Sunday, 1 September 2019

💐धार्मिक पण मार्मिक💐

💐धार्मिक पण मार्मिक💐
                       लहान-थोर, गरीब-श्रीमंत, साक्षर-निरक्षर, देशी-परदेशी, अशा सर्वस्तरावरील श्रद्धावानांना ऊर्जा देणारा व त्यांचा उत्साह वाढविणारा श्रीगणेशोत्सव आज सर्वदूर गाव-शहर-देश-परदेशात साजरा होत आहे. जातीपातीच्या आणि धर्माच्या अभेध्य अशा भिंती ओलांडून अवघे विश्व व्यापणारा हा सण साजरा करताना या उत्सवात काय योग्य आणि काय अयोग्य, याचा भाविकांनी, तसेच आयोजक-संयोजकांनी गंभीरपणे विचार करावा, असे मनोमन मला वाटतेय. खास करून महाराष्ट्र राज्यातील मुंबापुरी मध्ये समाजमनांत घर करून बसलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज कसा साजरा होतोय, पूर्वी कसा व्हायचा आणि उद्याच्या काळात कोणती परिस्थिती असेल याविषयी मला काही सांगायचंय, माझ्या नजरेतून…..…


💐 मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव—काल   आणि  आज……….

*काल…
गिरणगाव--      माझे बालपण आणि शिक्षण मुंबईतील गिरणगावामध्ये झालेय. १९७० पासून १९९६ या काळातले सांगतो आहे. हा सगळा भाग कापड गिरण्यांचा( म्हणजे टेक्सटाईल मिलचा,) साहजिकच गिरणी कामगार, माथाडी कामगार, रोजंदारीवर काम करणारे गरीब मजूर, अशा सामान्य लोकांच्या कुटुंब कबिल्यानी भरलेला भाग होता( म्हणजे तेव्हा होता).
         या साऱ्यांना कवेत घेऊन बसलेले लालबाग-परळ-घोडपदेव-फेरबंदर-नारळ वाडी-अंजीरवाडी  भायखळा, आणि सातरस्ता हे परिसर गणेशोत्सवात माणसांनी नुसते फुलून गेलेले असायचे.  या भागात  व्यापारी वर्ग आणि पांढरपेशे होते, पण त्यांचे प्रमाण कमी.
         पैशाची सुबत्ता नसली तरी उत्सव साजरा करायचाच, या जिद्दीने वर्षभर या गिरणगावात कोणते ना कोणते सण  आणि उत्सव दणक्यात व्हायचे ! या उत्सवकल्लोळात अवघे मुंबईकर सामील असायचे.
         त्याकाळी उपद्रवी वातावरण जवळपास नव्हतेच. गर्दी तेव्हाही व्हायची. पण चेंगराचेंगरी नव्हती, भाविक बांधव आणि महिलांवर हात उगारणे व तरुणींची छेडछाड सुद्दा नव्हती.
             
