Sunday, 1 April 2018

🌹समाजसंवेदना🌹

💐समाजसंवेदना..........
                 उस्मानाबाद-लातूर परीसरातील किल्लारी येथे १९९३ मध्ये  झालेल्या प्रलयंकारी भूकंपाची दुर्घटना बहुधा सर्वाना ज्ञात असेल.घटना तशी जुनी आहे. पण अंतर्मुख करणारी.
                 समाजात राहताना,वावरताना आपण कर्तव्यभावनेने एखाद्या सत्कार्यात सहभागी होतो, आणि मग येतात ते विविध अनुभव आपल्याला अंतर्मुख करतात.
                याविषयीच येथे लिहिले आहे....................

                                                                💐दुःख पर्वताएवढे.............

               
                 धरणी कंप पावते म्हणजे नेमके काय होते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे रामप्रहरी ! वास्तविक आम्ही मुंबईकर यावेळी अगदी गाढ झोपेत असतो.
                 मी सुद्दा त्यावेळी गाढ झोपेत होतो. आपण झोपाळ्यावर असल्यासारखे हलत आहोत, ही जाणीव झाली मात्र, ताडकन उठलो.काहीसे ओरडलो सुद्दा ! 'अहो, हलतंय हलतंय बघा.' हे शब्द उच्चारताना जवळच्या भिंतीवरील मोठे पुस्तकांचे कपाट तर पडत नाही ना ? हे पहिले. घरातले कोणी उठेनात. मग स्वतःला वेड्यात काढले. आजूबाजूस यावेळी केवढी शांतता होती ! म्हणजे आपल्याला हे स्वप्न वगैरे पडले होते तर ! स्वतःला समजावले आणि  पुन्हा अंथरुणावर पडलो.
                 सकाळी उठल्यावर घरच्यांना विचारले की, तुम्हाला अशी जाणीव झाली होती ? अर्थात ऑफिसात जायच्या गडबडीमुळे हे विचारणे राहून गेले. ऑफिसमध्ये जो तो ' भूकंप झालाय,एवढी माणसे दगावली ' इ. म्हणू लागल्यावर आपल्याला पहाटे आलेला अनुभव खरा असल्याची खात्री पटली. त्यानंतर वर्तमानपत्रे,रेडिओ आणि टि.व्ही. यांचेमार्फत आलेल्या बातम्यांनी मन अस्वस्थ होऊ लागले.अवती भवतीचे लोकसुद्दा याच अवस्थेत होते.
                 मुंबईतील एक नवखे, पण लोकप्रिय सायंदैनिक ' आज दिनांक ' भूकंपाच्या बातम्या सातत्याने देत होते. इतर दैनिकाप्रमाणे या दैनिकातही भूकंपग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत होते. ' आज दिनांक ' ने मदत करण्यासाठी तातडीने एक समिती स्थापन केली. अजित वाडेकर,सुनील गावस्कर,नाना पाटेकर,सदाशिव अमरापूरकर,आशा भोसले , इत्यादी मान्यवर लोक या समितीत सहभागी झाले होते. आमच्या गिर्यारोहक परिवारातील प्रसिद्द गिर्यारोहक प्रजापती बोधणे हे समितीच्या वतीने किल्लारी आणि आसपासच्या गावातील मदत कार्य पार पाडत होते. मुंबईतील अनेक गिरी प्रेमी युवक-युवती या मदत कार्यात हिरीरीने भाग घेत होते.
                  मदतकार्य म्हणजे प्रामुख्याने जिवंत वा मृत व्यक्तींना  ढिगाऱ्यातून बाहेर काढणे, जिवंत असल्यास त्यांची सुरक्षित स्थळी रवानगी करणे, जखमी असल्यास तातडीने त्यांना उपचाराकरीता जवळच्या आरोग्य पथकाकडे  सुपूर्द करणे ,आणि मृतव्यक्तींचे दहन/दफन त्यांचे नातेवाईकांचे मदतीने करणे, साधारणतः हीच कामे मोठ्या प्रमाणात भारतीय लष्कराचे सैनिक करीत होते. त्यांच्या कामात या तरुणांची मोठी मदत होत होती.
                   प्रजापती बोधणे, ' आज दिनांक ' चे काही कार्यकर्ते, मुंबई व आसपासचे काही गिर्यारोहक युवक-युवती, असे सारेजण लगेच किल्लारीस रवाना झाले. किल्लारी हे प्रजापतीचे गाव. त्यामुळे मदतकार्य करताना तेथील गावकऱ्यांनी हातभार लावला. सारेजण दिवसरात्र कामे करू लागले. माती-दगडांच्या राशी तपासल्या जाऊ लागल्या. बहुतेक मृत व्यक्तींची वाईट अवस्थेतील शरीरं हाती लागायची. क्वचितप्रसंगी ढिगाऱ्यात आवाज आला, तर समजावे कोणीतरी जखमी जीव आतमध्ये आहे. मग कार्यकर्ते तो ढीग अलगद उपसायचे. त्या जीवास बाहेर काढायचे. पण हे प्रसंग कमीच.
                    लष्कराचे पथक एकीकडे जोरात कामाला लागले होते. त्यानासुद्दा या कार्यकर्त्याची मदत व्हायची. काही अधिकाऱ्यांनी कौतुकाने कार्यकर्त्यांची पाठ थोपटली. त्यांना प्रश्न पडला. या अथकपणे काम करणाऱ्या तरुणांच्या जेवणाचे काय ? ते मुक्काम कोठे करतात ? किल्लारीतील मदत पथकाचे एक अधिकारी मेजर सुभेदार यांनी कार्यकर्त्यांना लष्करी कॅम्पमध्ये राहण्या-जेवण्याविषयी आग्रह केला, परंतु त्यांना आणखी भार नको म्हणून यांनी नम्रपणे नकार दिला.
                     शेवटी त्या अधिकाऱ्याने आमच्या मदत पथकातील कार्यकर्त्यांचा मुक्काम जेथे होता, त्या किल्लारीमधील 'गावकरे' यांच्या वाड्याच्या आवारात मिलीटरीचा एक तंबू उभारला.
                     या साऱ्या हकीकती मी मुंबईत ऐकल्या. दादरला अखिल महाराष्ट्रगिर्यारोहण महासंघाचे कार्यालय होते. महासंघाच्या सुनील राज कडून आणखीही माहिती मिळाली. जास्तीत जास्त गिर्यारोहक आणि गिरिप्रेमी कार्यकर्ते भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी जावेत, म्हणून सुनीलची धावपळ चालू होती. दुसरीकडे प्रजापती, किल्लारी आणि जवळच्या  गावात केलेल्या सहाय्याचा रिपोर्ट ' आज दिनांक ' ला कळविण्यासाठी मुंबईला येई. सरकारी माध्यमातूनअधिकाऱ्यांशी संपर्क साधे, पुन्हा किल्लारीस रवाना होई.
                     अशा धावपळी चालू असताना मी एक बॅचमधून तिकडे जायचा निश्चय केला. जायच्या रात्री एक खासगी बस आम्हाला किल्लारीस नेणार असे कळले. सात आठजण निघायच्या तयारीने दादर येथील ' आज दिनांक ' च्या कार्यालयात हजर झालो. थोड्या वेळाने कळले की, बस जाणार नाही ! कार्यालयाने एस.टी. महामंडळाकडे विचारणा केली. रात्री अकरानंतर तिकडे जाणाऱ्या गाड्या नाहीत असे समजले. दादर मधील एक कार्यकर्ता रवींद्र पाटील याच कामासाठी एक जीप तिकडे नेणार होता. त्याचे पैशाचे पाकीट आजच मारले गेले. त्यातील जीपचे लायसन्स, ही आवश्यक वस्तू आता नसल्याने ती जीप आज निघेना. रेल्वेने जायचा विचार केला, पण खूप उशीर झाला होता.
