Friday, 1 March 2019

💐 लक्षवेधी💐

💐 लक्षवेधी💐
             
                दूरवर हिमालयात,अवघड रस्ते आणि घाटीमध्ये आपली जुन्या जमान्यातली स्कुटर घेऊन भटकणारा एक कलंदर स्कुल टीचर आपल्या भारतात आहे. मुंबईत, एका कार्यक्रमाच्या  निमित्ताने हा हसतमुख टीचर आपल्या या आगळ्या हौसेविषयी संवाद साधण्यासाठी आला अन त्याने मला प्रभावीत केले.
                 या लक्षवेधीचा मजेदार परिचय......


💐स्कुटर स्वार मास्तरजी..
                 राजधानी दिल्लीमध्ये एक प्राथमिक शाळा आहे. तेथे हा मनस्वी स्कुल टीचर मुलांना शिकवितो.  या टीचरने आपल्या स्कुटरवरून कितीतरी अवघड
आणि उत्तुंग हिमालयीन रस्त्यांची आनंदी सफर केलीय. याचे नाव आहे तरुणकुमार गौतम. वयाने तरुण आणि हसतमुख चेहेऱ्याची ही वल्ली आपले सफर विक्रम एका कार्यक्रमात सादर करीत होती.
                ' मास्तरजी ' या टोपण नावाने हा प्रसिद्द आहे शाळेत. वर्षभर हा फिरत असतो ! याचे एकमेव वाहन म्हणजे बजाजची ब्राव्हो स्कुटर. तीही अठरा-एकोणीस वर्षांची जुनी स्कुटर आहे ! आपल्या ब्राव्होवरून खडतर प्रवास करीत तो स्थानिक लोकांशी संवाद साधतो. त्यांचेशी मित्रत्वाचे नाते निर्माण करून हा मास्तरजी आपली सफर पुढे पुढे नेत आहे. हिमालयात असलेला जगातला सर्वात उंचावरील पेट्रोल पंप, सर्वात उंच असा मोटरेबल रोड, सीमा प्रदेशातील अती दुर्गम कच्चे  रस्ते व घाटी, नाले  या मास्तरजीने जीवघेण्या थंडीवाऱ्यातून यशस्वीपणे पार केले आहेत ! त्याने सादर केलेल्या स्लाइड्स पाहताना थरारक वाटते.
                  वास्तविक उंचावर असा दुचाकीने प्रवास करताना पेट्रोल इंधनाची मोठी समस्या असते. मात्र मास्तरजी हुशार आहे. बरोबर नियोजन करून सर्व परिसराची नीट माहिती घेऊन, उपलब्ध साठ्याचा अत्यंत काटकसरीने वापर करीत हा मार्गक्रमण करतो. ब्राव्हो बिघडते तेव्हा काय करता ? या प्रश्नावर त्याचे चटकन उत्तर येते.' मला ती काळजी अगोदरच घ्यावी लागते. दुरुस्ती-देखभालीची जुजबी माहिती आहे. अगदीच पर्याय नसला की, वाट पाहातो कुणी मदतीला येतेय का, त्यासाठी. सुदैवाने सीमा भागातील फौजी दोस्त व त्यांचे ट्रक, वाहने स्वतःहून पुढे येतात. मदतीचा हात देतात. कधी त्यांच्या वाहनातून माझ्या ब्राव्होसह पुढचा प्रवास होतो !’
                      हा काही श्रीमंत फिरस्ता नाही. याचे कुटुंब आहे. ते त्याच्या छंदाआड येत नाहीत. कारण हा दिल्लीत असताना त्यांना फिरण्यासाठी नोकरी सांभाळून वेळ देतो. मास्तरजी उच्च शिक्षित शिक्षक आहे. पण आपल्या या छंदापायी प्राथमिक शिक्षकाचा पेशा त्याने पत्करलाय ! ' मोठ्या मुलांपेक्षा लहान मुले शिकवायला बरी ! ' असे हा हसत सांगतो. मास्तरजीच्या या साहसी सफरीत अजूनपर्यंत मोठी आपत्ती आलेली नाहीये. उलट याचे जागोजागी कौतुक होतेय.
                      हा मास्तरजी पुढचे साहसी बेत आखीत आहे. मात्र जगभर आपल्या दुचाकी वाहनांची पताका मिरवणाऱ्या बजाज कंपनीला या मास्तरजीची दखल अजून का बरे घ्यावीशी वाटली नाही ? याचे मला कोडे वाटतेय.
                     या मास्तरजीच्या पुढील सर्व सफरीसाठी माझ्या मनापासून शुभेच्छाआहेत.....

