Tuesday, 1 January 2019

💐मनभावन कविता💐

💐मनभावन कविता💐
       
           नववर्षाचे स्वागत करताना समाजमनात एकरूपता यावी, व या एकरूपतेतून स्नेहभावाचे सुवर्णफुल उमलावे की जे कधीच कोमेजणार नाही. हाच आशय सांगणारी ही मनभावन कविता...........
         
💐नको निबंधन..............
       
                    तुझ्या नि माझ्या घरा असावी
                    भिन्न दालने, एकच अंगण
                    भिन्न असावी नावे गावे
                    माथ्यावर पण एक निळेपण

मनामनातुन एकच श्रद्धा
जरी दैवते वेगवेगळी
जरी निराळ्या आशा भाषा
संस्कारांची एक पातळी

सुखदुःखा आकार निराळे
जीवभाव परि एक असावा
कौशल्याच्या तऱ्हा निराळ्या
कर्मयोग परि तोच असावा

तुझ्या नि माझ्या हृदयामधुनी
चैतन्याचे एकच स्पंदन
अभंग अपुल्या एकपणाला
स्थळकाळाचे नको निबंधन

                           (चंद्रफूल)
                           संजीवनी
( ' संजीवनी 'मराठे या जुन्या जमान्यातील सुपरिचित कवियत्री असून त्यांचे    
    भावगीत, बालगीतांचे संग्रह प्रसिद्द आहे )


                                ::::::::::::::::::::::::::::


💐हिमयात्रा💐

💐हिमयात्रा💐
             निसर्ग सहवास लाभावा म्हणून आपण रम्य अशा डोंगर-दऱ्या आणि हिरवाईने गच्च भरलेली जंगलं फिरू लागतो, भटकु लागतो. अन अशी भटकंती करता करता जणू निसर्गमयी होऊन जातो ! याच मनसोक्त फिरण्यातून साहस अंगावर घेत आपली पावलं नकळत सीमापार होतात. काळ्या कभिन्न सह्याद्रीच्या कुशीतुन थेट शुभ्रधवल हिमालयाकडे आपण झेपावतो !
            हिमालय: या कैलासपती हिमालयाच्या शिखररांगा जगभरात जवळपास पाच देशातून जातात. नेपाळ, चीन, भूतान, पाकिस्तान, आणि आपला भारत देश ! या भारत देशातील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड. या प्रदेशात हिमालयाचे अगाध वास्तव्य आहे. एकट्या उत्तराखंडात निळकंठ, स्वर्गरोहिणी, कामेत, शिवलिंग,  कालानाग, भगीरथ, मेरु (Meru), सुदर्शन, जोगीन, गंगोत्री, रुदुगैरा(Rudugaira), अशी मनोहर नावं असलेली उत्तुंग हिमालयीन शिखरं दिमाखात उभी आहेत !
           पण ही हिमशिखरं सहजसाध्य नसतात बरं का ! त्यासाठी साहसी गिर्यारोहण मोहिमा आखाव्या लागतात. खूप तयारी करावी लागते. सराव करून आपला अनुभव वाढवावा लागतो. चांगली टीम असावी लागते. आवश्यक सामान, गिर्यारोहणाची सामुग्री सोबत घ्यावी लागते. प्रथमोपचार व औषधे तसेच ताकद देणारे अन्नपदार्थही सोबत ठेवावे लागतात. येथे आपली कसोटी असते. मात्र  सर्व अडथळे पार करीत उत्तुंग अशा हिमशिखराचा माथा गाठण्याचे आपले लक्ष्य पूर्ण झाले की, जग जिंकल्याचा आनंद आपल्याला होतो ! अशी असते हिमयात्रा.

            आज आपण अशाच एका हिमशिखर मोहिमेची सफर करणार आहोत. चला तर...........

💐भव्य हिमालय तुमचा अमुचा......

   
         
          गढवाल परिसरातील रुदुगैरा(RUDUGAIRA). या १९,०९० फूट उंचीच्या उत्तुंग अशा हिमशिखरावर चढाईची मोहीम महाराष्ट्रात सुपरिचित असणाऱ्या साद माउंटेनिअर्स या संस्थेने आखली होती. त्यात मी एक सहभागी गिर्यारोहक होतो.
             या साहसी मोहिमेची तयारी तीन महिन्यांपासून सुरू होती. आवश्यक रेशन खरेदी, पॅकिंग,प्लॅस्टिकशीट्स, रेल्वे बुकिंग, आर्थिक मदत, गिर्यारोहण साधने मिळविणे, इत्यादी कामे वेगाने सुरू  झाली. कॅम्पिंग, खरेदी, गिर्यारोहण साधनांची जबाबदारी, पत्रव्यवहार, दैनंदिन अहवाल, वैद्यकीय सेवा, अर्थ-हिशेबाची जबाबदारी अशा सर्व लहानमोठ्या जबाबदाऱ्या सहकाऱ्यांवर सोपविण्यात आल्या आणि सुसज्ज होऊन  मोहिमवीर रुदुगैरामोहिमेवर निघाले.
              या मोहिमेत आम्ही एकूण अठराजण होतो. मोहिमेचे नेतृत्व स्वीकारले होते अनुभवी गिर्यारोहक राजन देशमुख याने. तर फिल्ड ऑफिसर होते, दिवंगत शिवसेना नेते आणि शिवभक्त आमदार (माजी कामगार मंत्री) साबीर शेख.
             मुंबईतून रेल्वेने प्रयाण झाले दिल्लीकडे, तेथून हरद्वार व नंतर उत्तरकाशीपर्यंत बसने प्रवास झाला.

