Saturday, 2 November 2019

💐मित्रांगण💐

💐मित्रांगण💐
        कॉलेजला असताना एक विषय होता मानस शास्त्राचा. आमच्या प्राध्यापक सरांनी सांगितलेले त्यावेळचे एक वाक्य माझ्या चांगले लक्षात राहिलेय. ‘ Man is a social animal ‘.  म्हणजे मानवप्राणी हा संवेदनशील असून तो समाजप्रिय आहे.
                 हाच विचार घेऊन मी माझ्या परिवारा बाहेर, समाजात मिसळत राहिलो. वावरत राहिलोय. त्यामुळे काही नवीन परिचय झालेत. त्यातले काही परिचय मैत्रीत रूपांतरित झाले. काहींशी दाट मैत्री झाली, तर काही वरवरचे मित्रही झाले ! माझे मित्रांगण तयार झालेय ते असे !    
                या  मित्रांगणात हळूहळू भर पडू लागली. मित्रांच्या गप्पाटप्पात आणि फिरण्या-वावरण्यात मोठी धमाल होऊ लागली.
                खरे तर, पूर्वी शालेय जीवनात मित्र परिवार होता. पण मैत्री हा विषय तेव्हा नीट उमजला नव्हता. एवढे परिपकव मन नव्हते.  आता तरी आपण कुठे परिपकव झालेलो आहोत एव्हढे ? मात्र सर्वसाधारण निरीक्षणातून सांगता येतेय की आपले मित्र-सखे कोण आहेत, कसे आहेत ? जवळचे किती आहेत ? वरवरचे कोण ? त्यातील सन्मित्र किती आहेत ?
                आज माझे मित्रांगण भरलेले असले तरी, मित्र आणि मैत्री हा विषय थोडाथोडका नाहीये. खूप लिहिण्यासारखे आहे यावर.
                आज प्रारंभी, माझ्या ‘मित्रांगणा’तील आगळ्या वेगळ्या मित्रांसमवेत मिळवलेल्या आनंदाची अनुभुती मी तुम्हाला ऐकवत आहे……….


💐अंधमित्रांच्या सहवासात………
             अंधमित्र भारतभर सर्वत्र आहेत. या मित्रांनी एकत्र येऊन नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड (N.F.B.) ही शिखर संस्था स्थापन केली आहे. ही प्रसिद्द संस्था असून  महाराष्ट्र राज्यात तीची एक शाखा आहे.
                या संस्थेचे अधिवेशन लोणावळा-पुणे या निसर्गरम्य ठिकाणी आयोजीत केले होते. माझ्या एका मित्राच्या आग्रहाखातर मी या अधिवेशनात अंधामित्रांचा स्वयंसेवक म्हणून सहभागी झालो होतो.
                अधिवेशनाच्या पूर्वव्यवस्थेसाठी मला दोघा मित्रांसमवेत एक दिवस आधी लोणावळ्याला जावे लागले. लोणावळ्यात एक मोठे हायस्कुल आहे. सहभागी अंधमित्र आणि त्यांच्या कुटुंबियांना मुक्कामासाठी ती जागा ठरविली होती. तेथे आवश्यक ती नोंदणी करून शाळेचा परिसर पाहून घेतला. नंतर  आम्ही तळेगाव डेपोत जाऊन एस.टी. बसेस ठरविल्या. बाजारात काही खरेदीसुद्दा करायची होती. तीही केली.
                 दुसऱ्या दिवशी सकाळी लोणावळा शहरात आमच्या अंधमित्रांचे परिवारासह आगमन झाले. हर्ष-उत्साहात सर्वांचे स्वागत झाल्यानंतर सारा समूह अधिवेशनाच्या ठिकाणी,  हायस्कुलमध्ये निघाला. एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवत, शिस्तीत सर्वांनी हायस्कुल परिसरात प्रवेश केला. लोणावळ्यातले लोक ही शिस्तबद्द रांग अचंब्याने पाहात होते.
                बहुतेक सहभागी अंधमित्र सुशिक्षित होते. काही तर उच्च अधिकारी होते. हे सगळे अंध आहेत, याचे भान ठेवून आम्ही डोळस स्वयंसेवकांनी त्यांची कुटुंबासह स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था केली होती. कुणाचीही गैरसोय होऊ नये, तरुण अंधमित्र एकत्रित राहावेत, कुटुंबातील लहान मुलांची आबाळ होऊ नये, या सगळ्या बाबींची आम्ही दक्षता घेत होतो. महिलांसाठी वेगळा हॉलहही राखून ठेवला होता.
                 पिण्याचे पाणी कोठे असते, टॉयलेटची नेमकी जागा कोणती, कार्यक्रमाचे(कला सादरीकरण) ठिकाण कुठे असेल, प्रत्येकाच्या नोंदी ठेवून त्यांना ओळख बिल्ले देण्याची कामे, अशा सगळ्या कामांची पूर्वतयारी आम्ही डोळस स्वयंसेवकांनी करून ठेवली.
                 संस्थेच्या पदाधिकारी वर्गाने(तेही अंधमित्र) सगळ्या व्यवस्थेची सविस्तर माहिती आमच्याकडून घेतली आणि समाधान झाल्यावर, वारंवार त्यांनी आमचे आभार मानले.
            पहिल्या दिवशी संध्याकाळी  अधिवेशनाचे जल्लोषात उदघाटन झाले. या कार्यक्रमात नव्या कार्यकारिणीची नेमणूक, संस्थेच्या पुढील योजना, याबाबत मान्यवर पदाधिकारी आणि काही सभासदांची भाषणे झाली.  काही अंधमित्र आपली अनुकूल-प्रतिकूल मते सर्वांपुढे मांडत होते, त्यावर पदाधिकारी स्पष्टीकरण देत होते. डोळस लोकांनी यातून धडा घ्यावा, असे या अधिवेशनातील वातावरण होते.
                 मात्र अधिवेशनातील सारे वातावरण गंभीर असून चालत नाही.  काही विरंगुळा हवा, थोडा बदलही हवा. त्यानुसार, रात्री छान वाद्यवृंदाचा कार्यक्रम सर्वांसमोर सादर झाला. एकेक कसलेला कलावंत आपली कला सादर करीत होता !
                  हिंदी, मराठी जुन्या नव्या गाण्यांची सूनहरी मैफल मिमिक्रीसह सुरू झाली. गाणी गाताना हे अंधमित्र बेभान होऊन नाचू लागले ! त्यांचा नृत्यानंद आम्हाला आगळी अनुभुती देऊन गेला. हे दृश्य पाहणारे  काहीजण गहिवरलेसुद्दा !
