Sunday, 1 March 2020

💐चला कोकणात💐


💐चला कोकणात💐
              कोकणात फिरताना  व  वावरताना बऱ्याच ठिकाणी नवीन माहिती मिळते. ऐतिहासिक वास्तू, व्यक्ती  किंवा कलाप्रकाराचे वैशिष्ट्यदेखील ज्ञात होते. कोकणाविषयी मला जे ज्ञात आहे, ते तुम्हास माहित व्हावे, म्हणून ही कोकण कोडे मालिका रुपात गेल्या वर्षी सुरू केलीय. आता ही  २०२० ची ज्ञान सफर….………….


💐कोकण कोडे-१/२०२०
१.उत्तम तांदुळ पिकाचे वाण  व त्यावर अविरतपणे संशोधन करणारी राज्यातील अग्रगण्य तसेच देशात प्रसिद्द असलेली संस्था
   रायगड जिल्ह्यात कुठे आहे ?
२.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणारी व नवनवीन शोध-संकल्पना यांमधून त्यांना प्रेरणा देत
   परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य जपणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘वसुंधरा विज्ञान केंद्र’ ही संस्था कुठे आहे ?
३.हा कोकणातील सर्वात मोठा जल विद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात कुठे आहे ?
४.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय लोकप्रिय असलेला हा पारंपारिक नाट्यकला प्रकार आहे.
५.पालघर जिल्ह्यामधील चिकू या गोड फळासाठी  भारतात प्रसिद्द असलेला तालुका कोणता ?
६.नागाव, आक्षी, सागर,चौल, आवास,किहीम,थळ,अलिबाग, ही आठ गावठाणी ‘अष्टागर’ म्हणून प्रसिद्द आहेत, ती कुठल्या
   जिल्ह्यात वसली आहेत ?
७.परदेशी पर्यटकांत ‘Lord of Dunes’ म्हणून प्रसिद्ध असणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोणते ?
८.दापोली तालुक्यामध्ये आंजर्ले गाव प्रसिध्द आहे, तेथे वाहणारी नदी कोणती ?
९.स्वराज्याच्या काळात समुद्र रक्षणाचे जाणते सरखेल कान्होजी आंग्रे यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्द असणारा श्रीवर्धन-
   आंजर्ले परिसरातील दुर्ग कोणता ?
१०.निसर्ग सुंदर कोकणाचे वैभव टिपणारी प्रसिद्द अशी कविता लिहिणारे कोकण सुपुत्र कवी कोण ?
११.विजयदुर्गाचे मूळ नाव काय ?
१२.मराठी साहित्यात विख्यात ठरलेले नाव म्हणजे वि.स.खांडेकर. त्यांचा आवडता व त्यांची आठवण साहीत्य प्रेमींना जागती
     ठेवणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्द किनारा कोणता ?
१३.कोकणात तळेरे(किंवा तरळा) परिसरात वैभववाडीच्या दिशेने जाताना वाटेत एक प्रसिद्द बारमाही धबधबा पर्यटकांना
     खुणावतो, त्याचे नाव ?
१४.स्वराज्यकालीन आरमाराची गोदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होती. ते ठिकाण कुठे आहे ?
१५.कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा सीमेवर(फोंडा घाट) कोल्हापूर हद्दीत वसलेले आणि रानगव्यांसाठी प्रसिध्द असलेले अभयारण्य कोणते ?
१६. फळांचा राजा ‘हापूस आंबा’ म्हणजे जणू  अमृत फळ ! मात्र ‘हापूस’ चे मूळ नाव काय ?
१७.रत्नागिरी जिल्ह्यात अतिशय लोकप्रिय असलेला  पारंपारिक नृत्यकला प्रकार कोणता ?
१८. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते शहर ‘सुंदर अन कलात्मक लाकडी’ खेळण्यांसाठी प्रसिद्द आहे ?
१९.उत्तर कोकणात पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळ एक मोठे बंदर विकसित होत आहे, त्याचे नाव काय ?
२०.संस्कृत वाङमयात कोकणचा उल्लेख कोणत्या नावाने होतो ?


