Thursday, 1 February 2018

🌹तारीख पे तारीख.....🌹

             💐कथाघर............💐
            या कथाघरात प्रवेश करताना प्र. के.अत्रे या प्रसिद्द लेखक,पत्रकार,नाटककारांचे स्मरण   होतेय.
            अत्रे माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत.कॉलेजात असताना त्यांच्या क-हेेचं पाणी या गाजलेल्या आत्मचरित्राने भारून टाकले होते. आयुष्यातल्यातल्या उलाढालीवर त्यांचेच 'मी कसा झालो', हे सुद्दा एक वेधक पुस्तक आहे.त्यांची कितीतरी नाटकं अजूनही रंगभूमी गाजवताहेत. कथासंग्रह देखील वाचकप्रिय आहेत.सानेगुरुजींच्या आयुष्यावर चित्रित झालेला ' श्यामची आई 'हा चित्रपट तर राष्ट्रीय पारितोषिक विजेते ठरला.
             त्यांची ' चांगुणा 'कादंबरी प्रसिद्द आहे.ती सत्यावर आधारित आहे.प्रतिकुल परिस्थितीशी सामना देणाऱ्या यशोदेची कथा वाचकाला अंतर्मुख करते.
             त्या पुस्तकाच्या प्रारंभी अत्रे म्हणतात '.....आजकालचे  आम्ही लेखक स्वतःला वास्तववादी म्हणवतो खरे,पण जीवनातली खरीखुरी वास्तवता चितारण्याची हिम्मत आहे कां आमच्या अंगात ? .........खऱ्या चांगुणेच्या जीवनाची कहाणी अजून संपलेली नाही.ती कशी संपेल ह्याची कल्पनाही करण्याची शक्ती माझ्या प्रतिभेत नाही.छे छे,जीवन फार भयंकर आहे.ते आपणाला समज नाही. म्हणुनच आपण जगतो आहोत......'
              कथा कादंबरीमध्ये वास्तवता हवी हे अत्रे यांचे योग्य मत लक्षात ठेवून मी आपणापुढे एक कथा सादर करतोय.........

