Tuesday, 1 October 2019

💐समाज संवेदना💐

💐समाज संवेदना💐
            प्रत्येक माणसाला  व प्राणीमात्राला जगायला काय लागते ? तर, पाणी. हे पाणी आपले जीवन आहे, असे लहानपणापासून मी ऐकत आलोय. मात्र हेच पाणी सर्वदूर नेण्यासाठी मूळ नदीकाठच्या व खोऱ्यात विस्थापित होत असलेल्या स्थानिक निवासी-आदिवासी बांधवांच्या कायमस्वरूपी सुरक्षित पुनर्वसनाचे काय ?
                 या प्रश्नाकडे माझे लक्ष वेधले गेले  ते एका माहितीपटामुळे.  शिल्पा   बल्लाळ या तरुणीने प्रत्यक्ष पाहिलेलं व अनुभवलेलं  संकटग्रस्तांचे वास्तव चित्रण आणि पुढच्या पिढीसाठी सुरु असलेल्या शैक्षणिक सत्कार्याची ओळख  या माहितीपटात आहे.  शिल्पा ही   सामाजिक विषयांची चांगली जाण असणारी व कृतिशील कार्यकर्ती आहे. नर्मदा सरोवर प्रकल्पग्रस्त आंदोलकांचा निकराचा लढा या महिला दिग्दर्शिकेने यात दाखविला असून तो पाहणाऱ्याला अस्वस्थ व अंतर्मुख करतो.    
                   समाजमनात घर करून राहाण्याची व प्रसंगी समाजाला वास्तवतेची जाणीव देऊन सक्रिय करण्याची ताकद देणारा चित्रपट कसा पहावा, याविषयी राज्यभर चळवळ उभारून गेली पन्नास वर्षे कार्यरत असलेल्या ‘प्रभात चित्र मंडळ’ या प्रसिध्द सिने सोसायटीमुळे मला हा माहितीपट बघायला मिळाला.                
                  आज मला येथे या माहितीपटाचे परिक्षण किंवा रसग्रहण करावयाचे नाही, तर इतरांच्या विकासामुळे विस्थापित होत असलेल्या आदिवासी बांधवांच्या नव्या पिढीला नवशिक्षणाच्या माध्यमातून उभे करण्याचा ध्यास घेणारी समाजसेवी मंडळी,  मूठभर असूनही कशी झटत आहेत, त्याची थोडी ओळख करून द्यायची आहे………….
                

💐पाणी आणि जीवन शाळा……………
                 गुजरात राज्याला प्रामुख्याने फायदेशीर ठरणाऱ्या  नर्मदा सरोवर जल प्रकल्प पूर्णत्वाला नेताना नर्मदा नदीच्या काठावरील आणि तीच्या खोऱ्यातील विस्थापित अवस्थेतल्या जुन्या नव्या पिढीचा जीवन मरणाचा प्रश्न सर्वांसमोर आणणाऱ्या मेधा पाटकर पस्तीस वर्षे न्यायासाठी निस्वार्थीपणे लढा देत आहेत.  गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र,  ही तीन राज्ये या प्रकल्पाशी संबंधित आहेत, पण विस्थापितांविषयी ती पुरेशी गंभीर नाहीत, हे सत्य या माहितीपटात आपण पाहाताना नर्मदा नदी-खोऱ्यात सुरू झालेल्या जीवन शाळांचा परिचय होतो. ही जीवन शाळा चालविणारे तरुण-तरुणी उच्च शिक्षित, आणि सुसंस्कृत आहेत. स्थानिक तरुण वर्गाला प्रशिक्षित करून त्यांना सक्रिय करण्याचे काम ही मंडळी प्रामाणिकपणे करीत आहेत. सरकारी दुर्लक्षामुळे, विस्थापित होणाऱ्या निरक्षर किंवा अल्पशिक्षित आदिवासी बांधवांच्या मुलांमध्ये शिक्षणाची जिज्ञासा या तरुण कार्यकर्त्यांनी निर्माण केली आणि मग १९९१ मध्ये पहिली जीवन शाळा या परिसरात सुरू झाली ती चिमलखेड्यात, नंतर निमगव्हाणमध्ये.
