Wednesday, 1 August 2018

💐लक्ष वेधी💐

💐लक्ष वेधी💐
              आरोग्याची  काळजी  कशी घ्यावी, आपला रोजचा आहार  कसा असावा, आणि रोग-व्याधी,  आजारापासून  आपण कोणती  खबरदारी कशी घ्यावी, याचे साध्या सोप्या शब्दांत
'  लोकसत्ता'   मध्ये  विवेचनात्मक लेखन करणारे व  महाराष्ट्रात सुपरिचित असलेले वैद्य  खडीवाले, यांचा मीसुद्धा एक वाचक  होतो.
                आज  हे वैदय खडीवाले  हयात नाहीत. गेल्या डिसेंबर  महिन्यात पुणे येथील कर्मभूमीत त्यांचे दुःखद निधन झाले. '  दैनिक लोकसत्ता ' या जाणत्या वृत्तपत्रात त्यांचे प्रसिद्द झालेले लेख माझ्यासारख्या   कित्येकांना उपयोगी ठरलेत. त्यांनी लिहिलेली  आहार, आरोग्य व आयुर्वेदिक औषधाविषयीची पुस्तके  माहिती पूर्ण  तसेच उपयुक्त आहेत.
                 या थोर व्यक्तीचे स्मरण म्हणून  हा लेख  येथे  लिहिला आहे..........

💐कडक शिस्तीचे डॉक्टर वैदय खडीवाले...............💐
                    या वैदय खडीवालेंकडून  मी उपचार करून घेत होतो त्यावेळची गोष्ट. त्यांचे सगळे पेशंट्स त्यांना वैदय नव्हे तर डॉक्टर म्हणत असत. म्हणून मी याठिकाणी त्यांचा डॉक्टर म्हणून उल्लेख करतोय.
                    मला प्रोस्टेट ग्रंथींचा त्रास सुरू झालेला होता. त्यामुळे मूत्रमार्गात अडथळे वाढत होते. पूर्वी एक शस्त्रक्रिया जे.जे.हॉस्पिटलमध्ये झाली  होती. आता पुन्हा शस्त्रक्रिया करायचा प्रसंग माझे ताण वाढविणारा होता. मी ठरविले की आपण खडीवालेंशी  संपर्क साधायचा आणि उपचार करून घ्यायचे.
                पुण्यात डॉक्टरांचा मोठा दवाखाना  असल्याची माहिती मिळाली. पुण्यातील एका मित्राने दवाखान्याचा पत्ता व फोन नंबर मिळवून दिला. तेथे प्रत्यक्ष जाण्यापूर्वी फोन केला, तर  फोनवर डॉक्टर स्वतः भेटले. म्हणाले,'  मी रविवारी सोमवारी  मुंबईत असतो . दादरला माधववाडीत माझा दवाखाना आहे, तिथे या तुम्ही.'.
               दादर पूर्वेकडील स्टेशनच्या जवळच माधववाडीची मोठी निवासी वसाहत आहे. तीच्या आतील बाजूस गल्लीमध्ये कोपऱ्यात एक छोटेखानी  दवाखाना आहे. साऱ्या मुंबईमध्ये तो प्रसिद्द होता. इथे लांबूनलांबून  गरजू पेशंट्स येत होते.  गरीब,श्रीमंत,साक्षर-निरक्षर असे सारे पेशंट्स तीथे यायचे. हिंदीतला प्रसिद्द नट प्रेम चोप्रा देखील इथे यायचा.  याशिवाय काही  डॉक्टरही तिथे उपचाराला आलेले मी पाहिलेत.

