Tuesday, 1 June 2021

💐💐परिसर💐💐

          कोल्हापूर विषयी माझ्या आठवणी खूप आहेत. भ्रमण छंद जोपासताना मला भावलेली दोन ठिकाणे आहेत-एक आहे कोल्हापूर, तर दुसरे हरिद्वार-हृषिकेश.

            ही दोन्हीही तिर्थक्षेत्रे आहेत. ती नदीकाठी वसलेली आहेत.

            कोल्हापूरचे श्रीसिद्देश्वर महाराज यांचा आज एक जूनला उत्सवदिन आहे. त्यांचे स्मरण करून मी तुम्हाला कोल्हापुर परिसराची नयनरम्य सैर घडवीणार आहे, खास करून कोल्हापूर अपरिचित असणाऱ्या वाचकांसाठी

💐करवीर नगरी-कोल्हापूर💐

            कोल्हापूर पहिल्यांदा पाहिले ते मी १२-१४ वर्षाचा असताना. कोकणातल्या आजोळी संगमेश्वरहुन अचानक एकदा माझ्या मामेभाऊ बापूने विचारले, ‘ येतोस का कोल्हापूर बघायला ? ’ मी त्याला चटकन हो म्हटले, पण त्याला प्रश्न केला, ‘ कधी ?  कुणाबरोबर ? ‘. बापूने सांगितले-‘ गदऱ्यांचा ट्रक आहे. तो निघणार आहे. माझा मित्र चंदू ट्रक ड्रायव्हर आहे. तो तिकडे जाणार आहे कामासाठी. बघून येऊ कोल्हापूर ‘. मी लगेच हो म्हटले. मात्र बापूला त्याच्या कामांमुळे जाणे रद्द करावे लागले. तो मला म्हणाला, ‘ तू एकटाच जा, काही काळजी करू नकोस, चंदू माझा चांगला दोस्त आहे, थोडा बडबड्या आहे, तुझा टाईमपासपण होईल.

           बापूच्या दोस्तासोबत मी ट्रकने कोल्हापूरकडे निघालो. देवरुख, मलकापूर, आंबाघाट मार्गे आमचा ट्रक प्रवास झाला. चंदूच्या ट्रक मालकाने त्याला सांगलीत काही काम करायला सांगितले होते. त्यामुळे सांगलीत काही वेळ आम्ही थांबलो. मग थेट जयसिंगपूर, वाठार मार्गे कोल्हापूर शहरात आमचा ट्रक पोहोचला. ही ट्रक सफर छान झाली.

           पहिल्यांदा मी कोल्हापूर पाहात होतो ! मोठे गजबजलेले शहर, आलिशान असे लक्ष्मी थिएटर. मोठठे मार्केट, तेथली दुकाने हे सारे बघून मी भारावून गेलो. इथल्या चौकाचौकात निर्धास्तपणे गप्पा मारीत बसलेले उत्साही कोल्हापूरकरांचे थवे बघून थोडे आश्चर्य वाटले. पण हा त्या शहराचा जिवंतपणाच दाखवत होता.

            इथे कामातून थोडी मिळाली, तेव्हा चंदू ड्रायव्हरने लक्ष्मी थिएटरमध्ये लागलेला पिक्चर बघायला आम्हाला नेले. अमिताभ बच्चनचा मजबूरपाहिला त्या दिवशी. ‘मजबूरची स्टोरी अजूनही लक्षात आहे…..

            तर, असे हे कोल्हापूर पहिल्यांदा पाहिले ते मनाला भावले. त्यानंतर कुटुंबासह श्रीमहालक्ष्मी देवीच्या दर्शनार्थ कोल्हापूरला आलो होतो. त्यावेळी पन्हाळा येथे मनसोक्त राहिलो आणि कोल्हापूरात फिरलोही.

            या उत्साही शहरात यायला राहायला बिलकुल कंटाळा येत नाही. गजबजलेल्या वातावरणातील श्रीमहालक्ष्मी देवस्थान, पंचगंगा नदीचा घाट, भव्यतम प्राचीन वाडे महाद्वार, इतिहासकालीन वस्तू संग्रहालय, कुस्तीचे गोलाकार मैदान, उत्तम अशी होलसेल अन रिटेल मार्केटस, दूधदुभत्या जनावरांच्या  सानिध्यात असलेले कपिलतीर्थ, लज्जतदार चवीची हॉटेल्स, विस्तिर्ण पसरलेला रंकाळा तलाव, नवा-जुना राजवाडा, शहराबाहेर तासाभराच्या अंतरावर वसलेले श्रीनरसोबाची वाडी देवस्थान, कागलचा श्रीकाडसिद्धेश्वर मठ, खिद्रापूरातले जुने देवालय, हे सारे बघणे हा एक आगळा अनुभव आहे.

                या शहरात, गंगावेस पासून खाली उतारावर चालत गेले की, आपल्याला कोल्हापूरची जलदायीनी पंचगंगा नदीचे दर्शन होते. समोर अरुंद पण वाहनांच्या वर्दळीने गुरफटलेला पूल दिसतो. हा परिसर तसा शांत आहे. नदीच्या घाटा जवळ पाण्यात असलेली  काही प्राचीन देवालये दिसतात. इथे जास्त करून क्रियाकर्म करणारे लोक वावरतात. अंगात संचार आलेल्या बाया देखील कधीकधी इथे पाया पडायला आलेल्या पाहायला मिळतात. खाली घाट पायऱ्यांवर बसून जवळच्या आयाबाया कपडे धुतानाचे दृश्यही आपल्याला बघायला मिळते. याच परिसरात श्री सिद्धगिरी महाराजांचे स्मृती स्थान आहे. जवळ एक मठसुद्दा आहे.