                 आज हे नर्मदा नवनिर्माण अभियान एकूण नऊ शाळा चालवीत आहे, ज्यात प्राथमिक स्तरावरचं शिक्षण दिले जाते. सुमारे एक हजार मुलं मुली जीवन शाळांत शिकत आहेत. ही मुलं-मुली पुढे आश्रमशाळा किंवा शासकीय मदतीवर चालणाऱ्या वसतिगृहात पुढच्या शिक्षणासाठी जातात. आजवर या जीवन शाळांतून पाच हजार मुलं मुली पुढे गेली आहेत. त्यातील काही क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करीत आहेत.
              या जीवनशाळांचं वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी संस्कृती, त्यांची दैवतं व इतिहास यांची जपणूक,यांचा अभ्यास करणे, त्याचबरोबर पिढीजात शहाणपण, कौशल्य, याना महत्व देत जंगलाचं ज्ञान, शेतीची ओळख आणि स्वछता, स्वावलंबन याबाबत जागृत होणे.ही आहेत.  या जीवनशाळेत बोलीभाषा व राज्यभाषा दोन्ही आहेत.
               मात्र,   केवळ पुस्तकी धडे न देता कामाच्या अनुभवातून जीवनाशी निगडित कौशल्य विकसीत करणारे शिक्षण घेणे, तसेच, निसर्ग आणि वनसंपदा सुरक्षित ठेवण्याची दक्षता घेणे याकरीता या जीवनशाळा काम करीत आहेत.
              या शाळेतील मुलांच्या सर्व आवश्यक गरजा व आरोग्य, यांची पूर्तता होते. मुलांना न्याहारी व दोन वेळचे जेवण दिले जाते. समाजाचाही यात सहभाग वाढावा, म्हणून विविध प्रयत्न केले जात आहेत.  त्यासाठी गावपातळीवर देखरेख समित्या आहेत. जीवनशाळांच्या परिसरातील स्थानिक भाषा-संस्कृतीची, वातावरणाची माहिती असलेले शिक्षक येथे कार्यरत आहेत. काही शिक्षक तर जीवनशाळेत शिकून पुढे गेलेले आहेत. या जीवन शाळेतील बरीच मुलं म्हणजे त्यांच्या घरातील शिक्षण घेणारी पहिलीच पिढी आहे.
               प्रत्येक मुलाला आपल्या घटनेने ‘शिक्षणाचा मूलभूत हक्क’ दिला आहे. तो हक्क या आदिवासी मुलांनाही मिळावा याकरीता प्रयत्न करणाऱ्या या शहरी तरुणांचे प्रयत्न खरोखर गौरवास्पद आहेत.  त्यांच्या या सत्कार्याला माझ्या सप्रेम शुभेच्छा आहेत.
                    हे अभियान अधिक जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी दोन संपर्क स्थळे दिली आहेत—
परवीन जहांगीर—२६१,ज्युपिटर अपार्टमेंट्स, ४१, न्यू कफ परेड, मुंबई-४००००५. फोन—०२२२२१८४७७९/०९८२०६३६३३५., विजया चौहान—ऑलिंपस सोसायटी, छोटानी मार्ग, माहीम(पश्चिम), मुंबई-४०००१६.फोन—०९८२०२३६२६७.


                                                   ::::::::::::::::::::::::::::💐वाचन छंद💐

💐वाचन छंद💐
                  वाचनप्रेमींनो, सस्नेह नमस्कार,
                मला नुकतीच, दोन चांगल्या आणि मोठया लायब्ररीजना भेट द्यायची संधी योगायोगाने मिळाली. त्या विषयी मी येथे वाचन-संवाद करीत आहे………………


💐सेन्ट्रल लायब्ररी---गोवा आणि सुरत…………..
                          आर्किटेक्टचे शिक्षण घेणाऱ्या माझ्या मुलीने यंदा डिग्री वर्षात एक प्रोजेक्ट, केस स्टडीसाठी घेतला आहे. सर्व सखोल अभ्यास करून हा प्रोजेक्ट सादर करावा लागतो. त्याची तपासणी होऊन गुणांकन केले जाते. प्रत्येक विध्यार्थी त्याकरीता एक विषय निवडतो. हिने निवडलेला विषय आहे, ‘पब्लिक लायब्ररी’.  काही निवडक लायब्ररीजना प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रोजेक्ट तयार करावा लागतो.
