Saturday, 13 January 2018


   🌹ब्लॉग प्रेमी मित्र-मैत्रीणींना सप्रेम नमस्कार व नवीन वर्षाच्या शुभेच्छा.🌹
     
       नववर्षाच्या पहिल्या दिवशी या ब्लॉगचा प्रारंभ  झाला.त्यात मी लिहिलेले संवादात्मक लिखाण आपण वाचलेच असेल. आता, येत्या १ फेब्रुवारीला मी पुन्हा आपली भेट घेणार आहे,खालील वाचनीय साहित्यासह......

      १-चित्रपट गप्पा
      २-कथाघर.... तारीख पे तारीख
      ३-भटकंती मनसोक्त..... वाय झेड

       कृपया लोभ असावा.....
   धन्यवाद.

   आपल्या प्रतिसाद-प्रतिक्रियेसाठी ई-मेल पत्ता....
                      yescharudatta@gmail.com

Monday, 1 January 2018

💐वाचनछंद💐


                                                     माझी लायब्ररी.......

                      घोडपदेवला कामगार वस्तीमधील एका चाळीत माझे बालपण आणि शिक्षण झाले.वडिल मिल कामगार होते.आई, बहिण-भावंडांसह आमचे सारे सहा जणांचे कुटुंब.त्यातले आई,बाबा आणि मी,असे तिघेजण वाचनप्रेमी.
             जवळच असलेल्या कामगार कल्याण केंद्रातील वाचनालयामध्ये जाऊन बाबा पेपर्स वाचीत. त्यांच्याबरोबर जाताजाता मलाही वाचायची आवड निर्माण झाली.आई तेथे दुपारी शिवणकाम-भरतकाम शिकायला जायची.तीचेपण वाचनवेड वाढले.
              या केंद्रात पेपरशिवाय येणारी साप्ताहिके,मासिके माझ्या वाचनात आली. चांदोबा,कुमार,आणि मुलांचे मासिक मी आतुरतेने वाचत होतो.शाळेचा अभ्यासही होताच.अकरावीपर्यंत शिकून कॉलेजमध्ये जायला लागलो.मुंबईतील प्रसिद्द अशा रुईया(Ruia) कॉलेजमध्ये कला शाखेत शिकत असताना तिथल्या भव्य अशा लायब्ररीतील अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकांत मी डोकावू लागलो.कितीतरी साहित्य समोर येत होते.अधाशासारखा त्याचा आस्वाद मी घेत होतो.त्यातूनच कधीतरी आपणदेखील स्वतःची लायब्ररी करावी आणि अखंडितपणे वाचन करावे,हे मनाशी पक्के ठरविले.
               दरम्यानच्या काळात नोकरी व कॉलेजचा अभ्यास,अशी धावपळ करत असताना प्रवासात वेळ मिळेल तेव्हा जवळचे पुस्तक वाचत असे.थोरामोठ्या लेखक-मान्यवरांना गाठून त्यांची स्वाक्षरी घेणे हा त्या काळचा माझा आवडता छंद देखील माझे वाचनवेड वाढवीत राहिला.
               त्यावेळी पुस्तक प्रदर्शन पाहून मोह व्हायचा.मग खिसा पाकीट पाहून पुस्तक खरेदी सुरू(suru) केली अन माझ्या लायब्ररीला आकार येऊ लागला.छोट्याशा कपाटात दाटीवाटीने माझी पुस्तके दिसायला लागली.घरातले कधीमधी पुस्तके चाळताना दिसू लागले,याचा आनंद वाटला.या लायब्ररीत कोणी फुकट दिलेली पुस्तके आणि जुन्या बाजारात घेतलेली पुस्तकेसुद्दा प्रवेश करीत होती.
               अर्थात,माझ्या लायब्ररीत नसलेली,तसेच येणे शक्य नसलेली बरीच गाजलेली पुस्तके मी शालेय आणि कॉलेजजीवनात वाचून काढलीत.स्वामी,मृत्युंजय,अमृतवेल,ययाती,अरेबियन नाईट्स, सत्तांतर,बनगरवाडी, क-हेचं पाणी,माझी जन्मठेप,श्यामची आई,रामनगरी, एक गाव एक पाणवठा,बलुतं,गारंबीचा बापू,नक्षत्रांचे देणे,जनु  बांडे, ऋतू चक्र, आमचा बाप अन आम्ही,साद देती हिमशिखरे,संशयकल्लोळ,...... अशी अगणित पुस्तके वाचलेला मी भाग्यवान वाचक आहे ! काहींची नावे आता नीट आठवत नसली तरी 'ती' स्मरणात आहेत.अन लेखकांबद्दल विचारलं तर, ग.दि.,  व्यंकटेश माडगूळकर,नां. स., पु.ल.,श्री.,नां., गो.नि.,द.मा., उद्धव शेळके,साने गुरुजी(Guruji),रणजित देसाई,माधव गडकरी,श्री.दा. पानवलकर,रत्नाकर मतकरी,शंकर पाटील,आचार्य अत्रे,अनिल अवचट,रामदास फुटाणे,सुरेश भट......असे कितीतरी दिग्गज माझे आवडते आहेत.
                आज माझी लायब्ररी माझ्या घरामध्ये स्थानापन्न झालीय.एक कोपऱ्यात छोटेसे कपाट बनवून घेतलेय. त्यामध्ये विषयवार पुस्तके ठेवलीत.हरतऱ्हेचे विषय असलेली ही पुस्तके एकाच ठिकाणी दाटीवाटीने पण आनंदाने नांदताहेत. कामाच्या धावपळीत,वेळ काढून मी ही पुस्तके वाचीत आलोय.
