Sunday, 1 July 2018

💐मनातलं जनांत💐

💐मनातलं जनांत💐

           आठवतेय १९८२ साल ?  आणि जानेवारी महिन्यातली १८ तारीख ? याच दिवशी गिरणी कामगारांच्या संपास सुरुवात झाली. अजूनही तो मिटलेला नाही !(कायद्याच्या नजरेतून). आज या घटनेला ३६ वर्षे होऊन गेलीत. हजारो गरीब,गरजू कामगारांची पार वाताहात करून टाकली या संपाने.
           मात्र या संपात तग धरणारे कामगार आणि त्यांचे परिवार अजुनही वाटचाल करीत जीवनाची रहाटगाडी ओढत, ढकलत पुढे चालले आहेत निर्धाराने. या संपाचे राजकारण करणारे काही राजकीय पक्षआणि पुढारी त्यांच्या नितीप्रमाणे वागलेत. अन आताही वागत आहेत.
           मी संपापुर्वी मिलमध्ये कामाला होतो. मलाही या संपाची झळ बसलीय. त्यावेळचे मिलमधले वातावरण कसे होते, कामगार श्रम करताना काय अनुभवित होते, दुःख-सुख कसे झेलीत होते, याविषयी येथे लिहिण्याची माझी इच्छा आहे.

💐एका गिरणबांबूची गोष्ट.......

              कापडाच्या मिलमधली नोकरी करण्याविषयी तितकीशी आस्था कोणी बाळगत नाही. मिलचा कामगार म्हणजे फडतूस माणूस.’ गिरणीतला ना, मग तो गिरणबांबूच ',असे शेरे मी स्वतः ऐकले आहेत.
              अशाच एका मिलमध्ये मी तीन वर्षे काढलीत. वडील कामगार होते बिमिंग खात्यात. येथे धाग्यांची प्रचंड बिम्स येत असत. ते धागे एक लायनीत यावेत म्हणून छोटया अणूकुचीदार तारेने काम करावे लागे. बिमचा मोठा रोल मध्ये व दोन्ही बाजूस एकेक कामगार बसत. तारा आणि धागे एकाच रेषेत ना गुंतता  यायला हवेत अशा पद्धतीने काम चाले. या कामासाठी  नजर बारीक असावी लागते.
              जेवणाचा डबा घेऊन बहुधा रोज मी मिलमध्ये जायचो. वडिलांचे दोस्त म्हणत- ' आला, विठोबाचा बाप आला जेवण घेऊन ! ' , हे ऐकून हसायचो. मला गंमत वाटे.
               एकदा मिलमध्ये नोटीस लागली की, अप्रेन्टिस क्लार्कस हवेत. मी अर्ज केला. इंटरव्ह्यू ला बोलावले. इंटरव्यूमध्ये पास झालो. मात्र मेडिकलच्या  परीक्षेत, वजन कमी म्हणून बाजूला काढले ! मग धावाधाव करावी लागली. नंतर  मिलचे डॉक्टर म्हणाले-' वर्षांनंतर परत मेडिकल टेस्ट घेईन.' त्यानंतर कामावर हजर झालो.
              वर्षभरात मला गोडाऊन, रिंगवार्प, सोसायटी ऑफिस, अशा विविध खात्यातून फिरविले. आठवड्यातून एकदा लेक्चर्स होत. लालबागच्या ' एनटीसी ' ट्रेनिंग हाऊस मध्ये सगळे एकत्र येत असू. तिथे मजा यायची. लेक्चरपेक्षा दंगल जास्त ! शिकविणारे खास नव्हते. साहजिकच नोट्स लिहून घ्याव्या लागत. येथे मुलीही होत्या.चेष्टामस्करी करणारेही होते.
              मिलमध्ये भटकायला मिळायचे.कापड खाते, फोल्डिंग, रिंगवार्प, डाइंग वेस्ट रिकव्हरी, रेशन दुकान, वायंडिंग, अशी कितीतरी खाती पाहू लागली. तीथल्या माणसांशी ओळखी होऊ लागल्या, त्या वाढू लागल्या
              या मिलमध्ये क्लार्क म्हणजे राजा माणूस. कामगार आम्हाला मास्तर म्हणून हाक मारत. मानाने वागवीत. मी वडिलांच्या खात्यात गेल्यावर त्यांचे दोस्त आस्थेने, कौतुकाने बोलत. खूप बरे वाटे.
              मिलमध्ये कापड खाते महत्वाचे. पण त्या खात्यात उभे राहवत नसे. केवढा आवाज ! खटाखट खटाखट साचे चालत.
कोणी दोन साचे तर कोणी चार साचे चालवत. त्यांना नावं होती- दोन बाजु वाले, चार बाजू वाले !
              वीज कपातीचे दिवस होते. तेव्हा रिंगवार्प मध्ये होतो. सर्व कामगारांना बहुधा रोज लेऑफ द्यावा लागे. म्हणजे कामावर नुसती हजेरी लावायची व घरी जायचे ! काही भाग पगार मिळत असे. पण त्यासाठी हजेरी लागायची.
              कामात असताना इथे काहीजणांशी ओळख झाली. जुने सहकारी गमतीशीर होते. एक शेडगे नावाचे क्लार्क होते. इमानदार माणूस. दुसरे सुमंत शिंदे. माझी त्यांची विशेष दोस्ती होती. हा हरहुन्नरी माणूस. गायक,वादक, नाटकात पण कामं करायचा.
              इथे एक क्लार्क होता. नाव आठवत नाही.तो स्वभावाने थोडा कडक होता. तो तिरसटही होता. माझ्याशी मात्र हा चांगले वागे. तो जातीभेद मानायचा. याला जेव्हा पाणी लागे, चहा लागे, त्यावेळी याने सांगितल्यावर कामगार आणून देत. मात्र ठराविक जातीच्या कामगारांकडून तो हे काम करून घ्यायचा. इतरांकडून नाही.
             मिलच्या कॅन्टीनची आठवणही तशीच आहे. रोज जेवणासाठी कॅन्टीनमध्ये झुंबड उडे. उसळ, शेव,बटाटेवडे चहा आणि जेवण हे पदार्थ मिळायचे आम्हाला. ते सर्व अल्प दरात मिळायचे.


