Monday, 1 July 2019

💐भटकंती मनसोक्त💐


💐भटकंती मनसोक्त💐
                  आषाढ वारी सुरू झालीय.  यंदा आषाढी एकादशी आहे बारा जुलैला. या वारीत राज्यभरातून-राज्याबाहेरुनच नव्हे, तर दूरदेशातील विविध जातीधर्माचे लहानथोर, सश्रद्द आणि निरक्षर, तसेच उच्चशिक्षित वारकरी सहभागी होऊन निघालेत पंढरपूरच्या दिशेने. श्री विठु माऊलीच्या चरणी माथे टेकल्यावर हा अवघा संप्रदाय धन्य होईल,  अन चंद्रभागेच्या तीरी सर्वत्र आनंदकल्लोळ सुरू होईल.
                   मीही एक वारकरी आहे. पण पंढरीच्या वारी इतकेच माझे लक्ष तेरा व चौदा जुलैला होणाऱ्या गिरीमित्रांच्या संमेलन वारीकडे लागलेय. दरवर्षी नित्यनेमाने दीड दिवसांच्या या वारीमध्ये सहभागी होताना मला श्रीक्षेत्र पंढरीत असल्यागत वाटणार आहे.  मुंबईतील पूर्व उपनगरामध्ये मुलुंडला  साजऱ्या होणाऱ्या ‘गिरीमित्र संमेलनात कित्येक नवेजुने गिरीमित्र-मैत्रिणी उत्साहाने भेटतील आणि  अवती भवती सुसंवाद होईल. 
                     हे आनंदक्षण मी गेली सतरा वर्षे प्रत्यक्ष अनुभवतो आहे. जगप्रसिद्ध असे साहसी गिर्यारोहक स्वतः वेळ काढून येथे उपस्थित राहातात. त्यांनी केलेले विक्रम ऐकायला-पाहायला मिळणे, हे मी सद्भाग्य समजतो.  या साऱ्या गिरीमित्र-मैत्रिणींच्या आषाढ वारीने  माझे ‘संमेलन’ संपन्न होणार आहे.
                    तुम्ही निसर्गवेडे आहात ना ? आणि साहसप्रेमी देखील असाल ना ? मग या अठराव्या गिरीमित्र संमेलनात अवश्य सहभागी होऊन आषाढ वारीचे आनंदक्षण अनुभवा की.
                   यंदाच्या ‘गिरीमित्र संमेलनाची संकल्पना आहे गिर्यारोहण क्षेत्रातील आध्य व्यक्ती (Pioneers in mountaineering’).  या निमित्ताने मी यावर्षीच्या संमेलनातील विशेष पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून देत आहे…………… 💐जॉन पोर्टर (ग्रेट ब्रिटन/इंग्लंड)

                  सन १८५७ साली स्थापन झालेली आध्य गिर्यारोहण संस्था , ‘ अल्पाईन क्लब ‘. या संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले जॉन पोर्टर यांनी आल्प्स व हिमालयीन, काराकोरम पर्वतराजीमध्ये अवघड अशा हिमशिखर मोहिमांत सहभाग घेवून त्या यशस्वी केलेल्या आहेत.  अल्पाईन पद्धतीचे गिर्यारोहण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
                आपल्या   गिर्यारोहण मोहिमांतील अनुभवांवर जॉन पोर्टर यांनी भरपूर लेखनही केले आहे. त्यांच्या ‘ वन डे अॅज अ टायगर ‘ या प्रसिद्द पुस्तकास बांफ माऊंटन फेस्टिवलचा विशेष पुरस्कार मिळालेला आहे.  जॉन पोर्टर यांचा जीवलग गिर्यारोहक दोस्त अॅलेक्स मॅकिनटायर याच्या साहसी मोहिमांच्या आठवणी या पुस्तकामध्ये त्यांनी शब्दबद्द केल्या आहेत. १९८२ मध्ये अन्नपूर्णा हिमशिखर मोहिमेत अॅलेक्सचा अपघाती अंत झाला. आपल्या या दोस्ताची साहसी व खिलाडू वृत्ती विशद करताना जॉन यांनी मोहिमेतील कसोटीच्या क्षणांविषयी गिर्यारोहकाची अवस्था कशी असते,  याचे वास्तव वर्णन केले आहे.
        अशा या लक्षवेधी व्यक्तीमत्वाच्या सानिध्यात दोन दिवस गिरीमित्र संमेलन साजरे होत आहे.