                  दुसरा दिवस उजाडला. आज लोणावळा परिसरात पर्यटन करायचे होते. त्यासाठी दोन एस. टी. बसेस सज्ज होत्या. लोण्यावळ्यातील समृदद धरणे व जलाशय, श्रीएकविरा देवी मंदिर, राजमाची पॉइंट, आणि इतर प्रेक्षणीय स्थळे अंधमित्रांनी पाहिली, म्हणजे अनुभवली. त्यांना नजर नसली म्हणून काय झाले ? त्यांचे कान तीक्ष्ण होते. त्यांचे चालणे-उतरणे-चढणे अगदी काळजीपूर्वक व्हायचे. फिरताना आमचे डोळस स्वयंसेवक मदतीला असले, तरी काही वेळा आमचाच गोंधळ उडायचा ! अशावेळी आमचे चतुर अंधमित्र खुलासा करायचे- ‘ अहो, तुम्ही आमचा जो हात धरलाय, तो थोडा वर केलात, की आम्ही समजु चढणीची वाट आहे, हात खाली केलात, की समजु आता उतरण आहे. हात सरळ केलात, तर आम्ही सरळ वाटेवर आहोत असे समजू की ! त्यात काय मोठेसे ? ‘
                  स्थळे  बघताना आम्ही विशिष्ट जागी आल्यावर स्थळ वर्णन अंधमित्रांपुढे केले, की ते खूप आनंदी होत.  आपण एवढया दुरून आलोय त्याचे सार्थक झाल्याचा भाव त्यांच्या चेहेऱ्यावर दिसायचा ! जणू प्रत्यक्ष स्थळ ते पाहात आहेत. त्यांचा हा आनंदी चेहेरा पाहून आमचे डोळे मात्र अश्रूंनी भरून जायचे.
                   या दोन दिवसांत काही अंधमित्रांशी चांगला परिचय झाला. त्यातील एक कॉलेजचे प्रोफेसर होते, तर एक आकाशवाणी कलावंत ! तेथे वसंत हेगडे म्हणून एक लक्षवेधी व्यक्ती होती. हुशार व्यक्तिमत्त्व. टेलिफोन खात्यात चांगली नोकरी असलेला हा अंधमित्र बोलका होता. एका डोळस तरुणीने यांचेशी प्रेमविवाह केलाय. एक गोजिरवाणा मुलगा आहे यांना. वसंत ‘एनएफबी’चा पदाधिकारी आहे. या अधिवेशनाची सारी सूत्रे त्याने यशस्वीपणे सांभाळली.
                  अधिवेशनाची सांगता झाली आणि मी निरोप घेताना वसंताला भेटण्यासाठी गेलो, तेव्हा माझा हात हाती घेऊन त्याने मला प्रश्न केला-‘ पुन्हा येणार ना ? त्यावर मी लगेच उत्तर दिले-‘ हा हात तुमच्या हातात दिलाय. जरूर येईन पुन्हा’. त्याला खूप आनंद झाला.
                  शब्द दिल्याप्रमाणे पुढील वर्षी मी एनएफबीने पनवेल येथे आयोजित केलेल्या कौटुंबिक सहलीला मित्रांसह हजर राहिलो.
                  नेरे हे निसर्गरम्य गाव पनवेल शहरापासून जास्त लांब नाही. शहरातली वर्दळ येथे नाही. शांत वातावरण आहे. इथे एक सुप्रसिद्ध संस्थेची वसाहत आहे, तीचे नाव शांतीवन.  कुष्ठरोगी बांधवांची ही पुनर्वसन वसाहत आहे. लोकांनी दूर फेकले म्हणून एकत्र येऊन स्वतःचे नवे आयुष्य घडवावे, या हेतूने शांतीवन उभे राहिलेय.  प्रसिध्द समाजसेवक आणि पूज्य साने गुरुजी कथामाला या सुप्रसिद्ध संघटनेचे संस्थापक असलेले स्वर्गीय प्रकाशभाई मोहाडीकर आणि इतर संस्था-व्यक्तींनी शांतीवन निर्मितीसाठी खूप परिश्रम घेतलेत.
                  या ठिकाणी सुरुवातीला आश्रमवासीयांना काही ग्रामस्थांनी खुप विरोध केला होता. नदीचे पाणीही वापरण्यास बंदी घातली होती.  आज परिस्थिती अगदी उलट झालीय. आज शांतीवनातील भाजीमळ्यात तयार झालेल्या भाज्या साऱ्या पनवेल शहरात व बाहेर विकल्या जातात ! बागेतील फुलांनाही चांगली मागणी आहे. इथे राहणाऱ्या बांधव-भगिनींना शिवणकाम, तंत्रज्ञान, इत्यादींचे शिक्षण दिले जाते. कुष्ठरोग पुन्हा पसरू नये, म्हणून शांतीवनात वैदयकीय यंत्रणा सूसज्ज आहे. नियमित तपासणी व औषधोपचार केले जातात. संस्थेची ऍम्ब्युलन्स गावागावात जाऊन वैदयकीय शिबिरे घेते. विविध आजारी ग्रामस्थांवर चांगले उपचार होतात.
                 शांतीवनात ऍम्ब्युलन्स आणि ट्रॅक्टर चालविणारा रोगमुक्त ड्रायव्हर ओळखीचा झाला. खूप बोलका होता तो.  मात्र त्याला या अंधमित्रांविषयी खूप कणव वाटायची. काय यांचे जीवन ! असे म्हणून हळहळायचा तो !
                आमची शांतीवन सहल खूप छान झाली. इथे रात्री झालेला वाध्यवृंद देखील चांगला रंगला ! दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात सगळे मित्र दणक्यात गाणी म्हणून नाचत एकमेकांना आलिंगन देत होते !
                या दोन्ही स्मरणीय कार्यक्रमांचा मला चांगला लाभ झालाय. एक नवी ‘दृष्टी’ सुद्दा लाभलीय. आता मी माझ्या या मित्रांबद्दल इतरांना आवर्जून सांगतो, की हे मित्र दृष्टीहीन जरी असले, तरी त्यांना कोणी कमी समजू नका. त्यांना इतरांसारखेच माना. फक्त डोळे सोडले, तर त्यांच्यात काय उणीव आहे बरं त्यांच्यात ? दृष्टी नसूनदेखील आयुष्यात खूप मोठी झेप घेणारी ही कर्तृत्ववान माणसं आहेत, आणि मी या आगळ्या मित्रांना जवळून पाहिलंय. .        
       माझ्या या उत्साही अंधमित्रांना माझा सलाम आहे.

                                                  --------------------

💐सुंदर माझे घर💐

💐सुंदर माझे घर💐
     आपले घर सुंदर असावे असे कुणास वाटत नाही ? आपल्या घरात हसरे तारे हवेत, एकमेकांबद्दल जिव्हाळा हवा, सुखदुःखात एकमेकांना साथ हवी, अशी ‘सुंदर’ घराबद्दलची माझी साधी-सरळ व्याख्या आहे. चार भक्कम भिंती, आत बाहेर चकाचक रंग, आलिशान फर्निचर, दिवसरात्र टिव्हीत किंवा मोबाईल-नेटच्या सानिध्यात मग्न असणारी, सतत उत्सवी कपड्यात नटून थटून घरात वावरणारी माणसे ज्या घरात आहेत, त्या घरास मी ‘सुंदर घर’ म्हणणार नाही.