                पंचगंगेच्या घाटावर पाहण्याजोगे खास ठिकाण म्हणजे काळ्या कातळशिल्पात कोरलेले शिवलिंगाचे प्राचीन देवालय त्याच्या भोवताली असलेली अभेद्य अशी तटबंदी.

                एरव्ही कोल्हापूर म्हटले की, श्रीमहालक्ष्मी मंदिर देवस्थान पाहायला देवीचे दर्शन घ्यायला सगळे ग्रामस्थ तसेच पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. कुणाही भाविकाला प्रसन्न करणारी श्रीमहालक्ष्मी मातेची मूर्ती, चारही दिशांना असणारी कलात्मक द्वारे आणि भक्कम तटबंदी पाहुन आपण भारावतो. मंदिरा बाहेरील भाग मात्र वाहन लोकांच्या वर्दळीने गजबजलेला आहे.

                कोल्हापूरचे संग्रहालय बावडा भागात न्यू पॅलेसच्या ऎतेहासिक इमारतीमध्ये वसलेय. स्वराज्य संस्थापक छत्रपती श्रीशिवरायांचे वंशज श्रीशाहू महाराज यांच्या वापरातील वस्त्रे प्रावरणे, शस्त्रास्त्रे, चिलखती पोशाख, कलाकुसरीच्या वस्तू, इतिहासकालीन नाणी-मोहरा, तैल जल रंगातली चित्रे, रानटी प्राण्यांचे मुखवटे, श्रीशाहू महाराजांनी मिळविलेले किताब-नजराणे, इत्यादी विविध दुर्मिळ वस्तू या संग्रहालयात आहेत.

                जुना राजवाडा शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्या भागाला भवानी मंडप म्हणतात. भवानी मातेचे जुने भव्य मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. दिवसभर या मंदिरात दर्शनाला भाविक ये जा करीत असतात. निवांत बसण्यासाठी इथे छान जागा आहे. कुस्तीचे प्रसिद्ध असे भव्य गोलाकार तांबड्या मातीचे मैदान येथून जवळ आहे

                रंकाळा तलाव समस्त कोल्हापूरकरांचे भूषण आहे. संध्याकाळी नेहेमी फेरफटका मारायला येणारी उत्साही मंडळी इथे आईस्क्रीम अन भेळ-रगडा पुरीची चव चाखत तृप्त होतात मनसोक्त कोल्हापूरी गप्पा मारतात.

                कोल्हापूरात खाण्या नाश्त्याची अन राहण्याची छान सोय सर्वत्र आहे. श्रीमंतांकरीता आलिशान हॉटेल्स, मध्यमवर्गीयांना सोयीची वाटणारी छोटी हॉटेल्स लॉजिंग बोर्डिंग्ज आहेत. सर्वसामान्य पर्यटक-भाविकांना हक्काची वाटणारी धर्मशाळा मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध होते.

                या कोल्हापुरात काय मिळत नाही सांगा ? तिखट पांढरा तांबडा-तांबडा रस्सा चाखता येतो, झणझणीत मिसळ कटवडा मिळतो, कोल्हापुरी साज-ठुशी मिळते, इथल्या वहाणा जगप्रसिद्ध आहेत. उसाचा ताजा शुद्ध रस प्यायला मिळतो, गाई म्हशींचे धारोष्ण दूध प्यायला मिळते, इथल्या अस्सल दुधाच्या माव्यात बनविलेली मिठाई आणि कंदी पेढे प्रसिद्द आहेत. इथला गूळ परदेशात जातो, कोल्हापुरी फेटा तर जगात नावाजलेला आहे !

               मात्र या शहरात वाहतुकीला फारशी शिस्त नाही, आडव्यातिडव्या दुचाकी वाहनांच्या गराड्यात रस्ता ओलांडताना नवखा माणूस कासावीस होतो ! सार्वजनिक बससेवा ठीक आहे.

               अशा या माझ्या आवडत्या कोल्हापूरची माणसे कशी असतील स्वभावाने ? हे जाणणेही जरुरीचे आहे. गावरान शिवीची पण निर्मळ स्वभावाची बोली, मनमोकळा भाव अतिथ्यशीलता, जीभ फटकळ असेल पण आतून कुस्केपणा नाही. असे समस्त कोल्हापूरकर वृत्तीने दिलदार आहेत.

               श्रीशिवरायांच्या कार्य कर्तृत्वाला साजेशी ठरलेल्या महाराणी ताराबाई, अन साऱ्या रयतेचे दुःख जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी दिवसरात्र झटणारा रयतेचा अलौकिक राजा छत्रपती श्री शाहू महाराज यांचे सानिध्य लाभलेली ही करवीर नगरी आहे.

               आता मी एवढे सारे सांगितल्यानंतर तुम्ही जरूर कोल्हापूरला जाण्याचा (हे वाक्य फक्त कोल्हापूर माहीत नसलेल्यांसाठी आहे) विचार पक्का करीत असाल नाही का ? जा, जरूर जा. समस्त करवीर नगरी तुमचे मनापासून स्वागत करेल.        

                                                               -------------