                खडीवालेंच्या दवाखान्यात दीडदोन तास तरी सहज जायचे. दवाखान्याबाहेर आणि आतमध्ये सुद्धा रांग असायची. सगळे शिस्तीत  रांग लावायचे. पेशंटचा नंबर आल्यावर डॉक्टरकडे आपली सध्यस्थिती  सांगून जवळ असलेली अगोदरची  कागदपत्रे आणि औषधे दाखवायची पद्धत होती.  डॉक्टर क्षणभर त्याचे निरीक्षण करीत आणि  ती कागदपत्रे,औषधे बाजूस ठेवायला सांगून पेशंटला औषधोपचार सुरू करीत. आयुर्वेदिक गोळ्या, पावडर, आणि रसकाढा बाटली, ही त्यांची औषधे होती. ती देताना डॉक्टरांची सक्त सूचना- सांगितलेली सारी पथ्ये नीटपणे पाळायला हवीत. आणि नंतर सांगितलेल्या दिवशी तब्येतीच्या तपासणीस येथे यायला हवे.
                  आयुर्वेदिक उपचारामध्ये  पथ्यपाण्याला जास्त महत्व असते . ही  उपचारपद्धती  शाकाहारी  रूग्णाला प्रभावी  उपचार देते, आणि लवकर बरीही करते. व्यवस्थित उपचारानंतर रोग-व्याधी कायमची निघून जाते हे  सत्य आहे, याची खात्री इथे अनुभवाने येणारे पेशंट्स देत असत.
                  खडीवाले डॉक्टरांचा दवाखाना साधा होता. पण तेथे सतत गर्दी असायची. दवाखान्याची वेळ सगळेच पाळायचे. यामुळे  तेथे गोंधळ-गडबड कधीच दिसली नाही.
मी उपचारासाठी जाऊ लागलो. पहिल्यावेळी त्यांना पाहिले.  डॉक्टर वयोवृद्द होते. त्यांची साधी  कृश, पण काटक अशी मूर्ती फारशी गडबड न करता  कोणाचीही मदत न घेता  काम करायची पद्धत.
                   पांढरा शुभ्र लेंगा आणि सदरा घातलेल्या डॉक्टरांचा  स्वभाव काहीसा रागीट होता. मात्र ते मिश्किलदेखील होते. याची झलक मला वेळोवेळी बघायला  मिळाली. तेथे असे काही पेशंट्स यायचे की, जे डॉक्टरांकडुन औषधे न्यायचे, पण ती औषधे घेताना हयगय करायचे.  आणि वर पुढच्या वेळी आल्यावर डॉक्टरांकडे  तक्रार करायचे !  '  डॉक्टर, अहो औषध लागू पडत नाही हो. तब्येत आहे तशीच आहे. ....'  अशा वेळी उलट तपासणी झाल्यावर लक्षात यायचे की, हा पेशंट काही  सांगितल्याप्रमाणे  औषध घेत नाही.  सूचनाही पाळत नाही.
                अशा पेशंट्सची कुठलीही भीडभाड न करता डॉक्टर त्याला तासायचे ! मग तो पेशंट बाईमाणुस असो की आणखी कोणी. काही जण तर त्यांच्या दटावण्यामुळे रडवेले झालेले मी पाहिलेत ! डॉक्टर स्पष्टच म्हणायचे ' , येता  कशाला माझ्याकडे ? मी नाही  तुमच्यासाठी बसलोय इथं. मला तुमचे पैसे पण नकोत. मी सांगतो ते तुम्ही का ऐकत नाही सांगा ना  ?  माझ्या सूचना पाळायला जमत नसेल ना तुम्हाला, तर मग इथून पुढे नका दवाखान्यात. चालायला लागा. ही चांगली औषधं मी या दुसऱ्या पेशंटना द्यायला बसलोय. हे तरी बरे होतील .हे ऐकतात माझं आणि वागतात तसे. निघा तुम्ही. पुन्हा येऊ नका......;'
                दरवेळी कोणी ना कोणी  डॉक्टरांचे  फटके खाई. ते पाहताना वाईट वाटे. त्या पेशंटचा दीनवाणा चेहरा पाहवत नसे. डॉक्टर मात्र पाझरत नव्हते.
              डॉक्टरांचे सगळ्यांना सांगणे असायचे, '  मीठ खाऊ नका, भात खाऊ नका, चहा सोडून द्या, ऐदी राहू नका. व्यायाम- हालचाल सुरू ठेवा. आपल्या शरीराची झीज काम करून झाली पाहिजे. मेद वाढायला नको. मांसाहार नका करू . ते माणसाचं अन्न नव्हे. शाकाहारच करा. चांगले ठणठणीत राहाल. चांगले जगाल. जास्त जगाल....'
             खडीवालेंच्या दवाखान्यात येणाऱ्या काही पेशंटना मिळालेले खरमरीत 'डोस' सांगायला हवेत, कारण तेथे येणाऱ्या माझ्यासारख्या इतरांना त्यापासून बरीच शिकवण मिळे.
              एकदा  माझ्या पुढच्या रांगेत दोन  महिला उभ्या होत्या. सुशिक्षित होत्या. त्यातली एक सासू होती तर दुसरी सून. सासूबाईंना उपचारासाठी  सुनेने आणले होते.

                     त्यांचा नंबर आल्यावर सुनेने सासूबाईंच्या दुखण्या-खुपण्या विषयी डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी सासुबाईंची चांगलीच खरडपट्टी काढली. ते म्हणाले, ' हिला माझी  औषधं  काय करायचीत ? ही अशीच बरी होईल. घरात हिला कामाला लाव चांगली. भांडी घासायला लाव. वजन कमी होईल हिचे. घरातली लादी पण साफ करून घे हिच्याकडून. .......' हे ऐकणारे आम्ही सारे  खोखो हसत होतो !( दबक्या आवाजात) . ओशाळवाण्या चेहेऱ्याने सासूबाई म्हणाल्या, '  मी करते हो घरातली  कामं..' सून पण म्हणाली, '  ह्या घरात बसून नाही राहात, कामं करतात त्या...' त्यावर डॉक्टर ताडकन म्हणाले, '  कशावरून खरे बोलतेस तू ? तीची बाजू नको घेऊस. मग ही जाड  कशी झाली ?   त्यावर सासू-सुनेचा आवाज बंद झाला !  नंतर डॉक्टरांनी त्यांना औषधं दिली आणि म्हणाले, '  ही औषधं मी सांगितल्याप्रमाणे घे. पुड्यांवर काय लिहिलंय ते वाच. आणि उद्यापासून चांगली कामाला लाग. शेजार-पाजारी जाऊन कामं कर. त्यांचे कपडेलत्ते  धुतलेस तर बारीक होशील तू. वजन कमी झालेले दिसले पाहिजे मला पुढच्या वेळी येशील तेव्हा, काय ? '
                      डॉक्टरांची अजून एक आठवण सांगतो, एकदा एक मध्यम वयाची  सुशिक्षित बाई दवाखान्याच्या दारात बाहेरील बाजूला एक कोपऱ्यात बराच वेळ उभी राहिली होती. मुसमुसत रडताना तिला पाहिली.  मात्र डॉक्टर ढिम्म तिच्याकडे बघत नव्हते ! या साऱ्यांचे आम्हाला कोडे पडले.
                    माझा नंबर जवळ आलेला होता.इतक्यात ती बाई डॉक्टरांजवळ आली व अगदी कळकळीने म्हणाली-'  डॉक्टर, आता मी सगळी औषधं  व्यवस्थित घेईन. सगळे पथ्य नीट पाळेंन. पण  डॉक्टर, मला औषधं ध्या, प्लिज,....'
                   तीचा तो स्वर ऐकल्यावर वाईट वाटले. मात्र डॉक्टर तिच्याकडे रागावूनच पाहात होते. त्यांनी विचारले, '  अगं, तू अजून इथेच थांबलीस ?  सांगितलं ना तुला परत येऊ नकोस म्हणून ? ....' त्यावर त्या बाईने चक्क हात जोडत डॉक्टरांची क्षमा मागीतली ! पुन्हा तिने विनवणी केली.  डॉक्टर काही बोलले नाहीत.  गप्प राहून जवळच्या पेशंटला  औषधं देत राहिले. ती बाई पण हलेना.
                    मग एकाएकी डॉक्टर तिला म्हणाले- '  जा ,जा, रांगेत जा. उभी राहा तिथं, शेवटचा पेशंट झाल्यावर मी तुला औषध देईन. ...' या एकाच वाक्याने बाईला(आणि आम्हालाही)  धीर मिळाला !  ती आनंदाने मागे जाऊन रांगेत उभी राह्यली.
                या दवाखान्यात एका ठिकाणी डॉक्टरांनी लिहिलेली पुस्तके विक्रीसाठी ठेवलेली होती. अगदी माफक किमतीतली ही पुस्तके काही पेशंट्स विकत घ्यायचे. पुण्यात डॉक्टरांचा औषध संशोधनाचा  व उत्पादनाचा कारखाना होता. गरीब-गरजू कामगार, महिलांना  त्यांनी या उपक्रमातून रोजगार दिला होता.
                या थोर धन्वंतरीकडे मी तीनचार महिने उपचार घेत होतो. पण त्यांनी सांगितलेल्या महत्वाच्या सूचना मला नीटपणे पाळता आल्या नाहीत.  सवयीचा चहा काही बंद होईना. मांसाहार  सोडवेना. तातडीचे उपचार म्हणू सुरू केलेली एलोपॅथीची औषधेपण बंद  करू शकत नव्हतो. काय करायचे ?  परिस्थिती बिकट झाली, तसा मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आणि सरळ शस्त्रक्रिया करून घेतली.
           
