Thursday, 1 March 2018

🌺मनभावन कविता आणि गाणी🌺

🌺मनभावन कविता आणि गाणी....

                     या मार्च महिन्यात कविवर्य कुसुमाग्रज यांचा स्मृतिदिन  १० तारखेला आहे.  याच महिन्यात इतरही महत्वाच्या ऐतेहासिक घटना घडलेल्या आहेत---
          ----२०१८----
             ४ मार्च--------स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्मदिन-
                                  -फाल्गुन वद्य  तृतीया शके १५५१.--(१९ मार्च १६३०)
             ७ मार्च-------शिवरायांचे बालपणीचे गुरू  दादोजी कोंडदेव यांचा स्मृतिदिन--१६४७
             १७ मार्च------धर्मवीर छत्रपति संभाजी राजांचा स्मृतिदिन
                                 फाल्गुन अमावास्या(११ मार्च १६८९)
             १८ मार्च-----थोरले राजे शहाजी भोसले यांचा जन्म--१५९४
             २० मार्च-----शिवाजीराजे आणि सोयराबाई यांचे पुत्र श्रीराजाराम महाराज
                                यांचा स्मृतिदिन-१७००.
             ३० मार्च-----पुरंदर(पुणे-सासवड) किल्ल्यावर दिलेरखानाशी शर्थीने लढणारे
                                मुरारबाजी देशपांडे हे धारातीर्थी--१६६५
             ३१ मार्च-----शिवरायांचा स्मृतिदिन--चैत्र शुद्ध  पौर्णिमा शके १६०२.

                           या सर्व थोर मान्यवरांना अभिवादन करून मी कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहिलेले एक शौर्यकाव्य आपणापुढे सादर करीत आहे-----
                           
                                        काव्य शिर्षक--..॥.वेडात मराठे वीर दौडले सात॥

                         (स्वराज्याचे सरसेनापती-सरनौबत प्रतापराव गुजर यांनी सहा शूर शिलेदारांसमवेत २४ फेब्रुवारी १६७४(महाशिवरात्र) रोजी नेसरी खिंडीत बहलोलखानाच्या सैन्याशी टक्कर दिली व वीरमरण पत्करले. त्या शूर सेनानी आणि सैनिकांची ही आठवण.)

                 म्यानातून उसळे तलवारीची पात
                 वेडात मराठे वीर दौडले सात

                 ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
                 सरदार सहा सरसावुनी उठले शेले
                 रिकबीत टाकले पाय झेलले भाले
                 उसळले धुळीचे मेघ सात निमिषात

                 आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
                 अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
                 छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
                 कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
                 खालून आग, वर आग आग बाजुंनी
                 समशेर उसळली सहस्त्र क्रुर(krur) इमानी
                 गर्दीत लोपले सात जीव ते मानी
                 खग सात जळाले अभिमानी वणव्यात

                 दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
                 ओढ्यात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
                 क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
                 अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात..........
                                           ॥  कविवर्य कुसुमाग्रज.॥

                            -----------------------------------------------------------------
🌺लक्षवेधी......
                 मी एक गिर्या्रोहक आहे. मला गो.नि.दांडेकर या प्रसिद्ध  लेखकाविषयी खूप कुतूहल होते. कारण ते एक गिरिप्रेमी  आणि गिर्यारोहक होते. मान्यवरांच्या स्वाक्षरी गोळा करण्याचा माझा छंद. त्यामुळे गोनिदांशी संवाद साधण्याची एकदा संधी मिळाली.त्यांनी मला संदेशासह स्वाक्षरी दिली होती !
                 अशा या थोर माणसाची आपण मुलाखत का घेऊ नये ? हा मनात विचार आल्यावर त्यांचा पाठपुरावा करून त्यांचेशी प्रत्यक्ष साधलेला हा संवाद मी तुमच्यासमोर ठेवत आहे.
                 तिर्थस्वरूप गोनिदां उर्फ अप्पा यांना माझी विनम्र आदरांजली....

