Saturday, 1 September 2018

💐थिएटरमध्ये💐


💐थिएटरमध्ये💐
              माझ्या  थिएटरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज शुभारंभी या ठिकाणी सादर होणार आहे एक छोटेसे नाटक. हे एक अंकाचेच असल्याने तुम्ही म्हणाल, ही तर एकांकिका आहे ! होय, ही  एक एकांकिका आहे. माझे हे पहिले नाट्यलेखन मला कितपत जमलेय ते तुम्हीच ठरवा.
           आज समाजात विशेषतः तरूणवर्गात व ग्रामीण महिलावर्गात मावा-गुटखा- तंबाखूयुक्त पान मसाला-खैनी यांचे व्यसन खूप वाढलेय. यातील तंबाखू आणि घातक रसायने शरीरात पसरून कॅन्सर सारखा भयंकर आजार हा समाज आपल्या अंगावर घेत आहे. हे सगळे भयाण आहे. अशा समाजात काही अंशी तरी जागृती व्हावी, म्हणून मी हे एकांकिका लेखन केलेय.
            माझे हे पहिलेच नाट्यलेखन आहे, हे कितपत जमलेय हे तुम्ही ठरवा.
                                                               💐कर्कमाला.......💐
           
                  ही एकांकिका एका मराठी टि. व्ही. वाहिनीवरील विशेष मुलाखतीच्या रूपात आपल्यापुढे येते. या वाहिनीचे नाव आहे ' व्ही.वाहिनी '. यामध्ये एकूण तीन पात्रं आहेत.
     १) टि. व्ही. निवेदक( पुरुष किंवा स्त्रीपात्र) २) तंबाखूसम्राट साहेबराव दांडगे.,३) तीन मृतात्मे(पुरुष पात्रं)

नेपथ्य मांडणी, वेशभूषा व कलावंतांविषयी:--
१. व्यासपीठावर एक टेबल व दोन खुर्च्या समोरासमोर ठेवाव्यात. पाठीमागे ' व्ही ' वाहिनीचा ठळक मोठा फलक असावा.
२. टि. व्ही. निवेदक बोलण्यात स्मार्ट व रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला हवा.
३. तंबाखूसम्राट साहेबराव दांडगे हे रांगडे जाडजूड अंगयष्टीचे व्यापाऱ्याच्या वेशातील अर्धा कोट/ओव्हर  कोट घातलेले असावेत.
४. तीन मृतातम्यांचा प्रवेश अगदी शेवटी आहे. त्यांना शक्यतो काळा कुळकुळीत ड्रेस म्हणजे माणसांच्या हाडांचे सापळे असलेला ड्रेस हवा. या तिघांपैकी एकाच्या हाती एक नकली मोठ्या खेकड्यांची माळ(रंगीत कागदी पुठ्ठ्यांची) किंवा इतर वस्तुंनी तयार केलेली असावी.
५. एकांकिका कालावधी:--सुमारे ३०/३५ मिनिटे.

                                                          ------------------------------
                                                                        प्रारंभ