             कॅन्टीनमध्ये आयझेक नावाचा एक क्लार्क होता. टॉप कपड्यात राहायचा तो. पण त्याच्या तृतीयपुरुषी वागण्यामुळे पाहायला विचित्र वाटे.  दम देऊन कॅन्टीनच्या माणसांकडून आयझेक कामं करून घेई. याची जीभ तेज होती.  घाणेरड्या व हरतऱ्हेच्या शिव्या याला पाठ ! रोज भांडणे ठरलेली. पाहणारांची मात्र करमणूक असायची.  आयझेकचे चालणेही लोकनाट्यातल्या मावशीसारखे होते ! त्यामुळे तो असला की कॅन्टीनमध्ये धमाल यायची.
              आमच्या मिलमध्ये दसरा,  गोविंदा आणि हनुमान जयंती हे सण उत्साहात साजरे व्हायचे. दसऱ्याला सुट्टी असल्याने आदल्या दिवशी गिरणी पाहायला लोकांना आत प्रवेशासाठी परवानगी होती. मिलमध्ये जत्रेतला उत्साह यायचा.  त्या दिवशी सारे खाते सजवले जाई. गोंडयाची फुले, आंब्याचे टाळे, गुलाल, यांनी मिलचा परिसर फुलून जायचा. सगळेच उत्साहात वावरत. एका वर्षी मात्र त्या दिवशी चोरी झाली आणि आत सोडणे बंद झाले. दसऱ्याचा उत्साहपण मावळला.
              हनुमानाचे मोठे देऊळ मिलमध्ये होते. तेथे रोज रात्री आरती व्हायची. हनुमान जयंतीला तर भाविक कामगार देऊळ छान सजवीत. मोठी पूजा-आरती करीत. दरवर्षी गोकुळाष्टमीला असाच उत्साह असायचा मिलमध्ये. दहीकाला करीत कामगार बंधू  ' गोविंदारे, गोपाळा ' करीत धमाल नाचायचे. त्यांचेवर पाणी ओतणारे पण उत्साही होते. या वातावरणामुळे सगळेच आनंदाने वावरत असत.
             मिलमध्ये चुकार कामगारांचा देखील भरणा होता. त्यांची बसण्याची, विश्रांतीची जागा ठरलेली ! बिल्डिंगच्या कोपऱ्यात, कॅन्टीनच्या आडोश्याला, नाहीतर संडास-मुत्रीचा कठडा ! अशा ठिकाणी हे बिनधास्त विश्रांती घ्यायचे.
.            मी गोडाऊनमध्ये दोन महिने होतो. पण कामाला मूड लागेना. बरोबरची माणसं जास्त बोलत नव्हती. अपवाद ज्ञानेश्वर गावडे आणि एक धोतरवाले क्लार्क यांचा. पैकी गावडें नंतर नगरसेवक झाले.
             आमच्या मिलमध्ये युनियन होती आर.एम.एम.एस.ची. म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघ. त्यांची मेजॉरिटी होती. काही कार्यकर्ते मात्र तितकेसे चांगले नव्हते. लोकं तोंडावर शिव्या घालत. मोठा संप व्हायच्या अगोदर दत्ता सामंतच्या युनियनने शिरकाव केला. कामगारांमध्ये हाणामाऱ्या झाल्याचे नेहेमी कानावर येई. या युनियनच्या गेट मिटींग्स व्हायच्या. पहिली पाळी सुटायच्या वेळेला. गेटवर पुढाऱ्यांची भाषणं ऐकायला दुसऱ्या पाळीवर येणारे, पहिल्या पाळीचे कामावरून सुटणारे, अशा साऱ्या कामगारांची गर्दी व्हायची. रस्त्यावरून जाणारे-येणारे पण जोरदार भाषणबाजी आणि युनियनच्या घोषणा ऐकायला हटकून थांबत.
