याचप्रमाणे, संस्थेच्या नियमांचे पालन करून पदाधिकाऱ्यांना सक्रिय सहकार्य करणे, हे प्रत्येक सभासदाचे कर्तव्य आहे.
               दुर्दैवाने तसे होत नाही. मी राहातो, त्या संकुलात किमान सहा संस्थांमध्ये वादाची स्थिती आहे. एका ठिकाणी नियमांचे शून्य ज्ञान असलेले पदाधिकारी काम करीत आहेत. तर, अशी एक संस्था आहे की जीचा एकमेव पदाधिकारी (अध्यक्ष) सारी सूत्रे आपल्या हाती घेऊन काम करीत आहे. काम तरी कोणते करायचे ? कसे करायचे याची बेसिक माहिती नसलेल्या या माणसामुळे सचिवासह इतर गरीब स्वभावाचे पदधिकारी मेटाकुटीस येऊन राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत.
               आणखी एक संस्था आहे, जीचे पदाधिकारी आपले खरे सभासद कोण आणि सदनिका नावावर न झालेले नवीन सदनिका धारक कोण ते नीट ओळखू शकत नाहीत. सरसकट सर्वाना
 ' सभासदांच्या' वार्षिक सभेत प्रवेश देऊन त्यांची उपस्थिती, त्यांचेकडे अधिकृत पेपर्स नसताना ग्राह्य  धरीत आहेत.काही संस्थेतील थकबाकीदार रहिवाशी ज्यांच्या नावे अजून सदनिका झालीही नाही ते पदाधिकाऱ्यांशी मुजोरी करून बिनधास्तपणे राहात आहेत, वावरत आहेत.
              एका संस्थेच्या व्यवस्थापकाने तर, संस्थेच्या हिशेबात प्रचंड घोटाळा करून पोबारा केलाय आणि संस्थेला आर्थिक संकटात टाकलेय. कितीतरी संस्थांवर प्रशासक नेमण्याची कारवाई झालेली आहे.
              अशी प्रशासक नेमण्याची पाळी कुठल्याही संस्थेवर कधी येऊ नये. कारण, आहे त्यापेक्षा जास्त आपत्ती त्या संस्थेवर होते. हे प्रशासक असे काम करतात की, सहा महिन्यांच्या कालावधीत संस्थेचा आर्थिक डोलारा कोसळून जातो !.
              आपली संस्था आदर्शवत राहावी असे मनापासून जर वाटत असेल तर, प्रत्येक सभासदाने सज्जन व सुसंस्कृत सभासदांकडे संस्थेचे नेतृत्व द्यावे. वर्षातून एकदा सहकारी नियम-उपविधींची अध्ययावत माहिती घेण्यासाठी आवश्यक असलेले सहकार प्रशिक्षण शिबीर आयोजित करावे आणि स्वतःसह इतर सभासदांना साक्षर-सक्षम करावे.
              संस्थेस प्राप्त होणारी वर्गणी व त्यातून होणारा प्रत्येक खर्च सभासदांसमोर मांडावा. सर्वसंमतीने आर्थिक व शिस्तबद्द कारभार करावा. संशयास्पद असे कोणतेही काम करू नये.    
              बेशिस्त, कसुरदार सभासदांवर  नियमांना अधीन राहून 'योग्य' कारवाई करणे आवश्यक आहे.
              शेवटी, सर्वांनी जबाबदारीने, स्नेहभाव व विश्वासाने एकमेकांना चांगले सहकार्य केले तर प्रत्येक  सहकारी गृहनिर्माण संस्था ही 'आदर्शवत व सुंदर ' होईल.

                                                         ::::::::::::::::::::::::::::::::::::

                                                                     प्रतिक्रियांसाठी:---इमेल-yeschaudatt@gmail.com
             
               


💐ट्रेकर्स डायरी💐


💐ट्रेकर्स डायरी💐
         भारतातील आघाडीची पदभ्रमण आणि गिर्यारोहण संस्थावाय.एच..आय.’(Youth Hostel s Association of India-New Delhi) ही वर्षभर  वेगवेगळे पदभ्रमण मोहिमांचे आयोजन करीत असते. काही  राज्यातील युनिट्स/ब्रॅंचेस स्वतंत्रपणे आयोजित करतात, तर काहींचे आ।योजन दिल्लीतील केंद्रीय संस्था स्वतः करते.