                  त्यावेळी, जरी मी या खडीवाले डॉक्टरांकडुन उपचार करून घेणे बंद केले असले तरी, माझ्या आरोग्यदायी जीवनासाठी त्यांनी मला( आणि इतरांनाही) उपचाराच्यावेळी दिलेल्या बहुमोल सूचना मी जमेल तशा पाळीत आलोय. डॉक्टरांची मी घेतलेली पुस्तकेदेखील नेहेमी उपयोगी ठरत आहेत मला.
                अशा या जाणकार वैदय खडीवाले डॉक्टरांचा मी सदैव ऋणी आहे.
             
                 त्यांना माझी मनापासून श्रद्धांजली.......

                                      ...........................................
                           

💐परिसर💐

💐परिसर💐
            भटकंतीच्या निमित्ताने प्रवास करायची संधी खूपवेळा मिळाली. सह्याद्री आणि हिमालयीन पदभ्रमणातील देशभरात प्रसिद्द असलेल्या युथ असोशिएशन ऑफ इंडिया या दिल्लीत मुख्यालय असलेल्या(YHAI ) संस्थेने  आयोजित केलेल्या काही हिमालयीन पदभ्रमण मोहिमेत कॅम्प लीडर म्हणून काम करताना राजधानी दिल्लीचा परिसर पाहायला मिळाला. त्या राजधानीतील  ही  छोटीशी सफर.....