 मुलाखतकार :--' व्ही वहिनी ' च्या सर्व रसिक प्रेक्षकांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्द उद्योजक आणि नुकताच
                       ज्यांना राष्ट्रीय स्तरावरचा ' तंबाखूसम्राट ' हा पुरस्कार मिळालेला आहे, असे माननीय साहेबराव दांडगे
                       येथे उपस्थित झालेले आहेत. व्ही वहिनीच्या वतीने मी साहेबरावांचे मनःपूर्वक स्वागत करतो
                       ( दोघांचे हस्तांदोलन होते ).
साहेबराव:--नमस्कार मंडळी(प्रेक्षकांकडे पाहात हात जोडत).
मुलाखतकार:--साहेबराव,आपले मी प्रथम हार्दिक स्वागत करतो.(पुन्हा हस्तांदोलन).
साहेबराव:--कशाबद्दल बुवा ?
मुलाखतकार:--अहो, आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार नाही मिळाला का, तंबाखू सम्राट म्हणून ? आज राज्याराज्यात व
                      गावागावात, एवढंच नव्हे तर देशभर तुमच्या ' मोक्ष ' कंपनीची तंबाखू वापरणारी शौकीन मंडळी तुमचा
                      उदोउदो करताहेत. त्यांना आपल्या या गौरवाबद्दल आनंदच झाला असेल ना ?
साहेबराव:--हो, हो, या सगळ्यांमुळेच मला माझ्या मोक्ष ब्रॅन्ड चा तंबाखू आणि गुटखा-मावामसाल्याच्या विक्रीचा  
                  रेकॉर्ड मोडता आलाय बरं का !
मुलाखतकार:--त्याची नोंद म्हणे गिनीज बुकच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालीय ?
साहेबराव:--होय, होय, त्यांचा मी आभारी आहे.
मुलाखतकार:--साहेबराव, आपण ही जी तंबाखू उत्पादने बनवीत आहात, ती खूप लोकप्रिय झालीत. काय आहे त्याचे      
                      वैशिष्ट्य एवढे ? म्हणजे काय काय असते हो त्यात एवढे ? जरा आमच्या या तंबाखू न खाणाऱ्या प्रेक्षकांना
                      तरी कळू ध्यात की !
साहेबराव:--सांगतो ना, ' मोक्ष ' तंबाखूचा ब्रॅन्ड म्हणजे अगदी कडक माल असतो बघा. माणसाला लगेच पकडतो बघा तो.
मुलाखतकार:--ऑ ! पकडतो म्हणजे ?
साहेबराव:--आमच्या तंबाखू आणि मावा-गुटखा, मसाल्यामध्ये छानपैकी सुगंध असतो. तो टिकायला ग्रेड वन केमिकल    
                  वापरतो आम्ही. आणि चव अशी की तबियत एकदम खुश !
मुलाखतकार:--व्वा ! काय म्हणता ?
साहेबराव:--अहो, लहान शाळकरी मुलं म्हणू नका, कॉलेजची पोरं म्हणू नका, आयाबाया अन सीनिअर माणसांचा आवडता                
                  ब्रॅन्ड आहे बघा ' मोक्ष ' म्हणजे !
मुलाखतकार:--पण ह्या तंबाखू-मावा-मसाला-गुटख्यामध्ये जहरी विष असते ना ?
रावसाहेब:--छे, छे, साफ खोटं आहे ते.
मुलाखतकार:--अहो, पण चांगल्या प्रयोगशाळेत तसे सिद्द झाले की ! हा तंबाखू-गुटखा-मसाला शरीराच्या आरोग्याला
                       घातकअसतो म्हणून ?
साहेबराव:--मी म्हणतो ना ? हा खोटा प्रचार चालवलाय काही लोकांनी....मला सांगा, तंबाखू थोडी जरी खाल्ली ना, तर        
                  केवढी ताकद येते शरीरामध्ये ? माहित्यय ? व्वा  ! काय सांगू !
