Sunday, 1 December 2019

💐स्वर्गस्थ💐

💐स्वर्गस्थ💐
          जगभरात विनोदी अभिनय करण्यात बाप असलेला चार्ली चॅप्लिन हा माझा सर्वात आवडता नट. मला चित्रपट पाहण्याचा छंद लागला  तेव्हा, चार्लीचे काही बोलपट- मुकपटही पाहायला मिळाले. त्यातील कारुण्यमय कथा डोळ्यासमोर पाहताना आपल्या निर्मळ हास्याने माझ्यासह सर्वच संवेदनशील रसिक प्रेक्षकांचे ताणतणाव हलके करणारा विनोदी नट चार्ली मला जवळचा वाटू लागला.
          आपल्या नेहेमीच्या जगण्या-वावरण्यात सततचे ताण आपले आयुष्य कणाकणाने कमी करीत असतात. अशा परिस्थितीत चार्ली,  व चार्लीसारख्या कित्येक अभिनेत्यांनी मला खूप हलके केले आहे. चार्ली चॅप्लिन, मेहमूद, दादा कोंडके, जॉनी वॉकर, लक्ष्मीकांत बेर्डे, ही माझ्या विनोद विश्वातील ‘तारे’ मंडळी आहेत.
         या विनोदी ताऱ्यांबद्दल  खूप सांगण्या सारखे आहे. मात्र आज येथे मी चार्ली चॅप्लिनची जीवन कहाणी व अभिनयाची कारकीर्द याविषयी थोडक्यात सांगत आहे. चिकित्सक साहित्यिक स्वर्गीय य. दि. फडके यांच्या एका पुस्तकामध्ये चार्लीचा परिचय वाचला  आणि मला यावर लिहावेसे वाटले.
         ही माहिती मी चार्लीच्या स्मृती दिनानिमित्ताने इथे सादर करीत आहे. या थोर कलावंताचे निधन नाताळच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला(१९७७) झोपेत असताना झाले.
         या अस्सल विनोदी अभिनेत्यास माझी विनम्र श्रद्दांजली.

💐स्मरण चार्ली चॅप्लिनचे…….
               चार्लीचे आत्मचरित्र १९६४ साली डेव्हिड रॉबिन्सन या प्रकाशकाने प्रसिद्द केले. त्यात चार्लीने कुटुंबाविषयी थोडक्यात सांगितलंय.  नाटककार युजिन ओनीलच्या तरुण मुलीशी चार्लीने लग्न केले.  त्यावेळी चार्लीचे वय होते पन्नास ! आपल्या पहिल्या व तिसऱ्या पत्नी विषयी चरित्रात लिहिलेय. दुसऱ्या बायकोने त्याला मनस्ताप दिला. तीच्याबद्द्ल नाही पण तीच्यापासूनच्या दोन मुलांचा(चार्ल्स व सिडने) उल्लेख चरित्रात आहे.
              चार्लीचे आईवडील दोघेही अभिनय करायचे. मात्र वडील दारुडे होते. त्यांनी बायकापोरांना टाकल्यावर आईला(ऍना) त्याचा त्रास झाला. तीला वेडाचे झटके यायचे. गरिब परिस्थिती मुळे चार्लीला शिक्षण पूर्ण नाही करता आले.
             चार्ली रंगभूमी कलावंत होता. ‘कीड’ मध्ये दिसणारे जॅकी कुगन हे अनाथ पात्र त्याचेच रूप आहे. त्याच्या चित्रपटात अन्नावर तुटून पडत असलेली दृश्य वारंवार दिसतात. ‘इमिग्रंट’ मध्ये बोटीवरचा गरीब भटक्या, ‘गोल्डरश’ मध्ये भुकेने कासावीस होऊन बूट शिजवून खाणारा मुशाफिर, अशा खूप भूमिका चार्लीने केल्या आहेत. ‘लाईमलाईट’ मध्ये कॅलव्हेरो दारूच्या आहारी गेलेला रंगभूमी नट म्हणजे त्याच्या पित्याची प्रतिकृती होती.
