Saturday, 1 December 2018

💐आठवणीतील व्याख्याने💐

💐आठवणीतील व्याख्याने💐
                     आपल्या चिरतरुण गीत आणि संगीताने रसिक श्रोत्यांना सदैव गुणगुणत ठेवायला लावणारे हसतमुख असे यशवंत देव आज आपल्यात नाहीत. सोमवार २९ नोव्हेंबर च्या मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पण माझ्या मनात या स्वरमयी देवांचे व्याख्यान अजूनही गुंजत
आहे..........
💐गीत,शब्द, अन सुरेल चाली.........

                   ' असे गाणे जन्मा येते ' हे कविवर्य आणि संगीतकार यशवंत देवांचे व्याख्यान चिंचपोकळी येथील विवेकानंद व्याख्यानमालेने आयत्यावेळी घोषित केले. त्या दिवशी होणार होते साहित्यिक अरुण साधू यांचे व्याख्यान. विषय होता- 'मराठीची गळचेपी ' .
                 अर्थात, यशवंत देवांचे व्याख्यान स्मरणीय असेच झालेय.
              देवांच्या चेहेऱ्यावर हास्य, पण स्वभाव मिश्किली अन  खोडकर असा ! हे त्यांच्या संवादात
 जाणवले.  आपल्या बोलण्यातून केलेल्या हलक्या-फुलक्या विनोदांनी अन चिंमट्यानी सर्व श्रोत्यांना त्यांनी शेवटपर्यंत उत्साही ठेवले. बोलताना कधी देव गीत सादर करायचे, त्यावेळी स्वरपेटीही वाजवायचे.  त्यांच्या साथीला एक तबलजी होता.
                 यशवंत देवांनी बरीच भावगीते  लिहिलीत.  कितीतरी चित्रपटांना श्रवणीय गीतं- संगीत दिलेय. त्याबद्दलच्या खूप आठवणी देवांनी सांगितल्या.
                 ते म्हणाले- ' गाणं गाताना त्याचा आशय ऐकणाऱ्याला ज्ञात होणे हेच त्या गाण्याचे खरे यश आहे. गाणं सुंदर असणं म्हणजे ते छान असणं नव्हे, तर त्याचे बोल काय आहेत ? हे नीट ऐकणे आणि' ते ' जाणून घेणे हे हवे असते. '
                ' गाण्याची निर्मिती तीन व्यक्तींद्वारे होते - पहिला कवी, दुसरा संगीत निर्देशक, आणि तिसरा व शेवटी आपल्यासमोर गाणं घेऊन येणारा गायक ! या तिघांचाही ताळमेळ जमायला हवा. '
               ' संगीतकार उत्तमोत्तम चाली गाण्याला लावतात. यात चाल चांगली असली तर गाणं लोकप्रिय होते. परंतु त्याचे बोल काय हवेत ? आशय काय हवा ? हे गुलदस्त्यात राहते. गंभीर वाटणारा विषय गंभीर चालीतील गाण्यानेच आपल्यासमोर यायला हवा. तर आनंदी गीत आनंदीप्रकारच्या चालीनेच गायला हवे. '
             ' गझल गाताना चालींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. नाहीतर सारी मज्जाच जाते. अर्थाचा अनर्थही  होतो. हल्ली संगीतकार निर्मात्याच्या सांगण्यावरून गीतांना चाली बांधतात. हाच प्रकार गीतकाराना गीत लिहिताना करावा लागतो. शेवटी श्रोत्यांपुढे येणारे गीत हे सुरेल चालींनी शब्दबद्द होऊन त्यांना गुणगुणत ठेवणारे हवेय..........'

                        या स्वर्गस्थ गीत-संगीतमहर्षिला माझी मनःपूर्वक आदरांजली.

                        ::::::::::::::::::::::::::::::

                                                                                          प्रतिक्रियेसाठी-email--yescharudatt.com
                                                                                            ७५८८७२७५२२.