                 याच दरम्यान घाटकोपर येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्था व सिव्हील डिफेन्स युनिटचे काही तरुण एका टेम्पोने भूकंप ग्रस्तांना द्यावयाचे समान घेऊन येणार होते. त्यांनी ' आज दिनांक ' किल्लारीत प्रवेश मिळावा म्हणून सहाय्याची विनंती केली. त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देण्यात आली आणि या टेम्पोतूनच आमचा प्रवास सुरू झाला.
                 किल्लारी हे जवळचे गाव नव्हे,चांगला पंधरा-सोळा तासांचा प्रवास करावा लागतो. मुंबईहून पुणेमार्गे सोलापूर,नळदुर्ग असे जावे लागते.उमरग्याच्या वाटेवर असताना एक वाट जळकोट, सास्तुर मार्गे किल्लारीकडे जाते.
                 रात्री साडेअकराला आम्ही मुंबईहून निघालो होतो. जळकोट गाठले,तेव्हा दुपारचा एक वाजला असेल. दुपारचे जेवण एक खानावळीत घेतले. या जळकोट गावातील पडझडीची माहिती खानावळीच्या मालकाने दिली. गावात आम्हाला पडलेली काही घरे  दुरवर दिसत होती.
                  काही वेळाने आम्ही उदतपुरला आलो. हे छोटेसे गाव असून रस्त्याच्या कडेला दुतर्फा, तसेच आतल्या बाजूस असलेली घरे उद्वस्थ होऊन दगड मातीच्या राशीच राशी जिकडे तिकडे दिसत होत्या. येथे आम्ही थांबलो आणि विचारपूस सुरू केली.
                  इथली घरे प्रामुख्याने काळीशार माती, ठिसूळ दगड व क्वचित चुना, यांचे मिश्रणातुन बांधली गेलीत. वास्तविक काळी माती बांधकामाची पकड घेण्याइतकी चिकट नसते. चुना तर सारेजण वापरत नव्हते. हा सारा ठीसुळपणाच या उद्वस्थ अवस्थेस कारणीभूत आहे. असे हे उदतपुर जवळजवळ भकास झालेले.
                 घरांचे अवशेष पाहताना जपून पुढे पाऊल टाकावे लागे. काही ठिकाणी दरवाजाच्या बाजूकडील भिंत केव्हाही कोसळेल या अवस्थेत ! दगड मातीच्या राशीतून डोकावे डोकावणारे तुटके माठ, भांडी,धान्याची कणगी,जुन्या मोडलेल्या मांडण्या, स्तब्धपणे लटकणारी देवाची तसबीर हे सगळे पाहून पार उदासी आली.
                 पुढे अशीच दोन-तीन छोटी गावं लागली.मग सास्तुर आले. पेपरमध्ये या गावांविषयी वाचलेले ती गावे आता प्रत्यक्ष पाहत होतो. सास्तुर क्षेत्रफळाने मोठे नसले तरी येथे  घरे आणि माणसांची वस्ती जास्त आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली कोणतीही वस्तू शाबूत अवस्थेत दिसेना. सगळीकडे दगड व मातीच्या  राशी ! त्यात अडकलेले जुन्या घराचे खांब, वासे आणि इतर अवशेष........
                 रस्त्याच्या एकीकडे मोठा खड्डा खणून तो बुलडोझरने पुन्हा बुजवल्याच्या खुणा, जवळच एक उंचवटा आहे. त्यावर उभे राहिले की सारे  सास्तुर न्याहाळता येतेय. समोर मोठी शेतजमीन आहे.त्याचे एक बाजूस प्राचीन वाटणारे एक मोठे देवालय कोसळून पडलेय. दुसऱ्या दिशेस नजरेच्या टप्यात येणारी अवघी घरे ढासळून गेलेली, अगदी कोठली भिंत कोठे होती  आणि कोठला दगड कोणत्या दिशेस होता हे  कळण्या इतकी !
                 गावात शिरल्या शिरल्या एक तिठा लागतो. तेथे लष्कराचे कॅम्पस लागलेले आहेत. कोठेतरी रेडिओवर मदतीसाठी देण्यात येणाऱ्या सूचना ऐकू येतात, आर.एस.एस.च्या जनकल्याण समिती राहुट्यांमधून कार्यकर्ते इकडे तिकडे धावताहेत. एके ठिकाणी साधू बैराग्यांची राहुटी. भूकंपग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जेवणाची त्यांनी तयारी चालविलेली.
                 सास्तुरमध्ये असताना विशेष जाणवत होते ते, तेथे भाऊगर्दी करून वावरणाऱ्या वाहनांविषयी. सरकारी अधिकाऱ्यांच्या अंब्यासिडर्स, मिलिटरी ट्रक, खासगी बघ्यांची वाहने इ.इ. आणखी त्यात आमचा टेम्पो !
                 सास्तुर मधल्या त्या छोट्याशा टेकाडावर मी  व  दोघेजण जवळचा भाग न्याहाळत असताना तेथे दोघे ग्रामस्थ आपापसात या विध्वंसाविषयी बोलत होते. मी त्यांना मध्येच विचारले,' काहो, ते जे मंदिर कोसळले त्यांच्या आत कोणी माणसं होती का हो ? ' त्यावर तो उत्तरला-'अहो,कोण असायचं त्या ठिकाणी वस्तीला ? कोणीही नाही. त्याला इतर ठिकाणाबद्दल विचारल्यावर म्हणाला. 'हा जो जवळ मातीचा बुजवलेला मोठा खड्डा दिसतोय ना, त्या ठिकाणी मोजता येणार नाहीत एवढी माणसं पुरलीत मिलिटरीनं ! एकावर एक माणूस ठेवलय. सगळा गाव बरबाद झाला.....' सारे ऐकताना सुन्न व्हायला झाले.
                 मी उभा होतो त्याचे बाजूस अगदी अलीकडेच विटांनी बांधलेल्या कबरी होत्या. त्यावर पसरलेले अबीर,गुलाल, फुलं, उदबत्ती पाहून हे जास्त दिवसांचे नाही हे स्पष्टपणे दिसत होते. आम्ही उभे होतो तेथे मधूनच हवेची झुळूक आली की कुबट, सहन होणार नाही असा वासआमची गाडी एक दोन वळणं पार करून एका सुन्न अशा नाक्यावर थांबली. कोपऱ्यावर उभा केलेला फलक एकेक गावाची दिशा सांगत होता--डावीकडे नारंगवाडी, साळेगाव, तर समोर होळी अन उमराग्याच्या रस्ता.
                 सास्तुरमध्ये माहिती मिळाली की, या ठिकाणी रेबेचिंचोळी गावातल्या लोकांना तात्पुरता निवारा दिला गेलाय.
या ठिकाणच्या लोकांना कपडे, धान्य इ. वस्तूची आवश्यकता आहे. तेथे आलो तेव्हा तिन्हीसांजा झालेल्या. किल्लारी जास्त लांब नसले तरी पोहोचायला रात्र होणार, शिवाय तेथे प्रवेश करतानाचे सोपस्कार. नंतर या टेम्पोतील सामान जमा करणे ही कामे काही लगेच होणार नव्हती. त्यामुळे येथेच आज थांबून इथल्या गरजवंतांना काही मदत देता येईल, हे ठरवून सारेजण उतरलो.
              टेम्पो थांबलेला पाहून काही ग्रामस्थ लगेच गोळा झाले. टेम्पोवरचा फलक तो मदत घेऊन आलाय हेच दर्शवत होता हे त्यांनी जाणले. काही बायका गलागला करू लागल्या.
             या नाक्याच्या एकबाजूस होळी तांडा या छोट्या वस्तीतली घरं उद्वस्थ अवस्थेत दिसत होती. तेथल्या लोकांना तात्पुरता निवारा समोरच्या बाजूस मिळालेला, तर पलीकडील बाजूला  शेड्स मध्ये रेबेचिंचोळी गावातून आलेले मागासवर्गीय ग्रामस्थ. या साऱ्यांना जेवण व चहा देण्यासाठी तेरणा साखर कारखान्याने मंडप तयार केला होता. आमच्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला की, येथे सामान वाटण्यापूर्वी काही कुटुंबांची चौकशी करावी.त्यांच्यात मिसळून विचारावे.
