Friday, 1 May 2020

💐हिमयात्रा💐


💐हिमयात्रा💐
 
             आपल्या भारत देशाचे भाग्य एवढे थोर आहे, की शुभ्रधवल हिमालयाच्या रुपात स्वर्गच जणू या देशात अवतरला आहे !  अशा या हिमालयाचे नाव कुणी उच्चारले तरी माझ्या नजरेसमोर हिमालयीन उत्तुंग  शिखररांगांची सुंदर चित्रं  झळकू लागतात, आणि  माझे अंतर्मन लगेच हॅवरसॅक भरून, ती पाठीला लावून, माझी पावले  हिमयात्रेस निघतात !
             सह्याद्री आणि हिमालयात भटकण्याची मला खूपवेळा संधी मिळालीय. तीचा लाभ मी जमेल तसा घेतलाय. या मनसोक्त  भटकंतीत मला  मिळालेल्या अनुभवांविषयी थोडेफार लिहिलेय देखील.
             पण आज आपण येथे वाचणार आहात, ते माझे नव्हे, तर कोलकात्याच्या एका मनस्वी गिर्यारोहकाने (चिनमोय चक्रबर्ती) केलेल्या स्मरणीय हिमयात्रेचे एक टिपण आहे…….

💐मारतोलीयाचा दुर्गा सिंग💐
           हिमालयात, मिलाम ग्लेशिअरचा ट्रेक करणारे भटके ट्रेकर्स सहसा मारतोली गावातून पुढे जात नाहीत, कारण एकतर ते मेन रुटला नाही आणि तिकडून स्टीफ चढणीची वाट कोण पत्करेल ?
           मात्र मी त्या वाटेने जायचे ठरवले, नंदादेवीची शिखररांग त्याबाजूने सुंदर दिसते म्हणून !
           एके दिवशी मी तिकडे निघालो. आदल्या रात्री मुक्काम रीलकोट या गावी होता. तेथून मारतोली चार किलो मीटरवर आहे. सकाळीच आम्ही मारतोलीची वाट धरली. हा ट्रेक रूट विशेष कठीण नव्हता. वाटेतील हिरवाई, टवटवीत हिमालयीन फुलं पाहात रमत गमत, मध्येच विश्रांती घेत आणि गोरी गंगा नदीच्या खळाळणाऱ्या प्रवाहाचा आवाज ऐकत-पाहात आम्ही मारतोलीकडे कूच केले. हे गाव दीड किलोमीटर्सवर असतानाच मला हरदेवल(Temple of God)हे हिमशिखर पाहायला मिळाले. ते मनोहर दृश्य नजरेत साठविण्यासाठी मी काही वेळ तेथेच एका खडकावर बसून राहिलो.
          ७१५० मीटरची उंची असलेल्या हरदेवल शिखरावर चढाई करण्याचे प्रयत्न १९३९ नंतर सुरू झाले. १९६७ मध्येही एक मोहीम झाली. मात्र आयटीबीपीने १९७८ मध्ये आखलेली मोहीम यशस्वी ठरली. एस.पी. मुलासी यांच्या नेतृत्वाखाली हरदेवलवर ३१ मे रोजी हरदेवल शिखर आरोहित झाले.
        तिबेटच्या हद्दीला लागून असलेला हा पूर्ण भाग फार पूर्वी जोहर किंवा सौका साम्राज्याच्या अखत्यारीत होता. या श्रीमंत राजघराण्याचा तिबेट समवेत मोठा व्यापार चाले. तिबेट नेपाळने हे साम्राज्य ताब्यात घेण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. पण उपयोग झाला नाही. सौकाचे अस्तित्व स्वतंत्रच राहिले. मात्र, ब्रिटिशांच्या आक्रमणानंतर सौका कायमचे पारतंत्र्यात गेले.   
        भारतीय स्वातंत्र्यानंतर सौका भारतात समाविष्ट झाले, पण दूर एका दुर्गम अशा कोपऱ्यात ! आणि चीनशी युद्ध झाल्यावर तर सौका तिबेटमधील व्यापारच बंद झाला, संवेदनशील सीमा परिसर म्हणून ! सौकाच्या वैभवाला उतरती कळा लागली. १९६१ साली असलेली साडेचारशेची वस्ती १९८१ मध्ये पार अठरावर आली ! आता फक्त तेथील घरांच्या  कुशलकोरीव दार-चौकटी  सौकातील जुन्या समृद्ध साम्राज्याची आठवण करून देत आहेत.