                      🌹 तारीख पे तारीख....🌹

              🌹दामले आता कोर्टात बसून कंटाळले.कितीवेळ वाट बघायची शेट्टी वकिलाची ? दरवेळी हा आपल्यानंतर तासाभरानी येणार.मग पुढचे सगळे सोपस्कार पुरे व्हायला आणखी एक तास !
              'रविकांत दामले.....',जोरदार आवाज दिला कोर्टाच्या क्लार्कने !दामले हडबडून उभे राहिले.त्यांनी हात वर करून ' मी आहे....'असा इशारा क्लार्कला दिला.त्याने विचारले,'फिर्यादी कां ?
 'हो हो', वकील आलेत का तुमचे ?,त्यावर दामले चटकन म्हणाले,'नाही आलेत अजून.पण ते निघालेत इकडे यायला अंधेरी कोर्टातून,येतील ते....'
               जज्ज मॅडम दामलेंकडे पाहून हसल्या.'ठीक आहे.ही केस नंतर रिकॉल करा'.क्लार्कला तसे निर्देश दिले. तेव्हा दामले निर्धास्त झाले. कोर्टातनं  बाहेर जायला आता हरकत नव्हती. दामले
गॅलरीत आले.
               कोर्टाची गॅलरी ऐसपैस आहे.तुरळक माणसं येजा करीत होती.युनिफॉर्म मधले पोलीस, पट्टेवाले शिपाई,चपराशी इथुन तिथं जात येत होते.  
               गॅलरीच्या टोकाशी काचेचा मोठा दरवाजा होता.त्या पुढे जीने. तिथेही छोटी गॅलरी होती. कोणी नव्हते तेथे. दामले निवांतपणे तिथे उभे राहिले.
               खाली रस्त्याच्या कडेला मोठी पोलीस व्हॅन उभी होती.व्हॅनजवळ बारा पंधरा युनिफॉर्म मधले शस्त्रधारी पोलीस ! दामले चक्रावले! पण हे तर कोर्ट आहे.येथे पोलीस आरोपींची वर्दळ असतेच.मग गाड्याही असणार ना त्यांच्या ? दामलेंनी स्वतःला समजावले.
               कोर्टाचा एक वयस्कर चपराशी तेवढ्यात तेथे येऊन उभा राह्यला.तो खाली पाहू लागला. मग त्याने दामलेंकडे हसत बघितले.म्हणाला,' आज मोठा आरोपी आलाय आपल्या कोर्टात ! 'कोण
आरोपी ?'. वेलची गँगचा बाप्पा पुजारी.' 'काय म्हणता ?,बाप्पा पुजारी ?' दामलेंच्या भुवया उंचावल्या! दामलेंच्या नजरेपुढे क्षणात त्या दादाचे साम्राज्य उभे राह्यले. मुंबईतल्या बिल्डर्स अन डेव्हलपर्स कडून वारेमाप खंडणी वसूल करणारा हा कोट्याधीश,नव्हे अब्जाधीश दादा आज इथे आलाय ?
              तो चपराशी पुढे बोलू लागला....'आता बाप्पा पुजारी येरवडा जेलमध्ये असतो.इथं अजून
एक मोठी व्हॅन आलीय पोलीसांची. ती पलीकडच्या बाजूला उभी राह्यलीय.'
            '  हां, बरोबर,म्हणून तर एव्हढा फौज फाटा....',दामलेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
             'आज कोर्टात तारीख आहे नां त्याची.तिसऱ्या माळ्यावर सकाळीच येऊन बसलाय तो.'
             पुन्हा दामलेंेसमोर त्या दादाची धारदार नजर उभी राह्यली.भेदक डोळे,रागीट चेहरा. कमी ऊंची असूनही दमदार पावलं टाकीत शहरभर वावरून दहशत गाजवणारा हा बाप्पा पुजारी अगदी नावाजलेला दादा होता.
             मात्र हा दादा लोकांना आवडायचा.कोणाला काय मदत लागली,पैसे लागले,त्यांची काही कामं अडकली,की ह्याची माणसं तत्परतेनं तिथं हजर ! जातीनं प्रश्न सोडवायची. एरियात तर सगळ्या लोकांचा हा भाई ! गरीब असो वा श्रीमंत. छोटे मोठे दुकानदार, गरजू आया बाया बिनधास्तपणे त्याच्या बिल्डिंगमध्ये जायच्या आणि मदत मिळवायच्या.
            एक आमदारकीची टर्म भोगलेला हा महात्मा.आज त्याच्या कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तीदेखील त्याच्यामुळे राजकारणात चमकू लागल्यात. पण आज,हाच एका हत्येप्रकरणी अडकलाय !
            तोच हा बाप्पा पुजारी आता या जेलमध्ये आलाय !
