Friday, 1 January 2021

💐💐भावलेले सुविचार-काव्यकण💐💐

 

💐💐भावलेले सुविचार-काव्यकण💐💐


“ …………..पायात काटे रुतून बसतात

                  हे अगदी खरं असतं

                  आणि फुलं फुलून येतात

                  हे काय खरं नसतं ?

                  काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं ?

                  तुम्हीच ठरवा !

                  सांगा, कसं जगायचं ?

                  कण्हत कण्हत की गाणं म्हणत ?

                  तुम्हीच ठरवा !................

                               

                   ……….……….मंगेश पाडगावकर.

                       

 

                                            :::::::::::::::::::::::::::::::::::

 

💐💐हिमयात्रा💐💐

 💐💐हिमयात्रा💐💐

               हिमालयीन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट(H.M.I.) ही भारतातील प्रसिद्ध गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था आहे. २९ मे १९५३ या दिवशी पहिल्या भारतीय नागरिकाने जगातील सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर  पाऊल ठेवले. या साहसी गिर्यारोहकाचे नाव होते तेनझिंग नोर्गे !

                     तत्कालीन भारतीय पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांनी या गौरवक्षणांची चिरंतन आठवण राहावी, म्हणून एक अध्ययावत अशी गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था स्थापण्याचे ठरविले आणि त्याच्या निर्मितीसाठी तेनझिंग नोर्गे यांना आमंत्रित केले. त्यानंतर दार्जिलिंगच्या हिमाच्छादित पर्वतराजीमध्ये  एचएमआयसंस्थेची   शानदार निर्मिती झाली.        

                    या मान्यवर संस्थेत सशास्त्रशुद्ध गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. त्याविषयीची माहिती आणि आठवणी मी येथे सांगणार आहे……….

💐गिर्यारोहकांचे गुरुकुल, एच.एम.आय.--दार्जिलिंग💐

            बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्ससाठी माझी निवड बॅच क्र. ४६ मध्ये झाल्याचे पत्र मला एचएमआय कडून मिळाले, याचा खूप आनंद झाला. हिमालयाच्या सानिध्यात मला एक महिना राहायला मिळणार होते. शास्त्रशुद्द गिर्यारोहणाचे धडे अनुभवी गिर्यारोहकांकडून मिळणार होते. मात्र त्या संस्थेने पाठविलेली कार्यक्रम पत्रिका  वाचली आणि मला धडकी भरली ! गिर्यारोहण-प्रस्तरारोहणाची प्राथमिक माहिती  (Basic Mountaineering & Climbing),  त्यावरील लेक्चर्स, प्रॅक्टिकल आणि प्रत्यक्ष बर्फावरील प्रशिक्षण, शेवटी चाचणी परीक्षा याचा अंतर्भाव कोर्समध्ये होता. मुंबईहुन या कोर्ससाठी निवड झालेले तीन सहकारीसुद्दा माझ्यासोबत दार्जिलिंगला येणार होते.

                   दार्जिलिंग हा निसर्गसुंदर पर्वतीय जिल्हा पश्चिम बंगाल या राज्यात वसलेला आहे. ‘एचएमआयची भव्य वास्तू या शहरापासून एक दीड किमीवर आहे. या संस्थेच्या प्रवेशद्वारावर हिमशिखराचे सुंदर शिल्प आणि शिखर आरोहण करणारा साहसी गिर्यारोहकांचा समूह पाहून आपण मोहित होतो. या ऐतिहासिक वास्तूमध्ये आम्ही पाऊल ठेवले आणि रीतसर नोंदी करून मुक्कामासाठी होस्टेलमध्ये दाखल झालो.