                                                       :::::::::::::::::::::::::::::::::::
💐आणि क्षमस्व💐

                     गेल्या महिन्यात ' चला कोकणात ' मध्ये टाकलेल्या ' कोकण कोड्यात, प्रश्न क्र. २  असा हवा होता--प्रसिद्द कवी केशवसुत यांचे गांव कोणते ?
                     या चुकीबद्दल क्षमस्व.
   

💐चित्रपट गप्पा💐

💐चित्रपट गप्पा💐             
                    जीवन प्रवाह चित्रित करताना मानवी जीवांची घालमेल, हतबलता याचे वास्तव प्रेक्षकांसमोर आणणारा जगन्मान्य बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन माझ्या आवडत्या  दिग्दर्शकांपैकी एक. गेल्या महिन्यात मृणाल सेन सर्वाना सोडून चित्रपटांच्या अंतराळ विश्वात मार्गस्थ झाले. त्यांना आदरांजली म्हणून ' खारीझ ' या बंगाली  चित्रपटाविषयी............तसेच,
                 २०१८  हे स्वर्गीय अरविंद गोखलेंचे जन्मशताब्दी वर्ष. तुम्ही विचाराल- कोण बुवा हे अरविंद गोखले ? आणि आता कुठे आहे २०१८  साल ?  ते साल तर संपलय !  होय, संपलेय २०१८ साल. आपण आता २०१९  मध्ये आहोत !
                 मला हे सांगायचेय की, हे अरविंद गोखले  जुन्या जमान्यातील सुप्रसिद्ध  मराठी कथाकार व साहित्यिक.
 त्यांचे जन्मशताब्दी वर्ष २०१८ मध्ये सुरू झाले. त्याची सांगता झाली यावर्षी १९ फेब्रुवारीला. अर्थात सरकारने याची दखलही घेतली नाही. त्यामुळे  जन्मशताब्दी वर्ष ' गोखलें ' च्या साहित्यप्रेमी चाहत्यांनी साजरे केले.
                 या थोर कथाकाराचे पुण्यस्मरण म्हणून  मी तुमच्यापुढे त्यांच्या ' अविधवा ' या गाजलेल्या कथेवर आधारीत
 ' माझे घर माझी माणसं ' या मराठी चित्रपटाविषयी संवाद साधत आहे...............
             
💐खारीझ(दिग्दर्शक-मृणाल सेन)
कलाकार-ममता शंकर,अंजन दत्ता
कथा-रुपदा चौधरी
संगीत-बी.व्ही. कारंथ
छायांकन-के.के.महाजन