                गिर्यारोहक असल्याने सह्याद्री आणि हिमालयीन भटकंती साठी उपयोगी ठरणारी पुस्तके,संदर्भ ग्रंथ, जर्नल्स जमवून ठेवलीत.नकाशे तर नेहेमी लागतात.गो.नि. दां. चे दुर्ग भ्रमण गाथा मला केव्हाही दुर्गांवर सफर घडवून आणते.  अध्यात्माच्या जवळ नेताना शास्त्राधार सांगून आपली ज्ञानतृषा भागविणारे मनशक्ती मासिक मी पूर्वी नियमित घ्यायचो. ही मासिके माझ्या संग्रही आहेत.यशवंत पाठकांचे पसायदान हे छोटेखानी पण मोठे ज्ञानदान देणारे पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचतो.
                मी चित्रपट रसिकदेखील आहे.१९८३ पासून प्रभात चित्रमंडळाचे(film society) 'वास्तव रुपवाणी(Rupvani)Z ',  हे  मासिक(आता- त्रैमासिक) लायब्ररीमुळेच माझ्या नियमित वाचनात असते.
               कवितांविषयी जवळीक असल्याने पाडगावकर,मोघे,पाटणकर,यांची कविता आणि शायरीचा लाभ मला मिळतो.राजकारणावर विडंबन करणारा कविता संग्रह माझ्याजवळ आहे.मी आस्तिक आणि धर्मप्रेमी असल्याने काही धार्मिक-कार्मिक पुस्तके मला लागतात.श्रद्धापुर्वक व गांभीर्याने ही पुस्तके आपण वाचली,तर देव तसेच धर्माच्या निर्मळ अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते,असा माझा विश्वास आहे.याशिवाय,दिवाळी अंक मला वाचायला आवडतात.काही चांगले अंक माझ्याकडे आहेत.
               साऱ्या जगात प्रसिद्ध  असणारी भगवद्गगीता खूपदा वाचूनही ती पूर्ण आकलन न झाल्याचे जाहीरपणे कबुल करणारे कितीतरी विद्वान असतील.माझ्या लायब्ररीत मात्र सुलभ भगवद्गगीतेचे गोष्टीरुप(goshtirup) छोटे पुस्तक वाचताना मला तिचा भावार्थ कळल्यावर,मी आनंदित होतो.
              कधी मी खिन्न असलो की,कविता वाचून स्वतःला सावरतो.तर,कधी 'पु.लं.' ची आठवण आल्यावर सुहास्य होऊन मी थेट 'निवडक कालनिर्णय' हाती घेऊन त्यात पु.ल. नी लिहून ठेवलेले खुसखुशीत लेख वाचू लागतो. माझ्या संग्रहात जुन्या वर्तमानपत्रातील बरेच महत्वाचे लेख आहेत.तेपण मला नियमित नवे ज्ञान देत राहतात.दुर्गा भागवतांचे ऋतू चक्र तर दरवेळी मला काही नवे निसर्ग गुज देऊन जाते.
              माझ्या लायब्ररीमध्ये थोरामोठ्यांच्या प्रसिद्ध ग्रंथ-पुस्तकांचा समावेश नाही,पण आहेत ती पुस्तके माझी चांगली सोबत करून(karun),मला जीवनमार्ग दाखवीत आली आहेत. हे मी खात्रीने सांगेन. आणखी एक,माझ्या लायब्ररीत फक्त पुस्तकेच नाहीत बरं का! कितीतरी जुन्या आणि स्मरणीय अशा मराठी,हिंदी गाण्यांच्या आणि शास्त्रीय संगीत- धुनीच्या एसीडीज,व्हीसीडीजही आहेत.
               माझ्या घरी माझी स्वतःची लायब्ररी आहे म्हणून मी केवढा भाग्यवान!,असा गर्व मला नाही.कारण, ती साधी व काहीशी विस्कळीत मांडणीची लायब्ररी आहे.मात्र ती'जिवंत'आहे.ती कोणाही वाचनप्रेमीला खुली आहे.परंतु एवढे वाचनवेड आता आहे तरी कितीजणांत ? मोबाईल अन कंप्युटरच्या धाव-रगाड्यात वाचन करणे म्हणजे अडाणीपणा समजला जातोय,हे कटु वास्तव आहे.इतरांचे सोडा,माझ्या लहानपणी सहा जणांच्या कुटुंबात मी,बाबा,आई घरी लायब्ररी नसताना वाचनवेडे होतो.आज माझ्या घरी चारजणांच्या कुटुंबात मीच एकमेव या लायब्ररीचा लाभ घेणारा आहे,त्याचे काय ?
               हे शल्य उरी बाळगुन जाताजाता आनंदाने सांगावेसे वाटते की,या वाचनप्रेमामुळेच मी वेळोवेळी लिहिता होऊन लेखनाची अनुभूती घेत आलो आहे.कधी साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंकात,तर कधी वर्तमानपत्रात लेख छापुन आल्यावर होणारा निर्मितीचा आनंद नेहेमी अनुभवित आहे.आज अशा लिखाणामुळेच आकाशवाणीने मला बोलण्याची तीन वेळा जी संधी दिली,त्याचे श्रेय मी माझे वाचनवेड वाढविणाऱ्या माझ्या लायब्ररीलाच देईन.अर्थात,दिवसेंदिवस तीळ तीळ वाढत राहणाऱ्या माज्या लायब्ररीतील पुस्तकांचे पूर्णपणे वाचन करणे मला या जन्मात तरी शक्य होईल,असे वाटत नाही,आणि त्याचे शल्य मनी कायम राहणार आहे.

