Tuesday, 1 September 2020

💐धार्मिक पण मार्मिक💐

 💐धार्मिक पण मार्मिक💐

                 हिरवागार श्रावण मास आला आणि गेलाही.  लॉकडाऊच्या या वातावरणात दहीकाला, राखी पौर्णिमा हे सण साजरे झाले. नंतर भाद्रपद सुरू झाला. गौरी गणपती सणाचा हा उत्साही माहोल असतो. पण  महामारीच्या या संकटकाळात आपण सारे लॉकडाऊनच्या बंधनात अजूनही अडकलो आहोत.                        

                 हा उत्सव भाविकांनी स्वतःच्या इतरांच्या आरोग्याची खबरदारी घेऊनच साजरा करायचा आहे. सरकारी बंधनं पाळायची आहेत. लॉक डाऊन काही पूर्णपणे उठलेले नाही. मात्र या वातावरणामुळे सारे श्रद्धाळू अस्वस्थ आहेत. मी सुद्धा अस्वस्थ आहे.

               कधी संपणार हे लॉकडाऊन ? आज गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला, तरी महामारी काही विसर्जीत होत नाहीए. का होतेय हे ? कधी थांबणार हे अरिष्ट ? केव्हा संपणार हे लॉकडाऊन ? हे सारे प्रश्न मला एकट्यालाच नव्हे, तर माझ्या परिवाराला, आप्त-मित्रमंडळींनाही पडलेत.

              अहो, स्वतः आपला गणपती बाप्पादेखील या बंधनांमुळे चिंतातुर झाला असेल. अशा विमनस्क अवस्थेत आपण आज एवढेच म्हणू शकतो, की……………      

                         

💐 कधी संपणार हे लॉकडाऊन  ?.......

‘’कधी संपणार हे लॉकडाऊन ?

कंटाळा आला घरात राहून....

प्राण्याचा पिंजरा जसा घर झालं तसं

चोवीस तास एका जागी रमावं कसं ?

बाहेर पडता दंडुका पोलिसाकडून

कधी संपणार हे लॉकडाऊन ?

कंटाळा आला घरात राहून....

 

शाळा-कॉलेज, ऑफिसं बंद आहेत सारी

ट्रेन्स, बसेस यार्डात, डेपोत, प्रवासी घरी

टॅक्सी, रिक्षाही बंद रोजचं धावणं सोडून

कधी संपणार हे लॉकडाऊन ?

कंटाळा आला घरात राहून....

 

त्याच त्याच मालिका तेच तेच पिक्चर

त्याच त्याच बातम्या दहादा सादर

उपयोग काही नाही टी.व्ही. लावुन

कधी संपणार हे लॉकडाऊन ?

कंटाळा आला घरात राहून....

 

जमवुन मित्र आणि मैत्रिणींना

छोट्यांना बाहेर खेळता येईना

घरात बसती बिचारे तोंड पाडून

कधी संपणार हे लॉकडाऊन ?

कंटाळा आला घरात राहून....

 

फ्रेंडसर्कलसोबत नाही फिरणं खाणं

बंद झालं बाहेरचं लाईफ एंजॉय करणं

तरुणाई बिचारी गेली बोअर होऊन

कधी संपणार हे लॉकडाऊन ?

कंटाळा आला घरात राहून....

 

'डेट' नाही भेट नाही दोघांची

गोची झाली मोठी प्रेमिकांची

'फ्लाईंग किस' फक्त आता व्हिडिओ कॉलवरुन

कधी संपणार हे लॉकडाऊन ?

कंटाळा आला घरात राहून....

 

देव-देवताही बंद देवळात

भक्तांना 'नो एंट्री' जाण्यासाठी आत

देव-धर्म ठेवावा लागे गुंडाळून

कधी संपणार हे लॉकडाऊन ?

कंटाळा आला घरात राहून....

 

आप्त आणि इष्टांच्या मर्तिकाला

शक्य नाही जाणं आता वांधा झाला

लग्न, समारंभही आता गर्दीवाचुन

कधी संपणार हे लॉकडाऊन ?

कंटाळा आला घरात राहून....

 

किती जरी कंटाळा आला तुम्हाआम्हा

सोडायचं नाही तरी देशहिताच्या कामा

कोरोनाचा बीमोड करु लॉकडाऊन‌ पाळून’’.

 

                                         ~ विनायक राहातेकर ~

(टीप:--ही काव्य रचना प्रसिद्ध गीतकार विनायक राहातेकर  यांनी केली आहे).


 

                                                         ------------------------------

 

💐चित्रपट गप्पा💐

 💐चित्रपट गप्पा💐

            आपल्या भारतामध्ये बाल मजुरांना राबवून घेणे त्यांचे लैंगिक शोषण करणे, अशा गुन्हेगारांविरुद्ध सरकारने कडक कायदे केलेले आहेत. पण बालमजुरी आणि मुलांच्या लैंगिक शोषणाची समस्या  काही अजून संपलेली नाही.

