Sunday, 1 November 2020

💐मनातलं जनांत💐

 💐मनातलं जनांत💐

                आयुष्यात धडपडीला खूप महत्व आहे. ही धडपड आपल्याला नेहेमी प्रयत्नशील ठेवते आणि कधी पडल्यावर आपल्याला ती सावरते देखील ! आपण कधी सरळ, तर कधी वळणं वळणं घेत पुढे वाटचाल करीत राहातो. या वाटचालीत वाटेत आलेले प्रत्येक वळण सुंदर करणे आपल्याच हाती असते, याचे भान मला एका सुंदर शिबिराने दिले. त्यातून मला चांगली प्रेरणा मिळाली.

                एका स्वयंसेवी संस्थेने  दोन दिवसांचे यु टर्न  शिबीर भरविले होते जुन्नर जवळील ओझरला. योगायोगाने मला त्या शिबिरात सहभाग घेता आला. तेथे मला मिळालेल्या चांगल्या अनुभूतींविषयी मी तुमच्याशी हितगुज करणार आहे………..


💐आयुष्याचा यु टर्न--ओझर शिबीर💐

               यु टर्न शिबिराचे आयोजन केले होते ‘ Winners ‘ Education Charitable Trust या  स्वयंसेवी संस्थेने.     आपल्या मनातली  मरगळ, निरुत्साह आणि खचलेपण कसे घालवावे, याचे अभ्यासपूर्ण धडे मनोरंजनात्मक स्लाइड्स शोज आणि चित्रपट-फितींच्या  माध्यमातून सांगण्याचे विविध मार्ग आम्हा शिबिरार्थीना सांगण्यात आले. लहानांपासून ते जेष्ठ वयाच्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांचा उत्साही सहभाग या शिबिरात होता.

               श्रीअष्टविनायक तिर्थक्षेत्रांत प्रसिद्द असणारे ओझर हे कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाटातून प्रवास केल्यानंतर जुन्नर, ओतूर जवळ आहे. बारमाही शेती, बागायती असलेला हा भाग. इथे श्रीविघ्नेश्वर देवस्थान आहे. बाजूस शांत वाहणारी नदी आहे. येथील ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेला प्रशस्त हॉल शिबिरासाठी निवडला होता. मोठे प्रसन्न वातावरण होते इथे. दोन दिवस पूर्ण कालावधीत झालेल्या या शिबिरामध्ये सुमारे बाराशे व्यक्तींनी सहभाग घेतला.

               शिबिर नियोजन करणारी संस्था तज्ञ मंडळींनी भरलेली आहे. या टीमचा प्रमुख आहे एक आयटी सॉफ्टवेअर इंजिनिअर. शशिकांत खामकर हे त्याचे नाव. या व्यक्तीने परिश्रम करून तरुण तरुणींची छानशी टीम तयार केली आहे.  विविध व्यवसायिक कंपन्यांना आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांची काम करण्याची ताकद कशी वाढविता येते, याचे धडे ही टीम आगळ्या वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने देत असते. टिपटॉप गणवेशात राहूनही आपल्या विनम्र बोलीत संपूर्ण सभागृहात उपस्थित असलेल्या शिबीरार्थीना प्रभावित करण्याचे मोठे काम आयोजक  करीत होते.

                   मी या शिबिरात सहभाग घेतल्यानंतर जमेल तशा नोंदी टिपत होतो. या नोंदीमधून निवडक काही  आठवणी सारांशरूपामध्ये तुम्हाला सांगत आहे…………….                

               या प्रेरणादायी शिबिराच्या प्रारंभीच पवित्रा नावाच्या एका चुणचुणीत मुलीने सर्वांचे स्वागत करीत प्रास्तविक केले. त्यानंतर शिबीरप्रमुख शशिकांत खामकर सर्वांसमोर आले. अतिशय उत्साही हसतमुख तरुण चेहरा असणारे शशिकांत खामकर यांनी आपल्याला आयुष्यात जिंकण्यासाठी नेमके काय हवे असते, त्याचे मर्म सांगितले-

*पुर्णतः विनम्र व्हा

*दुसऱ्यांना आनंद द्या

*स्वतःचा अहंभाव सोडा

*निरोगी शरीर-आर्थिक स्थिरता-आनंदी वृत्ती,  ही आपल्या यशाची तीन प्रमुख सूत्रे आहेत.

