Thursday, 1 August 2019

💐देश परदेश💐💐देश परदेश💐
                 आपल्या भारत देशाचा त्र्याहत्तरावा स्वातंत्र्य उत्सव मोठया उत्साहात आपण सारेजण  ऑगस्ट महिन्यात साजरा करीत आहोत. हा स्वातंत्र्य उत्सव साऱ्या देशभरातच नव्हे, तर जगभरातील आपले भारतीय बांधव साजरा करतात. त्या सर्वाना माझा सस्नेह सलाम आहे.
             हिमालयीन  पदभ्रमण,गिर्यारोहण व पर्यटन करताना मला आपल्या देशाच्या काही सीमावर्ती भागात जायची मला संधी मिळालीय.  त्यावेळी मी केलेले निरीक्षण व पाहिलेले वास्तव आता सांगणार आहे…….

 
  
💐बॉर्डर बॉर्डर………….

  भारत-नेपाळ(पशुपतीनाथ काकडविटा)बॉर्डर
                     
                 आयु्यात पहिल्यांदा देशाची सीमा ओलांडायला मिळाली ती १९८६ मध्ये. दार्जिलिंग येथील जगप्रसिद्ध अशा हिमालयीन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट( एच.एम. आय. ) मधून बेसिक माउंटेनिअरिंग कोर्ससाठी गेलो असताना, दोन दिवस मोकळे मिळाले होते.  तेव्हा संदफु, कालिंगपॉंन, बटासीलूप आणि मिरीक लेक परिसर पाहिला. ही सारी निसर्गरम्य अशी पर्यटन स्थळे आहेत. मिरीक लेक तर अतिसुंदर आहे. या ठिकाणी एक मुक्कामही केला. तेथून जवळच नेपाळची सीमा(पशुपतीनाथ बॉर्डर) लागते. पासपोर्ट-व्हिसा भारतीयांसाठी लागत नाही. सुरक्षा तपासणी मात्र होते. या बॉर्डरवरून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पहिल्यांदा परदेशात पाऊल ठेवले !
                        नेपाळच्या प्रवेशद्वार-कमानीपाशी आम्ही ग्रुपसह फोटो काढले. तेथे जवळपास जाऊन बाजार, मार्केट परिसर बघितला. त्यावेळी भारतात बंदी असलेला कोकाकोला मनसोक्त प्यालो. ही पहिली परदेशवारी असल्याने सारे एक्ससाईट झाले होतेव.  आणखी थांबायची इच्छा होती. मात्र वेळेत परतायचे असल्याने नेपाळचा निरोप घेतला आणि परतलो.                   
                          पुन्हा एकदा सीमापार जायची संधी मिळाली. दार्जिलिंग,सिक्कीम हिमालयीन गिर्यारोहण केल्यानंतर जलपायगुढी, सिलिगुढी, मार्गे बसप्रवास होतो. ही नेपाळची सीमा काकडविटा जवळ आहे. राजधानी काठमांडूला जाण्यासाठी तेथुन बसेस सुटतात. या बॉर्डरला काही लोक पानीटाकी बॉर्डर देखील म्हणतात.  वर्षभर येथे पर्यटक आणि स्थानिक, यांची वर्दळ असते. सिलिगुढीहुन पानीटाकीकडे जाताना एक छोटेसे गाव लागते-नक्षलबारी. हे प्रसिद्द आहे देशभर.
                          येथून सीमा ओलांडताना भारतीय चेकपोस्टमध्ये आवश्यक तपासण्या होतात. त्यामध्ये काही वेळ जातो,  त्यानंतर आपण नेपाळच्या हद्दीत प्रवेश करतो.  नेपाळ हद्दीमध्ये टू बाय टू आसनांच्या बसेसमधून दुपारनंतर सुरू होणारा आपला दिर्घ प्रवास दुसऱ्या दिवशी सकाळी काठमांडूला संपतो.
                          अशा रितीने मी दुसऱ्यांदा सीमापार जाऊन नेपाळची सफर केली.
  