                या गंभीर समस्येची सोडवणूक करण्यासाठी कैलास सत्यार्थी यांनी अथक प्रयत्न केले आहेत. ते एक सहृदयी समाजसेवक आहेत. “बचपन बचाओ आंदोलन ही त्यांचीच संकल्पना होती. ८०००० हुन अधिक मुलांना त्यांनी बाल मजुरीच्या वेठबिगारीतुन सोडविले आहे. त्यांच्या या विशेष कार्याचा गौरव जागतिक स्तरावर झालाय. १९१४ मध्ये कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

                या कर्तुत्ववान व्यक्तीच्या कार्याची ओळख करून देणारा प्रबोधनपर हिंदी चित्रपट आहे ‘झलकी’. हा चित्रपट आपल्यापुढे बालमजुरीची समस्या मांडतो. गरीब बालमजुरांविषयी संवेदना जागृत करणारा हा लक्षवेधी चित्रपट आपण जाणून घेऊ या…………..


 
💐झलकी💐

दिग्दर्शक-ब्रह्मानंद एस. सिंग

प्रमुख भूमिका- बोमन इराणी, आरती झा, गोरक्ष सपकाळ गोविंद नामदेव.

                    उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहर परिसरात ही घटना घडते. हातमाग-विणकाम व्यावसायिकांना कामासाठी लहान मुले पुरविणारा एक दलाल वारंवार गावात येऊन गरीब गावकऱ्यांना पैशाची लालूच दाखवतो. थोडी थोडकी रक्कम देऊन तो त्यांची मुलं चक्क विकत घेतो ! हातमाग-विणकामाची मजुरी करण्यासाठी या गरीब मुलांचा वापर होतो. या कोवळ्या मुलांना राबवून घेणारे आणि त्यांच्यावर दहशत ठेवणारे लबाड व्यावसायिक मिर्झापूरमध्ये सक्रिय आहेत.

                    या चित्रपटाची नायिका एका बालमजुराची बहीण आहे. अतिशय गरीब परिवारातील झलकीअवघी नऊ वर्षाची आहे. तीच्या लहान भावाला-बाबूला कामासाठी हतबल वडिलांनी विकलेय. झलकीचे लहान भावावर जीवापाड प्रेम आहे. बाबूला नेल्यापासून ती दुःखी व अस्वस्थ झालीय. हुशार आणि धाडसी स्वभावाची ‘झलकी’ बाबूला शोधून काढायचे ठरवते.     

                   ती शहर गाठते. तीचे प्रामाणिक प्रयत्न जवळून पाहणारा गरीब वयोवृध्द रिक्षा चालक तीला मदत करायला पुढे येतो. त्याच्या मदतीने  झलकी कलेक्टर साहेबाला भिडते ! सुरुवातीला तीला हाकलून देणाऱ्या कलेक्टरकडेच तीला आश्रय मिळतो ! कारण झलकीने चतुराई दाखवून  कलेक्टरच्या बायकोचे मन जिंकलेय. आपल्या मुलांच्या देखभालीसाठी कलेक्टरच्या बायकोने आग्रहाने झलकीला ठेऊन घेतलंय. कलेक्टरच्या मनात झलकीविषयी माया आहे. पण तो पुरेसा गंभीर नाही. पत्नीच्या आग्रहाने मात्र तो यात लक्ष घालायचे ठरवतो. तीच्या भावाला शोधण्याचे प्रयत्न सुरू होतात. शहरातील प्रमुख पोलीस अधिकारी चतुर लाचखोर आहे. झलकीने बाबूच्या कामाचे ठिकाण शोधून काढलेय. पण हा पोलीस अधिकारी त्या व्यवसायिकांस सावध करतो. धाड टाकूनही उपयोग होत नाही. हाती ताकद असूनही आपल्या हरवलेल्या भावाला शोधण्यास प्रामाणिक प्रयत्न न करणाऱ्या उच्चभ्रू अधिकाऱ्यांना झलकी वारंवार जाब विचारते. एक महिला पत्रकार आणि प्रामाणिक समाजसेवक(सत्यार्थी) झलकीच्या पाठी ठाम उभे राहिलेत. आता झलकीला बळ मिळालेय.

             झलकीचे अहोरात्र प्रयत्न आणि पत्रकार महिला तसेच समाजसेविंच्या पाठपुराव्यामुळे कलेक्टर व पोलिसांची दोषी व्यावसायिकांवर कारवाई सुरू होते. त्यांचेवर गुन्हा दाखल झाल्यावर कोर्टात खटला सुरू होतो. पण खोटी नोंदवही आणि पेपर्सच्या जोरावर तो लबाड व्यावसायिक कोर्टात निर्दोष सुटतो !

      आपला भाऊ बालमजुरीतुन मुक्त झाला याचा झलकीला आनंद झाला, तरी कोर्टाचा निकाल ऐकून झलकी संतापते. ती सरळ चप्पल फेकते कोर्टावर !

      झलकीचा भाऊ बाबुच नव्हे, तर असंख्य लहान मुलांना मजुरीसाठी राबवून घेणाऱ्या मुजोर व्यावसायिकांविरुद्द सुरू झालेल्या चळवळीला मिळालेले हे छोटेसे यश झलकीमध्ये दाखविले गेलेय.

             कैलास सत्यार्थी  यांच्या चांगल्या कार्याची थोडक्यात ओळख करून देणारा झलकीतुम्ही जरूर पहा.

 

                               -------------------------------