              स्थानिक व्यापारी वर्ग या महिन्यांत खुश ! कारण,  गणपतीच्या महिनाभरापासून लालबाग गरमखाडा मार्केट, त्याचप्रमाणे भुलेश्वर-माधवबाग येथे स्थानिकांची व इतरांची खरेदीकरीता  झुंबड उडायची.
खास गणपती-        लालबाग गिरणगावातला त्याकाळचा ‘खास’ गणपती कुठला होता माहितेय ? गणेशगल्लीतला गणपती ! या गणपतीची उंची व भव्यरुप पाहायला मोठाल्या रांगा लागायच्या. त्यानंतर, तेजुकाया, गरमखाडा, चिंचपोकळी, कॉटनग्रीन, काळाचौकी,  घोडपदेव,  आणि माझगावला  अंजीरवाडी-  हे गणपती पाहायला मोठी गर्दी व्हायची. लालबागच्या राजा तेव्हा ‘गरमखाड्याचा गणपती’ म्हणून  आणि चिंचपोकळीचा चिंतामणी ‘चिंचपोकळीच्या पुलाखालचा गणपती’ म्हणून प्रसिद्द होता.    हा परिसर सोडला की पलीकडे परळ-भोईवाड्यात व नायगाव दादरला छोटीमोठी मंडळे, चाळी-सोसायट्यांमध्ये  सार्वजनिक गणपती उत्सव साजरे व्हायचे.
                येथे आणखी काही भागांची नावं सांगायला हवीत.  यादी खुप मोठी आहे. मात्र त्यापैकी काहींचे  उल्लेख करायला हवेत.  भायखळा, सात रस्ता, डोंगरी-उमरखाडी, कुंभारवाडा, कामाठीपुरा,  सी.पी. टॅन्क, गावदेवी, ठाकुरद्वार, गिरगाव,  ताडदेव, काळबादेवी, राणीबाग, बोराबाजार  इ. भागात गणेशोत्सव साजरा व्हायचा.
               कामाठीपुराबद्दल विशेष सांगायला हवे. हा तेव्हा बहुतेक रेड वस्तीचा भाग होता.   वेश्यावस्ती  जास्त. स्थानिक वस्तीत मराठी, तेलगू, मुस्लिम, जैन, गुजराथी  हे समाजही गुण्यागोविंदाने राहात होते. एकूण तेरा गल्ल्या असणारा कामाठीपुरा त्याकाळी उत्सवमयी झालेला असायचा. श्रद्देने, आपली  जातपात, धर्म-पंथ बाजूला ठेऊन  स्थानिक बांधव आणि वेश्या भगिनी एकोप्याने या सणात रंगून जायचे.
                 उत्सवी  थाटमाट पाहायला लोकं माटुंग्याच्या वरदराजचा गणपती पाहायला जायचे. पुढे चेंबूरला दोन गणपती प्रसिद्द होते - एक आर. के. स्टुडिओचा, दुसरा सह्याद्री मंडळाचा. अंगावर भरपूर दागिने ल्यालेला तेव्हाचा एकमेव गणपती म्हणजे वडाळ्यातील गौड सारस्वत समाजाचा सुवर्णगणेश ! आजदेखील त्याला पाहायला गर्दी लोटते.
आदर्श गणेशोत्सव-           आणखी चार गणपतींचे उल्लेख करायला हवेत. मुंबईतील सगळ्यात जुना केशवजी नाईकांच्या चाळी(गिरगाव),  नाना चौकातील शास्त्री हॉल, निकदवारी लेन, आणि हिंदू कॉलनी. इथे गर्दी गणपतीला बघायला नव्हे,  तर सायंकाळी-रात्री होणाऱ्या चांगल्या व प्रसिद्द कार्यक्रमांना व्हायची ! साहित्य मैफल, सुगम गीतांचे वाद्यवृंद, नाट्यगीते, कीर्तन-प्रवचन, थोर वक्त्यांची व्याख्याने, जादूचे प्रयोग, स्थानिक स्तरावरील गुणीजनांचे कार्यक्रम, स्पर्धा, आणि नावाजलेल्या नाटकांचे मूळ कलावंतांच्या सहभागाने प्रयोग उत्सवाला बहार आणायचे. यानिमित्ताने मोठमोठी साहित्यिक मंडळी आणि सिने-नाट्य कलावंत या ठिकाणी वेळ काढून हजेरी लावत.
सजावट- डेकोरेशन-        गणपतीच्या मूर्ती भोवती थर्माकोल ऐवजी कापड वापरून, काथ्या- पीओपी वापरून बाप्पाचा रंगमंच सप्तरंगी व्हायचा ! त्यानंतर चलतचित्रं उभी राहात. कुठे सामाजिक प्रबोधनाचे देखावे तर कुठे पौराणिक प्रसंग. छान छान ट्रिक सीन्स तयार करणारे हरहुन्नरी कारागीर त्या काळी खूप होते ! लहानथोर, आयाबाया भान हरपून बाप्पा आणि त्याची सजावट डोळ्यांत साठवायच्या.  लायटिंगदेखील डोळे दिपविणारे ! ही व्यवस्था पुण्याच्या डेकोरेटर्सकडे प्राधान्याने दिली जायची.
               प्रत्यक्ष गणेशाची मूर्ती आणि इतर चित्रे सज्ज करताना मूर्तिकाराची आणि सजावटकारांची कसोटी असायची. मला चांगलं आठवते, राणीबाग जवळच्या पंगेरी  चाळ आवारात प्रसिद्द मूर्तिकार चव्हाण म्हणून होते( पंगेरी  चाळीचा गणपतीदेखील प्रसिद्द होता). चव्हाणांनी मूर्ती पूर्ण केल्या की, रघुवीर पारकर त्या मूर्तीना छानशी वस्त्रं  नेसवीत.  सगळ्या देवांचे रूप साजीरे दिसावे म्हणून तासन्तास मेहेनत घेणारा हा कलावंत मी जवळून पाहिलाय. ही प्रसिद्द व्यक्ती त्यावेळी गाजलेल्या मच्छिन्द्र कांबळींच्या ‘वस्त्रहरण’ नाटकात  दुःशासनाची भूमिका करायची.
कार्यक्रम-     गणेशोत्सवात सगळ्याच ठिकाणी मनोरंजन-प्रबोधन करणारे कार्यक्रम होत नव्हते. जेथे व्हायचे, तेथे दर्दी प्रेक्षक आवर्जून हजर राहायचे, अन दादही द्यायचे. कॉटनग्रीनला गणपतीच्या भव्य सभागृहात दररोज मराठी-हिंदी चित्रपट ददाखविले जायचे.  पण चित्रपट लवकर सुरु व्हायचा (रात्री आठ वाजता). इतर काही ठिकाणी सामाजिक, ऐतिहासिक नाटके, लोकनाट्ये, वाद्यवृंद, नृत्य कला, असे मनोरंजनपर कार्यक्रम रात्री व्हायचे. गर्दी तेथेसुद्दा व्हायची.
गिरणी संप  १९८२-        ८२ च्या संपानंतर हा भाग बदलू लागला. गिरणी बंद होऊन सुस्त बनल्या. विकासक समूह आणि सरकार हातात हात घालून,  निवासी संकुल-वसाहती बांधण्याचे संकल्प करू लागले. जोडीला ऐसपैस मॉल आणि उत्तुंग असे रेसिडेंशीअल टॉवर्स बांधायचे निर्णय झाले. मेट्रो-मोनोची काम जोरात सुरू झाली.  काही ठिकाणी मोनोरेल धावायलासुद्दा लागली !
                  या सगळ्या वातावरणाचा  प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम काही अंशी तरी गणेशोत्सवावर झालाय……….