                                                        ..............................................

🌹आठवणीतली व्याख्याने🌹                                                       " जगण्यातला आनंद ........"

         विवेकानंद व्याख्यानमालेतील यावेळी सर्वच श्रोत्यांना आवडलेले हे व्याख्यान असावे.मलाही या व्याख्यानाने चांगलेच प्रभावित केलेय.
         डॉ. निर्मलकुमार फडकुले हे प्रसिद्ध लेखक.जगणे,आयुष्यातील ताण-तणाव,सुख-दुःखं आणि मनाचा कमकुवतपणा घालवून माणसाने आनंदी कसे व्हावे हे सांगणारी त्यांची खुप पुस्तके आहेत.आपण ती अजून वाचलेली नसली तरी आज त्यांचे "जगण्यातला आनंद",या विषयावरील विचार प्रत्यक्ष ऐकायचेच,हे ठरवून व्याख्यानास आवर्जुन उपस्थित राहिलो.  
            माणसाने निराश होऊ नये,सतत आशावादी असावे.कारण, जग जरी क्षणभंगुर असले तरी त्यात विविधता आहे. प्रत्येक क्षणाचे वेगळेपण आहे.ते आपण सर्वांनी अनुभवायला हवेय.हे अवघड नाही,अर्थात अनुभव मात्र घ्यायला हवा.
            त्यांनी लहान मुलाचे उदाहरण दिले.लहान मुलाला खेळवणारा म्हातारा गृहस्थ ते रडणारे मुल बऱ्याच प्रयत्नाने हसते-फुलते करतो.त्याला आनंदी करण्यात आणि त्याच्या चेहेऱ्यावरचे हास्य पाहण्यात तो वृद्ध  स्वतःला धन्य मानतो.त्याला मुलाचे हसणे हवेय.हाच त्याचा खरा आनंद!
            एक कविता डॉ. निर्मलकुमार फडकुलेंनी श्रोत्यांसमोर गद्य  रूपात(rupat) ऐकवली.एक तरुण(tarun) जोडपे संवाद करताना म्हणते की,पंचवीस वर्षापूर्वीचा काळ अन आताचा, यात किती फरक पडलाय? पंचवीस वर्षांपूर्वीची आठवण काढताना तो तिला म्हणतो--त्यावेळची तुझी माझ्याकडे सल्लजपणे बघण्याची लकब आगळी होती.किती छान लाजायचीस त्या वेळी! तो चेहेरा,ते लाजणे, तो आनंदी भाव मला दाखव ना तुझ्या चेहेऱ्यावर! ती उत्तरते-आता देखील मी हसतेय की! पण  त्यावेळचे जमणार नाही मला हसणे.तो भाव कसा बरे जमेल मला? ती वेळच तशी होती.त्यावेळी तू देखील अधीर होतास,मला भेटायला. दोघंही आपण तरुण(tarun) होतो! एकमेकांबद्दल उत्कटता होती.
           पण आता पंचवीस वर्षे उलटून गेलीत.काळ गेलाय.पाणी वाहून गेलेय आता. आता तसे 'असणे',मला कसे बरे जमेल? आता तुला तरी 'त्या' नजरेने पाहाता येईल का माझ्याकडे, त्या पंचवीस वर्षापूर्वीसारखे ?
           भाषणात त्यांनी पुढे ज्वार्ज  वॉशिग्टनची एक गोष्ट सांगितली. तीन-चार मजूर एक गाडी हाकत असतात.ती एका ठिकाणी अडखळते. ती नीट मार्गावर आणायला त्यांना कठीण जाते. आणखी एकजण हवा असतो.इतक्यात त्यांच्यावर देखरेख करणारा सुपरवायझर तेथे येतो.त्यांना तो चापतो.'आटपा लवकर',म्हणतो.ते म्हणतात-'साहेब,आम्हा तिघांना हे जमणार नाही लवकर'. त्याच सुमारास एक व्यक्ती तेथे घोड्यावरून(varun) येते. तो वाटसरू(ru) त्यांची ही अडचण पाहातो आणि थांबतो. विचारतो-'अरे,तुम्हाला कसे बरे जमेल एवढे ओझे उचलणे ? आणखी एकजण हवाच.' जवळ उभ्या असलेल्या त्या साहेबाला म्हणतो-'आपण का यांना मदत करत नाही ? पटकन गाडी रस्त्यावर येईल की! हे ऐकल्यावर तो सुपरवायझर   वैतागतो.उसळून म्हणतो-'मी कोण आहे माहीत आहे कां ? मी ऑफिसर आहे.मी कशी मदत करू(ru)?  तेच करतील हे काम.'