       मी त्या गावात असताना सरकारी पाहुणा  म्हणून माझी आयटीबीपीच्या एम.एस.भंडारी नावाच्या इन्स्पेक्टरने चांगली सोय केली. त्या गावचा प्रमुख( मुखीया) दुर्गा सिंग मारतोलीया याच्या घरी माझा पाहुणचार घडला.ताडमाड उंच असा हा राजपूत गृहस्थ उमद्या स्वभावाचा होता. दुर्गासिंगचे वय पन्नासीचे असावे  असे मला वाटले.
         पण हा तर पासष्ट वर्षाचा बुजुर्ग तरुण निघाला ! मारतोली गावची परंपरा अशी आहे, की प्रत्येकाच्या नावापुढे गावाचं नाव येतं ! म्हणून दुर्गा सिंगचे आडनाव झाले  मारतोलीया.
        १९८२ पासून दुर्गा सिंग गावचा मुखीया झाला. त्याची मोठी बहीण आणि तो मारतोलीयात राहातात. बहीण त्याला प्रेमाने     दुग्गोम्हणते, !
        या गावात सगळी घरे एका विशिष्ट पद्धतीने बांधलेली आहेत. खडकाळ जागेवर खड्डा खणून तयार केलेल्या घरात जाण्यासाठी चौकोनी प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करतो, म्हणजे खाली उतरतो ! घर प्रशस्त असले, तर त्याचा पहिला मजला आपल्या ग्राउंड पातळीवर असतो. या घरांना अत्यंत छोट्या खिडक्या असतात,तीव्र थंडी आणि वेगवान वाऱ्यापासून बचाव व्हावा म्हणून ! दिवसभर  रेल्वे इंजिनाच्या जोरदार आवाजाइतका तुफान वारा वाहात येथे असतो !
       दुर्गासिंगने माझी व्यवस्था पहिल्या मजल्यावर केली होती. एका आलिशान वूलन कार्पेटवर एक प्रशस्त पलंग होता. ‘हा पलंग राजाच्या वापरातील आहे असे मला दुर्गा सिंगने सांगितले ! त्या पलंगापाशी  छोटी खिडकी होती. दररोज राजा तेथून दिसणाऱ्या एका जुन्या हिमशिखराचे दर्शन घेई. त्या शिखराचे नाव बनकातीआ’. त्या शिखराचे रंग सकाळ संध्याकाळी बदलत असत. याशिवाय, तेथे असलेल्या बकलो (की बकुळी ?) फुलांचा सुगंध सभोवती दरवळत असतो, ही फुले जशी सुकत जातात तसा इथला परिसर सुगंधित होत जातो !
        इथे दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था आयटीबीपी कॅम्पने केली होती. ब्रेकफास्ट मात्र मला दुर्गासिंगसह घ्यावा लागे. त्याच्या बहिणीच्या हातचे बटाट्याचे रुचकर पदार्थ मला मिळत होते.
       या मरतोलीया गावात फक्त पाच घरे आहेत. त्यामुळे गावचा दुर्गासिंग त्याच्या बहिणीकडे दिवसभर निवांत वेळ असायचा. त्याने तेथे बटाट्याची काही लागवड केली आहे, सकाळची वेळ त्या कामासाठी तो राखून ठेवायचा.
       येथे आमच्या खूप गप्पा झाल्या हिमालयावर. दुर्गासिंग औषधी वनस्पतींचा चांगला जाणकार आहे. त्याला युपी सरकारकडून कधी सल्ल्यासाठी, तर कधी सेमिनारसाठी बोलावले जायचे. (आता यूपीचे विभाजन झालेय). दुर्गासिंगला दोन मुली आणि दोन मुलगे आहेत. ते सगळे शहरात संसार थाटून आनंदाने राहात आहेत. त्याला आता पैश्याअडक्याची काही आवश्यकता नाही