*आज……
                   आपली परंपरा आणि संस्कृती जपणारा सार्वजनिक गणेशोत्सव आज, खरं तर आपले ‘सत्व’ हरवून बसलाय.
                     आज मुंबापुरीतला गणेशोत्सव ‘कॉर्पोरेट’ झालाय. मूर्तीची उंची वाढतच आहे. स्टेज डेकोरेशन, लायटिंग आणि स्पीकर्स अत्याधुनिक बनलेत. कार्यक्रमांचे आयोजन आमूलाग्र बदललेय. आज बाप्पाच्या सुरक्षेसाठी पोलीस,सुरक्षा यंत्रणा आणि कार्यकर्त्यांना अहोरात्र डोळ्यांत तेल घालून नजर ठेवायची वेळ आलीय. या साऱ्याची माझ्या मते दोन प्रमुख कारणे आहेत, ती म्हणजे – घातपाती कृत्यांची दहशत, त्याचप्रमाणे वाढती ‘उत्सवी’ गर्दी !
आजची गर्दी-            आजची गर्दी वेगळ्या पद्धतीची आहे. आज गरमखाड्याचा गणपती ‘लालबागचा राजा’ झाला आहे. टॉपमोस्ट गर्दी त्याला बघायला लोटतेय ! राजाच्या दर्शनाची रांग काळाचौकी, आंबेवाडीला वळसा घालीत, पाठच्या दिशेने पार दाभोळकर अड्ड्याच्या(त्या भागाचे नाव) पुढे जाते. केवढा हा बदल !
               पण या रांगेत असणारे कितीजण खरोखर भाविक आहेत ? त्यांना हे देवदर्शन पर्यटनाच्या अंगाने घ्यायची इच्छा असावी, असे माझे निरीक्षण आहे.    तरुण वर्गात तर लालबागच्या राजाच्या दर्शनाची निव्वळ क्रेझ आहे.  मी हे लालबागच्या राजाबद्दल बोललोय.
      आता सार्वजनिक गणपतीला राजा, महाराजा आणि सम्राट या नावाने ओळखले जाते !  बाप्पाला ही पदवी प्रसिद्दीचा हव्यास असणाऱ्या भक्तांनी आणि त्यांच्या मंडळांनी स्वतःहून दिलीय. वास्तविक आपला गणपतीबाप्पा राजां-महाराजांपेक्षा श्रेष्ठ नव्हे काय ?