              तीने निवडलेल्या दोन लायब्ररीज महाराष्ट्राबाहेर होत्या. ती एकटीच असल्याने सोबतीला मला तिकडे जाणे आवश्यक होते. या दोन लायब्ररीत मी एक ‘वाचक’ म्हणून फेरफटका मारल्या नंतर त्यांचा परिचय तुम्हाला(त्या माहिती नसल्यास) करून देत आहे.

*पट्टो-गोवा येथील कृष्णकांत शामा स्टेट सेंट्रल लायब्ररी—
                     निसर्गसुंदर गोवा राज्यात शिरताना प्रथम मांडवी नदीवरील मोठा पूल लागतो. तो पार केल्यावर राजधानी पणजीत आपण प्रवेश करतो. येथे उजव्या दिशेस असणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकाला लागून ‘पट्टो’ हे छोटेसे उपनगर आहे. मुंबईतील कफ परेडची हो नवीन आवृत्ती ! टिपटॉप कॉर्पोरेट ऑफिसेस आणि भव्य प्रशस्त अशा सरकारी इमारती इथे उभ्या राहिल्या आहेत, आणि उभ्या राहात आहेत.
                    या ‘पट्टो’मध्ये एक सुंदर इमारत आपले लक्ष वेधून घेते, तीचे नाव आहे ‘संस्कृती भवन’. गोवा शासनाच्या कला व सांस्कृतिक संचालनालयाच्या अधिपत्याखाली सन १८३२ मध्ये गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररीची स्थापना झाली  आणि इथल्या नवीन इमारतींमध्ये तीचे स्थलांतर २०१२ ला झाले.
             जवळपास १२००० चौरस मीटरच्या प्रांगणात आता कार्यरत असलेली भव्य व अध्ययावत इमारत  ‘कृष्णदास शामा गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररी’ म्हणून ओळखली जाते. सोळाव्या शतकातील कृष्णकांत शामा यांचे नाव कोकणी वाङमय क्षेत्रात प्रसिद्द आहे.  या सुप्रसिद्ध कोकणी साहित्यिकाने कोकणी भाषा-लिपीचा अभ्यास व प्रचार करून कोकणी भाषेचा गोडवा राज्याबाहेर नेला. त्यांची स्मृती म्हणून ही अध्ययावत लायब्ररी आकाराला आली आहे.
                उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेल्या या ‘कृष्णदास शामा गोवा स्टेट लायब्ररी’ चे  प्रवेशद्वार प्रथमदर्शनीच आपल्याला प्रभावित करते.  ही सुंदर इमारत आहे सहा माळ्यांची. सुमारे अडीच लाख ग्रंथ-पुस्तके व नियतकालिकांचा खजिना असलेल्या या समृध्द लायब्ररीत विशेष अध्यासन, दुर्मिळ ग्रंथ, संदर्भ कोश, अंध वाचक, लहान विद्यार्थी मुले,  इतिहास, पोर्तुगीज काळ, इत्यादींसाठी स्वतंत्र विभाग  विद्यार्थी तसेच अभ्यासुंसाठी सुसज्ज आहेत. पुस्तकांची देवाणघेवाणही
 आधुनिक तंत्राने होते.
                  या स्टेट लायब्ररीत चर्चासत्र  तसेच विशेष सादरीकरणाकरीता सुसज्ज असलेला कॉन्फरन्स हॉल आणि छोटे अभ्यास कक्ष आपले लक्ष वेधून घेतात. पुस्तके वर्षानुवर्षे टिकविण्यासाठी लायब्ररीत वेगळा विभाग कार्यरत असून तेथे बाईंडिंग व डिजीटायझेशनची कामे होतात.  
                  सर्व  पुस्तकांची चांगली काळजी घेताना, अभ्यागत-वाचकांशी सौजनशील वागून मैत्रीचे हात पुढे करणारा इथला अधिकारी कर्मचारी वर्ग मला भावला.
                  आपण जेव्हा केव्हा गोव्यात फिरायला जाल, तेव्हा थोडास वेळ काढून जरूर या कृष्णदास शामा गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररीला जरूर भेट द्या.