  भारत चीन बॉर्डर(बद्रीनाथ,माना-उत्तरांचल)-
                         
                      त्यानंतर  मला  भारत-चीन सीमाप्रदेशात गिर्यारोहणाच्या निमित्ताने जायला मिळाले. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ या  हिमालयाच्या कुशीमध्ये प्राचीन व प्रसिद्ध असलेली देवस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात गिर्यारोहण करण्यासाठी देशी-परदेशी गिर्यारोहकांची वर्दळ असते. यापैकी, बद्रिनाथ देवस्थान  माना बॉर्डरपासून लांब नाही. त्या सीमेवर हिमशिखरांच्या रांगा दुरून दिसतात. गिर्यारोहकांना आव्हान देणाऱ्या काही हिमशिखरांवर यशस्वी आरोहण होते, तर काही मोहीमा अयशस्वी ठरतात.
            आमच्या संस्थेने इनर लाईन मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी योग्य त्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वसुधारा फॉल(धबधबा)च्या दिशेने आम्ही निघालो.  भारतीय सैनिक या ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येकावर बारीक नजर ठेवून असतात, संशय येऊ नये म्हणून सामान्य खेडूत, शेतकरी, किंवा मजुराच्या रुपात राहून आपली ड्युटी बजावतात.  आम्हाला या सीमा परदेशात ठराविक मार्गात फिरण्याची परवानगी मिळाली. त्यावेळी आपल्या सैनिकांशी थोडावेळ संवादही झाला.  आपली विचारपूस करणारे आहेत  या भावनेने त्यांना बरे वाटत होते, हे त्यांच्या सुखावलेल्या चेहेऱ्यावरून दिसत होते. शरीर गोठविणाऱ्या थंडीत दिवसरात्र, डोळ्यांत तेल घालून शत्रू-सीमेवर नजर ठेवणाऱ्या या साऱ्या शूर जवानांचा मी ऋणी आहे.  

   भारत-चीन बॉर्डर(चितकुल-हिमाचल)-
              
                       हिमाचल प्रदेशातील सिमला या राजधानीच्या शहरातून तिबेट-चीनच्या दिशेने एक महामार्ग जातो. या मार्गावर कालपा, कुपा, नीचार, सरहान बुशहेर, अशी छोटी छोटी खेडी लागतात. या दिर्घ प्रवासात ठराविक अंतरावर बॉर्डर चेकपोस्ट्स आहेत.  या भागात, जिकडेतिकडे मिलीटरीच्या गाड्या, सैनिकांच्या वसाहती, कॅम्पस व पहारे-चौकी जातायेता पाहायला मिळतात.
                 मला रुतरुंग-कूपा  या चितकुल चेकपोस्टच्या अलीकडील सांगला खेड्यात उंचावरील एका कॅम्पची(सांगला कंडा) जबाबदारी  कॅम्प लीडर या नात्याने मिळाली.  इथल्या कामांमुळे कॅम्प सोडून जाता येत नव्हते.  त्यामुळे चितकुल सीमा प्रत्यक्ष पाहाता नाही आली. मात्र या संपूर्ण भागात लष्कराचे अधिपत्य जाणवले, सैनिकांची जागरूकता अनुभवली, आणि या शूर जवानांविषयीचा आदर आणखी वाढला.

