Tuesday, 2 November 2021

💐💐वाचनछंद💐💐

 

मराठी साहित्य आणि नाट्यविश्वातील जाणते लेखक-नाटककार वसंत कानेटकर यांनी लिहिलेली बहुतेक नाटके मला पाहायला मिळाली. विशेषतः त्यांची ऐतेहासिक नाटके मी आवर्जून पाहिलीत.

                नाट्यगृहातील सारे प्रेक्षक इतिहासकालीन व्यक्तिमत्व पाहाताना, त्यांचे अभिनय संवाद फेक अवलोकन करताना प्रभावित व्हायचे. रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू ही त्यांची नाटके खूप गाजली आहेत.                         

               इतिहासाचा अभ्यास करून जुने उपलब्ध दस्तऐवज पाहून, तपासून संबंधितांकडे खात्री करून आणि प्रसंगी त्या स्थळांपर्यंत जाऊन खातरजमा करणारे आणि त्यानंतर आपली नाट्यकृती निर्माण करणारे  वसंत कानेटकर हे वास्तववादी नाटककार होते.

                छत्रपती शिवरायांच्या पूर्वकाळापासून पुढच्या वाटचालीची इत्यंभूत माहिती घेऊन त्यांनी लिहिलेल्या  शिवशाहीचा शोधया प्रसिद्ध अभ्यासपूर्ण पुस्तकाची मला झालेली प्राथमिक ओळख मी तुम्हाला करून देत आहे. प्रत्येक इतिहासप्रेमीच्या संग्रही हे पुस्तक असायला हवेय.

                हे पुस्तक वाचताना मला शिवकालीन दिगग्ज व्यक्तिमत्वांची नव्याने ओळख झाली. काहींच्या गुण-अवगुणांमुळे मराठ्यांचा इतिहास कसा बदलत गेला तेही ज्ञात झाले.

                म्हणून या पुस्तकातील काही नोंदींसह माझे या पुस्तकविषयीचे मत मी इथे मांडत आहे……...

💐शिवशाहीचा शोध💐

            वसंत कानेटकरांनी जी पाच ऐतेहासिक नाटके लिहिलीत, ती लिहिण्यापूर्वी त्यांनी इतिहासकालीन ग्रंथ, बखरी, वृत्तांत, इत्यादी बरेचसे साहित्य अभ्यासले होते. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन थोरामोठ्यांना समक्ष भेटून सत्य माहिती मिळविण्याचे त्यांनी प्रयत्न केले.       

                या पुस्तकात कानेटकर यांनी शहाजी राजांपासून ते राजाराम, ताराबाईंपर्यंतचा काळ वाचकांपुढे मांडला आहे. त्यातील घटना वाचताना खूप धक्के बसतात. शहाजीराजे, शिवाजी महाराज, त्यांच्या राण्या, कर्तबगार माणसं सहकारी, मावळे, पुत्र संभाजी, राजाराम, त्यांच्या पुढील पिढ्यांचे उल्लेख आहेत.    

                सईबाई, येसूबाई, सोयराबाई, राजारामाची पत्नी ताराबाई, शंभुपुत्र शिवाजी उर्फ शाहू, या साऱ्यांविषयी देखील वेधक माहिती वाचायला मिळते


                या पुस्तकात मराठ्यांच्या शत्रूपक्षातील औरंगजेब केंद्रस्थानी आहे. कपटी, धर्मवेडा, कुणावरही विश्वास ठेवणारा  कठोर असा शहेनशहा औरंगजेब मराठ्यांविरुद्द अखेरपर्यंत लढला. परंतु शेवटी त्याला मराठ्यांना पूर्णपणे जिंकता  आले नाही. त्याने संभाजी महाराजांवर कसा राग काढला, कूटनीती करून त्यांना कसे क्रूरपणे छळले, ते वाचून मन अस्वस्थ होते. याकरीता काही अंशी संभाजीही जबाबदार असल्याचे आपण या पुस्तकात वाचतो.

                पूर्वी, म्हणजे आदिलशाहीत त्यानंतरच्या काळात फितुरी होती. भ्रष्टाचार होता. कपटनीती होती. या साऱ्याची मोठी झळ मराठ्यांना बसलीय.  