       आपले सुंदर घर खऱ्या अर्थाने ‘सुंदर’ व्हावे, याकरीता परिवारातील प्रत्येक जाणती व्यक्ती सदैव धडपड करीत असते. ती त्यांची जबाबदारीही आहे. आपला परिवार आर्थिकदृष्ट्या स्थिर, म्हणजे भक्कम राहील, हे प्रथमतः कुटुंबप्रमुखाने ठरवायचे असते. मात्र तो दूरदृष्टीने विचार करणारा हवा. आपल्या घरात आर्थिक स्थिरता कशी येईल आणि टिकेल, वाढेल याविषयी तो दक्ष राहून कृती करणारा हवा.
      म्हणून मी हे विचारपुष्प घराला ‘आर्थिक स्थिरता’ यावी व सामान्यांनी सजग व्हावे याकरीता लिहीले आहे.        
              मी कोणी अर्थ तज्ञ नाही. आर्थिक क्षेत्रातला जाणकारदेखील नाही.  तरीही, हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य असा असल्यामुळे मला आयुष्यात मिळालेले आर्थिक खाच-खळगे तुम्हाला(म्हणजे यात नवखे असणाऱ्यांना) मिळू नयेत, तसेच दररोजच्या व्यवहारांत खर्च आणि अर्थ संचय करताना छोट्या छोट्या गोष्टी किती उपयुक्त ठरतात, हे मी येथे सांगणार आहे…………..💐थेंबे थेंबे तळे साचे………..💐
        दैनंदीन आयुष्य जगताना, वावरताना प्रत्येक गरीब-श्रीमंताला पैसे प्रिय असतो.  हा पैसा  ज्याच्याकडे नसतो, त्याला स्वतःच्या चरितार्थासाठी ‘तो’ मिळविणे ही त्याची आत्यंतिक गरज बनते. ज्याच्याकडे तो बक्कळ असतो, त्याला त्याच्या सुरक्षेची दिवसरात्र चिंता लागलेली असते.
                 आज हे ‘अर्थ’ प्रबोधन मी, जे माझ्या सारखे कुटुंबवत्सल आहेत, आणि ज्यांना दररोजच्या गरजा भागविताना ‘थेंबे थेंबे तळे’ साठवावेसे वाटतेय,  त्यांचेसाठी करीत आहे. या बाबतीत हुशार असलेल्या व जाणकार मंडळीना माझ्या चिल्लर प्रबोधनाचा उपयोग होणार नाही.
*कुटुंब प्रमुख-
                प्रत्येक कुटुंबात एक पुरुष अथवा स्त्री प्रमुख असते. या कुटुंब प्रमुखाकडे गृह व अर्थ ही महत्वाची खाती असतात. आपल्या कुटुंबरुपी राज्याचा सर्व कारभार तो किंवा ती व्यवस्थित सांभाळते यात शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही.  या प्रमुखाला सर्वात जास्त मदत करणारी व्यक्ती पती वा पत्नी असते आणि तिची चांगली साथ कुटुंब प्रमुखास मिळते. मग संसाराची गाडी जोरात पुढे निघते.
                 ही आनंदी जीवन सफर करताना नूतन दाम्पत्याच्या आयुष्यात नवांकुर येतात  मुला- मुलीच्या रुपात ! हे आयुष्यातले सुखी क्षण.  परंतु वाढती जबाबदारी दोघांच्या अंतर्मनात ताण वाढवीत असते. आता  कुटुंबाची  आर्थिक घडी विस्कटत नाही, पण थोडी ओढाताण सुरू होते. अशा नाजूक स्थितीत संयमित राहून दोघांना गृह कारभार सुरळीत ठेवायचा असतो.
               मुलांचे संगोपन करता करता ती वाढत असतात. बालवाडी, के.जी., प्राथमिक शिक्षण करता करता मुलं कधी कॉलेज पर्यंत येऊन ठेपतात ते उमजतच नाही ! काळ किती गतीने पुढं सरकत असतो बघा !
             त्यानंतर मुलांचे उच्च शिक्षण, करिअर, आणि जॉब किंवा व्यवसायासाठी होणारी कुटुंब प्रमुखाची धावपळ  अखंडितपणे सुरु राहते. तो आता अनुभवाने सरावलेला असतो. मुख्यतः आर्थिक टेन्शन असते. परंतु समोर पर्यायही उपलब्ध होत असतात.
             पुढे स्वतःची निवृत्ती येते. पुरेशी आर्थिक स्थिरता आहे पण ही देणी, ती देणी डोळ्यासमोर दिसत राहतात.
*मुलांचे संगोपन-शिक्षण—
             मुलांच्या भवितव्याची तरतूद करताना त्यांच्या जन्मतारखेचा दिवस पाहून दरमहा थोडीथोडी रक्कम एका छोट्या कुलूपबंद अथवा पॅक बंद डब्यात(कॅश बॉक्स) जमा करावी. ही रक्कम अल्प असली तरी चालेल. वर्षभरानंतर(वाढदिवसाच्या अगोदर) ती साठलेली रक्कम कुटुंब प्रमुखाने त्यांच्या बँक खात्यात जमा करावी. त्याची वेगळी नोंद देखील ठेवावी. ही रक्कम मोठी असेल तर मुदत ठेवीत गुंतवावी. यथावकाश,  मुलांना ती निश्चितपणे उपयोगी पडेल.


*पाच वर्षानंतर-
             आता मुलांच्या नावे बँकेत खाते उघडावे. अठरा वर्ष हे खाते पालक, म्हणजे कुटूंब प्रमुखाला वापरावे लागते. सर्व नोंदी स्वतंत्र पणे राहतात. मुदत ठेव गुंतवणूकही करता येते.
      मुलांचे प्राथमिक शिक्षण व नंतरचे माध्यमिक शिक्षण सुरू असताना कित्येक प्रसंगी शालेय फी, स्पर्धा, कॅम्प, क्लासेस, तसेच आवश्यक खरेदी,  इ. बाबतीत पैसे लागतात. मुलांच्या खात्यात एवढी रक्कम कशी असणार ? म्हणून कुटुंब प्रमुखाने नियमितपणे अथवा वार्षिक/तिमाही/सहामाही आवकवाढीच्या वेळी या खात्यामध्ये रक्कम जमा करावयास हवी, जेणेकरून संबंधित खर्चाची पूर्तता सुलभ होईल.
*उच्च शिक्षण-करिअर-
              कॉलेज शिक्षण सुरू होताना आणि ते प्रत्यक्ष सुरू झाल्यावर फीच्या रुपात मोठमोठ्या रक्कमा देणे ही साधी गोष्ट नाही. त्याकरीता कुटुंबप्रमुख अगोदरच दक्ष असावयास हवा.