मुलाखतकार:--कमालच आहे ही !
साहेबराव:--मग, आज कुठल्यापण शौकीन माणसाला विचारा की, तंबाखूत किती ताकद असते ती !
मुलाखतकार:--काय म्हणता काय साहेबराव ? अहो पण कितीतरी माणसांना या तंबाखू आणि गुटख्यामुळे तोंडाचे कॅन्सर
                      होऊन ते जीव गमावून बसलेत ना ?
साहेबराव:--अगदी साफ खोटं आहे ते. हा आमचा आणि तंबाखूचा घोर अपमान आहे बघा ! अहो, ज्यांनी कोणी जीव
                   गमावलाय त्यांना आम्ही थोडेच जबाबदार ? अहो, ते पूर्वीपासूनच आजारी असतील की !
मुलाखतकार:--पण मग, डॉक्टर मंडळी का सांगतात सारखी, की हा तंबाखू-गुटखा-मावा मसाला खाऊ नका, त्यामुळे कॅन्सर
                      होईल म्हणून ?
साहेबराव:--अहो साहेब, पुन्हा सांगतो, हा सगळा प्रचार खोटा आहे हो. आज सगळीकडे बघा. ज्याच्या त्याच्या खिशात
                   तंबाखूची नाहीतर मावा- गुटख्याची पुडी असतेच. का बरं ? अहो, साधा शेतकरी,कामगार-मजुरच नाही तर पार
                   सरकारी साहेबलोक आणि त्यांचे पी.ए. सुद्दा याचे शौकीन झालेत बघा ! उगीच घेतात का ते सांगा ?
मुलाखतकार:--अहो पण साहेबराव चांगल्या ग्रेडवन प्रयोगशाळेत देखील सिद्द झालेय की या तुमच्या तंबाखूमध्ये विषारी
                      पदार्थ असतात म्हणून ? शिवाय गुटख्यात आणि मावा मसाल्यात माणसाच्या शरीराला मारणारे केमिकल्स
                      आढळलेत ना ?
साहेबराव:--बिलकुल खोटे आहे, आम्ही पण चांगल्या प्रयोगशाळेत आमचा माल तपासून तो ग्रेडवन असल्याचं सिद्द केलेय
                  की ! काही हानी, नुकसान होत नसते बघा या खाण्यामुळे.
मुलाखतकार:-मग प्रत्येक पाकिटावर तुम्ही का छापता बरे, तंबाखू आणि तंबाखूयुक्त  पदार्थांचे सेवन आरोग्यास
                     अपायकारक आहे म्हणून ?
साहेबराव:--काय करणार साहेब, तसा कडक नियम केलाय ना सरकारने ! म्हणून छापावे लागते. बघा हे पाकिटावर. पण
                  तुम्हाला एक सांगू ? आमचे प्रत्येक गिऱ्हाईक यामुळे नेहेमी ताजे आणि तरतरीत राहते बघा.
मुलाखतकार:--साहेबराव, या तूमच्या म्हणण्याला खरं मानायचं ? की पाकिटावरच्या सरकारी इशाऱ्याला खरं मानायचं ? हा
                      आज मला स्वतःला आणि आमच्या या लोकप्रिय वाहिनीच्या प्रेक्षकांना मोठा प्रश्न पडलाय. यावर तुम्ही
                      काय ते स्पष्ट बोला बघू.
साहेबराव:-लोकांचा सरकारवर नव्हे तर आमच्यावर जास्त विश्वास आहे बघा !
मुलाखतकार:--ते पण खरंच आहे की !
साहेबराव:--उगीच का एवढा मोठा ' तंबाखू सम्राट ' पुरस्कार मिळालाय आम्हाला ? अहो, तुम्हाला परत सांगतो, ह्या वस्तू    
                  खाऊनच खूप लोकं ताजीतवानी होतात. ताकद येते बघा त्यांच्यात ! पुरस्कार देणाऱ्यांनी या सगळ्याचा नीट
                  विचार केलाच असेल ना ? म्हणून तर....
मुलाखतकार:-बरं, मान्य करतो हे. पण मग तुम्ही स्वतः पण तंबाखू, मावा-गुटख्याचा आस्वाद घेत असालच की नाही ? कारण