           मग हा वाटसरू(vatsaru) घोड्यावरून(varun) उतरतो.त्या सुपरवायझरकडे जाऊन म्हणतो-'हे बघा साहेब,ठीक आहे आपले म्हणणे. पण मग मी जर यांना मदत केली तर आपली काही हरकत आहे कां ? त्यावर तो सुपरवायझर उत्तर  देतो- 'नाही,नाही,तुम्ही यांना मदत करू(karu) शकता.' मग हा त्या मजुरांना हातभार लावतो. ते गाडी रस्त्यावर नेऊन उभी करतात. त्या वाटसरू चे(vatsaruche) आभारही मानतात.त्यावर तो वाटसरू(vatsaru) त्यांना म्हणतो,'यात आभार मानण्यासारखे काही नाही.तुम्हाला मी थोडीशी मदत केली इतकेच.मलाही याचे खूप बरे वाटले.परत माझी मदत लागली तर आपण मला जरूर(jarur) बोलवा. मी त्या नदीच्या पलीकडे राहतो.तेथेच माझे घर आहे.माझे नांव ज्वार्ज वॉशिंग्टन. असे म्हणत तो घोड्यावर बसून निघू लागतो. ते नांव ऐकल्यावर त्या सुपरवायझरची बोबडी वळते.तो मग माफी मागतो......
             म्हणजेच त्या मोठ्या माणसाने सर्वसामान्य माणसांना मदत करण्यात आनंद मानला. कशात भेद नाही मानला. आपणही तसेच वागूया.निराशाही नेहेमीचीच असते आपल्या सभोवती. पण ती झटकून आनंद मिळवायला काही मोठे कष्ट करावे लागत नाहीत.तो सहजसाध्य आहे. पण तुमची तशी दृष्टी हवी. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा(shradda) ठेवा.संस्थेवर ठेवा.राष्ट्ावर ठेवा,आणि कार्यरत राहून आनंदमार्गी व्हा !
            व्यावहारिक जीवन साऱ्यांचेच असते.ते नेहेमी काट्याकुट्यानी भरलेले असते.पण त्यातील फुले वेचणे आणि फुलांमधील सुगंध शोधणे हे आपले आनंद मिळविण्याचे मोठे साधन आहे,हे लक्षात ठेवा. व्यावहारिक जीवनात आपण समाधानी कधीच राहात नाही.आपल्या साऱ्या इच्छा केव्हाच पूर्ण होत नाहीत.पण याचा अर्थ असा नव्हे की आपण निराश व्हावे,हताश व्हावे. तर, यातही आनंद कोणता ते पाहायला शिकले पाहिजे.वेचलेल्या फुलांतून मिळणाऱ्या सुगंधाने आपण मोहित व्हायला हवेय.यापेक्षा वेगळा आनंद तो कोणता ?
            भारताच्या स्वातंत्र लढ्यात अनेकजण फाशी गेले आहेत.लौकिकार्थाने सारे म्हणतील की,त्यांचे जीवन बरबाद झाले.त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात आणला देशासाठी,आणि स्वतःला संपवले !
            मी तसे म्हणणार नाही.ते खरेच मेलेले नाहीत.ते खरे जगलेत.त्यांनी जगण्याचा 'खरा' आनंद उपभोगलाय.
          तेव्हा तुम्ही साऱ्यांनी सतत आनंदी राहा.आनंदी म्हणजे व्यावहारिक आनंदी नव्हे ! उदाहरणार्थ-स्वतःला पगारवाढ मिळाली,स्वतःची पेन्शन वाढली की,वाढणारा आनंद !
           तर,वेगवेगळ्या अनुभूती घ्या. मजेत फिरत राहा.खरी दृष्टी वापरून(vaparun) जगा.त्याग करा दुसऱ्यासाठी. चांगले काम करा.कार्यमग्न राहा.विकृतीमध्ये न जाता प्रकृतीकडे जा.
           आनंद ज्ञान मिळविण्यात आहे.आनंद दुसऱ्याला हसविण्यात आहे.लहान मुलांचे रडणे थांबविण्यात आहे. फिरण्यातच नव्हे तर सुगंध घेण्यात आहे.रडण्यातही आहे ! देण्यात आहे.घेण्यात आहे. खेळण्यात आहे.एवढेच नव्हे तर तो अभ्यासण्यात आहे.मरण्यात आहे.संकटात असतानादेखील आनंद आहे.प्रेमात आहेच.पण विरहातही आहे.भक्तीत आहे.गाण्यांत  आहे. वाचनात आहे.लिहिण्यात आहे. दुसऱ्याची सेवा करण्यांत आहे.....
          डॉ. निर्मलकुमार फडकुलेंचे समारोपाचे हे बहुमोल शब्द आपण जपून ठेवायला हवेत.मात्र एवढया एका व्याखानामुळे आपल्यात काय कोणातही, या व्यवहारी जगात सदैव आनंद निर्माण करण्याची उर्मी टिकणे खूप कठीण आहे.
          त्यामुळे या प्रसिद्ध  लेखकाची पुस्तके आपण संग्रही ठेवून ती वाचायला हवीत.लाभ निश्चित होईल, आपले हे जगणे आणखी आनंदमयी होईल.....