              मला एक वर्षाची एप्रेन्टिसशिप संपल्यावर ब्रेक मिळाला. एन.सी.टी.व्ही.टी. परीक्षेत नापास झालो. पास झाले त्यांना घेतले कामावर. नाराज झालो. पण काय करणार ?
             मिलच्या सोसायटी ऑफिसमध्ये काही महिने काम करायला मिळाले होते एप्रेन्टिसशिपमध्ये. त्यांचेकडे कंपनी व्यतिरिक्त बाहेरचा स्टाफ घ्यायची प्रथा होती. तेथे माझा नंबर लागला. महिन्याला पगार होता १३०/-रुपये. या सोसायटी ऑफिसमध्ये काम करताना मजा येई. एकेक नग होते. रामभाऊ गुरव, वेलींग मास्तर,प्रधान, बुधकर, शिकारखाने, आमले इत्यादी....खरोखर ही इरसाल माणसं होती ! रामभाऊ सगळ्यांचे दोस्त.
              छेड काढताना झाडून सारे विषय चर्चेला येत. प्रधान पक्के बेवडे होते. रोज सकाळी त्यांना प्यायला लागे. सायंकाळी पण तेच. त्यांच्या चेहेऱ्यावर मात्र नशा दिसायची नाही ! कामात ते हुशार होते. वेलींग हे वयाने सिनिअर. ते फारसे बोलत नसत. यांच्या अबोल स्वभावाने त्यांची हेटाळणी होई. मिलच्या सोसायटी ऑफिसमध्ये असताना एक सुंदर बाईची क्लार्क म्हणून नेमणूक झाली. सोसायटीच्या वतीने कामगारांच्या मुलांना जी शैक्षणिक मदत देण्याची योजना होती. ते काम आम्ही करीत असू. त्या दिवसात काही 'रसिक' कामगार या ना त्या कारणाने बाईला पाहायला येत. ही  बाई सुद्दा बोलकी होती.तीचे नाव होते  निलांबरी. ती काही मराठी नाटकातून कामं करायची. तिची नंतर येथून दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली झाली.
               सोसायटीचे प्रमुख(सेक्रेटरी) होते तावडे मास्तर. ते थोडे विक्षिप्त स्वभावाचे होते. दर दहा पंधरा दिवसांनीं त्यांना आपल्या केबिनमधल्या टेबल, खुर्च्यांची  दिशा बदलायची लहर यायची!  मग जवळच्या कामगाराला बोलावं, कपाट इकडुन तिकडे हलव, टेबल-  खुर्च्यांची फिरवाफिरव कर, असे प्रकार ऑफिसमध्ये चालत. हा समारंभ चालू असताना बाहेर चेष्टा मस्करीला ऊत यायचा.
              सोसायटीची मासिक सभा व्हायची. आम्ही आपले काम करीत राहायचो. त्या दिवशी चहा बिस्किटे खायला मिळत असे. सोसायटीऑफिसमध्ये असताना ओव्हरटाईम भरपूर मिळे. तेथे बॅकेसारखे काम चाले. बरीच माहिती ज्ञात होत होती. विशेष म्हणजे मोठमोठया रक्कमेच्या बेरजा मारताना डोके दुखायचे. मात्र हळूहळू सवय झाली. आमच्यातले एक्सपर्ट्स खातेबुकातील वरच्या कोपऱ्यात पेन्सिल धरून सरक्कन खाली आणीत. झाली बेरीज !
              सोसायटी होती कामगारांची. तेच कमिटी मेंबर्स. सारे काही त्यांचे. काही विक्षिप्त स्वभावाचे होते. निरक्षर देखील होते, पण जाणकार होते.