 


💐धार्मिक पण मार्मिक💐
💐धार्मिक पण मार्मिक💐

.                   निसर्गसुंदर कोकणात दिवाळी सणानंतर गावोगावी जत्रोत्सवांचे आयोजन सुरू होते. अगदी ठाण्यापासून   बांदयापर्यंत आपल्या आराध्य आणि ग्रामदेवतांच्या जत्रा जल्लोषात होत असतात. त्यासाठी गावातल्या मानकऱ्यांसमवेत मुंबई आणि इतर शहरांतील चाकरमानी श्रद्धेने उत्सवाच्या तयारीस लागतात. कितीही प्रापंचिक विवंचना असोत की, त्यांना त्यांच्या नोकरीधंद्यातून वेळ मिळत नसला, तरीही साऱ्या अडचणी बाजूस ठेऊन ही गावकरी मंडळी उत्सवाच्या पूर्वतयारीत रंगून जातात.
                  जत्रेचा दिवस जवळ येतो अन या कारभाऱ्यांची तहानभूक हरपते. हे लोक एवढी कामं तरी कोणती करत असतील !
              देवळाचा परिसर साफ करणे, डागडुजी करून त्याची रंगरंगोटी करणे, देव-देवतांच्या लहान-मोठया मूर्ती व प्रतिमा व्यवस्थित घासणे, साफ करणे, त्यांची वस्त्रप्रावरणे करणे, देवांचे तरंग, पालखी,रथ, चौरंग-इत्यादी वस्तूंची नीट तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांची दुरुस्ती करणे, पूजाअर्चा करण्यासाठी लागणारी भांडी-ताम्हण, समई, पंचपळी, पात्र, फुलपात्र, दिवे, पणत्या, लामण दिवे, दीपमाळा, कुंकूपात्र, कलश, जलकुंभ, पूजेची वाध्ये, भजन-आरतीची इतर सामुग्री,...  या सगळ्या वस्तू व्यवस्थित करून ठेवणे, एवढेच नव्हे तर सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने व मजुरांना बोलावून सभा-मंडप, स्टेज बांधणे, लाईनीसाठी बांबू-रांगांची आखणी लावून घेणे, उत्सवाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी देणगी दाते अन आश्रयदाते, अशा थोर भाविक व मान्यवर गावकऱ्यांना भेटून पैशाची किंवा वस्तुरूपातली देणगी घेण्यासाठी धावपळ करणे, जत्रेच्या अगोदरचा दिवस, प्रत्यक्ष जत्रेचा दिवस आणि ती संपल्यानंतर आवराआवरीचा दिवस, या साऱ्याचे नीटपणे व्यवस्थापन करणे, ही सगळी कामे वाटतात तेवढी सोपी नाहीत. ही कठीण कामे श्रद्धेने आणि उत्साहाने करून आपल्या देवदेवतांची कृपादृष्टी मिळविणारे हे सगळे भाविक गावकरी खरोखर थोर आहेत.
                    कोकणातल्या कितीतरी गावांत असे वार्षिक जत्रोत्सव पूर्वांपार होत आलेले आहेत. देवगडचा श्रीकुणकेश्वर, अरोंद्याची श्रीसातेरीदेवी, मातोंड-पेंडुरचा श्रीघोडेमुख, आकेरी-माणगावचा  श्रीरामेश्वर, नेरूरचा श्रीकलेश्वर, आंगणेवाडी-मसूऱ्याची श्रीभराडीदेवी, देवरुखचा श्रीमार्लेश्वर, मातोंडची श्रीसातेरीदेवी, अशा कितीतरी जागृत व प्राचीन देवदेवतांच्या दर्शनाला जत्रेनिमित्ताने राज्यातून आणि राज्याबाहेरून हजारो भाविक येत असतात.
                  मला एकदा सावंतवाडी-मातोंड जवळील श्रीघोडेमुख देवाच्या जत्रेस जायचा योग आला होता. ही जत्रा कोंब्याची जत्रा म्हणूनही प्रसिद्द आहे. माझा जवळचा मित्र सुभाष मातवणकर याचे मुळगाव मातोंड, देवी श्रीसातेरी आणि देव श्री घोडेमुख.  त्यांनी मला या जत्रेस येण्याचा आ्ग्रह केला आणि मी  या जत्रेचा अनुभव घेतला.
               