               त्यांच्यातील एक तरुण भेटला.नाव आठवत नाही. बीए डीएड इतके त्याचे शिक्षण झालेय. हा भाबडा तरुण त्या दिवसाच्या हकीकती सांगू लागला-' घर कोसळलेल्या ढिगात अडकून पडले होतो. या पायाला जखमझालीय. आमची मांगांची वस्ती एक बाजूला होती. गावात शिवा शिव चालते. त्यादिवशी पहाटे हे वाईट घडले आणि लगेच आवई उठली की माकणी धरण फुटलेय. सगळी वस्ती नेसत्या वस्त्रानिशी अन हाती मिळेल ते घेऊन या जागेत आली.सवर्णांना हेच हवे होते....'तो घडाघडा हे सांगत होता संजय नेवे हा आमचा कार्यकर्ता आणि मी ऐकत होतो. इतर सहकारी अकि लोकांची चौकशी करू लागले.
              इतक्यात एक मॅटेडोर व्हॅन नाक्यावर येऊन थांबली. गाडीच्या बॅनरवर ' पंढरपूर व्यापारी संघ ' असे लिहिले होते.पांढरा शुभ्र सदरा, टोपी, परीट घडीतील लेहंगे अशा पोशाखातले एक दोघेजण धोतर घातलेले, खाली उतरले. पाचसहा जण तरी असावेत ते. काहींच्या हातात कापडांची गठडी. त्यात वेगवेगळी नवी कापडं.
              आमच्या भोवती असलेली बहुतेक लोकं त्यांच्यापाशी जमा झाली. आया-बाया आणि पोरांनी अगदी वेढा घातला ! हा प्रकार बघून ते व्यापारी गांगरून गेले असावेत. अखेर त्यांच्या एका प्रमुखाने ओरडून सांगितले,' हे पहा, तुम्हा साऱ्यांना कापडं मिळणार. आधी खाली बसून घ्या पाहू......'
             मग गडबड काहीकाळ शांत झाली. एका बाजूस गडी माणसं तर दुसऱ्या बाजूस आया-बाया अन लहान पोरं.वाटप करणारे दाते गठड्यातील बायका-पुरुषांची एकत्रीत कापडं घाईघाईत काढून वाटू लागले. त्यांना हे लक्षात आले नाही की आपण कोणाची कापडं कोणाला देत आहोत !
            योगायोगाने ज्यांना योग्य कापडं मिळाली ते ती घेऊन आपल्या राहुटीकडे  निघाले. इतरांचे काय ! त्यांच्या हातात नको ती कापडं पडली होती. पुन्हा गडबड सुरू झाली,इतकी की ते पुढारी उरलेली कापडांची गठडी घेऊन टेम्पोकडे निघाले. टेम्पो आता जाणार म्हटल्यावर लोकं ओरडू लागली.कोणी स्वतःला नको ते कापड मिळाले म्हणुन फेकून दिले, तर कोणी दुसऱ्याच्या हातातील हिसकावू लागले. हा सारा प्रकार बघायला ते पुढारी थांबले कुठे ? त्यांचा टेम्पो तर परतीच्या वाटेवर लागला होता !
                आमची येथली  चौकशी काही अंशी पुर्ण झाली,त्यावेळी समजले की येथुन सास्तुरच्या दिशेस एक छोटी वस्ती आहे नागराळ म्हणून. ती उद्वस्थ झालीय. तेथल्या गावकऱ्यांना देखील मदत हवीय. तेथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पहावी असे ठरवून सगळे तिकडे निघाले. निघताना टेम्पोचे शटर बंद करुन ड्रायव्हर आणि क्लिनर तेथेच थांबणार होते.
             अंधार पडला होता. त्या अंधारात शेताच्या वाटेने काही काळ चालून गेल्यावर मिलीटरीचे कॅम्प अंधुकपणे दिसले.त्या ठिकाणी मिलीटरीचे  दोघेजण एक ग्रामस्थ बसून इकड-तिकडच्या गप्पा मारीत होते. त्यांनी आमची विचारपूस केल्यावर बस म्हणाले. चौकशी अंती मिलीटरीनेच  सारी मदत केली आहे व करत आहे हे स्पष्ट झाल्यावर आम्ही परत रेबे चिंचोळीच्या वस्तीकडे परतलो.
             इकडे एक अजब प्रकार घडला होता. आम्ही नागराळ येथे जाऊन हे मदतीचे समान त्यांना देऊ. यातले काही मिळणार नाही असा समज रेबे चिंचोळी आणि होळी तांडा या गावच्या काही ग्रामस्थांचा झाला असावा, कारण आमच्या टेम्पोत बॅाम्ब ठेवल्याची अफवा तेथे पसरली आणि मिलीटरी तसेच पोलीस यांनी ड्रायव्हर-क्लिनरची सडकून हजेरी घेतली. ते टेम्पो तपासणीच्या वेळी कोठे गायब झाल्याने संशय अधिकच बळावला होता. हरतऱ्हेची चौकशी त्यांनी केली. टेम्पो उघडायला लावला. गाडीचा नंबर, ड्रायव्हरचे लायसन्स, संस्थेची माहिती हे सारे गोळा करून वर आमच्या टेम्पोतील यायचा. अशीच परिस्थिती या पुढील गावांत पाहायला मिळणार होती.
भूकंपग्रस्थाना देण्यासाठी आणलेल्या दोन प्लॅस्टिकच्या बादल्या त्यांनी जबरदस्तीने नेल्या.
              चीड आली साऱ्या प्रकाराची. सगळा अडाणीपणा. ही एवढी धावपळ आपण का करतो ? बॅाम्ब आमच्याच लोकांना मारायला आम्ही आणू ?
              तो मघाशी भेटलेला सुशिक्षित ग्रामस्थ तरुण पुढे आला. म्हणाला-' या दिवाण्या लोकांना मी समजावून देखील शेवटी हे असे झाले. मी काय करू ? इतर दोघे ग्रामस्थ जवळ आले. हळूहळू सारे शांत झाले.
               रात्र केव्हाच झाली होती,सगळ्यांना भूक लागल्या होत्या.बरोबर आणलेले काहीबाही खाल्ले. सामानाचे वाटप उद्या सकाळीच करूया, आता झोपण्याचें पाहू असे ठरवले. पाऊस पडण्याची चिन्हे होती. या कॅम्पजवळ तेरणा साखर कारखान्याच्या एक ट्रक उभा होता. गावकऱ्यांनी त्या ट्रकच्या वर आछादन म्हणून मोठे प्लॅस्टिक अंथरली व त्या राहुतीत काही गावकरी अन आम्ही रात्र काढली.
               सकाळी अन्न छत्रातील कार्यकर्त्या गावकऱ्यांनी चहा दिला. सामान वाटपाचे काम सुरू केले. प्लॅस्टिक च्या बादल्या, जेवणाची छोटी भांडी इ. वस्तूंचे नीट चौकशी करून वाटप झाले. आता फक्त रेशनची पोटी उरली होती टेम्पोमध्ये. ते आता किल्लारील शासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यायचे ठरवून येथील लोकांचा आम्ही निरोप घेतला. वाटेत होळी गाव लागले. इथेसुद्दा बहुतेक घरे नष्ट झालीत. पुनर्वसनाचे लष्कराने उभारलेले तंबू जागोजागी दिसत होते. आम्ही किल्लारीच्या दिशेने निघालो.
                किल्लारी गाव मुख्य रस्त्यापासून काहीसे आत आहे.एकीकडे लातूर तर दुसरीकडे उमरग्याला मोठा रस्ता आला की किल्लारीचा छोटा रस्ता लागतो.आज या मुख्य रस्त्याच्या वळणावर पोलीस, लष्कर,आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचा ताफा जिकडे तिकडे दिसत होता.अर्थात गावकऱ्यांपेक्षा शहरी लोकच जास्त दिसत होते. मदतीचे मुख्य केंद्र येथेच होते. कलेक्टर, तहसीलदार इत्यादींची तात्पुरती कार्यालये या ठिकाणी उभारलेली आहेत. येथेच एक झाडाखाली टेबल मांडून बसलेला एक कर्मचारी काही गावकऱ्यांना गावात जाण्यासाठी ओळखपत्र देण्याचे सोपस्कार करीत होता.या मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा असणारी काही घरे या भूकंपाची निशाणी दाखवत होती.