             या उत्तरकाशीविषयी खूप सांगण्यासारखे आहे- हे छोटे पण महत्वाचे शहर आहे. येथे श्रीकाशीविश्वेश्वराचे भव्य व प्राचीन असे शिवमंदिर आहे. हिंदूंचे आध्य गुरू श्रीशंकराचार्य यांचे पीठ, जगात प्रसिद्द असलेली नेहरू  इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिअरिंग(NIM,), ही गिर्यारोहकांना शास्त्रशुद्ध  प्रशिक्षण देणारी मान्यवर  संस्था आहे.याच संस्थेचे प्राचार्य कर्नल जे.के.बजाज यांनी मोहिमेसाठी आवश्यक असलेली गिर्यारोहण साधने आम्हाला उपलब्ध करून दिली.
            उत्तरकाशीतले आमचे वास्तव्य तीन-चार दिवस होते. येथे संस्थेने शिवप्रभूंची जयंती उल्हासात साजरी केली. नंतर एका सुंदर अशा ठिकाणी पदभ्रमणाला जायचे ठरले. धोदिताल हे ते रम्य ठिकाण ! तेथे जाण्यासाठी उत्तरकाशी ते संगम चट्टी  असा एक तासाचा बस प्रवास करावा लागतो. त्यानंतर खरा ट्रेक सुरू  होतो.
           भरगच्च हिरवळ, मोठमोठ्या दऱ्या, जोशपूर्ण प्रवासाची नदी. एकीकडे सततची चढण. वळणदार पण काहीशा बिकट वाटातून पुढे जात राहायचे. पुढे आगोडा हे टुमदार गाव लागते. तेथे मुक्काम होतो. दुसऱ्या पहाटे सारे धोदितालच्या दिशेने प्रयाण करतात. वाटेत अचानक येणारा जोरदार पाऊस, कडाडणारी वीज आपले स्वागत करते. सगळे चिंब चिंब भिजतात. याच अवस्थेत धोदिताल जवळ येते. वाह ! काय सुंदर आणि नयनरम्य ताल(सरोवर) आपण पाहात आहोत ! शांत अन पारदर्शक जललहरी. सभोवताली शुभ्र हिमकणांनी तयार झालेले उंबरठे ! छोटासा लाकडी पूल. त्याखाली वाहात असलेले खळाळते पाणी व भुरुबुरु पावसाची रिमझिम बरसात ! सारे सहयात्री न्हाऊन निघाले या सोहोळ्यात.
            परतीच्या प्रवासात सगळा लवाजमा पुन्हा मजल दरमजल करीत उत्साहाने संगम चट्टीकडे निघाला. बसने पुढे उत्तरकाशीस आलो. इथल्या मुक्कामात, रात्री सर्व आवराआवर करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे दहा भारवाहक(Low Altitude Porters), दोन विशेष भारवाहक(High Altitude Porters), व अठरा सादकरी- असा एकूण तीस जणांचा गट बसने गंगोत्रीस निघाला.
               आम्हा भारतीयांच्या पवित्र गंगेचे उगमस्थान म्हणून प्रसिद्द असलेले गंगोत्री हे छोटे गाव १०,३०० फुटांवर वसलेले आहे. इथून पुढे १८ कि.मी.वर गंगेचा मूळ उगम असून त्यास ' गोमूख ' म्हणतात.ही वाट काहीशी दुर्गम असल्याने तेथे सर्वच यात्रेकरू जात नाहीत. गोमुखाच्या पुढे तपोवन-नंदनवन ही अतिशय सुंदर परंतु दुर्गम ठिकाणे आहेत. मात्र गिर्यारोहक आणि साधुबैरागी आणि परदेशी साहसी पर्यटकांची तेथे वर्दळ असते.
             गंगोत्रीमधील एका आश्रमात आमचा मुक्काम झाला. इथे गिर्यारोहण मोहिमेची सर्व पूर्व तयारी पूर्ण करून आमची टीम रुदुगैरा शिखराकडे निघाली. कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत आणि पाठीवर भारंभार ओझे घेतलेल्या सॅक्स वाहात सगळे जण शिखराकडे मार्गक्रमण करू लागले.
           सुरुवातीला मोठी चढण लागली. त्यापुढे छोटा लाकडी पूल होता. या ठिकाणी अवचितपणे आमच्यातील एकाच्या हॅवर सॅक मधील मोठा प्लास्टिक कॅन पडला आणि खालून वाहणाऱ्या रुदुगैरा उपनदीच्या जोरदार प्रवाहास मिळाला ! तो परत मिळण्याची आशाच नव्हती ! पूल सावधपणे ओलांडल्यावर पुन्हा चढण लागली. डावीकडे भयाण वेगाने वाहाणारी रुदुगंगा व उजवीकडे उंच कातळ, मातीचे ढीग, की जे कोणत्याही वेळी कोसळत ! या धुक्यामुळे सारी फलटण सावध चित्ताने वाट काढीत होती.
