Tuesday, 1 May 2018

🌹लक्षवेधी🌹

🌹लक्षवेधी🌹......................      
                             
                    💐 तेंन्सिंग  नोर्गे-------लाजरा बुजरा एव्हरेस्ट वीर.........

                  (या लेखा विषयी---जगातल्या सर्वोच्च  अशा एव्हरेस्ट हिमशिखरावर भारताचे पहिले पाऊल शेर्पा तेंन्सिंगच्या रूपात पडले. तो दिवस होता २९ मे १९५३ ! तेंन्सिंग जगन्मान्य गिर्यारोहक झाला. त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू  यांनी  या विजयाची प्रेरणा घेऊन दार्जिलिंग(प.बंगाल) )       येथे हिमालयीन मौंटेनिअरिंग इन्स्टिट्युट(H.M.I.) ची स्थापना केली व भारतभरात असणाऱ्या साहसी गिरिप्रेमींना तेंन्सिंग नोर्गेच्या नेतृत्वाखाली शास्त्रशुद्ध  गिर्यारोहणाचे प्रशिक्षण मिळण्याची संधी  प्राप्त  झाली.
                मला सुद्दा १९८६ मध्ये या संस्थेत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर खुद्द  तेंझिंग नोर्गेच्या उपस्थितीत मेडल मिळाले.
               अशा या सुप्रसिद्ध  संस्थेला आपण जरूर भेट द्या.  दार्जिलिंग येथील निसर्गसुंदर  परिसरात वसलेल्या एच.एम.आय. चे प्रांगण आपल्याला भुरळ घालेल. तेथली लायब्ररी आणि म्युझिअम देखील छान आहे. याच संस्थेच्या जर्नल मधील(H.M.I.Journal vol.16/1985-86) सर एडमंड हिलरी(एव्हरेस्ट वर पहिले पाऊल ठेवणारा शूरवीर) यांनी तेंझिंगच्या  गौरवार्थ लिहिलेला इंग्रजीतील लेख मी  मराठीत शब्दबद्द केलाय.
               आणखी एक, एव्हरेस्टवर मराठी पाऊल(नागरी मोहिम) १९९८ च्या ' मे ' महिन्यात साहसवीर सुरेंद्र चव्हाणच्या रूपात पडले. या ऐतेहासिक गिर्यारोहण मोहिमेचे नेतृत्व होते ऋषिकेश यादवकडे. त्या आठवणीमुळे हा लेख तुमच्यासाठी....)
                 तो जयजयकार अजुन माझ्या कानात घुमतोय. एव्हरेस्टच्या यशानंतर काठमांडूहुन परतताना माझ्या कानावर हजारोंच्या मुखातुन ते शब्द येत होते--तेंझिंग नोर्गे झिंदाबाद,तेनसिंग नोर्गे जिंदाबाद !
            तेंझिंग एक विशेष व्यक्ती म्हणुन परतत होता.तो एक इंटरनॅशनल हिरो बनला होता !
         १९५३ पूर्वी याची कधी भेट झाली नव्हती. त्याच्याविषयी फक्त ऐकून होतो.परिचयानंतर ही व्यक्ती मला वेगळी वाटली.उंचीने थोडा मोठा आणि सदा हसतमुख.त्याने आपल्या सहकाऱ्यांना पण तसेच घडवलेय.
         कठीण चढाईच्या वेळी आपले कैाशल्य पणाला लावणे हे तेंझिंगचे वैशिष्टय !
१९५० पर्यंतच्या शेर्पांबाबत बोलायचे झाले तर मी म्हणेन--ते उत्कृष्ट शेर्पा होते.त्यांचेकडे अनुभव होता.ताकद होती.आपली सारी कामे प्रामाणिकपणे करून मोहिमेला यश मिळवुन द्यायचे हे एकच त्यांचे ध्येय होते. मात्र शिखरावर आपलेदेखील पाऊल पडावे यात शेर्पांना रस नव्हता.
          अर्थात तेंझिंगबाबत हे म्हणता येणार नाही.मोहिमेतली सर्व कामे करून स्वतः देखील शिखर सर करायचे अशी त्याची जिद्द होती. या जिद्दीपायीच तो एव्हरेस्टवर पोहोचला आणि जगप्रसिद्द गिर्यारोहक झाला.
          तेंझिंग भित्रा नव्हता. कितीतरी अपघात व मृत्यू त्याने जवळून अनुभवलेत.पण याच धाडसी व्यक्तीला मी एकदा भ्यालेले पाह्यलंय ! एव्हरेस्ट मोहीम आटोपली आणि आम्ही विमानाने दिल्लीला निघालो.आमचे मोठे स्वागत दिल्लीत होणार होते.
          एअरपोर्टवर लोकांची ही भाऊगर्दी! सारेजण तेंझिंगचा शोध घेत होते.तो दिसला आणि सारेजण ओरडले--तेंझिंग, तेंझिंग !.लोकांचा जमाव कुंपण तोडून जवळ येऊ लागला आणि तेंझिंगची पाचावर धारण बसली ! लोक आनंदाच्या आवेशात जवळ येत होते.पण तेंझिंग गांगरून गेला होता. हे सारे पाहून मला आश्चर्य वाटले.पण तेंझिंगची ही अवस्था समजण्याजोगी होती.
          आज तेंझिंग आणि एच.एम.आय(Himalayin Mountaineering Institute-Darjeeling,W.Bengal) भारतातील तरुणवर्गाची प्रेरणा बनली आहे.देशाच्या कानाकोपऱ्यात आता साहसप्रेमी तरुण-तरुणी आणि त्यांच्या संस्था दिसू लागल्यात. या क्षेत्रात स्वतःचे कौशल्य पणाला लावायला ही मंडळी उत्सुक आहेत.
          यांच्यात हा उत्साह निर्माण करण्याचा मान शेवटी तेंझिंगकडे जातो.आज तेंझिंग साऱ्या जगात प्रसिद्द झालाय.भारतात तर त्याला देवासारखा मान मिळतोय.
          मला खात्री आहे,' तेंझिंग ' कधीच विसरला जाणार नाही.
         