                कानेटकरांनी शिवरायांच्या चांगुलपणाची आणि कार्य कर्तृत्वाची भरपूर माहिती पुस्तकात दिलीय. त्यांना स्वराज्यात साथसंगत देणाऱ्या जेष्ठ श्रेष्ठ मान्यवरांची माहिती देखील यात आहे.    

               शिवाजी महाराजांनी सक्तीने धर्मांतर घडविणाऱ्या गोव्याच्या दोन पोर्तुगीज पाहुण्यांना देहांत शासन दिले. धर्मांतरीतांना आपल्या धर्मात पुन्हा घेण्याचे त्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यास धर्ममार्तंडांचा विरोध झाला, त्यामुळे महाराजांचे काम अपूर्ण राहिले.

              जिजाऊंचा मृत्यू-१७ जून १६७४ रोजी झाला, राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी. तो सर्वांना अपशकुन वाटला. उगीच शंका नको म्हणून राजांनी २४ सप्टेंबर रोजी राजगडावर दुसरा राज्यभिषेक निश्चलपुरी नामक तांत्रिक योग्याकडून करवून घेतला.

              मोगल सरदार बहादुरखान याला राज्यांनी पेडगाव येथे साध्या डावपेचाने सैरभैर केले. महाराजांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एका भागाने हल्ल्याची हुल दाखवून बहादूरखानाला त्याच्या छावणीतून सैन्यासह बाहेर काढले. मग माघार घेतल्याचे दाखवून त्याला २० कोसपर्यंत पाठलागावर नेले. पूढे राजांचे सैन्य चारी वाटानी गायब झाले ! बहादूरखान आपल्या सैन्यासह दूर जाताच महाराजांनी उरलेल्या सैन्यानिशी येऊन त्याच्या छावणीवर हल्ला केला. त्याचे तंबू जाळले आणि खजिन्यासह  २०० घोडे ताब्यात घेतले.

              शिवाजी महाराजांच्या आयुष्यात चार महत्वाच्या पराभवांची ओझरती माहिती या पुस्तकात दिली आहे -

-विजापूर-आदिलशाही घेणे त्यांना शक्य झाले नाही आणि वर्चस्वही मोडता आले नाही.

-मूरुडचा जंजिरा त्यांना  हस्तगत करता आला नाही.

-सावत्र भाऊ व्यंकोजी(तंजावर)ला राजी करणे जमले नाही.

-संभाजीचा दुरावा त्यांच्या मनी लागला. त्याने मोगलांकडे केलेले पलायन महाराजांना पटले नाही.

                 महाराजांच्या आयुष्यात महत्वाचे गौरवक्षणही घडलेत. त्यांनी दक्षिणेत मिळविलेला दिग्विजय आणि कुतूबशहाकडून झालेला सन्मान.

                 जिंजीचा किल्ला राजांनी किल्लेदार नसीर मुहम्मद यास ५०,०००/- उत्पन्नाच्या जहागिरीचे आमिष दाखवून वश करून घेतला. नंतर किल्लेदार रामाजी नलगे याची नेमणूक करून सुभेदारी विठ्ठल पिलदेव यास दिली.

                  दक्षिणेत तिरुवरमलई जवळ असलेल्या पेरूमल देवाच्या दोन मंदिरांच्या मशिदी करण्यात आल्या होत्या, त्याचे महाराजांनी पुन्हा मंदिरात रूपांतर करवून घेतले शिवलिंगे विधिपूर्वक स्थापन केली.

                  आपला कौटुंबिक मालमत्तेचा वाटा मागण्याची स्पष्ट मागणी महाराजांनी व्यंकोजीकडे केली होती. पण त्याने ती धुडकावली. तेव्हा लढाई करून त्याच्यावर संताजीने हल्ले चढविले. याच दरम्यान महाराजांस रायगडावर तातडीच्या कामासाठी जावे लागले. मग भावाभावात तह झाले.

                 १६७५ साली शिवाजी महाराज साताऱ्याला असताना दीर्घकाळ आजारी पडले. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे इंग्रजांचे म्हणणे होते. त्यांच्या कागदपत्रात तसा उल्लेख आहे.

                राजारामाची मुंज लग्नानंतर शिवाजी महाराज आजारी पडले. तो आजार रक्तातीसार असल्याचे  इंग्रजांचे मत होते, तर हा ‘ bloody flux Intensinal Anthrax’ नावाचा आजार असल्याचे पोर्तुगीजांचे मत होते.