                                                        .......................
🌺मुलाखत गोनिदांची.............
(पूर्वप्रसिद्दी-जिद्द दिवाळी विशेषांक--१९८७).
                                        शिर्षक--साहसाचा अतिरेक नको..

                अायुष्यभर भटकत राहावे, निसर्गाच्या रम्य सहवासात राहून आपली दृष्टी सभोवताल पसरावी, चैतन्यमय निसर्गाचा आस्वाद घ्यावा व आनंदून जावे, हे कुणास आवडणार नाही ? सुदैव हे की आम्ही यासह्याद्रीच्या सानिध्यात आहोत.गिरीदुर्गांची भटकंती करून ऐतिहासिक वास्तू पाहू शकतो. थोडेसे कष्ट व मनाची ओढ असल्यास आम्ही आमचा वैभवशाली इतिहास वारंवार साकार करू  शकतो.
                 अशा या गिरिभ्रमणाची आणि निसर्गप्रेमाची चटक लागली की सुटता सुटत नाही.माणूस पार व ठार  वेडा होतो. छंदिष्ट होतो.
                 आपल्यासारख्यांची ही स्थिती तर दुर्गप्रेमी अप्पांचे(गो.नि.दांडेकर) काय? यंदा वयाची एकाहत्तरी गाठलेला हा मनस्वी व सह्याद्रीसारखा चिवट गिर्यारोहक अनेकांच्या हृदयात ठाण देऊन       बसला आहे.
                यामुळेच,अप्पांना भेटायची व मनमोकळ्या गप्पा मारायची मनीषा मी अनेक वर्षे बाळगून होतो. हा योग यंदा मे महिना अखेर जुळून आला.