               आवश्यक ती कागदपत्रे घेऊन आम्ही आता किल्लारीत प्रवेश करणार होतो. तत्पूर्वी टेम्पोतील रेशन शासनाच्या गोडाऊनमध्ये  जमा करण्यास गेलो. तेथील प्रसिद्द अशा शिवरायांच्या पुतळ्यापासून काही अंतरावर तेरणा साखर। कारखाना आहे. जिल्ह्यातला हा पहिला सहकारी साखर कारखाना. अलीकडे तो बँड असायचा. त्याचे आवारात शासनाने तात्पुरते गोडाऊन करून भूकंपग्रस्तांना मदत म्हणून अलेलूं देशी विदेशी वस्तू ठेवल्यात. लष्कराचे एक अधिकारी आणि उदगीरचे तहसिलदार या दोघांची देखरेख या ठिकाणी होती. त्यांचे मदतीला लष्करी सैनिक तसेच प्रशिक्षण घेणारे पोलीस. ही सारी मंडळी सदैव तेथे झटत होती.
                अन्नधान्याची पोती, कांदे बटाट्याचे व्हॅलें थोरले ढीग, ब्लॅनकेट्स, सोलापुरी चादरी इ. गठडे, जुन्या तसेच नव्या कपड्यांच्या राशीचा राशी, परदेशातून आलेले तंबूचे पॅक केलेले  सुटसुटीत खोके, प्लॅस्टिक शीट चे गठडे, असंख्य भांडी, बादल्या हे सारे पाहून केवढी मोठी मदत ! असे कोणीही म्हणेल.
                 आमचे सामान जमा केल्यानंतर पोचपावती देण्यांत आली. विचारपुस वगैरे झाली अन आम्ही तेथून निघालो. किल्लारीमध्ये शिरताना थोडे अगोदर रस्त्याच्या कडेस शेतात लावलेले लष्कराचे कॅम्पस दिसू लागले. तेथे काही गावकऱ्यांना तात्पुरता निवारा मिळालेला होता.' किल्लारी ' आले.छोटा नाका दिसल्यावर चौकशी केली. एका बाजूला जाणारा गावातला छोटासा रस्ता. त्याच्या  कडेस एका वाड्याच्या आवारातील कंपाउंडची भिंत ढासळलेली.अन त्या ढिगावर लटकवलेला ' आज दिनांक 'चा कापडी फलक. ही जागा किल्लारीतील मान्यवर ग्रामस्थ गावकरे यांची. भूकंपाचा दणका या सधन ग्रहस्थानाही बसलाय.बैठा वाडा असला तरी आछादन स्लॅबचे आहे. आत ओळीने बांधलेल्या आठ दहा खोल्या आहेत. प्रत्येक खोलीला थोडीफार इजा पोहोचलीय. वाड्याचे छोटेसे प्रवेशद्वार केव्हाही कोसळेल अशा अवस्थेत आहे.येथल्या एका खोलीत कार्यकर्त्याचा राबता आहे. एक कोपर्या गोळा करून आणलेल्या जुन्या नव्या कपड्यांची बोचकी. दुसऱ्या कोपऱ्यात आवश्यक प्रथमोपचाराची औषधे ठेवलेली. बाजूला एक स्टोव्ह, कार्यकर्त्यांना खाण्यासाठी लागणारे रेशन वगैरे..... या वाड्याच्या आवारात लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेला तंबू. त्यात कार्यकर्ते राहतात.
             आज कार्यकर्ते येथून दीड दोन कि.मी.वर असलेल्या तळणी गावात आहे असे समजल्यावर टेम्पोने तळणी गाठली. या उद्वस्थ गावात काम करणाऱ्या दोस्तानी आमचे स्वागत केले. कामाच्या स्वरूपाची बोलणी झाली. राजेंद्र टन्नू या छात्रभारतीच्या पंढरपूर येथील कार्यकर्त्याने सारेकाही समजावून सांगितले अन आम्ही म्हणजे मी व संजय नेवे तसेच आमचे मुंबईचे दोस्त बाभूळ आणि बळवंत जे आमच्यापुर्वी इथे आले होते, त्यांच्याबरोबर थांबलो.आणि कामाला लागलो.टेम्पो घेऊन आलेल्या दोस्तानी आमचा निरोप घेतला.
             इथला दिवसभराचा कार्यक्रम म्हणजे स्वतःच्या कोसळलेल्या वास्तूमधील अडकलेल्या महत्वाच्या वस्तू काढण्यासाठी गावकऱ्यांना मदत करणे. त्यांची नीट विचारपूस करून सरकारमार्फत मिळण्याजोगी मदत त्यांना मिळण्यासाठी सहाय्य करणे,नवेजुने कपडेलत्ते गरजू व्यक्तींना देणे, या बरोबरच जमेल तेवढ्या लोकांशी संपर्क साधून प्रत्यक्ष हानीची माहिती घेणे. अर्थात,सुरुवातीच्या बॅचमधील आमच्या सहकार्यांना अथकपणे मृत व्यक्तींना ढिगातून बाहेर काढणे, त्यांचे दहन-दफन करणे, जखमींवर उपचार करण्यासाठी प्रथमोपचार केंद्रात पाठविणे, मेलेल्या गुरांची विल्हेवाट लावणे अशी कामे करावी लागली होती.कामाचा हा पहिला टप्पा पार पडला होता.आता उर्वरित पुनर्वसनाची कामे मुख्यतः शासन आणि आमचा एक गट जमेल तेवढी मदत करीत होता.
                 तळणी गाव तसं छोटेसेच, पण पार आडवे झालेय. गावातली घरं बैठी व इमल्याची होती ती कोसळून गेली आहेत. कोठेही नजर जावी अन दगड मातीची रासच रास आपल्या नजरेस यावी. जुने पुराणे पण भक्कम वाटणारे लाकडी खांब पार गाडले गेलेत ! क्वचित, ढिगामधून त्यांचा एक भाग डोकावून ' मी एवढा भक्कम असून देखील माझ्या ' माणसांना ' वाचवू शकलो नाही ' हे आपल्याला केविलवाण्या अवस्थेत सांगतोय आणि आपण त्या दगड मातीच्या राशी इतकेच निर्विकार होऊन तेथे उभे राहून ऐकतोय ! असे वाटण्याजोगी तेथली परिस्थिती.
                 इमल्यांचे अवशेष कोठे कोठे डोकावतात आणि त्या इमल्यांच्या अर्धवट राहिलेल्या भिंतींना लटकावलेले समस्त देवादिकांचे फोटो आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात, तर कोठे घरातल्या वायरींचे घोस लोमकळणाऱ्या अवस्थेत व त्यातच अडकलेला एखादा सिलिंग पंखा वाकड्या तिकड्या रूपात आपल्या नजरेस दिसतो.
             तळणीचेप्रमुख देवस्थान नागनाथेश्वराचे.  देव सुस्थितित आहे पण त्याचे सभोवतालच्या दोन दगडी भिंतींना तडे गेलेत ! पाठिकडील एक कोपरा कळसापासून खालपर्यंत ढासळलेला आहे.
              किल्लारी अन तळणीत आम्ही जमेल तेवढी कामे इतर स्नेह्यांच्या मदतीने करीत होतो. मुंबईतील प्रसिद्द महिंद्र अँड महिंद्र कंपनीचे कर्मचारी,केव्ह एक्सप्लोरर्स-मुंबई या संस्थेचे अनुभवी गिर्यारोहक मित्र व इतर कार्यकर्ते एक दिलाने दोन्ही गावात मदतीचे कार्य करू लागलो. कधी एखाद्याची अडकलेली बेगडी। काढून दे,तर कधी कोणाची भांडी, लाकूड सामान, वस्तू, कापडं ढिगातुन काढ, तर केव्हा एखाद्या इमल्याची घरातील धोक्याच्या ठिकाणी असणारे स्टीलचे कपात कौशल्याने काढण्यास मदत करावी, कोणी गावात जाऊन सर्वेक्षणाचे निमित्ताने चौकशी करून कोणा गावकऱ्यांच्या अडचणी कोणत्या आहेत, कमतरता मार्गाने दूर करता येईल,याची धडपड करीत होते.