                    तुमचे हे आरोग्य तर आम्हाला चांगले तगडे आणि निरोगी दिसतेय..
साहेबराव:--(हात जोडत नमस्कार करीत) आभारी आहे.(आता प्रेक्षकांकडे पाहात) अहो, हे आरोग्य माझ्या साऱ्या
                   गिऱ्हाईकांच्या कृपेमुळे मिळालंय मला.
मुलाखतकार:--काय म्हणता ? मी समजलो नाही ?
साहेबराव:--आपण काही तंबाखू बिंबाखू खात नाही बुवा !
मुलाखतकार:--ऑ ! काय म्हणता ? तंबाखू खात नाही तुम्ही ?
साहेबराव:--नाही, बिल्कूल खात नाही.
मुलाखतकार:--गुटखा,  आपला मावा-मसाला ? तो तरी ?
साहेबराव:--छे छे, नाही खात मी.
मुलाखतकार:--मग विडी, सिगारेटचे तरी व्यसन असेल तुम्हाला ?
साहेबराव:--अजिबात नाही. विडी, सिगारेट काहीच घेत नाही मी.
मुलाखतकार:--व्वा व्वा, छान ! प्रेक्षकहो पाहाताय ना तुम्ही ? आपल्या तंबाखू सम्राट साहेबरावांना कुठलेही व्यसन नाही.
                      अगदी निर्व्यसनी आहेत ते !
साहेबराव:--(प्रेक्षकांकडे पाहात) म्हणून तर मी असा निरोगी आणि धडधाकट आहे बघा !
मुलाखतकार:--पहा मंडळी, आपले साहेबराव किती धडधाकट आहेत. आपण त्यांना चांगले आरोग्य आणखी लाभू ध्या
                      म्हणून मनापासून शुभेच्छा द्यायला हव्यात नाही का ?
साहेबराव:--(हसून खुशीत येतो) आभारी आहे. तुमची सर्वांची कृपा आणि आशीर्वाद अशीच राहू देत....(उठायला लागतो)
मुलाखतकार:--थांबा थांबा, उठू नका तुम्ही. अजून एक प्रश्न राहिलाय विचारायचा.
साहेबराव:--(पुन्हा बसतो) तो कोणता ?
मुलाखतकार:--तंबाखू, विडी, सिगारेट घेत असताना जर तुम्ही एवढे निरोगी राहिलात ना ? मग जर रोज त्याचा आस्वाद
                      घेतलात किंवा मावा-गुटखा खात राहिलात, तर आहे त्यापेक्षा चांगले आरोग्य लाभेल की नाही तुम्हाला ?
                      अजून चांगले तंदुरुस्त व्हाल की साहेबराव तुम्ही ?
साहेबराव:--ऑ ! म्हणजे ?
मुलाखतकार:--साहेब,तुम्हाला चांगले शंभर वर्षाचे निरोगी आयुष्य लाभेल नां !
साहेबराव:--काही आवश्यकता नाही त्याची. उलट आता आहे तोच बरा आहे मी.
मुलाखतकार:--का बरं ?
साहेबराव:--एक सांगू तुम्हाला ? माझ्या आजोबांनी मरताना माझ्या पिताश्रीना सांगून ठेवले होते....
मुलाखतकार:--काय बरे सांगितले होते ?
साहेबराव:--आजोबा आमच्या पिताश्रीना मरताना म्हणाले होते-बाबा रे, या घरात तंबाखू, बिडी-काडी कोणीच खाऊ,पिऊ
                  नका बरं...
मुलाखतकार:--काय म्हणता ? नाव काय होते हो तुमच्या या आजोबांचे ?
साहेबराव:--बाबाजी त्यांचे नाव. ते म्हणाले होते की, लोकांना भेट म्हणून तंबाखू, बिडी-सिगारेट देत जा. त्याचा मोठा व्यापार
                  करा तुम्ही. पण आपल्या घरात कोणीच ते घेऊ नका.
मुलाखतकार:--हे छान आहे तुमचे. चांगलाच उपदेश देऊन ठेवला होता की तुमच्या बाबाजीनी !
साहेबराव:--परमपूज्य बाबाजींचे आदेश आमच्या पिताश्रीनी तंतोतंत पाळले.(वर आकाशाकडे बघत-जय बाबाजी,जय