                 जवळजवळ २५० किल्ले अप्पांनी पाहिलेत.काही तर अनेक वेळा.यात राजगड व रायगड हे प्रमुख.त्यांनी मनसोक्त भटकंती केलीय. आता ते शरीराने थकलेत. पुण्याला स्थायिक झालेत. पण, मनाला अजूनही भटकंतीची ओढ वाटतेय. एक तासाहून जास्त बोलत राहिल्यास त्यांना त्रास होतो. एकट्याला घराबाहेर भटकत येत नाही.
                 हे सर्व खरे असले,तरी त्यांचा अस्सल गिर्यारोहकाचा 'चार्म' काही अजून गेला नाही. ती रम्य सकाळ आम्ही त्यांच्या पर्वती(पुणे) जवळील निवासस्थानी घालविली. आम्ही आगाऊ न कळवता जातोय,याची खंत वाटली.पण त्यांच्या मात्र ते गावीही नव्हते! मनमुराद गप्पा झाल्या आमच्या...
               सध्या अप्पा रामदासस्वामींच्या दासबोधाचा अनुवाद करताहेत.
             अप्पांनी वयाच्या तेराव्या वर्षापासूनच भटकंती चालू केलीय.जन्मच एक किल्ल्याशेजारी (अचलपूर) झाला.गाडगेबाबांचा सहवास,नंतरची एकाकी परिस्थिती, यामुळे ही भटकंती वाढली.
            या गृहस्थाने अख्खा हिंदुस्थान पालथा घातलाय.काशी म्हणू नका,मथुरा म्हणू नका,अगदी चारी दिशांचे यांना ज्ञान! (अप्पांच्या पायात चक्र आहे,असे ऐकून होतो .प्रत्यक्षात ते नदिसल्याने निराश झालो.)
            अप्पांनी लिंगाणा सर केलाय,कर्नाळा केलाय,ते मच्छिन्द्र सुद्दा चढलेत!
संवाद---
💐दुर्गभ्रमण करताना आणखी काही स्मरणीय अनुभव असतीलच ते सांगा ना?
     -गिरिभ्रमणातील अनुभवांसाठी माझी 'दुर्गभ्रमण गाथा' वाचावी.
💐शासनाने ऐतिहासिक दुर्ग,प्रेक्षणीय वास्तु इ.वर कितपत लक्ष द्यावे?
    -सध्या लक्ष ठेवलेय तेवढे ठीक आहे. यापेक्षा अधिक नको.
💐अप्पा,तुम्ही बरेच दुर्ग पाहिलेत.या दुर्गांजवळील गांवे,तेथील लोक,निवासी इ.ना दुर्गस्थानाबद्दल आपल्या इतकी जवळीक वाटते का?
      -मुळीच नाही.त्यांना विशेष असे काही वाटत नाही.त्यांनी दुर्लक्षच केलेले जाणवते.
💐दुर्गांवर खासगी मालकी असावी का? उदाहरणार्थ, वाई जवळील पांडवगड. हा जवळजवळ एका पारसी गृहस्थाच्या ताब्यात आहे.
    -मला हे पटत नाही.दुर्गांवर खासगी मालकी नसावी.
💐आजच 'पुणे सकाळ' मध्ये एक वृत्त वाचले. सुमारगड(खेड) चढताना एका तरुण गिर्यारोहकास प्राण गमवावा लागला.  चुकीच्या, अवघड वाटेने चढताना हे घडल्याचा उल्लेख त्या वृत्तात आहे.तुमचे यावर  मत कोणते?
     -धाडसाचा अतिरेक झाला.लिंगाण्यावर सुद्दा हेच घडले.असे न व्हावे.
💐गिरीदुर्गांची भटकंती हल्ली बहुसंख्येने होते.हे कितपत योग्य?
    -गोतावळा फार नसावा.त्यामुळे निसर्गाचा पुरेसा आस्वाद घेता येत नाही.पाच/दहा जण जाण्यातच खरी मौज आहे.
💐अप्पा,तुम्ही वासोटा(व्याघ्र गड-सातारा) केलात का हो?
     -नाही. वासोटा राहिला पाहायचा.
💐कोकणच्या दुर्गांवर दुर्गप्रेमींची ओढ कमी आहे. असे का?
    -कोकणातील बहुतेक दुर्ग हे जलदुर्ग आहेत.यात 'खरे' भ्रमण फार कमी होते, हेच कारण !
💐अप्पा तुम्ही लिंगाणा,मच्छिन्द्र गड केलेत.या व्यतिरिक्त आणखी कोणते सुळके किंवा कडे चढलात ?
    -हिरकणी कडा,सुमारगड, वाघ दरवाजाचा ८00 फुटी कडा,गडदचा बहिरी,इ. केलेय.