              चार्ली दारू प्यायचा, पण व्यसनी नाही बनला. तो आईमुळे रंगभूमीवरचा नट म्हणून आला. एकदा (पाच वर्षाचा असताना) स्टेजवर एका प्रयोगाला आईचा गळा गाणे गाताना बसला. तेव्हा प्रेक्षक टर उडवायला लागले !  मॅनेजरने प्रेक्षकांसमोर छोट्या चार्लीला उभे केले आणि सांगितले की, हा। चार्ली आता तुम्हाला गाणं म्हणून दाखवेल. मग चार्लीने आईच्या आवाजाची नक्कल करीत गाणे म्हटले. त्यावर प्रेक्षक एवढे खुश झाले की त्यांनी स्टेजवर कौतुकाने पैसे फेकले. चार्लीने ते पैसे स्वीकारले. मध्येच गाणं थांबवून पैसे गोळा केले, आत आईकडे गेला आणि तिला ते दिले ! पुन्हा बाहेर आला व आपले गाणे तल्लीनतेने पूर्णही केले.
             त्यानंतर चार्ली रंगभूमीवरचा प्रसिद्द नट बनला.  खूप कामे केली. एकदा एका नाटकात ज्यू लोकांनी वैतागून त्याच्यावर अंडी, टोमॅटो फेकली ! कां ? तर,  तो प्रवेश ज्यूंच्या विरोधी होता. चार्ली नाराज झाला. पुढे त्याने रंगभूमीऐवजी चित्रपटात काम करायला सुरुवात केली.
            इंगमार बर्गमन या जगप्रसिद्ध डायरेक्टरने त्याला एकदा विचारले, ‘ तुमचा अभिनय पाहून प्रेक्षकांना खूप हसू येते. हे तुम्हाला पहिल्यांदा कधी कळले ?, चार्लीने त्याला उत्तर दिले-‘ एका मुकपटात मी पोलिसाची भूमिका करीत होतो,  मी एका गुन्हेगाराला पकडले आणि मारू लागलो तेव्हा माझी काठी त्याचेवर उगारल्यावर माझा नेमच चुकला आणि प्रेक्षक तुफान हसले ! तेव्हा मला समजले की आपल्याला हा अभिनय(विनोदी) येतोय. ‘
           अल्बर्ट आईन्स्टाईनने चार्लीचा ‘सिटीलाईट्स’ चित्रपट त्याच्याच बरोबर प्रीमिअर शोमध्ये पाहिला. त्याप्रसंगी, चित्रपटाच्या अखेरच्या भागात हा थोर शास्त्रज्ञ आसवं गाळीत होता ! चार्लीला हे अप्रूप वाटले. म्हणजे शास्त्रज्ञदेखील भावुक होतात तर ?
         ‘सिटीलाईट’ किंवा ‘गोल्डरश’ चित्रपटातील शेवटचे भाग बघताना थिएटर असेच भावुक व्हायचे.
         जगात चार्ली हा जिनिअस माणूस म्हणून चाहते त्याचे कौतुक करीत. त्याच्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे कौशल्य होते. तो अभिनयाशिवाय, दिग्दर्शन, एडिटिंगदेखील करायचा.
     कथा-पटकथा लेखनसुद्दा त्याने केले आहे. काही चित्रपटांना चार्लीने संगीत दिलेय. अशी चौफेर अदाकारी करणाऱ्या चार्लीला कीर्तीचा गर्व कधी चढला नाही.
          अमेरिकेचे आणि त्याचे काही नीट सुत जुळले नाहीत. अमेरिकन भांडवलशाहीचा उपहास त्याने मॉर्डन टाइम्स, द ग्रेट डिक्टेटर, अ किंग इन न्यूयॉर्क अशा चित्रपटात दाखविलाय. रशियाच्या लढाऊपणाचे चार्लीने कौतुक केलेय. मात्र या कारणामुळे त्याचा ‘अ किंग इन न्यूयॉर्क’ बरीच वर्षे अमेरिकेत दाखविला गेला नव्हता.
          चार्लीची मते स्पष्ट होती. त्याला राजकीय बंधनांचा तिटकारा होता. राज्याराज्यात असलेले मतभेद त्याला पटत नव्हते. आपल्या चित्रपटात प्रेक्षकांनी निव्वळ हसावे, एवढीच त्याची इच्छा होती.