            या कामातून देखील याTवाणीत राहणारे क्षण सांगावेसे वाटतात.....
          तळणी गावात चांद नावाच्या गृहस्थाच्या घर होते. भूकंपात हे कुटुंब ढिगात सापडले. सात-आठजण असावेत. यात एक १७/१८ वर्षाची तरुण मुलगी देखील होती. तिने स्वतःची सुटका करून इतरांचीही सुटका केली. मात्र दोन जणांना ती वाचवू शकली नाही.ही धाडसी तरुणी आणि चांद आपल्या महत्वाच्या वस्तू काढण्यासाठी तेथे येत व अमचेकार्यकर्ते त्यांना मदत करीत.
             जमविलेल्या जुन्या कपड्यांचा ढिग आमच्या कार्यालयात पडला होता. गरजुनाचत्यातले कपडे द्यावेत हा आमचा हेतू. दुसऱ्या ठिकाणाहून येथे येऊन राहणारे लोक या संधीचा फायदा घ्यायला बघत. खोटे बोलून व रडून बतावणी करीत आग्रह धरायचे, आशण आम्ही कपडे देत नव्हते. मनातून चीड यायची त्यांची.पण वरकरणी समजावून परत पाठवायचो.
             किल्लारी गावात एक मोठी शाळा आहे. शाळेच्या पटांगणात साधूंच्या एक गटाने तेथल्या काही गावकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली. मग चेंगराचेंगरी आणि कलकलाट ! यातले काही स्थानिक नसायचे ! पण कोण काय करणार ?
            कपडे पुरविण्याबाबतीत येथील गावकऱ्यांच्या पुनर्वसन कॅम्पमध्ये चौकशी केल्यावर एक अजब प्रकार समजला. शहरातून येणारे लोक यांना जे कपडे देऊ करीत त्यात बहुतेक फॅशनेबल कपडे असायचे.मॅक्सी,मिडी, पंजाबी ड्रेस,जिन्स पॅन्ट वगैरे वगैरे..' या साऱ्यांच्या आम्हा गावातल्या लोकांना के उपयोग सांगा बरं ? अहो, परकर-पोलके अन पाच-नऊवारी साड्या नसणाऱ्या बाय आम्ही ', हे ऐकल्यावर उबग यायचा त्या समाज सेवकांचा.
              तळणीत एक मठ होता. त्यात राहणार एक गोसावी, त्याचे नाव होते ब्रम्हचारी सुकदेव गिरी. वय असावे साठच्यावर. शरीर कृश, वर्ण काळा. अंगावर लालभडक खमीस आणि धोतर. या बाबांचे सामान काढीत होते लष्कराचे जवान. आम्ही त्यांना हातभार लावायला सुरुवात केली. बाबा डोक्याला हात लावून शून्य नजरेनं एका ढिगावर कोपऱ्यात बसलेले.
              शोधताना छोटा तांब्या मिळाला.मग एक घोगडे मिळाले, अर्धे अधिक काही फाटलेले. काही कापडं देखील सापडली. फाटलेली असूनही ती सोडायला बाबा तयार होईनात ! मध्येच एकदा पैशाची पुरचुंडी मिळाली. सहाशे अठ्ठावीस रुपयांची ! बाबा हळूहळू सावरू लागले. मात्र मध्येच काही आठवले की, दुःखी होत. आमचे काही दोस्त त्यांचे सांत्वन करू पाहात. बोलता बोलता बाबांनी त्या रात्रीची हकीकत सांगितली.....रोज मठात चार-पाच जण झोपत असत. बाबा त्या रात्री लातूरला वस्तीला होते. भूकंपात मठातील सारे सापडले अन एकजण दगावला होता.
               आम्ही बाबांना सारखे महाराज महाराज संबोधू लागलो तेव्हा ते उद्गारले- ' अहो, मी कसला हो महाराज !
गावातल्या लोकांना इथं आणून जुगार,दारू आणि कसली कसली मदत करायचो. मला तुम्ही महाराज नाका म्हणू ! ' याचवेळी त्या ढिगात एक जुनाट पेटी सापडली. महाराजांच्या पेटीमध्ये पन्नास रुपये,एक पोथी, जुने कपडे, व गंजची पुडी सापडली !
               तळणीत काम करीत असताना एकदा गुंडूराव पाटील म्हणून एक गृहस्थांनी आमची मदत मागितली. त्यांची जुनी परंतु किमती भांडी ढिगात अडकली होती. ती काढून द्यायची होती.काम सुरू झाले. खूप वेळ झाला.पण भांडी काही सापडेनाथ. फक्त धान्याची कुसलेली कणगी, लाकडी पाट, अशा किरकोळ वस्तू तेवढ्या मिळाल्या. या कामात थकायला झाले. पाटील निराश झाले. शेवटी हे काम थांबविले त्यांनी. खरा प्रकार असा घडला होता की, भूकंप। झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाहेरून आलेल्या बघ्यांची रिघ या गावात लागली. त्यावेळी काही लबाड लोकांनी संधी साधून हाती येईल ते घेऊन पोबारा केला ! पाटलांनी हे आम्हाला खिन्नपणे नंतर सांगितले.
               किल्लारी, तळणीआणि मांगरुळ ही गावे एकमेकांपासून फार लांब नाहीत. पैकी माकणी धरणाला जवळ असणारे गाव तळणी व मांगरुळ. तेथे बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्यांना खूप ठिकाणी पडलेल्या भेगा प्रत्यक्ष बघितल्या.
              तळणीतल्या त्या बाबांचे काम करीत असताना बाजूच्या एक घराचा ढीग पोलिसांचे प्रशिक्षणार्थी उपसीत होते. घर मालकाचे नाव महादेव कृष्णा कळशेट्टी कुटुंबात वाचलेला हा एकमेव. दुःख करून करून निर्विकार झाला होता बिचारा. पोलिसांना कामात तो मदत करीत असताना एकाला भिंतीवरील घड्याळ सापडले अन महादेव आनंदाने ते घेऊन जवळच्याना दाखवू लागला. घड्याळ सुस्थितीत होते. फक्त ते बंद पडले होते. भूकंपाची नेमकी वेळ कोणती ते दाखवून(पहाटे ५.४०) !
               किल्लारीतील जुने आणि प्रसिद्द असे निलकंठेश्वर आता साफ झालेय, फक्त देव व जवळपासचा भाग सुखरूप अवस्थेत आहेत.
               भूकंपग्रस्तांना करावयाच्या मदती संदर्भात पाहाणी करायला किल्लारी तळणी परिसरात दिवसभर येणाऱ्या मोटारी व त्यातून येणारे शासकीय अधिकारी,मंत्री, व्हीआयपी पुढारी, काही अंशी मदतकार्यात अडथळा आणीत. म्हणजे कार्यकर्ते अथवा कोणी कर्मचारी काम करीत असेल तर ते, या लोकांचे आगमन झाल्यावर थांबवले जाई. करण एकच.त्यांची सुरक्षा ! गंमत म्हणजे नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अगदी पांढरे शुभ्र कपडे घालून चामड्याच्या बुटांसह भर चिखलात, तैनाती फौजेसारखे या व्हीआयपींच्या स्वागतास उभे राहात. जोडीला अर्थातच खाकी वेशतले पोलीस !
           किल्लारीत एक सायंकाळी काही फॅशनेबल पुढारी लव्याजम्यासह आले. गावातील चौकात त्यांचा टेम्पो उभा राहिला. भूकंपानंतर असंख्य मृतात्म्यांची शरीरे ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जमा केली गेली होती ते हे ठिकाण. त्या ठिकाणी आमच्या या पुढाऱ्यांनी लग्नात जसा फोटोचा सोहोळा करतात,त्या पद्धतीने स्वतःचे फोटो काढून घेतले !