                                                              :::::::::::::::::::::::::::::::

💐धार्मिक पण मार्मिक💐


💐धार्मिक पण मार्मिक💐
        देवपूजा प्रत्येक भाविकाला मानसिक बळ देते. काही क्षण, काही काळ त्याला एकाग्रता मिळते. त्याच्या ‘आत’ ऊर्जा उत्पन्न होते. ही ऊर्जा-शक्ती त्याचे ताणतणाव कमी करायला आणि दररोज समोर येणाऱ्या प्रश्न-समस्यांना उत्तर देण्यासाठी त्याला सशक्त करीत राहाते. अर्थात, हे सारे श्रद्धाळू भाविकाला (अंधश्रद्धाळू नव्हे) लागू आहे.
                 देवपूजा आणि फुले यांचे एकमेकांशी जवळचे सख्य आहे. देवाचरणी वाहायला हळद-कुंकू, अक्षतांसह फुले, पत्री(म्हणजे पाने) हवीतच. त्याशिवाय देवपूजा संपन्न होत नाही.  या देवपूजेला लागणाऱ्या फुलांविषयी विचार करताना मी भूतकाळात जातो, अन बालपणाच्या आठवणींमध्ये गुंग होतो. माझ्या नजरेसमोर विविधरंगी छोटी,सुबक-मोहक फुले नाचू बागडू लागतात………..

