Monday, 1 February 2021

💐💐सु-विचार💐💐

 


                      जे कुणी खूप सहन केले, खूप सहन केले असे ओरडून सांगतात, ते खरे तर जगाकडून सहानुभूती मिळवत असतात. जो सहन करतो, तो कधी बोलत नाही “.

.पु.काळे

 

                                                                  ::::::::::::::::::::::::::::

💐💐ट्रेकर्स डायरी💐💐

                  गोवा म्हटले की चटकन आपल्या नजरेसमोर येतो, तो विस्तीर्ण असा समुद्र आणि वळणदार असे बीचेस. नारळ- सुरुच्या सानिध्यात बीचवर मनसोक्त फिरकी-गिरकी घेणारे पर्यटकही नजरेसमोर तरळतात.

                  माझ्या गोव्यातील पदभ्रमण सफरीमध्ये मात्र गोव्यातले घनघोर जंगलसुद्दा येते. ग्रामीण परिसरही येतो. दिल्लीच्या युथ हॉस्टेल्स असोसिएशनने आयोजित केलेल्या एन.टी..पी.’(NATIONAL TREKKING EXPEDITION PROGRAMME) पदभ्रमण मोहिमेमध्ये मी एकदा सहभागी म्हणून होतो. तर एकदा कॅम्प लीडरम्हणून सेवा करण्याची संधी मला मिळालीय.

                  या गोवा पदभ्रमण मोहिमेला देशभरातील निसर्गप्रेमींचा भरघोस प्रतिसाद लाभतो. पणजीतील कंपाल स्टेडियम येथे मोहिमेचा आरंभ होतो. तेथून मिरामार बीच, दोणा पावला मार्गे मारमागोवा येथील सागर पार करून पुढे बागमालोच्या किनाऱ्या पासून खरे पदभ्रमण सुरू होते. कसोली, दूध सागर, कुवेशी, डेव्हील्स कॅनियोन, दारगेम, करंजोळ, संत्रेम, सुरला घाट अशा हिरव्यागार राना-वनांनी गच्च भरलेल्या जंगल-वस्तीतून चालत   खळाळते नदी-नाले, ओढे ओलांडत भन्नाट भटकत, अन गावानजीकच्या कॅम्पमध्ये मुक्काम करीत आपण पुन्हा पणजीमधील कंपाल बेसकॅम्पला येतो. हे सारेच खूप थ्रिलिंग आहे.   

                  एन.टी..पी.’ पदभ्रमण मोहिमेच्या काही  थ्रिलिंग आठवणी मला तुम्हास सांगायच्या आहेत. फक्त जंगल-रानात किंवा सागरतीरी फिरणे करता कर्तव्यभावनेने एखाध्या कामात आपण छंद म्हणून स्वतःला झोकून देतो, तेव्हा त्याचे आंतरिक समाधान किती मोठे असते, याची अनुभूती मला गोव्यात मिळाली. अर्थात, कॅम्पलीडरची जबाबदारी पेलवताना प्रसंगी कठोर होऊन काही निर्णयही घ्यावे लागतात, याचे थोडे बालकडू देखील घ्यावे  लागले. मात्र त्याचा चांगला फायदा मला पुढील आयुष्यात झालाय


💐गोवा एन.टी..पी. 💐

*कंपाल बेस कॅम्प,पणजी

                 पणजीला कंपाल स्टेडियम आहे. तेथल्या बेस कॅम्पमध्ये रिपोर्ट केल्यावर  दोन दिवसांनी पुढील कॅम्पचे पोस्टिंग मला  मिळाले. माझ्याकडे दारगेम कॅम्प आणि माझा मित्र राजन याचेकडे करंजोळ  कॅम्पची जबाबदारी देण्यात आली. आम्ही ट्रकने सामानासह  आमच्या कॅम्पवर निघालो.

 *दारगेम कॅम्पचे दिवस--   

                 हिरवेगार वृक्ष, वेली आणि जंगलाच्या सानिध्यात असणारा हा कॅम्प होता. एका बाजूला संथपणे वाहणारी नदी. जवळ कच्ची पायवाट दूरवर असणारी सडक त्यानंतर गाव वस्ती, असा हा परिसर होता. ही कॅम्प साईट आवडली आपल्याला !