*क्रेडिट/डेबिट कार्ड—
               या कार्डाच्या नावातच त्याचा अर्थ आहे. प्रत्येक बँक किंवा चांगली वित्तीय संस्था वार्षिक/तिमाही सेवाशुल्क घेऊन हे कार्ड ठेवीदारांना उपलब्ध करून देते. क्रेडिट कार्ड आपल्याला त्या त्या ठेवीदाराच्या मर्यादेप्रमाणे व नियमानुसार तात्काळ एटीएम सेंटरमार्फत पैसे देते. त्यामुळे छोटीमोठी खरेदी आपण केव्हाही करू शकतो. प्रवासात हे फार उपयुक्त ठरते. आपल्या सिक्रेट पासवर्ड मुळे हे सुरक्षितही असते. मात्र ठराविक मुदतीत ते परत केले नाहीत, तर मोठया व्याजाचा भुर्दंडही पडतो, तेव्हा ते काळजीपूर्वक वापरावे लागते. !
             या उलट डेबिट कार्ड !  हे कार्ड आपल्या खात्यातील जमेएवढीच रक्कम एटीएम मार्फत तात्काळ देते. खरेदीसाठी हेसुद्दा उपयुक्त आहे. यालाही सिक्रेट पासवर्ड मुळे प्रवासात किंवा इतरत्र सुरक्षितता असते. त्यामुळे हेच आपण वापरणे योग्य.
*सोने-रुप्यातील गुंतवणूक व गोल्ड ईटीएफ फन्ड, सुवर्ण रोखे--
             भारतीय मन हे सोने म्हटले की, भावनिक होते. विशेषतः महिलावर्ग यात भावुक होतो. त्यांची आभूषणे सोन्यारुप्याने मढलेली असावीत, ही त्यांची आंतरिक भावना असते.
                  साहजिकच सुवर्ण संचय होतो. तो वाढत राहतो. आपत्तीच्या प्रसंगात या धनाला हात लावला जात नाही. यात, अपवाद अत्यंत कमी आहेत. त्यामुळे ही आपली स्थिर व पत वाढविणारी मालमत्ता ठरते.
                   मात्र सुवर्ण गुंतवणूकीत एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे गोल्ड ईटीएफ फन्ड. ही गुंतवणूक युनिटच्या स्वरूपात होते. बाजारात आज असलेल्या दराप्रमाणे आपण युनिट्स घेऊ शकतो. यामध्ये धन साठविताना काळजी करायला नको. ते पूर्णतः सुरक्षित असते. भविष्यात सोन्याचे दर वाढले की आपले युनिट्स देखील वजनदार होतात ! आपण ते विकून नफा कमावू शकतो. दुसरा एक मार्ग आहे- सरकारी सुवर्णरोखे. हेपण सुरक्षित असतात. या रोख्यांची आपण खरेदी-विक्री करू शकतो. मात्र अल्पकाळासाठी ही गुंतवणूक फायदेशीर नाही.
*जमीन जुमल्यातील गुंतवणूक—
                  हे थोड्याथोडक्या भांडवलामध्ये शक्य नसते. त्यासाठी कर्ज घेणे आवश्यक ठरते.  मग कर्जाचा हप्ता व व्याज, वगैरे वगैरे सोपस्कार आले. याकरीता आपली क्षमता आणि योग्य नियोजन जरुरीचे आहे. अन्यथा आपण पुढे होऊ नये. कालांतराने या गुंतवणुकीत होणारे चढ किंवा उतार सभोवतालच्या घडामोडींवर/उलढालींवर, (म्हणजेच आर्थिक,सामाजिक,,राजकीय स्थित्यंतरे यांचेशी) निगडित असतात.
                 यातील गुंतवणूक दिर्घकालीन व स्थिर असते.  गरजेच्या वेळेला ती उपयोगी ठरते. अर्थात, एकतर ती विकावी लागते अथवा गहाण तरी ठेवावी लागते.                
*शेअर्स व्यवहारात कितपत तथ्य आहे ?
                 वास्तविक ‘ शेअर्स ‘ हा शब्द ऐकल्यावर आमचा मराठी माणूस आधी शंकाकुल होतो. ‘शेअर्स म्हणजे सट्टाच’ असा त्याने सरळ शिक्का मारलाय ! हा विषयच तो सरळ उडवुन लावतो.
                परंतु हे अज्ञान असते. गैरसमज असतो. प्रत्यक्षात, सर्वात जास्त परतावा शेअर्स गुंतवणूक दारांना मिळतो. शेअर बाजारात करोडो-अब्जावधींची उलाढाल होत असते. देशपरदेशातल्या वित्त संस्था आपली गुंतवणूक शेअर्समध्ये करतात. विविध बँका शेअर्स तारण ठेवून गरजूंना कर्ज पुरवठा करतात.
               आता पूर्वीसारखा हर्षद मेहता घोटाळा होण्याचे दिवस राहिले नाहीत. सरकारी आधिपत्य असलेली सेबी व रिझर्व्ह बँक यांची देखरेख- कठोर नियंत्रण असल्याने, तसेच अध्ययावत तंत्रज्ञानामुळे शेअर्स व्यवहारांत बरीच पारदर्शकता आलीय. त्यामुळे घोटाळे होण्याची शक्यता नगण्य झालीय. शेअर्सची नोंदणी आता बंधनकारक झाली आहे. शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी प्रत्येक गुंतवणूकदाराला डिमॅट खाते उघडणे बंधनकारक झालेय. खाते अधिकृत ब्रोकर फर्म/बँकेशिवाय उघडता येत नाही.
                 हा सर्व विचार करून सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी बावरून न जाता या गुंतवणूकीसाठी अनुभवी व विश्वासू व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे व यात खुशाल सामील व्हावे. स्वतःचे/एकत्रित डिमॅट खाते उघडावे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सचा प्राथमिक वेध घ्यावा. नवीन नोंदणी करणाऱ्या कंपन्या, जुन्या नावाजलेल्या कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या, यांच्या शेअर्सचा चढउतार पाहून पुढचे पाऊल उचलावे. कंपनी चांगली असल्याची माहिती वाचनातून मिळते. नेटवरदेखील हे शक्य आहे. काही चांगल्या कंपन्यांचे स्थिर राहतात,  तर काहींचे शेअर्स उत्तुंग भरारी घेतात ! काही वर्षातून तीन चारदा लाभांश देण्यासाठी प्रसिद्द असतात, तर काही भागदारकांना बोनस रुपात आणखी शेअर्सही देतात !
                    या गोष्टी ध्यानी ठेवून, अभ्यास करून व जागरूक राहून शेअर्स घेण्यासाठी निर्धास्तपणे गुंतवणूक करावी.
*म्युच्युअल फन्ड गुंतवणूक-
                    शेअर्स खरेदी विक्री करताना जेवढा जास्त फायदा हवा असतो, तेवढा धोका-जोखीम पत्करायची मनाची तयारी असावी लागते. आपल्याला अधिक सुरक्षितता हवी असेल, तर सरळ फन्ड गुंतवणूकीचा आधार घ्यावा.