--------------------------------
उत्तरे:-
१.कर्जत
२.नेरूर-( कुडाळ मालवण मार्गावर)
३.पोफळी-कोयनानगर
४.दशावतार
५.डहाणू
६.रायगड
७.गणपती पुळे
८.जोग नदी
९.सुवर्ण दुर्ग
१०.माधव केशव काटदरे
११.घेरिया
१२.शिरोडा
१३.नापणे-शेरपे.
१४.गिरये(विजयदुर्ग)
१५.दाजीपूर अभयारण्य
१६.अल्फान्सो अलबुकर्क-पोर्तुगीज खलाशी, याने गोव्यात हापूस आंब्याची लागवड केली, मग तो कोकणात आला.)
१७.जाखडी नृत्य
१८.सावंतवाडी
१९.वाढवण बंदर
२०.अपरान्त
                                                       :::::::::::::::::::::::::::

💐संस्थात्मक💐

💐संस्थात्मक💐                
                        दैनंदिन जीवनोपयोगी वस्तू, खाद्यान, मालमत्ता, इत्यादी खरेदीव्यवहार करताना ग्राहकाने कसे जागृत असायला हवे, याचे प्रबोधन करणारी ‘मुंबई ग्राहक पंचायत’ ही सर्वदूर महाराष्टात परिचित असलेली ग्राहक संस्था आहे. या संस्थेने ग्राहकांच्या हितासाठी चांगल्या योजना कार्यान्वित केल्या असून त्यास ग्राहक सभासद-संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.