                                                  :::::::::::::::::::::::::::


*सुरत-गुजरात येथील कविवर्य नर्मद सेंट्रल लायब्ररी—
        गुजरात राज्यातील सुरत हे ब्रिटिश काळापासून उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध असणारे वर्दळीचे शहर. साडी-शालू ड्रेस मटेरिअल्सची खरेदी असो, किंवा विविध पदार्थांच्या चवी चाखायच्या असतील, तर हे सुरत शहर तुमचे नक्की स्वागत करते. या शहरामध्ये पंधरा मिनिटांवर असणाऱ्या घोडदौड मार्गावर आठवा लाईन पोलीस ठाणे आहे, त्याच्या समोर कविवर्य नर्मद सेन्ट्रल लायब्ररीचे प्रशस्त प्राकार आपल्या नजरेत पडते.
             आधुनिक रचनेची इमारत, ऐसपैस आवार आणि आरामदायी कॉरिडॉर-कक्ष-हॉल, ही ‘कविवर्य नर्मद सेन्ट्रल लायब्ररी’ची प्रमुख वैशिष्ट्ये. या ठिकाणी  विध्यार्थी-विध्यार्थीनी तसेच अभ्यासू वाचकांची दिवसभर वर्दळ असते.
              सुरत महानगर पालिकेच्या अधिपत्याखाली या लायब्ररीचे कामकाज चालते. हिची स्थापना १९९१ मध्ये आध्यकालीन कविवर्य नर्मद यांच्या १५९ व्या जयंती वर्षात झाली. त्यानंतर वेळोवेळी लायब्ररीत अध्यययावत सोयी होत गेल्या.  पाच माळ्याची इमारत असलेल्या या लायब्ररी मध्ये आजघडीला एकूण दहा स्वतंत्र विभाग आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाठी स्वतंत्र कक्षही आहे. अंध वाचक कक्ष आहे. ३६०० ब्रेल लिपीतली पुस्तके उपलब्ध आहेत. अंधमित्रांसाठी ऑडियोची चांगली सोय आहे. दुर्मिळ जुनी पण महत्वाची पुस्तके विविध अभ्यासू वाचकांना हवी असतात. त्यांचेसाठी वेगळा विभाग आहे.
               गरीब गरजू विध्यार्थ्यांना बुक बँकेच्या माध्यमातून शिक्षणासाठी पुस्तके दिली जातात. त्याकरीता इच्छुकांकडून देणगीही स्वीकारली जाते.  वयस्कर-जेष्ठ वाचकांकरीता नियतकालिके व संदर्भ मिळण्याची, तसेच ते वाचण्याची चांगली व्यवस्था लायब्ररीत आहे. सध्याचा जमाना नेट आणि कॉम्पुटरशी जास्त जवळीक केलेला आहे, त्यादृष्टीने या लायब्ररीत ‘इ-लायब्ररी’ च्या माध्यमातून उत्तम पद्धतीने सिडी, नेट, व कॉम्प्युटरच्या सहाय्याने चांगली व्यवस्था असून त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद आहे.  बाल-शालेय स्तरावरील मुलांना वाचन आणि ज्ञानाची गोडी लागावी या हेतूने ही लायब्ररी विशेष सेवा देते,
              आजघडीला या सेन्ट्रल लायब्ररीत तीन लाखांहून अधिक पुस्तके-ग्रंथांचा बहुमोल खजिना जिज्ञासू वाचकांना उपलब्ध झाला आहे. जवळपास बासष्ठ हजार मेंबर्स त्याचा लाभही घेत आहेत. ऑनलाइन मेम्बरशिप सदस्यत्व पण मिळते.        
                      आपण कधी सुरतला पर्यटनाला जाल, तेव्हा या ठिकाणी जरूर भेट द्या…………..
                                         :::::::::::::::::::::::::::::::::::::

                                                   


💐भटकंती मनसोक्त💐

💐भटकंती मनसोक्त💐              
                       भटकंतीची आवड अन शिर्डीला दरवर्षी जाणाऱ्या साईंच्या पालख्यांचे मला कुतूहल होते. तेव्हा दादरमधून मुंबईतील एकमेव मोठी पालखी निघायची. ही माहिती मिळाल्यानंतर मी त्या पालखी यात्रेत सामील व्हायचे ठरवले. लालबाग आणि ग्रँटरोड भागातील जुने साईभक्त एकत्र येऊन मंडळाच्या माध्यमातून नेमाने दरवर्षी हा कार्यक्रम आखायचे. त्यांचे पालखीचे नियोजन शिस्तबद्ध आणि चांगले होते. प्रत्येक सहभागीची माहितीसह नोंद, निघण्याची तारीख, शिर्डीत  पोहोचण्याची तारीख, पहाटेपासून ते रात्री विश्रांती समयी पर्यंतचा दिनक्रम, रोड-हायवेवरून चालताना सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता, ठरलेली आरतीची वेळ, दुपार-रात्रीची मुक्काम स्थळे, आरोग्य व प्रथमोपचार सोयी, खानपानाची तसेच स्वछतागृहांची व्यवस्था, इत्यादी सर्व बाबतीत मंडळाचे आयोजक दक्ष होते. मी या पालखी यात्रेत सहभागी होऊन पूर्णतः शिर्डीपर्यंत चालायचा आगळा अनुभव घेतलाय.