             येथे असताना दुसऱ्यांदा मी नापास झालो ! शेवटचा चान्स म्हणून पुन्हा परीक्षेला बसलो. यावेळी पास व्हावे लागले. कंपनीने परत इंटरव्ह्यु  घेतला आणि हंगामी क्लार्क म्हणून नेमणूक केली. काही महिन्यांनी प्रोबेशन ऑर्डर हाती पडली. आता मी पर्मनंट होणार होतो सहा महिन्यांनी ! हे सहा महिने संपले. ऑर्डर आज येईल, उद्या येईल, अशी वाट पाहिली.  हेडक्लार्कला भेटलो, तेव्हा, लवकरच ऑर्डर हाती देऊ असं  म्हणाले.
                 याच दरम्यान संप होणार अशी हवा उठली. दत्ता सामंतची युनियन जोरात होती. गेटवर पुन्हा सभा व्हायला लागल्या. संघाविरुद्द आवाज उठत होता. कामगार संभ्रमात पडत होती. जाहीर सभांचा त्यांचेवर परिणाम होत होता. १९८२ च्या जानेवारीत १८ तारखेपासून मिलचा बेमुदत संप होणार हे नक्की झाले.
                 झाले. सारे कामगार कायमचे  घरी बसले. आता माझे प्रोबेशन ही गेले  आणि नोकरीसुद्दा !
               या संपकाळात कामावर जाण्यासाठी आहि जण तयार होते. त्यांच्या भेटी संघाच्या पुढाऱ्यांनी घेतल्या. त्यांना मिलमध्ये नेण्या-आणण्याची व्यवस्था केली. मिलमध्ये राहायची सोय केली. लोकं आठवडा-महिनाभर तेथे राहू लागले. मी प्रयत्न केला असता तर संधी मिळाली असती. पण नाही गेलो.
              गिरणी संपाच्या दोन दिवस अगोदर एका खात्यात कामगाराचा भीषण मृत्यू घडला. मशीनची दुरुस्ती करीत असताना एक तरुण कामगार उसाच्या चिपाडासारखा यंत्रात सापडला आणि गेला ! खूप वाईट घडले हे.
              मिळचे कामगार बहुसंख्येने निरीक्षर. त्यामुळे साहजिकच फसविले जात. व्यसनी व कर्जबाजारूपणा होताच.  दर महिन्याच्या दहा तारखेला मिळणारा पगार वीस तारखेपर्यंत खतम ! मग पठाणाकडे खाते उघडून त्याच्याकडून भरमसाठ व्याजाने कर्ज घ्यावे, असे  सारखे व्हायचे. सोसायटीचे कर्ज काढून देणेकरी भागवणे हे तर नित्याचेच !
              १९८२ च्या गिरणी संपाने या अशिक्षित आणि कर्जबाजारी कामगारांचे फार हाल झाले. काहींनी गावचा रस्ता धरला, कोणी भिवंडी, आगरीपाडा, इथल्या छोट्यामोठ्या साच्यांवर कामं सुरू केली. तर काहीजण फेरीवाले, वडेवाले बनलेत. माझे  वडील खात्यातल्या कपातीमुळे आधीच निवृत्त झाले होते. मी संपानंतर सात आठ महिन्यांनी नोकरीस लागलो.
              सध्याचे दिवस मात्र मिलचा शेवट होऊन गेल्याचे दिवस आहेत. आता ज्या ठिकाणी आठदहा गिरण्या दिमाखात उभ्या होत्या,  त्या घोडपदेव-फेरबंदर भागात म्हाडाची मोठी वसाहत उभी राहिलीय,टॉवरच्या रूपात ! लोअर परळ भागात तर उत्तुंग टॉवर अन रंगीबेरंगी मॉल लोकांची गर्दी खेचत आहेत.
              आणखी एक विशेष सांगू ? मुंबई महापालिका आणि राज्य सरकार म्हणे गिरणी कामगारांची आठवण सर्वाना (अगदी बाहेरच्या पर्यटकांनाही) राहावी म्हणून भव्य असे संग्रहालय उभारण्याची योजना साकारत आहे !
                सारांशाने सांगायचे झाले तर, आज पर्यंत महाराष्ट्राचे म्यांचेस्टर म्हणून पूर्वी परिचित असलेल्या मुंबईतील कापड गिरण्या आता हद्दपार झाल्यात. उद्योगपतींनी  बिल्डर्सच्या मदतीने इथे मॉल आणि उत्तुंग टॉवर उभारण्याचा विडा उचललाय.  गिरणीमध्ये भरपूर कापडाची निर्मिती होऊन रशिया, अमेरिका, इत्यादी देशांत कापड पूर्वीप्रमाणेच निर्यात करावे, आपली मिल आधुनिक करावी, कामगारांनाही स्थिरता द्यावी, अशी इच्छा मालक वर्ग आणि कामगार संघटना, एवढेच काय, सरकारला, तसेच लोकप्रतिनिधींनाही मनापासून वाटतच नसावी...........