  भारत-पाकिस्तान बॉर्डर(भुज-कच्छ-गुजरात)-
             
                     गुजरातचा सीमाभाग भुज भागात विस्तारलाय. सरक्रीकचे नाव तुम्ही ऐकलेय ? हे आंतरराष्ट्रीय सीमेचे महत्वाचे ठिकाण, जवळपास निर्मनुष्य असून मैलोनमैल पसरलेलं हे मिठागरांनी भरलेलं रणमैदान आहे.  इथून पलिकडे पाकिस्तानचे प्रसिद्द कराची बंदर आहे. हा
सुद्दा सारा संवेदनशील सीमा भाग आहे. भारतीय सैनिक चोवीस तास या सीमेवर जागते पहारे देण्यासाठी सुसज्ज असतात.
              कच्छ- भुज पाहायला येणारे हजारो पर्यटक सुरक्षा निर्बंधांमुळे सीमाभागात जाऊ शकत नाहीत.  पण आवश्यक पूर्वपरवानगी घेऊन आपण तेथे जाऊ शकतो, प्रत्यक्ष सीमा रेषा पाहू शकतो. मात्र, त्यासाठी  खूप आधी सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करावे लागतात.  
               या भागात इतर पाहायला तरी काय आहे ? सांगतो- खूप चांगली ठिकाणे या परिसरात आहेत- श्री कोटेश्वर मंदिर, आहे. नारायणपूर मंदिर आहे.  हाजीपीर दर्गास्थान, प्राचीन आणि जागतिक ‘युनो’ संस्थेने नावाजलेले शीख गुरुद्वारा देखील आहे. काली डोंगरी येथे प्रसिद्द श्रीदत्तात्रेय मंदिर आहे.  सिंधू संस्कृतीच्या वेळेचे व मोहेंजोदाडो हडप्पाच्या समकालीन असणारे ढोलाविरा हे अतिप्राचीन नगर आहे.
               आम्ही पूर्वनियोजन करून बॉर्डर पाहायला गेलो  होतो. तो अनुभव सांगतो- प्रत्यक्ष सीमारेषेपूर्वी अंदाजे ८५ कि. मी. पासून आमची व बसची सामानासह तपासणी झाली. लष्कराकडे असलेल्या श्वान पथकानेदेखील बसमध्ये येऊन प्रत्येकाची तपासणी केली !
              प्रत्यक्ष सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना आम्ही काही माहिती विचारली. त्यांनी व्यवस्थित पणे ती सर्वाना सांगितली- सीमेपालिकडे असणारी आणखी एक सीमा रेषा असते-तिला नो मेन्स लँड म्हणतात. कुठल्याही देशाचा त्यावर हक्क नसतो. सायंकाळनंतर लोखंडी तारांमध्ये जास्त क्षमतेचा वीजप्रवाह सोडला जातो.
               इथले बंकर्स(खंदक) पहारा देण्यासाठी खूप सुरक्षित असतात. मात्र त्यात साप-विंचुंचे वास्तव्य असण्याची दाट शक्यता असते, म्हणून काळजी घ्यावी लागते. पेट्रोलिंगची ड्युटी करताना जवानांवर प्रचंड ताण असतो. त्यातही, टीममध्ये कोणी कमी असले, तर ड्युटी संपल्यावर निघता येत नाही. या सीमेवर आपल्या नगरकडचा एक मराठमोळा जवान भेटला. आम्हाला आणि त्यालाही खूप आनंद झाला.  थोडक्यात गप्पा टप्पा केल्या. अभिमानदेखील वाटला शूर जवानाचा.
       या सीमेवरून पलिकडे कराची शहरातील उंच इमारती दूरवर, पण स्पष्टपणे दिसतात. आपल्या हद्दीत मात्र सर्व भाग निर्मनुष्य वस्तीचा आहे.

  भारत-पाकिस्तान बॉर्डर(जेसलमेर, बारमेर-राजस्थान)-
                   
                     भुज सफर करण्यापूर्वी राजस्थानला ऐतिहासिक स्थळे  पाहण्याचा योग आला होता. त्यावेळी जोधपूर मार्गे पाली, पोखरण, जेसलमेर, बारमेर हा सीमाभाग पाहिला. या परिसरात वस्ती व वर्दळ खूप आहे. मात्र गावची हद्द सोडली, की पुढे सारे काही सुनसान वातावरण असते ! फक्त रस्ता आणि रस्ताच ! तोही वाकडातिकडा नव्हे, तर सरळसोट रस्ता !  प्रत्यक्ष पाकिस्तान बॉर्डरला जायला मिळाले नाही. पण भारतीय सैन्यदलाने या पूर्ण परिसरात किती चोख बंदोबस्त केलाय ते  पहायला मिळाले. इथे पाणी टंचाई आहे.  पाणी मिळते, ते वाळूमिश्रीत असले तरी घ्यावे लागते.
           हा वाळवंटी परिसर निर्मनुष्य आहे. नेहेमी जोरदार वाऱ्याची वादळे येतात. क्षणात सभोवती वाळूचे डोंगर उभे करतात ! अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शूर सैनिक अहोरात्र सेवा बजावीत असतात.
                         आपण इकडे शहर-गावांत सुखनैव राहात आहोत. मस्त एन्जॉय करीत आहोत  आणि तिकडे देशाच्या सीमा भागात दिवसरात्र थंडीवाऱ्याची, वादळाची, कशाकशाची पर्वा न करता आणि आपले कुटुंब विसरून आपले शूर जवान देशसेवा करून, भारतीय सीमांचे रक्षण करीत आहेत. मी मनापासुन या सर्व भारतीय जवानांचा शतशः ऋणी आहे. देशाच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाला अभिवादन करताना, सर्व देशप्रेमीना माझे नम्र आवाहन आहे की, भटकंती करताना, पर्यटक म्हणून फिरताना आयुष्यात एकदा तरी आपल्या देशाच्या सीमांना भेट द्या. सीमेवर जा. तो परिसर पाहा. देशाच्या बॉर्डर्सचे अहोरात्र, प्राणपणाने रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना भेटा. त्यांचेशी संवाद साधा. तुम्हाला वास्तवाची जाणीव होईल आणि आपल्या सैनिक बांधवांचे बळ आणखी वाढेल…..
                                                                    || जय हिंद ||