                        गिर्यारोहण पदभ्रमण करता करता मला वाटू लागले  की, अनुभव वाढविण्यासाठी आपण  एखादया मोहिमेत कॅम्प लीडर म्हणून सेवा करावी.  त्याप्रमाणे मी गोवा येथील सागर-जंगल भटकंती, सरहान-सांगला व सार पास(हिमाचल प्रदेश) येथील राष्ट्रीय स्तरावरील ट्रेकिंग मोहिम, तसेच अंदमान सफर अशा मोहिमांमध्ये कॅम्प लीडर म्हणून काम केले आहे. यापैकी एका मोहिमेत मी अनुभवलेले काही भलेबुरे क्षण ‘डायरी’ स्वरूपात येथे लिहिले आहेत.
                          हा अनुभव आहे हिमाचल प्रदेशातील सरहान-सांगला मोहिमेचा..........💐भूमी ही यक्ष किन्नरांची.........
                   किन्नोर-हिमाचल पर्वतराजीतील(हिमाचल प्रदेश) शुभ्रधवल हिमालयाच्या सानिध्यात कॅम्प लीडर म्हणून नेमणूक झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर माझी रेल्वे रिझर्वेशन पासून ते ऑफिसची रजा मंजूर होईपर्यंत जी धावपळ सुरू झाली, ती निघेपर्यंत सुरूच होती.
                         अखेर, सारे सोपस्कार पूर्ण करीत माझा रेल्वे प्रवास सुरु झाला. मुंबईहून पंजाब मेलने दिल्ली, तेथून पुढे कालका. मग बसने सिमला. त्यानंतर पुन्हा बस प्रवास ‘ सरहान बुशहेर’ पर्यंतचा. असे करीत करीत तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी वाय.एच.. आय.चा बेस कॅम्प गाठला.
👍चौथा दिवससरहान बेस कॅम्प-
                 या मुख्य तळावर चौदा-पंधरा तळ प्रमुख(कॅम्प लिडर्स) आहेत. निळ्याशार आसमंतात ऐसपैस पसरलेला हा बेस कॅम्प सुंदर आहे. दोन्ही बाजूला कॅनव्हासचे मोठे जवळपास वीस तंबू. वरील बाजूच्या जंगलटेकडी वरून येणाऱ्या पाण्याला वरतीच अडवून पाईपद्वारे खाली बेसकॅम्पमध्ये पाणी पुरविण्याची व्यवस्था केलेली. स्वतंत्र भटारखाना आणि तात्पुरती बांधलेली टॉयलेट बाथरूमची व्यवस्था.
           हा रम्य परिसर काहीसा उंचावर असल्याने वातावरणात थंडी पसरलेली. फार दूरवर दिसणारा हिमालय.  हे सगळे मी डोळ्यात साठवून ठेवत होतो.
                      मुंबईहून निघाल्यापासून प्रवासातला शिणवटा व एकाकीपणा येथे आल्यावर पार निघून गेलाय. येथे आता चौदा-पंधरा कॅम्प लिडर्स आहेत. गुजरात मधले जास्त दिसताहेत. इतर राज्याचेही आहेत. ओळख नंतर होईलच. वाय.एच..आय.चे नॅशनल सेक्रेटरी नरेश शर्मा यांचेकडे, आल्याचा रिपोर्ट केला. रात्रीच्या डेली मीटिंगमध्ये त्यांनी एकंदर कार्यक्रमाची कल्पना दिली.
👍पाचवा दिवस-बेस कॅम्प
               काही कॅम्प लिडर्सना कॅम्पची जबाबदारी देऊन तिकडे पाठविण्यात आलेय. तर काहीजणांना कुठला कॅम्प सांभाळायचा त्याची सूचना मिळालीय. पोपट पटेल(गुजरात) ला पहिला कॅम्प ‘सौरा’, तर राजस्थानच्या सिंगला ‘ट्रांडा’ कॅम्प मिळालाय. आपल्याला अजून काही सांगण्यात आलेले नाही.