                ट्रकमधील तंबू आणि रेशन सामान-वस्तू एके ठिकाणी ठेवण्यात काही वेळ गेला. कॅम्पवर चार मोठे  तंबू कसेतरी लावून कामकरी पळाले ! दोन छोटे तंबू  इथल्या माणसांच्या मदतीने आम्हीच लावले. त्यादिवशी स्थानिक वायएचएचा एक कॅम्प लीडर लवू आमच्या सोबत मुक्कामाला राहिला. त्याने बऱ्याच हिंट्स दिल्या.

               दुसऱ्या दिवशी सकाळी राजन आणि लवू पुढच्या कॅम्पवर गेले. आता एक गढवाली कुक, दार्जिलिंगचा मदतनीस आणि लोकल वूड कटर-हेल्पर म्हणून इथला(स्थानिक) नारायण असे आम्ही चारजण इथे राहिलो. दोन दिवस इथल्या जंगलात वावरायला भीतीच वाटत होती. ग्रुप यायच्या आदल्या रात्री एकटाच तंबूमध्ये झोपलो. नंतर ग्रुप यायला सुरू झाले. त्यामुळे काळजी मिटली.

              येणारे ४०, ३९, ४६,२२ असे छोटे मोठे ग्रुप दररोज दुपारनंतर या कॅम्पवर येतात. एक रात्र मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे प्रस्थान पुढच्या कॅम्पवर होते. त्यांच्यातील एकाला ग्रुप लीडर म्हणून बेस कॅम्पवर अगोदरच नेमलेले असते. त्याची जबाबदारी असते, प्रत्येक सहभागी सदस्याला सोबत घेऊन दिलेल्या मार्ग आणि कॅम्पप्रमाणे पदभ्रमण करण्याची. मुक्कामाच्या कॅम्पवर सुखरूप साऱ्यांना घेऊन सुखरूपणे पोहोचणे तेथील कॅम्प लीडरला प्रत्येकाच्या ओळखपत्रा सह रिपोर्ट करणे, ही प्रत्येक ग्रुपच्या लीडरची जबाबदारी असते.

     

             कॅम्प लीडरकडे ग्रुपच्या मुक्कामाची जबाबदारी असते. आलेल्या सहभागीचे स्वागत करून त्यांचे चहापान-नाश्त्याची व्यवस्था करून झाली, की प्रत्येकाची ओळ्खपरेड होते. मग त्यांच्या प्रकृती-तब्येतीची विचारपूस करून आवश्यक सूचना त्यांना द्याव्या लागतात. हा भाग जंगल-रानाचा असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने काय करावे काय करू नये, हे सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगावे लागते.

            कॅम्प सोडून बाहेर जाणे, स्वछता काटेकोरपणे पाळणे, जवळ असलेल्या खोल डोहात बुडून अपघात घडले असल्याचे सांगून पाण्यात उतरताना सावध असणे, धूम्रपान आणि मद्यपान करणे, कोठल्याही प्रकारचे गैरवर्तन करणे, अशा कितीतरी महत्वाच्या सूचना कॅम्पवर द्याव्या लागतात. आपण निसर्गात पदभ्रमण करीत असताना शिस्तीचे पालन करूनही मोठा आनंद घेता येतो, याची जाणीव सर्वाना द्यावी लागते. इथल्या परिसर-गावाची उपलब्ध असणारी माहितीदेखील द्यावी लागते.

            मी माझ्या परीने या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडीत असताना मला इथे येणारे काही ग्रुप्स अंतरंगी मिळाले. मात्र  सक्त सूचना केल्यावर ते दबून राहायचे. एकदा दिल्ली-गुजरातचा  ४६ जणांचा ग्रुप मुक्कामी होता. दिल्लीवाले ओव्हर स्मार्ट होते. पण सुरुवातीला ब्रिफिंगमध्ये सारे स्पष्ट केल्यावर ते नंतर छान वागले.

