Thursday, 2 September 2021

💐💐लक्षवेधी💐💐

               हिमालयात भटकंती करताना अंगावर साहस घेण्याची प्रबळ इच्छा मनात आली तर ? तर शुभ्रधवल हिमालयीन शिखरे आपल्या स्वागतास सदैव सज्ज असतात. त्यांच्या सानिध्यात आपली ऊर्जा अधिक वाढत राहाते. 

                   गिरी दुर्गात फिरणाऱ्या तरुण गिर्यारोहकांना प्रोत्साहित करून त्यांची साहसी वृत्ती वाढविणारे हरिष कपाडिया हे असेच एक साहसी लक्षवेधी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी  हिमालयात नवनवीन ट्रेकिंग रुट्स शोधून काढले आहेत. सह्याद्री तसेच हिमालयातील दुर्गम भागात जाऊन, परिसराची वास्तव माहिती संकलित करून, त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली आहेत. अप्रसिद्ध अशी हिमशिखरे पादाक्रांत करण्याच्या मोहिमा आखून त्या हरिषभाईंनी यशस्वी केल्या आहेत.

                  याच लक्षवेधी गिर्यारोहक-लेखकाविषयी मी तुमच्याशी संवाद साधत आहे……………

 

💐हरिष कपाडिया💐

                  वयाची पासष्टी पार करूनही शरीर आणि मनाने चिरतरुण असणारे हरिष कपाडिया यांचे व्यक्तिमत्त्व देश विदेशातील गिर्यारोहण क्षेत्रात सुपरिचित आहे. या लक्षवेधी व्यक्तीची ओळख मला हिमालयन क्लबचे सभासदत्व मिळाल्यानंतर झाली.

                  स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश आणि भारतीय गिर्यारोहकांनी  पश्चिम बंगाल राज्यात स्थापन केलेल्या हिमालयन क्लबचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. हा क्लब आज शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या क्लबचे मुख्यालय आता मुंबईत आहे. या क्लबच्या संदर्भ ग्रंथालयात कित्येक जुन्या-नव्या गिर्यारोहण मोहिमांची माहिती नकाशांसह संग्रहित करून ठेवली आहे. मोहिमांविषयी मार्गदर्शन करणे त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे कार्य ही संस्था करते.

                 हिमालयन क्लबचा  अँन्युअल सेमिनारमुंबई कलकत्त्यात दरवर्षी उत्साहात साजरा होतो. भारतातील इतर देशातील मान्यवर गिर्यारोहक दोन दिवसांच्या सेमिनारमध्ये आवर्जून सहभागी होतात. हिमालयातील मोहिमा, तसेच   त्यासंदर्भातील घडामोडी दर्शविणारे स्लाईड शोज, फिल्म्स मुलाखती-व्याख्याने यांचा माहितीपूर्ण आस्वाद घेणे म्हणजे नव्या जुन्या गिरिप्रेमीना मोठी पर्वणीच असते. हरिष कपाडिया हिमालयन  क्लबचे जुने जाणते पदाधिकारी आहेत.

                या क्लबचे वार्षिक प्रकाशित होणारे हिमालयन जर्नलहे प्रमुख वैशिष्ट्य ! जवळपास पंचवीस वर्षे जर्नलची संपादकीय जबाबदारी हरिषभाईंकडे  होती  त्यांनी अथक मेहेनत घेऊन ती जबाबदारी पार पाडलीय.    

                हरिषभाईंचा चेहरा नेहेमी हसतमुख, स्वभावात खोडकरपणा, कुणाशीही बोलताना अहंभाव नाही, भरपूर बोलायची सवय, त्यामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा आहे. त्यांनी चाळीस वर्षांहून अधिक काळ भटकंती केली आहे. अकरा पुस्तकेही लिहिली आहेत. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जगात नावाजलेल्या लंडन येथील अल्पाईन क्लबचे मानद सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले आहे.  भारतातील हिमालयीन मोहिमांवर नियंत्रण ठेवणाऱ्या दिल्लीत मुख्यालय असणाऱ्या इंडियन मौंटेनिअरिंग फाउंडेशन(I M F) या शिखर संस्थेचे उपाध्यक्षपद देखील हरिष भाईंनी भूषविले आहे.   

                 क्लबच्या कार्यक्रमात मला या मान्यवर व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी क्वचितच मिळाली. मात्र आमच्या संस्थेने आखलेल्या सिक्कीम परिसरातील पदभ्रमण मोहिमेची आखणी करताना हरिषभाईना समक्ष भेटून त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक वाटले. म्हणून आम्ही त्यांचेशी फोनवर संपर्क साधला. समक्ष भेटीची विनंती केल्यावर हरिषभाईंनी तात्काळ होकार दिला वेळ कळवून त्यांचा निवास पत्ताही दिला. ते वर्ष होते १९८९.