                सकाळी येथे पाऊस पडला. मग थंडी वाढली. काही वेळानंतर चक्क ऊन पडले ! मध्येच ढगांचा कडकडाट देखील होतोय. दरम्यान दररोज येथे येणाऱ्या भारतभरातील सहभागी मेम्बर्सचे आगमन होतेय. नोंदलेल्या ग्रुप प्रमाणे त्यांची व्यवस्था केली जातेय. या कामातही कॅम्प लिडर्स आहेत.
              नवीन मेंबर्सना बेस कॅम्पमध्ये पूर्वतयारी आणि सरावासाठी दोन दिवस राहावे लागेल. भरपूर चालणे-धावणे व्हावे, उंचावरील वातावरणाची सवय लागावी, म्हणून सराव आवश्यक आहे.
👍आठवा दिवस - कुपाकडे प्रयाण
            सरहान बेस कॅम्पवरून निघालो. मोठ्या ट्रकमध्ये चार तळांचे सामान होते. ट्रकने पुढचा प्रवास सुरु झाला. शालाबाग, ज्युरी, वांगडू, खर्चम, या वाटेतील गावांमार्गे ‘ कूपा ‘ येथे पोहोचलो. वास्तविक, तळ जेथे लावलाय त्या गावाचे नाव आहे- ‘ रूतरुंग ‘. रस्त्यापाशी पाटी आहे ‘ चांसू ‘ ची. आणि ‘कूपा’ दहा मिनिटांच्या अंतरावर आहे, बास्पा नदीच्या पलीकडे !
              कूपाचा परिसर छान आहे. जवळून वाहणारी जोरदार प्रवाहाची बास्पा नदी. नदीवर एक लाकडी पूल आहे. तो मजबूत असला तरी त्यावरून जाता येता  तो हलतो, पुलावरून चालताना खाली दिसणारा जोरदार प्रवाह आणि तुफानी वारा पोटात गोळा आणतो.
            कूपा किन्नोर जिल्ह्यात आहे, तरसरहान ‘ सिमला जिल्ह्यात. तिबेट-चीनची सीमा येथून काही तासांवर आहे. पूर्वी ‘ वांगटू ‘ ब्रिज जवळ नियंत्रण रेषा सुरू व्हायची. आता ती ‘ कौरिक ‘ येथे सुरू होते. इथले बरेचसे लोक गरीब आहेत. काही सधन आहेत. मात्र यांच्या पोशाखावरून समजणे मुश्किल आहे.
           आम्ही काहीजण हा कॅम्प तयार करायला आलोय. हे साधे काम नाही. मदतीला माणसं कमी आहेत.  पाऊस सारखा पडतोय. त्यातून कामे सुरू आहेत. चांसू चे काही सामान पाठवले. डुमरचे सामान
 न्यायचेय. हे सामान न्यायला चार खेचरवाले आले. त्यांना पाठविले. मग पाऊस वाढला, तेव्हा दुसरे खेचरवाले थांबलेत. चार तळ या दोनतीन दिवसात लावून व्हायला हवेत. कूपा कॅम्पला ज्या दिवशी ट्रकने आलो त्या रात्री रस्त्यावरच झोपुन मुक्काम करावा लागला. त्याची आठवण काही जात नाही.