                    या पालखीयात्रेने मला काय दिले, काय अनुभूती दिलीय, याविषयीच्या माझ्या भावना मी येथे व्यक्त करीत आहे
.
💐शिर्डी पदयात्रा………..
                    पुऱ्या देशभरातच नव्हे, तर परदेशात भक्तगण असलेल्या श्री साईनाथांची शिर्डी वर्षभर गर्दीने गजबजलेली असते. मी साईनाथांचा निस्सीम भक्त नाही, पण श्रद्धेने त्यांचे स्मरण करतो, श्रीसाईंना देवस्थानी मानतो. या अवलिया संताचे दोन शब्द मला आयुष्याच्या वाटचालीत सदैव उपयोगी ठरलेले आहेत, ते म्हणजे- ‘श्रद्धा आणि सबुरी’.
                   ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात साईंची पुण्यतिथी असते. साईंचा निधन दिनांक आहे--१५/१०/१९१८. शिर्डीमध्ये या कालावधीत, तसेच मार्च-एप्रिलमध्ये(राम नवमी) असंख्य पालख्या दाखल होतात.
                   मी ज्या पालखीयात्रेत सहभागी होतो, तो काळ आहे जवळपास तीस वर्षांपूर्वीचा ! आज खूप काही बदललेले आहे.  आज मुंबईतील असंख्य साई भक्त शिर्डीपर्यंत पदयात्रा काढतात. काहींची मंडळे आहेत, काहीजण ग्रुपने पालख्या नेतात. राज्या राज्यातुन अशा हजारो पालख्या शिर्डीत जातात.                        

                 मी त्यावेळच्या एकमेव मोठ्या पालखी मंडळात रीतसर नोंदणी करून सहभागी झालो. मंडळाने मला त्यांचे नियम व अटी समजावल्या. दैनंदिन कार्यक्रम-मुक्कामासह सारी माहिती दिली. जवळपास दोनशेहून अधिक साईभक्त या यात्रेत होते. त्यातले बहुतांश प्रौढ आणि वयोवृद्. साईंवर गाढ श्रध्दा असणारे त्यांचे निस्सिम भक्त. यांत, शिर्डीपर्यंत पायी जाईन म्हणून कोणी नवस बोललेले, तर कोणी दरवर्षीचे वारकरी. काहींनी शिर्डीमध्ये साईंचे दर्शन होईपर्यंत अनवाणी चालण्याचे ठरवलेय, तर काहीजण एकवेळचे आहार व्रती.
        मुंबईतील दादर टी.टी. येथे साई संस्थानचे कार्यालय आहे. तेथून प्रस्थान होणार होते.  पालखी यात्रेचा प्रारंभ राम नवमीच्या दहा दिवस आधी होणार होता.
                  त्याप्रमाणे एके दिवशीं दुपारच्या वेळी सारे सहभागी दादर टी.टी. एकत्र जमा झाले. साई नामाचा मोठा गाजर,  साई संस्थानच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या साई मंदिरात पूजा व आरती झाली.  भजने-गीते गाणारा उत्साही साईभक्त व या यात्रेत काही काळ सहभाग घेऊन शिर्डीत पोहोचल्याचा आनंद घेणारे कितीतरी भाविक येथे एकत्र आल्याने या परिसरात मोठी गर्दी झाली. सर्वांच्या शुभेच्छा घेवून आमचा यात्रीसमूह उत्साहात पुढे निघाला.