*प्रथम त्याचे आभार माना, की ज्याने तुम्हाला इथे पाठविले आहे. नंतर स्वतःचे आभार माना. कारण तुम्ही येथे उपस्थित झालात. तसेच इथे आल्यावर आपले नाव,पद आणि स्वतःची प्रतिष्ठा पूर्णपणे विसरून जा. निर्मळ व्हा. रिकामे व्हा. त्यानंतर या शिबिराचा निखळ लाभ सर्वांना होईल.

                त्यानंतर, प्रत्येकाने उभे राहून आय ऍम विनर, आय ऍम विनर,’ असे जोरदार आवाजात हात उंचावून म्हणावे, असे सर्वाना आवाहन करण्यात आले. काही क्षणातच ही घोषणा सर्व सभागृहात घुमली. सारेच आता उल्हसित झाले !

                आयुष्यात प्रत्येकाचा जीवनक्रम कसा असतो तो कसा असावा, हे  स्लाईड शोच्या माध्यमातून शशिकांत खामकर यांनी विशद केले--

*शिक्षण-ज्ञानार्जन

*कामाचे नेतृत्व-जबाबदारी स्वीकारणे

*कठीण-कसोटीचा काळ

*अर्थार्जन संचय

*निवृत्ती-विश्रांती

                याच विषयासंदर्भात खामकर यांनी काही महत्वाच्या विषयांची माहिती दिली-

*सुरक्षा दक्षता.

*शालेय शिक्षण मर्यादित असते, पण आयुष्याची शाळा कायम कार्यरत राहाते.

*ज्ञान ही मोठी शक्ती आहे.

*लग्न हा आयुष्यातला महत्वाचा मंगल प्रसंग आहे. पण सावधान राहून निर्णय घ्यावा.

*आयुष्यात पिवळ्या रंगाच्या सिग्नलला मोठे महत्त्व आहे(म्हणजे सावध राहून पुढे होणे).

*कुठलीही कृती करण्यापूर्वी स्वतःबद्दल विश्वास बाळगा आपल्या क्षमतेची खात्री करा.

*दुसऱ्याकडे विश्वासाने पहा.

*एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होणे हे महत्त्वाचे तत्व असले तरी, तत्पूर्वी आपल्या स्वतःमध्ये विश्वास निर्माण करणे शिकायला हवे.  

*दररोज सकाळी आरशात स्वतःला पाहताना स्वतःमध्ये होकाराची आत्मविश्वासाची भावना निर्माण करा.

                  दुसऱ्या सत्रात वर्षा मॅडम यांनी शिबिरार्थींशी संवाद साधताना आपण नेहेमी कसे वागायला हवे, हे वेगळ्या ढंगात सांगितले--

 *आपली वृत्ती आशेची-होकाराची हवी.

*कोणाचेही प्रथम ऐकून घ्यायची सवय हवी, त्यानंतर आपली भूमिका मांडावी.

*अंगी नेहेमी सहनशीलता हवी.

*दुःख-पीडा सवयीची करावी. दुःखात शांतचित्त राहावे.

*आपणच गेलोआहोत, मृत्यू पावलो आहोत ! ही कल्पना एकदातरी  डोळयांसमोर आणावी. ते कल्पना चित्र स्वतः पाहावे. कल्पना विचित्र वाटली तरी आपल्या नंतरचेहे चित्र महत्वाचे आहे.

                    दुपारनंतरच्या सत्रात पुन्हा शशिकांत खामकर  सभागृहात आले. आता सभागृहातील प्रत्येकाला एक प्रश्नावली आणि सूचनांचा कागद वाटण्यात आला. खालील प्रश्न त्यात लिहिले होते. ते वाचून सर्वांनी उत्तरे लिहायची होती--

*लोकं खरोखर तुमचे स्वागत करतात का ?