💐हिमालयातील प्रसिद्द गिर्यारोहण संस्था गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्द प्रशिक्षण देतात. महाराष्ट्ात गिर्यारोहण करताना हे प्रशिक्षण कितपत उपयोगी पडेल?
    -महाराष्ट्ात याचा फारसा उपयोग होणार नाही.
💐दुर्ग भ्रमणावर आपण बरेच लेखन केलेत.कादंबऱ्या लिहिल्यात ते लेखन कोणते?
    -बरेच लिहिलेय.दुर्गदर्शन, किल्ले,दुर्गभ्रमण गाथा, छंद माझे वेगळे,इ. दुर्ग/निसर्गावर्णनात्मक पुस्तके, तर माचीवरला बुधा(राजमाची),वाघरू(राजगड),रानभुली,त्या तिथे रुखातली,इ.कादंबऱ्या लिहिल्या आहेत. जैत रे जैत(कर्नाळा),पवनाकाठचा धोंडी(तुंगी),या कादंबर्यावरून चित्रपट झालेत.
💐अप्पा,दैनंदिनी लिहिता का?
    -दैनंदिनी लिहीत नाही.
💐सध्या दुर्गभ्रमणाविषयी कोणते लेखन करता आहात?  
    -नाही.आता फक्त दोन प्रवास वर्णनात्मक पुस्तके लिहितोय,अमेरिकेतून जाऊन आलो,त्याविषयी व 'दक्षिण वारा' हे दक्षिण भारतातील भटकंती विषयी.
💐इतरांनी दुर्ग-भटकंती विषयी लिहिलेले कितपत चांगले वाटते? उदा.आनंद पाळंदे, प्र. के.घाणेकर.
     -दोघेही कसलेले गिर्यारोहक आहेत. दोघेही सुंदर लिहितात.घाणेकरांच्या लेखनात सविस्तर माहिती    असते.
💐'दुर्गभ्रमण' या विषयी व्याख्याने द्यायची निमंत्रणे आली तर जाल का ?
    -नाही.तब्येतीमुळे झेपणार नाही.
💐असे कोणते दुर्ग पहायचे राहून गेलेत की ज्यामुळे तुम्हास चुटपुट वाटते?
   -व्याघ्रगड, कमळगड,हे दोन पाहायला हवे होते.पण आता ते शक्य नाही.
💐तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे? असल्यास पुढच्या जन्मी कोण व्हावेसे वाटते?
   -पुनर्जन्म? तो मिळायचाच असेल, तर कुण्या गडाच्या भवताली वसणाऱ्या धनगरपोटी मिळावा,आणि त्या जन्मात किल्ले पहायची बुद्दी जागी असावी.
💐आणखी काय सांगावेसे वाटते?
   -तुम्ही तुमच्या दृष्टींतून दुर्गभ्रमण करा.तुमचे स्वतःचे मत ठरवा, माझी मते भिन्न असतील.अधिक भटका. दुर्ग पहा,आणखी काय?
             ' गोनिदां 'उत्तम छायाचित्रकार सुद्दा आहेत.हा अनुभव,त्यांनी छायांकीत केलेली निसर्ग दुर्गचित्रे पाहताना आला. मोठ्या आस्थेने त्यांनी हे सर्व दाखविले.साल्हेरचा किल्ला, राजगड,जंजिरा, सिंधुदुर्ग,रायगड,राजमाची,प्रतापगड इ.बऱ्याच किल्ल्यांची सुंदर छायाचित्रे वेगवेगळ्या कोनातून घेतलेली आम्ही पहिली.
              राजगडावरील घेतलेल्या एका ' लक्षणीय 'छायाचित्राचे(Against the Sun) त्यांनी लॅमिनेशन केलेय.त्यांच्या दिवाणखान्यात ते दिसते.  मोठ्या कष्टाने अप्पांनी जमविलेल्या तोफेच्या गोळ्यांची कवचे, रंगीबेरंगी प्रस्तर,शिंपले, सिंधुदुर्गात असलेल्या महाराजांच्या पादुकांचे ठशाचे नमुने, औरंगजेबाच्या वाड्यातील एक कलाकुसर(मातीची बांधीव) जंगली श्वापदांच्या कवट्या, शिंगे, दुर्ग राजमाचीवर सापडलेला एक अप्रतिम प्रस्तर(याचे मधोमध एक तिरपे छिद्र असून आपल्याला तेथे सफेद मोत्यांचे चमचमणे दिसते) ,
अजिंठ्यास सापडलेली एक उभ्या बर्फासारखी दिसणारी चमचमती प्रस्तराकृती व इतर बऱ्याच मौल्यवान वस्तू आम्ही पहिल्या.