                हरिषभाई मुंबईत नेपिअन्स रोड परिसरात राहातात. मोठी फॅमिली आहे त्यांची. त्यांच्या पत्नी गीताबेन या देखील ट्रेकर्स आहेत. छान रेखाचित्रेही काढतात. त्यांचा एक मुलगा नवांग हा भारतीय सैन्य दलात अधिकारी होता. कारगिलच्या युद्धात या सुपुत्रास वीरमरण आले. त्याचे स्मरण म्हणून निवास परिसरातील चौकाला नवांग कपाडिया चौक असे नाव देण्यात आले आहे.

               हरिषभाई आमच्याशी मनापासून गप्पा मारीत होते. आमच्या मोहिमेस उपयुक्त ठरणारी बरीच माहिती त्यांनी दिली. सिक्कीमचा मॅप दाखवला. दार्जिलिंग ते पेलिंग पुढे योगशम ऐवजी गॅनझिंग करा, असे त्यांनी सांगितले. जवळचे रुट्स सुद्दा मॅपसह दाखविले.

                गप्पांमध्ये त्यांनी सीमा भागातील काही महत्वाच्या हिमशिखरांवर तेथील परिसरात जायचे असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने कोणते कायदेशीर ठरणारे परवाने लागतात ते सांगून चुकून अशा भागात बेकायदेशीररीत्या गेल्यास त्रास होतो, कोणता अपघात घडला तर अधिकच त्रास होतो, याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी असे सांगून आम्हाला सावध केले. 

                 हरिष भाईंनी बोलता बोलता आम्हाला म्हटले, ‘ तुम्ही सिक्कीम कशाला करता ? गढवाल, कुमाऊ, काश्मीर, लढाख, हिमाचल प्रदेश, येथेही जा की’. तिकडचे कितीतरी रुट्स त्यांनी आम्हाला सांगितले. ‘ क्लबच्या जर्नलमधून अजून डिटेल्स माहिती मिळते, ती मिळवा. शिवाय, क्लबकडे तुम्ही ग्रुपला मोहिम आखणीपूर्वी मॅप रिडिंगवर वर्कशॉप घ्यायचा प्रस्ताव दिलात तर अधिक माहिती देता येईल असे त्यांचे म्हणणे होते.

                मोहिमेत अत्यंत आवश्यक असणारी साधन सामुग्री, कंपास, अल्तामिटर, . साधने किती काळजीपूर्वक निवडून घ्यावीत तीचा योग्य पद्दतीने वापर कसा करावा याची माहिती देखील हरिषभाईंनी दिली           

                महाराष्ट्रातील गिर्यारोहणावर सुद्दा आमची चर्चा झाली. ‘ Trek the Sahyadri ‘ हे त्यांचे पुस्तक सुरुवातीपासून आम्हाला उपयोगी ठरत आल्याचे सांगितल्यावर हरिषभाई आनंदित झाले.

               सध्या हिमालयात काही तरुण खोटी माहिती देऊन त्यावर परवानगी मिळवून  मोहिमांवर जातात आणि कुठला अपघात घडला की संकटात सापडतात. मग त्यांना धावाधाव करून स्वतःचा बचाव करावा लागतो.  हे अयोग्य आहे. काही मोहिमा तर खोटे रेकॉर्ड दाखवून शिखर चढाईचा दावा करून त्याची प्रसिद्दी मिळवतात. अशा घटना गैर आहेत. ते पब्लिकला बनवतील, पण माउंटेनिअर्सना बनवू शकणार नाहीत. अशा वृत्तीमुळे आपले फिल्ड बदनाम होत आहे,’ असे त्यांनी शेवटी स्पष्टपणे सांगितले.

                   आमच्या गप्पा गोष्टींचा समारोप झाल्यावर त्यांनी आम्हाला तुम्ही भरपूर भटका, ट्रेक्स करा, मोहिमा करा, पण त्यात सातत्य राहू दे, हिमालयन क्लब तुम्हाला नेहेमी मदत करेल, ‘ असे सांगून पुन्हा गप्पा मारायला येण्याचे हरिषभाईनी आम्हाला निमंत्रण दिले.

                   या अष्टपैलू उमद्या व्यक्तीने गिर्यारोहण क्षेत्राला दिलेले योगदान सर्व साहसप्रेमींना नेहेमी ऊर्जा देत राहील याविषयी शंकाच नाही.

                                                        -----------------------------