              चिंचपोकळी पुलाखालचा गणपती आता ‘चिंतामणी’ म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्याच्या आगमनाच्या वेळी तर अती उत्साही तरुणांचे ग्रुप्स आयोजक आणि पोलीसांना नकोसे करताहेत ! या वाढत्या गर्दी-गोंधळामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होतेय. या कल्लोळात  बिचाऱ्या स्थानिकांचे हाल होतात त्याचे काय ? इतर गणेशोत्सवाची ठिकाणेही गर्दीचे उच्चांक मोडत आहेत. याचा आयोजकांवर आणि कार्यकर्त्यांवर ताण वाढतो आहे.
            दुसऱ्या बाजूने विचार करणारी आयोजक मंडळी मात्र या भरगच्च गर्दीवर खुश आहेत.  त्यांच्या गणपतीला सर्वत्र प्रसिद्दी मिळतेय. त्यांनाही प्रसिद्दी मिळत आहे ! या निमित्ताने अर्थलाभही वाढत राहातोय. गणपतीला नवस करणारे भोळे भाबडे भाविक, तसेच दानपेटीत पैसे टाकणारे दाते वाढत आहेत.  कोणी सुवर्ण धन देवाला अर्पण करीत आहे.  याशिवाय, वर्गणी वाढत राहातेय. उत्सवी खर्चाची स्पॉन्सरशीप वाढते आहे. हा चौफेर लाभ कोणाला नको आहे ?
             हल्ली पूर्वीपेक्षा जास्त सेलिब्रिटी कलाकार आणि नेता-सत्ताधाऱ्यांचे पाय गणपती मंडपात लागत आहेत. सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह देवदर्शन घडल्यावर भक्कम देणगी/दान हमखास मिळते आहे.
विसर्जनाचा दिवस-   प्रचंड उत्साहात उत्सव काळात दिवसभर राबणारे कार्यकर्ते विसर्जनाचा दिवस उजाडल्यावर दुःखी होतात. बाप्पा निघत असताना त्याला दुःखी चेहेऱ्याने निरोप कसा देणार ? तेव्हा मनातली आणि चेहेऱ्यावरची खिन्नता बाजूस सारून सगळे कार्यकर्ते आनंदाने पुढे सरसावत विसर्जनाची जोरदार तयारी करतात.
              गणपतीबाप्पाची वाजत गाजत मोठी विसर्जन मिरवणूक सुरू होते. संपूर्ण मुंबापुरीत बहुतेक रस्ते, गल्ल्या आणि चौक माणसांनी फुलून गेलेले असतात. या विसर्जन मिरवणुकींच्या मोठ्या रांगा हळू हळू पुढे सरकतात. सागर किनारे-चौपाटी, तलाव  बाप्पासाठी सुसज्ज झालेले असतात…...
अंतर्मन बाप्पाचे-             विसर्जनसमयीच नव्हे, तर संपुर्ण उत्सवकाळात मौन धारण केलेल्या गणपतीबाप्पाकडे कोणाचे लक्ष तरी जातेय कां ? त्याच्या अंतर्मनात काय घालमेल चाललीय याची जाणीव करून घ्यावीशी कुणाला वाटत नाही कां ?
    श्रीच्या मंडपात विराजमान झालेली भव्य दिव्य मूर्ती चतुर्थीपासूनच मौन धारण करून बसलीय ! तीची नजर खाली गेलीय. हा उत्सवी थाटमाट आणि नुसता देखावा तीला नकोसा झालाय. आतल्या आत बिचारा बाप्पा कासावीस झालाय. चतुर्थीनंतरचे दहा दिवस तो कसे बसे ढकलतो आहे. अकरावा अनंत चतुर्दशीचा दिवस कधी उजाडतोय आणि कधी एकदा जलसमाधी मिळतेय असे त्याला झालेय.
         शेवटच्या दिवशीही त्याचे हाल होत आहेत, किती उदाहरणं द्यायची ?
कर्णकर्कश आवाजातले स्पीकर्स, आडवे तिडवे अंगविक्षेपी डान्स, दारू प्राशन केल्या नंतरच त्याला उचलायला येणारे कार्यकर्ते, खूपवेळ एकाच ठिकाणी रेंगाळणारी मिरवणूक, अन शेवटी रात्रीअपरात्री पाण्यात कशाही पद्धतीने त्याला ढकलून देणारे स्वयंसेवक. या सगळ्यां विषयी त्याच्या मनात प्रचंड चीड आलीय. तो रागावलाय. पण काय करणार तो ? त्याच्यातला जीवच हरवून बसलाय, शरीर तेवढे उरलेय !
         तरीही ही माणसं असं का बरं म्हणतात ? ‘ पुढच्या वर्षी लवकर या ! .
                                                                      ----------------------------💐चला कोकणात💐