                शिवाजी राजे शेवटच्या काही दिवसांत बेशुद्धावस्थेत होते. पन्नास वर्षे जगलेल्या राजांच्या मरणसमयी त्यांच्या जवळ कोणीही मंत्रीगण नव्हते.

                संभाजीराजे आणि अण्णाजी दत्तो(सचिव), मोरोपंत, इतर सर कारकुनांमध्ये तेढ होती, अशी नोंद या पुस्तकात आहे.                  

                 संभाजी राजे शिवाजीराजे यांच्यातील वाद वाढत राहिले. दोघांत दिलमजाई झाली नाही. राज्यांचे दोन भाग करण्याचा राजांचा प्रस्ताव संभाजीने नाकारला ते विषय पुढे पुढे नेले.       

                सोयराबाईंच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ( एप्रिल १६८०) २१ एप्रिल रोजी अण्णाजी दत्तो , मोरोपंत  इत्यादी प्रधानांनी राजारामाचे मंचकारोहण केले संभाजीला कैद करण्यासही फर्मावले.      

                त्यावेळी संभाजीराजे पन्हाळ्यावर होते. त्यांना हे समजल्यावर त्यांनी सारी सूत्रे स्वहाती घेऊन तेथेच राजा म्हणून घोषित केले. मात्र त्यांना रायगडावर १८ जूनला कैद करून आणण्यात आले. पुढे  २० जुलैला त्यांचे मंचकारोहण झाले १६ जानेवारी १६८१ ला राज्यारोहण सोहोळा झाला.

                मग संभाजीराजांनी प्रधानांना मुक्त केले. सोयराबाईना कैद केले नाही. मात्र सुरक्षा म्हणून नजरकैदेत ठेवले.

               संभाजीराजांवरही विषप्रयोग झाला होता. याच वेळी मे-जून १६८१ मध्ये औरंगजेबपुत्र अकबर रणांगणातून पळून राजांच्या आश्रयाला आला. त्याच्या बरोबर त्याचा मित्र दुर्गादास राठोडही आला.

               आपल्यावरील कटकारस्थानाची माहिती एका पत्रामुळे अकबर कलशामार्फत संभाजीराजांना समजली. मग त्यांनी अणाजीपंत सचिव, बालाजी आवजी, सोमजी दत्तो, हिरोजी फर्जंद यांना देहांत शासन दिले, अशी माहिती या पुस्तकात आहे.

                 संभाजीच्या आईचे(सईबाई) जन्मानंतर वर्षांनी (१६५९) निधन झाले. त्यांचा सांभाळ १५ वर्षेपर्यंत जिजामातांनी केला. त्यानंतर राजारामाचा जन्म झाला.

                 बुऱ्हाणपूर येथे दोन वर्षे मोगल छावणीत शहजादा मोअज्जम(सुभेदार) यांच्या संगतीत संभाजी राहिला.

                 शाक्त पंथाची दिक्षा कलशाने संभाजीराजांना दिली. १६८९ मध्ये मोगलांनी त्यांना पकडल्यानंतर सोडविण्याचे विशेष प्रयत्न झाले नाहीत.

                संगमेश्वरात राजांना फेब्रुवारी १६८९ ला अटक झाली. खेळण्यात गणोजी शिर्केचा बंदोबस्त करण्यास ते गेले होते. खेळण्याहून रायगडावर जाण्यासाठी संगमेश्वरात आले, तेव्हा ही अटक अनपेक्षित पणे झाली. त्यासाठी शेख निझाम कोल्हापूर येथून फौज घेऊन आला होता. अगोदर मुकर्रबखानाने हेर पाठवून सगळी माहितीही घेतली होती. संभाजी राजांचा जिवलग कवी कलश याने संगमेश्वरला बागा वाडे बांधले होते, असेही यात वाचायला मिळते. 

            संभाजी राजांना पकडल्यानंतर स्वराज्य विस्कळीत झाले. औरंगजेबाच्या आदेशानुसार राजांचे क्रूर पद्धतीने हाल करण्यात आले. डोळे फोडल्या नंतर राजांनी जेवणखाण सोडले. सगळ्यांनी सांगूनही ऐकले नाही. 