                          ही आहे एक शोककथा. तेव्हाच्या कलकत्ता शहरात राहणारे एक छोटे कुटुंब. पाच-सात वर्षाच्या गोड मुलाचे तरुण आईवडील अगदी आनंदाने संसार करीत आहेत. आपल्या लहान मुलाला- पुपईला सोबत व्हावी आणि घरातील कामात थोडी मदतही व्हावी, म्हणून हे तरुण जोडपे एका बारा-तेरा वर्षाच्या मुलास घरी कामाला ठेवतात. खरेतर त्या मुलाचा गरीब बापच एकदा यांचेकडे येतो. आग्रह करून आपल्या मुलाला-पालनला तीथे कामाला ठेवतो. मुलाच्या कामाचा पगार किती घेणार, विचारल्यावर पालनचा बाप म्हणतो, ' तुम्ही काही द्याल ते द्या, पण ते पालनकडे नका देऊ. मी महिन्या-दोनमहिन्यांनी येईन पैसे न्यायला.' आणि आपल्या मुलाचे इथे भलेच होईल या विश्वासाने तो निघूनही जातो !
                    इमारतीमध्ये याच वयाची इतर मुलेसुद्दा कामाला आहेत. ते एकमेकाशी चांगले परिचित होतात. पुपईला पालनची सवय झालीय. त्याचे आईवडील देखील आता निवांत झालेत. मात्र अकस्मात एक घटना घडते. थंडीचे दिवस येतात. हुडहुडी भरण्याइतपत गारठा वाढतो.
                    घराशेजारील किचन असलेल्या खोलीमध्ये पालन रोज झोपतो. त्या दिवशीची रात्र सरते. दुसऱ्या सकाळी, पालन अजून कसा उठला नाही ? याचे कोडे पुपईच्या आईवडिलांना पडते. वारंवार शेजारच्या खोलीचा दरवाजा ठोठावून देखील पालन दरवाजा उघडत नाही. आता त्यांचे धाबे दणाणते. यांच्या आवाजाने शेजारी जमा होतात. इमारतीचा मालक, त्याची पत्नी तीथे येते. खोलीतून कुठलाच प्रतिसाद नसतो. मग दरवाजा जोर लावून उघडला जातो. आतमध्ये पालन अंगावर पांघरूण घेऊन शांत झोपलेला दिसतो. मात्र त्याला हाका मारून, हलवून तो उठत नाही. तेव्हा सगळे गंभीर होतात. कोणी सांगतो, पोलिसांना कळवा, कोण म्हणतो, डॉक्टरला बोलवा... हे सगळे पाहून पुपईची आई घाबरते. त्याचवेळी पुपई जागा होतो. त्याला समजावून लांब नेले जाते.
                  डॉक्टर येतात. तपासतात. हा मुलगा जिवंत नसल्याची जाणीव त्यांना होते, पण ते ऍम्ब्युलन्स आणा, पोलिसांनाही  बोलवा. पालनला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल, म्हणतात. मग पोलीस येऊन सगळी पाहणी करतात. आडवे तिडवे प्रश्न विचारतात.  खोलीत एक राखेची शेगडी पालनच्या उषाशेजारी कशी ? रात्री खूप गारठा असल्याने शेगडी इथे वापरणे आवश्यक असल्याचे सगळ्यांचे मत असते. यावर पोलीस काही बोलत नाहीत.
                  इमारतीच्या आवारात आता गर्दी झालीय. चौकशीच्या निमित्ताने लोकांची शेरेबाजी चालू असते. पुपईचे आईवडील खूप अस्वस्थ होतात. भांबावून जातात. कोणी काहीही विचारत असतो. मात्र त्यांना धीर द्यायला आईवडील, घरमालक, शेजारचा एक मित्र, व काही शेजारी पुढे येतात.
                  दरम्यान पालनच्या कुटुंबाला कळवायला हवेय, याची जाणीव होऊन पुपईचे वडील शोध चौकशी करायला लागतात. माहिती मिळाल्यावर त्यांची वस्ती गाठतात. पालनचा बाप सापडत नाही. मग निरोप ठेऊन हे परततात. या दुर्घटनेमुळे भविष्यात कोणती आपत्ती नको म्हणून चांगल्या वकीलाच्या मदतीने कुटुंब तयारीत राहाते.