                                       ....................................

💐भटकंती विशेष.💐

💐भटकंती विशेष.💐

                 निसर्ग प्रेमी आणि साहसी सवंगडयांनो, सप्रेम नमस्कार,विनंती विशेष,
होय, विशेषच सांगायचंय तुम्हाला.
            दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलै महिन्यामध्ये १४ व १५ तारखेला मुंबईतील नामांकित संस्था-महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांनी राज्यभरातील डोंगरवेड्यांची वारी आयोजित केलेली आहे. या वारीचे यंदा सतरावे वर्ष आहे." गिरीमित्र संमेलन--२०१८ " या नावाची ही वारी  राज्यभरात प्रसिद्द आहे. या संमेलनात देशभरातीलच नव्हे, तर परदेशातील मान्यवरांची उपस्थिती असते. फिल्म्स-छायाचित्र यांचे प्रदर्शन असते आणि स्पर्धाही असतात संवाद-परिसंवाद देखील होतात. विविध गिर्यारोहण संस्थांचे सदस्य--पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून कार्यरत असतात
            चला तर, तुम्ही आम्ही, आपण सारेच या डोंगर वेड्यांच्या आषाढ वारीत सामील होऊया.........


                                        ॥  डोंगर वेड्यांची आषाढ वारी-२0१८ ॥


 💐स्वर्गस्थ💐

💐स्वर्गस्थ💐

                थोर गायक स्वर्गीय महंमद रफी यांचा स्मृतिदिन याच महिन्यात ३१  तारखेला आहे. माझ्यासारख्या लाखो श्रोत्यांना आपल्या सुमधुर आणि दर्दभऱ्या स्वरांनी सदैव तृप्त करणारे  महंमद रफी हे माझे अत्यंत आवडते गायक.
                रफीच्या स्मृतीला सलाम करताना,  या थोर गायकाने स्वरबद्द केलेल्या एका मराठी चित्रपट गीताविषयी गीतकाराने सांगितलेल्या स्मरणीय आठवणी तुम्हाला, त्यांच्याच शब्दांत सांगायच्या आहेत.........

                                                               💐रफी साहब................                                                                        
             