                              ------------------------  
                                              प्रतिक्रियेसाठी--yescharudatta@gmail.com
                               
                                            

🌺भटकंती मनसोक्त🌺

🌺भटकंती मनसोक्त🌺.................
                               निसर्ग प्रेमी मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला फिरायला, भटकायला आवडते ना ?
                 फिरणे-भटकण्याची आवड ज्याला नाही तो या छान व सुंदर आयुष्यातील महत्वाचे आनंदी क्षण घालवून बसलाय, असे माझे ठाम मत आहे.
                 तर, असे फिरताना मिळणारा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे.मात्र हा आनंद घेताना आपण किती सावध असायला हवे, याबद्दल मला काही सांगायचंय..............💐मनसोक्त फिरा, पण...........
         
                         आपल्या अवती भवती असंख्य पर्यटन संस्था कार्यरत असतात. त्यातील मान्यवर व चांगली सेवा देणाऱ्या संस्था पर्यटकांची नीट काळजी घेतात. इतरांचे काय ? शिवाय अलीकडे महागडी रक्कम तिकडे देण्यापेक्षा स्वतंत्र ग्रुपनेे फिरून पर्यटन करावे  असें मानणारा मोठा वर्ग आपल्यात आहे. त्यात नियोजनाची जबाबदारी व ताण असला तरी वेगळ्या  अनुभवातून गैरसोयींना सामोरे जाताना आणि त्या सोडविताना आपला  आत्मविश्वास वाढतो. वेळापत्रकाचे बंधन नसते. नीट नियोजन करून कमी पैशात जास्त भटकंती होते. स्वतंत्रपणे केलेल्या प्रवासाचा आनंदही मिळतो.आकस्मिक अडचणींना सामोरे जाण्यात एक वेगळेच थ्रिल असते, नाही का ?
                   अापण आपल्याला समजायला लागल्यापासून शाळा कॉलेज, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आणि नंतर निवृत्तीमध्ये फिरत भटकत असतो. यातून निरनिराळे अनुभव मिळत जातात. आपण घरातून बाहेर पडल्यावर आपली नेहेमीची हद्द ओलांडल्यानंतर म्हणजेच गाव,शहर,राज्य,आपला देश यांच्या सीमा ओलांडल्यानंतर प्रवासात आपली नजर नीट उघडी ठेवावी. थोडेही गाफील राहू नये. नाहीतर गोत्यात येऊन आपल्यासह इतरांचेही नुकसान होईल.

्प्रवासाला निघाल तेव्हा सोबत काय घ्याल ?
             जेवढी जास्त ठिकाणे करीत असाल तेवढा अधिक कालावधी तुम्हाला लागेल. त्या दृष्टीने तुम्ही सामान घ्यावे. अंथरून-पांघरून, कपडे आवश्यक तेवढेच घ्यावेत. लिखाणाची, नोंद ठेवण्याची आवड  असल्यास पेन,पेन्सील वही/डायरी हवी.कॅमेरा प्रवासात महत्वाचा सोबती असतो. पण तूम्हाला फोटो काढता येत नसतील तर ? गृपमधल्या इतरांची अथवा नवीन परिचितांची अशावेळी मदत घ्या. लक्षात ठेवा,आपण पाहिलेले प्रत्यक्ष स्थळ ही कायम आठवण म्हणून निर्मिती करण्याचे काम तुमचा कॅमेरा करीत असतो. म्हणून तो हवा.

औषधे.---
               आपण निरोगी आहोत असे म्हटले, तरी एकदा घराबाहेर पडलो की तेलाची पोळी,तुपातील जेवण, आवडती चटणी-लोणचे-मुरंबा-जॅम/सॅास सगळीकडेच थोडे मिळणार ? मग कधी आपल्याला अपचन होते. तोंडाची चव जाते. बदलते हवामान, प्रवासाची दगदग, अनियमितपणा, वेगवेगळ्या  तेलतुपातली(किंवा त्याशिवाय)  जेवणं, अस्वच्छ वातावरण, झोप न मिळणे, या साऱ्यांमुळे आपण अस्वस्थ होत राहातो. तशात तब्येत बिघडली की प्रवास अर्ध्यावर सोडायची पाळी येते. उपचारासाठी डाँक्टर्स, दवाखाने/हॉस्पिटल्स शोधावे लागतात. ते उपलब्ध झाले तरी अपरिचित असतात. मात्र त्यांनी केलेले उपचार स्वीकारावे लागतात. या साऱ्याचा परिणाम इतर सहप्रवाशांवर होतो आणि प्रवासात बाधा येते.
            हे टाळण्यासाठी प्रवासापूर्वी खबरदारी घायला हवीय.  त्याकरीता काय  कराल ?