                 बॉडीचे पोस्टमार्टेम होणार असते. त्याचा रिपोर्ट यायला एकदोन दिवस जातात. तो काळ हे जोडपे प्रचंड तणावाखाली काढते. या काळात छोट्या पुपईला हसते खेळते ठेवायला शेजारची एक तरुणी खूप मदत करते. पोस्टमॉर्टेम रिपोर्टवरून डॉक्टर माहिती देतात की, पालन कार्बनवायू खोलीत कोंडला गेल्यामुळे मृत्यू पावला !
                 ' तुम्ही विचलित नाही व्हायचे. तुमची या घटनेत काहीच चूक नाहीय ' असा धीर पुपईच्या आईवडिलांना मिळालेला आहे. मात्र कुटुंब तणावातच असते.  पालनचे वडील  पुपईच्या घरी दाखल होतात. पालनचा हा बाप स्वभावानेही गरीब आहे.अनपढ आहे.  मुलाच्या दुःखाने तो ढसाढसा रडतो. ' माझा पालन मला परत द्या आणून....'म्हणत आक्रोश करतो. त्याचे सांत्वन केले जाते. तो शांत होतो. रात्री त्याला तिथेच थांबवले जाते. पण झोपणार कुठे तो ? आपल्याच घरात थोडी जागा करून त्याची व्यवस्था करण्यात येते. पण तो राजी होत नाही. ' माझा पालन किचनमध्ये होता ना ? मग मी पण तीथे झोपणार !  ', असे म्हणून किचनमध्ये जाऊन झोपतो.
                 पुपईच्या वडिलांना पोलीस अधिकारी बोलावून घेतात. बॉडीची ओळख व नातेवाईक म्हणून पालनचा बापही बरोबर असतो.  मुलाचे शव पाहताना त्यांना शोक अनावर होतो. मग पुढे स्मशानभूमीत सगळे येतात. अग्नी दिल्यानंतर प्रथम पुपईची माणसं घरी निघतात. परंपरे प्रमाणे यांना घरी घेताना त्यांच्यावर अग्निमशाल फिरविली जाते.  प्रथम कडुलिंब, मग काही गोड वस्तू खायला देतात. आता शुद्द झालेले सगळे आत येतात. नंतर खुप वेळाने पालनचा बाप आणि त्याचे आप्त, मित्र, इमारतीत काम करणारी काही मुलं येतात. विधीपूर्वक त्यांनाही आत घेतले जाते.
                  आता चित्रपटातील शेवटचा प्रसंग- पालनच्या बापाकडून आता कुठली कृती होणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष असते. पण तो गरीब बाप कोणतीही तक्रार न करता सगळ्यांचा निरोप घेतो. निघताना पुपईच्या वडिलांना हात जोडत एवढेच म्हणतो, ' निघतो आम्ही ........' त्याचे हे शब्द प्रेक्षकांसह सगळ्यांचाच प्रश्न सोडवतात. सगळ्यांना हलके करतात !
                   हा चित्रपट पाहून झाल्यानंतर, मनातली अस्वस्थता लगेच जात नाही. सर्वांचा निरोप घेणाऱ्या पालनच्या बापाचे दुःखाने व  अश्रूंनी भरलेले डोळे मन अधिक अस्वस्थ करते........
                   या चित्रपटात सगळे काही मृणाल सेन 'टच' वास्तव जीवन चित्रित झालेय. कुठेही अतिरेक नाही. कलावंत (सगळेच) कसबी आहेत. संगीताचा वापर अगदी माफक आहे. छायांकनसुद्दा आवश्यक तेथेच जवळून केलेय. हा चित्रपट मुख्यतः कथेमुळे जास्त भिनतो. यातले कुटुंब आपल्या पुरते पाहणारे, वावरणारे असले तरी स्वतःला अपराधी मानत आहे. इतर लोक, शेजारी (अपवाद वगळता) आपल्या वर्तनातून सर्वसामान्य समाजाचा आरसा समोर आणतात. असा हा ' खारीझ मनाला अस्वस्थ करून गेला.