          खाली बघत असलेला चपराशी आता दामलेबरोबर गप्पा हाणू लागला.' साहेब,तुम्हाला सांगतो,ह्या दादाला आपण जवळून ओळखतो.कितीतरी वेळा ह्या कोर्टात बाप्पा आलाय.'
          'लाख माणूस आहे बघा.तुम्हाला खोटं वाटेल,पण तो आपल्याला पर्सनली ओळखतोय....'.
          ' काय म्हणतां ?',दामलेंच्या भुवया पुन्हा वरती गेल्या !
         ' मग काय,आपण खुप वेळा भेटलोय त्याला या कोर्टात.काय लागलं सवरलं तर आणून पण दिलंय त्याला ! '
          ' बापरे,भारीच आहे हे.' दामले मनाशी म्हणाले.' आरोपीला कोर्टाचा माणूस काही आणून देतो म्हणजे.....? '
            इतक्यात वरच्या मजल्यावरून काही पोलीस लगबगीनं खाली गॅलरीत आले.
        ' चला,चला,इथं थांबू नका तुम्ही....तिकडं आतल्या बाजूला चला...'त्यांनी जबरदस्तीने सगळ्यांना आतल्या गॅलरीत नेले.बाहेरून काचेचा तो मोठा दरवाजा लावून बंद केला.पोलीस आता पाहाऱ्याला तिथं उभे राह्यले.
         चपराशी दामलेंेबरोबरच आतल्या गॅलरीत आला. बंद काचेच्या दरवाजाजवळ ते उभे राह्यले. मग
चपराशी दामलेंना म्हणाला,' तो बाप्पा पुजारी आता खाली निघेल बघा इथल्या जिन्यातुन.'
        ' आता आपल्याला इथून बघायला मिळेल की हो.'
        'हो तर,इथूनच उतरणार तो.पण मला ओळख दाखवेल बघा तो.तुम्ही बघाच.' चपराशाच्या ह्या बोलण्याकडे दामले आश्चर्यचकित होऊन पाहू लागले.
        दामलेंना आता जिन्यातुन पाचसहा गन घेतलेले पोलीस खाली येताना दिसले.त्यांच्या मागे, एका हाताला बेडी ठोकलेला बाप्पा पुजारी येताना दिसला ! डोक्यावर तिरकी गांधी टोपी.भेदक बेदरकार नजर आणि टपोऱ्या डोळ्याचा बाप्पा पुजारी दामलेंनी पाहिला. जेमतेम उंची.आणि पायात कोल्हापूरी चपला घातलेला.पांढऱ्या शुभ्र सदरा लेंग्यातला हा दादा !      दामले जवळून पाहात होते !
             एवढ्यात त्या दादाची नजर या चपराशाकडे गेली.'  काय दळवी ? ',एवढे दोन शब्द उच्चारीत बाप्पा पूजारी खाली उतरला ! आता दळवी चपराशी धन्य झाला !
           ' साहेब,बघितलंत का ? ',त्याने दामलेंना विचारले. दामलेही धन्य झाले.आता त्यांना दळवीबद्दल आदर वाटू लागला !
            दामलेंनी मग त्याला विचारले,' काय हो दळवी, एवढ्या लांबून हा आरोपी आणणे साधेसोपे नाही.बरोबर ?'
            दळवी दामलेंकडे निर्विकार नजरेन पाहू लागला.  पुन्हा दामले बोलू लागले. ' अहो दळवी, केवढा बंदोबस्त लागतो या लोकांना ? पार पुण्याहून इथे आणायचे म्हणजे ? आणि त्यात काही धोका घडला तर ?'
         दळवी त्यावर हसला.....' अहो काळजीचं नसत त्यात. या दादालोकांचा पण वेगळा बंदोबस्त
असतो. सगळं मॅनेज केलेलं असतं यांचं ! शिवाय, कोर्टाच्या तारखेला यायचं म्हणजे वाटोवाट काही देवघेव,व्यवहार घडतात. ते काही पोलिसांना समजतात आणि समजत नाहींतही ! '
         ' बापरे,सगळंच भयानक आहे हो हे.'
        ' मग काय हो,एवढ्या प्रवासात थांबायला खूप कारणं असतात की, भेटीघाटी घडतात... माहिती देता येते.घेता येते.आणि इथं कोर्टात आल्यावर तरी काय काम असतं याचं ? पुढची तारीख मिळते की. मग यांची पुढची वारी...'
          दामलेंना घडाघडा माहिती देणाऱ्या दळवीला आता आपल्या साहेबाची आठवण झाली.आणि दामलेंना,' चला,निघतो मी आता.नाहीतर माझ्यासाहेबापुढं माझी खैर नाही....,'एवढे बोलून तो निघूनही गेला !
         दामले एकटेच गॅलरीत उभे राह्यले.
         कोर्टातले हे धक्के दामलेंना बसत असताना, ' दामलेसाब, मै अभी आ गया हूं. चलो,अंदर कोर्ट मे जायेंगे.....',असे म्हणत शेट्टी वकिलाने दामलेंना एक हलकासा धक्का दिला !🌹