💐रम्य आणि अगम्य राजधानी दिल्ली...........💐

                     रात्री अकराच्या सुमारास हरद्वारला  आम्ही जी बस पकडली ती निघाली होती दिल्लीला. सारे झोपेच्या मूडमध्ये होतो. सामान टपावर चढवले अन सगळ्यांनी आत जागा पटकावल्या. मग एकदाची बस सुटली.
                  मला व नऱ्याला बसायला जागा नव्हती. उभे राहावे लागले. बाकीचे एव्हाना झोपेच्या अधीन झाले होते. बस वेगाने चालली होती. ती मध्येच कोठे थांबली की यांना जाग येई. मग विचारीत,'  काय आले ?'
             आम्हा दोघांना झोपायचे होते. मग एक शक्कल काढली. बसच्या खिडक्यांना जाडजूड पडदे लावलेले. त्यातला मोठा पडदा अंथरला खाली, त्यावर दोघे पहुडलो. कानाजवळ बसच्या इंजिनाची सुरावट ऐकत झोप घेतली.
             पहाटे पाचचा सुमार असावा. आमच्या बसने दिल्लीच्या भव्य अशा आंतरराज्य बसस्थानकात प्रवेश केला. मग भराभर  सामान उतरणे सुरू झाले, आणि कुजबुज ऐकू आली,'  बॅग हरवली,  बॅग हरवली.......'  एका व्हीआयपी बॅगेत आमच्या संस्थेची महत्वाची कागदपत्रे, काही रक्कम, राजनच्या काही वस्तू , हे  सगळे ज्या बॅगेत होते ती बॅगच गहाळ झाली होती !
           साऱ्यांचा मूड गेला. बस अजून तेथेच  उभी होती. बसचे काना कोपरे सगळयांनी  धुंडाळले, पण काही  उपयोग झाला नाही. आम्ही एकमेकांना दोष देऊ लागलो.
            राजधानी दिल्लीच्या आमचे स्वागत असे केले !  अशा या ऐतेहासिक राजधानीत आमचा दोन दिवस मुक्काम होता.
           या दिल्लीचे दोन भाग आहेत. दिल्ली-मुख्य शहर, आणि नवी दिल्ली हे नियोजनातून  वसलेले शहर. आपल्या महाराष्ट्रातील बहुतेकजण इथे आल्यानंतर महाराष्ट्र सदन अथवा महाराष्ट्र भवन राहण्यासाठी पसंत करतात. मात्र राजकारणी/सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या संपर्कातील लोक महाराष्ट्र भवनात गर्दी करतात ! तर इतरांना मात्र महाराष्ट्र सदन जवळचे वाटते.ते आहे नवी दिल्ली स्थानकापासून जवळच असलेल्या  पहाडगंज परिसरात.
                आम्हाला वरील दोन्ही  ठिकाणी  राहाता आले नाही म्हणून आम्ही दिल्लीतल्या प्रसिद्द चांदणीचौकातील रायबहादूर धर्मशाळेत राहायला गेलो. ही धर्मशाळा निःशुल्क आहे.  मात्र नेहेमीच्या फिरत्या व्यापाऱ्यांनी व्यवस्थापकांशी सलगी करून येथे खोल्या अडवलेल्या  असतात. चहापाणी देऊ केले तर व्यवस्थापकाकडून आपली चटकन सोय करण्यात  येते.
                रायबहादूर धर्मशाळेत लाईटचे भाडे वेगळे.संडासचे वेगळे. भल्या पहाटे संडासला जाताना हातात पैसे ठेऊन जायचे, नाहीतर तेथे प्रवेश नाही !  धर्मशाळेच्या आवारात एक इस्त्रीवाला आहे. आपण त्याच्याकडे कपडे  इस्त्रीला टाकले आणि परत आणायला गेलो की तो तीथे नसतोच ! जवळ चौकशी  केली तर ' काही माहिती  नाही' असे उत्तर मिळते.  आपल्या प्रवास वेळेमुळे जास्त वेळ थांबताही  येत नाही. एकतर कोठे फिरायला जायचे असते ,नाहीतर  धर्मशाळा सोडायची घाई असते. तरी इस्त्रीवल्याचा पत्ता नसतो !  ज्यांना धर्मशाळा सोडायचीअसे, ते आपले कपडे तेथेच सोडून निघून जात. आमचे पण तेचहोणार होते, मात्र आम्ही त्याचा शोध घेऊन आमचे कपडे परत मिळवले.
                दिल्लीमध्ये हॉटेलपेक्षा धाब्यात लोक जास्त जातात. गंमत म्हणजे  तिथे ऑर्डर दिल्यावर बऱ्याच वेळाने खाणे मिळते. पण लोकं ते सहन करतात!  अर्थात धाब्यामधले  खाणे गरमागरम आणि मसालेदार व चविष्ट  असते. मात्र मला दिल्लीतली लस्सी  आवडायची. मोठ्या स्टीलच्या ग्लासमधील सुगंधी लस्सी पिताना लज्जत येते.
                 दिल्लीतला  चांदणी चौक म्हणजे मुंबईतील  जणू भेंडीबाजार ! हा वर्दळीचा भाग आहे. छोटीमोठी दुकाने , मार्केट, काही ऑफिसेस, हॉटेल धाबे यांच्या जोडीला शीखपंथीयांचा गुरुद्वारा, यांनी हा चांदणी चौक-फतेहपुर परिसर वेढलेला आहे. शुक्रवारी नमाजसाठी मशिदी जवळील मुख्य रस्ता  बंद होतो, तर शीख बांधवांच्या गुरुद्वाराजवळील  प्रशस्त फुटपाथवरून वाटसरू ना जाऊ देत नाहीत !
               या राजधानीच्या शहरात बेकारांचा भरणा भरपूर आहे. शहरात सायकल रिक्षा बऱ्याच फिरताना दिसतात. मात्र तरुणांपेक्षा  वयस्कर रिक्षावालेच सायकल रिक्षा चालवताना जास्त दिसतात. ते धंदा चिकाटीने करतात. प्रवाशांची पाठ सोडीत नाहीत!