                    फन्ड विविध प्रकारचे असतात. डेट फन्ड, ओपन एनदेड फन्ड, बॅलन्स फन्ड, कर सवलत असणारे फन्ड, गोल्ड ईटीएफ फन्ड, रोखे संलग्न फन्ड, इत्यादी. हे युनिटच्या रुपात आपण खरेदी करतो. त्याकरीता प्रथम रीतसर नोंदणी करावी लागते. सारा व्यवहार पारदर्शी आणि कायदेशीर होतो. इथेही पर्याय असतात. एकरकमी गुंतवणूक होते, तशीच दरमहा एस. आय.पी.(सिस्टिमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे हप्ते भरून रक्कम गुंतवता येते. शिवाय ती केलेल्या करारानुसार/नियमानुसार काढताही येते. आपली जमा असलेल्या रकमेवर देय होणारा लाभांश काढण्याचा किंवा तो तसाच ठेवून नफा वाढविण्याचा चांगला पर्याय आपल्यापुढे असतो.
 
                   चांगला म्हणजे गुणवत्तापूर्ण फन्ड काहीसा महाग असतो. तर नवीन फन्ड किंवा साधारण दर्जाचा फन्ड कमी रकमेचा असतो. ही गुंतवणूक शेअर मार्केटच्या चढउताराशी निगडित असते. आपण यात किमान तीन ते पाच वर्षे गुंतवणूक करावी. दीर्घकाळ ठेवल्यास परतावा वाढतो. पण याचाही नीट अभ्यास व्हावा लागतो. हा फन्ड चालविणारी संस्था मॅनेजर/ संचालक नेमते. या क्षेत्रात ते तज्ञ असतात. बाजारात मंदी आली, तरी ते विचलीत होत नाहीत, उलट चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन, योग्य संधी पाहून ते विकून नफा कमावतात आणि आपल्या गुंतवणूक दारांना वाटतात. त्यामुळे आपण चिंतीत व्हायचे कारण नसते. मात्र हे फन्ड निवडताना  नीट माहिती घ्यावी.
*सरकारी रोखे—
        हा देखील गुंतवणूकीचा एक चांगला व सुरक्षित प्रकार आहे. यात किमान ठरलेल्या कालावधीसाठी रक्कम गुंतवावी लागते. रोखे गुंतवणूकीचा परतावा थोडा कमी मिळतो, पण तो खात्रीशीर मिळतो.
*बँकेतील मुदत ठेवी--
       सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सर्वसामान्य गुंतवणूकदार एक वर्ष, तीन वर्षे किंवा अगदी एक-दीड-दोन महिन्यांच्या कालावधीसाठीही मुदत ठेव म्हणून रक्कम गुंतवितो. ठेवींवर निश्चित ठरलेला व्याजदर पाहून बँक परतावा देते.
       मुदत ठेव चांगल्या सरकारी बँकेत अथवा उत्तम रेकॉर्ड असणाऱ्या सहकारी बँकेत करणे गुंतवणूक दारांना अधिक सुरक्षित करते. याशिवाय, काही ठेव योजना करसवलत देतात. जेष्ठ नागरिकाना मुदत ठेवीत सुरक्षिततेसह जास्त व्याजाचा लाभ मिळतो. या ठेवींवर विमा संरक्षणही असते.
*पोष्टातल्या ठेवी आणि गुंतवणूक-
       पोष्टामध्ये आपण बचत खाते उघडू शकतो, तसेच बचत प्रमाणपत्रांच्या रुपात मुदत ठेवीही ठेवू शकतो. पोष्टातल्या सर्व ठेवीमध्ये निश्चित परतावा मिळतो व ठेवी सुरक्षित राहतात


*जीवन विमा-आरोग्य विमा-सर्वसाधारण सुरक्षा विमा-वाहन विमा इ.--
       वास्तविक या ठिकाणी मी पैसे गुंतवणूकीविषयी सांगतोय. विमा हा विषय बचत किंवा गुंतवणूकीशी संबंधित नाही. तरीही बरेच जण विम्याकडे ‘चांगली गुंतवणूक’ म्हणून बघतात. हा निव्वळ गैरसमज आहे.
       आपल्यानंतर, आपले वारस व कुटुंब आर्थिक अस्थिर होऊ नये म्हणून जीवन विमा असतो. आजारपणात आपली व कुटुंबाची आर्थिक चणचण होऊ नये, म्हणून आरोग्य विमा संरक्षण देतो. आपले घर, मौल्यवान वस्तू, इत्यादीच्या सुरक्षेसाठी विमा घेता येतो. वाहन विमा मात्र बंधनकारक असतो.
       या सर्व ठिकाणी सुरक्षा महत्वाची असते, परतावा मिळत नाही, पण झालेले  आर्थिक नुकसान करारानुसार भरून मिळते.
       जीवनविमा पॉलिसीज मुदतपूर्तीनंतर किंवा आधीही (विशिष्ट पॉलीसी नुसार) परतावा स्वरूपात बोनससह देय रक्कम पॉलिसीधारकाला किंवा वारसाला देतात. म्हणून आपण आपल्या जीवाच्या सुरक्षेसाठी विमा घेणे अत्यंत आवश्यक ठरत. विमा गुंतवणूकीतील मिळणारा नफा इतर गुंतवणूकींच्या तुलनेत कमी असला तरी विम्यामुळे सुरक्षा मिळते.      
अर्थ-गुंतवणूकविषयी ज्ञान वाढण्यासाठी—
                आपण सामान्य गुंतवणूकदार आहोत. त्यामुळे आपण योग्य गुंतवणुकीसाठी सल्लागार नेमणे उत्तम.  परंतु त्या सल्लागाराची/कंपनीची फी अदा करावी लागते. मात्र ती अनाठायी जात नाही.  अशा सल्लागार-कन्सल्टंटचा या क्षेत्रात चांगला अभ्यास असतो. तो आपल्या कामी येतो.
                 आपण स्वतःसुद्दा जागरूक राहून अर्थसाक्षर होऊ शकतो, यासाठी आपण मुळात काय करायला हवे बरं ? आपण आठवड्यातून एकदा-दोनदा वर्तमानपत्रांमध्ये येणारे ‘अर्थ’विषयक लेख-लिखाण बारकाईने वाचावयास हवेत. त्यातील माहिती-घडामोडी, आढाव्यांसह असते, ती वेचून घ्यावी.
                 मराठीत दोन, तर इंग्रजीत एक वर्तमानपत्र छान माहिती देते-लोकसत्ता, सकाळ अन इकॉनॉमिक टाइम्स. त्यातील सामान्य गुंतवणूकदारांना अत्यंत उपयोगी ठरणारे लेख आपल्याला दररोज अर्थज्ञान देतात. विशेष उल्लेखनीय शेअर्स, चांगले म्युच्युअल फन्डस, बँकेतील सुरक्षित ठेवी आयुर्विमा-आरोग्य विमा, कमोडिटी मार्केट, कर रचना व सवलती इ. भरपूर माहिती आपल्याला अध्ययावत करीत राहाते. तेव्हा हे वाचनज्ञान तुम्ही जरूर मिळवावे.