           सुदैव हे की, सभोवतालच्या बर्फाच्छादित निसर्गाचे मनोहर दर्शन होत होते. पुढे माळरानासारखे पठार लागले. अर्थात चढण होतीच ! हे सारे होईपर्यंत मध्यान्ह झाली. एव्हाना आम्ही ' खर्क ' या पहिल्या ठरलेल्या मुक्कामात असावयास हवे होते. परंतु हवामान व शारीरिक त्रास यामुळे येथे जवळपास असलेली जागा पाहून तळ ठोकायचे ठरविले. तंबू ठोकण्याची कामे सुरू झाली. बर्फाएवढी जागा कोठेच नव्हती. सगळीकडे भुसभुशीत बर्फ ! तेव्हा काहीशी बर्फाळ जागा पाहून तंबू ठोकण्यात आले.
           दिवसा बहुतेकण थंडीमुळे थरथरत होते. मग रात्रीचे काय ? स्वेटर, विंडचीटर, फेदर जॅकेट, यांचा आधार घेऊन थंडीपासून बचाव करण्यात आला. जेवण करताना पण धावपळ उडाली ! थंड वातावरणात स्टोव्ह लवकर तापत नाहीत. साहजिकच स्वयंपाक लवकर होत नाही. मात्र छोटा गॅसस्टोव्ह या बाबतीत उपयुक्त असतो. अर्थात तंबूत याचा वापर अतिशय सावधतेने करावा लागतो. चहा-कॉफी, जॅम-ब्रेड, ड्रायफ्रुट्स इत्यादी तयार अन्नपदार्थांचा आस्वाद घेतच साऱ्यांनी आपली भूक भागवली. असा हा दिवस नव्हे, रात्र आम्ही पहिल्या तळावर(Camp) काढली.
           दुसरा दिवस उजाडला. घड्याळात पावणे पाच वाजले होते. परंतु आसमंत आता स्पष्ट दिसत होता. उंचीवरील प्रदेशात सुर्यदर्शन लवकर होते. त्याचा हा परिणाम ! सकाळचे सारे सोपस्कार अगदी नाश्त्यासकट आटोपले व पुढे निघालो. ठरलेल्या दैनंदिन कार्यक्रमानुसार आज बेसकॅम्पवर पोहोचणे महत्वाचे होते. मजल दरमजल करीत ताफा पुढे निघाला. आमच्या पैकी काहीजणांना आता उंचावरील वातावरणाचा त्रास होऊ लागला. डोकं दुखणे,पायांना फोड येऊन  काहींची चाल मंदावली. चक्कर येणे, उलटी होणे, असे प्रकारही सुरू झाले.
           वाटेत एक उघडा गोलट आडोसा दिसला. छोटेमोठे खडक एकावर एक रचून तयार केलेले हे आडोसे मेंढपाळांसाठी उपयुक्त असावेत. या ठिकाणाला नाव होते- खर्क १ (उंची अंदाजे १३,५०० फूट).
          आता सभोवताली हिमकणांची नुसती बरसात होती ! गेल्या ऑक्टोबर मध्ये ' रुदूगैरा ' चा पायथा(Base Camp) याच मार्गाने गाठला होता. परंतु आता सभोवताली असणाऱ्या बर्फमय चढणीने वाट चुकतोय की काय अशी शंकाही मनी आली!  पण नाही. आम्ही योग्य वाटेवरच चालत होतो. कारण पुढे दूरवर स्पष्टपणे खुणावणाऱ्या बेसकॅम्पवरील उंच खडकांवर साऱ्यांचे लक्ष गेले. उत्साह वाढला.
          दुपारी १.३५ ला पहिल्या चारजणांनी बेस कॅम्प गाठला व खालच्या इतर साथीनी ' साद ' घातली. एकेक करीत तीन वाजेपर्यंत सारे वर आले. एव्हाना पुढच्या तुकडीने दोन तंबू योग्य जागी लावले देखील ! एकीकडे वाहणारा जोरदार वारा.  नुकताच चालू झालेला हिमवर्षाव, यातच उंचावरील वातावरणाचा शरीराला होणारा त्रास हा सारा अनुभव घेऊन
 ' साद ' ने मोहिमेचा पहिला टप्पा तर यशस्वी केला.
            सुमारे १६,००० फूट उंचीवर असणारा हा मुख्य तळ(Base Camp) तसा प्रशस्त आहे. पाच-सहा तंबू लावण्याइतकी जागा येथे असून जोरात वाहणारा वारा आपल्याला फारसा उपद्रव देत नाही. येथून आपल्याला जोगीन-१,२,३  व  गंगोत्री-१,२,३, या उत्तुंग हिमशिखरांचे मनोहर दर्शन होते.