            मग वढू कोरेगाव येथे ११ मार्च १६८९ ला संभाजी राजांना कवी कलशला ठार मारण्यात आले. (राजाराम तेव्हा १९ वर्षाचा होता ). राजांची रीतसर उत्तरक्रिया झाली नाही. येसूबाईनी त्या स्थळी राजांचे साधे स्मारक केले.

           औरंगजेबाने संभाजी राजांच्या निधनानंतर १४ दिवसात रायगडाला वेढा दिला(२५ मार्च).  त्यावेळी  येसूबाई २८ वर्षाच्या होत्या.

           या प्रसंगी हुशारी दाखवून येसूबाईनी  कैदेतल्या व्यक्तींना सोडवले. राजारामाचे मंचकारोहण केले. छत्रपतींचे अधिकारही त्यांना दिले. तेथील किल्लेदार चांगोजी काटकर मुख्य अधिकारी येसाजी कंक होता. त्यावेळी स्वतः मुलाला घेऊन रायगडावर त्या राहिल्या. मात्र राजारामाबरोबर सरदार मुत्सद्दी यांना सुरक्षितपणे पन्हाळगड किंवा विशाळगडावर जाण्यास सांगितले. त्यात परशुराम त्र्यंबक, रामचंद्रपंत, अमात्य नावडेकर, शंकराजी नारायण , धनाजी जाधव, खंडो बल्लाळ, संताजी घोरपडे, खंडेराव दाभाडे हे होते. अर्थात, औरंगजेब धूर्त असल्याने धावपळ व्यर्थ ठरली मराठ्यांचा पराभव झाला.                                          

           औरंगजेब हा शिवराज्यातला सर्वात मोठा परकीय शत्रू होता. त्याने फितूर सरदार, किल्लेदार, आणि वतनासाठी लोभी असलेली माणसं, यांचा पुरेपूर उपयोग आपले साम्राज्य वाढविण्यासाठी करून घेतला

           औरंगजेबाने संभाजीराजांचे केलेले हाल या पुस्तकात वाचताना खूप क्लेश होतात.                                               

           विशेष म्हणजे याच संभाजीराजांचा पुत्र शहाजी त्याची आई येसूबाई (शंभुपत्नी ) यांना औरंगजेबाने शरणार्थी म्हणून सांभाळले, तेही शेवटपर्यंत !  मात्र, यात येसूबाई यांनी मुत्सद्दीपणा दाखवून विचारपूर्वक कृती करून त्याचा आश्रय घेतला होता.

               शिवाजी महाराजांनी दुसऱ्या धर्माची स्थळांची विटंबना कधी केली नाही. उलट, मशिदीना नेमणुका दिल्या. रस्त्यावर पडलेली  कुराण प्रत मौलवीकडे पाठविली. परंतु औरंगजेबाने काशी विश्वेश्वराच्या देवालयाची विटंबना केली !

              नेताजी पालकरला सक्तीच्या धर्मांतरामुळे औरंगजेबाने महंमद कुलीखान केले होते.                                           

              १६८२ मध्ये प्रचंड फौजेनिशी औरंगजेब औरंगाबादेत आला. औरंगजेब ९६ वर्षे जगला ! त्याचा मृत्यू १७०७ला झाला. तो अकबर(बंडखोर पुत्र) याला पकडण्यास धडपडत होता. त्यासाठी त्याने ब्रिटिशांनाही आमिषे दाखविली होती. पण अकबर सुरक्षित राहिला.           

              येसूबाई यांनी दोघांच्या जीवाचे अब्रूचे अभय औरंगजेबाकडे मागितले कुराणाची शपथ घेऊन औरंगजेबाने त्यांना अभय दिले. मात्र त्याने आपल्या निवासस्थानाच्या आवारात तंबू लावण्याची आज्ञा देऊन त्यांना तेथेच राहायला लावले.

            रायगडाचा विध्वंस झुल्फिकारखानाने केला आणि लुटही केली. छत्रपतींचे बत्तीस मणाचे सिंहासन तुकडे तुकडे करून लुटीत घेतले, अशी माहितीही यात वाचावयास मिळते.