 💐💐  आपल्या प्रतिसाद-प्रतिक्रियेसाठी ई-मेल पत्ता....
                      yescharudatta@gmail.com💐💐

                                     

💐भटकंती मनसोक्त........💐


                         💐 वाय. झेड.......💐

         या नावाची एक मान्यवर गिर्यारोहण संस्था मुंबईत कार्यरत आहे.'वाय झेड' म्हणजे यंग झिंगारो ट्रेकर्स.
         वाय झेडचे ऐतिहासिक कार्य म्हणजे शिव स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले रायगडावरील गडजगरण सोहळा.हा कार्यक्रम राज्यभर गाजला.दूरदर्शनवर सुद्धा त्याचे प्रेक्षपण झाले होते.
          १९८५ मध्ये झालेल्या या गडजागरणाचे कौतुक दुर्गमहर्षी अन लेखक स्वर्गीय गो.नि.दांडेकर. तसेच साबिर शेख.शिल्पकार अण्णा सहस्रबुद्धे या मान्यवरांनी केलेय.तीन दिवस ते स्वतः गडावर राहिले होते.
           गिरिप्रेमी मावळ्यांचे कौतुक करताना गोविंदा भारावून गेले होते.त्यावेळी ते म्हणाले होते,'एवढी चांगली मंडळी तुम्ही,हे तुमचे काम बघून शिवप्रभूही धन्य झाले असतील.....पोरांनो मोठे काम केलेत तुम्ही....पण मला हे तुमचे 'वायझेड' हे नाव बुवा पटत नाही काही.ते बदलुन टाका बघु आधी.....'.
           मात्र वायझेड नाव आहे तसेच राहिले.त्याला कारणही तसेच आहे.कारण हे नावच 'हटके'आहे.
           माझ्या भटकंतीची सुरुवात खऱ्या अर्थाने याच संस्थेतुन झालीय.सहयाद्रीचे खोरे आणि भव्य अशा हिमालयाची ओळख. मी अन माझ्यासारख्या हजारो दुर्गवेड्याना वायझेड मुळेच झालीय.
           मुंबईतील गिरगावमध्ये विद्याधर बिर्जे,हर्डीकर बंधू,भिडे बंधू,यादव बंधू,शुभांगी सोहोनी,अंत्या जोशी,गुराम, श्री दळवी(ही यादी खूप मोठी आहे)अशा डोंगरवेड्यांनी मिळून स्थापन केलेली आणि जव्हेरी फॅमिलीने सक्रिय राहून प्रोत्साहित केलेली यंग झिंगारो ट्रेकर्स ही गिर्यारोहण पदभ्रमण संस्था आता महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
            सह्याद्रितील दुर्ग मोहिमा,अंध अपंग मित्रांचे गिर्यारोहण,अवघड कडे कपारीवर प्रश्तरारोहण, तसेच नवख्या पण साहसी तरुण तरुणींसाठी निसर्ग साहस शिबिरांचे आयोजन,प्रशिक्षित व अनुभवी गिर्यारोहकांच्या हिमालयीन शिखरांवर मोहिमा.यात 'वायझेड'वर्षभर मग्न असते.
            महाराष्ट्राने सन १९९८ च्या मे महिन्यात एव्हरेस्टवर आपले पाऊल ठेवले त्या नागरी मोहिमेचा नेता आणि मान्यवर गिर्यारोहक ऋषिकेश यादव हा वायझेडचा स्टार गिर्यारोहक आहे.
            याच संस्थेच्या माध्यमातून मला १९८६ साली दार्जिलिंगच्या एच.एम.आय.या सुप्रसिद्ध संस्थेतून प्रशिक्षण घ्यायची संधी मिळाली.त्यांनतर मी जमेल तशी भटकंती सुरू केली.संस्थेच्या काही मोहिम उपक्रमात सक्रिय राहून सेवा केली.हे करताना मिळालेले अनुभव मला पुढच्या वाटचालीत उपयोगी ठरलेत त्याबद्दल मी वायझेडचा सदैव ऋणी आहे.


       

🌹चित्रपट गप्पा......🌹

                                                              चित्रपट गप्पा......

           🌹चित्रपट म्हटला कि आपल्या डोळ्यापुढे 'करमणूक' हा शब्द उभा राहतो.पण खरोखर चित्रपट हा फक्त आपली करमणूक करित असतो का?
         
             पूर्वी थिएटरमध्ये (आणि आता घरोघरी) आरामात दोन-तीन तास लोकं सिनेमा पाहात असत.या सिनेमांत तुम्ही- आम्ही गुंग होऊन जायचो.सिनेमा संपला की, आपण भानावर यायचो.याचे रहस्य काय बरे होते? तर,आपल्याला त्या चित्रपटाची (म्हणजेच सिनेमाची) कधी कथा भावायची, तर कधी त्यातली अवीट गोडीची गाणी आपल्या ओठांवर कायमची घर करून बसत असत.उत्तम काम करणारे कलावंत,त्यांच्या सौंदर्यासह मोहीत झालेले तुमच्या माझ्यासारखे कित्येक रसिक असतील!
         