                  आमच्या  बॅचमध्ये अट्टेचाळीस जणांचा समावेश होता. विविध राज्यांचे चार विध्यार्थी मिळून एक गट याप्रमाणे  १२ गट करण्यात आले. बेसिक कोर्स लष्करातील जवानांसाठी बंधनकारक असतो, त्यामुळे आमच्या बॅचमध्ये लष्करी जवान आणि अधिकारी सुद्दा सहभागी होते. प्रत्येक गटाचे नेतृत्व त्यांचेकडे देण्यात आले.

                  दुसऱ्या दिवसापासून येथील नंदू जयाल हॉलमध्ये आमचा कोर्स सुरू झाला. प्राथमिक गिरीभ्रभण, घात-अपघात झाल्यास घ्यावयाची खबरदारी, गिर्यारोहण साधने, दोरीच्या निरनिराळ्या गाठी बांधणे, अतिउंचावरील गिर्यारोहण, थंड वातावरणात आपल्या शरीरावर होणारे परिणाम, गिर्यारोहणातील धोके, ढग-धुक्याविषयीची माहिती, एकूण प्रशिक्षणाची रुपरेखा, इत्यादी माहिती सर्वांना देण्यात आली.

                    सरावाचा भाग म्हणून रोज सकाळी संस्थेचे प्रशिक्षक आम्हाला तीन-चार किमी अंतरावर असलेल्या मोठया पटांगणापर्यंत धावायला लावायचे. तेथे शारीरिक कवायती अगदी दमछाक होईपर्यंत घेतल्या जात. पण आम्ही जिद्दीने ते करीत होतो. त्यानंतर सर्वांची  वैध्यकीय तपासणी झाली. प्रतिबंधक इंजेक्शन्सही देण्यात आली.

                    फिल्डवर  निघण्यापुर्वी प्रत्येकाला गिर्यारोहण साधने देण्यात आली. यांत हॅवरसॅक, आईस ऍक्स, मिटॉन्स, वुलन सॉक्स, स्लिपिंग बॅग, फेदर जॅकेट, विंडशीटर, विंटर ट्राउझर, क्लाईम्बर शूज, क्रॅम्पॉन्स, कॅरॅबिनर, स्लिंग रोप, अशा जरूरीच्या सामानाचा  समावेश होता. प्रत्येक ग्रुपकडे  रेशनसामानही देण्यात आले होते.त्यामुळे  प्रत्येकाला जवळपास तीस किलो ओझे वाहावे लागणार होते !

                   दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही ४८ प्रशिक्षणार्थी १२ प्रशिक्षक आणि पोर्टर्सच्या मोठ्या ताफ्यासह बसने दार्जिलिंगहुन पश्चिम सिक्कीम मधील पेलिंगला रवाना झालो.

                   पेलिंग येथील मुक्कामानंतर प्रत्यक्ष गिर्यारोहणास सुरूवात झाली. पेलिंग येथून पुढच्या कॅम्पवर निघाल्यावर सुरूवातीला उताराच्या वाटा लागल्या, त्याचे विशेष वाटले नाही. पण नंतर चढण सुरू झाली आणि काहींचा चालण्याचा वेग कमी झाला. चढत, उतरत  आम्ही दुपारी - च्या सुमाराला योग्शम (उंची ५८४० फूट) कॅम्पला पोहोचलो.

                  प्रसिध्द सिनेनट डॅनी याचा हा गाव. छोटेसे पण निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर टुमदार गाव आहे. इथल्या फॉरेस्ट रेस्ट हाऊसवर आम्ही राह्यलो. इथे सगळे दमलेले असल्याने, त्यातही वातावरण थंड असल्यामुळे कोणी बाहेर पडायला राजी होईना. त्याऐवजी आराम करणे सर्वांनी पसंत केले.

                  दुसऱ्या दिवशी ग्रुप बक्कीम(उंची ८००० फूट) कॅम्पकडे निघाला. आता वाटेत अधून मधून लागणारे ओढे, निसरडी वाट, कधी चढण तर कधी उतरण, मग परत चढण अशी दौड करीत दुपारी दोनच्या सुमारास आमचा ताफा बक्कीमच्या फॉरेस्ट रेस्ट हाऊसवर पोहोचला. येथून पुढे बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत स्वयंपाककरण्याची जबाबदारी आमचीच म्हणजे प्रत्येक ग्रुपची असणार होती.