               दिल्लीतली सर्वसामान्य  हॉटेलसुद्धा मजेशीर आहेत. एका हॉटेलमध्ये बसलो होतो. तिथला वेटर मरगळल्यासारखे  काम करीत होता. आम्ही मुंबईकडचे आहोत कळल्यावर  त्याला थोडा उत्साह आला त्याच्यात!  '  बंबईमे  मेरेलीये कुछ नौकरी मिलाकर दिजीए साहेब। ', असं अजीजीने म्हणायला लागला. ह्याला नोकरीला ठेवण्याइतके आपण कोणी मोठे नाही. पण मनात विचार आला,की आमच्या मुंबईतल्या वेटर्स इतके चपळाईने आणि अदबीने हे काम करतील !
                 दिल्लीतील प्रसिद्द लाल किल्ला चांदणी चौकापासून  फारसा लांब नाही. येथे लष्कराचे अधिपथ्य आहे. लालकिल्ल्याच्या आतमध्ये खासगी दुकाने विखुरलेली आहेत. किल्ला लालतांबूस दगड मातीने बांधलेला खराखुरा ' लाल' किल्ला आहे. तो पक्का मजबूत असून विस्तीर्ण आहे. दरवर्षी या किल्ल्यावर स्वातंत्रदिनाचा सोहोळा साजरा होतो. येथले विशेष आकर्षण म्हणजे  '  दिवाण-ए-आम ' व '  दिवाण-ए-खास ' . हे दोन सुंदर महाल आहेत. बारीक पण रेखीव कोरीव काम , किमती  प्रस्तरांची सिहासने, भव्य अशा  छतांची  नयनरम्य कलाकुसर, हे सारे पाहाण्याजोगे  आहे.
                 रोज संध्याकाळी इथे  एक विशेष दृक्षाव्य कार्यक्रम  पर्यटकांना दाखविण्यात येतो. लोकांची गर्दी होते. वाद्यांच्या ध्वनी-्प्रकाशाचा  मेळ साधणारा हा रमणीय कार्यक्रम आपल्याला इतिहासात नेऊन सोडतो. हा कार्यक्रम खरोखर छान आहे.
                 जुनी दिल्ली व नवी दिल्लीअसें दोन भाग असलेल्या राजधानीच्या या जुन्या शहराला आपण '  दिल्ली '   म्हणतो.  नवी दिल्ली विस्तीर्ण आणि स्वछ आहे. येथे आपली लोकसभा इमारत, राष्ट्रपती भवन, सचिवालय, देशोदेशींच्या वकीलाती, अशा महत्वाच्या वस्तू आहेत. केंद्रीय मंत्री, खासदार, व्हीआयपीज , देखील नवी दिल्लीत राहातात. स्वर्गीय लालबहादूर शास्त्री, पंडित नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी,राजीव गांधी इ. प्रसिद्द नेत्यांची समाधीस्थळे सुद्धा नवी दिल्लीतील विस्तीर्ण जागेत वसली आहेत.
              स्व.इंदिरा गांधींचे '  तीन मूर्ती सदन'  आता राष्ट्रीय स्मारक झालेय. त्यांना मारेकऱ्यांनी  गोळ्या झाडल्या होत्या त्यावेळचे रक्ताचे डाग अजूनही पाहायला मिळतात. ध्वनिमुद्रित आवाजही वातावरण गंभीर करते.  त्यांचे स्मारक म्हणून प्रसिद्द असलेले '  शक्तीस्थळ 'पाहायला लांबून पर्यटक येतात. देशोदेशीचे दुर्मिळ प्रस्तर येथे विविध अंगांनी मांडून ठेवलेत.
             दिल्ली शहराचा फेरफटका आपल्याला खासगी व सरकारी पर्यटन संस्थमार्फत करता येतो. मात्र ही धावती भेट असते. सर्वच ठिकाणे  आपण नीटपणे पाहू शकत नाही. आम्ही एका खासगी पर्यटन बसने दिल्ली पाहिली. या घाईघाईच्या ट्रिपने आम्हाला कुतुब मिनार, बिर्ला मंदिर, इंडिया गेट, एक प्राणी संग्रहालय, इत्यादी पाहायला मिळाले. सुप्रीम कोर्ट, संसद भवन, परराष्ट्रांच्या वकीलाती, हे मात्र बसमधूनच (दूरदर्शन) पाहावे लागले. यात पाकिस्तानी वकीलात उठून दिसते.
             नवी दिल्लीतील इंडिया गेट भव्य व प्रशस्त आहे. तेथल्या भव्य स्तंभावर युद्धात हौतात्म्य  पत्करलेल्या भारतीय जवानांची नावे कोरलेली आहेत. वीर जवानांना मानवंदना देणारी '  ज्योत '  अखंडपणे तेवत असते.
             बिर्ला मंदिर पाहताना आमच्यातील एकाच्या चपला गेल्या !  भल्या मोठ्या छपलांच्या ढिगाऱ्यात ठेवल्या होत्या. बरेच धुंडाळले. पण चपला काही  मिळाल्या नाहीत. शेवटी त्याला अनवाणी च बसमध्ये परतावे लागले.
             तर अशी ही ऐतेहासिक, भव्य अन दिव्य अशी दिल्ली.पाहिली खरी. पण फारशी आवडली नाही. भावली नाही. दिल्लीकरांना बाहेरच्यांविषयी आस्था नाही . रस्त्यात किंवा एखादया वसाहतीत आपण साधा पत्ता जरी विचारला तरी दिल्लीकर नकाराची मान फिरवून बेफिकीरीने पुढे निघून जातो ! या दिल्लीकराना  पाहुण्यांत स्वारस्य वाटत नाही. इथल्या हॉटेलातील वेटर्स  आणि मुंबईतले उडपी किंवा इतर कुठल्याही हॉटेलचे वेटर्स, यांच्यात जमीन अस्मानाचे अंतर जाणवते. अर्थात, जुन्या दिल्लीचा बकालपणा व नव्या दिल्लीचे रेखीवपण हे नेहेमीच लक्षात राहील, असे आहे.
                  मात्र, या भारताच्या रम्य पण अगम्य राजधानीमध्ये अधिक काळ राहिलो तर तीचे अंतरंग मला  आणखी कळू शकेल.
                                                                          प्रतिक्रियेसाठी-yescharudatta@gmail.com
                                                                                                7588727522.
                                      ..............................................
                                      ....................................