             त्या संध्याकाळी पाऊस पडला. सगळे सामान ट्रकमधून उतरवून ते एवढ्याशा रस्त्यावर एका बाजूस कसेबसे लावणे, त्यातील खोके-पोती खाली वसवलेल्या कॅम्पकडे नेणे, पुन्हा वर रस्त्यावर येणे, ही कामे स्वयंपाकी व मदतनीस मजूर सातत्याने करीत होते. त्यांना आम्ही जमेल तसा हातभार लावला.  यात रात्र झाली. यांच्या सोबतीने मीही येथे रस्त्यावर मुक्काम करायचे ठरवले. रस्त्यावर मोठमोठाले सिमेंटचे पाईप्स एकावर एक रचून ठेवलेले होते. तेथे व्यवस्थित सुरक्षित जागा बघून सामान या लोकांनी ठेवले होते, तेथेच एक सपाटशी जागा पाहून ब्लॅंकेट्स ठेवली. एक स्लीपिंग बॅग घेवून सरळ त्यात शिरलो. पावसाळी आणि थंड वातावरणाचा अनुभव घेत झोप घेण्याचा प्रयत्न केला. झोप कुठली येतेय ? डोळ्यापुढे खालचा बेस कॅम्प येऊ लागला ! तिथली धावपळ, नवीन येणाऱ्या ग्रुपची व्यवस्था, नवख्या तरुण-तरुणींच्या घाबरत होणाऱ्या कवायती, त्यांचे अदबीने वागणे-बोलणे,हे सगळे दिसत होते !
               त्यातच एका संध्याकाळी कॅम्पच्या पाठीमागील टेकडीवर जंगलात गेलेला एक गुजराती तरुण. चित्ता दिसल्यावर त्याची झालेली घबराट. त्यावेळी हा चित्ता पाहून बिथरलेल्या तरुणाला तंबूत आणून शांत करीत धीर दिला होता. नंतर ही माहिती नरेश शर्माना दिल्यावर ते म्हणाले होते- ‘ अरे भाई, अच्छा हुआ ! यह लेपर्ड किसीको बारबार देखने नहीं मिलता !
👍दहावा दिवस-सांगला कंडा कॅम्प-
            नॅशनल सेक्रेटरी नरेश शर्मानी सर्वांची निवड जाहीर केली होती. चांसू येथे भावसार, डुमारला मंगेश कोळी व सुधीर, तर माझ्याकडे सांगला कंडा. 
            हा हायर कॅम्प(म्हणजे उंचावरील कॅम्प) मला आवडला. छान साईट आहे. हिरवीगार जमीन. जवळ वाहणारे नितळ-निर्मल पाणी. त्यापुढे थोडया उंचीवर पठारी भाग. नंतर पुन्हा उतार आणि खाली वाहणारी जोरदार प्रवाहाची बास्पा नदी. दिवसभर किन्नोर कैलास पर्वत रांगेतून स्पष्टपणे दिसणारे
‘ जोरखादेन ‘ हे हिमशिखर(उंची-६४७३ फूट). पाठच्या बाजूस दूरवर दिसणाऱ्या हिमालयीन शिखररांगा(उत्तर प्रदेशचा सीमाभाग). खरोखर मोहक असा कॅम्प मला मिळालाय.
          या कॅम्पवर संध्याकाळी ग्रुपचे आगमन झाल्यावर चहा बिस्किटे, रात्री सूप व जेवण. नंतर शेकोटीभोवती गप्पागाणी(प्रत्यक्षात मेणबत्ती फायर) व बोर्नविटाचा आस्वाद ! दुसऱ्या सकाळी उठतानाच बेड टी. नंतर तासाभराने चहा-नाश्ता, असा इथला किचनचा कार्यक्रम.
        पण कॅम्प अजून पूर्ण लावलेला नाही. फक्त दोन तंबू लावलेत किचनसाठी. येथे आणखी बांबू लागणार आहेत, ते मिळत नाहीत.
        इथले गावकरी बांधव सध्या खाली असलेल्या सांगला गावामध्ये राहात आहेत. पंधरावीस दिवसानंतर ते इथे येणार. तोपर्यंत हे ठिकाण सुनेसुनेच राहील. दोनचार वयोवृद्द गावकरी अधूनमधून येथे दिसतात, ही समाधानाची बाब. या कॅम्प जवळ ग्यान वीर नावाचा वृद्द माणूस राहतोय. शेळ्या मेंढ्या अन गुरांसाठी तो इथे राहिलाय. माणूस साधा व अबोल आहे.
                 आणखी दोन वयस्कर बायका या भागात होत्या. कॅम्प लावण्यासाठी या सगळ्यांची मदत झालीय.  सुरुवातीला येथली जागा फार दलदलीची होती. छोट्या नाल्याचे पाणी इकडे वळले होते. काल अर्धा दिवस त्याच कामात राहिलो. त्या दोघीजणी आणि लाकडं आणून देणारा ठेकेदार ताशी डोंडुप, त्याचा छोटा नातू हरिष, या सगळ्यांची मदत मिळाली.