                 अति उंचावरील थंड वातावरण आणि खराब हवामानात पुढे जाणे कठीण होईल, असा अंदाज आल्याने सगळ्यांचा उद्याचा मुक्कामदेखील येथेच होईल, अशा सूचना डीएफटीकडून मिळाल्या. इथला मुक्काम वाढल्याने आम्ही मात्र खुश झालो !

                दुसऱ्या दिवशी या कॅम्पवर आमच्या प्रशिक्षकांनी  प्रस्तरारोहणाचा सराव सर्वांकडून करून घेतला. हे अनुभव थ्रिलिंग असे आहेत. वरून पुढे आलेला प्रचंड खडक, उंच चिमणी (दोन प्रचंड खडकांमधील घट) यावर चढताना आणि उतरताना सुरुवातीला बहुतेकांची घाबरगुंडी उडाली होती, पण कॉन्फिडन्स वाढत होता.

                        दुसऱ्या दिवशी सकाळी इथला मुक्काम हलला आणि आमची बॅच निघाली जामलिंगम कॅम्पकडे. त्याची उंची आहे ११,००० फूट ! एव्हरेस्ट वीर तेंझिंग नोर्गे यांचा मुलगा जामलिंगम याचा एका गिर्यारोहण मोहिमेत अपघाती मृत्यू झाला, त्याची स्मृती म्हणून या कॅम्पला त्याचे नाव दिले गेलेय. इथेपण आमचा मुक्काम दोन रात्री होणार होता.

                       या कॅम्पवर थंडी जास्त जाणवू लागली. त्यामुळे दिलेले विंडशिटर, कानटोपी, वूलन सॉक्सचा वापर इथे आवश्यक झाला. इथे रात्री बर्फवृष्टी देखील सुरू झाली.              

                      दुसऱ्या दिवशी येथून १३,५०० फूट उंचीवरील जोंगरी या ठिकाणी आम्हाला नेण्यात आले. आपल्या देशाचे सर्वोच्च शिखर कांचनगंगा, त्या शिखरावर जाण्यास  जोंगरी  येथून एक वाट आहे. इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कॅम्पवरून चारही दिशेस उत्तुंग अशी हिमाच्छादित शिखरे दिसतात. पूर्वी सिक्कीमचा राजा येथेच विश्रांतीसाठी  यायचा.

                    या मनोहर अशा कॅम्पचा आम्ही दुसऱ्या दिवशी निरोप घेतला अन प्रयाण केले चौरीक्वांग बेस कॅम्पकडे. त्याची उंची होती १४,६०० फूट. आज शेवटचा दिवस होता चालण्याचा म्हणून प्रत्येकजण आनंदात होता. कारण चौरीक्वांग बेस कॅम्पवर सर्वांना आठ रात्री काढायच्या होत्या ! तेथे भ्रमण नव्हते, पण पुढची साहसी मोहीम होणार होती. सराव होणार होते.

                  बेस कॅम्पच्या अगोदर वाटेत ठिकठिकाणी बर्फ लागले. त्यामुळे आईस एक्स(बर्फातली कुदळ) वापरावी लागली. आता जागोजागी चढताना पाय जोरात खाली रुतवावा लागे, कारण शरीराएवढीच पाठीवरील वजनदार सॅक सांभाळावी लागत होती. यात थोडा जरी तोल गेला असता, तरी खोल दरीच्या कुशीत गच्छंती होणार होती ! मात्र आमचे तज्ञ प्रशिक्षक खबरदारी घेत होते.