💐कथाघर💐

💐कथाघर💐
                 आपले  जवळचे  आप्त म्हणजे आपली रक्ताची माणसं. सुखदुःखाच्या क्षणी हीच माणसं  आपल्याला हवी असतात. ही तर आपल्या जिव्हाळ्याचे क्षण अन क्षण  चिरंतन करीत असतात.  परिवारात असलेला मधुर जिव्हाळा सुख द्विगणित करीत असतो, तर दुःखद प्रसंगी  आपल्याला एकटे  न पाडता आपल्याला सावरत असतो.
                  मात्र   आपल्याला सावरता सावरता परिवारातलं एखादं  माणूस तुटक वागू लागलं तर ?  ..... हाच विषय मांडून अस्वस्थ करणारी  ही कथा आपण  जरूर  वाचायला हवी...
     
💐आपुलकीचं  कोडं.......

              संध्याकाळ चा शीतल समय. सुधा, छोटा सांदीपन आणि मी, शांतपणे जवळच्या निसर्ग उद्यानात विहार करतोय. इथली परिचित मंडळी विचारतात, '  काय हो सांंदीपनकुमार ? कुठे आहेत तुमच्या आज्जीबाई ? '. त्यावर छोटा सांदीपन फक्त खुदकन हसतो ! विचारणारेही गमतीने हसून पुढे चालू लागतात...
खरंच, मलाही वाटू लागते, आई आपल्याबरोबर न येण्याचे कारण काय बरे ?  मग मी स्वतःशीच हसतो अन आपल्याच नादात दोनचार पावलं  गतीनं चालू लागतो. सुधा हाकारते- '  अहो, चालली का तुमची गाडी पुढे पुढे ? '  मी पुन्हा संथपणे चालू लागतो !
              असं आहे माझं !  विचारात चालणारी माणसं रेंगाळत चालतात. आपण मात्र गतीने पुढे चालतच  राहातो. सुधा विचारते-'  ' अहो, बोला काही तरी....गप्प गप्प का तुम्ही ?  धड घरी नाही बोलत. नाही इथे.....'   मी स्तब्धच ! त्यावर सुधा पुन्हा छेडते. मग, '  ऑ ?  कुठे ?  काय ? .....काही नाही गं....' असे काही बोलून मी चालणे संथ करतो.
              '  पण मी म्हणते, तुम्ही चार दोन दिवस आईंना घेऊन जा की कुठे यात्रा-जत्रेला, काय ?  त्यावर मी पुन्हा गप्प ! '  हे बघा, तुम्हाला हवं असेल तर आपण सारेजण जाऊ या ?
              '  ऑ  ? हो, हो  जाऊया की, '
               पण हे मी मनापासून नाही म्हणत, कारण माझे मन यावेळी असते भूतकाळात ! .....