*आपण आपला पुनर्जन्म इच्छेप्रमाणेमागून घ्यावा.

*तीन महत्वाची नाती प्रत्येकाने जपून ठेवायला हवीत-

एक-इतरांसमवेत, दोन-स्वतःसमवेत, तीन-निर्गुण निराकार परमेश्वरासमवेत.

*निर्मळ नात्यांशी जपणूक करताना आवश्यक तत्वे-

-नेहेमी संवाद साधावा.

 -कुठलीही अपेक्षा ठेवू नये.

 -नात्यात विश्वास ठेवावा.

 -नात्यामध्ये आदर बाळगावा.

                 हे सांगताना त्यांनी श्रीशिवरायांचे उदाहरण दिले. शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांनी एकमेकांना आदर दिला, म्हणून शिवप्रभु छत्रपतीझाले.

                यावेळी  मुन्नाभाई एमबीबीएसया चित्रपटातील एक दृश्यही दाखविण्यात आले. समोरचा बदलत नसेल तर आपण बदलावे, असे चित्रण त्यात होते.

*प्रेम म्हणजे निव्वळ प्रेम असावे(निरपेक्ष निर्मळ असे).

*आपल्याला कनिष्ठ असणाऱ्यास नेहेमी बरोबरीचा मान द्यावा.                

*दुसऱ्याच्या चांगुलपणाची प्रशंसा करताना ती मनापासून करावी.

*दुसऱ्याकडून घेतलेले नेहेमी परत करावे.

*उत्तम श्रोते व्हावे.

*आपल्या पत्नीचा चांगला आदर करावा.

*आयुष्यात सुरू केलेला संसार कधीही मोडू नये.

*लग्नात हार घालताना प्रत्येकाला एकमेकांसमोर झुकावे लागते, हे कायम लक्षात ठेवून त्याचे नेहेमी पालन करावे.

*केव्हाही तक्रारखोर बनू नये.

*नेहेमी क्षमाशील असावे.

*आयुष्यात नाते जपणे अत्यंत महत्वाचे असते, याचे भान ठेवावे   त्याप्रमाणे वागावे.

                 या सत्राच्या शेवटी सर्वाना काही क्षण डोळे मिटून एकाग्रचित्त राहण्याच्या सूचना मिळाल्या. त्यानंतर सारे सभागृह स्तब्ध झाले.

                  नंतरचे सत्र मेघा चिपकर या तरुणीने सुरू केले. नियमित योगासने करणे शरीर आणि आपले मनाला कसे उपयोगी ठरते, याचे विवेचन सोप्या भाषेत त्यांनी केले. दररोज करण्याजोगी काही योगासने कोणती ते सांगून त्याची छान प्रत्यक्षिके  करून दाखविण्यात आली.

                  दुसऱ्या दिवशी पुन्हा शशिकांत खामकर यांनी कालच्या विषयासंदर्भात व्याख्यान दिले. त्यावेळी त्यांनी समूह शक्तीबद्दल सांगितले--

*एकटी व्यक्ती कधीच काही करू शकत नाही. त्यासाठी  समूह एकत्र हवा. हे सांगताना त्यांनी साऱ्यांना आवाहन केले. तसेच सामूहिक पद्धतीने उभे राहून हात उंचावत ‘I am winner, I am winner ’…..असा घोष करायला सांगितले. उस्फुर्त आवाजात हा घोष घुमला.

                त्यानंतर सामूहिक प्रार्थना झाली. आपली एकत्रित ताकद किती मोठी कामे करू शकते, याची काही उदाहरणे त्यांनी दिली--

*आपली वास्तू असो अथवा कोणतेही  मोठी योजना-संकल्पना असो, ती प्रत्यक्षरूपात आणताना आधी किती अभ्यास करावा लागतो, कसे नियोजन करावे लागते, याविषयी मजेदार उदाहरणे त्यांनी ऐकवली. प्रथम दहीहंडी कशी रचली जाते हे त्यांनी स्लाइड्सवर दाखविले. मग लगानचित्रपटातले एक दृश्य दाखविले.