        गुंतवणूक करणाऱ्या व करू पाहणाऱ्या सर्व वाचक स्नेह्यांना मी सारांशाने एवढेच सांगेन, की आयुष्यात चढ-उतार प्रत्येकास अनुभवाला येतात, अशा वेळी चार पैसे गाठीशी असले तर, अन त्यातही चांगली गुंतवणूक केली असेल, तर आपण सुरक्षितपणे आपली व आपल्या कुटुंबाची पुढे यशस्वी वाटचाल करू शकतो.
                  पाण्याचा एवढासा थेंब बहुमोल असतो. पण त्याकडे दुर्लक्ष केले तर ? तर तो थेंब दुसऱ्या थेंबाला घेऊन प्रवाही पाण्यात मिसळून पुढे निघून जातो. ते थेंब स्वीकारण्यासाठी आपला हात घट्ट करून उघडला, तर थेंब थेंब पाण्याने आपली ओंजळ भरू लागते ! या ओंजळीतले पाणी व्यवस्थित ठेवता येते  आणि साठवुन  वापरताही येते, नाही का ?          

                                                                        :::::::::::::::::::::::::::

💐मनातलं जनात💐

💐मनातलं जनात💐
            या जगात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात या ना त्या कारणाने, पोलीसांशी आणि कोर्टाशी एकदा तरी संबंध येतो. समाजात कायदा तसेच शांतता अखंडित ठेवण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे पोलीस खाते आणि जनतेला विश्वासाने न्याय देऊन अपराध्याला शिक्षा देणारे कोर्ट, या दोन प्रभावी यंत्रणा समाजजीवनात अत्यावश्यक आहेत.
                मात्र आज, पोलीस म्हटले की सामान्य माणसाच्या मनात कारण नसताना धडकी बसते ! आणि कुठल्याही कारणासाठी कोर्टाची पायरी चढायची वेळ आली,  तरी त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागते !
                वास्तविक असे व्हायला नकोय.  मला आयुष्यात दोन्ही ठिकाणी या पायऱ्या चढाव्या लागल्या. त्यामुळे पोलीस आणि कोर्ट मला थोडेफार उमगलेय. काही  भलबुरे अनुभवही गाठीशी आलेत. मात्र आजही मी या दोन्ही यंत्रणांना आदरस्थानी मानतो व त्यांच्याबद्दल विश्वास बाळगून आहे.
                पोलीस स्टेशनची पायरी चढल्यानंतर वेळोवेळी कोणते अनुभव मला मिळालेत, त्यातले निवडक प्रसंग आज मी  येथे सांगत आहे…………
💐पायरी पोलीस स्टेशनची…………


            नोकरी लागण्यापूर्वी काही बेकार तरुण एकत्र येऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात एक दिवसाचे घोषणा आंदोलन करीत होते. त्यात मी बेकार म्हणून सहभागी झालो.  सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम ठरला होता. आम्हा बेकार तरुणांमधील काही मोजके कार्यकर्ते या आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. या आंदोलनात पोलिसांनी सगळ्यांना पोलीस व्हॅन मध्ये टाकले आणि पोलीस ठाण्यात आणले. आयुष्यात हा पहिला प्रसंग ! ग्रुपमधील इतरांच्या देखील हा पहिलाच प्रसंग असावा. पोलीस स्टेशनची पायरी पहिल्यांदा अशी चढलो !
               ठाणे अंमलदारांसमोर सर्वाना हजर करण्यात आल्यानंतर साहेबांनी चौफेर नजर फिरवीत आमच्यावर शेरेबाजी केली ! ते शब्द आता इतक्या वर्षानंतर नीटसे आठवत नाहीत, पण सगळेच त्यावेळी हबकून गेले होते.
             नंतर मात्र त्या साहेबाने आम्हाला चांगली वागणूक दिली. कोणा इन्स्पेक्टरला ‘या सर्वांची लिस्ट करा, नीट माहिती घ्या , ‘ अशी सूचना त्यांनी केली.
                  सगळ्यांचा आता दिवसभर मुक्काम तेथे होता. त्यानंतर काय करतील ? ही धाकधूकही मनात होती. साहेबांनी सगळ्यांना चहा आणि वडापाव मागविला ! आता आम्ही बरेच सावरलो. एकमेकांना धीर देत राहिलो.
                 आमचे नेते दुसऱ्या साहेबाबरोबर सरकारी अधिकाऱ्यांची भेट घ्यायला गेले. सायंकाळच्या सुमाराला ते हसतमुख मुद्रेने पोलिसांबरोबर परतले. आपल्याला आता धास्ती नाही बरं का ! ‘आपल्या मागण्या त्यांनी ऐकल्यात, सर्व म्हणणे त्यांनी मान्य देखील केलेय. नवीन नियुक्तीचा आदेश शासन काढेल. ‘ असे सांगून छोटेखानी भाषण त्या पोलीस स्टेशनमध्येच करून नेत्यांनी सर्वाना आश्वस्त केले !
                मोठया साहेबांची आमच्या नेत्यांनी भेट घेतली. एका पोलिसाने सर्वांची सही एका रजिस्टर मध्ये घेतली, आणि ‘निघा आता’, असे फर्मान साहेबांनी सर्वांना सोडले ! अत्यानंदांत आणि विजयी मुद्रेने प्रत्येक जण तेथून निघाला !
               पोलिसांशी दुसऱ्यांदा संबंध आला तो एका जुन्या माहितीची दाखला प्रत घेण्यासाठी.   संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन माहिती करून घेतली. तसा अर्ज करायला मला सांगण्यात आले. मग  अर्ज नेऊन दिला. महिन्यानंतर यायला सांगितले.  ‘जरा लवकर हवी होती’, अशी विनंती केल्यानंतर  मात्र,  ‘ठीक आहे. या दहा दिवसांनी’ , असा दिलासा मिळाला ! दहा दिवसांनी गेल्यानंतर कागदपत्रं मिळाली.
              एकदा मुलाचे पाकीट बसमधून कुठे गहाळ झाले, तेव्हा बसचा दुसरा पास व शाळेचे ओळखपत्र मिळविण्यासाठी पोलिस स्टेशनचा दाखला आवश्यक होता.  मग मुलालाच घेऊन गेलो तेथे.  ड्युटी ऑफिसरने मुलाला न्याहाळत काही प्रश्न विचारले, काही मला विचारले. सारी माहिती आम्ही दिल्यावर साहेबाने एका हवालदाराला बोलावून घेतले आणि तसा दाखला द्यायला सांगितले. नंतर व्यवस्थित घटना लिहून हवालदाराने ती एका वहीत नोंदविली आणि दाखला प्रत साहेबाची सही घेऊन आम्हाला दिली.