                  चौरीक्वांग बेसकॅम्पवर पाऊल ठेवले दुपारी तीन वाजता. खूप आनंद झाला त्यावेळी. कारण इतका सुंदर बेस कॅम्प प्रथमच पाहात होतो. इतका सुंदर कॅम्प की इथून तुम्हाला हलावेसे वाटणार नाही ! या ठिकाणी चक्क व्हॉलीबॉलचे मैदान होते !

                  बेस कॅम्पवर टाटा कंपनीने पुरस्कृत केलेली छानशी टिस्को हट राहण्यासाठी देण्यांत आली. प्रशिक्षकांना वेगळी हट मिळाली. या बेस कॅम्पवर वैध्यकीय उपचारासाठी परिपूर्ण अशी मेडिकल हटसुद्दा तयार होती. थंडीचे प्रमाण येथे जास्त असल्याने सर्वांना फेदर जॅकेट घालण्याच्या सूचना देण्यात आल्या.

                  या कॅम्पवर आमचे बर्फावरील गिर्यारोहण, क्रॅम्पॉन्सचे प्रात्यक्षिक, शिखर रॉक चढाईचा-उतरण्याचा सराव इथे होणार होता. या ठिकाणी ग्रुपला स्वयंपाक करण्याची जबाबदारी नव्हती. इथे आमच्या सरावावर जास्त भर राहाणार होता.

                     या वातावरणातील विरळ हवेची सवय व्हावी म्हणून सुरुवातीचे दोन दिवस सर्वांना सकाळीच बेस कॅम्प मधून १००० फूट उंचीवर नेण्यात येई. तेथे बर्फावरील गिर्यारोहण करताना घ्यावयाची काळजी, आजूबाजूचा परिसर . विषयी परिपूर्ण माहिती दिली जाई.

                     तिसऱ्या दिवसापासून आम्हाला आणखी पुढे नेण्यात आले. येथे राथोन्ग हिमनदी आहे. या हिमनदीवरून चालताना पहिल्या दिवशी सगळ्यांची तारांबळ उडाली ! क्लाइम्बिर शूज, त्यावर क्रॅम्पॉन्स बांधून पाय फाकून चालताना बहुतेकांची भंबेरी उडाली ! जर का पायातल्या क्रॅम्पोनचे खिळे एकत्र आले, तर आपल्या पायाला अपघात होण्याची शक्यता असते, शिवाय तोलही जातो. पण हे सारेच थ्रिलिंग होते !

                     दोन प्रकारच्या बर्फावरून प्रशिक्षण घेण्याची संधी बेस कॅम्पवर मिळाली. एक- कठीण बर्फ(HARD ICE) दुसरा पावडरसारखा बर्फ म्हणजेच हिमकण(POWDER SNOW). कठीण बर्फावरून चालताना आपले क्रॅम्पॉनचे पाऊल जोरात उचलावे लागे. या उलट पावडरसारख्या बर्फावरून चालताना काळजीपूर्वक पावले टाकावी लागत. कारण खड्डा मिळाला तर थेट दोन-चार फूट खोलवर  आपले पाऊल जाई ! अशा प्रसंगी आईस एक्स खूप उपयोगी असे.

                    बेस कॅम्प परिसरात एके दिवशी आम्हाला बर्फाची (ICE WALL) उभी भिंत कशी चढायची, त्यासाठी आईस एक्सच्या सहाय्याने पायरी कशी तयार करायची ? सेफ्टी रोप कधी कसा  लावायचा ? रोप लावून चढाई कशी करायची, उतरायचे कसे ? याविषयीचे धडे देण्यात आले. नंतर एका मोठ्या बर्फाच्छादित कड्यावरून चढण्या-उतरण्याची परीक्षा घेण्यात आली.

                   चौरीक्वांग बेस कॅम्पवरील दिवस भराभरा निघून जात होते. इथले टेम्परेचर दिवसा , अंश सेल्सिअस इतके, तर रात्री उणे १०,१२ अंश सेल्सिअस पर्यंत असायचे ! साहजिकच आम्हा सर्वांना आवडता असा कॅम्प फायरचा कार्यक्रम साजरा करता येत नव्हता. म्हणून आम्ही सायंकाळी साडेसहाला जेवण आटोपले की टिस्को हटमध्येच गाणी, विनोद, असे  मनोरंजन करीत आनंद साजरा करीत होतो.