          माणसाच्या स्वातंत्र्यावर आघात करणाऱ्या व्यक्ती व प्रवृत्तीची चीड त्याने आपल्या उपहासगर्भ शैलीच्या विनोदाने प्रेक्षकांसमोर व्यक्त केली आहे. ‘इमिग्रंट’ मध्ये चार्लीची बोट न्यूयॉर्क बंदरात शिरल्यावर अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा पुतळा समोर येतो व पडद्यावर अक्षरे झळकतात- द लँड ऑफ लिबर्टी ! पण थोड्याच वेळात, चार्लीसकट सर्व उतारूंना एका मोठ्या दोरखंडाने जखडण्यात येते. ‘मॉडर्न टाइम्स’ मध्ये सुरुवातीला त्याने मेंढरांचा कळप  व कारखान्यातुन बाहेर पडणारे कामगार दाखवलेत.’द ग्रेट डिक्टेटर’ मध्ये पृथ्वीचा गोल फिरवीत नाचणारा हायकेल, ही सारी दृष्ये म्हणजे हिटलरच्या हुकूमशाहीची खिल्ली होती.
       चार्ली चॅप्लिनचे निधन झोपेत झाले. नाताळचा दिबस होता तो. स्वर्गस्थ असणाऱ्या चार्लीला या पृथ्वीवर अजूनही मानवी स्वातंत्र्याला नख लावणारी हुकूमशाही शिल्लक आहे, हे नक्कीच दिसत असेल, नाही ? मात्र आता तो त्यावर कोणतेही भाष्य न करता स्मितहास्यच करीत असेल !
 
-      ----------------------

💐आठवणीतील व्याख्याने 💐

💐आठवणीतील व्याख्याने💐

💐 आज सोनियाचा दिन……….यशवंत पाठक.
                प्रसिद्द तत्वज्ञ व कीर्तनकार सोनोपंत दांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने(१९९५) त्यांचे विचार व थोरवी ऐकणारे हे सर्वांगसुंदर असे व्याख्यान देणारा वक्तेही जाणकार होते. अगदी रसाळ व टिपणं लिहून घ्यावीत, अशा भाषेत श्रोत्यांशी संवाद करणारा हे संत अभ्यासक-साहित्यिक म्हणजे डॉ. यशवंत पाठक.
                यापूर्वी मला सोनोपंत दांडेकरांची फारशी माहिती नव्हती. गो. नी. दांडेकरांच्या पुस्तकात, ’सोनोपंत एक मोठे व्यक्तिमत्त्व आहे’ एवढे वाचले होते.
                सोनोपंत दांडेकर ही एक थोर, समाजसेवी, अभ्यासू, साहित्यिक, तत्वज्ञ, कर्मयोगी, अशी व्यक्ती होती. त्यांची सर्वांगीण माहिती रसाळ भाषेत एकही शब्द अनाठायी न वापरता यशवंत पाठकांनी श्रोत्यांना सांगितली. पाठकांना त्यांचा सहवासही  लाभलाय.
                सोनोपंत दांडेकर हे त्यावेळच्या वारकरी संप्रदायातील एक लाडके व्यक्तिमत्व. अतिशय परिश्रमी  व अभ्यासू. सोनोपंतांनी अनुभवी, संत-महंत व्यक्तींमध्ये वावरून त्यांचे शिष्यत्व पत्करून, ज्ञानेश्वरीसह तुकारामांची गाथा, भगवद्गीता, आणि व्यापक अशा वारकरी संप्रदायातील वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला. नुसता अभ्यासच नव्हे, तर पाश्चात्य तत्ववेत्यांची पुस्तके अभ्यासून  त्यांची मीमांसा केली. प्लूटो, कान्ट, अरिस्टोटल, इत्यादींचे वाङ्मय सोनोपंतांनी वाचून काढले.