💐चला कोकणात💐
              
             पावसाळ्यात, विशेषतः श्रावणात कोकण पहाणे हा एक अती सुंदर अनुभव असतो.  सण-उत्सवात रंगून जाणारी गावं, वाड्या तसेच, हिरवीगार दरी खोरी अन घाट रस्त्यांची निसर्गपखरण तुम्हापुढे सेवेला तत्पर असते.
                    पण या वर्षी पाऊसवारी मोठी होती. कोकणातल्या बऱ्याच नद्या नाल्यांना महापूर आले, आणि लहानथोर कोकणवासीयांची दैना केली. पिकं, बागा आणि गाई गुरांना, एवढंच नाही तर, पशुपक्ष्यांनाही मोठ्या संकटात टाकले.
                   अशाही परिस्थितीत आमचे कोकणी बांधव गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा करीत आहेत.
         या परिस्थितीत, कोकणासह अन्य सर्व भागातील, सर्व राज्यांतील  दुःखी बांधवाना या संकटातून बाहेर काढून, त्यांना चांगले दिवस लवकर दाखव, अशी देवा श्रीगजाननाकडे प्रार्थना करीत मी हे कोकणकोडे२ तुम्हापुढे ठेवीत आहे…….💐कोकणकोडे-/२०१९…….
१      
       १. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गाचे
     पूर्वीचे नाव काय ?
  .  कामण दुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  .  रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण पासून २०-२२ किमी. अंतरावर असलेले गाव,        
            जेथे मगरी पाहायला पर्यटक येतात ?  
  . भगवती देवीचे मंदिर कुठल्या किल्यावर आहे ?
  . तारापूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  . आचार्य विनोबा भाव्यांचे जन्मगाव ?
  .  ब्रम्हदेशचा राजा शिबा याला ब्रिटीशांनी कोठे ठेवले होते ?
  .  वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून महापराक्रम करून हिसकावून घेणारे मराठी    
            योद्धे कोण ?
  .  रत्नागिरी-पावस क्षेत्रात कुठल्या अध्यात्मिक संतांचा मठ आहे ?
  १०. कालनिर्णय कार जयंत साळगावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले श्रीगणेश   
           मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोठे आहे ?
   ११.  अप्रतिम आणि दुर्मिळ अशा चित्रे-पेंटिंग्सचे प्रसिद्ध म्युझियम रत्नागिरी  
           जिल्ह्यातील एका गावात आहे. त्या गावाचे नाव ?
  १२. १९९८ साली एका मराठमोळ्या गिर्यारोहकाने ‘एव्हरेस्ट’ शिखर सर केले,  या    
           यशस्वी नागरी शिखर मोहिमेत भाग घेणारा, मूळ गाव दापोलीचा साहसी    
           युवक कोण ?
  १३.  चिंतामणराव देशमुख(स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री) यांचे गाव ?
  १४.  श्रीक्षेत्र परशुराम कुठे आहे ?
  .  अंजनवेल(गुहागर) येथील किल्ल्याचे नाव ?
  १६.  वैभववाडी तालुक्यातील नाधवडे परिसरात असणारा बारमाही कोसळणारा हा    
         धबधबा पर्यटकांत प्रसिद्द आहे, त्याचे नाव काय ?
१७. मंडणगड किल्ला कुठे आहे ?
१८.  खेड(रत्नागिरी) मधून वाहणाऱ्या नदीचे नाव ?
१९. सावित्री नदी कुठल्या शहर परिसरातून वाहाते ?
२०. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापलेले पतित पावन मंदिर कुठे आहे ?
२१.  नेरळ-कर्जत(रायगड जिल्हा)च्या पेठ किल्याचे दुसरे नाव ?
२२. चंदेरी किल्ला कुठल्या परिसरामध्ये आहे ?
२३. लोकसभेच्या या भूतपूर्व सभापती होत्या आणि चिपळूणच्या सुपुत्री.
२४.  रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड जवळ एक अष्टविनायक देवस्थान आहे.
२५. गंभीर गड कुठल्या परिसरात आहे ?
२६. सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये देवी भगवतीच्या प्राचीन मंदिरा शेजारी प्रसिद्ध असलेला   
       विस्तीर्ण तलाव कोणता ?
२७. काळदुर्ग कुठे आहे ?
२८. कल्याण कोण-भिवंडी मार्गावर असलेला हा दुर्ग, येथे दुर्गा मातेचे जुने मंदिर   
       आहे. या दुर्गाचे नाव काय ?
२९. सर्जेकोट किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे आहे ?
३०. पोलादपूर ते चिपळूण प्रवासात कशेडी घाट लागतो. या घाटात असलेला हा
        छोटेखानी किल्ला कोणता ?
३१. छत्रपती शंभाजी यांच्या पत्नी येसूबाई यांचे माहेर कोकणात रत्नागिरी
       जिल्ह्यात कुठे आहे ? आणि त्यांचे माहेरचे आडनांव ?
३२. पेशवेकालीन धुरंदर नाना फडणीस यांचे जन्मगाव कोकणात कुठे आहे ?
३३.  कोकणातून बेळगाव,कोल्हापूर कडे वाहत जाणाऱ्या ‘हिरण्यकेशी’ नदीचे मूळ
       उगमस्थान सावंतवाडी तालुक्यात कोठे आहे ?
३४. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे या देवीचे मंदिर प्रसिद्द आहे.
३५. छत्रपती संभाजीराजे यांच्या काळात, आदिलशाही व मराठयांत झालेल्या एका
       लढाईत कोळी बांधवांनी देवळातील देवीची मूर्ती चिपळूण जवळील एका डोंगरात    
       मातीच्या ढिगाखाली सुरक्षित ठेवली होती. नंतर त्याच डोंगरात देवीची विधिव्रत    
       पुनर्स्थापना झाली, त्या देवीचे नाव ?