             उपगरात राहणारा जवळचा   एक  नातेवाईक संकटात सापडला होता. त्याची तक्रार आली होती पोलीस स्टेशनला. बिचारे सगळे  कुटुंब घाबरले होते !  किरकोळ विषयावरून गैरसमजुतीपोटी कुठलातरी वाद घडला  होता  शेजाऱ्याशी ! मग सगळी माहिती घेतली. त्या  कुटुंबास धीर दिला  आणि त्या नातेवाईकास घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला गेलो. एक साहेब ओळखीचे होते. सगळी हकीकत ऐकल्यावर त्यांनी तसा लेखी जबाब माझ्या नातेवाईकाकडून लिहून घेतला  आणि
‘असे पुन्हा होऊ देऊ नका, ‘ असे प्रेमळ भाषेत सांगून सामोपचाराने शेजाऱ्यांशी वागायची सूचना केली. नंतर ते प्रकरण मिटले.
                  सोसायटी मध्ये चांगले काम करूनही दुष्ट गुंड प्रवृत्तीचे रहिवाशी एखादया वयोवृद माणसाला आणि चांगल्या रहिवाशांना कसे सतावतात व रीतसर तक्रार करूनदेखील काही पोलीस अधिकारी अर्धी बाजू जी चुकीची आणि खोटी असते, ती ऐकून तक्रारदारास किती मनःस्ताप देतात, ती घटना येथे सांगायला हवी,  कारण याचा त्रास माझ्यासह इतरांना झालाय.
                यातील  वाईट गोष्ट म्हणजे, त्या गुंड प्रवृत्तीच्या रहिवाशांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने आमची खिल्ली उडवीत आम्हाला अपमानास्पद वागणूक दिलीय. हे सविस्तर सांगतो-
                पोलीस स्टेशनने या प्रकरणाच्या संबंधित तक्रारीस उत्तर म्हणून एक लेखी पत्र हवालादाराकरवी पाठविल्या नंतर आम्ही तीघेही चौकशी अधिकाऱ्याची ड्युटी वेळ विचारून भेटायला गेलो, तर हे अधिकारी महाशय आमची खिल्ली उडवीत म्हणाले, ‘ तुम्ही रिटायर्ड मंडळी काम नाही, म्हणून अशा तक्रारी करीत बसता काय ?  रिकाम्या डोक्याला काही कामधंदा नसतो. तसे तुम्हा म्हाताऱ्यांचे झालेय.  तुमचे रिकामे डोके कुठे चांगल्या कामासाठी वापरा की ‘,
                लगेच डोक्यात प्रकाश पडला- त्या गुंड प्रवृत्तीच्या रहिवाशांचे आणि या अधिकाऱ्याचे काहीतरी संगनमत निश्चितच झाले असणार ! त्याशिवाय हा अधिकारी आपल्याला अशी खालच्या पातळीची वागणूक कसा देईल ?
            अधिकाऱ्याची ही शेरेबाजी व  अपमान ऐकणे सहनशक्ती पलीकडचे होते. एकतर या अधिकाऱ्याने अजून आम्हाला पुरते बोलून दिले नव्हते. आमचा दाखल अर्जही बाहेर काढला नव्हता.
             मात्र आपण आता पोलीस स्टेशनमध्ये आहोत, याचे भान ठेवत, अतिशय संयम ठेवीत आम्ही अदबीने पुन्हा पुन्हा, ‘साहेब, अहो आमचे म्हणणे आधी नीट ऐकून तरी घ्या  ‘,  असे त्यांना सांगून पाहिले.  तो निर्बुद्द अधिकारी ढिम्म आमचे ऐकत  नव्हता !
           ‘अहो साहेब, आमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसांची चेष्टा मस्करी-टिंगल करणारे टपोरे गिरी करणारे रहिवाशी आहेत ते.  तुम्ही निदान त्यांची चौकशी तर करा. समोरासमोर विचारा ना त्यांना बोलावून……?.’ हे आमचे शब्द देखील त्या दगड अधिकाऱ्याने उडवून लावले ! तो  स्पष्टपणे म्हणाला- ‘ ही असली सिव्हिल मॅटर्स सोडवायला पोलिसांना बिलकुल वेळ नाही. तुम्ही निघा आता.’
              पुन्हा आम्ही विनवणी केली-    ‘ अहो साहेब, पुढे काही गंभीर घटना घडू नये, म्हणून तुमच्याकडे तक्रार केलीय आम्ही…....’ आमची ही विनंतीदेखील त्याने सरळ उडवून लावली. वर म्हणाला, ‘ आपसात मिटवा की,  नाही तर कोर्टात जावा….हवं तर मी तसे पत्र देतो तुम्हाला. ‘ पुढे बोलण्यात शहाणपणा नव्हता.
             खरेतर, याच अधिकाऱ्याची आता तक्रार करायला हवी होती. पण याक्षणी सबुरी घेणे योग्य होते.  म्हणून त्याचे पत्र घेण्याचा आग्रह आम्ही धरला. तेव्हा त्या अधिकाऱ्याने त्याची इतर कामे आधी केली. नंतर चार ओळींचे पत्र लिहून, त्याची कुठे नोंदणी वगैरे काहीही न करता झेरॉक्स आणायला सांगितली. मूळ कॉपी स्वतःकडे ठेवून झेरॉक्स प्रत त्याने आम्हाला दिली.              
              ती कॉपी व आमचा तक्रार अर्ज घेऊन दोन दिवसातच आम्ही एका उच्च अधिकाऱ्याच्या कानी ही घटना घातली. त्या भल्या साहेबानी आम्हाला निर्धास्त राहाण्यास सांगितले, आणि, ‘ काळजी नका करू.  मी बघतो पुढे काय करायचे ते. ‘ असे सांगून दिलासा दिला.
              मात्र काही दिवसातच कुठल्या तरी क्षुल्लक विषयावरून इमारतीत वाद झाला व आमच्या वृद्द सहकाऱ्याच्या अंगावर धावून जाण्याची दुर्दैवी घटना घडली ! गुंड प्रवृत्तीच्या त्या तरुण रहिवाशांच्या दादागिरीमुळे सोडवायला पुढे येणार कोण ?
              मी घरच्या वाटेवर असताना हा प्रकार मला कळविण्यात आला. लगबगीने मी इमारतीमध्ये पोहचलो. ही गर्दी झालेली ! एक जण आमच्या सहकाऱ्याभोवती घिरट्या घालीत त्यांना झापित होता.  मी त्याला शांत भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुसरा एकजण माझ्याच अंगावर धावून येऊन मला शिवीगाळी करू लागला ! एवढ्यात कोणीतरी त्याला आवरले. चीड आणणारी गोष्ट म्हणजे,  इमारतीमधील बरेच रहिवाशी गंमत बघायला म्हणून भवती गोळा झाले होते ! या लोकांची खरी ओळख मला त्या दिवशी झाली.  या वाईट प्रसंगात एकाने ‘लोकलज्जेस्तव’ पुढे होवून हल्लेखोरांना आवरण्याचा प्रयत्न केला. गंमत म्हणजे हा त्यांचा हितचिंतक निघाला !