               याशिवाय, सामान्य वारकऱ्यांसमवेत राहून संकीर्तने, प्रवचने केली. दुःखीताना आधार दिला. अखंडित दानधर्म करीत राहिले. त्यांनी हजारोंना अन्नाला लावले. रोजगारही मिळवुन दिला. कित्येकांची लग्ने लावून दिली. लोकांची सेवा करण्यांत कमीपणा मानला नाही. दानधर्म करताना स्वतःचे नाव कुठे प्रदर्शित नाही केले. कनिष्ठ माणसाला देखील त्यांनी चांगला मान दिला.
              सोनोपंत दांडेकरांनी ज्ञानेश्वराना मायमाऊली समजून त्यांच्या काव्याची समग्र मीमांसा केली. तसेच, संत एकनाथांचे ग्रंथ वाङमय, जनाबाई, निवृत्ती नाथ, अशा संत-साहित्यिकांचे गद्य-पध्य साहित्यसुद्दा अभ्यासले. दर्दी विध्यार्थ्यांपुढे ते चिकिस्तेसाठी ठेवले.
             सोनोपंत दांडेकरांच्या आयुष्याला मोठी वळणे देण्याचे काम दोघा धुरीणांनी केले. एक जोग महाराज, आणि दुसरे गुरुदेव रानडे. पहिल्याने ‘पौरात्य’ चे अथपासून इथपर्यंत ज्ञानभांडार दिले, तर दुसऱ्याने पाश्चात्यांचा अभ्यास कसा करावा, हे सांगितले. मनी येणाऱ्या शंका-प्रश्न सोनोपंत त्या दोघांना विचारीत. दोघेहो अगदी प्रदिर्घ पद्धतीने सोनोपंतांचे निरसन करीत.
             डॉ. यशवंत पाठक आपल्या रसाळ वाणीने सोनोपंतांचे चरित्र ऐकवीत होते. त्यांनी व्याख्यानात शेवटी सांगितले की,  सोनोपंत आणि त्यांच्यासारख्या इतर पूजनीय व्यक्तींची जपतप स्थाने   म्हणजे घर नव्हे तर, ‘निसर्ग’, नद्यांचे काठ, डोंगर, ही होती. म्हणजे जो काही आविष्कार सोनोपंतांना मिळाला, तो घरात बसून नव्हे, तर निसर्गात, खुल्या आभाळात ! ती त्यांची केंद्रे होती !.
            डॉ. यशवंत पाठकांनी या व्याख्यानाचा समारोप करताना ‘अनुभव’ या शब्दाची व्याख्या नव्या अर्थाने सांगितली-- ‘ अनुभवाचा नेमका अर्थ वर्णन करताच येत नाही, ‘तो’ अनुभवावाच लागतो…’
            ज्ञानी-विज्ञानी, आस्तिक  साहित्यिक आणि संतवृत्तीच्या सोनोपंत दांडेकर या थोर विभूतीचा मला या व्याख्यानामुळे झालेला परिचय कायम स्मरणात राहील……………


                                                                   ::::::::::::::::::::::::::::::::::::

💐चित्रपट गप्पा💐

💐चित्रपट गप्पा💐
               प्रभात चित्र मंडळ या जाणत्या सिने सोसायटीमुळे मला देशी-विदेशी, ऑस्कर-अकॅडमी व विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, दुर्मिळ, जुन्या आणि नव्या चित्रपटांचा वेध घ्यायची चांगली संधी मिळाली. त्या संधीचा मी  जमेल तसा लाभ घेत आलो आहे.  वेळ काढून आणि जमेल त्या त्या ठिकाणी जाऊन या चित्रपटांचा रसास्वाद घेतलेला आहे, आणि घेत आहे.
              अधून मधून तुमच्याशी ‘चित्रपट गप्पा’ करताना मला भावलेल्या व कधी अस्वस्थ करणाऱ्या चित्रपटांची थोडीबहुत ओळख तुम्हा रसिकांना करून देण्याचा प्रयत्न मी करीत आहे. समीक्षक म्हणून नव्हे, तर सर्वसामान्य नजरेतून या विषयी मी लिहित आहे. काही जाणकारांनी हे चित्रपट अगोदर पाहिलेले असतील, तर त्यांना माझे लिहिणे विशेष वाटणार नाही. पण इतरांना यात नावीन्य जरूर वाटेल.