   चला तर, आपण सारेजण कोकणातील या प्रसिद्द जत्रोत्सवात सामील होऊ या...........
💐मातोंडचा जत्रोत्सव..........
                                      सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पासून सुमारे चौदा कि.मी.वर मातोंड हे छोटेखानी गांव आहे. वेंगुर्ला मार्गेही मातोंडला जात येते. मातोंड गांव छोटेसे पण हिरवाईने वेढलेले काहीसे सखल भागात वसलेय. टुमदार कौलारू व भक्कम चिरेबंदी असलेली घरं, रंगीतसंगीत छोटे बंगले, त्याच्या भवतालची फुले-फळांची झाडे, बाग, पाणंदीच्या लाल हिरव्या वाटा, आणि आमराई व माडांचे बन आपल्याला मोहित करेल असेच आहे.
                         साऱ्या गावची वस्ती असावी सुमारे तीनचार हजाराची. शाळेची सोयही येथे आहे. वस्ती मात्र वेगवेगळ्या समाजाची आहे. येथे बहुसंख्येने मराठा समाज आहे. भंडारी, कुंभार, राऊळ, घडी, मेस्त्री, गुरव,...या समाजाबरोबर ब्राह्मण वस्तीही येथे आहे. अशी वेगवेगळी घराणी असूनही या गावात चांगला एकोपा आहे. त्यामुळे येथे उत्साहात सण-उत्सव साजरे होतात.
                अशा या उत्साही गांवातील श्रीघोडेमुख डोंगरावर आम्ही निघालो. तो डोंगर दिसतो दूरवर. तेथे जायला चारही दिशेच्या गाव-वाड्यातून वाटा असल्या तरी मोठी चढण चढावी लागते. पण लोकं श्रद्धा भावनेने तो डोंगर पार करतात व देवाचे दर्शन घेतात.
                उत्सवाच्या दिवशी दुपारी आम्ही दोघेजण गावातल्या सूर्यकांत गावड्यांकडे पोहोचलो. ते सुभाषचे परिचित मित्र. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आमचा छान पाहुणचार केला. रात्रीचा मुक्काम त्यांचेकडेच होता. यांचे ऐसपैस घर जुन्या पद्धतीचे आहे. परसातली केळीच बाग, नारळांचे माड, फुलांची छोटी झाडं, हे पाहताना  खूप बरे वाटले.
                दुपारी दोनच्या सुमाराला या गावात वाध्ये वाजू लागली. देवांचे तीन तरंग (म्हणजे देवदेवतांची पितळी-चांदीचे मुखवटे किंवा हात असलेल्या प्रतिमा लावलेल्या उंच काठ्या. त्यावर वस्त्रप्रावरणे ) आलेली आम्ही पाह्यली. प्रमुख मानकऱ्यांनी हाती धरलेल्या तीन तरंगकाठ्यांना  पाहायला व पाया पडायला घराघरातून लहानथोर माणसं भाहेर पडू लागली.
                ही तरंग यात्रा गावातल्या एक मंदिराजवळ येऊन थांबली. तेथे सगळे जमा झाले होते. येथे गाऱ्हाणे, पूजा-प्रदक्षिणा व पूजाअर्चा, इत्यादी होऊन जयघोष केल्यावर तरंग पुढे निघाले. आता अवघे भाषिक डोंगरावर निघाले होते. आम्हीही त्यांच्यात सामील झालो.
               शेतवाटातून ओळीने एकेक ग्रामस्थ श्रद्धेने पावलं पुढे टाकीत दूरवर उंच दिसणाऱ्या घोडेमुख देवाच्या देवळाच्या कलशाकडे पाहत मार्गक्रमण करीत होते. दुपार सरली होती. हळूहळू दूरवर दिसणारा कळस गर्द झाडीत दिसेनासा झाला. आता पायाखाली डांबरी सडक लागली. थोड्या वेळाने पायथ्याच्या मुख्य कमानीपाशी सगळे पोहोचलो.
              येथे आजूबाजूच्या गाववस्तीतून भाविक, ग्रामस्थांची एकच गर्दी वाढत होती. आम्ही त्या गर्दीत मिसळुन पुढे निघालो.
             आता आजूबाजूला झाडी आणि ऐसपैस पण चढणीची, वळणावळणाची वाट सुरू झाली. लाल मातीत मळलेल्या पायवाटेवरून घोडेमुख देवस्थानाकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढली होती. पुढे पुढे तर अरुंद वाटेमुळे दाटीवाटी होऊ लागली.
             अजून सूर्यास्त व्हायला तासाभराचा अवकाश असावा. गावातून वाजत गाजत आलेले देवदेवतांचे तरंग-काठी दर्शनस्थानापाशी दाखल झाले होते. तोपर्यंत आम्ही टोकाच्या पायऱ्यापर्यंत पोहोचलो. येथे छानपैकी पायऱ्या बांधून, मध्ये रेलिंग लावलेले आहे. इतकी व्यवस्था असूनही प्रचंड गर्दीमुळे वर पोचणार कसे ?  अखेर, दाटीवाटी व धक्काबुक्कीचा  अनुभव घेत एकदाचे वरती आलो. आता सुरक्षितपणे कोठे उभे राहावे ?  कारण अजिबात  तशी जागा नव्हती.  देव-तरंगांच्या प्रदक्षिणा आता सुरू झाल्या होत्या. येथल्या तुळशीवृंदावनाला वेगात पाचवेळा महाप्रदक्षिणा घालत फिरणाऱ्या। तरंगांना वाट करून देण्यासाठी आयोजक-कार्यकर्ते झटत होते. पण त्यांना ही गर्दी आवरता येत नव्हती.