            अापण निरोगी असलात तरी सर्वसाधारण प्रवासात लागणारी औषधे जवळ ठेवा. त्यासाठी तुमचे फ़ॅमिली डॉक्टर्स तुम्हाला गाईड करतील. पण तुम्ही अगोदर कोठल्या आजारपणातून बरे झाले असाल, कोठले ऑपरेशन झालेले असेल, रक्तदाब, -हदयविकाराचे किंवा आणखी कोणते उपचार सुरू असतील आणि तरीही तुमच्यावर प्रवास करण्याची पाळी आलीय अथवा इतरांच्या आग्रहामुळे तुम्ही प्रवासास जाणार असाल तर नीट विचार करून निघा. तुमच्या तज्ञ डॉक्टर्सचा विचार घ्या. त्यांनी सल्ला दिल्यावर निघा. नेहेमीची औषधेे, इंजेक्शन्स शिरींजसह जवळ ठेवा. ती संपण्यापूर्वी खरेदी करून ठेवा. त्यांचे डोस वेळेवर घेत जा. सहप्रवाशाना त्याची माहिती अवश्य  ध्या. प्रवासातील खाण्यावर नियंत्रण ठेवा.

प्रवासातील विश्रांती आणि झोप:-
              आपल्या भटकंतीत स्वतःच्या शरीराला नीट विश्रांती अन झोप अत्यंत जरुरीची असते. परंतु रेल्वे/बस/विमान/छोटे मोठे वाहन,त्यातल्या गैरसोयी, म्हणजेच तांत्रिक बिघाड,प्रवासात मिळणारे सिग्नल्स,ट्रॅफिक। जॅम, खराब हवामान, स्थानिक आंदोलने,अशा कितीतरी अडचणी सारख्या व्यत्यय आणीत असतात. अशा वेळी तुम्ही विश्रांती तरी किती व कशी घेणार ?
                घरी असताना नियमितपणे  रात्रीची  निवांत झोप मिळते. काहींना दुपारी वामकुक्षी करायला मिळते. प्रवासात मात्र हे सारखे शक्य नसते. वाहनातून होणाऱ्या प्रवासात आरामदायी सीट मिळाली तरी तासनतास बसून राहणे अवघड असते. रेल्वेत बर्थवर हवे तसे पसरता येते.शिवाय सर्वत्र फिरता येते. पण सर्व ठिकाणी रेल्वेचा प्रवास शक्य नसतो. तेव्हा तुम्ही अशा स्थितीत मिळेल तेवढी विश्रांती व झोप घ्या, आणि संधी मिळाली तर पाय मोकळे करण्यासाठी थोडे चाला-फिरा. त्यामुळे तुम्ही प्रवासात फ्रेश राहाल.
 
स्वतःच्या वाहनातून फिराल तेव्हा :-
              आपले स्वतःचे वाहन आणि ग्रुपमधील इतरांचे वाहन अथवा भाड्याने घेतलेले वाहन प्रवासासाठी घ्यायचे ठरविलेत तर ते वाहन तंदूरस्त म्हणजे चांगल्या स्थितीतील हवे. त्याचा चालक व सहाय्यक अनुभवी आणि चांगला हवा. मोठा प्रवास असेल तर दोन चालक असावयास हवेत. प्रवासात त्या दोघांनाही आराम मिळतो.
             वाहन कितीही चांगले म्हटले तरी त्यात केव्हापण तांत्रिक बिघाड होतो. टायर्स कधी पंक्चर्स होतात तर कधी गाडी तापते. अतीउष्म्याने टायर फाटून अपघातही होतात. बॅटरी कमी होणे, लाईट्स जाणे,स्टारटिंग ट्रबल, पावसात आणि पहाटेच्या धुक्यामध्ये समोरचे न दिसणे, वायफर्स बिघडणे, असे किती प्रकार सांगावेत ? वाहन प्रवास या अडचणी शिवाय पार पडतच नाही. म्हणून तुम्ही प्रवासाला निघण्यापूर्वी आपले वाहन छान पैकी ' तयार ' करून घ्या.ते तपासून घ्या. जादा टायर, ट्यूब अद्ययावत करून घ्या. जॅक, प्लग-पान्हा किट/इतर टूल्स तयार ठेवा. साईड/फ्रंट/बॅकग्लास तसेच लाईट्स तपासून चालू करून,गाडीचे नीट सर्विसीग करून घ्या. फॅाग लाईट्स गाडीला हवेतच. आतील लाईट्स, स्पीकर्सदेखील हवेत. हल्ली सीटबेल्टस गाडीत असतात ते वापरा.
                एवढे झाल्यावर त्या वाहनाच्या टपावरील सामानाचे कॅरेंज/हौद व्यवस्थित करून रस्सीसह तयार ठेवावेत. लहान वाहन असेल तर त्याच्या टपावर काथ्याची जाड तयार चटई अंथरून बांधून घ्यावी. त्यामुळे उन्हाळ्यातील प्रवासात आत गारवा राहातो.मात्र अधून मधून पाण्याचा शिडकावा त्यावर व्हावा. गाडीत इंजिन ऑइल व पाण्याने भरलेले कॅन्स उपयोगी ठरतात.
               वाहनाच्या सुरक्षेसाठी लॅाक असते. पण फक्त डोअर लॅाकच नव्हे, तर पेट्रोल टाकी व टायर्ससाठीही लॅाक असावे. त्याचप्रमाणे पेट्रोल/डिझेल पुढे कुठे मिळेल, टायर्स पंक्चर्स कुठे काढले जाते, तसेच रिपेरिंग गॅरेज कोठे असेल, ही माहिती खबरदारी म्हणून अगोदरच घ्यावी.
              प्रवासात वाहनाचे पार्किंग करणे ही छोटी समस्या नव्हे ! गर्दीच्या ठिकाणी पंचाईत होते. स्थानिक व्यापारी त्याचा फायदा घेतात. प्रायव्हेट पार्किंगसाठी मोठे शुल्क द्यावे लागते. सुरक्षेची मात्र गॅरंटी नाही ! काय करणार अशा वेळी ? मग    त्यातल्या त्यात सुरक्षित व अधिकृत पार्किंगचा शोध घ्यावा. शंका नको म्हणून आपला चालक व्हॅनजवळ ठेवावा. तेही नको असल्यास सरळ काहीशा दूर अंतरावर मोकळ्या पण सुरक्षित वाटणाऱ्या। ठिकाणी वाहन पार्क करावे.