             यालाच मी चित्रपटाचा आपल्यावर पडलेला 'प्रभाव' म्हणेन.सर्वसामान्य प्रेक्षकावर चित्रपटाचा हा प्रभाव पडत असेल तर त्या रसिक प्रेक्षकाने अधिक जागरूक नजरेतून तो चित्रपट का पाहू नये!
     
             या करिता त्या रसिक-प्रेक्षकास काही पथ्ये जरूर पाळावी लागतील.पाहिले महत्वाचे पथ्य म्हणजे त्याने कोठलाही चित्रपट फक्त करमणूक म्हणून बघू नये.तो एक कालाकृती म्हणून बघावा.
         
             ही कलाकृती पाहात असताना आपण मुख्यतः चार घटकांना भेटतो आणि अनुभवतो.ते चार घटक (किंवा चित्रपटाचे अंग म्हणा हवंतर) म्हणजे कथा,चित्रपटातली पात्रं,संगीत आणि दिग्दर्शक.
     
            चित्रपटातील कथा काल्पनिक असो वा वास्तव,आपण ती वास्तव म्हणून बघतो. चांगली कथा आपल्याला निश्चित्तपणे खिळवुन ठेवते.कथेत कधी प्रेमावर भर असतो तर कधी शौर्यावर.तशा खूप विषयांच्या कथा आपल्याला चित्रपटांतुन दिसतात.देशप्रेम,गरिबी,अमिरी,या दोन्हीतला दुरावा,प्रेम,पिळवणूक,जमिनदारी,खून,बलात्कार,युद्ध,साहस, विज्ञान,अंतराळ,जादुई परीकथा,निसर्गप्रेम,पर्यावरण,पाणी,जन्म-मरण,पत्रकारिता,क्रौर्य,संगीतप्रेम,शिल्पकला,उदासी,आनंदीजीवन, तुरुंगातील कैदी,पुरुषार्थ,स्त्रीचे जगणे,भोगवृत्ती,विनोद,लहानमुलांचे विश्व,क्रीडाप्रेम,........असे कितीतरी विषय चित्रपटातून येतात.चित्रपटात कधी एकाच विषयावर भर असतो तर कधी इतर उपविषयांची एकत्र गुंफण केलेली असते.
       
            चित्रपटातील पात्रं प्रेक्षकांना चित्रपटाची सगळी कथा उलगडून सांगतात. ती नकली व कळसूत्री असली तरीही तीच आपल्याला भेटतात आणि बोलतात.त्यांचे सुख-दुःख जगणे-वावरणे....इ.आपण जवळून बघतो.त्यातुन आपले त्यांचे नाते होते.
           चित्रपटातील या पात्रांत कित्येक देशी-विदेशी विलक्षण अभिनय सामर्थ्य असलेले कलावंत लपलेले असतात.तरुण,वृद्ध, बालक,माता-भगिनी,सौंदर्यवती,कृरकर्मी,यांच्या रूपात ते आपल्याला भेटतात. चित्रपट तारणे अथवा पाडणे त्यांच्या हाती असते.
         