                   इतक्या उंचावरचे  थंड हवामान काहींना सहन होईना. त्यामुळे कुणाची  डोके दुखी सुरू झाली, तर काहींना थोडे चालल्या-बोलल्यावर दम लागण्याचा त्रास सुरू झाला. बऱ्याच जणांची भूक आणि झोप इथे कमी झाली. थंड वातावरणात संध्याकाळी प्रातर्विधी करीता बाहेर जायला कंटाळा येऊ लागला ! सोसाट्याचा गार वारादेखील आमची परीक्षा घेत होता. बेस कॅम्पवर सूर्यदर्शन होणे दुर्मिळ झाले. फक्त शेवटी दोन दिवस सतत ऊन पडत होते.

                  आपल्या शरीरात ऊब राहावी थंडीतून थोडातरी बचाव व्हावा म्हणून चहा, कॉफी किंवा बोर्नव्हिटा आम्हाला दिवसातून - वेळा मिळत होता. प्रत्येकाला दोन-दोन स्लिपिंग बॅग्स देण्यात आल्या होत्या. इतके सगळे असूनसुद्धा थंडी काही कमी  होईना !                 

                    गिर्यारोहणाचा सराव प्रशिक्षण जवळपास पूर्ण झाल्यामुळे याच परिसरातील १७,५००  फुट उंचीचे ‘ ‘’बी.सी.रॉय शिखर  सर करण्याची  मोहीम सर्वांसाठी आखण्यात आली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने ज्यांची तब्येत ठीक नाही जे फिटवाटत नाहीत, अशांना या शिखर मोहिमेत भाग घेण्यास मनाई करण्यात आली.

                    दुसऱ्या दिवशी मोहिमेला सुरुवात झाली. सतत असलेली चढण आमची दमछाक करीत होती. मात्र हळू हळू  आणि जिद्दीने आम्ही शिखराच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहिलो. मात्र काही तासानंतर,  २०/२२ जण शिखरावर पोचतात पोचतात तोच उरलेल्या गिर्यारोहकांना तेथेच थांबविण्यात आले !

                   बी.सी.रॉय शिखर नजरेच्या टप्प्यात आले होते ! तरीही सुरक्षेच्या दृष्टीने पुढे जाण्यास मनाई इतरांना करण्यात आली ! यात आम्ही चौघे होतो. आमचा आणि इतरांचाही हिरमोड झाला, नाराजी आली. पण त्याला इलाज नव्हता. कारण वातावरण खराब होत होते. शिखर मार्गावर जोरदार वारे आणि हिमकडे कोसळण्याची भिती वाढत होती. त्यापेक्षा परतीचा सुरक्षित मार्ग सर्वांना योग्य होईल, म्हणून आमच्या प्रमुखांनी परतीचा निर्णय घेतला.

                   परतताना आलेली नाराजी आमच्या प्रशिक्षकांनी घालविली. ’ आप सभी इस कठीन व्हेदर कंडिशनमे  बिलकूल फिट हो, लेकीन इस स्थितिमे आगे होना बडी गलती होगी | यहा अपनी सभीकी सेफ्टी मस्ट है |’, अशा शब्दांत त्यांनी साऱ्यांना समजावले.         