                 दादरला मुख्य रस्त्यावरून माटुंगा, सायन मार्गे चुनाभट्टी परीसरात पालखी आली. येथे कित्येक भाविक साई पालखीचे दर्शन घेण्यासाठी वाट पाहात होते. एक भाविकाने सर्वाचे स्वागत करून चहापानाची व्यवस्था केली.   यानंतर इथल्या भाविकांचा निरोप घेऊन, साईंचा जयजयकार करीत पालखी हळूहळू पुढे आग्रा हायवेवरून निघाली. आग्रा हायवेवरून विक्रोळी मार्गे ठाणे, पुढे भिवंडी असा आजचा प्रवास होता. हायवेवरून जाणाऱ्या, धावणाऱ्या वाहनांपासून खबरदारी घेत आम्ही विक्रोळीकडे जात असताना साईंची पालखी वाहणारे सहभागी काही वेळाने बदलत असत. चालता चालता संतांचे अभंग टाळ मृदुंगांच्या आवाजात गाताना मध्येच साईंचा जयजयकार व त्यांची भजने छान चालीवर तल्लीनतेने गात होते, प्रवासी आणि स्थानिक लोकांचे पालखी कडे लक्ष वेधले जात होते, काही भाविक दुरून पालखीला हात जोडत होते.
                 विक्रोळी पूर्व उपनगरात टागोर नगरमध्ये एक साई मंदिर आहे. सायंकाळी येथे पालखीचे आगमन झाले. पूर्ण परिसरात  पालखीच्या दर्शनासाठी ही गर्दी ! या ठिकाणी स्थानिक संयोजकांनी चांगला पाहुणचार केला. या पाहुणचारानंतर साईंच्या नावाचा गजर करीत पालखी ठाण्याकडे निघाली.
               ठाण्यात आग्रा हायवेवर एक मराठी कुटुंब राहाते. हे कुटुंब पुर्णतः साईभक्त. पहिल्या दिवशी रात्रीच्या मुक्कामापूर्वी दरवर्षी काही वेळ पालखी येथे थांबते. यजमानींकडून पालखी  दर्शन, पूजा, त्यानंतर सहभागीचे भोजन, हे कार्यक्रम होतात.
             आम्ही त्या रात्री दहाच्या सुमाराला येथे पोहोचलो. इथला सारा सोहोळा-सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पालखी पुढे निघाली.  ठाण्यापर्यंत खूप साईभक्त पालखीला सोबत करतात आणि मग सगळ्या सहभागीना शुभेच्छा देऊन घरोघरी परततात. त्यापुढे केवळ शिर्डीपर्यंत जाणारे आम्ही पालखी यात्री सहभागी राहातो.
               
              साईंची पालखी आता पहिल्या मुक्कामाच्या दिशेने चालू लागली. हा परिसर भिवंडीचा. दोन्ही बाजूला पाण्याची मोठी पाईपलाईन, बेफाम जा-ये करणारी वाहने. येथे सुरक्षेच्या दृष्टीने दोन दोनच्या जोडीने आमचा समूह पुढे मार्गक्रमण करीत राहीला. काही वेळाने भिवंडी मागे पडली. पुढे एक सुनसान गाव आले. रात्री बाराची वेळ असल्याने शांत असे वातावरण होते.
            तेथे  रस्त्यालगत एक मंदिर आहे. विहिरही आहे. संयोजक यात्रींनी इथला आजचा मुक्काम जाहीर केला. आम्ही सारे सहभागी जवळची सोयीची जागा पाहून विश्रांतीस सज्ज झालो.  दमल्यामुळे कधी झोप लागली ते कळलेही नाही.
             दुसरा दिवस उजाडला. इथल्या जवळच्या स्वच्छता गृहात प्रातर्विधी आटोपून आंघोळी झाल्या. विहिरीमुळे चांगली सोय झाली होती.  नंतर चहा नाश्ता झाला आणि साईंचा जयजयकार करीत नव्या उत्साहात साईंची पालखी सिन्नरच्या दिशेने निघाली. आजदेखील साईंची आणि संतांची भजने, अभंग म्हणणारे आणि ते ऐकणारे सगळे तल्लीन झाले होते.
            पालखी मार्गावर सकाळी ठीक आठच्या सुमाराला रस्त्यालगत असलेल्या सुरक्षित जागी पालखी पूजा व आरतीसाठी थांबली.  साग्रसंगीत पूजा-आरती झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो. हा रस्ता कसारा घाटातून पुढे घोटी व सिन्नरमार्गे जातो.