             नाताळ सणाच्या आदल्या रात्रीचा ग्रुप मोठा होता. त्यांनी धमाल केली. छान कँडल फायर केला. सन्ताकॉज तयार केला होता. सुरुवातीला आम्ही वेगळे पुलावचे जेवण करू असे ते म्हणाले. मी अगोदरच जेवण तयार केलेय. इथे ते शक्य होणार नाही, असे समजावून सांगितले. मला ड्रिंकची भितीही वाटत होती. त्यांनी तसे काही होणार नाही अशी हमी दिली. त्यामुळे निश्चिंत झालो. त्या रात्री बारापर्यंत डान्स-गाणी चालली. गेम्स झाले. बक्षीस समारंभही साजरा झाला.

            कॅम्पमध्ये येणारे सहभागी वेगवेगळ्या राज्यातून येणारे होते. त्यात सर्व वयोगटातील सहभागी आहेत. त्यातले कोणी डॉक्टर, वकील, आयएएस, प्रोफेसर्स, मोठे व्यवसायिक, प्रसिद्ध गायक, कोणी सेलेब्रिटी देखील आहेत ! त्या सगळ्यांचा मान ठेवत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची मोठी कसरत करावी लागत होती.  पण या कामामुळे स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढला. चांगल्या ओळखी झाल्या.

           या कॅम्पजवळ खोल नदी डोह होता. तीथे एक बाई, नंतर एक पुरुष बुडालाय. माझा टेंट या डोहाजवळचहोता. रात्री सारे शांत झाल्यावर मनात अस्वस्थता यायची. पण दिवसभराच्या धावपळीमुळे छान झोप लागे.

           या जंगलात रानरेडा, साप, घोणस, वाघ, अस्वले आहेत, असे गावकरी म्हणाले. मला मात्र एकही जनावर कॅम्पवर दिसले नाही. सुरुवातीला मात्र रात्रीच्या वेळी काही आवाज यायचे. इथे ग्रुप यायला सुरुवात झाल्यावर, त्यांच्या वर्दळीमुळे नंतर तसे जाणवले नाही.

          पंधरा दिवसांपूर्वी तांबडी सुरला गावातल्या शेतातून भर दिवसा एका बैलाला वाघाने नेले, असेही गावकऱ्यांनी सांगितले. सुरला गावच्या जंगलात डुकरासाठी शिकाऱ्यांनी जाळी लावली होती, त्यात चित्ता आला ! त्याने एकाला जखमी केले. रान रेड्याने एकाला जवळच्या जंगलात शिंगाने मारून जखमी केलेय, हे सुद्दा ऐकायला मिळाले.

              सुरला गावातले गावकरी कॅम्पला भेटायला यायचे. मनमोकळे बोलल्यावर त्यांना आनंद वाटायचा. काहींशी ओळखी झाल्या. एकदा एकजण शिकारीला मध्यरात्री गेला होता. त्यांना सांबर आणि रान रेडा दिसले. पण यांच्यातला कोणीतरी खोकला आणि जनावरे पळाली. मला तो गावकरी म्हणाला,’ येणार का तुम्ही शिकारीला ? ‘.                      

             या कॅम्पच्या बाजूलाच वेताळाचे जुने देऊळ होते. तेथे बाराभूमी देवीची मूर्ती होती. वेताळाच्या दोन मूर्ती नग्न आहेत. पाहाताना चटकन लक्षात येत नाही. देवळा समोर तीन-चार फुटाचे हिरवे रानगवत वाढले होते. तेथे जपून वावरावे लागे. मात्र देवाचे नाव घेऊन रोज संध्याकाळी उदबत्ती-दिवा लावायला जायचो.

             एक ग्रुप चांगला होता. साऱ्यांना नेहेमीच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच स्वतः ग्रुप लीडर कॅम्पजवळ टॉयलेटला गेला. तो परतल्यावर त्याला झापले आणि त्याची घाण उचलून लांब नेऊन टाकायला लावली. अशा वेळी वाद घडतात, पण इलाज नव्हता.

            एका ग्रुपमध्ये मुंबईचे जण होते. एक मराठी तरुणी पत्रकार हौशी लेखिका होती. तीची ओळख झाली. बोलकी होती. त्या ग्रुपमध्ये एकटीच मुलगी. रात्री तीची स्वतंत्र तंबूत व्यवस्था करावी लागली.