                                                           ..................................................

💐मनभावन कविता,अन गाणी💐             या क्षणी आठवण होतीय ती शब्दप्रभु कविवर्य मंगेश पाडगावकर यांची. त्यांचा "सलाम"हा काव्यसंग्रह १९७८ मध्ये प्रसिद्ध  झाला. "सलाम" मध्ये पाडगावकरांनी, सन १९७५मध्ये देशात लादल्या गेलेल्या आणीबाणीच्या वातावरणात प्रतिक्रिया म्हणून काही कविता लिहिल्यात. त्यात कविवर्य शब्दसामर्थ्याचे महत्व सांगतात----
              "शब्द हे माझ्या कवितेचे माध्यम आहे. मी शब्दाब्रह्माचा उपासक आहे. या शब्दाचे रहस्य मी शोधतो आहे.

        💐शब्द, जिवंत शब्द,
            भिजले पंख फडफडवणाऱ्या
            पाखरांसारखे शब्द,
            अन्यायाच्या पहाडाच्या
            ठिकऱ्या ठिकऱ्या करणारे
            सुरुंगासारखे(surung) शब्द,
            ओल्या मातीच्या वासाचे शब्द,
            प्रकाशाने झळाळणारे शब्द,
            अंध सत्तेचा थरकाप उडवणारे शब्द,
            गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग
            यांच्या छातीतली जखम व्यक्त करणारे शब्द,
            म्हाताऱ्या आजीसारखे अनुभवी, शहाणे शब्द,
            अपार निःशब्दतेशी एकाकार होणारे शब्द....

अनुभवाच्या प्रत्येक वळणावर अनेक रुपांनी(rupani) हे शब्द मला भेटत असतात.
            बापाने आपल्या चार तरूण(tarun) मुलांना विचारले,"तुम्हाला कोण व्हायचे आहे ?" पहिला म्हणाला, मी सेनाधिकारी होणार. दुसरा म्हणाला, मी कारखानदार होणार.तिसरा म्हणाला, मी वकील होणार. चवथा मुलगा गप्पच होता--आपल्याच तंद्रीत असल्यासारखा. त्याला तंद्रीतून जागा करुन(karun) बापाने पुन्हा विचारले,"अरे,तुला कोण व्हायचे आहे ?"तेव्हा तो मुलगा हसून म्हणाला,"मला... मला... समजून घ्यायचे आहे."बापाने त्रासिक स्वरात विचारले,"समजून? काय समजून घ्यायचे आहे ?"   तो मुलगा म्हणाला,"मला माणूस समजून घ्यायचा आहे. माणूस दुःखी होतो म्हणजे काय ? तो मोहात पडतो म्हणजे काय ? ज्या यशाच्या मागे तो छाती फुटेपर्यंत धावत असतो त्या यशाचा नेमका अर्थ काय ? माणूस एकाकी का होतो ?मृत्यूचा अर्थ काय ?हे सारे मला समजून घ्यायचे आहे."
             माझी कविता कशासाठी या प्रश्नाचे उत्तर त्या चवथ्या मुलाच्या उत्तरापेक्षा वेगळे नाही.मला माणूस समजून घ्यायचा आहे आणि माणसावर प्रेम करीत माणसाचे गाणे मला गायचे आहे."....

               साधी,सोपी कविता.............मंगेश पाडगावकर,

         💐अगदी आपली साधी,सोपी कविता:
             बाळबोध घराण्यातल्या वळणासारखी सरळ,
             कुणाच्या अध्यात नाही,
             कुणाच्या मध्यात नाही,
             नाकासमोर वास न घेता चालणारी,
             डोकीवर पदर घेऊन बोलणारी,
             डोके असले पाहिजे
                 पदर घेण्यासाठी,
                 पदर भेटला पाहिजे.
                 डोके आहे म्हणून,
                 अशी ही घराणेदार, नम्र,
                 साधी,सोपी कविता.

                 अशी माझी साधी,सोपी,सरळ कविता
                 तोंड बांधलेत तरी स्वस्थ आहे
                 कारण तुम्हाला हवी तीच तिला शिस्त आहे,
                 पण तुम्ही म्हणाल तर
                 तोंड खोलते बरे,
                 तुम्हाला हवे तेच
                 ती बोलते बरे,
                 अशी बोलते छान
                 की पोपटाने घालावी खाली मान.
                 तुम्ही म्हणा आगेकूच :
                 ही म्हणते आगेकूच,
                 तुम्ही म्हणा आबादीआबाद :
                 ही म्हणते आबादीआबाद,
                 तुमच्या इशाऱ्यावरच तिची भिस्त आहे
                 कारण मुख्य म्हणजे तिला शिस्त आहे.

                 माझी साधी,सोपी, सरळ  कविता
                 कुणाविषयीच रागाने तिरके बोलत नाही,
                 सर्वांची सोय पहाते,
                 कुणीही वाचावी,
                 कुणीही छापावी,
                 कुणीही तपासावी,
                 कुठेही कापावी,
                 कापले तरी हूं नाही,
                 छाटली तरी चू नाही,
                 कारण ती आहे
                साधी,सोपी,सरळ कविता
                जिला काही घडवायचे नाही,
                जिला काही दडवायचे नाही.