प्रवासातील निवास,मुक्काम व सुरक्षा :-
              निघण्यापूर्वी नियोजन करून मुक्कामाचे ठिकाण ठरविले असेल तर ते उत्तम. मात्र नवनवीन, आयत्यावेळी मिळणाऱ्या मुक्कामी खबरदारीने राहा. आपले ठेवलेले सामान कुलूपबंद करून ठेवा. बाहेर जाताना खोली-हॉलला स्वतःचेच टाळे लावा. बाहेरून आल्यावर अगोदर ठेवलेले सामान त्याच ठिकाणी व व्यवस्थित स्थितीत आहे का ते बघा. जोखमीच्या वस्तू येताजाता जवळच ठेवा.
            अर्थात सर्वच वेळा हे जमत नाही. मग निदान चोरट्याला संशय येणार नाही अशा सामानात महत्वाच्या वस्तू/पैसे ठेवा. वास्तविक प्रवासात जोखमीच्या वस्तू  तसेच जास्त रोख रक्कम घेऊ नये. दागदागिने तर नकोतच. ते असली नकली कसेही असले तरी चोरटे त्यावर नजर ठेवून लुटतात. पैशांच्या बाबतीत बोलायचे तर रोख रक्कमे ऐवजी डेबिट/क्रेडिट कार्ड अथवा ट्रॅव्हलर्स चेक्स बाळगावेत. ते सर्वात सुरक्षित. मात्र काही ठिकाणी एटीएम सेंटर/बॅक नसेल तर, किंवा विजेअभावी यंत्रणा बंद असली की पंचाईत होते ? अशावेळी राखीव स्वरूपात जवळ असलेली रोख रक्कम उपयोगी पडते. ती सुरक्षित सामानात विभागून ठेवावी
                  रेल्वेतील प्रवासात बॅगा, सुटकेसेस साखळीबंद करून लॅाक कराव्यात. छोटया पर्सेस, पाऊच, चांगले बंध असलेले घ्यावेत. स्टमक पाऊच चांगले बंध असलेले घ्यावेत. स्टमक पाऊच, पिट्टू सॅक सगळ्यात उत्तम. बंध/दोरी असलेला साधा पातळ छोटा पाऊच गळ्यातही टाकता येतो.