            चित्रपट निर्माण करून तो आपल्यापुढे आणण्याचे सारे श्रेय हे निर्मात्याचे असते.परंतु आपल्यासमोर सर्व पात्रं बोलकी करून ती कथेसह सादर करणारा कलाकार असतो चित्रपटाचा दिग्दर्शक. चांगला चित्रपट पाहून प्रेक्षक प्रभावित झाले, तर त्याचे सगळे श्रेय प्रथम दिग्दर्शकाकडे जाते.मात्र चित्रपट पडला,तर साऱ्या अपयशाला जबाबदार तो दिग्दर्शकच!
           आपल्या भारतात आणि जगभरात असे यशस्वी-अयशस्वी कितीतरी दिग्दर्शक होऊन गेलेले आहेत,आजही आहेत.
            जवळपास प्रत्येक चित्रपटात संगीत असते.संगीताचा वापर चित्रपटातून करणे दिग्दर्शकांना आवश्यक वाटते.या संगीतामध्ये दोन कप्पे असतात-एक म्हणजे चित्रपटात सातत्याने आपण ऐकतो ते पार्श्वसंगीत (सुरावट, घुन, गंभीर किंवा गंमतीदार प्रसंगी आपण ऐकतो ते संगीतातले तुकडे),दुसरे म्हणजे चित्रपटातील गाणी.या गाण्यांविषयी खूप काही लिहिण्यासारखे आहे.येथे आपण चित्रपट पाहाणे या विषयी बोलत असल्याने संगीताचा विस्तार नको,मात्र संक्षिप्तपणे सांगायला हवेच-
       
             चित्रपटातील सर्वच संगीत आपल्याला श्रावण करावे लागते.अवीट गोडीची गाणी तर आपण हृदयाच्या कप्यात ठेवतो.ती आपण गातो गुणगुणतोही.मग ती गाणी नायक-नायिकेने दुःखात गायलेली असोत की सुखात! उडती गाणीपण आपल्याला प्रिय होतात.ही सारी गाणी गाणाऱ्या आपल्या खऱ्या गायक-गायिकेचे काय?तो तर आपल्याशी स्वरगुंजन करीत असतो.
         
             तर,ही झाली चित्रपटातील चार महत्वाची अंग.आता या चारजणांच्या  संगतीत चित्रपट एकाग्रता आणि सलगतेने पाहाण्यासाठी योग्य जागा म्हणजे सिनेमाचे (चांगले) थिएटर हे लक्षात ठेवा.घरामधील टि. व्ही.अथवा व्हिडिओ आपल्याला ही एकाग्रता देऊ शकणार नाही.
           
            प्रत्येक चित्रपट एक कालाकृती म्हणून पाहिल्यानंतर चित्रपटाच्या वर सांगितलेल्या चार अंगांविषयी आपले प्रामाणिक मत ठरेल ते त्या चित्रपटाचे खरे-खुरे परीक्षण समजावे.
         
            या ठिकाणी तुम्हाला सांगतो की,तुम्ही केलेले चित्रपटाचे परीक्षण आणि अभ्यासू चित्रपट समिक्षकाचे परिक्षण यात जरूर फरक असेल.पण त्याची धास्ती नको.कारण त्या समीक्षकाची नजर असंख्य चित्रपटांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणानंतर तयार झालेली नजर आहे,तर तुमची नजर आहे जाणत्या रासिक प्रेक्षकाची.
       
            महाराष्ट्रातील माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांत जुन्या अशा 'प्रभात' चित्र मंडळाचा मी जेव्हा सदस्यही नव्हतो,तेव्हा कॉलेजात बोअर वाटणाऱ्या लेक्चर्सना बुट्टी मारून मी इतर मित्रांसह मॅटीनी शोजला जायचो!त्यावेळी पाहिलेल्या आणि लक्षात राहिलेल्या चित्रपटांमध्ये -गाईड,आँखे,जॉनी वाँकर (चित्रपटाचे नाव),कागजके फुल,कोहरा,असे कितीतरी आहेत.
         
            तत्पूर्वी शालेय जीवनात पाहिलेले चित्रपतदेखील माझ्या अजून लक्षात आहेत.ते म्हणजे -उजाला,मेरा साया,असली नकली,पत्थर के सनम,नागीन, ताजमहल, दादीमाँ,कानून,साहब बीबी और गुलाम,चायना टाऊन,नया दौर,प्यासा,वक्त,दो रास्ते,आराधना,अमरप्रेम,अन्नपूर्णा, मोलकरीण,सांगते ऐका, केला इशारा जाता जाता,एक गाव बारा भानगडी, सोंगाड्या,मुंबईचा जावई,सतीचं वाण,वारणेचा वाघ,पांच नाजूक बोटं, एक दोन तीन, वैभव,वैशाख,वणवा, बीस साल बाद,शांतता कोर्ट चालू आहे,संत तुकाराम, श्यामची आई,माणूस,शेजारी,संत सखू,अशी किती नावं सांगावीत?
            प्रभात चित्र मंडळाचा सदस्य झाल्यावर मात्र मी माझ्या 'शोधक' नजरेने चित्रपट पाहू लागलो.पूर्वी बघितलेले चित्रपट पून्हा पाहायला मिळाले ते मला वेगळे भासू लागले. काही अधिक भावले तर काहींना अगोदर एवढे चांगले ठरावल्याची खंत वाटली.
       