                                                                :::::;::::::::::::::::::::::

💐माझे घर माझी माणसं(दिग्दर्शक-राजा ठाकूर)
कलाकार--सुलोचना, विवेक, चंद्रकांत गोखले, रमेश देव.
गीते- ग.दि.मा. पार्श्वगायक-लता, सुधीर फडके, लिलावती फडके.
संगीत-सुधीर फडके.

                ही आहे  एका स्वप्नवेड्या प्रेमिकांची अधुरी कहाणी. आईवडिलांनतर पोरकी झालेली तरुण लेक-इरावती
(सुलोचना) मावशीच्या  छायेत आयुष्याची पुढील वाटचाल करतेय. ती मेडिकल कॉलेजात आहे. डॉक्टरीचे शिक्षण घेता घेता तीचे त्याच कॉलेजमध्ये असलेल्या अविनाश वर(विवेक) प्रेम जडलेय.
                आपण एकमेकांत छान गुंतून गेलो आहोत. एकमेकांशिवाय यापुढे जगू शकत नाही, डॉक्टर झाल्यावर आपला सुंदर  संसार उभा राहील, गोजिरवाणे मूल होईल.......हे आहे यांचे स्वप्न. लग्नानंतरचे दिवस लवकरच येणार आहेत याची दोघा प्रेमिकांना खात्री आहे.
                ही नायिका इरावती गडगंज श्रीमंत आहे. आई वडिलांमागे सर्व इस्टेट तीचीच आहे. पण ती सालस व संस्कारित आहे. लोभी वगैरे नाही. प्रेमळ अन लाघवी स्वभावाची आहे. संपत्तीचा तीला गर्व नाही. उलट आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या संसारात एकत्र कुटुंबासह राहून त्याच्या आईवडिलांची, भाऊ-बहिणीची आस्थेने सेवा करायची हा तीचा निश्चय आहे.
                नायक अविनाशचे कुटुंब गरीब आहे. वयस्कर बाप कर्जबाजारी आहे. कुठेतरी टेबल टाकून, टायपिंग करून आपले कुटुंब चालवतोय. मात्र आजारी पत्नी, एका मुलीचे शिक्षण, छोटा उनाडक्या करणारा मुलगा आणि विवाहित बहिणीला आधार देतादेता मेटाकुटीला आलेला हा बाप प्रचंड तापट आहे.  याला मान भरपूर आहे ! पण गरिबीपुढे काय चालते ? कधी एकदा आपला मुलगा डॉक्टर होतोय अन या गरिबीतून आपली सुटका करतोय, याची आस त्याला लागलीय.
                अविनाश मात्र शांत व संयमी स्वभावाचा आहे. आईचे आजारपण, धाकट्या बहिणीचे शिक्षण, मोठया बहिणीची लहान मुले, आणि उनाड भाऊ यांचेकडे स्वतःच्या  प्रेमिकेपेक्षा पेक्षा त्याचे जास्त लक्ष आहे.
                दोघांचे प्रेमप्रकरण छान चालू आहे, पण घरच्या जबाबदारीमुळे अविनाश वेळ ठरवूनही इरावतीला भेटत  नाही. तेव्हा ती  हिरमुसते. तीचा राग अनावर होतो. पण मावशी आणि इतरांच्या समजावणी मुळे ती शांत होते. एकदा अविनाशचे वडील अगदी आनंदी चेहेऱ्याने घरी परततात. घरच्यांना हा धक्का असतो ! विचारल्यावर म्हणतात,' मुलाला चांगले स्थळ सांगून आलेय. कुठे आहे तो ? आधी पेढे आणा, पेढे. अहो,  एकुलती एक पोरगी सांगून आलीय त्याला. तीला पाहायचा कार्यक्रम करायचाय आता. आजारी पत्नी आणि धाकटा मुलगा-मुलगी हरकून जातात ! अविनाश घरी आल्यावर वडिलांसह सारेच आनंदात असल्याचे पाहून त्याला हलके वाटते. सगळे त्याच्या भोवती गोळा होतात. त्यावेळी  धाकटी बहीण वडिलांना म्हणते, ' बाबा, दादाने तर आधीच ठरवलेय त्याचे लग्न ! वडिल खवळून उठतात.' अरे, चांगली सोन्यासारखी पोर सांगून आलीय तुला. भरपूर इस्टेट आहे पोरीची. लग्नानंतर चांगला दवाखाना टाकशील तू. आहेस कुठे तू ? आणि हे काय ?  