          यावेळी आमचे भारवाहक(Low Altitude Porters) मित्र मुख्य तळावर येत होते. पहिल्या तळावरील सामान मुख्य तळावर  आणण्याची जबाबदारी त्यांचेकडे होती. पाहिल्या तळावर सामान बरेच असल्याने जमेल तेवढे या भारवाहकांनी मुख्य तळावर आणले.  शिवाय गंगोत्रीस अजून सामान होतेच. गंगोत्रीहून निघालेले काही भारवाहक आज पहिल्या तळावर थांबून उद्या मुख्य तळावर सारे सामान आणणार होते. मानेचे दुखणे अचानक उद्भवल्यामुळे आमच्याबरोबर गंगोत्रीहुन येऊ न शकलेला सहयात्री नाना पाताडे त्यांच्याबरोबर उद्या येणार होता.
           इकडे मुख्य तळावर एकीकडे स्वयंपाकाची तयारी चालली होती, तर दुसरीकडे चालून चालून थकल्यामुळे एकमेकाला तेलमालीश करणारे महाभाग होते, तर  एकदोघे या थंडगार हवेत नुकत्याच होऊन गेलेल्या हिमवर्षावामुळे स्वच्छ झालेला आसमंत न्याहाळत होते !
            साऱ्यांची जेवणे उरकली. उत्साहाने एकेकजण तंबूबाहेर पडू लागले. रात्र बहरण्यास प्रारंभ झाला व चांदण्याचे कवडसे पडून लखलखीत झालेला शुभ्रधवल ' हिमालय ' अवघ्यांच्या दृष्टीत मावेनासा झाला. सारे अभिमानाने त्याचेकडे पाहात होते आणि हा भव्यतम हिमालय स्वागतस्मित करून कौतुकाने आमच्याकडे पाहात होता !
           दुसरा दिवस उजाडला. आज पहिल्या तळावरून येणाऱ्या भारवाहकांना मदत व्हावी आणि येथील वातावरणाचा सराव व्हावा, या उद्देशाने आमच्यातील काहीजण (म्हणजे शारीरिक त्रास न झालेले ) पहिल्या तळावर निघालो. वाटेत काही भारवाहक मित्र भेटले. त्यांच्याकडील थोडाफार भार हलका केला. इतरांनी या तळावरील उरलेले सामान पाठीवर घेतले. पहिला तळ आवरून सर्वजण मुख्यतळावर निघाले. कठीण चढण , बर्फातील धोके, पाठीवर ओझे, इत्यादी सारे अनुभवीत मार्गक्रमण होत होते. हा त्रास आमचे फिल्ड ऑफिसर साबीरभाई यांना सहन झाला नाही. तेव्हा त्यांनी पहिल्या तळावरूनच  गंगोत्रीस परतण्याचे निश्चित केले होते. काल पहिल्या तळावर थांबून आज ते गंगोत्रीस परतले. मात्र साऱ्या साहस वीरांना शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत.
           मुख्य तळावरील सादकऱ्यांनी नानाचे उस्फुर्त स्वागत केले. मात्र भाईंना तब्येतीमुळे मोहिमेतून परत गंगोत्रीस जावे लागले, हे समजून सगळ्यांना हळहळ वाटली.
          सर्व सामान आता मुख्य तळावर आले होते. त्यामुळे भारवाहकांना(L.A.P.) परत पाठविण्याचे ठरले. त्यांनी अल्पोपहार केला व साऱ्यांना मोहिमेच्या शुभेच्छा देऊन ते गंगोत्रीस निघाले. आता या मुख्य तळावर सादचे सतरा जण, एक आचारी, दोन उच्च भार वाहक(H.A.P.) असा एकूण वीस जणांचा समूह होता.
           वातावरणाचा कल पाहून येथून टप्प्याटप्प्याने ' रुदूगैरा ' शिखर सर करण्याचा सादचा बेत होता. उद्या पहिली तुकडी पुढच्या तळावर निघणार असल्याचे जाहीर झाले. पूर्वतयारीही सुरू झाली. जरुरीचे सामान पॅक करणे, गिर्यारोहण साधने तपासणे इ. कामे आज करण्यात आली. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र, पुढच्या तळावर निघणे शक्य होईना. आसमंत आमच्यावर नाराज असावा. धुके, वाहाते वारे व हिमवर्षावाची शक्यता, ही लक्षणे म्हणजे वातावरण बिघडल्याची साक्ष होती. मीरा व देवी या दोघा अनुभवी गिर्यारोहकांशी चर्चा केल्यानंतर पुढच्या तळावर जाणे उद्यावर ढकलल्याचे मोहिमनेत्याने जाहीर केले.