                  देवस्थानचे धार्मिक विधी म्हणजेच गाऱ्हाणे, कौलप्रसाद, नारळ, कुळ रहाट अर्पण करणे,बळीचा सोपस्कार, इत्यादी सर्व झाले आणि इतर ग्रामस्थांनी तेथे दर्शनास गर्दी केली. त्याच भाऊगर्दीत देवाजवळ नारळ ठेऊन उतरायला सुरुवात केली. उताराच्या दोन्ही वाटेवर जिकडे पाहावे तिकडे खाली बसून कोंबड्यांच्या बळी देण्याचा विधी गावोगावचे भाविक करीत होते.
               प्रत्येकाच्या हाती कापडी पिशवी, त्यामध्ये जिवंत कोंबडा. ते बसलेल्य मानकरी(कापणारे)  माणसाकडे जात. आणलेल्या बळीला तेथे ठेवीत. नावगाव व नवसाचे कारण विचारून रीतसर गाऱ्हाणे, अरस घालून मानकरी तात्काळ त्या बळीची मान उडवून मानेचा भाग स्वतःजवळ ठेवी आणि उरलेला भाग परत देई. तो भाग घरी आणून म्हणून शिजवायचा. मग प्रसाद म्हणून खायचा हा तेथला रिवाज आहे.
               खाली कमान उभारलीय, तेथपर्यंत हे बळी विधी देणे सुरू होते. बसलेले मानकरी कापणारे आणि बळी देऊन प्रसादाचा कोंबडा घरी घेऊन समाधानाने जाणारे भाविक, ग्रामस्थ पाहून मी अंतर्मुख झालो.
             पण एक आहे, सगळेच भाविक बळी देत नाहीत. काही नुसते केळी-नारळ अर्पण करतात. तर कोणी बोललेला नवस मातीची किंवा लाकडाची बाहुली देऊन पुरा करतात. कोणास नवसाने मूल झालेय. कोणाची मुलगी आजारातून बरी झालीय. कोणाच्या धंद्याला चांगले दिवस आलेत. कोणाचा पोरगा-जावई नोकरीला लागलेत. कोणी कोर्ट केसमध्ये जिंकलाय, तर कोणाचे व्यसन सुटलेय, अशा असंख्य कारणांमुळे देवापुढे बळीचा नवस फेडायची चढाओढ लागते. बरेच ग्रामस्थ तर नेमाने दरवर्षी बळी देतात. येथल्या माहेर वाशिणी पण कुटुंबासह श्रद्धेने  येऊन देवदर्शन घेतात.      
             मी  ज्या सुर्यकांत गावडेंच्या घरी राह्यलो होतो, ते दिवसभर देवकार्याच्या धामधुमीत असल्याने नीटपणे त्यांचेशी बोलता आले नाही. रात्री मात्र त्यांनी मला या देवस्थानची परंपरा व या जत्रेची व्यवस्थित माहिती दिली.
            जवळपास ३६० चाळ्यांचा-भूतपिशाच्च्यांवर नियंत्रण करून त्यांना नीट ताब्यात ठेवणारा हा राखणकर्ता देव म्हणजे देवांचाच सरदार श्रीदेव घोडेमुख आजूबाजूच्या संपूर्ण पंचक्रोशीचे कायम रक्षण करणारा हा देव आहे. त्याचा मानाचा हा वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी कार्तिक अमावास्येतील चवथ्या दिवशी सायंकाळी होतो. त्याला मानाचा कोंबड्याचा बळी देण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. या ठिकाणी दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक बळी दिले जातात. या
परंपरेला थांबविण्याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी शासन यंत्रणेने केला होता. पण त्यात यश आले नाही. बळी द्यायची प्रथा सुरूच राहिली आहे.
           अशा या श्रीदेवघोडेमुखाची पूजाअर्चा व इतर विधींची वर्षभराची जबाबदारी गंधगावडे कुटुंबियांकडे असते. उत्सवकाळात मात्र त्यांचे शिवाय, गावडे, गंधगावडे, परब, पाणभोई, मेस्त्री, भूतनाथ परब, रवळनाथ राऊळ, ही घराणी मानकरी म्हणून कार्य करतात. त्यांना साथ असते ती  घाडी अन गुरव घराण्याची .
           हा वार्षिक जत्रोत्सव तिन्ही सांजेपुर्वी पूर्ण करण्याचा संकेत आहे. यानंतर तेथे कोणीही थांबत नाही, की वस्ती करीत नाही ! त्या रात्री हा भाग निर्मनुष्य होतो, आणि तेथे दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोंबड्याचे एक पीसही दिसणार नाही ! जत्रेच्या दिवशी दर्शनानंतर खाली परतताना मात्र प्रत्येकाला बळीच्या रक्ताचा एखादा तरी थेंब कृपाप्रसादाच्या रूपामध्ये कपड्यावर, अंगरख्यावर मिळालेला असतो. हे आश्चर्य मी स्वतः अनुभवलेय.