            दररोज मजल दरमजल करीत नियोजित ठिकाणी सकाळची पूजा-आरती, दुपारचे जेवण करणे, थोडी विश्रांती घेत पालखीसह चालणे,  सायंकाळची आरती आणि रात्रीचे जेवण, तसेच मुक्काम करणे,  अशा पद्धतीने संयोजक-कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथांच्या पालखीचा कार्यक्रम नऊ दिवस चालला.
              आमचा भव्य लवाजमा सांभाळणारे प्रमुख कार्यकर्ते जातीने सगळ्या सहभागी बांधवांची विचारपूस करायचे, त्यांची काळजी घ्यायचे. आमचे सामान एका मोठया टेम्पोत, तर दुसऱ्या स्वतंत्र गाडीमध्ये स्वयंपाकी आणि अन्न धान्य-खाद्य वस्तू होत्या.  शिवाय प्रथमोपचाराचे साहित्य तयार असायचे. संयोजक मंडळी याकरीता खूप मेहेनत घेत होती.
       आता जणू आमचा एक मोठा मित्रपरिवार झाला होता. या मित्रयात्रेत मी नवखा होतो, तरी जुन्यांनी मला सामावून घेतले. एकमेकांचे चांगले परिचय झाले  व जिव्हाळा वाढला. कोणी कायम मागे राहणारा वयोवृद्ध, तर एखादा बडबड्या  पण प्रेमळ स्वभावाचा तरुण यात्री, अशी सगळी मंडळी खेळीमेळीत वावरत होती.
               माझ्यासाठी नवलाची गोष्ट म्हणजे आमच्या परिवारात एक नख वाढविलेला विक्रम वीर होता ! ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये याचे ‘जास्त बोटांची मोठी नखे असणारी व्यक्ती’ म्हणून नाव नोंदविले होते म्हणे ! आणखी एक राज्यातील प्रसिद्द बॉडीबिल्डर होता. मात्र हे दोन्ही सेलिब्रिटी सर्वाशी मिळून मिसळून वागत होते.
              नऊ दिवस मुंबई-ठाणे-भिवंडी-कसारा घाट-इगतपुरी-नाशिक-सिन्नर-पोहेगाव मार्गे तल्लीनतेने चाललेली साईंची पालखी ठीक नवव्या दिवशी शिर्डीमध्ये दाखल झाली. या दिवशी दुपारी शिर्डीच्या वेशीवर स्मरणीय असा सोहोळा झाला. गाववेशीवर लेझीम पथकासह, ढोल ताशांच्या गजरात पालखीचे स्वागत करायला स्थानिक मान्यवर आले होते ! इथे साईची भजने दणक्यात सुरु झाली. गावच्या भगिनी पाण्याने भरलेले हंडे-कळशी घेऊन पालखी पाशी आल्या. प्रवरा नदीच्या पवित्र जलाने प्रत्येक सहभागीच्या पावलांना मुक्तपणे जलस्पर्श झाला ! प्रत्येकाला टिळा लावून ओवाळण्यात आले. हा क्षण साऱ्यांना गहिवरून टाकणारा होता. आपण काय एवढे पुण्यकर्म केलेय, म्हणून या आया बहिणी आपल्याला ओवाळतात ? आपले पाय धुतात ? असा प्रश्न निदान मला तरी पडला. मात्र, त्यांना आमच्यातील  माणसं दिसत नव्हती, तर आमच्यातील साईप्रेम दिसत असावे.
                या सोहोळ्यानंतर पालखीसह सगळा लवाजमा श्री साई मंदिर परिसरात उत्साहात दाखल झाला. पालखी मोठया मैदानात विसावली. नंतर सर्व सहभागी बांधवांची निवास व्यवस्था संस्थानच्या वतीने एका भक्त निवासात करण्यात आली. उद्या रामनवमी उत्सव, त्यामुळे  शिर्डीत गर्दीच गर्दी दिसत होती. आम्ही आज शांतपणेभक्त निवासात विश्रांती घेतली.