                  आता हिरवळ थोडीफार सुकली तर पुन्हा पाऊस आला. हे सुरुवातीचे दिवस कसोटीचे आहेत. काल आचाऱ्याची तब्येत नरमगरम होती. रात्री तो जेवला नाही. भूक नसल्याने मीही जेवलो नाही.
               आज मात्र आचारी व्यवस्थित होता. सकाळीच एक मदतनीस आला. मुन्ना त्याचे नाव. पण वयाने तो मोठा आहे ! कूपा कॅम्पहुन खच्चरवाला नोरबू उरलेले रेशन सामान घेवून आला. ते रेशन सामान, खोके एका उघड्या खोलीत ठेवले व दुसरे काही काम कॅम्पवर करू लागलो.
                तेवढया वेळात एक आडदांड-धिप्पाड याक(म्हणजे मोठा नंदीबैल) गपचूप त्या उघड्या खोलीत शिरला आणि पोती-खोके, फोडून सरळ अमूल बटरचे पॅक आणि बटाटे फस्त करू लागला ! त्याला आचाऱ्याने दुरून पाहिले आणि मला जोरात आवाज दिला. वळून बघितले तिकडे. आधी त्याचा धिप्पाड आकार बघून गाळणच उडाली. पण काहीतरी करायला हवे होते. सरळ एक हाती आलेला मोठा बांबू घेऊन ओरडत याकच्या पाठी लागलो. त्याने खाणे थांबवले, आणि पळायला सुरुवात केली. पण बाहेर जायला वाट नव्हती. त्या वाटेत मीच उभा होतो ! तो बिथरला क्षणभर. इकडे मलाही घाम फुटत होता. आता त्याला एक मोठी उघडी खिडकी दिसली, तशी दाणकन उडी मारली आणि त्याने खिडकीबाहेर जाऊन धूम ठोकली ! बापरे, मोठा बाका प्रसंग आला होता त्यावेळी !
           असो,   या कॅम्पवर लाकूडफाटा मिळणे मुश्किल झालेय. महिनाभर खूप लाकडं लागतील स्वयंपाकासाठी. ती पुरविणारा एकमेव माणूस आहे ताशी डोंडुप. तो पहिल्या दिवशी चहाला आला. काही मदतही केली. परंतु हा माणूस लाकडं पुरविण्याबाबत काहीसे अडवून दाखवतोय. लाकडं तर लवकर मिळायला हवीत. या अडचणीची माहिती कूपा कॅम्पवरील लायसन ऑफिसर शुक्ला यांचेकडे चिठ्ठी द्वारे पाठविली आहे.  ताशी दोंडुप काल आणि आज फिरकलाच नाही. आज पहिली तुकडी आली. तिच्यासोबत निरोप आला की,  लाकडं लागेल त्या भावात घ्या !
             एक स्टोव्ह आणलाय तो लीक झालाय. पेट्रोमॅक्स पण तसाच. या त्रासामुळे आचारी फकिरचंद काळजीत पडलाय. सुदैव म्हणजे या पहिल्या तुकडीची जेवणाची व्यवस्था खालच्या कूपा कॅम्पवर करण्याचे ठरले, कारण, हा कॅम्प अजून पूर्णपणे लागलेला नाही. तेव्हा या पहिल्या तुकडीच्या दहाजणांचे  स्वागत करून चहापाण्याची व्यवस्था केली. गप्पा मारताना कळले की, यात पुण्यातील तीनचारजण आहेत. बरे वाटले. सगळ्यांचा पाहुणचार आटोपल्यावर त्यांना निरोप दिला.
                  घरून आणलेला छोटा रेडिओ येथे कामाला येतोय. मात्र रात्रीच ऐकायला मिळते.
👍सोळावा दिवस-मुक्काम सांगला कंडा कॅम्प
                कालच्या ग्रुपबरोबर प्रोग्रॅम ऑफिसर तरुण रॉय आला. सर्व व्यवस्था त्याने पाहिली.  काही सूचना देखील केल्या. आज सकाळी त्या ग्रुपबरोबरच पुढच्या कॅम्पवर गेला.
