Wednesday 8 May 2024

💐💐आठवणीतील व्याख्याने💐💐

                दुर्ग किल्ल्यांची भटकंती करणाऱ्या छंदीष्ट तरूणांना पर्वणी ठरावी, असे एक व्याख्यान ऐकण्याची संधी नुकतीच मला मिळाली. विलेपार्ले येथील जनसेवा समिती या जून्या जाणत्या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. संदीप मुळीक या तरुण लेखकाने गोमंतक भूमीतील स्वराज्यकालीन व त्यापुर्वी घडलेल्या घटना तसेच, प्राचीन वास्तूंचा शोध घेऊन त्यांचा इतिहास ‘गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर’ या पुस्तकात शब्दबध्द केला आहे. त्या शोध-भटकंतीचा धांडोळा घेणारे हे व्याख्यान होते……………..

💐मराठ्यांचे गोमंतकीय दिग्विजय💐

                 ‘मराठ्यांचे गोमंतकीय दिग्विजय’ या विषयाची व्याप्ती मोठी आहे. त्यामूळे संदीप मुळीक यांनी श्रोत्यांपूढे स्लाईड व व्हिडिओच्या माध्यमातून सादरीकरण करुन माहिती देण्यास सुरुवात केली.

                 गोवा महाराष्ट्राचे शेजारी व दक्षिण कोकणाला लागून असलेले स्वतंत्र राज्य आहे. गोव्यात समुद्रकिनारे, चर्चेस पहायला पर्यटक गर्दी करतात. मनसोक्त दारू ढोसायला व रात्रभर बोटीची सैर करुन नाचायलाही मिळते ! गोव्याची ती ख्याती आहे.

                 मात्र याच गोमंतक भूमीच्या इतिहासात डोकावून पाहिले तर प्राचीन काळापासून हा भाग समृध्द असल्याचे ज्ञात होते. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांच्या पराक्रमाशी संबंधित ही भूमी आहे. नाविक दृष्ट्या महत्वाचे असलेले अंजदीव बेट(अंज म्हणजे पाच) हे महत्त्वाचे ठिकाण गोव्यात होते. आज त्याच ठिकाणी नौदलाचा मोठा तळ कार्यरत आहे.

                 दोन जिल्हे आणि बारा तालुके गोव्यात आहेत. मुळात कोकण प्रांत डहाणू – पालघर पासुन गोव्यासह कारवारपर्यंत पसरलेले होते. मौर्य काळापासून हा प्रांत अस्तित्वात असल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. सुरत, सोपारा, कल्याण, वेंगुर्ला ही व्यापारदृष्ट्या महत्वाची ठाणी होती.

                 या गोमंतक भुमीमध्ये पन्नासच्यावर किल्ले होते. सौसगड, अग्वाद किल्ला, रेश मापुस किल्ला, कोलवाळ किल्ला, बेतुल किल्ला, फोंडा किल्ला, डिचोली किल्ला, कुंकली, राशोत, मडगाव किल्ला सांगे, सुपे आणि ऊसगाव किल्ला, बोरी किल्ला, अशा कितीतरी किल्ल्याची नावं सांगता येतील. आज त्यांपैकी बरेच किल्ले अस्तित्त्वात नाहीत. काही किल्ले गावाच्या नावरुपात शिल्लक आहेत. काही मोजके किल्ले अजून भक्कम अवस्थेत आहेत.

                  कोकण प्रांत व तेथील बंदरे मराठ्यांच्या ताब्यात नव्हती, फिरंगी व्यावसायिक स्थानिक राज्यकर्त्यांना हाताशी घेऊन त्यावर हुकूमत करीत होते. हे पाहून महाराजांनी दूर दृष्टीने विचार केला व ‘ज्याचा समुद्र त्याचं राज्य, त्याचेच आरमार’ हे धोरण अनुसरून कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर मुहूर्तमेढ रोवली. १६६३ मध्ये कुडाळ जिंकले, मग वेंगुर्ला येथे आले. तेथे डच वखार होती, ती आदिलशहाने काबीज केली होती. तो भाग राजांनी घेतला, गोमंतकातील सातेरी(म्हणजे सत्तरी), बीचोली(म्हणजे डिचोली), आणि बसनुर मोहीम महाराजांनी स्वतः फत्ते केली. कोल गावाजवळील बेतूल या किल्ल्याचे बांधकाम स्वराज्य काळात पूर्ण करुन घेतल्याचे उल्लेख जून्या दस्तऐवजांत असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

                 जून्या गोव्यामध्ये श्रीगोमंतेश्वर व सप्तकोटेश्वर मंदीर आहे. मोगली राजवटीत यांसह बऱ्याच देवस्थानांची हानी झाली होती. शिवाजी महाराजांनी वैयक्तिक लक्ष घालून यातील बरीच देवस्थाने वाचविली. १६६८ मध्ये सप्तकोटेश्वर मंदिराची पुनर्स्थापना केली. फोंडा किल्ला महाराजांच्या मावळ्यांनी मोठा पराक्रम करून १६७५ मध्ये जिंकला. फोंडा शहर आता आधुनिक झालेय. मात्र त्याकाळी फोंडा किल्ला घेताना मोठे अडथळे उभे राहीले होते. सारे अडथळे पार पाडून किल्ला ताब्यात यावा म्हणुन फोंड्यातील जागृत दर्गा स्थानाला राजांनी प्रार्थना केली. फोंडा किल्ला ताब्यात आला. हे ऋण फेडण्याकरीता संभाजी राजांनी दर्गा स्थानासाठी वतन व्यवस्था केली.

                  गोमंतकातील जवळपास दीडशेहून अधिक किलोमीटरचा प्रदेश शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आला होता. तो १६८६ पर्यंत ताब्यात राहिला. नंतरच्या पेशवे काळात १७३९ साली बाजीराव पेशवे यांनी दक्षिण गोवा मोहीम आखून पराक्रम केल्याच्या ऐतेहासिक नोंदीही आहेत.

                  दृकश्राव् माध्यमातील ऐकायला मिळालेल्या या व्याख्यानातून श्रोत्यांना गोव्यातील सेंट फ्रान्सिस चर्च, राशो सेमिनरी, फोंडा-फार्मागुडी, आग्वाद, बार्देश या प्राचीन स्थळांबद्दल बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

                  अर्थात, संपूर्ण गोमंतक प्रांताचा इतिहास जाणून घ्यायला हे एक व्याख्यान पुरेसे नाही. संदीप मुळीक यांनी परिश्रपूर्वक सारा प्रांत प्रत्यक्ष फिरून, स्थानिकांच्या भेटी घेऊन, अभ्यासकांशी चर्चा करून आणि जुन्या दस्तऐवजांची तपासणी करून पुस्तकाचे लेखन केलेय. हा महत्त्वाचा विषय सर्वदूर जावा म्हणुन ते सतत व्याख्यानाच्या माध्यमातून दौरे करीत आहेत. त्यांच्या या सत्कार्यास शुभेच्छा.

                                                                       :::::::::::::::::::::::::


No comments:

Post a Comment