प्रवासातील खरेदी:--
              महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर फिरताना प्रत्येक ठिकाणचे वेगळे वैशिष्ट्य असते ते खरेदीचे. कुठे लाकडी कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी चांगली मिळतात तर कुठे शाली अन चादरी प्रसिद्द असतात. तांब्या-पितळी,चांदी, चिनीमातीच्या कलाकुसरीच्या वस्तू, स्पोर्टशूज,संगीत वाध्ये, लाकडी किंवा धातूच्या शिल्पवस्तू, छान कपडे आणि साड्या, दुर्मिळ व असली रुद्राक्ष,आणि-मोत्यांच्या माळा... अशा कितीतरी वस्तू " तेथेच " घ्या, असे आपल्याला निघण्यापूर्वी बरेच माहितगार सांगतात.
               हे सगळे खरेदी करायलाच हवेच. पण आपण भटकतो ते कशासाठी सांगा ? नवनवीन ठिकाणे, प्राचीन वास्तू, तीर्थक्षेत्र पाहायला जास्त   वेळ घ्यायचा, की या खरेदीसाठी बाजार पालथे घालायचे ? यावर जास्त भर दिला तर तुमचे पुढचे वेळापत्रक कोलमडते. काही ठिकाणे पाहण्यासाठी वेळेचे बंधन असते. मात्र आपण नाहक खरेदीमध्ये गुंग होऊन जातो.काही लबाड प्रवासी एजंट आपल्याला बोलून संमोहित करून टाकतात ! तेव्हा विचार करा आणि खरेदीपेक्षा स्थल दर्शनाला महत्व द्या.
               मी मुंबईकर असल्याने चतुर खरेदीदार आहे. साऱ्या दुनियेतल्या वस्तू आमच्या मुंबईत मिळतात. त्यातही बार्गेनिंग केली तर त्या स्वस्तात मिळतात. तुम्हीही चतुर राहा आणि खरेदीपेक्षा फिरण्यावर भर द्या. मात्र काही ठिकाणी मिळणाऱ्या दुर्मिळ परंतु चांगल्या वस्तू, फळे, मिठाई, जेवण,खाध्यपदार्थ यांचा अवश्य लाभ घ्या. उदा. नाशिकचे मनुका-बेदाणे, कुलू मनालीची लिची, शिर्डीतील गोड पेरू, डाळींब, रामफळे, राजस्थानची दालबाटी, घट्ट दुधातला चहा, चंदीगढचे तूप व तुपातली  मिठाई,अचार, गोव्याचे काजूगर, सावंतवाडीची लाकडाची खेळणी, सातारचे कंदी पेढे, पुण्याची बाकरवडी, सोलापुरी चादरी, ओरंगाबादची पैठणी, कोल्हापुरी साज आणि ठुशी, दार्जिलिंगचा जगप्रसिद्द पत्ती चहा, तिबेटी गालिचे, काश्मीरच्या मऊ शाली, पष्मीना, केशर, भंडारदरा-बारीमध्ये मिळणारा असली माव्याचा पेढा, सुरती साड्या, मद्रासी कॉफी, कोलकात्यामधील रसगुल्ले, बंगाली मिठाई, नागपूरकडची आंबटगोड संत्री, अंदमानातील नारळपाणी, हैद्राबादी मटण, महाबळेश्वरची  स्टॅाबेरी, किनोर-हिमांचलची सफरचंदे, नेपाळी रुद्राक्ष, अस्सल गुजराती जेवण आणि उंधियो...... ही यादी वाढतच जाईल. तुम्ही हे सगळे पहा. खरेदी करा आणि आस्वादही घ्या, पण वेळ, तब्येत आणि खिसापाकिट सांभाळून!

फोटोग्राफी:--
                 आपण पाहिलेल्या स्थळांची चिरंतन आठवण कायम संग्रही राहावी, म्हणुन प्रवासात कॅमेरा हवा. परंतु त्यासाठी बेसिक फोटोग्राफीचे  ज्ञान असणे गरजेचे आहे. प्रवासात आपण भेट दिलेले प्रत्येक स्थळ, त्याचे ऐतेहासिक/प्राचीन महत्व, जवळील परिसर, तुमचे स्वतःचे, तुमच्यासह ग्रुपचे, कधी स्थानिकांचे, असे सर्व फोटो तुम्ही अवश्य घ्या. हे करताना स्थळाचे नाव,पत्ता, फोटो व्यवस्थितपणे घ्या. हे लक्षात ठेवा की त्या स्थळापेक्षाही आपण दुय्यम आहोत. काहींना आठवण म्हणून आपले नाव पत्ता, प्रवासाची तारीख, भेट दिलेल्या  ठिकाणी लिहिण्याची, कोरण्याची  वाईट खोड असते. त्यासाठी हे प्रवासी खडू, पेन-मार्कर किंवा रंग स्वतः जवळ बाळगतात ? ही अत्यंत वाईट खोड आहे. तुम्ही तसे कधीही करू नका अन इतरानादेखील मनाई करा.    
               प्रवासात बऱ्याचदा नदीनाले, ओढे, उत्तुंग इमारती, शिल्प, प्रवेशद्वारे, कमानी,  स्तूप,   तसेच, पक्षी-प्राणी-जलचर, वेधक व्यक्ती, देवालये, इ.चे चित्रण करण्याची चांगली संधी आपल्याकडे कॅमेरा असला तर घेता येते. ही संधी तुम्ही गमावू नका.
              काही ठिकाणी तुम्हाला फोटो काढता येत नाहीत. उदा. काही देवालये, दुर्मिळ शिल्प वस्तू, शासकीय संरक्षित वास्तू, सैन्याच्या नियंत्रणाखालील परिसर. अशा ठिकाणी तुम्ही फोटॊ काढण्याचे साहस कृपा करून करू नका. नाहीतर, तुमचा कॅमेरा जप्त करण्यात येईल.
         
प्रवासातील नोंदी :--
               आपल्या प्रवासात, ग्रुपमध्ये कोणीतरी एकजण हौशी असतो, की ज्याला प्रत्येक स्थळाची, प्रसंगाची माहिती स्वतःकडे नोंदवून ठेवायची सवय असते. प्रवास करताना जमाखर्चाचे हिशेब ठेवण्याइतके हे महत्वाचे काम आहे. तेव्हा अशा हौशी सवंगड्याकडे ही जबाबदारी द्यावी. त्याचा तुमच्या संपूर्ण नियोजनात उपयोग होईल. नीट माहितीदेखील राहील. भविष्यात तुमच्याच परिचितांना त्यांचे कार्यक्रम आखताना  हे उपयुक्त ठरेल.
              नोंदी तरी कशाच्या ठेवाव्यात ? कार्यक्रमाचा दैनंदिन प्रवासमार्ग, त्याबाबतचा सर्व तपशील, मुक्कामी ठिकाणे, तेथील संपर्क क्रमांक, परिसराचे टिपण, इत्यादी.