                        ‘मुंबई  ग्राहक पंचायत’ ही संस्था  दैनंदिन आवश्यक वस्तूंची खरेदी विभागवार पद्धतीने करताना नफ्याकडे पाहात नाही, तर ग्राहकांचे हित पाहते, सुरक्षा जपते. वेळोवेळी ग्राहकांचे प्रबोधन व्हावे म्हणून एक नियतकालिकही प्रसिद्ध करते. सरकारी कायदे व नियम नेमके कसे आहेत, त्यात कोणता-कसा बदल झालाय,किती-कधी सुधारणा झाल्या, नवीन अंमलात येणाऱ्या कायदयामुळे सर्वसामान्य ग्राहक कितपत सुरक्षित झालाय, याविषयी ही संस्था तज्ज्ञांच्या सहकार्याने समाजप्रिय सरकारी अधिकारी व आपल्या सभासद संस्थांशी सुसंवाद साधण्याचे मोठे काम तीच्या स्थापनेपासून करीत आलेली आहे.
                   मुंबई ग्राहक पंचायतीच्या या कार्याची दखल राज्य-केंद्र आणि जागतिक स्थरावर घेतली जातेय. दिवंगत रामदास गुजराथी व आताचे अध्यक्ष ऍडव्होकेट शिरीष देशपांडे यांचे या क्षेत्रातील कर्तृत्व सर्वमान्य झालेय. अशा समाज संवेदनशील संस्थेच्या कार्याची छोटीशी ओळख मी येथे करून दिलीय.
                  १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन.  या ग्राहक दिनाच्या निमित्ताने, आपण ‘ग्राहक’ म्हणून दैनंदिन व्यवहार-खरेदी करताना किती जागृत राहायला हवेय, याबाबत मला आपणाशी संवाद करावयाचा आहे…...
💐ग्राहकराजा……
*वस्तूचा दर्जा-दर्जेदार वस्तू नामवंत उत्पादक कंपन्या  तयार करतात. काटेकोर कायदे पाळून व उत्तम दर्जाचे उत्पादन करून किंवा ती  खरेदी करून  गिऱ्हाईकापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे थोडी जास्त किंमत असूनही आपण विश्वासाने ती वस्तू घेतो.
*वस्तूची किंमत-कुठल्याही पॅक केलेल्या वस्तूची-मालाची विक्री (M R P) ही त्यावर छापलेली असते. त्यामुळे ती  खरेदी करण्यापूर्वी  आपल्याला निर्णय घेणे सोपे होते. साधी दुकाने, मोठे मॉल्स, किंवा डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये याच छापील किमतीला वस्तू आपण खरेदी करतो. त्यावर वेगळी कर आकारणी नसत
*वस्तूचे वजन-कुठल्याही वस्तूचे वजन हे पॅकिंग केलेल्या वस्तूवर इतर माहितीसह असतेच. मात्र सुट्या स्वरूपातसुद्दा काही वस्तू मिळतात, तेव्हा विक्रेता आपल्याला मागणीप्रमाणे तराजू(अध्ययावत असलेले)वर वजन करून  वस्तू देतो.
*खाद्यनातील भेसळ-हे प्रकार आरोग्यास हानिकारक असतात. त्यासाठी दक्षता म्हणून सरकारी यंत्रणा नेहेमी जागरूक असते. मात्र ग्राहकाने देखील नीट माहिती मिळवून दक्ष राहावयास हवे. काही प्रमुख खाद्याने आहेत की ज्यात भेसळ होऊ शकते. उदा. बेसन पीठ, दूध, मावा,तूप, विविध डाळी, तांदूळ, गहू, चहा पूड,हिंग, डिंक ,हळद, मध, कोल्ड्रिंक, अशा कितीतरी वस्तू आहेत…..
                     यावर उपाय काय ? तर खरेदी नेहेमी ‘चांगल्या’ दुकानांमधून करावी, कारण तेथे प्रामाणिकपणा जास्त असतो. व्यवहारात पारदर्शकता असते.पावत्या मिळतात. त्यातूनही फसवणूक झाली तर ग्राहक न्यायालयाकडे तक्रार दाखल करणे ग्राहकाला  सोपे जाते.
*इलेक्ट्रॉनिक वस्तू- ही खरेदी तशी स्वस्त नसते. वस्तूचा दर्जा, उत्पादक कंपनी, ब्रँड, ती घेतल्यानंतरची सर्व्हिस, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण ही वस्तू काही सारखीसारखी घेत नाही, म्हणून दक्षता घ्यायला हवी. मान्यवर-विश्वासू दुकानात जाऊन  या वस्तू खरेदी कराव्यात.  कुठल्याही ऑफरला महत्व देण्याऐवजी तीचा टिकाऊपणा, सुटसुटीतपणा जाणून घ्यावा. तीच्या  दुरूस्ती-देखभालीची काय तरतूद आहे ?  याची नीट विचारपूस करून खात्री झाली, की खरेदी निश्चित करावी.
*ऑनलाईन खरेदी- आता सर्वत्र ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले गेलेय. आपण घरबसल्या, मोबाईल-नेटवरून आवश्यक असलेल्या वस्तूची तपशीलवार माहिती घेऊ शकतो. किमती कळतात. कंपनी कळते. त्याला मिळणारा प्रतिसाद देखील समजतो. हे चांगले आहे. पैशाचा व्यवहारही विविध पर्यायी असतो.
                           मात्र याची दुसरी बाजू दुर्लक्षित करू नये. ऑनलाईन विक्री व्यवहार करणाऱ्या असंख्य कंपन्या आहेत. त्यातील निवडक कंपन्या तपासून खात्री झाल्यावर पुढचे व्यवहार करावेत. यात आपल्याला प्रत्यक्ष वस्तू पाहण्याची, निरखण्याची-तपासण्याची संधी नसते. डिलीव्हरी होते तेव्हाच वस्तू आपण प्रत्यक्ष पाहतो. वापरून पहा, नाही समाधान झाले तर रिटर्न् करा,पैसे परत करू, असे काही कंपन्या जाहिरातीत सांगतात. परंतु, ते थोडे  किचकट असते.
फ्री ऑफर्स-सेल---अगोदर म्हटलेय, की कुठलीही ऑफर पाहताना भुलून जाऊ नये. त्या वस्तूचे गुण-दर्जा याला प्राधान्य द्यावे, सारे नीट तपासावे. बऱ्याचदा कंपनीने एखादे उत्पादन कालबाह्य ठरविले, की क्लिअरन्स स्टॉकच्या नावाखाली विक्रीची धडक मोहीम सुरू करते आणि आपण ‘गिऱ्हाईक’ होतो !
*फसवणूक- आपली फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक ग्राहकाने काटेकोर राहायला हवेय. ग्राहकाची फसवणूक कितीतरी प्रकारे होते. उदा. अपुरे वजन, कालबाह्य वस्तू, चुकीची(जास्त) किंमत आकारणी, डुप्लिकेट कंपनीची वस्तू, इत्यादी प्रकारांनी ग्राहक फसू शकतो. वजनाची फसवणूक करताना उत्पादक काय काय शक्कल लढवतात, माहित आहे ? सेंटच्या बाटलीत गॅस टाकतात, खाध्य पदार्थ(वेफर्स,फरसाण, टूथपेस्ट, आणि अशा कितीतरी पॅकबंद वस्तू)  पॅकेट्स मध्ये जास्त हवा भरली जाते !
*नियतकालिके-आपण जागरूक ग्राहक व्हायचे असेल, तर नेहेमी वर्तमानपत्रात दैनंदिन आर्थिक व ग्राहकांशी निगडीत बातम्या वाचाव्यात, खूप उपयोगी माहिती मिळते त्यातून. असलेली माहितीही अध्ययावत होत राहाते.