                   या जत्रोत्सवाचे आणखी एक विशेष म्हणजे देवाला मानणाऱ्या जवळपासच्या सर्व ग्रामस्थांकडे कधी चोरी-मारी किंवा कोणती दुर्घटना घडलेली नाही. येथे दारुडेही नाहीत. सारे वातावरण एकोप्याचे आहे. वर्षभर, म्हणजे चैत्र पाडव्यापासून ते होळी पॊर्णिमेपर्यंत साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्यात मनोभावे मेहेनत घेऊन जबाबदारी सांभाळणारी कितीतरी घराणी आहेत. प्रामुख्याने यामध्ये -सूर्यकांत गावडे,  रमाकांत परब, उदय परब, लाडू परब, सोमा मेस्त्री, गानू राऊळ, धोंडी(दांडेकर), हे ग्रामस्थ आहेत.
                       ' कोंबड्याची जत्रा ' म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्द असलेल्या या जत्रोत्सवाला ' कोंब्याची जत्रा ' म्हणूनही ओळखले जाते. राज्याबाहेरील गोवा, कर्नाटकातील भाविक येथे दरवर्षी आवर्जून येतात. सुमारे चाळीस हजाराहून अधिक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या जागृत श्रीदेव घोडेमुखाचे दर्शन कोंबड्याच्या जत्रेनिमित्ताने यंदा घ्यायचे असेल तर त्यांनी यंदा १२ डिसेंबर रोजी सावंतवाडी-मातोंड-पेंडुरमार्गे प्रवास करून जत्रेची अनुभूती जरूर घ्यावी.