                 चौरीक्वांग बेस कॅम्पवरील शेवटची रात्र गाजली.  ज्यांचे आज शिखर सर झाले त्यांचे मनापासून अभिनंदन करीत साऱ्यांनी धम्माल नाच-गाणी करून अगदी जल्लोष केला ! याच रात्री आमचे डायरेक्टर नवांग गंबु   मुख्य प्रशिक्षक चेवांग ताशी यांनी गिर्यारोहणाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल आमचे सगळ्यांचे जाहीर कौतुक केले. ‘ ही एकच बॅच अशी आहे की, १०० टक्के विध्यार्थ्यांनी बेसकॅम्पवरील सराव आणि प्रशिक्षण पूर्ण केलेय. या पूर्वी ३०/४० टक्के विद्यार्थी अर्ध्यावरून परत गेलेले आहेत. तुम्ही सक्षम धाडसी आहात. असेच धाडसी गिर्यारोहक व्हा ! ’, असा प्रबोधनाचा संदेश  दोन्ही सरांनी दिला आमची उमेद वाढवली.

                  आता आमची परतीची यात्रा सुरू झाली. या परतीच्या वाटेवर परत जामलिंगम, बक्कीम, योग्शम लागले. प्रत्येकाची गती व आत्मविश्वास वाढला होता.

                  परतीचा पहिला मुक्काम योग्शमला केला. तेथे एक सुंदर निळाशार पाण्याचा ओढा आहे. त्या ठिकाणी आम्ही मनसोक्त स्नान केले. खूप मज्जा आली !                  

                  आमचा परतीचा पुढचा मार्ग बदलल्याचे सांगण्यात आले. आम्ही ताशिदींगकडे निघालो. त्या गावात एका शाळेमध्ये मुक्काम झाला. ताशिदींगमध्ये प्राचीन बौद्ध गुंफा पाहायला मिळाली. .

                  शेवटच्या दिवशी ताशिदींग ते लेगशिप असे पदभ्रमण करायचे होते. फक्त - किलोमीटर सरळ रस्ता होता. तो चालल्यावर आमच्यासाठी थांबलेल्या बसेस दिसू लागल्या ! त्याबरोबर प्रत्येकाने आपली गती वाढवली आणि बस गाठली. बसच्या टपावर आपापल्या सॅक्स ठेवल्यानंतर आम्ही सारे निश्चिंत मनाने बसमध्ये बसलो आणि निघालो दार्जिलिंगच्या  एचएमआयहोस्टेलकडे !

                    एचएमआयकडून बेसिक कोर्सची एक प्रस्तरारोहण चाचणी (Rock Climbing Test) बाकी होती. दोरखंडाच्या गाठी बांधण्याविषयीची चाचणीही दुसऱ्या दिवशी होणार होती. तत्पूर्वी आम्हाला दार्जिलिंग मधील तेन्सिंग रॉकवर सराव करण्यासाठी काही वेळ देण्यात आला. त्यानंतर सर्वांची चाचणी परीक्षा यथासांग पार पडली. सायंकाळी प्रत्येकाची स्वतंत्र मुलाखत   एचएमआयचे प्रिन्सिपॉल कर्नल अमित रॉय यांनी घेतली. ’ प्रशिक्षणाचे  तुमचे उद्देश काय होते, ते  कितपत सफल झाले, . प्रश्न त्यांनी विचारले.

                   एचएमआयबेसिक माऊंटेनिअरिंग कोर्सच्या सांगता समारंभाची आठवणही सांगण्यासारखी आहे. हा कोर्सचा शेवटचा पण महत्वाचा दिवस. विद्यार्थ्यांनी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल पदक(Medel) प्रदान करण्याचा खास समारंभ होता. या समारंभाची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यक्रम एचएमआयच्या विस्तीर्ण प्रांगणात संपन्न झाला. ब्रिगेडियर के. विजयकुमार यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानपूर्वक पदक प्रदान केले, ते ही एचएमआयप्रमुख एव्हरेस्टवीर तेनझिंग नोर्गे यांच्या उपस्थितीत !

                  एचएमआयसारख्या नावाजलेल्या संस्थेतून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतल्याचा मला आजही आनंद अन अभिमान आहे.  

 

(पूर्वप्रसिद्दी-स्वराज्य साप्ताहिक).

 

                                                               ::::::::::::::::::::::::::::::::::::