                  बाबाजी..) आणि आता त्यांच्या आदेशांचे पालन मी करतोय...काय ?
मुलाखतकर:--प्रेक्षकहो, पाहिलेत नां ? बाबाजींचे हे तंबाखूसम्राट नातू एवढे मोठे कां झाले त्याचे रहस्य ?
साहेबराव:--(सर्वांपुढे हात जोडत) आभारी आहे मी आपला. ही सगळी आमच्या बाबाजींची कृपा बरं का ! हा आणि साऱ्या
                  तंबाखू-गुटखा शौकीनांची पण मेहेरबानी आहे हे मी विसरणार नाही...
मुलाखतकार:--तर प्रेक्षकहो, आमच्या व्ही वाहिनीतर्फे या मुलाखतीच्या निमित्ताने आज साहेबरावांचा आपण येथे विशेष
                      सत्कार करणार आहोत.
साहेबराव:--(एकदम खुशीत येऊन उभा राहातो व वर बघत) जय बाबाजी,जय बाबाजी..
मुलाखतकार:--(प्रेक्षकांकडे पाहात) आज येथे थेट स्वर्गातून काही तंबाखू शौकीन मृतात्म्यांचे आगमन आपल्या स्टुडिओत
                      झालेले आहे. त्यांचे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. (तीन मृतात्मे प्रवेश करतात. एकाच्या
                      हातात मोठी खेकड्यांची माळ असते.)
साहेबराव(थोडा सावरून बसतो. इकडे तिकडे बघतो.)
मुलाखतकार:--तंबाखूसाम्राट साहेबराव दांडगे यांचा विशेष सत्कार करण्यासाठी हे मृतात्मे आज येथे आलेत बरं का !
सर्व मृतात्मे:--(साहेबरावांना वाकून वंदन करीत उभे राहातात)
साहेबराव:--असू द्या,असू द्या...
मुलाखतकार:--( मृतात्म्यांना उद्देशून ) काय, तुम्ही सत्कार करणार आहात ना या साहेबरावांचा ?
पहिला मृतात्मा:--होय, होय, आम्ही या साहेबरावांसाठी खास स्वर्गातून एक ' कर्कमाला ' घेऊन आलोय बघा !
मुलाखतकार:--कर्कमाला ? म्हणजे ?
दुसरा मृतात्मा:--आज या साहेबरावांच्या कृपेमुळेच आम्ही आमची पृथ्वीवरची यात्रा लवकर संपवून स्वर्गात आलो. पृथ्वीवर
                        यांनी आम्हाला भेट म्हणून दिलेल्या कर्कामुळेच आम्ही सारे स्वर्गीय झालोय ना !
मुलाखतकार:--काय म्हणता काय तुम्ही हे ?
तिसरा मृतात्मा:--त्यांनी आम्हा सगळ्या शौकिनांना दिलेल्या कर्कांची एक ' कर्कमाला ' तयार करून आज साहेबांना आम्ही ती
                         अर्पण करणार आहोत.
मुलाखतकार:--बापरे ! हे तर सगळे जिवंत खेकडे आहेत तुमच्या माळेत !
साहेबराव:--(दचकत सावरून बसतो).
सर्व मृतात्मे:--(साहेबरावाभोवती घेराव घालीत त्यांच्या गळ्यामध्ये ती ' कर्कमाला घालतात). साहेबराव अमर रहे ! साहेबराव अमर रहे ! (साहेबराव जोरात किंचाळत) मेलो,मेलो...(ते तिथेच खुर्चीत कोसळतात).
सर्व मृतात्मे:--तंबाखूसम्राट साहेबरावांचा आत्मा अमर होवो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो....(म्हणत निघून जातात).
मुलाखतकार:--व्ही वाहिनीवरील सर्व प्रेक्षकांनो, आपणही आता साहेबरावांना श्रद्धांजली वाहूया..
                      (उभा राहुन नमस्कार करतो).
                                                                   