                         ::::::::::::::::::::::::::::::::::::::


💐स्वर्गस्थ💐

💐स्वर्गस्थ💐

                   अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला या  सुप्रसिद्द संस्थेने मुंबईमध्ये सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाचे आयोजन केले होते. तीन दिवसांच्या या स्मरणीय अधिवेशनात पूर्णकाळ, कॉलेजच्या एन.एस.एस.चा एक स्वयंसेवक म्हणुन काम करण्याची संधी मला लाभली.
                   पूज्य सानेगुरुजींच्या थोर कार्याचा प्रसार सर्वदूर करण्याची प्रतिज्ञा करून ती प्रत्यक्षात  आणणाऱ्या जेष्ठ मंडळींचा परिवार खूप मोठा आहे. यात अग्रणी होते  प्रकाशभाई मोहोडीकर. आज ते हयात नाहीत. शिस्तप्रिय स्वभाव पण तेवढेच मायाळू अशा या प्रकाशभाईंच्या हाताखाली काही दिवस का होईना, काम करताना खूप शिकायला मिळालेय. त्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनातील कार्यक्रमात कितीतरी मोठ्या मंडळींनी सहभाग घेतला होता माहितेय ? स्वर्गीय बाबा आमटे, अच्युतराव पटवर्धन, कानू घोष, बाळासाहेब ठाकरे, बाळकराम वरळीकर, मधू नाशिककर,मधुकरराव चौधरी, सुशीलकुमार शिंदे...........अशी आणखीही दिग्गज मंडळी होती.
                त्यानंतर मी ' श्यामची आई ' हे पुस्तक वाचले. आईच्या कार्यकर्तृत्वाची थोरवी ओळखून तीच्याशी कायम कृतज्ञ राहिलेला श्याम मला भावला.
                मित्र -मैत्रिणींनो, याच पूज्य  सानेगुरुजींची जयंती २४ डिसेंबरला आहे. त्यांना आदरांजली म्हणून त्यांनी लिहिलेले हे प्रसिद्द गीत तुम्हापुढे सादर केले आहे.......💐खरा तो एकची धर्म............

                                         ॥  खरा धर्म  ॥

               खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे ||
               जगी जे हीन अति पतित
               जगी जे दीन पददलित
               तया जाऊन उठवावे | जगाला.....||
               जयांना कोणी ना जगती
               सदा जे अंतरी रडती
               तया जाऊन सुखवावे | जगाला.....||
               सदा जे आर्त अति विकळ
               जयांना गांजिती सकळ
               तया जाऊन हसवावे | जगाला.....||
               कुणा व्यर्थ शिणवावे
               कुणा ना व्यर्थ हिणवावे
               समस्ता बंधु मानावे | जगाला.....||
               प्रभूची लेकरे सारी
               तयाला सर्वही प्यारी
               कुणा ना तुच्छ लेखावे | जगाला....||
               जिथे अंधार औदास्य
               जिथे नैराश्य आलस्य
               प्रकाशा तेथ नव न्यावे | जगाला....||
               असे जे आपणापाशी
               असे जे वित्त वा विद्या
               सदा ते देतची जावे | जगाला.....||
               असे हे सार धर्माचे
               असे हे सार सत्याचे
               परार्था प्राणही द्यावे | जगाला.....||

               खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे.||

                                            -सानेगुरु जी
                 ( जन्म-२४ डिसेंबर  १८९९. निर्वाण- ११ जून  १९५० )


                           ::::::::::::::::::::::::::::::