            किल्लारीत पुनर्वसन केन्द्रात गावकऱ्यांशी एकदा बोलत असताना रस्त्यावर एक मिनी ट्रक येऊन उभा राह्यला.त्यावरील कापडी बॅनरवर हार्व्हेस्ट व्हिजन मिनीस्टर्स - मुंबई असे ठळक अक्षरात लिहिले होते. जवळपासची आयबाय अन पोरं टोरं लगबगीने जमा झाले. हा प्रकार जवळून पहावा म्हणून मी, संजय नेवे व चेतन दिवेकर टेम्पो पासून काही अंतरावर उभे राहिलो. जवळपास  ३०-४० गावकऱ्यांचा जमाव असावा तो. त्या संस्थेचे दोनतीन टिपटॉपकार्यकर्ते जमावात मिसळले. एकीकडे त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण सुरू  झाले. लोकांचा गोंधळ वाढू नये म्हणून शांततेचे आवाहन करण्यात आले. एका कार्यकर्त्याने ट्रकमधून पार्ले ग्लुकोज बिस्किटचा मोठा बॅाक्सबाहेर आणला. म्होरक्या तरुण कार्यकर्त्याने तो बॅाक्स उघडून एक पुडा हातात घेतला व लोकांना, म्हणजे त्या कॅमेऱ्याला दाखविला. आंग्ल भाषेत त्यांचे प्रवचन सुरू झाले......Look,they are in such position.......in bad situation........they need our help ....they need food.Now they are taking.......
                गावकऱ्यांत चुळबुळ सुरू झाली.ते एकमेकांकडे भांबावून पाहू लागले....त्यांना ती आंग्ल भाषा उमजेना. वस्तू मिळण्याची चिन्हे दिसेनात. आपण येथे का थांबलो आहोत हा त्यांना प्रश्न पडला. जमवत चारदोन तरुण हातवारे करून त्या कार्यकर्त्यांना विचारू लागले. परंतु ढिम्मपणे तो प्रवचनकार तरुण कॅमेऱ्याकडे पाहत व हातातील पुडा फिरवीत बोलतच होता.
             मग गलगला वाढू लागला, एक जण ओरडला- ' अरे,देत न, काय नाय उगी आपली बडबड कराया आलात ? .....' एक कार्यकर्ता त्यांना हिंदीत समजावू लागला- ' अरे भाई, सुनो,सुनो आपका पिक्चर आईग. टि.व्ही.पर देखने मिलेगा ' त्याला कोणीतरी शिवी हासडली. हळूहळू जमाव त्या खोक्याजवळ आला.आता आपले काही खरे नाही हे लक्षात आल्यावर त्या कार्यकर्त्यांनी आवरते घेतले. नेमक्या याच क्षणाचा फोटो मी घेतला. फ्लॅश पडल्यावर मात्र ते चपापले. तो बोलणारा कार्यकर्ता पटकन जवळ आला आणि धमकीच्या सुरात बोलू लागला.गव्हर्नमेंट व प्रेसचे आहोत म्हटल्यावर त्यांनी थोडे आवरते घेतले. ते माघारी फिरले !
             अशा अपवादात्मक गोष्टी सोडल्या, तर बरेचसे लोक होईल तेवढी मदत या संकटग्रस्तांना करीत होते. मग त्यात सचिव, जिल्हाधिकारी, मंत्रीगणांचे सहाय्यक, सरकारी कर्मचारी आले,अन विविध स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते देखील.
भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देण्यात सिंहाचा वाटा अर्थातच लष्कराकडे जातो. लष्कराचे जावं आणि अधिकारी यांनी तातडीची कामे अखंडितपणे केलेली आहेत. पोलीसांचे काम देखील तेवढेच महत्वाचे. तीन तीन दिवसांची ड्युटी लागोलाग पणे त्यांना वाजवण्याची पाळी येई. जिल्हा परिषद। आणि शाळांचे शिक्षक वेलकल न पाहता कामात मग्न राहात.
              आपल्या कामातून वेळ मिळाला की पुनर्वसन केंद्रात जाऊन कोना गावकऱ्यांचे शब्द ऐकणे व त्यांची सध्याची अवस्था पाहाणे हा एक वेगळा अनुभव होता.परदेशातून मदत म्हणून मिळालेले अद्यावत तंबू कोणाला द्यावेत या बाबत निर्णय घ्यावा लगे. सगळ्यांनाच तंबू लावणे जमत नसे. तंबू लावून दिला तर त्यात चूल कशावरून नाही पेटविणार ? ही भीती होती. तेव्हा शासनाच्या अधिकाऱ्यांची माजी सैनिकांच्या मदतीने तंबू लावून दिले. गावकऱ्यांशी बोलताना विषय निघाला की ते तंबूबाबत सांगीत.
              भूकंपाने लहानथोर मुलांच्या शिक्षणाचे बारा वाजवले. सुदैवाने काही संस्था त्यांना चालू वर्षाचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी पुढे आल्या. या भूकंपात जी घरे व वाडे कोसळले त्यांत कित्येकांची कागदपत्रे, पैसेअडके, दागिने,रेशनकार्डस,शेतीवाडीचा आधार ठरणारी गुरेढोरे गेली. कोणाचा एकुलता एक मुलगा दगावला तर कोणाची लेक गेली,कोणी आपल्या आई वडिलांना मुकले तर कोणाचे नवजात मूलदेखील देवाघरी गेले.
              किल्लारीत असताना एकदा पहाटे( ९ ऑक्टोबर १९९३) झालेल्या भूकंपाने चांगलाच दणका दिला. आदल्या रात्री वाड्याच्या आवारातील टेंटमध्ये खाली चिखल असल्याने त्यावर जवळच असलेल्या लाद्या व्यवस्थितपणे साऱ्यांनी बसविल्या व त्यावर मोठे कापड अंथरल्यावर काहीजणांच्या झोपण्याची सोय झाली. सगळे कार्यकर्ते निद्रेच्या अधीन झाले होते. मात्र राजेंद्र टन्नू, संजय नेवे आणि आणखी एकजण असे काही मध्यरात्रीपर्यंत वाड्याच्या एक कोपऱ्यात गप्पा हाणीत होते. नंतर  ते झोपायला आले. फक्त टन्नू आपल्या दिवसभराच्या कामाचा रिपोर्ट डायरीत लिहू लागले.
             बरोबर २.१५ ला धरणी गदागदा हलू लागली ! अन गाढ झोपेत असणारे आम्ही अवघे जागे झालो. मी तर ताडकन उठून जमीन हलतेय, हलतेय असे म्हणीत सैरावैरा तंबूबाहेर आलो ! सिरिअस सगळेच झाले होते. आयुष्यात अनुभवलेला हा दुसरा मोठा भूकंप !झोपेतून उठताना जमिनीच्या खाली समुद्राच्या लाटांचा आवाज कानात स्पष्टपणे ऐकू येत होता.
            आता आम्ही टेंटमध्ये एकत्र बसलो आहोत, काही बोलत आहोत तोवर पुन्हा जमीन हलली.(वेळ-२.१७) त्यानंतर एखादा क्षण गेला असावा. परत हलकासा धक्का बसला व त्यानंतर २.१९ ला पुन्हा एक धक्का !
             हा भूकंप झाला तेव्हा उडालेली आपली भित्री तारांबळ आणि दुसरीकडे मदतीच्या कामात आग्रहाने काम करणारे आपण ! खरे कोण आणि खोटे कोण ? सगळाच विचित्रपणा !
             आपण लोक किती सुखी आहोत. या दुःखीतांचे सारे गेलेय. आपण फक्त त्यांच्या तात्पुरत्या सोयी लावण्यासाठी इथे येतो. अशानं त्यांचे गेलेले थोडेच परत येणार आहे ? निराश झाल्यावर मन म्हणे की, या ठिकाणी आपण किती काळ काम करू शकू ? आपली क्षमता तेवढी आहे का ? शासन आणि लष्कर यांनी तर मोठ्या प्रमाणावर मदतीचे काम करून ठेवलेय.