           एके दिवशी आलेल्या गृपमधील सात जण रात्री च्या दरम्यान आले. एवढा उशीर का झाला, त्याची माहिती घेतली. डेव्हील कॅनियन कॅम्पहून निघाल्यावर हायवे लागतो. तेथले ऍरोज(गाईड मार्क्स) गोंधळून टाकतात असे सारेच म्हणत होते. तेथे यांनी ट्रक पकडला आणि दारगेमच्या ऐवजी रामपूर धारवाड या कर्नाटकच्या सीमेजवळ गेले ! तेथून ते कसेबसे परतले. फार धावपळ झाली त्यांची. ग्रुप लीडर मात्र अगोदरच आला होता !

          त्यांचेकडून सगळे ऐकल्यावर  इन्स्ट्रक्शन्स देताना सर्वांना आवर्जून सांगितले, की कॅम्पवर उशीरा आलेल्या पार्टीसिपंट्स वर मला ऍक्शन घ्यावी लागेल. त्यामुळे ग्रुप सिरिअस झाला. त्या रात्री सर्वांची जेवणे आटोपली. सर्वांना  ड्रिंकिंग चॉकलेट दिले. नंतर एका बाजूला नेऊन गोड भाषेत पण चपराक बसेल असे त्या उशीरा येणाऱ्याना आणि ग्रुप लीडरला बोललो. त्यांचे स्पष्टीकरण ऐकल्यावर सांगितले की, उद्यापासून ग्रुपबरोबरच राहा आणि ट्रक वा इतर वाहनांचा वापर करू नका, नाहीतर मला पूढे कळवावे लागेल.

         रात्री कँडल फायर झाला नाही. त्याच रात्री उशीरा पर्यंत बाजूच्याच टेंटमध्ये काही सहभागी १० पैसे  पॉईंटने पत्ते खेळत होते. त्यांचा आवाज कमी होता. पण हे वागणे गैर होते. त्यामुळे ग्रुप लीडरला लगेच बोलावून घेतले आणि तो प्रकार थांबवायला लावला. सकाळी निघताना सर्वांसमोर त्या सहभागीना कठोर भाषेत सूचना दिल्या.     

         एकदा करंजोळ कॅम्पला जायचे ठरवले. प्रोग्रॅम ऑफिसरने वेळ काढून त्या कॅम्पवर जाऊन या, रूट-वाटा पाहा तेथली स्थिती बघा, असे सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे तिकडे निघालो.

         सकाळी सव्वा आठला बॅच तिकडे निघाली. त्यांचे बरोबर निघालो. मात्र त्यांच्या रमत गमत चालण्यामुळे उशीर झाला असता, मला वेळेवर परतायचे होते. त्यामुळे गती वाढवली पुढे निघालो. ती जंगल वाटच होती. काहीवेळाने  मोठी चढण लागली. ती चढू लागलो. एकटाच असल्याने सावध होऊन चालत होतो. जरा कुठे आवाज झाला की थांबायचो ! मग मोठी काठी मिळवली आणि ती हाती घेऊन वाट चढू लागलो. चढण अर्धी झाल्यावर मोठे रॉक्स लागतात तेथे चुकायला झाले. डावीकडे जाणार होतो. पण नीट चेक केले आणि उजवीकडे निघालो, इतक्यात पाठचा ग्रुप येताना दिसला. त्यांना आवाज दिला आणि याच वाटेने पुढे या म्हणून सांगितले. सगळी चढण पार केल्यावर सपाटी लागली. मग पूर्ण उतरण, त्यानंतर पूर्ण सपाटी लागली. पुढे  करंजोळ गावलागले. ते उजवीकडे आहे. आमचा  कॅम्प डावीकडे होता. मग पुन्हा डावीकडे आलो.