आणि पूर्वनियोजन.....
                 प्रवासास निघण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर आपण पूर्ण कार्यक्रमाची नीट आखणी करावयास हवी. रेल्वे/बस/विमानाचे आगाऊ आरक्षण, बस/खासगी वाहन मालक/एजन्सीकडून चांगल्या वाहनांची निश्चिती, सुरक्षित मुक्कामांची खात्रीशीर माहिती, यापूर्वी जाऊन आलेल्या परिचित, अनुभवी लोकांकडून मिळविलेली माहिती, हे सगळे तुमच्या नियोजनात आवश्यक आहे.
               हल्ली खूप टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीज आहेत. त्यांचेकडे सहज चौकशी केली तरी चांगले मार्गदर्शन(पण मर्यादित)) मिळते. विविध राज्यांच्या पर्यटनसंस्था ही माहिती देण्यास तत्पर असतात. पर्यटन विशेषांक, मासिके, वर्तमानपत्रातील काही लेख, पुस्तके, यांच्या वाचनाचा देखील उपयोग करून घ्यावा. एवढे लक्षात ठेवा की, जेवढे चांगले पूर्वनियोजन कराल तेवढा तुमचा प्रवास उत्तम होईल आणि तेच पर्यटन तुम्हास  अधिक आनंद देईल.

सावधान:--
            तुम्ही तुमचा प्रवास निर्धास्तपणे करा. प्रवासात आनंदी व हसतमुख राहा. नवनव्या मित्रमैत्रिणींचे तुम्ही सवंगडी व्हा. इतरांना फिरण्यासाठी प्रोत्साहन द्या. पण तुमच्या प्रवासात सदैव सावध असा. पैसे, वस्तू, आणि तुम्ही स्वतः इतरांसह सुखरूपपणे घरपोच यायला हवेय, याचे नेहेमी भान असू द्या.
            तुम्ही म्हणाल, हे पुन्हा पुन्हा हे काय सांगताय -सावध राहा,सावध राहा म्हणून ? अशाने नवखा कोणी घाबरून नाही का जाणार ? कधी फिरण्यासाठी बाहेर पडणारच नाही तो.
            पण मला आणि इतरांना आलेले वाईट अनुभव तुम्हा कोणासही येऊ नयेत, तुम्ही सारे आनंदयात्री व्हावे, अपरिचित ठिकाणी तुम्ही संकटात सापडू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
             पैसे लुटले गेल्यानंतर परतायला आणि खायला पैसे मागणारे दाम्पत्य मी हरद्वारला पाहिलंय. शाब्दिक गैरसमजामुळे अंगावर धावून येणारा माणूस मी दार्जिलिंगजवळ अनुभवलाय. खरेदीसाठी संमोहित केल्यानंतर संपूर्ण ग्रुप कसा टेक्सटाईल इम्पोरियम मध्येच वेळ घालवतो, याची प्रचिती राजस्थानात घेतलीय. रेल्वे प्रवासात ठेवलेली किंमती सामानाची सुटकेस अवघ्या पाच मिनिटात लंपास झाल्यावर रडवेले झालेले बंगाली कुटुंब मी जलपायगुडीमध्ये बघितलेय. वस्तू विकत घेत नसाल तर ताबडतोब माझ्या समोरील जागेतून तुमची गाडी हलवा, असे धमकवणारा आळंदीकर माझ्या चांगला लक्षात राहिलाय. चपला ठेवायला भलीमोठी रांग पाहून त्या गेटपाशी ठेऊन, परतताना त्या नाहीशा झाल्यावर केवढीे पंचाईत होते ते श्रीसाईंच्या शिर्डीत अनुभवलेय. मोठ्या ग्रुपमधून हरद्वार ते दिल्लीच्या प्रवासात बसमध्ये रॅकवर ठेवलेली आमचीच बॅग शेजारच्या चोरट्या प्रवाशाने गुपचूप पळवून नेल्यानंतर आमच्यावर जी आपत्ती आली ती अजून विसरलेलो नाही.स्नान करून ओल्या वस्त्राने आणि वाहायला तेल बरोबर घेतले नाहीत तर श्री शनीच्या देवळात घेणार नाहीत-असे बेधडक खोटे बोलून भाविकांना कापणारे शिंगणापूरचे काही दुकानदार मी अनुभवलेत.
              एवढेच नव्हे, तर रेल्वेमध्ये प्रवाशांशी ओळख वाढवीत स्वतःचे खाणे-खाऊ/फळे देऊन, नंतर गुंगी आलेल्या प्रवाशांना लुटणारी टोळी पोलिसांनी पकडल्याचे वर्तमानपत्रात तुम्ही-आम्ही नेहेमी वाचतो. गर्दीमध्ये बसण्याच्या जागेवरून शाब्दिक बोलचाली होता होता चालत्या गाडीतून बाहेर ढकलण्याच्या घटनासुद्दा अवतीभवती घडलेल्या आहेत. असे अनुभव तुम्हाला येऊ नयेत. तुमची सफर निर्विघ्नपणे व आनंदमयी व्हावी अशी माझी इच्छा आहे.
           
              तेव्हा आता तुम्ही प्रवासाच्या तयारीला लागा बघू.......