                साध्या, सोप्या कवितेत या
                साधी,सोपी गोष्ट आहे :
                एक होता ससा
                ढगासारखा शुभ्र,
                कापसासारखा मऊ,
                त्याला खुप आवडायचा
                कोवळ्या गवताचा हिरवा खाऊ,
                खाऊसुद्दा थोडाच खाई,
                सुखाने झोपी जाई....
              साध्या,सोप्या कवितेतली
              गोष्ट आधी,सोपी
              जिच्यात ससा गेला झोपी,
              ससा किती शहाणा :
              जागेपणाचा करीत नव्हता बहाणा,
             
              गोष्टीत प्रतीक नाही,
              गोष्ट तिरकी नाही,
              कुणाचीच फिरकी नाही,
              प्रतीक म्हणजे डोक्याला त्रास,
              फिरकी म्हणजे फुकटचा फास :
              लिहिणाऱ्याला फास,
              छापणाऱ्याला फास,

              साध्या, सोप्या कवितेत या
              पण तसे काहीच नाही,
              कोणालाच त्रास नाही,
              कोणालाच फास नाही,
              खालून वाचा,
              वरून(varun) वाचा,
              उजवीकडून वाचा,
              डावीकडून वाचा,
              कुठूनही वाचली तरी एकच,
              कापणार तर कापा,
              खालून,वरून(varun),मधून कापा :
              जेवढी उरेल तेवढी छापा,
              जो कापील त्याचे भले,
              जो छापील त्याचे भले,
              जो न छापील त्याचे भले,
              जो वाचील त्याचे भले,
              जो न वाचील त्याचे भले...

              अशी माझी कविता साधेपणा जपते
              आणि वाचूनही किती लवकर संपते.
                     ......................................

🌹🌹 सुस्वागतम् 🌹🌹

                                                 