परस्पर कुठल्या पोरीशी जमवलेस तू ? कोण आहे ही मुलगी ? ' यावर लगेच धाकटी बहीण म्हणते-  ' काय बरं त्या बाईंचं नाव ? आमच्या शाळेत आम्हाला तपासायला आल्या होत्या बरं का त्या ! हां, इरावती, इरावती मॅडमच त्या.  काय रे दादा, बोल ना ? ....' दादा आपला गप्पच !.
                मात्र हीच मुलगी असते वडिलांनी सांगितलेली ! लहान भाचे, आणि धाकटी बहिण-भाऊ अविनाशभोवती पिंगा घालू लागतात. आजारी आई उठून बसते ! आणि वडिलांचा आनंद तर बघायला नको ! लगेच ते अविनाशला बजावतात-जा, जा, तू  त्यांच्या मुलीला घेऊन ये पाहू..'
                तो पडत्या फळाची आज्ञा घेऊन निघतो. मुलीच्या घरीही आनंदी वातावरण आहे.भाचीच्या सुखात तीचा आनंद सामावलेला आहे. खरंतर तीचा एक पुतण्या लग्नाचा आहे(रमेश देव) चांगला व्यवसाय करतोय. मोठे दुकान आहे त्याचे.  तो यांच्याकडे येतो जातो. दोघांचे जुळविण्याचे मावशीने प्रयत्न केलेत. पण भाचीचे प्रेम पक्के झालेय. तीच्या मनात आता दुसरा कोणी नाही. मावशी हे जाणते. म्हणून मुलीच्या इच्छेप्रमाणे व्हावे असे ठरवते.
                अविनाश आपल्याला त्याच्या घरी घेऊन जाणार, पूर्वी आपण ठरवूनही जे घडले नाही याचा तीला अत्यानंद झालाय. त्या आनंदात ती सजून तयार होते. वाट पाहू लागते अविनाशची.....तीच्याकडे निघालेला अविनाश तीला आवडणारी फुलं-गजरे घेत असताना अचानक रस्त्यावर सुसाट येणारे वाहन त्याला दिसते. एक लहान मूल त्याचवेळी रस्ता ओलांडताना तो पाहातो आणि त्याच्याकडे झेपावतो ! त्याक्षणी मोठा अपघात होतो. नायक कोसळतो. मूल सुखरूप राहाते. मग हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी नेले जाते. डोक्यावर मोठा आघात झाल्याने  शर्थ करूनही डॉक्टर अविनाशला वाचवू शकत नाहीत.
                ही दुर्दैवी घटना दोन्ही कुटुंबांना दुःखी करते. आपल्या सुंदर स्वप्नाची राख रांगोळी झालेली इरावतीला सहन होत नाही. तीला जबर धक्का बसलाय. ती खाणे-पीणे टाकते. मावशी खूप समजावते. तीचा पुतण्याही समजावतोय. त्याचा उपयोग होत नाही. हीच स्थिती त्या अविनाशच्या घरी झालीय. मुलगा गेल्याचा धक्का एकट्या बापालाच नाही तर पूर्ण कुटुंबाला झालाय. लवकरच पोरगा डॉक्टर होईल. दवाखाना घालेल. कर्ज फेडून आपल्याला व सगळ्या गरीब कुटुंबाला चांगले दिवस दाखवील, हे वडिलांचे स्वप्न आता दुभंगून गेलेय.