          आज दिवसभर बर्फात गिर्यारोहणाचा सराव करायचा होता. बर्फात अपघात झाल्यास काय करायचे, आवश्यक असणारे दोर(Ropes), तसेच सुरक्षित गाठी बांधणे, बर्फात कुदळ(Ice Axe) योग्य तऱ्हेने कशी वापरावी इ. चे प्रात्यक्षिक सुरू झाले. सुरवातीस अपघात झाल्याचे प्रात्यक्षिक करताना कचरणारे, इतरांचे धाडस पाहून मुक्तपणे बर्फावरून घसरणे व कुदळीने स्वतःला सावरणे इ. सराव आता बिनधास्त करू लागले ! सारा दिवस यातच कारणी लागला.
           दुसऱ्या सकाळी आम्ही पुढच्या तळावर जाण्यास सज्ज झालो. अर्थात, सर्वचजण काही आज येणार नव्हते. एकूण दोन तुकड्या पाडण्यात आल्या होत्या. श्रीगणेशाची आराधना झाली व पहिली तुकडी पुढे निघाली. मुख्यतळावर राहाणारे साथी शुभेच्छा देऊ लागले.
           कठीण असलेली चढण, सभोवताली असणारी हिमकणांची वाट, नागमोडी पद्धतीने एकेकजण उभे जात होता. प्रत्येकाकडे बर्फातील कुदळ, पायात स्नोशूज, व थंडी-उन्हापासून बचाव व्हावा म्हणून फेदर जॅकेट, गॉगल्सही होते. स्नोशूजना अद्याप क्रेम्पोन्स( कठीण बर्फावर पाय उठून राहावं म्हणून याचा वापर होतो) बांधले होते.
          पावले संथपणे पण ठाम पडत होती. मात्र कधी अंदाज न आल्याने पटकन गुडघ्या इतके खड्यात जाणे(ते सुद्दा पाठीवरील सॅकसकट)  पाहिले. स्वतः अनुभव घेतला. अर्थात एकमेकांचे सहाय्य हा या साहसी मोहिमेतील महत्वाचा दुवा !
समोर काहीसे डाव्या दिशेस दिसणारे ' रुदुगैरा ' आम्हाला खुणावू लागले. साऱ्यांना काहीसा उत्साह वाटला. पावलंात थोडी गती आली.
          मध्यान्हीच्या वेळी आम्ही तळावर पोहोचलो.आमच्याबरोबर असणारे मीरा, देवी यांच्या मते इथेच मुक्काम असणे योग्य होते. तेव्हा आज या तळावर आपण राहाणार असल्याचे नेता राजन देशमुखयाने जाहीर केले.
             सपाट जागा कोठेच नव्हती. काहीशी सुरक्षित वाटणारी जागा पाह्यली व तीथे साचलेला बर्फ काढून,तर काही बर्फावर पावलांची ताकद वापरून तंबू लावण्याइतकी जागा करण्यात आली. सादचे छोटे तंबू(Dome Tent) दिमाखात उभे राहिले.    
                   वाहत्या वाऱ्याचा परिणाम होऊन तंबू उडून जाऊ नये म्हणून रोवलेल्या खिळ्यांवर मोठे दगड लावण्यास आम्ही विसरलो नाही. तंबू छोटे असल्याने सर्वांच्या सॅक्स व इतर सामान बाहेर उघड्यावर प्लॅस्टिक सीट्स अंथरून त्यावर ठेवले.वर चांगले आवरण घातले व तंबूत गप्पा ठोकायला जमलो.
          १७,५०० फूट उंचीवरील या इटूकल्या तंबूत दाटीवाटीने झोपण्याइतपत जागा झाली.आता साऱ्यांना भुकेची जाणीव झाली. वास्तविक उंचावर भूक मंदावते. पण आम्ही भक्षकांचे वंशज ! तेव्हा करणार काय ? बरोबर आणलेले लाडू, चकल्या, मिठाई,द्रायफ्रटस, चॉकलेट कॉफी, यांचा आस्वाद घेत चेष्टा विनोदाची मैफल जमविली व हळूहळू निद्राधीन झालो.
           दुसरा दिवस उजाडला. पहिली तुकडी रुदुगैरावर आरोहण करण्यास निघाली. मध्ये कोठलाही मुक्काम न करता थेट शिखरमाथा गाठून पुन्हा खालच्या मुख्यतळावर जाण्याचा साहसी बेत आमच्या नेत्याने जाहीर केला.

