Friday, 1 June 2018

💐इतिहासात....💐                इतिहास म्हटला की, ऐतेहासिक घटना आल्या,स्थळे आली, शूर वीर अन योध्याच्या कहाण्याही आल्या.
अशा या इतिहासात सर्व काळ आपण रममाण झालो तर ?
               तर वर्तमानातील वाटचालीचे काय ?  मात्र पुढची वाटचाल करताना प्रेरणा आणि बळ देणारा इतिहास आपल्या आयुष्यात जरूर हवा.
               मी दुर्गप्रेमी आहे. माझा सगळ्यात आवडता गड राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी. स्वराज्य संस्थापक शिवप्रभूंच्या कार्य कर्तृत्वाची अनुभूती घेतलेला हा गड, पुणे-वेल्हे-तोरणा परिसरात अजूनही भक्कम स्थितीत उभा आहे.
               तुम्ही इतिहासाचे दर्दी असाल तर छानच. नसलात तरी इतिहासाचे हे ' पान ' जरूर वाचा.........

💐अवतरली शिवशाही तेथे.............
                 स्वराज्य भूषण छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा  साजरा झाल्याला आता तीनशे वर्षे लोटलीत. हा योग साधून मुंबईच्या यंग झिंगारो ट्रेकर्स(वाय. झेड.) या गिर्यारोहण संस्थेने ठरविले की पुणे येथील दुर्गम राजगडावर त्रिशताब्दी आगळ्या वेगळ्या रीतीने साजरी करायची. तेथे गड जागरण करायचे ! हे ठरल्यावर वाय. झेड. परिवार उत्साहित झाला.
                 पुणे सातारा महामार्गावर नसरापूर फाटा लागतो. तेथून वेल्हे येथे जाणारा गाडीरस्ता आहे. वाटेत विंझर, मार्गासणी गांवे लागतात. तेथून राजगडाकडे जाणारी एक वाट आहे. गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींना मोहात पाडील असा हा राजगड सहजसाध्य नाही. त्यासाठी दोन तीन तासांची पायपीट करावी लागते.
               या राजगडावर लांबच लांब पसरलेली सुवेळा माची, दुहेरी तटबंदीची संजीवनी माची, अभेद्य  हत्ती खडक, झुंजार बुरुज, देखणा गुंजण दरवाजा, पाली दरवाजा, पद्मवतीदेवीचे मंदिर, उत्तुंग असा बालेकिल्ला, स्वच्छ नितळ व खोल पाण्याची विस्तीर्ण पसरलेली पाण्याची टाकी हे सगळे आपल्याला भारावुन टाकते.
              अशा या सुंदर गडावर त्यावेळच्या पोशाखात वावरावे, रोज पालखी निघावी, मशाली जाग्या व्हाव्यात, अष्टोप्रहर पहारे लागावेत, भालदार-चोपदार गडावर वावरावेत, ऐतेहासिक सदर उभी रहावी, अशी संस्थेची इच्छा होती.
              मग भराभर सारे तयारीस लागले. संस्थेचे कार्यकर्ते मुंबई पुण्यात भरपूर होते. त्यांनी कार्यक्रमासाठी मदत,देणग्या गोळा करायला सुरुवात केली. प्रतिसादही चांगला मिळू लागला.
              यात  मी एक सामान्य सदस्य होतो. गिरगावातल्या स.का.पाटील उद्यानात सगळे एकत्र जमत. तेथे मी जाऊ लागलो. काही कामे अंगावर घेतली. जमेल तसा धावू लागलो.
              या अपूर्व अशा गड जागरण सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी राजमाता विजयराजे शिंदे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो.नि. दांडेकर, शिवभक्त साबीर शेख(माजी मंत्री) ,इत्यादि मान्यवर व्यक्ती राजगडावर येणार होत्या.
              यापकी फक्त गो.नि.दांडेकर आणि साबीरभाई शेख उपस्थित राहिले. महाराष्ट्राचे प्रसिद्द शिल्पकार अण्णा सहस्रबुद्वे  यांचेकडून आम्ही छत्रपती शिवरायांचा एक दिमाखदार पुतळा तयार करून घेतला. सिहासनाधी्ष्ट ब्रॉंझच्या वर्णाचे हे  ' शिल्प' 'खूप सुंदर होते.