                   इथे कॅम्प लीडर राजन होता. मी आल्याचे पाहून त्याला बरे वाटले. बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही.पाठून येणारे सहभागी एकेक करत करंजोळ कॅम्पवर दाखल झाले. दुपारी जेवण झाले आणि राजनचा निरोप घेतला. वाळपई गावाकडे निघालो. वाळपईहुन दारगेम जवळच्या एका गावाकडे जाणारी बस आहे. तेव्हा उगीच १६ किमी. पुन्हा ट्रेक करण्यापेक्षा गाडीने वेळेत आपल्याला वेळेत पोहोचता येईल, असा विचार केला. या जंगल वाटेत मोठा साप पाहायला मिळाला ! पिवळा  धम्मक होता. एक वाटसरू बरोबर होता. त्याने हे दिवड असल्याचे सांगितले. मात्र त्याला बुधवार-रविवारी विष असते. ही नवीन माहिती मिळाली. जवळ असलेला  कॅमेरा घेऊन थोडा पुढे झालो, तर त्या सापाने डोके उचलले ! तो चाहूल घेऊ लागला. पटकन फोटो घेतला आणि पाठी आलो. साप पुन्हा खाली येत सरपटत झाडीत निघून गेला.

                 वाळपईत बस मिळाली. ती पकडून उजगावला आलो. तेथे नाक्यावर (म्हणजे तिसका) दीड तासानंतर एक बस येणार  होती. तीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र  येथे दामोदर गांवकर हे नारायणचे नातेवाईक भेटले. त्यांचा परिचय अगोदर झाला होता. हा कॉलेज तरुण आहे. खूप बोलका आहे. रिस्पेक्ट देऊन बोलत होता.

                 आमची बस आली दोन तासांनी. मग बसने दोघेही बोळकण्यास आलो. तेथे दामोदरने सायकल घेतली आणि आम्ही डबलसीट निघालो. त्याने वाटेत सोडले. कॅम्पवर आलो. थोडा उशीर झाला होता. बॅच कॅम्पवर दाखल झाली होती.

                हा ग्रुप उपद्रवी असल्याचे लगेच समजले. वेळेवर बोलावल्यावर कोणी यायचे नाही. ग्रुप लीडर होता गुजरातचा. हा नॉन कोऑपरेटिव्ह होता. रात्री टेंटमध्ये एका टोळक्याचा धिंगाणा चालू झाला.  तेव्हा पटकन जाऊन त्यांना रोखले आणि ताकीद दिली, तेव्हा सगळे सिरिअस झाले. त्यावेळी ते घाबरले खरे, पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची तशीच मस्ती पाह्यली. ग्रुप लीडरसुद्दा त्यात होता. मग सणक आली ! पण संयम ठेवला आणि तो ग्रुप पुढे सोडताना, त्यांनी गैरवर्तन केले म्हणून रिपोर्ट लिहिला. कारण प्रोग्रॅम ऑफिसरनी पूर्वीच तशा सूचना दिलेल्या होत्या. नाईलाजाने तसे करावे लागले. हा ग्रुप पुढच्या कॅम्पवर असाच वागला तर ? त्यामुळे ही ऍक्शन घेणे जरुरीचे होते.

               मात्र हा खराब रिपोर्ट पाहिल्यावर ग्रुप लीडर आणि त्याचे काही साथीदार वाद घालू लागले. तेव्हा त्यांना स्पष्टपणे आणि संयम ठेवून उत्तरे दिली, ‘तुमच्या सगळ्यांकडून वाय.एच..आय. या संस्थेला चांगल्या वर्तनाच्या अपेक्षा आहेत.  तुमची राहाण्याची निवासाचीच व्यवस्था करता तुमच्या वर्तनावर-हालचालीवर जबाबदारीने आम्हाला लक्ष ठेवावे लागते. आपण इथे जंगलात आहोत. गावही फारसा लांब नाही. कोणालाच कसलाही उपद्रव होता आपला कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. तुमचे कालच्या वागणे सुधारण्यासाठी चांगल्या भाषेत मी समजावले होते. पण उपयोग झाला नाही. म्हणून ही कारवाई नाईलाजाने केली आहे.’  त्यानंतर सगळेजण शांत झाले आणि इथून पुढच्या कॅम्पवर निघाले.      

             त्यानंतर, एक दिवस बॅच नसल्याने रेस्ट डे मिळाला ! जरा मोकळे वाटले. दुपारी कुक ओमप्रकाश आणि त्याच्या असिस्टंटला  नारायणबरोबर प्राचीन असे तांबडी सुरला मंदिर पाहायला पाठवले आणि मी भाजीची ऑर्डर आणि इतर कामासाठी बोलकरण्याला आणि तेथून उसगाव तिसकाला जाऊन आलो.