               रामनवमीला पहाटेपासूनच सभा मंडप साईभक्तांनी भरलेला ! स्पीकर्स वरून अखंड नामस्मरण सुरू होते.  शिर्डीतली गर्दी क्षणाक्षणाला वाढत गेली.  आज दुपारी बरोबर बारा वाजता श्रीरामांचा जन्म सोहोळा सुरू झाला. श्रीरामांचे स्तोत्र आणि साई भजनांच्या आवाजाने सगळा  परिसर दुमदुमू लागला. दुपारी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
             श्रीरामनवमीचा उत्सव सायंकाळनंतरही सुरू होता. रात्री नऊनंतर श्रीरामांची आणि साईंची  पालखी निघाली. सगळ्या परिसरात ती फिरली. वातावरणात पुन्हा चैतन्य आले. साईनाथांचा सारखा उद्घोष होत राहिला. या वातावरणात वार्षिक श्रीरामनवमी उत्सव संपन्न झाला, आणि  आमची पालखीयात्रा देखील पूर्ण झाली.
            साईंच्या या पालखी यात्रेतून मला काय मिळाले बरं ?
           तर प्रांजळपणे सांगतो, की निव्वळ पायी भटकंती करावी, आपल्या क्षमतेचा अंदाज घ्यावा आणि भवतालचे साईभक्तीने भारलेले वातावरण स्वतः अनुभवावे, हे हेतू मनी होते आणि ते पूर्णतः साध्य झाले.
            मात्र,  या देशभरात प्रसिद्द असलेल्या पवित्र क्षेत्री वर्षभर गर्दीच गर्दी असल्याने,  आपल्या  इच्छेप्रमाणे या परिसरात मन:शांती मिळत नाही. हे स्पष्टपणे मला जाणवले. मुळात लोकांपासुन, तसेच वैभव आणि भोगापासून दूर संन्यस्त वृत्तीने राहणाऱ्या श्रीसाईंनाथांचा अंतरात्मा आज काय म्हणत असेल ? पहाटे पासून सुरू राहाणारी हौशी पर्यटक व भाविकांची वर्दळ,  अखंडितपणे  चालणारे उद्घोष व भजने, सततचे अभिषेक-पूजा,  या गदारोळात श्रीसाईंचा अंतरात्मा समाधान पावत असेल ? मला नाही तसे वाटत.  दर आठवड्याला सुट्टीत येथे येणारे ग्रुप्स व त्यांचे हौशी पर्यटन, पवित्र अशा समाधीस्थळी आणि  मुख्य सभामंडपात होणारा गलबला साईंच्या आत्म्याला क्लेश देत नसेल का ?
           इथल्या प्रचंड अशा उत्सवी गर्दीमुळे चांगले श्रद्धाळू भाविक जसे जास्त संख्येने येतात, राहतात, तसेच या क्षेत्री अपप्रवृत्ती सुद्दा सक्रिय झाल्या आहेत. पिणे-खाणे आणि मजा मारणे याकरीता कित्येकजण येथे येत जात असतात. भक्त निवास तसेच हॉटेल परिसरात निवासी यात्रेकरूंवर बारीक लक्ष ठेऊन त्यांच्या चीजवस्तू पळविण्याचे प्रकार घडलेले आहेत. आमच्या पालखी यात्रेच्या वेळी सी सी कॅमेरे नव्हते.साधी सुरक्षा सेवा होती.  आता चोख बंदोबस्त असतो,  तरी भुरट्या चोऱ्या येथे अजूनही होतात.
           अंतिमतः,  या   पालखी यात्रेबद्दल सांगायचे, तर आता खूप पदयात्रा मंडळे झालीत. कुठून कुठून साई पालख्या शिर्डीत येतात. त्यावेळचे आणि आजचे वातावरण यात सर्व बाबतींत  कमालीचा फरक झालाय. भक्ती भावना त्यावेळी होती  आणि आजही आहे, पण त्यात प्रदर्शन जास्त आहे असे माझे मत आहे.
           शिर्डीत एक मात्र चांगली गोष्ट झालीय, ती म्हणजे या क्षेत्री प्रामाणिकपणे स्वतःहून काही काळ सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी संस्थानने एक योजना सुरू केलीय. नोकरवर्गाच्या सहाय्याला हे सेवक विना मोबदला काम करतात,  सगळीकडे लक्ष ठेवतात. या सेवेसाठी त्यांना पूर्व नोंदणी करावी लागते.
             माझ्या या पालखी यात्रेनंतर कितीतरी वेळा शिर्डीत जाणे झालेय  आणि यापुढेही होईल.  पण ‘ती’ पदयात्रा मला खुप स्मरणीय अनुभव देऊन गेलीय, त्याबद्दल मी श्रीसाईंचा ऋणी आहे.
           
                                                       ::::::::::::::::::::::::::::::