*दहीहंडी-

                  दहीहंडी एकट्याची असत नाही, त्यासाठी समूह तयार करावा लागतो. नियोजन करावे लागते. दहीहंडीचा सराव करावा लागतो. शिस्तबद्द पद्धतीने गोविंदांची रचना करून थर उभारून हंडी फोडायची असते. पडून कोणता अपघात होऊ नये, म्हणून खबरदारी सुद्दा घ्यावी लागते. त्यातून अपघात झालाच तर उपचार सर्वांची काळजी घ्यायची असते.

*लगान मधील क्रिकेट मॅच-

                  आपल्यावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी, ‘सामना जिंकूनच दाखवा’, असे आव्हान दिल्यानंतर निरक्षर गावकऱ्यांची इर्षा जागवून त्यांना क्रिकेट(गोला दंडी) या खेळाचे पूर्ण ज्ञान देऊन टीम तयार करणारा चतुर सक्षम नायक प्रत्येकास, त्याचे वेगळे कसब आणि त्याच्या उणीवा  हेरून कसा तरबेज करतो, याचा धडा सर्वाना आपली क्षमता अजमावण्यासाठी किती आवश्यक आहे, याची माहिती खामकरांनी स्लाईड-फिल्मच्या माध्यमातून सोपी करून सांगितली.

                 आयुष्यात आपल्या योजना-संकल्पना कितीही उत्तुंग असल्या, तरी त्या प्रत्यक्षात आणणे अशक्य नसते. ते कठीण जरूर असते, पण आपल्यात सत्यता आणि साहस तसेच चिकाटी-जिद्द निर्माण झाली, तर आपण विजय प्राप्त करू शकतो, हे त्यांनी सर्वाना पटवून दिले.

*आपले यश नशिबापेक्षा आपल्या धडपडीवर अवलंबून असते. नुसते विचार करीत बसून राहणाऱ्याला नशीब साथ देत नाही. त्याचप्रमाणे आपण नेहेमी, ‘मी आहे म्हणून जग आहे, सारे आहेत’, असा विचार करता  जग आहे ते सारे आहेत म्हणून मी आहे’, याचे सदैव भान ठेवावे, असा बहुमोल विचार खामकरांनी मांडला.

                   नंतरच्या सत्रामध्ये आपले आरोग्य आणि पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्ती किती महत्वाची आहे, याची माहिती प्रशांत या अनुभवी लेक्चररने विविध उदाहरणे दाखवून दिली--

*पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे.

*प्रत्येकजण पाणी   हवा याशिवाय जिवंत राहू शकत नाही.

*प्रत्येकाच्या शरीरामध्ये  ७२  टक्के  पाणी असते. मेंदू ९० टक्के पाण्याने भरलेला असतो आपल्या रक्तात ८३ टक्के पाणी असते.

*शरीराचे कमीतकमी आवश्यक तापमान ३७ सेल्शिअस इतके असते.

*शरीरातल्या पाण्याचा समतोल जेव्हा बिघडतो, तेव्हा आपले शरीर कमकुवत बनते. पाणी टक्के जरी कमी झाले तरी शरीराला त्रास होऊ लागतो. डोकेदुखी सुरू होते, पचन संस्था बिघडू लागते. अशा वेळी दक्षता म्हणून आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे(तंबाखू मळतात तसे-पण तंबाखू नको) आणि गरम पाणी प्यायचे. आराम मिळतो.

*ब्लड प्रेशर कमी जास्त व्हायला लागले अथवा सांधे आखडू लागले, तर योगासनातील कुबेर मुद्रा ५० मिनिटे करावी. म्हणजेच आपली हाताची तीन बोटे उंच न्यायची. ज्यांना एवढा वेळ नसेल त्यांनी आपल्या बोटांना सेलो टेप लावायची.

*डायलिसिस आता डॉक्टरांच्या मदतीने घरच्या घरी होऊ शकते. मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग  झालेला आहे.

*आपल्या मेंदूला आणि मूत्रपिंडांना कधीही रिकामे ठेवू नये. त्यांना सतत काम द्यावे (म्हणजेच पाणी पुरेसे प्राशन करावे).