  ब्लॉगप्रेमी मित्र मैत्रिणींनो,
               तुम्हा  सर्वांना आदर पूर्वक नमस्कार,आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.........
  मला तुमच्याशी ब्लॉगच्या माध्यमातून संवाद साधून, गुजगोष्टी करायच्या होत्या. आपल्याच संसार विश्वात न अडकता, इंटरनेटवर सारे विश्व व्यापलेल्या ब्लॉग  परिवारात दाखल व्हायचेे, ही माझी इच्छा आज या क्षणी होत आहे.
               या प्रारंभ दिनी मी थोडक्यात पण महत्वाच्या शब्द गप्पा तुमच्याशी मारणार आहे.
           प्रथम या ब्लॉग शिर्षकाबद्दल सांगतो." यस,लाईफ इज ब्युटीफुल ,बट........"हे नाव मी एका ऑस्कर विजेत्या "Life is Beautiful" या विदेशी चित्रपटापासुन घेतलंय. मुंबई अन महाराष्ट्रात सुपरिचित असणारी प्रभात चित्र मंडळ. या संस्थेच्या माध्यमातुन मला देशोदेशीचे चित्रपट पाहायला मिळतात. चांगल्या व गाजलेल्या चित्रपटांचा आस्वाद घेता येतो, एव्हढंच नव्हे तर सेलिब्रिटी दिग्दर्शक,नट-नट्यांची मतं कळतात, संवाद साधण्याची संधी मिळते.
             तर, या ऑस्कर विजेत्या चित्रपटाच्या कथेची प्रेरणा घेऊन मी ब्लॉगचे " हे" नाव ठरवलेय.
                   ' Life is Beautiful ' ची कथा थोडक्यात अशी आहे--
             महायुद्धाात झळ बसलेलं एक हतबल कुटुंब यात युद्ध कैदी झालेय. त्यांच्यासमवेत इतरही असंख्य कुटुंबआहेत.
तेथल्या छळाची ही दुर्दैवी कथा आहे.येथे महिला,पुरषांना वेगळे ठेवले जाते.नायकाला एक गोजिरवाणे आठ-दहा वर्षाचे मुल असुन त्याला आईकडे की बापाकडे ठेवायचे हा प्रश्न लष्करी अधिकाऱ्यांना पडलाय! ते बालक गोंधळून गेलेय. त्याला अखेर वडिलांकडे ठेवले जाते. ते बालक शोक करते.त्याची आईही रडते, विनवणी करते.पण उपयोग होत नाही. इतर कैद्यांबरोबर हे दोघेजण बराकित रवाना होतात. तेथले अवघड जीवन दाखवलंय. नायक कैदेत असताना विविध चौकश्यांना त्याला सामोरे जावे लागतंय. दरवेळी त्याचं बालक बरोबर असते. त्याच्यासमोर बापाला मारपिट होते.पोरगं हवालदिल होतं. हे काय चाललंय? ते बापाकडे आणि त्या मारणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाहतेय. ते निर्दयी आहेत. पण बाप चतुर आहे, तो विनोदी आहे! मुलाला म्हणतो- अरे,काही विशेष नाही बर हे, हा एक खेळ आहे. मजा येतेय मला. पोरगं हसून दाद देतं. ही छळ कहाणी संपत नाही, आणि बापही अंगावर मार सोसत आपल्या निरागस पोराला रिजवत जगत असतो. तिकडे आईही पोराला बघायला आतुर असते, पण मायलेक जवळ येऊ शकत नाहीत.नायक दोषी ठरतो आणि त्याला गोळी घालून ठार मारण्याची शिक्षा होते, ते दृश्य पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यात आसवं दाटतात.पण नायक अगदी आनंदात आहे! तो मुलाला सांगतोय-अरे, हा पण एक सुंदर मॅजिक गेम आहे. आता मी त्या बॉक्स मागे लपणार आहे, आणि काही वेळ कोणालाच दिसणार नाही, तुलाही नाही. बायबाय बेटा!