            आता ही गुंड माणसं पोलिसांशिवाय कोणाचे ऐकणार नाहीत  हे माझ्या लक्षात आले.  ‘आता पोलिसांना बोलावतो’ म्हटल्यावर मात्र सगळ्यांची पांगापांग सुरू झाली.लगेच शंभर नंबरला  फोन फिरवला आणि पोलिसांना ही घटना सांगितली. तातडीने येण्याची विनंतीही केली.
           पोलीस व्हॅन तात्काळ आली. पोलिसांनी लगेच जुजबी चौकशी सुरू केली. मघाशी पांगलेले  बहुसंख्य रहिवाशी हाताच्या घड्या घालून पुन्हा गंमत पाहू लागले !  कुठली माहिती सांगायला मात्र ते पुढे येईनात ! मग  जे घडलंय त्याची माहिती आम्हीच पोलिसांना दिली.
      यावेळी देखील पोलीसांच्या पुढ्यात त्या गुंड लोकांचा आवाज कमी होत नव्हता. जोरदार दम एका अधिकाऱ्याने दिल्यावर मात्र चुळबूळ करीत ते थोडावेळ गप्प झाले.
             आमच्या वृद्ध सहकाऱ्याना याचा मानसिक धक्का बसला होता. वरवर ते ‘ठीक आहे मी…’, म्हणत राहिले. मी थोडा विचार केला आणि पोलिसांना विनंती केली- ‘ उद्या सकाळी येतो आम्ही यांना घेऊन पोलीस स्टेशनला,आता त्यांना नेणे योग्य नाही.’ पोलिसांनी ही परिस्थिती पाहिली व ‘उद्या सकाळी पोलीस स्टेशनला या’, अशी सूचना दोन्ही पक्षांना केली.
             दुसऱ्या दिवशी सकाळीच पोलीस स्टेशनला इतर सहकाऱ्यांसह जाऊन ड्युटी ऑफिसरपुढे काय काय घडले, ते आमच्या सहकाऱ्यानी व्यवस्थित सांगितले.   ‘त्या’ रहिवाशांना देखील बोलावण्यात आले असल्याने ते गोतावळ्यासह हजर झाले होते. आता त्यांना सामोपचार करायची बुद्दी झाली होती !
           आम्ही तक्रार नोंदविण्याचा आग्रह धरला.  ड्युटी ऑफिसरच्या सूचनेप्रमाणे एक महिला पोलीस अधिकारी जाब-जबाब घेवू लागली. तीच्या पुढ्यात त्यातल्या एकाने आगाऊपणा सुरू केल्यावर तीने त्याला जोरदार खडसावले ! नंतर तो गप्प राहिला.
           या दुर्दैवी प्रकरणात अजून एक माहिती सांगायची राहिलीय. आमची खिल्ली उडवून आमचे अगोदरचे तक्रार प्रकरण गुंडाळणारा अधिकारी त्यावेळीपोलीस स्टेशनमध्ये ड्यूटीवर होता. मात्र त्याने त्या टोळक्याला जवळ केले नाही, व आमच्याही नजरेला नजर दिली नाही ! तो टाळू लागला आम्हाला. कारण, वरिष्ठ कार्यालयाकडून त्याला चांगला दट्ट्या बसलेला असणार !
            सध्या ते गुंड रहिवाशी शांत बसलेत. कदाचित, आम्ही पोलीस स्टेशनला केलेली दुसरी तक्रार त्यांना अडचणीत आणेल, किंवा ‘त्यांच्या’ साहेबाला वरिष्ठांकडून मिळालेला दट्ट्या, या दोन कारणांमुळे ते शांत बसले असतील.
           पोलिस स्टेशनची पायरी चढण्याच्या आणखीही घटना आहेत. परंतु या ठिकाणी मला
सामान्य माणूस आणि पोलीस,  यांच्यात असलेल्या नात्याबद्दलचे ‘वास्तव’ पैलू उलगडून
दाखवाचा प्रयत्न केलेला आहे.
            अजून एक प्रसंग सांगतो- एक   घरगूती वाद   होता. त्याची तड लागेना, म्हणून पोलिसात लेखी तक्रार केली. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी  बोलावणे पाठविले.
                   विभागातील पोलीस चौकीमध्ये  ड्यूटी ऑफिसरपुढे दोघेही हजर झाल्यावर त्याने समोरच्याला चांगल्या भाषेत खडसावले, तेव्हा, ‘ यापुढे सहकार्य करीन ‘असे स्पष्ट आश्वासन मला मिळाले. हा पोलिसांचा प्रभाव !  त्यानंतर सामोपचाराने वाद मिटला.
                   वास्तविक घरगूती वाद असोत, की परिसरात कुठले किरकोळ मतभेद उद्भवल्याने होणारी भांडणे असोत, पोलिसांचा हस्तक्षेप झाला की  नक्की उपयोग होतो. बहुधा सामंजस्यच होते. अशा प्रकरणांत  खबरदारी म्हणून पोलिसांकडे लेखी तक्रार करणे जरुरीचे ठरते.
                  पोलीस खाते मात्र गंभीर गुन्हेगारी रोखणे व आपल्या कार्यक्षेत्र-परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, या कामात सदैव मग्न असतात. पोलिसांना कामाचा मोठा ताण असतो. धोका पत्करून आपले कर्तव्य बजावावे लागते, हे सर्वमान्य आहे.
                 पोलिसांचे  हे सारे ताणतणाव-जबाबदाऱ्या विचारात घेतल्या, तरी  सर्वसामान्य माणसांना संकटात असताना पोलिसांचा मोठा आधार वाटतो,  ही बाब देखील विचारात घ्यायला हवी. म्हणून किरकोळ वाद-भांडणे, केवळ ती वैयक्तिक आहेत, कौटुंबिक आहेत, सिव्हिल मॅटर्स आहेत, किंवा परिसरातील किरकोळ घटना आहेत, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष होऊ नये. त्यासाठी पोलीसांनी वेळ द्यावा. प्राप्त तक्रार प्रकरणाची नीट शहानिशा करावी. यात योग्य-अयोग्य कोण  आहे ? याचे प्रामाणिकपणे निरीक्षण व्हावे. मग योग्य कार्यवाही करावी, तरच, ‘सिव्हिल मॅटर्स’सारखे विवाद किंवा भांडणे कायमची मिटतील. नंतर कोणत्याही गंभीर प्रसंगाला सामोरे  जाण्याची वेळ सर्वसामान्य निरपराध माणसांवर येणार नाही.

                                                          :::::::::::::::::::::::::::::::