            औरंगजेबाचे अखेरीस हाल झाले. अहमदनगरच्या छावणीत घाण दुर्गंधीमध्ये त्याला दिवस काढावे लागले. त्याने दक्षिणेत येऊन मोहीम राबविण्याचा पश्चाताप झाल्याचा उल्लेखही ऐतेहासिक दप्तरात आहे. त्याने मराठयांविषयी असलेल्या रागातून एकदा फर्मान काढले होते, मराठ्यांना यापुढे दुष्मन किंवा गनीम म्हणायचे नाही, त्यांना चोर म्हणायचे ! औरंगजेबाला मराठी सैन्य नेमके किती आहे, ३०/४० हजार आहे की लाख आहे याची नेमकी माहिती मिळाली नाही .

             औरंगजेब फारच आजारी पडला, तेव्हा त्याला आता शाहूचे काय करायचे ? हा प्रश्न पडला. मात्र त्याच्यावर मराठ्यांचा दबाव वाढल्यावर त्याने शाहूला पोशाख सात हजारी मनसब दिली. कामबक्षच्या आज्ञेत राहून दक्षिणेचे राज्य करीत जा असा हुकूम केला. पण त्याच्यावर नजर ठेवण्यास झुल्फिकारखानास बजावले. शाहू त्याचा मांडलिक बनला.

             औरंगजेब २० फेब्रुवारी १७०७ ला वारला. शाहूने औरंगजेबाचा बंदी म्हणून छत्रपती झाल्यावरही राज्यकारभार केला. त्याने थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाला वेसण घातली. स्वामींचे(औरंगजेब) राज्यास धक्का लावणे ही त्यांना सक्त ताकीद दिली. नंतरचे सारे पेशवे बंदयाचे बंदे म्हणून कारभार करू लागले. मोगलांचे बंदे म्हणून दिल्लीच्या तख्ताची सेवा रक्षण करण्याची कामगिरी नंतरच्या पेशव्यांनी उत्तम रीतीने पार पाडली.                        

            मनूची हा औरंगजेबाच्या काळातील एक परकीय लेखक महत्वाच्या घटनांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. तो लढवय्या देखील होता. कानेटकरांना काही माहिती त्याच्या पुस्तकातून मिळाली आहे. त्यानुसार, औरंगजेबाच्या मृत्युनंतर २० वर्षांनी बाळाजी विश्वनाथांनी आझमशी वाटाघाटी करून येसूबाईना सोडविले. मात्र या काळात येसूबाईची कारकिर्द संपली होती. शाहूही बदलला होता.

            शाहूचे पहिले नाव शिवाजी होते. औरंगजेब त्याला नेहेमी म्हणे, ‘ तुझा बाप आणि आजोबा चोर होते, पण तू मात्र साव आहेस ’. या सावापासून शाहू हे नाव प्रचारात आले, अशी माहिती यात वाचायला मिळते. शाहूला मुसलमान करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला होता. पण  झिनत्तूनिसा या औरंगजेबाच्या मुलीने त्याला रोखले. ती बापास म्हणाली, ‘ तो हिंदू आहे. मग त्याला हिंदूच राहू दे, तरच मराठ्यांचे नाक तुमच्या हातात राहील ‘.

            औरंगजेबाच्या आश्रयात राहिल्याने शाहुवर त्याचा जास्त प्रभाव पडला. इतका की, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा शाहूची सुटका झाली, त्यावेळी पहिल्यांदा त्याने खुलताबादला जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले !  आजोबा आणि वडिलांच्या समाधीचे दर्शन घ्यायची उत्सुकता त्याला वाटली नाही.

             राजारामाच्या कारकीर्दीविषयी या पुस्तकात वाचलेली माहितीही अंतर्मुख करते. राजाराम स्वभावाने सौम्य होता. विलासी वृत्तीचा होता. राजारामाचे निधन मार्च १७०० ला सिंहगडावर झाले आणि त्याची कारकिर्द संपली.

               राजारामाची पत्नी ताराबाई मात्र पराक्रमी राणी ठरली. इतिहासात तीच्या कारकिर्दीविषयी चांगले लिहिले गेलेय. ती ८६ वर्षे जगली.