               हा ग्रुप गेल्यावर सहज कॅम्पच्या चारी दिशेला फेरी मारली. लक्षात आले की, काल रात्री येथल्या(स्थानिक) लोकांच्या पूजस्थानावर कोणीतरी घाण केलीय. काल प्रत्येक मेम्बरला स्वच्छतेच्या सूचना देऊनही हा प्रकार घडला, याचे वाईट वाटले. चीड आली. सध्या या परिसरात गावकरी राहात नाहीत. पण पंधरा वीस दिवसानंतर ते येथे येतील आणि त्यांना हा प्रकार समजला तर ? भविष्यात आपल्याला येथे मुक्कामास जागा मिळेल ? आता चीड येऊनही काही उपयोग नव्हता.  सारी घाण काढून साफसफाई करावी लागली.
              वास्तविक ग्रुप कॅम्पवर आल्यावर सर्वावर बारीक लक्ष ठेवावे लागते. फक्त स्वच्छताच नव्हे, तर दरी जंगल, नदी आहे, इतरही धोके असतात, त्यामुळे खबरदारी घ्यावी लागते.
              आणखी एक प्रताप या ग्रुपने केल्याचे समजलेय. दुपारी डोंगर उतारावरच्या काही शेतकरी स्त्रिया कागाळी घेऊन आल्या होत्या, तेव्हा हे कळले. ही माणसं हिरवे मटार, बटाटे शेतात लावतात. संरक्षणासाठी त्यांनी कुंपणही घातलेले आहे. त्यावरून उड्या मारून आमचे शिकलेले लोक शेतात घुसून,शेतं तुडवून खाली कॅम्प दिसतोय म्हणून शॉर्टकट मारीत येतात ! त्या गरीब स्त्रियांची मी माफी मागितली. मात्र यापुढे आपली कसोटी आहे हे समजून वागायला हवेय.
👍अठरावा दिवस-सांगला कंडा कॅम्प
            दोन दिवसांपूर्वी झालेला प्रकार पुन्हा घडलाय ! काल रात्री त्याच पवित्र भागात कोणीतरी घाण केली. हे आज सकाळी फेरी मारल्यावर लक्षात आले. काल मुक्कामाला थांबलेल्या ग्रुपवर निघण्यापूर्वी कारवाई करणे आवश्यक होते.
         त्यांची  निघण्याची तयारी पूर्ण झाली. पुढच्या रूटबद्दल जरूर त्या सूचना त्यांना केल्यावर थेट सर्वाना जाहीरपणे विचारले, ‘ आपल्या ग्रुपमधील काहीजणांकडून इथल्या पूजास्थानाजवळ घाण करण्याचा प्रकार घडलाय. बोला, कोणी हे केले? काय ते कबूल करा.’
              एकदम शांतता पसरली ! ‘ काय ते लवकर सांगा. नाहीतर पुढच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. मी सर्व ग्रुपची लेखी तक्रार करेन.’ त्यावर कोणीच बोलेना ! मी थोडावेळ गप्प राह्यलो. एवढ्यात दोनचार सज्जन तरुण पुढे आले. ‘ सर, चला, आम्ही ती घाण साफ करतो, सॉरी सर……: मग त्यांना त्या जागेवर घेऊन गेलो. जागा साफ करून घेतली. हे कठोर वागणे मनाला पटले नव्हते, पण इलाज नव्हता.
             एरव्ही इथले वातावरण छान आहे. दुपारी वर डोंगराच्या उतारावर माणसांचा ठिपका दिसला रे दिसला की पाठीवर छोटी सॅक मारून, पाणी घेऊन तो डोंगर चढायला लागतो. ही रोजची रपेट साधी सोपी नसली तरी येणाऱ्या ग्रुपच्या स्वागतासाठी ती करावी लागते. दिवसभर ट्रेकिंग करणारे सर्व वयाचे सहभागी एकेक करून येताना दिसल्यावर त्यांना हस्तांदोलन करून हसतमुखाने त्यांचे स्वागत करणे हा एक वेगळाच अनुभव आहे. साऱ्यांच्या चेहेऱ्यावर दिसणारा आनंद माझा दिवसभराचा शिणवठा कमी करतो.  यात आणखीही एक फायदा होतो. ग्रुपचे निरीक्षण करायला मिळते. बऱ्यावाईट गोष्टी (त्यांच्याकडून) कळतात. ग्रुप लिडरची नीट ओळख होते. ग्रुपच्या अडचणीही समजतात.  