              फक्त तब्येत सोडल्यास ' गोनिदां ' अजूनही चिरतरुण भासतात. स्मरणशक्ती, दृष्टी आजही तीक्ष्ण आहे.
              आम्हा दुर्गप्रेमींना हा उत्साह, ही धडाडी,तो जोश, ते प्रेम, निरीक्षक दृष्टी व सुयोग्य मार्गदर्शन हवे, असे नाही वाटत ?

                           
                           .................................................................................


🌺मनातलं जनात................                                
                                                       आरसा मनाचा........

            वामन चोरघडे प्रसिद्द लेखक.त्यांचा एक हल्लीच वाचनात आला. विषय होता त्यांनी लिहिलेली दैनंदिनी.
            या मोठ्या व्यक्तीने बारीकसारीक नोंदी,भाषणे, व्यवहार,प्रवास इत्यादी तपशील लिहिलंय.हे दैनंदिनी लेखन परदेशात वेगळ्या अंगाने अभ्यासले जाते असे लेखकाचे मत.
            मला माझ्या दैनंदिनीची आठवण झाली.१००/१५० पाणी वहीच्या सुरुवातीच्या पानावर ' श्री ' काढुन श्रीगजाननाचे छोटे चित्र चिकटविलेले. एकीकडे तारीख दि.२२ जानेवारी १९७८.भारतीय सौर दिनांक २ माघ श्री शके १८९९. स्वतःचे संपूर्ण नाव लिहिलेले,
             आणि मी दैनंदिनी लिहिण्यास प्रारंभ केला.  लिहिणे रोज व्हायचे.वह्या सतत भरत होत्या. बारीकसारीक तपशील लिहीत होतो.आता वाचतो तेव्हा हसू फुटते.आपण एखाद्या विद्यार्थ्यांसारखे लिहिलेय. अमुक वाजता उठलो.ट्रेन पकडली.पोचलो.बसलो.अमुक वाजता जेवलो आणि झोपलो बस्स
             खास विषय,वाद,भांडणे, प्रकरणे, घरच्या कटकटी, सारे दैनंदिनीत आलेय. अजूनही लिहितोय. मात्र या लिहिण्यात खूप फरक पडलाय. फरक पडलाय म्हणजे काय झालेय ?   या नेहेमीच्या नोंदी कमी केल्यात. तोचतोचपणा बंद. उलट सर्व सामान्य विषयांचे लेखन आता होतेय. जवळचे मित्र, नातेवाईक,गिर्यारोहणाचे निमित्ताने होणार प्रवास, चांगल्या-वाईट विचारांच्या लहरी, मोठ्या व्यक्ती (सगळ्याच प्रसिद्द नाहीत,पण ज्यांच्याकडे काही आहे)  या साऱ्यांनी दैनंदिनीत हजेरी लावलीय.पूर्वी इतका नियमितपणा मात्र या लेखनात नाही.
             विचारांचा गुंता नेहेमीच डोक्यात असतो.बारीकसारीक गोष्टी सतावतात. कधीकधी तर वेड लागेल की काय असा भास होतो. स्वभावातला हा फरक इतरांनाही जाणवतो. त्यानंतर लिहिणे सुरू(suru)होते.
             जेव्हा प्रारंभ केला.त्यावेळी सुद्दा कधी सुरुवात करायची? केव्हा लिहायचे? असे नेहेमी चाले.  मग ठरवले की आपण आपला जन्म दिवस प्रारंभाला योग्य. इतर मोठी माणसं लिहितात,मग आपण का लिहू नये ? ही भावना या लिहिण्यामागे होती.
             मनातले ऐकायला सांगायला तेव्हा कोणी कोणी नव्हते.अजूनही खास मित्र-दोस्त आहेत,पण सारे ओपन करणे जड जाते.