        एकूण नऊ जण पहिल्या तुकडीत होते. खरोखरच साहसी गिर्यारोहण होते हे. दूरवर दिसणारा शिखरमाथा जवळ यावा असं वाटत होतं. पण शिखर आहे तिथेच होते. सगळे सावकाशपणे चालत होते. बरोबर घेतलेल्या आईसएक्सचा वापर सावधपणे करीत एकेक जण शिखरमाथा जवळ करीत होता. मध्येच एका ठिकाणी काही प्राणी कळपाने वावरताना दिसले. स्थानिक लोक याला ' बरड ' म्हणतात. एकीकडे काहीजण उत्साहाने पुढे होत होते. तर दोन सादकऱ्यांना वातावरणाचा त्रास होऊ लागला. त्यांची गती मंदावली. इलेक्ट्रोल पावडर,फळांचा रस त्यांना देण्यात आले. थोडा उत्साह आल्यावर धीम्या गतीने ते पुढे निघाले. मात्र एकाला पुढे जाण्याचा त्रासच होऊ लागला. अखेर आमचा एक सहयात्री गुरुनाथ मालोडकर, याने त्याला मदतीचा हात दिला व ते दोघे खालच्या तळावर परतू लागले. त्यांना परतल्याचे पाहून इतरांची निराशा झाली. पण इलाज नव्हता. शिखर हळुहळू जवळ येत होते. एक कठीण वळण पार केल्यावर माथा लागला. हे होते ' रुदुगैरा २ ’ अजून अर्ध्या पाउण तासाचा अवधी असावा.
          दुपारचे दोन वाजले.सादचा साहसी गिर्यारोहक नाना पाताडे ' रुदुगैरा ’ हिमशिखरावर प्रथम पोहोचला ! नंतर इतरांनी क्रमाक्रमाने माथा गाठला. नऊपैकी सातजण शिखरावर पोहोचले.प्रत्येकजण दुसऱ्याचे अभिनंदन करीत होता. शिखरमाथा सुंदर आहे.पण इकडेतिकडे फिरण्यास योग्य नाही.प्रचंड उतरण असल्याने बर्फावरुन जरा पाय निसटला तर खोलवर असणाऱ्या बर्फाच्छादित दरीतच गश्चंती मिळेल, असे हे ठिकाण आहे. मात्र यावेळी हवामान चांगले होते. त्यामुळे सभोवतालची भव्य शिखररांग दिसू लागली. आमचा स्नेही मीरा या सुंदर शिखरांची नावं सांगू लागला. गंगोत्री-१,२,३,,जोगीन शिखररांग, थलेसागर सुदर्शन, मात्री, चितबासा(तिबेट बाजू), अशी कितीतरी प्रसिद्द हिमशिखरे आमचे दूरवरून स्वागत करू लागली.
               बदलत्या हवामानाचा धोका पत्करून चालण्यासारखे नव्हते. प्रथम सर्वांनी भारताच्या तिरंग्या ध्वजाची व सादच्या प्रतिक ध्वजाची उभारणी केली. त्यांना अभिवादन केले. छायाचित्रे घेण्यात आली. स्थानिक प्रथेनुसार मीराने शिखराची छोटी पूजा केली व या उत्तुंग शिखराचा निरोप घेत एकेकजण खाली उतरू लागला. आयुष्यात काहीतरी दिव्य केल्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात होती.
             साहसी मोहिमेचे यश मुख्य तळावरील इतरांना सांगायचे होते. विलक्षण थकवा असूनही वेगाने सारेजण खाली परतु लागले. मधल्या तळावर खालून आलेली दुसरी तुकडी विश्रांती घेत होती.त्यांना आमची चाहूल लागली व ते स्वागताला सामोरे आले.  त्यांनी घटकाभर विश्रांती घ्यायला लावली. साऱ्यांना मायेने खाउपिऊ घातले व मुख्यतळावर निघालो तेव्हा निरोप दिला.
             दुसऱ्या दिवशी सादचे नऊ साहस वीर व देवी मिळून दहाजण ' रुदुगैरा ' आरोहणास निघाले. काल आलेले अनुभव साऱ्यांना येऊ लागले. निम्मे अंतर चालून झाले असेल,नसेल, दोघांना पुढे जाववेना  ! डोके गरगरणे, उलटी व थकावट, यामुळे त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला.
             बर्फातील पाऊलखुणा पाहात पाहात मधूनच भोवतालचा सुंदर रुद्र निसर्ग अवलोकीत दुसऱ्या तुकडीतील सादकरी चालत होते. शिखरमाथा हळुहळु जवळ येत होता. मध्यान्हीचे पावणेदोन वाजले व आमचा सहयात्री सिराज ठक्कर शिखरावर पोहोचला ! इतरांनी त्याचे हात उंचावून स्वागत केले. नंतर एकेकजण या शिखरावर येऊ लागला.
             दहापैकी आठजण शिखर सर करण्यात यशस्वी झाले होते. एकमेकांचे स्वागत, शिखरपूजा, छायाचित्रे इ. सोपस्कार आटोपल्यावर भोवताली दूरवर दिसणाऱ्या उत्तुंग हिमालयाचे ओझरते दर्शन घेतले व खाली परतायला सुरुवात केली. वातावरण काहीसे स्वच्छ वाटले. साऱ्यांचाउत्साह आता वाढला. काहीनी घसरत घसरत खाली यायला सुरुवात केली. धोका नको म्हणून आईस एक्स होतीच. पण एकदा वेग घेतल्यावर ताबा सुटतो की काय असे वाटे. मग ब्रेक घेतघेत उतरू  लागलो. खरोखर हा आनंद अवर्णनीय आहे ! खाली तळावर आलो. स्वागत, खाणेपिणे झाले व खालचा तळ गुंडाळला. सारेजण मुख्यतळावर  निघाले.