😢उत्तरे
     
      १.   घेरिया
      २.   ठाणे
      ३.   मालडोली
      ४.   रत्नागिरी(रत्नदुर्ग)
  .  पालघर
  . गागोदे(पेण)
  ७. थिबा पॅलेस-रत्नागिरी 
  ८. चिमाजी अप्पा
   . स्वामी स्वरूपानंद
  १०. मालवण(मेढा)
  ११. देवरुख
  १२. सुरेन्द्र चव्हाण
  १३.  रोहे
  १४. चिपळूण
  १५. गोपाळगड
  १६. नापणे-शेरपे
  १७. खेड
  १८. जगबुडी
  १९. महाड
  २०. रत्नागिरी
  २१. विकट गड
  २२. बदलापूर-वांगणी(ठाणे)
  २३. सुमित्रा महाजन
  २४.  श्रीबल्लाळेश्वर
  २५. तलासरी-जव्हार
  २६. धामापूर
  २७.पालघर
  २८. दुर्गाडी
  २९. मालवण
  ३०. कोंढवी
  ३१. शृंगारपूर, शिर्के
  ३२. वेळास
  ३३. आंबोली
  ३४. श्रीमहालक्ष्मी
  ३५. श्रीविंध्यवासिनी

विनंतीया माहितीत जर कोणत्या विसंगती आढळल्या तर,  त्या जरूर सांगाव्यात,
(संपर्क--७५८८७२७५२२/     yescharudatta@gmail.com)
                                                 ---------------------------