             तेव्हा जास्त कोणाशी बोलत नसे. दोस्ती झाल्यानंतर अघळपघळ बोलणे होई. आता स्वभावात बराच फरक झालाय.भटकंतीमुळे ओळखी वाढतात. बोलल्याशिवाय जमत नाही.भडाभडा बोलणे होते. माणसाचा सहवास हवासा वाटतो.त्यांच्याविषयी ऐकायला आता आवडू लागलेय.
              घरच्यांना या लिहिण्याविषयी रस नव्हता.कोडे जरूर असावे.त्यांच्या हाताला वही लागू नये म्हणुन आडबाजूस लपवुन ठेवायचो.आता त्यांना चांगले माहीत झालेय की याचे लिहिणे चालूच असते. मात्र वही उघडण्याइतपत इंटरेस्ट त्यांना नाही.
              आताच्या लिहिण्यात नेहेमीची भटकंती,घरच्यांची भांडणे,स्वभाव,व्यवहार,कामातली माणसे,
घातअपघात, राजकारणाच्या हकीकती, पाहिलेले पिक्चर्स, नाटके,व्याख्याने, टीव्ही रेडिओचे कार्यक्रम,पुस्तकांचे वाचन,इत्यादी सारे आहे.वैयक्तिक मतभेद लिहिलेत खरे,पण जर वही प्रसिद्द झाली तर,इतरांचे वाईटपण घ्यावे लागेल.

            कॉलेजमध्ये असताना भरपूर वाचायचो. खांडेकर,जी.ए. कुलकर्णी,दांडेकर,् श्री..ज. जोशी, पेंडसे, इनामदार, रणजित देसाई, उद्धव शेळके, दळवी, र.धों. कर्वे,असे कितीतरी,या वाचनाचा परिणाम दैनंदिनीवर झाला.
             दैनंदिनीत लिहायचो-कादंबरी लिहावीशी वाटते,लघुकथा लिहावीशी वाटते,मग लगेच त्यांचे मुद्दे लिहीत असे. त्यानंतर सुचत नसे. निराशा होई. त्यापेक्षा हे सर्वसामान्य जगणे लिहिणे ठीक वाटे. काहीवेळा लिहिलेसुद्दा.
             अध्याप पर्यंत या दैनंदिनीच्या चारपाच वह्या झाल्यात.मध्येच एखादी वही वाचायला घेतो. धोपट मार्गाने लिहिलेले सुरुवातीचे भाग वाचताना गंमत वाटते. काही विशेष वाचताना त्या काळात जातो.
              हे दैनंदिनी लेखन करून आपण काय मिळवलेय ? नेहेमीच हा प्रश्न सतावतो. उगीच वह्या कशाला ठेवायच्या ?(पूर्वी एकदा टेन्शन मध्ये असताना पहिली वही समुद्रात टाकायला निघालो होतो.)
       
              मात्र बऱ्याच वेळा वाटते की हे जमविले ' धन ' आहे. ते जपून ठेवायला हवेय.चांगल्या अक्षरात लिहून टिकाऊ वहीत हे राहायला हवेय.
              त्या कामाला सुरुवात केलीय.

              महत्वाचे काय ? तर आपण नेहेमी आरशात पाहातो. तसेच,सभोवताली वावरताना,बोलताना वागताना या दैनंदिनीचा आधार मिळतोय.तोडलेली माणसं जोडावीशी वाटतात.जोडलेल्या माणसांच्या सहवासात सदैव राहावेसे वाटतेय. सभोवतालची परिचित, अपरिचित माणसं, मित्र-शत्रू,यांचे सध्या वाचन करतोय.त्यांच्या गाभ्यात शिरण्याचा प्रयत्न करतोय.जग सुंदर आहे असे म्हणतात. खरोखरच ते सुंदर आहे की नाही याचा पडताळा घेतोय.हे अनुभव घेण्यासाठी जे इतरांना निरर्थक वाटते ते अनुभवावे लागतेय.फिरावे-भटकावे लागतेय.
             मनात विचार सारखे असतात,आणि जेव्हा जेव्हा निराश होतो तेव्हा या दैनंदिनीच्या आरशामुळे खूप दिलासा मिळतो.उमेद येते.
            ' येणाऱ्या सुख-दुःखाला सामोरे जायला हवेय ' हे  वाटणे काय कमी आहे ?

                                          ............................................