            दुसऱ्या तुकडीत माझा समावेश होता. परतताना घडलेली एक स्मरणीय घटना सांगावीशी वाटते-घसरत घसरत उतरण्याचा आनंद मी घेत होतो. एवढ्यात वरून कोणीतरी आवाज दिला की, ' सॅकमधून कॅरीमेट(बर्फावर झोपताना वापरण्याची चटई) पडलीय. पकड,पकड...' मी शरीराला ब्रेक दिला. डावीकडे पाहू लागलो. वेगात येणारी कॅरीमेट खाली जाऊ लागली.
           मी वाट बदलली आणि कॅरीमेटच्या दिशेने निघालो. त्याच्या घसरण्याच्या वेगात मला ते पकडता आले नाही. अंतर वाढू लागले. माझे पाय बर्फात खोलवर रुतू लागले. येथे खड्डे असण्याची शक्यता होती. वरून मात्र काही समजत नव्हते. हे सर्व पार करीत मी वेग वाढवू लागलो. परंतु विवरे असल्याच्या स्पष्ट खुणा मला दिसू लागल्या. मी त्या कॅरीमेटचा नाद सोडला. सावधपणे परतून सरळ वाटेवर म्हणजे सुरक्षित उतारावर आलो. पुन्हा घसरगुंडीचा अनुभव घेत एकदोन टप्पे पार केले. पुढे एका उतारावर विश्रांती घ्यावी म्हणून थांबलो. डावीकड ेनजर गेली. विसबावीस फुटांवर ते कॅरीमेट पडलेले होते !        
          कमीजास्त उंचीच्या बर्फामुळे ते अडकले असावे. पुन्हा मधले धोक्याचे खड्डे चुकवीत चुकवीत तेथे गेलो. ते कॅरीमेट घेतले व सावधपणे वाटेला लागलो !
          तर असा हा माझा अनुभव कायम लक्षात राहिलाय.
           मुख्य तळावर आमचे जल्लोषात स्वागत झाले. छान मेजवानी झाली ! रंगीबेरंगी गप्पा, थरारक अनुभव कथन, आणि टेपरेकॉर्डर द्वारे आमची मैफिल सूनहरी करणारे लता-रफी, किशोर, अझीझ, या साऱ्यांनी आमची रात्र ' बहार ' केली !
              दुसऱ्या दिवशी विश्रांतीचा बेत होता. पण वाईट हवामानाचा धोका न पत्करता आम्ही मुक्काम आवरला व परतीचा प्रवास सुरू  झाला. परतीची वाट देखील सोपी नव्हती. 3बऱ्याच ठिकाणी बर्फ वितळून वाटा दिशेनाशा झाल्या होत्या. मीरा, देवी यांनी अंदाज बांधले व सारे उतरू लागले. गंगोत्री गाठणे आज तरी शक्य नव्हते. सायंकाळी एक छोटा तळ पाहून तंबू ठोकले.
             मोहिमेनंतर न मिळालेली विश्रांती. त्यातच आजचे प्रदीर्घ चालणे, याचा बऱ्याच जणांना त्रास झाला. सूर्यास्त होत होता. तरीही निम्म्याहून अधिकजण मुक्कामी आले नव्हते.  पुढे आलेल्यानी टॉर्च, खाणेपिणे घेतले व सोबत्यांना आणायला पुन्हा वर येण्यास सुरुवात केली. वरून मदत करणारी चांदणी रात्र आणि साहसी मित्र, यांची मदत घेत एकेकजण तळावर आला. या मुक्कामी देखील धम्माल गाणी म्हणून आम्ही श्रमपरिहार केला !
            दुसरी पहाट उजाडली. सादकरी गंगोत्रीकडे निघाले. अंतर फारसे नव्हते. पण कोसळलेल्या दरडीतुन वाट शोधीत
पुढे चालावे(म्हणजेच उतरावे) लागत होते. लाकडी पूल चक्क तुटला होता ! खालच्या रुदुगंगा उपनदीवर बर्फाचा थर साचून टेकाड तयार झाले होते. त्यावर अगदी जपून पावलं टाकली आणि पलीकडे आलो. शेवटची चढण पार केल्यानंतर गंगोत्रीच्या हद्दीत शिरलो.
            फिल्ड ऑफिसर साबीरभाई यांना झालेला आनंद कोणत्या शब्दात सांगू ? गंगोत्रीतील आमच्या मुक्कामी अवघा आनंदी आनंद साजरा झाला ! रात्री गोड जेवणं झाली. भाई एकेकाचे अनुभव ऐकत होते. गप्पा रंगत होत्या.
            अशी ही सुंदर रात्र सरली आणि दुसरा दिवस उजाडला. १ मे हा महाराष्ट्र दिन ! आमच्या संस्थेने गंगोत्रीमध्ये हा दिन साजरा केला. श्रीगंगामातेच्या मंदिर प्रांगणात सादचे साहस वीर सावधानच्या पोझमध्ये उभे आहेत, अन शिवप्रेमी भाई साऱ्यांना शिवमुद्रा प्रदान करून साऱ्यांसह दणदणीत आवाजात म्हणत आहेत महाराष्ट्र गीत ! हे गीत भव्य हिमालय
 ऐकतोय !......