             या सगळ्या प्रश्नांना मनाचा एक कोपरा उत्तर देई. मदतीच्या कार्यात आपण साऱ्यांनी आपल्या परीने हातभार
आवळा आहे. खारीचा वाटा असला तरी तो कमी महत्वाचा नाही. शासनाला अनेक स्वयंसेवी संघटनेची व कार्यकर्त्यांची मदत लाभलीय. दुःखीत लोक देखील अधिक विश्वासाने कार्यकर्त्याकडे पाहत होते. त्यामुळेच उजाड झालेल्या वस्त्यां आता नव्या रूपात आणि भक्कमपणे उभ्या राहिल्या, मात्र भविष्यात निसर्गाने सुद्दा साथ द्यायला हवीय नाही का ?


                                                                                -------------------

💐परिसर...............
               मुंबईतील पश्चिम उपनगरात शांत असे एक ठिकाण आहे. त्या परिसराला जुहू म्हणतात. विलेपार्ले च्या पुढे आणि अंधेरीच्या अलिकडील हा भाग सुखवस्त ूअशा लोकांच्या निवासस्थानांचा भाग. त्याच जुहूतील इस्कॉनमध्ये काही दिवसाची नोकरी करताना झालेला अल्पसा परिचय.........

                                                                  💐इस्कॉनचे दिवस.

                कॉलेजमध्ये होतो तेव्हाची गोष्ट. नोकरी नव्हती. रोज पेपरच्या जाहिराती बघे. एकदा ' इस्कॉनची ' पेपरमध्ये  जाहिरात वाचली. अर्ज केल्यावर मुलाखतीसाठी उत्तर आले, असिस्टंट म्हणून नेमणूकही झाली.
                विलेपार्ले-जुहू मधील इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्ीय भक्तीवेदांत संघटना. भगवान श्रीकृष्णाच्या तत्वांचा प्रसार करणारी ही विश्वविख्यात संघटना, अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांत देखील कार्यरत आहे. प्रभूपाद स्वामी तीचे प्रमुख. त्यांचे जगभरातील अनुयायी या भक्तीवेदांताचा अभ्यास करतात.
               मुंबईतील शांत आणि रमणीय वाटणाऱ्या जुहू भागात इस्कॉनने एक देखणे श्रीकृष्ण मंदिर बांधलेय. इथल्या श्रीकृष्णाची मूर्ती  मनोहर आहे. तीचा साजशृंगार मोहक आहे. या मंदिराच्या आवारात हरेकृष्ण आश्रमाची  इमारत आहे.
               या आश्रमात राहायचे असेल तर  काही पथ्ये पाळावी लागतात. मांसाहार, धूम्रपान आणि मद्यपान येथे चालत नाही. स्वतःचे मुंडण करावे लागते. पांढरेशुभ्र धोतर नेसावे लागते. महिलांनादेखील  काही पथ्ये पाळावी लागतात. गळ्यांत माळा अन कपाळी केशरी टिळा असा आश्रमवासीयांचा सर्वसाधारण वेश असतो. आपल्या सुहास्य वदनाने  सर्वत्र वावरणाऱ्या साधकांमुळे येथले वातावरण सदैव प्रसन्न असते.
                 मी या ठिकाणी जेमतेम आठवडाभर नोकरी केली असेंन, पण या अवधीत आलेले अनुभव सांगण्यासारखे आहेत. मी ' स्टोअर 'मध्ये होतो असिस्टंट म्हणून. रेशन आणि स्वयंपाक इ.साठी लागणारे सामान स्वयंपाक्यांना द्यायचे, त्याची नोंद ठेवायची, ही कामे मी करायचो. तेथला स्टोअरकीपर होता दाक्षिण्यात्त तरुण, त्याचे नाव परमेश्वर ! आमचे दोघांचे छान जमत असे. एकमेकाना मदत व्हायची. त्याच्यावर एक वरिष्ठ माणूस होता. तो  सदा वैतागत असे. अर्थात, माझा त्यांचेशी जास्त संबंध आला नाही.
                इस्कॉनचा सारा स्वयंपाक, खाद्यपदार्थ अस्सल तुपात तयार होत असे. आनंदाची गोष्ट म्हणजे  तेथे जेवण मिळत असे रोज. मी कॉलेज करून कामावर येतो, हे इथल्या मुख्य स्वामींना(अधिकारी) सांगितले असल्यामुळे सकाळी नऊ ते चार ही माझी सोयीची वेळ त्यांनी ठरवुन दिली. रोज सकाळी आल्याबरोबर जेवण आणि जाताना जेवण असा मामला होता.
                काही दिवसांपूर्वीच येथे एक घटना घडली. आश्रमाजवळ राहणाऱ्या एक व्यक्तीस जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली होती. या आश्रमातील काहीजणांचा त्यात सहभाग असल्याची वदंता होती. त्यावेळी हे प्रकरण वृत्तपत्रात येत होते. ' श्री ' साप्ताहिकाने या प्रकरणी स्पेशल रिपोर्ट छापला होता.
                 प्रत्यक्षात मला येथे प्रथमदर्शनी तरी काही आढळले नाही. अर्थात मी जास्त खोलात गेलो नसेन, आणि कामाच्या व्यापात वेळ तरी कोठे होता फिरायला ? इस्कॉनचे एक छोटे पण आधुनिक हॉटेल होते तेथे. पण त्यावेळी परवानगी मिळाली नव्हती म्हणून बंद असायचे ते. आश्रमाच्या इमारतीत तळघरात एक मिनी थिएटर होते. मी अधूनमधून ते न्याहाळायचो.
                 आमच्या स्टोअरमध्ये याचवेळी एक नोकर कामावर येऊ लागला.तो चोरी करायचा. माझ्या देखत एकदा त्याने स्टीलचे चांगले काटे-चमचे लांबविले. तो बोलायचा भरपुर. मी राजेश खन्नाकडे जेवण करायला जातो. इथल्या  खूप सिनेनटांकडे माझे नोकर म्हणुन जाणे येणे आहे. या त्याच्या गोष्टी आम्ही ऐकायचो. हा चोर गृहस्थ दोन दिवसांनी गडप झाला. माझी नवीन घेतलेली सॅंडल देखील त्यादिवशी गेली !
                  इस्कॉनच्या मंदिरात रोज दोन वेळा आरती व्हायची. सारे भक्तगण एकाग्र होत आणि रंगून जात आरती म्हणताना. आरती आणि भजनाच्या तालावर तो परिसर दणाणून जाई. तासाभराने आरती संपली की, उत्तम तुपातला शिरा ' प्रसाद ' म्हणुन वाटण्यात येई.            
                  मला या नोकरीचा त्यावेळी का कंटाळा आला कळत नाही. पण मी ते ठिकाण सोडायचे ठरवले. कामावर जायचे थांबवले. नंतर काही आठवड्यानी तेथे जाऊन,कामावर येणे जमणार नाही असे सांगितले.पगार देण्याची विनंती केली.
काही दिवसांनी तो मिळाला आणि माझे इस्कॉनशी जाणे येणे थांबले
                  इस्कॉनमध्ये मी नोकरी केली असती, तर एव्हाना स्टोअरकीपर झालो असतो. पुढचे प्रमोशनही मिळाले असते. पण तसे व्हायचे नव्हते. असो.....
                  आता तेथे गेलो की तेथल्या स्वादिष्ट खाण्याची आठवण येते. तिथल्या गंमतीजमती आठवतात.  जुहूच्या
 शांत परिसरात इस्कॉनचे सुंदर मंदिर आजही दिमाखात उभे आहे. तेथे रोज पुर्वीच्याच जल्लोषात आरती होते, श्रीकृष्ण भक्तीची भजनं होतात. दर्शन आणि प्रसादासाठी खूप भाविक येतात. आता जन्माष्टमीच्या उत्सवात तर, तेथे अलोट गर्दी  होतेे. सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात असतो.