*पाणी केव्हा पिऊ नये ?

जेव्हा-कुठले श्रम अथवा एक्झरसाईज करून आपण थांबतो, किंवा उन्हातानातून थकून आपण येतो.

सौच करून आल्यावर.

झोपण्यापूर्वी दोन तास.

जेवणापूर्वी.

जेवताना(पण शक्य असेल तर).

जेवल्यावर एक ते दीड तासांपर्यंत (त्यानंतर थोडे थोडे प्यावे).  

*पाणी केव्हा कसे प्यावे ?

पाणी बाटली नेहेमी आपल्या जवळ बाळगावी.

पाणी बसून प्यावे.

पाण्याचा गोल लोटा वापरावा.

थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्यावे.

पाणी तांब्याच्या भांड्यात एक ते दीड तास ठेऊन मग ते प्यावे.

मातीचे माठ पाण्यासाठी उत्तम.

दररोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे.

                    आपण गरीबच राहायचे की श्रीमंत व्हायचे ?’ हा विषय घेवून पुढील सत्रात शशिकांत खामकर व्यासपीठावर आले. त्यांनी याबाबत सांगितले--

                    आपण गरिबीत जन्माला आलो आहोत, हा काही आपला दोष नसतो. पण गरिबीतच आपल्या आयुष्याची अखेर व्हावी, हा दोष आपला असतो. तसे कधी  होऊ नये. आपण आपली प्रगती जरूर करावी. ते अशक्य नाही.

                    गरीब आणि श्रीमंतांची विचार प्रवृत्ती कशी असते ? याबद्दल ते म्हणतात--

*गरीब व्यक्ती आजचा विचार करते, तर श्रीमंत व्यक्ती दूरचा करीत असते. मध्यमवर्गीय हा महिना दोन महिन्यांच्या काळात काय करावे काय होईल ? याचा विचार करतो. त्यातही उच्च मध्यमवर्गीय माणसे आणखी पुढे जाऊन वर्षभराचे नियोजन करीत असतात.

*उच्चभ्रू लोकांच्या कल्पनांची भरारी उत्तुंग असते, तर मध्यमवर्गीय माणसं आपली मर्यादा ओळखून अवती भवतीच्या लोकांचा जास्त विचार करतात. श्रीमंतांना धोक्याची विशेष पर्वा नसते, मध्यमवर्गीय  नेहेमी, रिस्क घ्यायचेच कशाला ? म्हणून थांबतात. ते सहसा धोका पत्करत नाहीत. श्रीमंत माणसे मात्र सतत पुढे जात नवे अनुभव घेत शिकत असतात, आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीयाचे अनुभवाचे शिक्षणशाळा-कॉलेजपुरतेच मर्यादित राहाते.

*आयुष्यात यशस्वी होताना प्रत्येकाला चांगल्या कोचची जरुरी असते.

*तुम्हाला नायक, म्हणजे हिरो व्हायचे असेल तर, भरपूर मेहेनत घ्यावी लागते. विचार करण्याची क्षमता वेळेवर निर्णय घेण्याचे, त्याप्रमाणे कृती करण्याचे धाडस आपल्या अंगी असावे लागते. त्यानंतर आपण निश्चितपणे यशस्वी ‘winner’ होतो. जगभर नावाजलेली बिल गेट्स, स्टीव्ह व्हाज, एमडीएच मसालेचे मालक-धरमपाल, महेश ट्युटोरीअल्सचे महेश शेट्टी, दौंडची असामान्य महिला-कमल परदेशी(अंबिका मसाले ग्रुप), फ्लिपकार्टचे सुनील बन्सल, ही सारी कर्तृत्ववान मंडळी प्रचंड परिश्रम घेऊन आज यशशिखरावर विराजमान झालेली आहेत.

                    शशिकांत खामकर यांनी स्वतःचे उदाहण देखील दिले--

*शालेय शिक्षण रस्त्यातील दिव्यांखाली करणारा हा तरुण  छोट्या चाळीतल्या गॅलरीत राहायचा, आईने नोकरी  काबाडकष्ट करून या मुलाचे शिक्षण पूर्ण केले, मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आणि पुढे अथक मेहेनत घेऊन आज करिअर करून यशाच्या शिखरावर उभा राहिलाय.