              येथे मी ‘मुक्ता’(मराठी) आणि ‘राशोमान’(जपानी), हे दोन चित्रपट मला कसे दिसले ते सांगत आहे- हे दोनही पुरस्कारप्राप्त चित्रपट आहेत
.
💐मुक्ता(१९९४)…….....
दिग्दर्शन-जब्बार पटेल, संगीत- आनंद मोडक.
कलावंत- श्रीराम लागू, सोनाली कुलकर्णी, रीमा लागू, विक्रम गोखले.
            हा चित्रपट समाजातील जात-धर्म, राजकारण, यातला नेमकेपणा दाखवीत दाखवीत आपल्याला निर्मळ निसर्गाची काव्यसफरही घडवून आणतो.
           या चित्रपटात प्रारंभी आपल्या समोर एक परदेशस्थ  भारतीय कुटुंब येते. कायम अमेरिकेत राहणाऱ्या या  सुखवस्तू कुटुंबातील आईवडील आपल्या तरुण व उत्साही मुलीला म्हणतात- ‘ हे बघ मुक्ता, तू आता पर्यंत अमेरिकेत राह्यलीस, वावरलीस, पण यापुढे तुला या आपल्या देशाच्या मातीत राहायचे आहे…..’ मुक्ताला हे मान्य आहे. इथली माती तीला जवळची वाटतेय.
           हे मोठे कुटुंब आहे, सधन आहे. मुक्ताचे एक चुलते आहेत राज्याचे मंत्री ! दुसरे आहेत मोठ्या कारखान्याचे संचालक. तीच्या आतेचा नवराही आहे मंत्री ! मुक्ताचे वडील मात्र काळ्याशार मातीत आणि हिरव्यागार निसर्गात रमणारे कवी ! त्यांची पत्नी, म्हणजे मुक्ताची आई सुस्वभावी आहे.
          ‘मुक्ता’ नावाप्रमाणेच मुक्त स्वभावाची नायिका आहे. इथे मेडिकलला ऍडमिशन घेऊन ती होस्टेलला राहू लागलीय. तेथे एक तरुण तरुणींचा ग्रुप आहे, चाकोरी बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज करणारा, पथ नाट्ये करणारा.
           समाजातील  अन्यायाची दाद मागण्यासाठीही हे तरुण व्यस्त आहेत. त्यांचा नायक दलित समाजातील एक आक्रमक बोलणारा, पण सालस वृत्तीचा तरुण आहे. उच्च वर्णीयांबद्दलची चीड, बड्या राजकारण्यांबद्दल असणारा द्वेष तो नेहेमी व्यक्त करतो.
          जवळच्या गावात एका दलित बाईला नागवं करून तीची धिंड काढल्याची घटना घडते. त्यात गावची प्रतिष्ठित मंडळी ही घटना पाहतात. या साऱ्याची चीड नायकाला स्वस्थ बसवत नाही. तो मित्रांच्या साहाय्याने या प्रकरणाच्या मागे लागतो.  दोषींवर तातडीने कारवाई व्हावी म्हणून मोर्चा, आंदोलनाचा, घेराव घालण्याचे प्रयत्न होतात. पण कसलेले राजकारणी ‘समिती’ नेमून या तरुणांना ‘थंड’ करतात. हे तरुण निराश होतात. पण पुन्हा उभे राहून पुढचे बेत ठरवतात.
         यांच्या  ग्रुपमध्ये ब्राह्मण व इतर जातीचे तरुण तरुणी आहेत. नायक त्यांना एकदा त्वेषाने म्हणतो-‘शेवटी तुम्ही पण तसेच वागणार रे…आम्ही आपले खालीच….
         या उद्देगावर मकरंद रानडे(एक सहकारी) गप्प राहतो. मात्र नायिकेला तो ऐकवतो-‘हा दलित आहे हे याच्या मनातून काही जात नाहीये. आमच्या बद्दल त्याला असे वाटतेय !  हे त्याच्या मनातून जायला हवेय.