                श्रीकृष्ण मंदिर प्राकारात  फिरताना  माझी पावलं तेथे रेंगाळतात. देखण्या आणि तेजस्वी अशा श्रीकृष्णाकडे पुन्हा पुन्हा नजर जाते. ' तो ' सुद्दा स्मितहास्य करून माझ्याकडे पहात असतो, मला म्हणतो-" आपली अजूनही मैत्री आहे बरं का !

                                                                               ------------------------
🌺चित्रपट गप्पा.............
                     देशी विदेशी चित्रपट पाहण्याची ' दृष्टी ' मला प्रभात चित्र मंडळामुळे मिळाली, त्याविषयी मी यापूर्वी लिहिले आहे. आज तुमच्या पुढे मी माझ्या नजरेतून पाहिलेल्या आणि मला भावलेल्या काही चित्रपटांविषयी तुमच्याशी थोडक्यात संवाद साधणार आहे.........

💐मायकल क्वालिन्स--दिग्दर्शन-नील जॅार्डेन  (अमेरिका)
                   खरोखर एक सुंदर चित्रपट पहिल्याचं आनंद झाला. आयरिश स्वातंत्र्य(Freedom)  लढ्याची ही कहाणी. नायकाने स्वतःला या लढ्यात झोकून देणे, सहकार्यांना त्याने दिलेली उमेद. प्रसंगी कठोर वागून त्यांचेवर नियंत्रण ठेवणे व लढ्याची दिशा ठरवून  जुलमी राजसत्तेला त्रस्त करणे, हे सारे चित्रण कलावंतांनी व दिग्दर्शकाने अगदी जिवंतपणे उभे केलेय.
                 नायकाने एवढी धडपड करूनही हाती आलेल्या यशाच्या क्षणी सहकाऱ्यांच्या टीकेला तो बळी पडतो. यातच त्याची शेवटी होणारी हत्या आपल्याला अंतर्मुख करते.
                 चित्रपटात ' प्रेम ' हा विषय सहज येऊन गेलाय. ही प्रेमाची गुंतागुंत दोन घनिष्ट मित्रांना दुरावते. मायकलला किटी मिळते खरी, पण मृत्यु त्या दोघांना एकत्र येऊ देत नाही.
                सर्व कलावंत अस्सल वाटले. या सुंदर चित्रपटाच्या यशाचे श्रेय सर्वप्रथम नील जॅार्डेनला द्यायला हवेय.

                                                   ..............................
💐कोख--दिग्दर्शन--आर. आर. विकल(भारत)
                  वेधक विषयाची हाताळणी दिग्दर्शकाने कौशल्याने केल्याचे ' कोख ' पाहिल्यावर जाणवते. स्त्री मग ती शिकलेली असो वा अडाणी, तिच्यापुढे उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला नाईलाजाने तिला सामोरे जावे लागतेय. तिच्या विरोधाला कोणी विचारीत नाही. मदतीचे हात स्वार्थी निघतात. पण त्यांचेशी जुळवून घ्यावे लागतेय तिला. मात्र अशा या जगण्यात देखील तिला(तुडी) देवमाणसं भेटतात आणि उमेद देतात. हे चित्रपटातील वास्तव परिणामकारक आहे. मात्र चित्रपटाची मांडणी पसरट झालीय. 
           ' कोख ' मध्ये शेवटी तुडीच्या मुलाने आपल्या आईचा उपभोग घेऊन तिला टाकणाऱ्या चांदगीची केलेली हत्या तर्कसंगत नाही वाटत. 
            आणि भूमिकांबाबत बोलायचे झाले तर, पंकज कपूरचा भोपा लक्षात राहिलाय. चित्रपटात ढोंगी राजकारण्यांवर चांगलेच कोरडे ओढलेत.
                      
                                                   .................................
💐सिक्स्थ  हॅपीनेस--वारीज हुसेन (अमेरिका )
                 आपल्या भवतीच घडणारी ही करून कहाणी पाहिल्यावर खूप अस्वस्थ झालो. नायकाने स्वतः कथन केले अनुभव आयुष्य मनातून जाईना. 
                  अपंग नायक ब्रीद हा तरुण आहे. सुंदर तरुणीचा सहवास त्यालाही हवा असल्याची जाणीव यातील प्रसंग आपल्याला करून देतात. त्याचे आईवडील सर्वसामान्य पालक वाटले. म्हणजे ब्रीदच्या आईचे मुलावर प्रेम आहे. पण ओढ वाटत नाही. बाप ब्रीदकडे ' आफत ' म्हणून पाहतो. हे सारे बघून फील होते. 
                 आपल्या आयुष्यात समोर आलेल्या हरेक प्रसंगाला आपल्या खट्याळपणासह सामोरे जाणारा नायक फिरदोस कंगणे मोठ्या ताकदीने उभा केलाय. या चित्रपटातील बहुतेक प्रसंग वास्तवरूपात असल्याने ते पाहताना आपण गुंग होऊन जातो. त्या कुटुंबाचे दुःख आपलेच वाटून अस्वस्थता येते. आपले हे शरीर काही उपयोगाचे नाही, असे समजणारा ब्रीद शरीर सुख मिळाल्यावर, ' आपले शरीर निरुपयोगी नव्हते ' या निष्कर्षाप्रत शेवटी आलाय.
                यया चित्रपटाचे कथानक जबरदस्त वाटले. वारीज हुसेनने ते समर्थपणे आपल्यापुढे आणलंय. कलावंतांमध्ये फिरदोस कांगा लक्षात राहतो. स्पर्धाविभागात ( कुठल्याही चित्रपट महोत्सवात) हा चित्रपट पाठविला तर याला निश्चित पारितोषिक मिळेल.

                                              ..........................................
 💐द जर्नी(Journey) --दिग्दर्शन--हरिष सलूझा (अमेरिका) 
              या चित्रपटातील नायक आयुष्यावर अतोनात प्रेम करणारा,  भाबडा आणि आधुनिक वास्तव जगाशी समरस होऊ न शकलेला असा नायक आहे.
                 परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलाकडे वास्तव्य करताना सुनेला किशनचा भारतीय अघळपघळ पद्धतीचा वावर खटकतो. ती सुजाण आहे. कविमानाची आहे. पण तिला सासऱ्याचे वागणे पटत नाही. मुलालाही वडिलांचे वागणे खटकतेय. पण तो संयमाने त्यांचेशी वागतो. त्याच्या अशा सहज कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतो. यात त्याला पत्नी पत्नीला समजावणे जड जातेय. येथे पती-पत्नीमधील ' पूर्व पश्चिम ' भेद प्रेक्षकांच्या नजरेस येतात.  
               हळुहळु  किसनसिंगच्या हे लक्षात येते. तो नाराज होतोय. आतून दुखावतो. परदेशातील या आधुनकतेविषयी आयाम जुळवून घेणार किशनचा जुना मित्र, सुनेची एक हसतमुख मैत्रीण आणि स्वतःची नात. ही तीन माणसेच त्याला समजून घेणारी. परदेशातील या परिचित भारतीयांच्या एक पार्टीत घडलेला प्रसंग मात्र त्या सुनेला हा सासरा आपल्याच परिवर्ततील असल्याची जाणीव करून देतो, आणि तिचा सासर्याविषयी असलेला दुरावा निघून जातो.
             हा संथ लाईटला चित्रपट आहे.पण कंटाळवाणा वाटत नाही.तो पाहिल्यावर पूर्वेकडील माणुसकीचा ओलावा असलेला माणूस, व पश्चिमेकडील यांत्रिकतेत गुंतून जाणारा माणूस यांचे प्रेम ( आणि त्यानंतर संसार ) तरी कसे होऊ शकते याचे कोडे वाटले. हा चित्रपट लक्षात राहतो, तो कथेमुळे, दिग्दर्शकामुळे नाही.

                                             ....................................
                     प्रतिक्रियेसाठी संपर्क- yescharudatta@gmail.com