                                                   :::::::::::::::::::::::::::💐मनातलं जनात💐

💐मनातलं जनात💐

   

           तुम्हा सर्वांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा ! आज माझ्या या ब्लॉग लेखनाला वर्ष पूर्ण झालेय. याप्रसंगी थोडेसे हितगुज तुमच्यापाशी........
💐वर्षपूर्ती आणि संकल्प........
                  ब्लॉगप्रेमी मित्रमैत्रिणींनो, दैनंदिन आयुष्य जगताना आपले विविध छंद जोपासण्याची संधी मला वेळोवेळी मिळाली, आणि मी या संधीचे सोने केलेय, असे मला वाटते. याच छंद प्रेमातून मी लिहीता झालो आहे.
              या वर्षभरात तुमच्याशी संवाद साधताना मी वेगवेगळे विषय स्वतंत्र स्तंभातून तुमच्यापुढे मांडले आहेत. हे जणू काय एक छोटेसे मासिकच ! मात्र हे एक प्रयोगशील मासिक आहे.
              वर्षभरात  मी माझ्या दृष्टिकोनातून व्यक्त  केलेले बरेवाईट लेखन प्रामाणिकपणे आपणापुढे मांडले आहे. याकरिता मला माझे दैनंदिन डायरी लेखन उपयोगी पडलेय. कलात्मक चित्रपटाचे अवलोकन, मनसोक्तपणे केलेली भटकंती, अवतीभवती वावरणारी सर्वसामान्य आणि असामान्य माणसं, अवीट गोडीची गीतं ऐकुन मिळणारा स्वरमयी आनंद, जमेल तसे आणि जमेल तिथे वाचन करून मिळणारे ज्ञान व त्यातून उमगणारे साहित्यविश्व, या साऱ्याचा समावेश असणारे माझे हे संवादात्मक लेखन आपणाला कितपत भावतेय किंवा कितपत भावलेय, हे मला जाणून घ्यायचेय.
या लेखनातही काही डावे उजवे असेलच ना ?
              आणि हो,  यावर्षीच्या ब्लॉगलेखनात मला आणखी काही नवीन विषयदेखील  तुमच्या समोर मांडायचे आहेत - उदा. ट्रेक डायरी, अदभूत, आरोग्यम, सुरशहनाई, पाणी, गावोगावी, चला कोकणात, व्यंगचित्रसफर, हिमयात्रा, वगैरे वगैरे........या नवीन लेखांचेसुद्दा आपण स्वागत करावे ही अपेक्षा आहे.
               कळावे, लोभ असावा, ही विनंती.
               धन्यवाद..........

                                                        आपला,
                                                        चारुदत्त
                                                                                                                                इमेल--yescharuddata@gmail.com
                                                                                                                               phone-7588727522.


                                  ::::::::::::::::::::::::::::: :