       पण त्याचे मन हिमालयाच्या निसर्गाने ओढले गेलेय. म्हणून दुर्गासिंग आपल्या बहिणीसह दर वर्षी इथे येतो, राहातो आणि  ऑक्टोबर नंतर परत आपल्या मूनसीराई येथील दुसऱ्या घरी परततो. विशेष सांगायचे म्हणजे, याने एकट्याने मेहेनत करून बिर्च(Birch Tree) झाडांची मोठी लागवड करून मोठे जंगल तयार केलेय. या जंगलाने कस्तुरी मृगानाही आकर्षित केले आहे
       मात्र वाईट गोष्ट म्हणजे चोरट्या शिकारींमुळे  या जंगलाला धोका निर्माण झालाय, त्याने मला ही बाब  मूनसीराईच्या  डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या कानी घालण्याची विनवणी केली.
      मी दुसऱ्या दिवशी सकाळीच नंदादेवीचे दर्शन घ्यायचे ठरवले. गावात टेकडीवर नंदादेवीची प्राचीन देवालय आहे. ते देऊळ बंद होते. पण कुलूपबंद केले नव्हते. मी दरवाजा उघडला आणि आत गेलो. आत मी पाऊल टाकले, आणि क्षणात मोहक अशा सुगंधाची दरवळ मला जाणवली ! तो सुगंध मला काल अनुभवायला मिळाला होता. सुकलेल्या बकलू फुलांचा तो सुगंध ! मी देवळाबाहेर आलो आणि खाली पायरीवर बसलो, तरी तो सुगंध दरवळत होता.
        विशेष म्हणजे समोर दिसणारी उत्तुंग अशी  नंदादेवीची शिखररांग नुकत्याच आलेल्या सूर्यकिरणांनी सुवर्णमंडीत झालेली मला पाहायला मिळाली ! मला तर वाटतं, या देवळातील नंदादेवी क्षणार्धात त्या नंदादेवी हिमशिखरावर जाऊन, शांतपणे विराजमान होऊन बसलीय !
         मला आज येथून मुक्काम हलवायचा होता. निघताना मला दुर्गसिंगच्या बहिणीने खुसखुशीत बटाटे खायला दिले वाटेत खाण्यासाठी. दुर्गासिंग तर गावाच्या सीमेपर्यंत मला सोडायला आला होता. आम्ही निरोप घेतला, मिलाम व्हॅलीच्या मुख्य मार्गावर जाण्यासाठी  मी मारतोलीयातून उताराची  वाट धरली.
         आता येथे आपले पुन्हा येणे जवळपास शक्य होणार नव्हते. दुर्गासिंगही पुन्हा भेटणार नव्हता. म्हणून मी सहज पाठी वळून पाहू लागलो, तर दूर उंचावरील एका टोकावर दुर्गासिंग मलाच न्याहाळत होता ! मला गहिवरून आले. त्या क्षणी मला मनोमन वाटले की आपले एक हक्काचे घर झालेय दुर्गम अशा या हिमालयातील मारतोलीयामध्ये.  त्यानंतर, आम्ही प्रत्यक्ष नाही, तरी फोन द्वारे संवाद मैत्री सुरूच ठेवली.       
        या विलक्षण माणसाने एकट्याने मेहेनत करून बिर्च(Birch Tree) वृक्षांची जी लागवड केली होती, ते आज एक लक्ष वृक्षांच्या दाट जंगलात रुपांतरीत झालेय. जवळपास डजनभर कस्तुरीमृग तेथे आनंदाने वास्तव्यही करीत आहेत !
        आपल्या थोरल्या भावाची- दुर्गासिंगची मारतोलीयातील ती सुंदर वास्तू, मारतोलीया गाव, आणि नंदादेवी, हे सारे माझ्या कायम  स्मरणात राहील.
        दुर्गासिंग मारतोलीयाच्या कर्तुत्वाला माझा सलाम आहे.


(वाचन संदर्भहिमालयन जर्नल २०१३-१४).
                                                                 ::::::::::::::::::::::::::::