                                                                 समाप्त
                                                     ----------------------------------                                                                                  
                 🌹महत्वाची टीप-  ही प्रबोधनपर एकांकिका जर आपण कॉलेज किंवा इतर कोणत्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून ' प्रयोग' म्हणून  ती सादर करणार असाल तर आपले स्वागतच आहे. मात्र आवश्यक ते प्रमाणपत्र शासनाकडून अजून  यायचे आहे. त्यामुळे स्वारस्य असलेल्या संस्था/मंडळांनी संपर्कात राहावे.🌹
                        🌹इमेल--yescharudatta@gmail.com व  ७५८८७२७५२२.🌹
                                         

💐धार्मिक, पण मार्मिक💐

💐धार्मिक, पण मार्मिक💐
                   हिमालयीन आणि सह्याद्रीतील  गिरीभ्रमण करताना धार्मिक व प्राचीन क्षेत्रांचे जवळून दर्शन झाले. चांगली गोष्ट म्हणजे त्यामुळे  माझ्या ज्ञानकक्षा विस्तारण्यात मदत झाली आणि इतर धर्मीयांकडे  पाहण्याची माझी दृष्टी  निर्मळ होऊ लागली. कधी सिक्कीम-दार्जिलिंग तर कधी हिमाचल, कधी समुद्रसफर थेट अंदमानला ! तर कधी गुजरात-कच्छ आणि राजस्थानला.
                     आज या मुसफिरीत मी तुम्हाला दर्शन घडविणार आहे, साधू-ऋषी मुनींचे माहेर घर म्हणून देशभर परिचित असलेल्या ऋषिकेश-हरद्वार नगरींचे ! चला तर,........                                          💐ऋषिकेश-हरद्वार: साधु, संन्याशांचे माहेरघर........💐

              उत्तरांचल हे हिमालयीन गिरीशिखरांची मनोहर सफर घडविणारे प्रमुख राज्य आहे. तेथे ्प्रवेश करण्यापूर्वी दोन महत्वाची छोटेखानी अशी धार्मिक शहरे  आपल्याला वाटेत लागतात, ती म्हणजे ऋषिकेश  आणि हरद्वार.

             ऋषिकेशची उंची फक्त ३४० मीटर आहे. साहजिकच येथे हिमालयाची थंडी आणि बर्फ बिलकुल नाही. या छोट्या शहरात मठ-धर्मशाळा, मंदिरे, गंगेचे घाट, धार्मिक पीठे,  छोटी मोठी दुकाने, हॉटेल्स,  आणि भव्य गुरुद्वारा आहे.
               ऋषिकेशमधील एका प्रसिद्द अशा शीख गुरुद्वारामध्ये आम्ही मुक्काम केला होता. याचे विस्तीर्ण प्रांगणात लंगर, निवासी इमारती, मोठा तलाव व गुरू ग्रंथसाहेबांचे पठणगृह व मंदिर आहे. आमच्या गिरिभ्रमणातील सर्वात स्मरणीय मुक्काम या गुरुद्वारात झाला.
               कुठलीही जात धर्म न विचारता आथित्य करणाऱ्या शीखबांधवांना कोण विसरेल ? या ठिकाणी आपली निवास व भोजनाची(प्रसाद स्वरूप) उत्तम व्यवस्था असते. मात्र आपल्याला येथे राहताना काही महत्वाची पथ्ये जरूर पाळावी लागतात- डोके उघडे ठेवायचे नाही, म्हणजे डोक्यावर पगडी, टोपी, रुमाल यापैकी काही असायला हवे. दाढी, केस कर्तन करायचे नाही. धूम्रपान व्यर्ज आहे.