                   असे परिश्रम करण्याची वृत्ती प्रत्येकाच्या अंगी उपजत असते. फक्त आपण तीला जागे करायला हवे.

                   चांगले अर्थकारण प्रत्येकाला किती उपयुक्त ठरते, हे सांगताना खामकर म्हणतात--

धन-संपत्ती बद्दल मनात मोठे गैरसमज पसरलेले असतात-

पैसे मिळविणे कठीण आहे.

हा पैसा फक्त श्रीमंतांनाच मिळतो.

पैसा चांगला नाही.

पैसा कधी स्थिर राहात नाही, वगैरे वगैरे……

                 प्रत्यक्षात, पैसे कष्ट केल्यानंतर मिळतात.

आपण पैशाला कधी शत्रू मानू नये.

पैसे बचतीची सवय तरुणपणीच व्हावी.

मिळालेला पैसा उधळपट्टी करता व्यवस्थित नियोजन करून ठेवावा. हा पैसा आपल्या ऐपतीप्रमाणे आवश्यक बाबतीत खर्च करावा.

आपल्या प्रगतीसाठी पैशाची अवश्य गुंतवणूक करावी.

दुसऱ्यांच्या संपत्ती-पैशांचा कधी मत्सर करू नये.

योग्य आर्थिक व्यवहार करण्याचे कौशल्य अंगी बाळगावे.

आपण इतरांपेक्षा धनवान आहोत असे नेहेमी म्हणावे.

                   यानंतर पवित्रा मॅडमनी सभागृहात प्रवेश केला एक प्रात्यक्षिक सर्वाकडून करून घेतले--

*प्रात्यक्षिक-

                   प्रथम आपले डोळे बंद करावे. मग आपल्या अंतर्मनात पाहावे,  , ,,, असे क्रम मोजत मन एकाग्र झाले की (मनाने) आपल्या घरात/वास्तूत प्रवेश करावा. किचनमध्ये जावे. लिंबू घेऊन त्याचे सरबत तयार करावे आणि ते प्राशन करावे. काही वेळ तेथेच थांबावे. मग हळू हळू अंतर्मनातून बाहेर, नॉर्मल स्थितीत यावे.

*सारांश-

                   मनात आले तर आपण सारे काही करू शकतो ! छोटे असो वा मोठे काम, आधी आपण नकार घंटाच लावतो, आपण हे करू शकणार नाही, आपल्या हातून ते होणार नाही, वगैरे वगैरे……पण तसे नसते.

*एका कागदावर/वहीमध्ये आपण चांगल्या गोष्टी(आपले संकल्प) लिहून ठेवाव्यात.

*स्वच्छ पाण्याच्या ग्लासात शाईचा एक थेंब पडला तरी ते पाणी रंग बदलू लागते. म्हणजेच ते अस्वच्छ होऊ लागते, पण ते पुन्हा स्वच्छ करायचे, तर भरपुर पाणी वापरावे लागते. म्हणजेच वाईट-नकारार्थी गोष्ट विनाविलंब होते, पण चांगली गोष्ट लवकर होत नाही.

*नकारात्मक विचार ताकदवान असतात. ते लगेच निर्माण होतात. सकारात्मक-चांगले विचार त्यापेक्षा ताकदवान असतात, पण ते लगेच निर्माण होत नाहीत.

*प्रत्येक व्यक्तीला आपली आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी मनःशांती आणि ध्यानधारणा यांची नितांत आवश्यकता असते. ही आंतरिक शक्ती आपण गाढ झोपेत असताना जास्त प्रभावी होवुन आपले मनोबल वाढवते. *आपल्या शरीरात लोहचुंबकाचे उत्तम गुण आहेत. आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून पाहिलेत की हातात चुंबकाचे गुण येण्यास सुरुवात होते. .

                 पवित्रा मॅडमनी या प्रसंगी आणखी काही माहिती ऐकवली--

*जवळपास आठ टक्के व्यक्तीच आपल्या मेंदूचा वापर करतात.