ही ठिकाणी आयुष्यात एकदा तरी पहा:--
            अंदमानचे जेल, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर, कन्याकुमारी,आनंदसागर, पेरियार, बनारस, गोमुख, गंगणानी,पशुपतीनाथ,अजमेर,हल्दीघाट, हवामहल,दूधसागर,पुत्तीचेरी, हावडा ब्रिज,टायगर हिल,तिबेटीयन रिफ्युजी कॅम्प,बेल्लूर मठ,ताजमहाल, सुवर्णमंदिर,हरद्वार,ऋषिकेश, माणिकरण, इंडिया गेट,मलाना गाव,शांती निकेतन.........

आणि आपल्या महाराष्ट्रात:--
           शिवदुर्ग रायगड, पावनखिंड,सिंहगड,श्रीशंभुराजांचे तुळापूर येथील स्मृतिस्थळ, तारकर्ली बीच,चवदार तळे,जुने महाबळेश्वर,हेमलकसा-आनंदवन,भामरागड,श्रीमंत पेशव्यांचे गाव श्रीवर्धन, कोकणकडा-हरिश्चंद्रगड,शेगाव,ब्रह्मगिरी, अजिंठा, नागफणी, सिंधुदुर्ग,शनिवारवाडा,श्रीमलंगगड,कागलजवळील श्रीकाडसिद्धेश्वर मठ, चिपळूण जवळील मगर दर्शन केन्द्र, वेळासचे कासव प्रजनन केन्द्र, दापोलीचे कृषी विद्यापीठ,..........

                                       --------------------------------------------  
           

🌺वाचनछंद🌺

🌺वाचनछंद.🌺............
                       शुभ्रधवल हिमालयाच्या अंगणात वसलेल्या नेपाळच्या अंतरंगाचे चित्रमय दर्शन घडविणाऱ्या  या            वाचनीय आणि नयनरम्य  पुस्तकाविषयी...........

               
                💐पुस्तक परिचय:-
पुस्तकाचे नाव-PEOPLE WITHIN A LAND SCAPE
लेखन/छायाचित्रण-BERT WILLISON-SHIRLY BOURKE
 ्प्रकाशक-THE FOUR SHERPA TRUST, NEW PLYMOUTH (NEWZEALAND), P.O.BOX-92.

