Sunday, 1 August 2021

💐💐मनभावन कविता💐💐


             आपल्या भारतदेशाचा  ७५ वा स्वातंत्र्य दिन रविवारी १५ ऑगस्टला सर्वत्र साजरा होईल, ‘कोविड १९  महामारीच्या विळख्यातून आपण सारे अजून पुरते बाहेर आलेलो नाही. त्यामुळे नेहेमीच्या स्वातंत्र्य दिन समारोहाचा जल्लोष करताना आपल्यावर अनेक निर्बंध आहेत.

              या निमित्ताने मी आपल्या गौरवशाली देशाच्या राष्ट्रीय ध्वजास मनोमन वंदन करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.

              या प्रसंगी, देशामधील राजकीय वातावरणाचे वास्तव टिपण करणारे सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांनी लिहिलेली ही कविता तुम्हाला अंतर्मुख करील. यातील सत्यआजही पूर्वीसारखेच आहे………….. 


💐भारत कधी कधी माझा देश आहे……..

भारत कधी कधी माझा देश आहे

आम्ही सारे भारतीय

अलग अलग आहोत

माझं आयुष्य

हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही

त्यामुळे अन्य जाती धर्माशी

माझा काडीचाही संबंध नाही

माझ्या जातीचा माणूस

माझ्या धर्माचा माणूस

हाच माझा भाऊ आहे

माझा देश माझा खाऊ आहे

खाऊन खाऊन तो संपणार आहे

प्रांता प्रांतांची जुंपणार आहे

जुंपल्यानंतर फाटतील

एकमेकांना लुटतील

पुन्हा नवे परकीय

साम्राज्यवादी येतील

पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी

नवे टिळक नवे गांधी होतील

 

त्यांचेही पुतळे उभे राहतील

पुतळ्यावर कावळे बसतील

खुर्चीवर बगळे बसतील

पुन्हा आम्ही एक होऊ

स्वातंत्र्याचे गाणे गाऊ-

हम सब एक है

हिंदूमुस्लिम भाई भाई

हिंदूसीख भाई भाई

हिंदूइसाई भाई भाई

हिंदूबौद्ध भाई भाई

हिंदूजैन भाई भाई

हिंदूहिंदू

सुद्दा भाई भाई

 

तोपर्यंत मित्रांनो

मला माझ्याच स्वप्नांची तहान आहे

या देशापेक्षा मीच महान आहे

मी माझ्याचसाठी जगतो

मी माझ्याचसाठी मरतो

आरशात पाहून

मी मलाच नमस्कार करतो

तेव्हा

माझा जयजयकार असो

माझ्या धर्माचा जयजयकार असो

माझ्या पंथाचा जयजयकार असो

माझ्या प्रांताचा जयजयकार असो

झालंच तर

कधी कधी

माझ्या देशाचासुद्दा

जयजयकार असो……...

 

---रामदास फुटाणे

(काव्यसंग्रह--सफेद टोपी लाल बत्ती).

 

              :::::::::::::::::::::::