                      देशासाठी  लढणाऱ्या शौर्यशील जवानांवर एक चांगला मराठी सिनेमा तयार करावा, असे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या मनात आले आणि त्यांनी निर्माते प्रभाकर निंकळकरांसमवेत 'शूरा मी वंदिले ' या सिनेमाची निर्मितीही सुरू केली.
ते वर्ष असावे १९७५-७६ साल. या युद्ध पटाला संगीत देणार होते स्वतः श्रीकांजी. गीत लेखनाची जबाबदारी उमाकांत काणेकर व माझ्यावर होती. माझ्या तीन गीतांपैकी दोन कृष्णा कल्ले यांनी गायचे ठरले होते. राहिलेले एक गीत कोणी गायचे ? याचा निर्णय श्रीकांतनी घेतला नव्हता.
                  त्या गीताचे बोल होते--'अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको.........',या सिनेमातला खलनायक असतो एक पाकिस्तानी हेर! तो पकडला जातो. त्याचा उदासीपणा दर्दभऱ्या गीतातून व्यक्त होणार होता. गीत मराठी होते. पण त्यात काही शब्द हिंदी-उर्दू   असावेत, असे श्रीकांतनी अगोदरच सांगितले होते. ते लिहिण्यापूर्वी मला चाल ऐकविण्यात आली. त्याप्रमाणे मी गीत तयार केले. श्रीकांत अन निंकळकरानाही हे दर्द भरे गीत पसंत पडले. 'आपण हे गीत महंमद रफी कडून गाऊन घेणार आहोत. तोच हे गीत गायला फिट्ट आहे, ' असे श्रीकांत म्हणाले. मला खूप आनंद झाला . पुढे श्रीकांतनी रफीसमवेत भेट ठरवली आणि मला तयार राहायला सांगीतले.
              वांद्रे परिसरात पश्चिमेला महंमद रफीचे घर होते.मी, श्रीकांत आणि निंकळकर असे तिघेजण रफीच्या घरी गेलो. छान स्वभावाचा व हसतमुख, दिलखुलास बोलणाऱ्या रफीने आमचे स्वागत केले.नंतर श्रीकांतजींच्या  निर्देशाप्रमाणे आपल्या सुमधुर आवाजात ते गीत गायला रफीने सुरुवात केली. आम्ही तिघेही नादमुग्ध झालो ! खरोखर रफी तो रफीच. त्याला तुलना नाही.
                त्या सुमधुर गीताचा पुढचा टप्पा होता रेकॉर्र्डींगचा. ताडदेव ला फिल्मसेंटरचा स्टुडिओ होता.तेथे वेळात वेळ काढून संगीतकार मदनमोहन, स्वतः बाळासाहेब ठाकरे रफीचा आवाज ऐकायला आले होते. हे सगळे गौरवाचे क्षण मी कधी विसरणार नाही. गीताचे  रेकॉर्डींग परफेक्ट झाले. हे गीत खूप चालेल असा सगळ्यांचा अंदाज होता. तो खरा ठरला. अजुनही आकाशवाणीवर हे गीत ऐकायला जाणकार श्रोते आतुर असतात.
                'शूरा मी वंदिले ' चा प्रीमिअर शो गिरगावात सेन्ट्रल सिनेमामध्ये मोठ्या थाटामाटात प्रदर्शित झाला. रामकृष्ण उल्हाळ या उमेदीच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शन केलेला हा सिनेमा खूप चालला. गाणीही रसिकांच्या ओठी गाऊ जाऊ लागली. या सिनेमाचा नायक होता, सुनील रेगे(भारतीय जवान) , खलनायक होता रविराज(पाकिस्तानी हेर) आणि नायिका होती सरला येवलेकर या सगळ्यांनी सिनेमात जीव ओतून काम केले. आणखी एक विशेष म्हणजे रफीचे गीत पडद्यावर गाणारा नायक नव्हे, तर खलनायक-हेराच्या भूमिकेत(रविराज) होता !                            
                मात्र आजही त्या सिनेमातले रफीने गायलेले ' अरे हे दुःखी जीवा, बेकरार होऊ नको.....', हे सुमधुर पण दर्द भरे गीत ऐकणारे दर्दी श्रोते म्हणत असतील, ' वाह ! वाह ! रफीसाहब आपने तो कमाल कर दी...............'
                                                                                                             

                                                                         शब्दांकन:--विनायक राहातेकर(गीतकार)
                               संपूर्ण गीत:--
(चित्रपट-शूरा मी वंदिले, संगीत-श्रीकांत ठाकरे,स्वर-महंमद रफी, पडद्यावर गाणारा नट-रविराज.)

                 अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको.......
                  बरे ते नाही तुला पाश रेशमी कुठले
                 अखेरच्या घडीस हो मुष्कील तुटायाते
                 अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको........
                 अकेला तू तुला या जगात समजू नको
         
                मी बदनशीब असा, दुःख मला सामोरी
                कहाणी दर्दभरी लोक ऐकती लाखो
                हे फूल उमलले नव्हतेची सावली सरली
                कुणी ना हात दिला दूर राहिले धनको
                अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको.........
       
                तलाश रोज करी ध्यास घेतला पुरता
                मला ते प्यार हवे आणखी काही नको
                अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको......

                         .......................................