                नेपाळमधील तिलचो लेक-अन्नपूर्णा परिसराची भटकंती करण्याचा बेत न्यूझीलंड मधील न्यु प्लायमाऊथ ट्राम्पिंग क्लबने आखला. त्यानुसार १९८५ मधील ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अकरा न्यूझीलंडवाशी,दोन स्पॅनिश,नऊ शेर्पा आणि बावीस हमाल, असा सारा चमू मार्गक्रमणास निघाला.
               या हिमालयीन परिसरातील तिलचो व मेसोकाटो दरम्यान(उंची-१६,५०० फूट) झालेल्या हिमवादळाच्या तडाख्यात सारे सापडले. त्यातच एक तरुणाला उंचावरील वातावरणाचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी जवळच्या जोमसंम या ठाण्याकडे मार्गक्रमण करीत असता यातील चार शेर्पांना हिमप्रपाताने ओढून नेले.
             तीन दिवसानंतर हवामान थोडे सुधारले आणि टीममधील दोन सदस्य, एक शेर्पा, असे तिघेजण मार्ग काढीत काढीत ' ंमनांग ' या खेड्यात पोहोचले. तेथे त्यांनी अपघाताची खबर हिमालयीन रेस्क्यु असोशिएशनच्या डॉक्टर्सना दिली.
             या मोहिमेनंतर इतर सारेजण मायदेशी परतले व त्यांनी चौघांची स्मृती राहावी म्हणून ' फॉर शेर्पा ट्रस्ट ' ची स्थापना केली. ट्रस्टमध्ये जमा होणाऱ्या रक्कमेतून प्रथम अशा अपघातात सापडलेल्यांविषयी रेडिओ यंत्रणेद्वारे संदेश पोहोचविण्याचे काम करण्याची व्यवस्था असोशिएशनच्या मदतीने करायचे ठरले.
             ही रेडिओ यंत्रणा १९८७ मध्ये एचआरए-मानांग(अन्नपूर्णा परिसर) आणि ' फेरीचे '(एव्हरेस्ट परिसर) येथे उभारण्यात आली. नेपाळ नॅशनल पार्क नेटवर्क सेवेशी ही यंत्रणा जोडण्यात आली आहे.' पिपल विदिन अ लँडशेप ' हे बर्ट विल्सन व शर्ली बर्क या लेखक द्वयिनी लिहिलेले पुस्तक वाचताना प्रारंभी लिहिलेल्या घटना व प्रास्तविक आपल्याला अंतर्मुख करतात.
            या पुस्तकाचे विशेष म्हणजे नेपाळमधील लोकजीवन व समृद्ध  निसर्गाचे सप्तरंगी दर्शन ! जगप्रसिद्द हिमालयीन शिखररांगा, गरीब पण आथित्यशील श्रीमंत असलेले येथील लोक. दुर्मिळ परंतु मोहक  फुलं. यांची आपल्याला आकर्षित करतात.
           साहसी भ्रमण व गिर्यारोहण याविषयी लोकांना नेपाळमध्ये आकर्षित करून घेणाऱ्या जिम्मी रॉबर्ट्सची माहिती यात आपण वाचतो.नेपाळमधील प्रसिद्द रॉयल चितवन नॅशनल पार्क, तेथील वन्यप्राणी जीवन, सुंदर अशी पोखरा व्हॅली वैशिष्ट्यपूर्ण बांधणीची व हिरवीगार दिसणारी पोखरामधील टुमदार घरं,ही पुस्तकातील चित्रं आपले मन वेधून घेतात. हसरी अन आनंदी,निरागस चेहेऱ्याची मुलं, कलाकुसरीची जीवापाड कामं करणारे कारागीर, आगळीवेगळी पण पारंपरिकरित्या तयार केलेली मक्याच्या कणीसांची रास आणि प्राचीन असे त्रिहुली मंदिर, या साऱ्यांचे दर्शन लोभसपूर्ण आहे
              नेपाळ हिमालयाचे दर्शन तर आपल्याला पानोपानी होते. उत्तर पोखरात गॅडरुंग, दुधखोसी आणि लांगतांग व्हॅली, अन्नपूर्णा अभयारण्य परिसर, हिमकणांनी झाकलेले तुकचे गाव,एव्हरेस्ट मोहिमेचे प्रवेशद्वार म्हणून गणले गेलेले नामंचे बझार इत्यादी चित्रं म्हणजे समग्र हिमालयाचे दर्शनच जणू !
            नेपाळ हा जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू देश आहे. साहजिकच येथले लोक भाविक आहेत. प्राचीन परंपरा जपण्याचा त्यांना सोस आहे हे जाणवते.' पिपल.....' मधील मंदिरे आणि जुने शहरांचे अवशेष पाहताना.
            येथील पर्यटकांचे आकर्षण आणि तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्द असलेले मुक्तीनाथ, पशुपतीनाथ, दरबार चौकातील कृष्णमंदिर, सुवर्णद्वार, दुर्गभवानी,त्याचप्रमाणे अतिप्राचीन असे पाटण-भक्तपुर शहरांचे अवशेष पाहण्याजोगे आहेत.
हिंदूंप्रमाणेच बौद्द व तिबेटी भाविकांनी जपलेला " ओम मणी पदमे हम "(HAIL TO THE JEWEL OF THE LOTUS) हा शुभसंदेश नेपाळमधील गुंफामधुन पदोपदी आढळतो. गुंफांच्या सभोवताली उभ्या लाकडी फिरक्या बसवलेल्या असतात. त्यांवरील हा संदेश पाहत आपण ती प्रत्येक फिरकी फिरवीत प्रार्थना मंदिराला प्रदक्षिणा मारली की आपली इच्छा त्या ईश्वराला ज्ञात होते. रुसीनडो(RUNGSINDO), थ्यांगबोचे, पांगबोचे, स्वयंभुनाथ इ. वैशिष्ट्यपूर्ण गुंफा आणि स्तूप आपल्या नजरेस पडतात.
            नेपाळच्या ग्रामीण भागातील लोकांची घरं सहसा दुमजली असतात. तळमजल्यावर ते पाळीव प्राणी आणि सामान ठेवतात. वरचा मजला असतो निवासाकरिता. इंधनाचा दुष्काळ येथेही आहे. शेण्या थापून त्या सुकवितात. इंधनासाठी त्याचा वापर होतो.
                ' यती ' हे सगळ्यांनाच अदभुत व गूढरम्य वाटणारे कोडे आहे. या हिममानवाला पाहिल्याचा उल्लेख काही जुने जाणते हिमालयीन लेखक, गिर्यारोहक आपल्या पुस्तकात करतात.
                 हिमालयात गिर्यारोहणाचा योग चारपाच वेळा आला. त्यावेळी या ' यती ' विषयी स्थानिक लोकांकडून थोडेफार ऐकायला मिळाले होते.  यतीचे अवशेष आपल्याला या पुस्तकात दिसले की, ' यती ' पाहिल्याचे समाधान मिळते.
             पांगबोचे गुंफेत हे अवशेष ठेवलेले आढळतात. डोंगराळ भागात ' तातो पानी ' खेड्याजवळ मोठा सस्पेंशन ब्रीज बांधलाय. त्या ब्रीजवर आपण उभे आहोत आणि खालचे थरारक खोरे पाहतोय,असा भास क्षणभर हे चित्र पाहताना होतो.
            ' पिपल......' वाचताना आपल्याला शेर्पा या शब्दाचा अर्थ ज्ञात होतो. ' शेर-पा ' चा तिबेटीयन अर्थ ' पूर्वेकडील लोक '. हे मूळचे मंगोलियन. बाराव्या शतकानंतर तिबेटमधील खाम परिसरातून नेपाळ व इतरत्र स्थलांतरित झालेली ही वंशावळ
 ' शेर्पा ' म्हणून परिचित आहे.
            शेवटी ' पिपल.........' वाचून व पाहून संपले तरी डोळ्यासमोर रेंगाळतात ती अमाडब्लम, मकालू, लांगतांग, लिरुंग, पूमोरी ,धवलागिरी, निलगिरी, या पर्वतरंगातून दिसणारा शुभ्रधवल हिमालय आणि आपला उत्तुंग " एव्हरेस्ट ".
                                                ...............................................................