                      '  अरे रमण,  कोण नाही बरे आपल्या दोघांचे, सगळे  अप्पलपोटे लोक आहेत. तू तेव्हढा नोकरीला लाग बाबा, आणि मला दाखव चांगले दिवस. '   आईचे हे नेहेमीचे शब्द खूप वेदना द्यायचे त्यावेळी.
                दहा बाय बाराच्या खोलीत मी, माझी पत्नी सुधा, धाकटा भाऊ रमण आणि आई असे चारजण राहायचो. आईला सून भावली नव्हती. म्हणून आई अधून-अधून धुसपुस करायची. आईचा स्वभाव पुरेपूर माहीत असलेला मी स्तब्ध राहायचो.
               वडील दिवंगत झाल्यावर आईने मला व रमणला  सर्वार्थाने सांभाळले पोटाला चिमटे काढून आमच्यासाठी  खूप कष्ट घेतले. मी सरकारी  नोकरीत क्लार्क म्हणून लागलो. त्यावेळी ऑफिसात एका चांगल्या पण अबोल मुलीशी ओळख वाढून माझे प्रेमप्रकरण सुरू झाले. आईला कालांतराने हे समजले. तिला ते  पटले नाही. परंपरेला जपणारी आई मला आडवी येऊ लागली. लग्न करायचेच असे ठरल्यावर रिमाच्या घरच्यांनी आनंदाने परवानगी दिली. आई मात्र हटूनबसली !
                  वातावरण निवळावे म्हणून खूप प्रयत्न झाले, पण आई बघेना. मात्र मी लग्न करेन तर हिच्याशीच हे ठाम केले होते.
                  अखेर लग्न झाले. आई लग्नाला आलीच नाही ! रमण तेवढा आला होता.पुढे संसार सुरू झाला. लग्नानंतरचे वातावरण चांगले असावयास हवे. पण तसे ते नव्हते.
                  रिमाचे लग्नानंतर नाव बदलले. ती आता सुधा झाली. सुधा स्वभावाने अबोल असली तरी नम्र आणि मायाळू होती. धाकटा भाऊ रमण व सुधामध्ये बहिण भावाचे  नाते सुरू झाले. वातावरण निवळत होते. पण  कधी आई कुठलाही विषय काढून टोचत बसायची. कधी रडत कोपऱ्यात दुःखी चेहेऱ्याने  सुन्न बसायची!  आमचे काही शेजारी आईचा स्वभाव ओळखून होते.  का.ही बायका दयेच्या नजरेने सुधाकडे पहायच्या. पण तिच्याशी ओळख वाढवायची त्यांची ताकद नव्हती. लग्नानंतर रमणला पोष्टात नोकरी मिळाली व घरातले वातावरण आणखी हलके झाले. आईचा चेहेरा थोडा हसरा दिसू लागला.
                  मात्र काही दिवसांनी आईने एक नवा विषय काढला. त्यावरून रमण आणि मला टोकायला सुरुवात केली. आई रमणला म्हणे- '  अरे रमण, इथे आता काही खरे नाही रे माझे. झोपडी मिळाली तरी चालेल बघ मला. आता दोघं निघुया इथून !  आपले गाव आणि घर असते धड  तर तिथे गेले असते रे मी पण नाही तेव्हढी नशीबवान मी, काय समजलास ? तेव्हा आता तू कुठे आपल्या दोघांसाठी खोलीचे बघ पाहू. आपण जाऊ तेथे कायमचे राहायला ’ .
               रमण अशावेळी माझ्याकडे पाही. व खिन्न मनाने गप्प बसे. मला आता कासावीस व्हायला लागले. . एकदा तर आईने,'  रमण, अरे नाहीरे राहवत इथे. तुझे किती हाल चाललेत बघ. त्या काळीचे तर तोंड बघवत नाही मला. मला म्हातारीला खरं तर गरज आहे यांच्याकडून सेवेची. कामाची.पण या बयेचा स्पर्शही  नकोय मला......'
               घरी दिवसभराच्या कामाने थकून घरी आलेला मी  आईच्या या विखारी बोलण्यानं अस्वस्थ व्हायचो. सुधा देखील दुःखी व्हायची. रात्ररात्र दोघांचेही डोळे भरलेले पडायचे.
               रमणला नेहेमी रात्रपाळी असायची. रात्रीचे हे वातावरण त्याला दिसत नव्हते. पण दिवसभर तोसुद्धा अस्वस्थ आणि अबोल असायचा. आपल्या मोठया भावावर खूप प्रेम करणारा रमण हतबल होता आईपुढे. आईच्या या वृत्तीचा मला राग येई.  आई असली म्हणून काय झाले?  मी एव्हढा काय अपराध केलाय की तिने असा दुस्वास  करावा ?  सतत टोचत राहावे?  नवीन आलेल्या सुनेला आपलेपणाही  दाखवू नये ?
              मात्र माझा आवेश काही वेळाने ओसरत असे. रमण आता कोठे नोकरीला लागलाय.कुठून आणणार घर घ्यायला पैसे ? मीच आता खोली घ्यायला हवी खरे तर...
              हा विचार बळावू लागला. मी हे एकदा रिमाच्या कानावर घातले. ती माझ्यावर पूर्णपणे विश्वासलेली. म्हणाली,  हे बघा, तुम्ही जे कराल ते योग्य तेच कराल. पण आईंना तुम्ही दुखवु नका '
             त्यानंतर एकदीड महिन्यांनी रिमाला ऑफिसमध्ये जागा मिळणार असल्याचे तिने सांगितले. रिमा म्हणाली-'  हे बघा, आईंना आणि रमण भावजीना इथेच राहूध्या काही दिवस. आपण तिकडे नव्या जागी राहायला गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांना नेऊ. तेही आईंना आणि भावोजीना यावयाचे असेल तर. सगळेच तिथे राहू आपण. पण त्यांचा कल बघा,म्हणुन म्हटलं हे...'
             ही खूप चांगली घटना होती. रमण जवळ हा विषय काढला. त्याचे म्हणणे पडले- ' दादा, तुझ्यासारखा मी पण कोड्यात पडलोय रे. आईला काय झालेय कळत नाही. मला तुम्ही दोघानी येथून जावेसे वाटत नाही रे. ही खोली खरं तर तुझीच आहे. सांग, मी काय केलंय या घरासाठी आणि तुमच्यासाठी ? ' मी यावर गप्प राह्यलो. '  नाही दादा, अशी भांडणं आणि टोमणे ऐकण्यापेक्षा तुम्ही दोघे वहिनीच्या ऑफिसकडून मिळणाऱ्या ब्लॉकवर राहा. आई आणि मी राहू इथे. तू नको चिंता करूस. तिचे वय झालेय म्हणून चिडचिड वाढलीय तीची. तू नको काळजी करू. '.
               त्यानंतर काही दिवसांनी आम्ही पतिपत्नी नवीन जागेत राहायला गेलो. आईला धक्का बसला होता. पण उघड तिने काही दाखवले नाही. निरोप घ्यायला गेलो तर मान  फिरून बाहेर निघून गेली !
            नवीन घर ऐसपैस होते. नीटनेटके होते. आई रमणवीना  माझे तेथे  मन रमेना.  मात्र इलाज नव्हता. संसार  सुरूच होता. रमण आणि आईची खुशाली घ्यायला दोघेही अधूनमधून घरी जायचो. आई ढिम्म बोलायची नाही की बघायची नाही !
            हळूहळू सुधा व मला नवीन जागेची सवय झाली. दिवस असेच चाललेले असताना एक दुःखद घटना घडली  आणि मी हदारून गेलो. पोष्टात नोकरी करणारा माझा धाकटा भाऊ रमण आम्हाला सोडून गेला !  टपाल ऑफिसमधून टपाल वाटण्यासाठी तो बाहेर पडला. त्याला एके ठिकाणी रस्ता क्रॉस करायचा होता, त्याच वेळी तेथे एक म्हातारी बाई कडेला उभी होती. तीला पलिकडे जायला मदत हवी होती. याने व्यवस्थित तीला पलिकडे नेले. मग अलिकडे ठेवलेली टपालाची बॅग घ्यायला हा निघाला तर अवचित एका ट्रकची त्याला धडक बसली !  आणि सगळेच संपले.
            आम्हाला दोघांनाही हा मोठा धक्का होता. पण त्यातून सावरायला हवे होते.   आणि आईचे काय?  तीला हे सहन होण्या पलिकडचे दुःख होते. पण तिने ते चेहेऱ्यावर जाणवू दिले नाही व अबोला काही सोडला नाही.  आम्ही दोघांनी खूप आग्रह करून तिला नवीन घरी न्यायचे ठरवले. तसे प्रयत्न केले. मात्र आई काही बधली नाही. जुन्या घरीच राह्यली.. ऐकेचना !