            प्रभातमार्फत देशी-विदेशी कलात्मक आणि गाजलेले तसेच दुर्मिळ चित्रपट दाखविले जात.विदेशी चित्रपट पाहाताना भाषेची अडचण येई .मात्र बहुतेकवेळा इंग्रजी सबटायटल्स वाचायला मिळाल्याने समजणे सोपे होई. आजघडीला मी पाहिलेल्या चित्रपटांची यादी मोठी नसली तरी ती छोटीही नाही.
       
            तुम्हीसुद्धा खूप चित्रपट पाहिलेले असतील नाही का?मग तुम्हीही रसिक प्रेक्षक आहात असे मी म्हणेन.तर रसिकहो,मी पाहिलेल्या आणि जाणलेल्या चित्रपटांचे 'सार' सांगायचे म्हंटले तर एवढेच सांगेन की,जागतिक चित्रपटांत मला इटली,जपान,जर्मन,झेक,स्पेन,अमेरिका,स्विडन,......या देशांचे चित्रपट आवडतात.थेट आणि वेधक चित्रण,किरकोळ वाटणारा विषयदेखील मोठा करून रंजक बनविलेली कथा,अस्सल छायाचित्रण,प्रारंभीची आगळी विक्षिप्त वाटणारी संगीत सुरावट, बिनधास्त परंतु प्रामाणिक अभिनय करणारे कलावंत,आणि हे सगळे आटोपशीर वेळेमध्ये सादर करणारा कसबी दिग्दर्शक मलातरी श्रेष्ट वाटतो.इन्ड बर्गमन,स्पिलबर्ग,कुरुसावा,बर्तालू,डिसिका,चाप्लिन,.....हे त्यातले काही जेष्ठ अन श्रेष्ठ कलाकर्मी.

           काही चांगले अपवादात्मक चित्रपट सोडले,तर रशिया,चीन,सिलोन,.....या देशाच्या चित्रपटांनी मला बोअर केलेय. इज्रेल,ब्राझिल,आफ्रिका,नेदरलँड,इराण,तुर्कस्तान,.....या देशांच्या काही विलक्षण चित्रपटांनी मी खूप प्रभावीत झालोय.
           आपल्या भारतीय चित्रपटांबाबत मी आनंदी आहे.स्वर्गीय व्ही.शांताराम,सत्यजित रॉय, विमल रॉय, दादासाहेब फाळके,राजकपूर,विजय तेंडुलकर,गोविंद निहलानी,राम गाबाले,राजा परांजपे,बी.आर.चोप्रा,.....इत्यादीं चित्रमहर्षींनी हिंदी-मराठी चित्रपट सृष्टी गाजवलेली आहे.
         
           आणि,बासू चटर्जी,ऋतुपुर्ण घोष,बासू भट्टाचार्य,गिरीश कर्नाड,गोविंद निहलानी,अडुर गोपालकृष्णन ,जब्बार पटेल,रामदत्त, शाम बेनेगल,दीपा मेहता,अमोल पालेकर,कांचन नायक,आशुतोष गोवारीकर,सत्यदेव दुबे,तपन सिन्हा,मृणाल सेन ऋत्विक घटक,गिरीश कासाखल्ली,......या दिग्गजांचे दिग्दर्शन कसे विसरता येईल?
         
           रसिकहो,आपण प्रत्येक चित्रपट पाहाताना तो फक्त करमणूक म्हणून नव्हे तर एक कलाकृती म्हणून पाहावा या हेतूने मी तुमच्याशी या चित्रगप्पा मारल्यात, यामुळे तुम्हा रसिकांचे चित्रप्रेम अधिक जागरूक व अभ्यासु व्हावे हीच याक्षणी इच्छा आहे.🌹