                कॅम्पवरचे मुख्य काम आहे- प्रथम सगळा ग्रुप येथे आला की, त्यांची राहण्याची वेगवेगळ्या तंबूत व्यवस्था करायची. चहा-नाश्त्याची व्यवस्था करायची. मग सर्वाना एकत्र बोलावून इथल्या परिसराची थोडक्यात पण महत्वाची माहिती द्यायची. त्याचवेळी प्रत्येकाची जाहीरपणे ओळख करून घ्यायची. त्यांची कार्ड्स ग्रुपलीडर कडून ताब्यात घ्यायची. काही शेरे असल्यास त्याची नोंद घ्यायची. इथल्या मुक्कामात कसे राहायचे, वागायचे, शिस्त आणि सुरक्षा- स्वच्छता यांचे पालन करण्याच्या सूचना प्रेमळ भाषेत पण स्पष्टपणे द्यायच्या. ही सगळी कामे आता सरावाची झालीत.
               आता या ठिकाणी वातावरणात ढगाळता वाढलीय.  थंडगार हवा आहे. मध्यंतरी गारा सुद्धा पडल्या होत्या येथे. पण हे सारे आपल्याला सहन करायला हवेय.
               परवा आलेली तुकडी सगळ्यात मोठी म्हणजे ३९ जणांची होती. सुरुवातीला या गर्दीमुळे ताण पडला. पण सगळे चांगले होते. शर्मा नावाचा दिल्लीचा ग्रुपलीडर होता. आपल्या हिमालयीन मोहीमा खूप झाल्याचे तो सांगत होता.  स्वभाव छान वाटला त्याचा.
             या   कॅम्पवर येणाऱ्या टपोऱ्या तरुणांबरोबरच सज्जन डॉक्टर्स, सर्जन्स, आर्किटेक्ट, आय.. एस. अशी मान्यवर मंडळी असतात.  सगळ्यांशी त्या त्या ढंगाने वागणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, तीचाही अनुभव घेत आहे.
             दुसऱ्या कॅम्पबद्दलचे रिपोर्ट्स इथे ऐकायला मिळत आहेत. निचार कॅम्पचा लीडर सगळ्यांना भलताच कडक वाटतोय ! खर्चम कॅम्पच्या दोन लिडर्सनी कॅम्प विस्कळीत करून ठेवलाय. डुमार  आणि चांसू बद्दल मात्र चांगले ऐकायला मिळतेय.
👍सव्वीसावा दिवस-सांगला कंडा-
            आता या कॅम्पचा आपल्याला निरोप घ्यायचा आहे. अगोदर ठरविल्याप्रमाणे रेल्वेचे आरक्षण  केलेले आहे. ते दिल्लीहून मुंबईचे आहे. येथून दिल्लीत पोहोचायला जवळपास तीन दिवस लागतील. आज आपला चार्ज प्रोग्रॅम ऑफिसर तरुण रॉयकडे द्यायचा आहे. इतके दिवस हेच आपले घर होते, मदतीचे स्वयंपाकी, मजूर सहकारी आणि स्थानिक गावकरी, (यात महिलाही आहेत) यांचे आपले चांगले नाते झाले होते. हा एक परिवार सोडून आपण जातोय. निघणे आवश्यक असते तरी त्यांचेपासून दूर जात असल्याची रुखरुख आहेच. त्यांच्या चेहेऱ्यावरची उदासीही आपण पाहात आहोत.  
