Saturday, 1 January 2022

💐💐थिएटरमध्ये💐💐

          नाटक किंवा सिनेमा आपण थिएटरमध्येच पहावा, अशा मताचा मी आहे. कारण थिएटरमध्ये या कलाकृतीचे आकलन रसिक प्रेक्षकांना व्यवस्थितपणे होते. त्यात आनंद जास्त मिळतो. पण आज घरोघरी असणाऱ्या टिव्ही-मोबाईल, आणि इंटरनेट माध्यमांमुळे प्रेक्षकांना कधीही, कुठेही नाटक-सिनेमा पहायची मोठी सोय झालेली आहे. हे पाहणे सुलभ असले, तरी त्यात गंभीरता नसते. त्याचा आस्वाद एकाग्रतेने घेताही येत नाही.

              अशाही स्थितीत, मी पूर्वी कधी घरच्या टीव्हीवर बघितलेले एक मराठी नाटक मला या क्षणी आठवत आहे. ते नाटक विशेष प्रसिद्द नव्हते. त्याचा गाभा, जो मला काहीसा उमगलाय, तो मी थोडक्यात इथे सांगत आहे…………….

💐चौकट💐

           नाटकाचं नाव आहे चौकट’. त्याचे लेखक आहेत शफाअत खान. विजय कदम आणि स्वाती टिपणीस या गुणी कलावंतांनी त्यात काम केलेय.

                नाटकाचा नायक लेखक आहे. दोघे  इच्छुक पतिपत्नी स्वभावाने भावुक आहेत. नायक-लेखकाचे साहित्य वाचता वाचता  नायिका त्याची मैत्रीण होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. या दोघांचे प्रेम आंधळे मात्र नाही. दोघे  विचारी मनाचे आहेत.

                परंतु त्या दोघांची स्वतंत्र  चौकटआहे. मुलीच्या बापाची वेगळी चौकट आहे. त्याला जावई चांगला हवाय. त्या बापाच्या चौकटीत लेखक(नायक) बसत नाही.

                नायक लग्नाचा विषय घेऊन नायिकेच्या बापाला चांगले पणाने विचारायला जातो, पण अपमानित होऊन त्याला परतावे लागते. कारण हा जावई त्याच्या चौकटीत बसणारा नाही !

               एवढी चहूकडे सुधारणा होतेय, विकास होतोय. सारे जग विज्ञानाकडे झुकत आहे. तरी कोणाची चौकटकाही बदलत नाही. लोक छान वागण्याचे फक्त देखावे करतात. संस्कारी आहोत असे जगाला दाखवितात. प्रत्यक्षात ते आजही मागेच राहिलेत.

               घरचे बुजुर्ग लोक, ‘ आपण मुलांना जन्म दिलाय, त्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणेच आपला जावई  किंवा सून निवडणार. तो अधिकार आपलाच आहे. त्यांचे भविष्य आपणच ठरविणार आहोत !’ असे समजतात.

               आमचे एवढे तरी ऐकायला नको का मुलीने ?(किंवा मुलाने ). त्यांचे आम्ही वाईट थोडेच चिंतणार आहोत ?’ अशी देखील त्यांची धारणा आहे !

                 हा विषय चौकटनाटकाच्या केंद्रस्थानी आहे. या नाटकात मुलाच्या घरच्या कोणत्याही घटना दाखविलेल्या नाहीत. फक्त चौकटीत गुरफटलेल्या  समाजमनाची संवादात्मक चर्चा घडलीय.

               या चर्चेतील बरीच वाक्यं भिनणारी आहेत. ती ऐकून अस्वस्थ होतो आपण.

               आईवडील मुलांच्या हितासाठी साऱ्या गोष्टी करतात, हे शंभर टक्के खरे आहे. पण आपल्या स्वतःच्या हिताचा विचार करणारे दोघे इच्छुक पतिपत्नी सुजाण समर्थ असताना त्यांच्या आप्तांनी शंका का बाळगावी ? अधिकार आहेत म्हणून का वापरावेत ? त्यांनी त्यांच्या पारंपारिक चौकटीतुन बाहेर पडायला नको का ?

              असे अनेक सवाल नाटककार शफाअत खान यांनी प्रेक्षकांना चौकटमध्ये केले आहेत.  प्रत्यक्षात, या चौकटी आहेत तशा यापुढेही राहाणार आहेत. ‘चौकटप्रेमी माणसंही खूप मागं राहाणार आहेत !

                                                           ::::::::::::::::::::::::