*ग्राहक संस्थेचा संपर्क पत्ता-मुंबई ग्राहक पंचायत, ग्राहक पंचायत भवन, जेव्हीपीडी स्कीम,
                                                      जुहू, मुंबई-४०००५६.
*तक्रारीसाठी ग्राहक  न्यायालये-ही ‘ग्राहक संरक्षण मंच’ म्हणून जिल्हा मुख्यालयात कार्यरत असतात.आपण तिकडे दाद मागू शकतो.
*गृह खरेदी आणि रेरा(रिअल इस्टेट कायदा)-आयुष्याचे आश्रयस्थान शोधताना गृहखरेदीबाबत प्रत्येक गरजू माणसाने सदैव दक्ष असावयास हवे असे मला वाटते. पण घर म्हटले, की संवेदनशील माणूस हळवा होतो. गृहस्वप्नात सदैव वावरतो. दिवसरात्र स्वप्नात त्याला सुंदर व टुमदार घरे दिसू लागतात ! आटोपशीर(किंवा ऐसपैस) पण अध्ययावत फ्लॅट्स त्याच्या नजरेसमोर  दिसू लागतात.
                    ‘ काय ? स्टेशनच्या अगदी जवळ ! फक्त दोनपाच हजाराचा ‘ईएमआय’ भरायचा ! नंतर कर्जमाफीही मिळणार ? काय ! सर्व प्रकारच्या फर्निचर आणि टीव्ही-फ्रिजसह ताबा मिळणार ! जीम आणि क्लबची लाईफ मेम्बरशीप फ्री ! आणि वर सर्व ड्युटी-कर द्यायची देखील गरज नाही ! सोने पे सुहागा !’’.
                    दररोज वर्तमानपत्रात आणि मीडियावर,फोनवर दिसणाऱ्या आकर्षक जाहिराती भोळ्या व गरजवंत ग्राहकाला भुलवित असतात. मग अधिक वेळ न घालविता गरजू गृहग्राहक सरळ संबधित बिल्डर, डेव्हलपर किंवा काँट्रॅक्टरच्या ऑफीसशी संपर्क  साधतो. बोलघेवडा व इम्प्रेसिव्ह स्टाफ, जोडीला चहापानासह उत्तम पाहुणचार. त्यानंतरचे रंगीतसंगीत प्रेझेन्टेशन, आलिशान गाडी-बसमधून लोकेशन ट्रिप !
                   घर-फ्लॅट बुकिंग करताना टोकन द्यायला आणखी काय आकर्षण हवे, सांगा ? लगेच  बुकिंगप्रक्रिया सुरू  होते. त्या गडबडीत अटीशर्तींचे  पेपर्स स्वाक्षरीसाठी पुढे येतात. आपण त्यावर उत्साहात, हसतमुखाने सह्या करतो आणि मग बांधले जातो !
                  गृहखरेदी करताना गरजूंची फसवणूक होऊ नये म्हणून दक्ष असणाऱ्या ग्राहक संघटना आणि अभ्यासू लोक प्रतिनिधीनी अथक पाठपुरावा केल्यानंतर आपल्या देशात ‘रेरा’ कायदा  २५ मार्च २०१६ पासून अंमलात आला, त्याला अनुसरून राज्यांनी नियमावली तयार केली आहे. त्याचे पालन संबंधितांना कायद्याने बंधनकारक झालेले आहे. त्यामुळे  आता गृहखरेदीच्या व्यवहारामध्ये बरीचशी सुरक्षितता आलीय.
                  वस्तू-अन्नधान्य खरेदी असो किंवा गृह खरेदी असो, प्रत्येक ग्राहकाने व्यवहार  करताना नेहेमी सतर्क आणि जागृत  राहायला हवेय, ही अपेक्षा यावर्षीच्या ग्राहक दिनी मी व्यक्त करून सर्वाना  ‘ग्राहक दिना’च्या शुभेच्छा देत आहे.