             इथला प्रसिद्द लक्ष्मण झुला आम्ही पाह्यला. या मजबुत झुल्याचे काम १९३९ साली करण्यात आलेय. पूर्वी दोरखंडाने बांधलेला जीर्ण  लक्ष्मण झुला येथे होता. हजारो यात्रेकरू  त्याचा वापर करीत व गंगाघाटावर येत. पलीकडच्या तीरावर जाताना किंवा तेथून परतताना बरेचशे यात्रेकरू  या जीर्ण  झुल्यातून थेट खाली वाहणाऱ्या गंगेच्या प्रवाहात पडत. आता मात्र 'लक्ष्मण झुला'  उत्तम स्थितीत आहे. पर्यटक हा झुला पाहून प्रसन्न होतात. खाली प्रवाहात वाहणारे रंगीबेरंगी मासे पाहतात, त्यांना खाध्य टाकतात. इथे कुणीही झुल्याचे चित्र काढू नये असा फलक आहे. पण स्थानिक फोटोग्राफर बिनधास्तपणे फोटो काढून घ्यायचा आग्रह पर्यटकांना करतात !
           लक्ष्मण झुल्याच्या पलीकडे स्वर्गाश्रम नावाची एक उंच इमारत आहे. या इमारतीमध्ये अगणीत अशी छोटी मोठी मंदिरे प्रत्येक माळ्यावर सजली आहेत. अगदी दक्षिणेच्या श्रीरामेश्वरापासून ते नेपाळच्या पशुपतींनाथापर्यंत ! सारी इमारत पाच-सहा मजली असावी. या इमारतीच्या गच्चीवरून लक्ष्मणझुल्याचे मनोहर दर्शन होते. गंगेचे विस्तीर्ण व शांत पात्र दिसते. सभोवार दिसते ऋषिकेश शहर, तर एकीकडे दिसणारा शिवानंद झुला आपले मन आकर्षून घेतो.
           अध्यात्मिक संत व डिव्हाईन लाईफ सोसायटीचे आध्य संस्थापक स्वामी शिवानंद यांची स्मृती म्हणून सरकारने शिवानंद झुलाची निर्मिती केली. पर्यटकांची येथे वर्दळ असते.  स्वर्गाश्रमाजवळ गंगेचा घाट आहे. त्याचे बाजूला गीता भवन आहे. गीता भवनात भगवद्गीतेविषयी सर्व वाङमय, रामायण, महाभारत इ. चे संदर्भ ग्रंथ संग्रहित केले आहेत. ऋषिकेश मध्ये बाबा कमळीवाला यांची धर्मशाळा व आश्रम आहे. मंदिर आणि आश्रम, मठ-धर्मशाळा सर्वत्र आहेत.
           अशा या सुंदर शहराचा निरोप घेऊन हरद्वारला निघालो. हे अंतर आहे २३ कि.मी. इतके व बसप्रवास  तासाभराचा.
           हरद्वार हे  सुद्धा छोटेसे धार्मिक शहर आहे. मात्र गजबजलेले शहर आहे. इथे रस्त्याच्या दुतर्फा दिसणाऱ्या इमारती, दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हरद्वार रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या विष्णुभवन नामक धर्मशाळेच्या इमारतीमध्ये आम्ही मुक्काम केला.
           हरद्वार नगरीला मायापुरी हे प्राचीन नाव होते. हिंदू भाविक चार धाम यात्रेची सुरुवात या क्षेत्रापासून करतात व पुढे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री व यमुनोत्रीकडे वाटचाल करतात.