         राजकारणी मंडळींना या तरुणांकडे लक्ष देणे महत्वाचे वाटत नाही. परंतु, जेव्हा प्रतिष्ठित मंत्री कुटुंबातली व्यक्ती-मुक्ता त्यांना सामील होऊ पहाते व ‘त्या’ नायकात गुंतण्याच्या मार्गावर असते, तेव्हा सारे कुटुंब सावध होते. मग कुटुंबियांच्या ‘कारवाया’ आल्या, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धमकी, हल्ला प्रकार आले, दुसरीकडे  सामोपचार व आमिष, इत्यादी प्रकार सुरू होतात. पण याचा फारसा परिणाम मुक्तावर होत नाही.
         टेन्शनमध्ये असलेल्या कणसे पाटीलांच्या घरात या मुलीला समजावणीचे प्रयत्न होतात. आई वडिलांना परदेशातून पाचारण केले जाते. ते येतात. त्यांना मुक्ता खंबीर असल्याचे स्पष्ट दिसते. तेव्हा ते तीच्या पाठी उभे राहायचे ठरवतात. हा सुशिक्षित पण आक्रमक तरुण जावई म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नाही, असे सर्वाना सांगतात.
         या घडामोडी चालू असताना मुक्ताचा अमेरिकन मित्र येणार असल्याची माहिती येते. सगळे कुटुंब आनंदी होते. का ? तर, हा परदेशी असला तरी अमेरिकन आहे, इथल्या दलित मुलापासून तरी मुक्ता सुटेल ! सगळ्यांचा ताण कमी होतो.
         प्रत्यक्षात तो अमेरिकन मित्र ‘काळा’ आहे ! सगळे हादरून जातात. मुक्ता मात्र आपल्या ग्रुपमध्ये त्याला घेवून जाते. परिचय करून देते. नायक तरुण तर अचंबित झालाय !
                मुक्ता त्या अमेरिकन मित्राशी लगटून-बिलगून चालते ! ही आपली मैत्रीण आणि भावी सखी ! आणखीही ती काहीबाही करीत असेल ? केले असेल ? तीने त्याचे बरोबर ?…..
               अशा मनस्थितीत नायकाची नाराजी एका प्रसंगी त्या अमेरिकन मित्राला मारल्यावर संपते. मुक्ता त्या जखमी मित्राला सावरते  आणि उसळून नायकाला म्हणते-‘ अरे, हा माझा तसा मित्र नाही रे, अरे, माझे अमेरिकेत जे ऑपरेशन झाले ना तेव्हा याने माझी आईसारखी सेवा शुश्रूषा केलीय.  माझे हगणे मुतणे काढलेय याने ‘. हे ऐकून नायक खजील होतो.  मुक्ता पुढे म्हणते-‘ तू जातीबद्दल येथे जे काही करतो आहेस ना, तेच काम हा त्या परदेशात करतोय. अरे, आपण इथे कितीही गोरे गोमटे आणि उच्च वर्णीय असलो ना, तरी तिकडच्या देशात आपण काळेच ठरतोय रे. तिकडे अशाच अपमानाचे वेळी याने मला आधार दिलाय…..’
                 आता तो अमेरिकन मित्र समंजसपणे नायकाजवळ येऊन म्हणतो- ‘चल, ये करूया आपण मारामारी, हा पण एकमेकांशी नव्हे बरं का, आपण लढूया जातीपाती विरुद्द आणि वर्णद्वेषाविरुद्द ! ‘….
                 मुक्ताच्या प्रेमप्रकरणामुळे घरी जोरात वाद होतात. अगदी भावा-भावजयांची उणीदुणी काढण्याचे प्रकार घडतात. या कुटुंबातील एका मंत्र्याचे दलित बाईशी संबंध आहेत, ते उघड होतात. ‘ तेव्हा तुमची जात का आडवी येत नाही ? ‘, अशा प्रश्न मुक्ताची आई त्या दिराला विचारते. घरातलीही भांडणं धुमसत राहातात. अखेर मुक्ता तीच्या इच्छेप्रमाणे नायकाबरोबर लग्न करणार, हे निश्चित होते  व चित्रपट संपतो.