                                                                                                                          ::::::::::::::::::::::::::::::

💐निसर्गायण💐

💐निसर्गायण💐
            राज्यभरातील निसर्गप्रेमी आणि साहसी गिरीमित्र दरवर्षी ‘गिरिमित्र संमेलना’च्या निमित्ताने मुंबईत एकत्र येतात. विविध संस्थात्मक चळवळींच्या माहितीची देवाणघेवाण या संमेलनात होते. निसर्गप्रेमापोटी सर्वस्व झोकून देणारे कित्येक रथी-महारथी या संमेलनात भेटतात. सुसंवाद घडतो. नवनवीन योजना व संकल्प समजतात. त्यातून साहस, भटकंती आणि  निसर्गसंवर्धनाची प्रेरणा मिळते.

           अशाच एका वर्षीच्या गिरिमित्र संमेलनात कोकणातल्या ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या चिपळूणच्या संस्थेचा परिचय झाला. ही संस्था प्रामुख्याने रानावनातील गिधाडे, भारतीय पाकोळ्या, सागरी गरुड, कासवे आणि खवले मांजर अशा वन्यजीवांची  काळजी घेते. त्यांचे रक्षण व्हावे, त्याचप्रमाणे दुर्मिळ ठरलेल्या अशा वन्य प्रजाती वाढाव्यात, म्हणून ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. या कार्याव्यतिरिक्त या संस्थेने इ-मॅमल(म्हणजे अध्ययावत तंत्राद्वारे प्राण्यांची निरीक्षणे व अभ्यास), मधमाशी पालन, माझं जंगल-संवर्धन, नेत्रदान, इत्यादी चांगले प्रकल्प राबविले आहेत.
            भाऊ काटदरे ही कलंदर व्यक्ती ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ची संस्थापक. भाऊ व त्याच्या सवंगड्यानी दुर्मिळ कासवांची होणारी चोरटी शिकार व व्यापार थांबविण्यासाठी अथक प्रयत्न केलेत  व करीत आहेत. या संस्थेचा गौरव गिरिमित्र  संमेलनात झाला.
            खवले मांजर हा दुर्मिळ वन्यजीव वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या ‘सह्याद्री निसर्ग मित्र’च्या कार्याचा व खवले मांजराचा अल्पसा परिचय मी  इथे करून देत आहे…….
💐खवले मांजर(Indian Pangolin).
                 आकार व रूप  मुंगूससारखे असणारा हा वन्य प्राणी गरीब स्वभावाचा असून त्याला अंगावर,पाठीवर सर्वत्र खवले असतात. बंदुकीच्या गोळीलाही सहज दाद देणार नाही अशा  खवलांमुळे  याला ‘खवले मांजर’ हे नाव मिळाले असले तरी आपल्या मांजराचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जगात आफ्रिका व आशियात याचे अस्तित्व आढळते. भारतामध्ये उत्तर प्रदेश व  कोकणात रानात-जंगलामध्ये ही खवले मांजरं आहेत. याची चोरटी शिकार होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारही होतो. कारण, या प्राण्याची खवले म्हणे औषधी आहेत !  याला मारून खातात, का ? तर  हे चविष्ट मांसान्न आहे !
                    हा प्राणी बीळ स्वतः तयार करून त्यात आपल्या पिलासह राहातो. मुंग्या-मुंगळे आणि वाळवी या प्राण्याचे प्रमुख खाद्य. आपल्या एक ते दीड फूट लांबीच्या जीभेने तो अन्न(म्हणजे भक्ष्य) प्राशन करतो. या सस्तन प्राण्याला  दात नाहीत. माणसाला किंवा अन्य प्राण्यांना कोणत्याही प्रकारची इजा न करणारा हा प्राणी जगभर चोरट्या शिकारीचा, व्यवहाराचा बळी ठरलाय.
                  अशा बिकट परिस्थितीत ’सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्था खवले मांजर वाचविण्यासाठी पुढे झालीय. ‘UICN’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने  हा निरुपद्रवी वन्य प्राणी ‘दुर्मिळ आणि संरक्षित’ असल्याचे जाहीर केलेय. महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाने  भाऊ काटदरे आणि ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ च्या परिवारास शासकीय बळ दिलेय. मात्र स्थानिक ग्रामवासी आणि शालेय विध्यार्थी खवले मांजराच्या संरक्षण-संवर्धनाविषयी  दक्ष आणि सक्रिय व्हावेत, म्हणून हा परिवार सध्या कार्यरत आहे.
                ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ चे हे  सत्कार्य कार्य असेच वाढत राहो आणि बलवंत होवो, ही सदिच्छा…..….....

                                    -----------------------------