            आता फक्त बॅचेस यायच्या राहिल्या होत्या. त्यानंतर सगळे कॅम्प्स वाइंडअप होणार होते. आता इथल्या वातावरणाची आणि कॅम्प सांभाळण्याची सवय झाली होती. ताण बराच कमी झाला होता.

           मात्र पुन्हा एकदा दुसरी उपद्रवी बॅच आली. त्यांचा ग्रुप लीडर चांगला होता. त्या रात्री कँडल फायर झाला, तेव्हा उपद्रव करणारा एक गट तंबूतून बाहेरच आला नाही ! त्यांचे गाणे-बजावणे आणि गोंधळ वाढल्यावर मुख्य  कँडल फायर मध्ये बसलेल्या चांगल्या सहभागींना त्रास होऊ लागला. वास्तविक रात्री होणाऱ्या कँडल फायरला सगळ्यांनीच उपस्थित राहायचे असते. एकत्रित गप्पा होतात, व्यवस्थित ओळखी होतात. कोणी आपले कला कौशल्य सादर करतो, कितीतरी गुणी कलावंत यासाठी इच्छुक असतात. छान गाणी म्हणणारे आणि सांगीतिक मैफल सादर करणारे ग्रुप्स कॅम्पवरील मुक्कामाची शान वाढवतात. कोणी अनुभवी मान्यवर मोकळेपणाने रम्य अशा जुन्या आठवणी सांगतो तर कोणी काव्य-अभिनयदेखील सादर करतो ! कॅम्पच्या रात्री अशा कँडल फायरमुळे सुखद बनतात.

             दुर्दैवाने त्या रात्री अतिरेक वाढल्यावर मी सरळ त्यांच्या तंबूत घुसलो आणि ग्रुप लीडरच्या समोर(कारण तो त्यांना घाबरत होता) त्यांची झाडाझडती घेतली. ‘ लगेच बाहेर येऊन जॉईन व्हा नाहीतर इथे शांत पडून तरी राहा ‘, असे त्यांना  बजावले. तुमचा रिपोर्टही मी करणार असल्याची माहिती दिली. ते शांत झाले. मग पूर्ववत बाहेर कँडल फायरचा कार्यक्रम सुरू झाला रंगला !

             आणखी एका बॅचकडून घडलेला गैरप्रकारही सांगणार आहे.

            एक ग्रुप १६ जणांचा होता. तसा चांगला होता. पण यातील काहींनी रात्री थोडा हंगामा केला. त्यापूर्वी सायंकाळी अंघोळ करताना त्यांची मस्ती सुरू होती. नंतर इन्स्ट्रक्शन्स देताना सगळयांनाच कॅम्पच्या शिस्तीची कल्पना दिली. तेव्हा बराच परिणाम झाला. ग्रुप लीडर राजस्थानचा होता. थोडा ओव्हर वाटला. मात्र त्याला सगळे काही स्पष्ट करून सांगितल्यावर, कोणी तसे वागणार नाही, याची त्याने खात्री दिली.

             रात्री कोणीतरी कॅम्पला लागूनच टॉयलेट करून ठेवल्याचे आढळले ! सकाळी ग्रुप लीडरला ही माहिती देऊन सांगितले की तुम्हाला ते लगेच साफ करावे लागेल. मग त्याने बऱ्याच जणांना विचारले. सारे नाही नाही करीत होते. अखेर सगळ्यांना चांगल्या भाषेत सुनावले- तुम्हाला वेळ होईल इथून निघायला. काय तो नीट विचार करा. वाटल्यास मी ती घाण साफ करतो. पण तुमचे रिपोर्ट्स खराब होतील. जर कोण कबूल होत नसेल, तर एक-दोघाजणांनी तेथे चला, त्या घाणीवर माती टाका आणि ती उचलून दूर नेऊन टाका. मात्र कोणी तयार होईनात !