          चित्रपटाची ही दुःखी कहाणी शेवट मात्र सुंदर करते. ते लहान मूल आता मोठे झालेय. बापासारखे आनंदित मुद्रेत आपल्या पुढे येऊन आनंदी आयुष्याला सामोरे जाताना हाती फुले घेत पुढे निघालेय!
          या सुंदर अशा चित्रपटाची कहाणी मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगितलीय. त्यात थोडे इकडे तिकडे असेल,पण कथेचा गाभा हाच आहे,की, "यस, लाईफ इज ब्युटीफुल बट....." जगण्यात आनंद आहेच. पण....? पण वाटचाल साधीसोपी नाही. आपण त्यात जगणे आनंदमयी करायचेय. काय ?
           आता मी या ब्लॉग संवादात काय असेल ते सांगतो-
          मी माझ्या वाटचालीत जपलेले छंद, आयुष्यात भेटलेली,भेटत राहणारी सर्वसामान्य आणि असामान्य माणसं, त्यांच्यासमवेत घालवलेल्या कडू-गोड आठवणी सांगणार आहे . कसोटीच्या घटना ऐकवणार आहे. समाजात रमताना वावरताना येणारे अनुभव सांगणार आहे. अजूनपर्यंतचे जगणे कितपत भावलेय की निसटलेय, ते कथन करणार आहे. मला तुमच्याशी संवाद साधताना कोणता मोठेपणा मिरवायचा नाही की,मी मी करायचे नाही. जगात अवती भवती, सर्वत्र "मी" सोडून बरेच काही असते, त्यातले "चांगले काही" वेचून तुम्हापुढे ठेवायचे आहे.
           माझे प्रमुख छंद आहेत--वाचन,लेखन,भटकंती, गिर्यारोहण, चांगले चित्रपट पाहाणे,समाजोपयोगी संस्थांत आपल्या
कुवती प्रमाणे कार्यकर्ता म्हणून सक्रिय राहणे.....
           या वाटचालीत खुप अनुभव येतात. चांगले वाईट फील होते. ताणाचे प्रसंग घडतात. त्यावर लिहिले की हलके वाटते.
चांगल्या गोष्टी चार जणांना सांगितल्या की, आपला आणि त्यांचाही आनंद वाढतो, अशी माझी भावना आहे.
            याच भावनेतुन मी तुमच्याशी संवाद साधणार आहे.
            माझ्या या ब्लॉग संवादात वेगवेगळ्या विषयानुसार मी लिहिणार आहे.त्याला वेगळे उपशिर्षक सुद्दा असेल. मला लिहिण्याचा छंद असला तरी मी लेखक वगैरे नाही. त्यामुळे हे साधे सरळ लिखाण एका हौशी छंदिष्टाचे आहे हे समजुन वाचावे, असे माझे आर्जव आहे.

           
             आज मी पहिल्या दिवशी तीन विषयांवर(उपशिर्षकानुसार) लिहिले आहे. यानंतर पुढील महिन्यात  याच दिवशी म्हणजेच १ तारखेस नवीन विषय घेऊन तुम्हाला भेटेन.
             दरम्यान तुमच्या प्रतिसादाची,अन प्रतिक्रियेचीही वाट पाहीन. धन्यवाद.🌹
                                                  ............................................................