👍सत्तावीसवा दिवस-परतीचा प्रवास
               आज सकाळीच कुपाकडे निघालो. तेथून कल्पा पर्यंत बस गाठायची होती. पण ती सकाळची होती, त्यामुळे या कॅम्पवर मुक्काम करावा लागला.  येथे इंदोरचा कोरान्हे म्हणून कॅम्पलीडर आहे.
👍अठ्ठावीसवा दिवस-
            आज सकाळीच येथून निघालोय.  चितकूल कल्पा बस पकडली. खर्चमला उतरलो. तेथून सोलनला जाणारी बस मिळाली. ही  बस खच्चून भरलेली ! त्यात सामान भरून जड झालेली सॅक घेऊन बस कशीबशी पकडली आणि पुढचा प्रवास सुरु केला. टापरी गाव आले, तेव्हा बसायला जागा मिळाली. पुढे ज्युरी गाव लागले. आता दुपार झाली होती. येथे उतरलो.  येथून वरच्या दिशेस असणाऱ्या सरहान बुशहेर कडे जाणारी बस हवी होती. पण ती बस थोडक्यात चुकली. यावेळी वाजले होते सव्वा एक.  आता पाच वाजेपर्यंत बस नाही ! तोपर्यंत या ज्यूरीमध्येच थांबावे लागले.
              माझ्या सारखा एक जण सोबतीला मिळाला. हा आय. टी. बी. पी. चा जवान होता. आम्ही मग गप्पा मारल्या. चहा घेतला आणि वेळ काढला.  नंतर एक  किन्नू कडे जाणारी बस आली. त्या बसने घराट पर्यंत प्रवास केला. येथून पंधरा मिनिटांची चढण पार करून सरहान बुशहेर गाठले. जवळच आमचा बेस कॅम्प होता, तिथे आलो.
                 या कॅम्पवर बिरुसिंग नावाचा कॅम्पलीडर होता.  छान व्यक्तिमत्व लाभलेला हा ४५ वर्षाचा तरुण स्वागताला समोर आल्यावर खूप बरे वाटले. मात्र रात्री समजले की हे महाशय ओव्हर कॉन्फिडन्स असलेले पराक्रमी आहेत ! मग जरा दूर राहायचे ठरवले. या बिरुसिंगचे वडील प्रसिद्द गिर्यारोहक असून त्यांनी डब्ल्यू. एच. एम. आय.(हिमाचल प्रदेश) चे प्राचार्यपदही सांभाळलेय.
                 बेस कॅम्पवर आता नरेश शर्मा नव्हते. दुसरे कोणी शर्मा नावाचे प्रोग्रॅम डायरेक्टर म्हणून होते. मुजुमदार नावाचे एक अधिकारीही आले होते. या दोघांना माझा कामाचा सर्व अहवाल दिला. नंतर हिशेब तपासणी व किरकोळ ऑफिसवर्क असते, ते केले. कागदपत्रे जमा केली. उद्या येथून निघायचे असल्याची माहिती त्यांना दिली. मग सारी पॅकिंग करून सरळ आराम केला कॅम्पवर.
               रात्री वाय.एच..आय.च्या परंपरेनुसार प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्याचा छोटा सोहोळा पार पडला.

👍एकोणतीसावा दिवस-
             आज सकाळी बेसकॅम्पचा निरोप घेतला. येथून बसने शिमला, व पुढे दुसरी बस पकडून कालका पर्यंतचा प्रवास केला. कालकाहुन हावडा मेलने दिल्लीत आलो. पुढे रेल्वेनेच मुंबई पर्यंतचा प्रवास करताना सारे काही आठवत होते, दिसत होते, आणि संवादही करीत होतो त्या चिरतरुण हिमालयाशी !
                आपण घेतलेला हा अनुभव इतर कॅम्पलीडर्सनादेखील आला असेल. इतर गिरिप्रेमीनीसुद्दा या राष्ट्रीयस्तरावरील हिमालयीन पदभ्रमण मोहिमेत कॅम्पलीडर म्हणून सहभाग घ्यावा. हा अनुभव त्यांना स्वतःला व त्यांच्या संस्थेला खूप उपयोगी ठरेल, असे निश्चितपणे वाटतेय.

                                                          ::::::::::::::::::::::::::::