 💐फुलाफुलांत……….
    माझे शिक्षण मुंबईतील राणीबाग-घोडपदेव परीसरात  झालेय. हा भाग गरीब, कामगार   
वस्तीमधला. बहुसंख्येने मराठमोळी माणसे आहेत, पण मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, गुजराती बांधवांची कुटुंबे देखील येथे राहातात.
    आम्ही ‘चाळ’ वस्तीत राहायला होतो. आईबाबा, बहीणी-भावासह मी गुण्यागोविंदाने राहात  
होतो.  आमच्या घरी दरवर्षी गौरीगणपतीचा सण उत्साहात साजरा व्हायचा. माझी फुलांशी मैत्री या सणामुळेच झाली.
                  या सणात दुर्वा आवश्यक असायच्या.  पूजेला लागणारी फुले,फळे बाजारातून आणायचे काम बाबांचे. मी मात्र जवळच्या राणीबागेत दुर्वा, फुले आणायला जायचो. राणीबागेच्या कोपऱ्यात मोठे मैदानात व गेटजवळ दुर्वा खूप मिळायच्या. दुर्वांशिवाय पांढरी, लाल चाफ्याची फुले तेथे होती.  वाऱ्यामुळे ही फुले अलगद हिरव्या गवतावर पहुडलेली असायची.  ती मी गोळा करायचो. तेथे पारिजातकाचे झाड होते. तेथ खूप सडा पडलेला असायचा  छोट्या, नाजूक प्राजक्तफुलांचा ! ती फुले वेचल्यावर राणी बागेत, थोड्या आतल्या दिशेस मी फुलेल धुंडाळायचो. लाल-पिवळी जास्वंद, कर्दळीची त्याच वर्णाची डेरेदार फुले, पांढरी तगर, अनंताची फुले दिसायची. फुलांची पिशवी भरून जायची. पण हे काम माळ्याची नजर चुकवून करावे लागे ! 
                  फुलांच्या ओढीने फुले ‘कळू’ लागली. त्यांचा स्पर्श मला देवभक्तीकडे ओढू लागला.  ही ताजी व निर्मळ फुले श्रीगजाननाच्या पायी अर्पण करताना माझे मन खूप भाविक व्हायचे.  इतरांचेही असेच होत असेल ?
                गणपतीगौरीत दररोज सकाळी राणीबागेतून आणलेल्या दुर्वा आणि फुले श्रीगणरायापुढे अर्पण व्हायचे.या सणात,  एके दिवशी गौराईचे आगमन व्हायचे. त्या दिवशी तेरडा फुलांची छोटी फांदी व लाल तुऱ्याचे गवत असलेली जुडी लागायची.  गौरीपूजेच्या दिवशी चवळी, करंद, तवशाची पाने भायखळा बाजारात मिळायची.  
                आमच्या घरी गौराईच्या गळ्यात भेंडीच्या पिवळी फुलांचा, लाल टिपक्यांचा हार व डोक्यात छानशी वेणी विशेष शोभून दिसायची. मी खटपट लटपट करून, फिरून कोठून तरी भेंडीची फुलं आणून द्यायचो. गौराई आल्यानंतर बायकांची ये-वाढायची. गौराई पूजेच्या दिवशी तर सारे घर आयाबायांनी भरून जायचे !  आमच्या घरी फुला फुलांनी आणि माणसांनी बहरलेला गौरी गणपतीचा हा सण असा उत्साहात साजरा व्हायचा.
               आजच्या काळात मात्र, शहरी भागांत, पिवळी भेंडीची फुले बघायला मिळत नाहीत. चाफा, कर्दळी, जास्वंद-प्राजक्तफुलेदेखील दुर्मिळ झालीत.  काँक्रीटच्या या जंगलात हिरव्यागार दुर्वानी बहरलेले एखादे तरी मैदान तुमच्या दृष्टीस पडावे, अशी आज स्थिती नाही.
              श्रावण महिन्यात, आणि गणपतीच्या सणात, कमळाची फुलेही बाजारात सहज मिळतात. लाल-गुलाबी, निळी-जांभळीशार, पांढरीशुभ्र कमलपुष्पे गणपतीगौरीसमोर एका पसरट भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये ठेवलीत, की आपल्या देवांचा मंडप किती भरल्यागत वाटेल सांगा !
               या महिन्यात केवडा, मोगरा, अबोली, गोंडा(झेंडू) ही फुलेसुद्दा बाजारामध्ये मिळतात. गोंडा नवरात्रामध्ये भरपूर मिळतो.  आमच्या गावच्या घरी देवीच्या  घटस्थापनेला दररोज गोंडयाची माळ गुंफायला लागते. तेव्हा हे लाल-पिवळे गोंडे उपयोगी पडतात. दिवाळीत तर गोंडा फुलांची मागणी खूप वाढते. तरीही, शहर असो वा गाव, सर्वत्र हे गोंडे वाजवी किमतीत मिळतात.
              आज या फुलाफुलांच्या आठवणी सांगताना, मी स्वतःस सुदैवी समजतो, कारण शहरात राहून, दररोज सकाळी देवपूजेला मला ताजी फुले मिळतात ! खिडकीत लावलेली सदाफुली सदैव बहरलेली असते, तुळशीचे छोटे रोपटे आहे.  या तुळशीची पाने व मंजिऱ्या देखील मिळतात. पावसाळ्यात,  खिडकीतल्या कुंडीत दुर्वा लावल्या, की त्या वाढत राहतात. नंतर त्या पूजेसाठी मिळतात.  गावाहून दोन वर्षांपूवी आणलेली जास्वंदीची छोटी फांदी आता जोमानं वाढतेय. अधून मधून ती लाल जास्वंदीचे फुलही देऊ लागलीय. गावी मुक्कामी असतो,  तेव्हा पूजेला पांढरी तगर आणि सुवासिक पिवळा चाफा, जास्वंदीची फुले माझी सकाळ आणखी ‘शुभ’ करतात.  गावी परसात फुलं मिळतात, तर मुंबईत खिडकीतली फुले माझी देवपूजा सुफळ संपूर्ण करतात.
              अजून एक सांगायचेय- गावच्या देव्हाऱ्यात वर्षातून कितीतरी वेळा सकाळी व सायंकाळी स्वतः सूर्यदेव अवतीर्ण होतात !  फुलाफुलांनी, पानांनी केलेली माझी  देवपूजा पाहतात, स्मित करीत क्षणभर थांबतात. त्यावेळी मी डोळे मिटून त्या तेजस्वी सुर्यदेवतेला मनोभावे नमस्कार करतो. आता माझी प्रार्थना परिपुर्ण झालेली असते.
                 आहे की नाही मी भाग्यवान ?  
                                                    :::::::::::::::::::::::::::::::::::::