                पुन्हा ते गरीब कुटुंब आपले जीवन जगू लागते. चारी बाजूनी त्यांचे हाल सुरू  होतात. एकाकी अवस्थेत असलेली इरावती हळूहळू वास्तवाचा विचार करतेय. कसे असेल ते कुटुंब  ? तीचे भाबडे मन तीला सांगते-आपले लग्न तर त्याच्याशी लागणार होते ना ? आज तो जरी जगात नाही. तरी  त्याची माणसं माझी माणसं नाहीत ? ते घर माझं नाही ? एकदा ती मनाशी ठरवून आपल्या भावी( गेलेल्या) नवऱ्याच्या घरी जाते. तीथे अविनाशचे वडील तीला अपमानित करतात. निराश होऊन ती निघते.  या तापट वडिलांची पत्नी(म्हणजेच अविनाशची आई)आजारी आई आता मरण पंथाला आहे. डॉक्टर म्हणून  इरावती तीची काळजी घेऊ पहाते. वडिलांना मात्र ही तीथे नकोय.
                     इरावतीची मावशी तीच्या दुःखावर फुंकर घालत असतेच. अधून मधून तीचा पुतण्याही येतो तीचे मन वळवायला. आता या दुःखातून बाहेर यायला हवेय. कामात मग्न राहायला  हवेय. हे दोघांचे म्हणणे तीला पटलेय. हळुहळु इरावती सावरतेय. धीर द्यायला येणाऱ्या मावशीच्या पुतण्याला ती प्रतिसाद देऊ लागलीय.
                    आता इरावती डॉक्टर झालीय. परीक्षेत पहिली आलीय.  पण ?  पण तीला या परीक्षेतील यशाचा आनंद नाहीय. तीला मधूनच आपला सखा आठवतोय आणि ती हरवून बसतेय ती  स्वतःला !
                   आपले नवे आयुष्य सुरू  व्हावे, आपण दवाखाना घालून रुग्णसेवा करावी,  जेणेकरून शिक्षणाचा उपयोग होईल आणि आपण कामात मग्न राहू....हे इरावतीचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरतात, म्हणजेच ती दुःखातून सावरते आणि डॉक्टकी चालू करते. तीचा दवाखाना सुरू। होतो.
                  इरावतीचा आताचा स्नेही(मावशीचा पुतण्या) तिच्या अवतीभोवती आहेच. पण एका प्रसंगाने त्याला जाणीव होते की, ही इरावती तीच्या गेलेल्या प्रिय सख्यात घट्ट गुंतून गेलीय. मनाने तीने अविनाशशीच लग्न केलेय.  तो स्वतःहून मग बाजूस होतो.
                 आणि शेवटी ?  शेवटी नायिका इरावती ज्यांना ' माझं घर माझी माणसं ' समजते, ती माणसं तीला सामावून घेतात ! आता तीचे दुःख कितीतरी हलके झालेय.  अविनाशशिवाय समोर आलेला हा संसार इरावतीने मनापासून स्वीकारलाय !
                 हा जुना चित्रपट आहे. तो काळ, ती माणसं, एक गरिबी व व्यथेची सोबत असलेले कुटुंब, तर  दुसरे श्रीमंत पण  सुसंस्कारित ममतेने भरलेले ! या चित्रपटातील सारे कलावंत जीव ओतून काम करतात. संगीताबद्दल सांगायचे तर सुधीर फडके यांची मधुर गीते भावतात मनाला.  लता व सुधीर फडकेंशिवाय, काही गीतांना फडके यांच्या पत्नी आणि त्यावेळच्या सुप्रसिद्ध  गायिका लिलावतीनी स्वरबद्द केलेय. पार्श्व संगीताचा मात्र चित्रपटात माफक वापर आहे.अरविंद गोखल्यांच्या ' अविधवा ' कथेचा प्रभाव पूर्ण चित्रपटभर जाणवतो. याचे श्रेय जाते दिग्दर्शक राजा ठाकुरांकडे.  हा चित्रपट देखील मनाला चटका लावून जातो.