            स्वराज्यात राजगडावर ज्या ठिकाणी जरीपटका फडकत असे,तेथे आमचा मुख्य सोहोळा झाला. गो. नि. दांडेकरांनी जरीपटका फडकाऊन गडजागरण सोहोळयाचे औपचारिक उदघाटन केले. बोलताना ते भारावून गेले आणि म्हणाले, ' आज कित्येक वर्षांनी हा ध्वज येथे फडकतोय, तो राजा धन्य होईल तुमच्यावर.'
            आमच्या संस्थेचे संक्षिप्त नाव होते ' वाय झेड ' ते त्यांना विचित्र वाटले असावे. म्हणाले, ' एवढं चांगलं कृत्य करणारी तुमची संस्था, तुम्ही हे नाव प्रथम बदलायला हवं.   बोला, बदलणार ? ' भारावलेल्या बहुतेकांनी त्या समयी होकार दिला. पण आमची ही संस्था आज ' वायझेड ' म्हणूनच कार्यरत आहे. महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या या गिर्यारोहण संस्थेचे ५०० हुन अधिक ' यंग झिंगारो' आहेत.
             राजगडावरील सोहळा पाच दिवस चालला होता. या काळात गडावर रोज पालखी निघायची. त्यावेळच्या वेशातील मानकरी मंडळी-भालदार, चोपदार, तुतारी वाजविणारे, लालकेशरी पागोटी आणि ढाल-तलवारी घेतलेल्या मराठमोळे मावळे, नऊवारीे साड्या ल्यालेल्या गृहिणी, लेझीमवाले,.......... असा सारा जामानिमा पालखीबरोबर असायचा.
             ही पालखी पद्मावती माचीवरून निघायची आणि सुवेळामाचीच्या दिशेने जायची. परत वाजतगाजत पद्मावतीवर यायची. राजगडावर वासुदेवाची देखील फेरी व्हायची.
            देखण्या अशा राजगडावर पुन्हा शिवशाही अवतरलीय याचा प्रत्यय आम्ही दररोज घेत होतो.गडावरील ' सदर ' पुण्याच्या मित्रांनी छान सजवली होती. हे सारे कलावंत होते. सदर दरबारातील सिहासन, इतर बैठका, कलाकुसर, रंगरंगोटी, याकडे तात्या ताम्हणकर विशेष लक्ष देत होता. येथे शिवराज्याभिषेक सोहळा उभारण्यात आला. संस्थेने यावेळची आठवण म्हणून सुंदर कॅलेंडर्स काढली होती.
                  राजगडाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे पद्मावती माची. येथे बहुतेक कार्यक्रम होत असत. या माचीवर वारा मात्र भयंकर ! जेवणावळीच्या पत्रावळी उडून जातील एवढा वारा इथं यायचा !
                गड जागरण सोहळा नीट पार पडावा म्हणून सिनिअर मंडळीनी कामाची वाटणी करून दिली होती. तरी काही प्रमाणात गोंधळ व्हायचा. ड्रेस,ढाली,तलवारी,भाले,पगडी,कर्णफुले आणि माळा, इतर दागिने, हे सारे भाड्याने आणलेले होते. काही मावळे या वस्तू व्यवस्थित पणे न ठेवता गोंधळ घालीत ! दिवसभर पहाऱ्याची व इतर कामे करून मावळे थकायचे. मग रात्री तंबूत आल्यावर अंगावरचा वेश, तलवार, पगडी काढावी त्यांच्या जीवावर येई ! ऊशाला पगडी ठेऊन बिचारे तसेच झोपेच्या अधीन व्हायचे !
             माझी ड्युटी होती सुवेळा माचीवर. मला पोशाख मिळाला नव्हता. त्यामुळे मी सिव्हिल ड्रेसमध्ये फिरायचो. मला एका सरदाराबरोबर मदतीला राहावे लागे. सरदाराचं नाव अशोक गायकवाड. याला हिरवाजर्द पोशाख व दरबारी पगडी मिळाली होती. त्याला तो पोशाख छान दिसायचा.
             आम्ही दोघे जुने मित्र होतो. सुवेळामाचीवर दोघे बरोबरीने कामे करीत होतो. सुवेळावरील या पहाऱ्यात वयस्कर मंडळी कमी. चौदा-पंधरा वर्षाची मुलेच जास्त. त्यांचेकडून कामे करून घ्यावी लागत. यात गंमत म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये एक उत्साही मावळा होता. त्याचे वय असावे ३०,३२. स्वभाव थोडा विक्षिप्त !