                   या पवित्र क्षेत्री काय नाही असे नाही ! सप्तर्षी आश्रम, पवनधाम, दुधधारी मंदिर, भिमगोडा, गंगेचा घाट, गौरीशंकर महादेव, दक्षप्रजापती हनुमान, विलकेश्वर महादेव,चंडी देवी, मानसादेवी, भारतमाता, अशा नावांची कितीतरी देव-देवतांची देवालये इथे आहेत. कुंभमेळ्याबद्दल प्रसिद्द असलेले ब्रम्हकुंड, हरकी पैरी या नावाने प्रसिद्द असलेला गंगेचा घाट येथेच आहे.

           हरद्वारला सर्व स्थळे पाहायला दोन दिवस पुरतात. इथली महत्वाची स्थळे दोन आहेत-हरकी पैरी(श्रीगंगा घाट) व मानसा देवी. हरद्वारला गेलात तर ही दोन ठिकाणे  तुम्ही जरूर बघा. मानसा देवीचे मंदिर एका टेकडीवर आहे. कश्यप ऋषींची ही कन्या-बंगाली बांधव या देवीला फार मानतात. साहजिकच त्यांची वर्दळ येथे असते. या प्रसिद्द मंदिरास आपण दोन मार्गांनी जाऊ शकतो. एक पायवाट आहे, तर दुसरा उडनखटोला ! म्हणजेच रोपवे. या रोपवेनेच बहूतेक पर्यटक मंदिराकडे येतात.
          कुंभमेळ्यासाठी साऱ्या देशात प्रसिद्द असलेला 'हरकी पैरी' हा घाट वर्षभर गजबजलेला असतो. गंगेच्या पवित्र प्रवाहात हजारो भाविक स्नान करतात. पूर्वजांचे श्राद्द, अभिषेक व इतर धार्मिक विधी या ठिकाणीच व्हावेत ही कितीतरी  भारतीय व परदेशीय हिंदू भाविकांची मनोमन इच्छा असते. त्यासाठी ते हरद्वारला येतात. दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो आणि सहा वर्षातून एकदा अर्धकुंभमेळा ! या प्रसंगी यात्रेकरुंची येथे अलोट गर्दी होते. घाटावर जिकडेतिकडे ्श्रीगंगाजी मंदिरासमोर गंगाजलाचा पूजाविधी आपण पाहातो. भाविक ते गंगाजल घरोघरी नेतात.
           हरद्वारला खरेदी करण्यासारखे खूप आहे. इथे  लोकर मुबलक मिळते. लोकरीचे तयार कपडे, रेशमी शाली, पंचे, बनारसी साड्या, तसेच तांब्या-पितळेच्या आणि कांस्य धातूच्या कलात्मक वस्तुसुद्दा मिळतात, त्याही वाजवी भावाने ! हरद्वारला खाण्याची देखील चंगळ आहे बरं का ! दुधातुपातली मिठाई, गोड मठ्ठा दही, लस्सी,  चविष्ट(पण शाकाहारी) जेवण, सर्वत्र मिळते.
           अशा या ऋषिकेश-हरद्वारला राहिल्यानंतर माझी हिमालयीन मोहीम खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाली असे मी म्हणेन. याचे कारण, शुभ्र धवल हिमालयीन हिमशिखरांच्या सानिध्यात स्वतःला विसरून जायला होते. एवढेच नव्हे तर, या वाटेत येणारी कुठल्याही धर्माची  तीर्थक्षेत्रे  मला आपलीशी करतात आणि तेथील  देवमाणसांची आतिथ्यशीलता माझ्यातील  देव जागा करतात.
                             


                                                            ______________________💐मनभावन गीत, कविता, अन गाणी💐

💐मनभावन गीत, कविता, अन गाणी💐

                याच महिन्यात १३  सप्टेंबरला  श्रीगणराजांचे आगमन अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात होणार आहे. आणि
मग?   मग काय ! बाप्पाच्या संगतीत समस्त  भाविक आपले वय, जातपात,  धर्म विसरुन , आपल्या व्यथा आणि दुःख
विसरून  श्रीगणेशोत्सवात उत्साहाने न्हाऊन निघतील. आनंदाच्या डोहात तरंगत राहातील.
              अशा या, सर्वाना ऊर्जा  देऊन आनंदात ठेवणाऱ्या  श्रीगणराजाला माझे त्रिवार वंदन !
              याक्षणी मला आठवताहेत ते  ’ वाहतो ही दुर्वांची जुडी ', या एकेकाळी गाजलेल्या मराठी भावस्पर्शी नाटकातील काव्यमय गीतामधील शब्द.....

                       


                                 💐वाहतो ही दुर्वांची जुडी.........💐

                                      ॥  वाहतो ही दुर्वांची जुडी ॥
                                          गजाननाला वंदन करुनी
                                         सरस्वतीचे स्तवन करोनी
                                         मंगल शिवपद मनी स्मरोनी
                                         सदभावाने मुदित मनाने
                                         अष्टांगांची करून ओंजळ
                                         वाहतो ही दुर्वांची जुडी ॥

                                         अभिमानाला नकोच जपणे
                                         स्वार्थासाठी होऊन घालव मनुजा
                                         जीवन हे हर घडी
                                         वाहतो ही दुर्वांची जुडी ॥

                                         विघ्न विनाशक गणेश देवा
                                         भावभक्तीचा हृदयी ठेवा
                                         आशीर्वाद हा द्यावा मजला
                                         धन्य होऊ दे कुडी
                                         वाहतो ही दुर्वांची जुडी ॥

                                         पार्वतीनंदन सांगून-सागरा
                                         शंकरनंदन तो दुःख हरा
                                         भजनी पूजनी रमलो देवा
                                         प्रतिमा नयनी खडी
                                         वाहतो ही दुर्वांची जुडी ॥
                                                                           
                                                                     --कवी व थोर नाटककार, स्वर्गीय बाळ कोल्हटकर.