            आणखी एक प्रयत्न म्हणून सुधाने ठरवले. ' चला, आज आपण आईंकडे जाऊया परत एक  प्रयत्न करते मी. '   काय 'करणार तू ?  असे विचारल्यावर '  आज मी पाय धरते  तुमच्या आईचे. ..'
मला हे मला पटेना . पण निघालो. त्या दिवशी तास दोन तास आईकडे थांबून राह्यलो. ती एका कोपऱ्यात एकटक  गप्प कोठे तंद्री लावून बसली होती.   बघेना की बोलेना!  कंटाळलो शेवटी. सुधाला म्हणालो- '  चल, निघू या आता. ' .आणि निघताना अचानकपणे सुधा आईजवळ गेली . पटकन तीचे पाय धरले !
'  अहो आई, चला ना, आई, नका राग धरू  माझ्यावर...'. त्यावर आईने ताकद लावून सुधाचे हात धरले आणि बाजूस झाली. म्हणाली, ' अगं बाई, तू कोण ग माझे पाय धरणारी ?  माझा लाडका लेक होता तो कायमचा निघून गेलाय वर. आता माझं कोणी नाही. तू तर माझी कोणीच नाहीस...'
               सुधाला हे सहन नाही झाले. ढसा ढसा रडली ती !  मग मी पुढे झालो आणि तिला सावरले. दोघेही खिन्न होऊन तिथून निघालो. त्या रात्री दोघेही खूप निराश झालो होतो. काय एवढी चूक घडली होती आमच्या हातून ?
              वर्षानंतर सुधा  बाळंत झाली. आम्हाला मुलगा झाला. माहेरच्यांनी सुधाचे  सारे बाळंतपण केले. आनंदी दिवस होते ते. मुलाचे आता बारसे करावे, छोटा पण  छानसा सोहोळा करावा असा बेत आखला.
               तेव्हा सुधा म्हणाली, ' मी आपल्या मुलाचे नांव सासूबाईंच्या इच्छेने ठरवणार आहे. त्यांना तुम्ही घेऊन या. '  सुधाने लकडाच लावला. मला  मागचे आठवून  ताण यायला लागला. डोळ्यापुढे  आईचा कठोर आणि करारी चेहेरा उभा राह्यला.
               सुधा हटून बसली !  तीच्या माहेरच्यांनी विनवले. ' बघा हो, तुमची आई  आहे ती. या चांगल्या घटनेमुळे सावरेल ती. जा आईकडे..'   मग विचार केला आणि निघालो आईकडे.
              घरात आई एकटीच होती. पेपर वाचीत होती. घरात शिरताना तिने मला पाह्यलं. क्षणभर  नेहेमीचा कठोर चेहरा करून बघितले आणि अवचितपणे आई म्हणाली, '  कारे ?  का आलास बाबा ?  कायरे ? झाली का तुझी बायको बाळंत ?  ' . त्यावर माझा विश्वास बसेना !  आई हे विचारतेय ?   तीने पुन्हा प्रश्न केल्यावर सावरलो. म्हणालो, '  आई  गं, तुला नातू झालाय !  ' .
            '  काय म्हणतोस ?  तुला बाळ झालं ?  लगेच वर बघत तीने हात जोडले. म्हणाली, '   बस राघव बस तू, तुला साखर देते..'  .लगेच उठली आत जाऊन साखरेचा डबा माझ्यापुढे  आणला !  घे, तोंड गोड  कर राघव ' . मग तशीच खाली बसली. मी ही बसलो. '  तीला म्हणावं, पोराची काळजी घे नीट. ...' हे ऐकताना माझे दोन्ही डोळे भरलेले  तिने पाहयले. माझे दोन्ही हात हाती घेऊन ही माऊली मला म्हणाली, '  राघवा रे,पोराचं थाटात बारसं करायचं बरं ..'  माझी आसवं थांबेत ना. तशी स्वतःच्या साडीपदराने आईने डोळे पुसायला घेतले. तीच्याजवळ तसाच शांत बसून राह्यलो थोडा वेळ.  आईला आग्रह केला तशी, ' चल बाबा, आता सगळं करायला हवंय आपल्याला चल निघुया....'  
             आईला घरी आणल्यावर सुधाला माहेरी कळवले. ती खूप आनंदली. नंतर काही दिवसांनी सुधाला बाळासह  घरी आले. सुधाचे व बाळाचे चांगले स्वागत केले. घर आनंदाने अगदी भरून गेले. दोघी एकमेकींशी जिव्हाळ्याने बोलू वागू लागल्या.
              काही दिवसातच बारशाचा सोहोळा झाला. सुधाच्या माहेरची माणसं मनापासून कार्यक्रमात राबत होती. माझा जवळचा मित्र परिवार पण  वेळ काढुन आला होता. आईने नातवाचे नाव ठेवले-'  सांदिपनी.   हे नाव साऱ्यांना आवडले.
            आता आईचा वेळ नातवाला खेळवण्यातआणि त्यांचं हवं नको ते बघण्यात जाऊ लागला. आता आम्ही दोघेही या चांगल्या वातावरणाने निवांत झालो. ताण नसल्याने उत्साहाने दोघेही वावरत काम करीत होतो. सुधाची रजा संपली आणि ती कामावर जायला लागली.
           आता दोघेही सकाळी कामावर जायला निघालो की आई  सांदिपनला कडेवर घेऊन दारापाशी येऊन उभी राही. म्हणे, '  चालले बघ तुझे आईबाबा फिरायला, बघ बघ, लबाड कसा डोळे मोठे करून बघतोय...', मग दोघांना म्हणायची-'  जा तुम्ही, निघा लवकर, आता आम्ही दोघे खेळणार बरं का !टाटा कर बाळा टाटा आईबाबांना...'.
             बाहेर पडल्यावर मी सुधाला यावर प्रतिक्रिया विचारल्यावर ती म्हणायची- '  तुमच्या आईचे मन  चांगले आहे हो. पण त्यावेळी आपल्या लग्नाचे काय एवढे लावून घेतले होते कुणास ठाऊक ? मला तर ते कोडेच वाटते बाई..' .
             आता ते चांगले दिवस संपत आलेत असे वाटायला लागलेय. आता हवा बदललीय. आई आता पुन्हा पूर्वीसारखी गप्प गप्प राहायला लागलीय. नीट मोकळेपणाने बोलत नाही . नातवाशी वरवर हसून बोलते. त्यात माया नाही दिसत मला.
              आता दररोज  सायंकाळी निवांतपणे  फिरायला  बाहेर पडणारे  आमचे  कुटुंब  आई शिवाय निघते. आग्रह केला तरी  आई उठत नाही. फिरायला येत नाही. आढेवेढे घेते. का हे असें ? आता काय बिनसलेय हीचे ?तब्येत तर ठीक आहे. सुधा आणि तीच्यात वादाचे काहीही घडलेले नाहीय. मग ?
              पण एक गोष्ट आहे. परवा ती घरी सांदीपनला  खेळवताना  एक वाक्य बोलल्याचे ऐकलंय मी. '  सांदिपन, आज तू एकटाच खेळ बाबा. तुझे आईबाबा आहेत ना तुला खेळवायला? मला नाही  झेपत तुला कडेवर घ्यायला आणि बाहेर फिरवायला. आणि  आता माझं मेलीचं आहे कोण इथं ? इथं सगळी रमतात त्यांच्यात्यांच्यात. मला नाही जमत त्यांच्या बरोबर वावरायला. मी आपली एकटीच असलेली बरी. आणि आहे कोण इथं आपलं आपुलकीच ? सांग ना ? '.
                 हे शब्द आठवल्यावर सुधाच्या कानी ते घातले. ती निराश चेहऱ्याने म्हणाली-'  अहो, आज अचानक आई अशा  वेगळं का बोलल्या ?  आमच्या दोघांत तर कुठला वादपण नाही झाला. छान बोलल्या सकाळी.  आणि आता तुम्ही .....'  मी गप्प राह्यलो.
                 भूतकाळातून वास्तवात आलेला मी सैरभैर होऊन सभोवताली बघू लागलो. सुधा समजावतेय मला, '  तुम्ही काय एव्हढे मनास लावून घेताय बरं ?  आईंना थोडा शीणवठा आला असेल. मागचे काही आठवून त्या तसे बोलल्या असतील....'.सुधाचे हे शब्द माझ्या मनाला हलके करेनात. याक्षणी  छोटा सांदीपन  आनंदाने बागडतोय. धावतोय. सुधा स्वछंदी चेहऱ्याने त्याचे मागे धावतेय...
               आणि आपण ? आपण मात्र येथे खिन्न खिन्न आहोत! कानावर आईची वाक्यं आदळताहेत सारखी, '  आपल्या आपुलकीचं कोण आहे रे इथं ? ....'.
                  अशा या  आपुलकीचं कोडंच पडलंय मला. हे  कोडं सुटता सुटत नाहीय.

                                                  ---------------------------------