                 त्या रात्रीचा मुक्काम सुवेळावरील एका छोट्या पठारावर करायचे ठरले. मुक्कामी तंबू ठोकायचे होते. प्रथम सारेजण त्या जागेकडे निघालो. एका उत्साही मावळ्याच्या पाठीवर त्यावेळी सॅक होती. चालताना स्वतःच्या पायातले हंटर शूज त्याने पाठी सॅकला लटकावले होते. ते शूज लोम्बकळत आणि त्याच्याच पाठीला लागत !
                 तिन्हीसांजेेची वेळ.त्या परिसरात झाडे झुडुपे होती. त्या वाटेने चालताना पोरं आधीच टरकलेली. त्यात हा मावळा म्हणायचा- माझ्या पाठीकडे कोणीतरी आहे. सारखे धक्का देतेय मला ! . झाले, सारी पोरं घाबरली !
                 मग कसेबसे सगळेजण त्या पठारावर पोहोचलो. तेथे तंबू लावताना जवळपास साप-विंचू येऊ नयेत म्हणून सफाई सुरू झाली. इतक्यात ह्या मावळ्याने तिथला एक दगड उचलला, त्याखाली विंचू ! सगळे  ' विंचू विंचू...'असे ओरडू लागले. पुन्हा पोरं घाबरली. मग आम्ही तेथले दगड,गवत, सारे बाजूला सारले. थोडा जाळ केला. चांगली साफसफाई केली. नंतर तंबू लावले. अशोकने त्या मावळ्याला दम दिला. पोरांनाही समजावले. मग गंमतीजमती, विनोद सुरू झाले. पोरं मूडमध्ये आली.
                 राजगडावर एकीकडे गाणे-पोवाड्याच्या तालमी होत होत्या. आमच्यातले सातआठ जण मुंबईत तयारी करून आले होते. गोंधळगीत, नमन, पोवाडे,महाराष्ट्र गीत, असा आमचा जंगी शाहिरी बेत होता.आमचे शाहीर बाळ(विजय) पंडित. हा माझा दोस्त. मुंबईतील त्याच्या रिकाम्या खोलीमध्ये आमच्या तालमी महिनाभर चालत होत्या.
                 शाहिरी कार्यक्रम पद्मावतीच्या देवळात रात्री सुरू झाला. सुरुवातीला साबीर भाईंनी शिवकालीन पोवाडे म्हटले. हा माणूस पक्का शिवभक्त. स्वराज्याचा इतिहास,गडकोटांची इत्यंभूत माहिती यांना तोंडपाठ ! ते किर्तनकारही होते.
                 मुंबईच्या त्यावेळच्या दूरदर्शन टीमचे प्रसिद्द कलावंत जयंत ओक यांनी एक आगळीवेगळी क्रिकेटची कॉमेंटरी  सादर केली.( ते चित्रीकरणासाठी राजगडावर आले होते.)
                या कार्यक्रमाचा शेवट गमतीशीर झाला. एवढ्या रात्री उशिरापर्यंत आमचा शाहिरी कार्यक्रम तल्लीनतेने लोकं ऐकतात म्हणजे काय ? त्यामुळे एकापाठोपाठ एक अशी गीतं सादर होऊ लागली.(मी सुद्दा काही गीतं म्हटली. ) यावेळी आमच्यातल्या काहीजणांनी जरा बारकाईने नजर मारली, तर काय! आम्हाला दाद देणारे हे दर्दी प्रेक्षक अंथरून पांघरूण घेऊन आले होते, कधी एकदा आमचा कार्यक्रम संपतोय याची ते वाट पाहत होते !  कारण त्यांना तिथेच पथारी पसरायची होती !
                 असा हा ' राजगड जागरण सोहळा ' यथासांग पार पडला. सगळे शिवप्रेमी दुर्गप्रेमी राजगडाच्या ऐतेहासिक आठवणी मनी घेऊन परतीच्या प्रवासाला लागले.
                  त्यानंतर,दोन तीनदा या राजगडावर जाणे झालेय.  तेथे गेले की सारे आठवते. ते ऐतेहासिक क्षण जागे होतात. राजगडही पुनः जागा होतो आणि म्हणतो- '' या माझ्या मराठमोळ्या मावळ्यांनो, राजगड तुमच्यासाठी सदैव सज्ज आहे.!
                 
             
                                        -----------------------------

No comments:

Post a Comment