*आपल्या २००१ च्या राष्ट्रीय गणना कार्यक्रमाच्या नोंदणीनुसार जगात ७५ टक्के लोक आजारी अवस्थेत, तर २५ टक्के लोक निरोगी आहेत. एक तृतीयांश जनता हृदय रोगाने आणि मधुमेहाने त्रस्त झाली आहे. कॅन्सर हा दुर्धर आजार देखील लाखो लोकांना गिळंकृत करू पाहात आहे.

*प्राचीन ऋषी चरक यांनी असे सांगितले आहे, की जो आजारी असतो तो स्वतःचा वैद्य होऊ शकतो. ८५ टक्के रुग्ण स्वतःचा आजार स्वतःच बरा करू शकतात. १५ टक्के रुग्णांना वैद्यकिय उपचाराची गरज भासते.

                   जगात मानसिक आजारपण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण नाते संबंध बिघडत आहेत. घटस्फोटाच्या घटना वाढल्या आहेत. एका मोठ्या परिवाराची छोटी छोटी शकले होत आहेत. शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात देखील मानसिक आजारपण ताणतणाव वाढले आहेत. निराश तरुणांच्या आत्महत्या होत आहेत.

*आपली संपत्ती गेली तर जेवढे नुकसान होत नाही, तेवढे नुकसान आपले आरोग्य बिघडले की होते. चारित्र्य बिघडले तर आपले अधिक नुकसान होते.

                   सलमान खान हा चित्रपट हिरो दररोज जवळपास १६ लाख रुपये गरजू लोकांना दान करतो. आणि वर्षाला ४९/५० कोटी धर्मार्थ संस्थांना देतो, असेही त्यांनी सांगितले.

                  या सत्रात अजून एक प्रार्थना-प्रात्यक्षिक होणार होते. प्रत्येकाने डोळे बंद करून, मन-चित्त एकाग्र करून आपला जीव-आत्मा मरणानंतर कोठे जात असेल, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रार्थनेपूर्वी करण्यात आले. त्याप्रमाणे शिबिरार्थीनी प्रार्थना करताना ‘आतमध्ये’ डोकावण्याचा प्रयत्न केला.

                 शिबीर आयोजकांनी आपली भविष्यातील अध्यात्मिक शांती विश्वविद्यालयाची संकल्पना सर्वांसमोर तपशिलासह मांडली. यात सर्व धर्म आणि जाती,पंथ-संप्रदायी एकत्र यावेत, यादृष्टीने नियोजन होणार असल्याचे शशिकांत खामकर यांनी यु टर्नशिबिराचा समारोप करताना सांगितले.

                 हे प्रेरणादायी शिबिर आनंद आणि उत्साहात संपन्न होताना सर्व उपस्थितांना  सुंदर अशा संगीत  सुरावटींवर बेभान होऊन नृत्य करण्याचे आवाहन करण्यात आले. ही संधी प्रत्येकाने साधली आणि त्यानंतर संपुर्ण सभागृह जणू  नृत्यमयी झाले !

                 लहान थोर, अबालवृद्धांसह सारेजण नृत्याच्या अत्यानंदात रममाण झाले असताना, दहा मिनिटांनंतर संगीत सुरावट थांबली अन नृत्यही थांबले. मग सर्व शिबिरार्थींचे, तसेच  आयोजनात सहभागी असणारे सगळे लहानमोठे स्थानिक कार्यकर्ते इतर मान्यवर मंडळींचे जाहीर ऋण व्यक्त करीत सर्वांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर यु टर्नशिबीर संपल्याची जाहीर घोषणा झाली.

                 तर, असे हे बहुगुणी शिबीर माझ्यासह इतर सहभागींना पुढील वाटचालीकरीता उत्तम मार्गदर्शक ठरले आहे. ही यु टर्न आठवण वाचून काहींना जर प्रेरणा मिळाली, तर हे लिखाण सार्थकी लागल्याचे मला समाधान मिळेल.

 

                                                                        :::::::::::::::::::::::::::::