               ताराबाईचा पिता हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांच्या अष्ट प्रधान मंडळात सरनोबत मुख्य सेनापती होता. ताराबाईने युद्ध शिक्षण घेतले होते. राजारामाचे विलास गैरवर्तन याबद्दल येसूबाईने तीला खबरदारीचे इशारे दिले होते. ताराबाई पुरुषवेषाने जिंजीला गेली राजारामावर नियंत्रण आणून सगळा कारभार तीने ताब्यात घेतला. राज्यकारभार करताना तीने दुर्लक्ष केले नाही. संताजी धनाजी यांच्यामध्ये मोठा वाद होता. तो वाद थांबविण्याचा प्रयत्न ताराबाईने केला, पण त्यात तीला यश आले नाही. राज्याची राजधानी ताराबाईने सातारला हलविली. ताराबाई कर्तृत्ववान असली तरी भाऊबंदुकीच्या वादात ती शेवटी पराभूत झाली           

             शाहुबरोबरच्या लढाईत ताराबाई पराभूत झाली, कारण तीची माणसे फोडण्यात पेशवे यशस्वी ठरले. ताराबाईचा पराभव झाल्यानंतर आपसात वाद नको म्हणून शाहूने कोल्हापूरला दुसरी गादी निर्माण केली ती ताराबाईंच्या मुलाला दिली.

             पण पेशव्यांनी पडद्याआड कारवाई करून ताराबाईला तीच्या मुलासह कैदेत ठेवले आणि गादीवर ताराबाईचा सावत्र मुलगा संभाजीस बसवले. पुढे तीला सातारच्या किल्ल्यावर आणून ठेवले. तीचा शुवजी हा मुलगा निधन पावला होता. त्याचा एकच पुत्र होता. तो ताराबाईचा नातू. तो तीने गुपचूप रामचंद्र पंतांच्या मुलाच्या घरात वाढवण्यासाठी ठेवला होता.

             अखेरीस शाहू ताराबाई एकत्र आली समोपचार होऊन ताराबाईच्या नातवाला दत्तक म्हणून गादीवर बसविले. नंतर तोच दत्तक मुलगा पेशव्यांचे ऐकू लागला, तेव्हा त्याला ताराबाईने तुरुंगात डांबले.

                  अशा या संशोधनात्मक पुस्तकात वाचाव्यात तेवढ्या खूप घटना आहेत.

                 कानेटकरांनी एका ठिकाणी प्रा. नरहर कुरुंदकरांच्या मताचा संदर्भ दिलेला आहे. ते म्हणतात-    

 इतिहासातील आदरणीय पुरुषांविषयी समाजमानसात प्रतिमा उभ्या राहिलेल्या असतात. त्यात प्रेम असते. त्यानुसारच अभ्यास होतो. ते अपरिहार्य आहे. तरीपण चिकिस्तक वृत्तीने अभ्यासाला प्रारंभ व्हायला हवाय ‘.

                 शिवाजी महाराजांवर आपली चांगली श्रद्धा असली तरी त्यांनी अंगावर घेतलेले पराभव, सहन केलेली संकटे, केलेल्या कपटनिती, गनिमी कावा, जशास तसे राजकारण, याचाही डोळे नीट उघडून अभ्यास करणे योग्य आहे.              

                 दिल्लीचे तख्त पादाक्रांत करण्याची इच्छा कोणत्याही पेशव्याने कधीच धरली नव्हती. तेवढे अधिकार संपन्न असतानाही !   याबाबत कानेटकरांचे महत्वाचे वाक्य आहे, ‘ ….एकदा राज्यसाधनेतून हिंदवी राज्यांची सार्वभौमत्वाची भूमिका वगळली, की मग बाकी मागे उरते ती स्थावर जंगम मालमत्ता. ती फक्त एक दौलत असते. निव्वळ एक संपत्ती असते. म्हणूनच मराठ्यांचे उर्वरित राज्य म्हणजे शहाजींच्या काळातल्या सारखेच. पण आकाराने अंमळ मोठी अशी ही एक जहागिर झाली होती.                      

                सारांशाने कानेटकर स्पष्ट लिहितात-‘ शेवटी मात्र सगळे चांगले वागले, पण योग्यवेळी संवाद घडला नाही म्हणून शेवटी त्याचा काहीच उपयोग नव्हता ‘.    

                इतिहास प्रेमी वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावे, आणि शिवकालीन शोधही घ्यावा. 

             -----------------