                 ‘मुक्ता’ चित्रपटात प्रेम, मतलबी राजकारण, जातपात-वंशभेद, स्वार्थ, स्त्रीकडे पाहण्याची नजर, निस्वार्थ वृत्तीची सेवा, असे सगळे विषय येतात. चित्रपट पाहताना त्यात निसर्गावर लिहिलेल्या कवितांचे सादरीकरणही प्रेक्षकांना प्रसन्न करते. कविमनाचे मुक्ताचे आईवडिल  कधी घरगूती मैफिलीत सुंदर काव्य सादर करतात,  तर मुक्ता सवंगड्याना कधी कविता ऐकवते, नायकसुद्दा काव्यवेडा आहे. ही सगळी काव्यात्मकता चित्रपटाला टवटवीत ठेवते.
                  या चित्रपटातील सगळ्या कलावंतांनी चांगला अभिनय केलाय. मुक्ताचा परदेशी मित्र त्याची जीवनकथा इंग्रजी काव्यातून मुक्ताच्या चुलत्याला ऐकवतो, तो भाग मनाला चटका लावून जातो. या चित्रपटात अस्पृश्यतेचा विषय मांडताना पंढरीचा काळासावळा विठुराया प्रेक्षकांसमोर येतो. मुक्ताचा परदेशी तरुण मित्र त्याचे अंतःकरण पूर्वक दर्शन घेतो.  तल्लीनतेने दिंडी-यात्रा करतो. हे सारे परिणामकारक झालेय. एकूण ‘मुक्ता’ प्रेक्षकांना अंतर्मुख करतो.
💐राशोमान(१९५०)………
दिग्दर्शन- अकिरा कुरोसावा(जपान)-
                ‘राशोमान’ म्हणजे एका गावाचे प्रवेशद्वार. हा चित्रपट रहस्यमय आहे, तो पहाताना प्रेक्षक अस्वस्थही होतो. सगळ्या घटना एकाच ठिकाणी घडतात.
                पहिली घटना -  गावातील डोंगरावर एक तरुण आपल्या पत्नीला नेत असताना अचानक त्यांच्यासमोर एक उग्र चेहेऱ्याचा लुटेरा येतो. दोघे बिथरतात. लुटेऱ्याचे लक्ष त्या तरुणाच्या पत्नीकडे जाते. तो तीच्यावर जबरदस्ती करतो. तीचा भोग घेतो. त्या तरुणाला ठार करतो !  ती बिचारी हतबल झालीय. ती आता त्याला स्वीकारायला विनवणी करते, तो उडवून लावतो !
                पुढे  खटला सुरू होतो. त्यावेळी मृत तरुणाची पत्नी, खुनी लुटेरा, आणि घटनास्थळी असलेल्या इतरांच्या जाबजबान्या होतात. मृत तरुणाला प्लॅनचेटच्या माध्यमातून बोलाविले जाते. यानंतर निष्कर्ष काढला जातो-
एक - त्या तरुणीच्या इच्छेविरुद्द लुटेऱ्याने  बलात्कार केलाय.
दोन - तीच्या इच्छेप्रमाणे लुटेऱ्याने तीला भोगलेय.
तीन - तीच्या सांगण्यावरूनच लुटेरा त्या तरुणाला मारतो.
              या तीनही शक्यता सामान्य प्रेक्षकाला कोड्यात टाकतात. यात खरे काय व खोटे काय ? एक बौद्ध भिक्षु या सर्व घटना पाहत आहे. तो सुद्दा प्रेक्षकांइतकाच संभ्रमात पडलाय. माणूस एवढा क्रूर वागू शकतो का ? हा त्याला पडलेला प्रश्न आहे.
             अजून एक घटना इथे घडते-एक लहान एकाकी असणारे रेंगाळणारे मूल एक व्यक्ती पळवीत आहे. बौद्ध भिक्षू त्याच्याकडे विस्मयाने पाहात असताना ती व्यक्तीच भिक्षूला उत्तर देतेय-मी हे मूल चांगल्या हेतूने नेत आहे  बर का ? भिक्षू त्यावर शांत झालाय ! पण तो स्वतःशीच विचारतो आहे -अशीही माणसं असतात ?
             या रहस्यमय चित्रपटाने अस्वस्थ केले. चित्रपट नीट उमगलाही नाही. ‘राशोमान’ पुन्हा पाहिल्यावर व्यवस्थित समजेल, असे वाटते.

                                                        -----------------