                                               :::::::::::::::::::::::::::

             
💐इतिहासात💐

💐इतिहासात💐
                     
                 कर्तुत्ववान अशा शिवप्रभूंची प्रेरणा-शक्ती घेऊन पुढे निघालेले छत्रपती संभाजी यांचा स्मृतिदिन ११ मार्च रोजी आहे. त्यांचे पुण्यस्मरण करताना आतून-बाहेरून होणारे दुःख येथे मांडायचे नाहीये. तर आपल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी निष्ठा, शिस्त आणि धाडस या तीन महत्वाच्या गोष्टी फक्त राजासाठी नव्हे तर प्रजेसाठी तसेच सेवकांसाठीही तेवढ्याच महत्वाच्या ठरतात हे मी थोडक्यात सांगत आहे.....................


💐छत्रपती संभाजी-फक्त  राजे ?  नव्हे, एक कर्तुत्ववान छावा..........
                     
                   छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक स्वराज्याभिमानी माणसाच्या  हृदयात महाराजांचा शूर छावा छत्रपती शंभुराजे देखील आदरस्थानी असायला हवेत. आज मुंबई आणि महाराष्ट्रात एका टि. व्ही.चॅनेलवर या राजांची कर्तृत्व गाथा दाखविली जातेय.
                  ही मालिका घरोघरी पाहिली जातेय. शंभुराजांच्या आयुष्यात आलेली कित्येक संकटं त्यांनी इमानी, साहसी व जीवावर उदार असलेल्या शूरवीरांच्या मदतीने कशी जिकिरीने परताऊन लावली आहेत व परतावत आहेत, हे सर्व आपण पाहात आहोत. शिवरायांनी विश्वासू अन साहसी मावळ्यांच्या साहाय्याने उभे केलेले स्वराज्य अंतर्गत भेदी व स्वार्थी आप्त कसे उधळवून लावण्याचा प्रयत्न करत आहेत, हे देखील आपण या मालिकेत पाहात आहोत. हे सगळे नाट्यमय व रंजक असले तरी ते वास्तव आहे. मन चिंतीत करणारे आहे.
                  पण  हे  पाहिल्यानंतर,प्रत्येक स्वराज्यप्रेमी माणसाच्या मनामध्ये या मराठेशाहीच्या इतिहासाचे वाचन करायची उर्मी जागी व्हायला हवी. वाचलेला इतिहास नीट अभ्यासायला हवा. त्याचप्रमाणे, या शूर पिता-पुत्रांनी उत्तुंग आणि दुर्गम गिरीदुर्गांचे केवढे अफाट स्वराज्य उभे केले व सांभाळले होते, अशा ऐतेहासिक दुर्गांचे दर्शन घ्यायला हवेय. विशेषतः त्यांचे जन्मस्थान किल्ले पुरंदर, यश-अपयशाची  स्मृती जागविणारा रायगड, स्वराज्य शत्रू  औरंगजेब याच्या शिपायांनी राजांना जेरबंद केले, ते  कोकणातील कसबा-शृंगारपूर(संगमेश्वर), शेवटी हालहाल करून त्यांच्या देहाची विटंबना केली ते-वढू तुळापूर, ही ठिकाणे अवश्य बघायला हवीत.
                  शंभुराजांविषयी मला सु.ग.शेवडे, वसंत कानेटकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, या जाणकार लेखकांच्या पुस्तकांचे वाचन उपयोगी ठरत आहे.  वेळोवेळी वाचली जाणारी वर्तमानपत्रातील यासंबंधीत विषयावरील लेखही मी जाणून घेत आहे. 
                  शेवडे यांचे छोटेसे पुस्तक शंभूराजांच्या जन्मा पासून मृत्यूपर्यंत अगदी व्यवस्थित माहिती देते. तर शिवशाहीरांनी शहाजीराजांपासून ते राजाराम राजे यांचेपर्यंतची सर्व कारकिर्द ओघवत्या शैलीत शब्दबद्ध  केलेली आहे. नाटककार वसंत कानेटकरांनी ' इथे ओशाळला मृत्यू ' हे शंभुराजे किती तडफदार अन साहसी होते याचे दर्शन घडविणारे व शेवटी सर्वाना अस्वस्थ करणारे ऐतेहासिक नाटक लिहिलेय. इतरही लेखन शंभूराजाना आणखी जाणून घ्यायला उपयुक्त ठरणार आहे. 
                  मात्र आपण असा कर्तुत्ववान छावा देवासमान मानतो, तेव्हा तोही एक माणूस आहे, त्याचेही काही गुण-दोष इतिहासामध्ये नोंदले गेले आहेत. त्याची सत्यासत्यता आपण नीट पडताळून पाहिली पाहिजे. अन्यथा पराक्रमी आणि कर्तुत्ववानांची दोषांची बाजूच सर्वांसमोर येत राहील. आणि त्यांच्या पराक्रमाला डाग लागेल. वसंत कानेटकरांनी आपल्या नाटकात व्यवस्थित अभ्यास करून शंभूराजांच्या पराक्रमाला चांगला न्याय मिळवून दिलेला आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
                 अशा या शौर्यवान शंभुराजाना माझा त्रिवार मुजरा..........

                                           :::::::::::::::::::::::