            अखेर स्वतःच ती सफाई करायला निघालो. तेव्हा एक आसामी सहभागी म्हणाला, मी ते साफ करतो. मग त्याला सुकी माती दिली आणि बरोबर चल म्हटले. मग एकेक करीत / जण निघाले घाण साफ करायला ! त्यांनी घाणीवर माती टाकली. नंतर त्यावर पाला पाचोळा पसरला. सगळे उचलून दूरवर टाकून ते परत आले.

            एरव्ही सकाळी आठ-सव्वा आठला निघणाऱ्यांना नऊ वाजले. ग्रुप लीडर  या सगळ्या घटनेमुळे नाराज झाला होता. निघताना मात्र  त्याच्यासह  साऱ्यांनी सॉरी म्हटले. असे ग्रुप्स असले की टेन्शन वाढते. अशा प्रसंगी अधिकाराचा वापर करायला मिळतो म्हणून ठीक, अन्यथा कॅम्प लीडर शीप सांभाळणे कठीण होते.

*आणि शेवटची बॅच-

           शेवटची बॅच छान होती. ग्रुपमध्ये १८जण होते. संध्याकाळी कॅम्पवर ही बॅच थोडी उशीरा आली.  आल्यावर जल्लोश केला ! पुन्हा टेन्शन आले. या ग्रुपमध्ये स्टुडंट मंडळी होती. त्यांचे शिक्षकही उत्साही होते. नेहेमीचे चहापान, ब्रेकफास्ट झाल्यानंतर नेहेमीची इन्स्ट्रक्शन्स सर्वांना दिल्यानंतर फरक पडला.

          रात्री कँडल फायरचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्यानंतर उद्याचे टाईम टेबल समजावून सगळ्यांना टेंटमध्ये परतण्याच्या सूचना दिल्या.                 

                दुसरा दिवस उजाडल्यावर चहा ब्रेकफास्ट झाला ही बॅच पुढे जाण्याची तयारी करू लागली त्यांना निघायला थोडा वेळ होता, तेव्हा ग्रुपच्या शिक्षक-विध्यार्थ्यांनी  इथे आम्हाला श्रमदान करायची इच्छा आहे, असे सांगितल्यावर आनंद झाला ! जवळच असलेल्या बाराभूमीचा गवत वाढलेला परिसर साफ करून घेतला. यावेळी काही गावकरी पण उपस्थित राहून मदत करू लागले. सर्वाना पुन्हा चहा नास्ता दिला त्यांचे आभार मानले. मग त्या ग्रुपला पुढच्या कॅम्पसाठी शुभेच्छा देऊन निरोप दिला.

*वाइंडअप करून पुन्हा बेसकॅम्पकडे

              सर्व बॅचेस आता येऊन गेल्या होत्या. मग इथे एक दिवस आवराआवर करून ठेवली आणि ट्रकची वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी दुपारी मागील कॅम्पच्या सामानासह आलेल्या ट्रकने आम्हाला पणजीत बेस कॅम्पला आणले.

              आता विश्रांतीच विश्रांती होती. बेस कॅम्पवर सगळ्या कॅम्पच्या लीडर्स मित्रांची एकत्रित बैठक आमच्या प्रोग्रॅम ऑफिसर आणि डायरेक्टर मंडळींच्या उपस्थितीत झाली. ग्रुपचे आणि आमचेही रिपोर्ट्स इकडे पोहोचले होते. त्यावर चर्चा होऊन डायरेक्टरनी आमच्या प्रत्येक लीडरला शाबासकी देत पुन्हा असेच वाय.एच..आय.’ च्या मोहिमेत सेवा देण्याचे सर्वाना आवाहन केले. प्रत्येकाला मान्यवर अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तेव्हा आपल्या सेवेचे चीज झाल्याची जाणीव सर्वांना झाली.

            त्यानंतर, हिमालयात मी दोनदा अशी सेवा केलीय. मान्यवर अशा संस्थेने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या  विविध मोहिमा आणि कार्यक्रमातुन फक्त सहभागी म्हणून जाण्याऐवजी त्याच्या आयोजन-नियोजन कामाची जबाबदारी घेणे ती निभावणे, यात मला खरा आनंद वाटतो अन समाधानही वाटते आहे. 

 

                                                                           :::::::::::::::::::::::::::::