Thursday, 1 April 2021

💐💐परिसर💐💐

          मुंबईहुन पुण्याकडे रेल्वेने प्रवास करताना खंडाळा घाट लागतो. त्या घाटाच्या अलीकडे असणारे महत्वाचे  रेल्वे स्टेशन कर्जत आहे. रायगड जिल्ह्यातला हा मोठा तालुका आहे. इथली बाजारपेठ, शासकीय कार्यालये, निवासी घरे, इमारती आणि संकुले यांच्या गराड्यापासून  थोडी दूर असणारी हिरवीगार पर्वतराजी पाहायला येणारे शौकीन पर्यटक पुण्या मुंबईहुन कर्जतला नेहेमी येतात.

            याच परिक्षेत्रात असणारी पळसदरी, गुंडगे ही लहानशी परंतु सुंदर अशी गावे आहेत. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या खोपोली मध्ये आणि खोपोलीच्या आसपास देखील पर्यटक निसर्ग प्रेमींना भावणारी काही लक्षवेधी ठिकाणे आहेत.

            त्याच परिसराची सैर आपण आता करूया……...    

💐पळसदरी, गुंडगे आणि खोपोली…….

*पळसदरी स्टेशन-

                मला भटकंती करताना आवडलेले एक निसर्ग रम्य रेल्वे स्टेशन आहे कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरील पळसदरी’. हिंदी चित्रपटात असते तसे छोटे एकाकी स्टेशन. डोंगर दऱ्यांच्या कुशीत पळसदरी विसावलेय. तेथे फक्त सेंट्रल रेल्वेची खोपोली लोकल जाता येता थांबते. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील हा एक उपमार्ग आहे.

                आपण पळसदरीला उतरल्यावर एकीकडे गावात जाणारी पायवाट धरावी किंवा जवळ दिसणारा अगदी छोटा पुल न्याहाळीत अवती भवतीची गच्च हिरवाई अनुभवावी. समोर दिसणारा डोंगर म्हणजे पळसदरीचा किल्ला. तो दिसतो जवळ पण रूट लांबचा आहे. सुट्टीच्या दिवशी गिरीप्रेमी येथे धडकतात.

                 पळसदरी स्टेशनला छप्पर हा प्रकार जवळजवळ नाहीच. तिकीट खिडकी, स्टेशन मास्तरचे छोटे ऑफिस आणि सिग्नल यंत्रणेची शेड, एवढे सोडले तर सारे मोकळे आकाश आहे.

                  इथले प्रवासी कोणते ? तर पावसाळ्यात धबधब्याच्या धारेत किंवा ओढ्या नाल्यात भिजायला येणारे शहरी तरुण तरुणी, त्याचप्रमाणे सुट्टी मिळाली की किल्ल्यांची अवघड वाट चढायची उमेद बाळगणारे साहसी गिर्यारोहक भटके ट्रेकर्स. नेहेमी येजा करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना हाच रेल्वेमार्ग लागतो. एरव्ही पळसदरी शांत सुनसान असते !

*श्रीसमर्थांचा मठ-

           डी. काळे या समर्थभक्ताच्या पुढाकाराने स्थापन झालेला हा मठ पळसदरी गावात आहे. या मठाच्या वास्तूत खाली तळघर असून तेथे ध्यानधारणा चिंतन करण्यासाठी साधक येतात. डी. काळे आता हयात नाहीत. त्यांचे शिष्यगण-साधक मठाची धुरा सांभाळतात.

             आमच्या आध्यत्मिक संस्थेने येथे मुक्कामी शिबिरे घेतली आहेत. हा पूर्ण भागच निसर्गरम्य आणि कोलाहल विरहित असून येथे काही काळ थांबल्यास निश्चितपणे मनःशांती मिळते.

*गुंडगे येथील शिबिर स्थळ-

             कर्जतला उतरून अर्ध्या पाऊण तासात सडकेने चालत आपण गुंडगे गावात पोहोचतो. गाव वस्तीजवळ स्वतंत्र अशा जागेत एका पटांगणालगत बांधलेले एक  शिबिर स्थळआहे. शाळेतील वर्गासारखी ही वास्तू बघताना विशेष वाटत नसली, तरी तेथला निसर्ग आपल्याला लगेच प्रसन्न करतो.

            मुंबईतील प्रसिद्ध आर.एम. भट एज्युकेशन सोसायटीच्या अधिपत्याखाली याचे नियंत्रण असून शाळा स्वयंसेवी संस्थांचे शिबिरार्थी आधी नोंदणी करून येथे येतात.

            आमच्या संस्थेने आयोजित केलेल्या एका शिबिराच्या निमित्ताने मी तिकडे गेलो होतो. ही वास्तू परिसर सर्वाना आवडला. तेथून जवळच वाहात असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात (ते जास्त खोल नसल्याने) निर्धास्तपणे आम्हाला डुंबायला मिळाले ! रात्रीचा मुक्काम देखील स्मरणीय झाला.

            पुन्हा या ठिकाणी जरूर यायचे असे मी ठरविलेय, पण अजून तो प्रवास योग आला नाही.

            गुंडग्याचे हे ठिकाण चिंतन-अभ्यास आणि निसर्ग सहवास शिबिरासाठी अत्यंत योग्य असे आहे. मी पुन्हा तेथे कधी ना कधी जरूर जाणार आहे.        

                                                               ----------------------  

*खोपोलीचा मठ-

            मुंबई पुणे हायवेवर घाट चढण्यापूर्वी मोठे शहर लागते खोपोली. या शहराच्या आजूबाजूस खूप पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे आहेत. पावसाळी वातावरणात भिजवून टाकणारा झेनिथ धबधबा, अष्टविनायक यात्रेतील महडचे गणेश मंदिर, रमाधाम वृद्धाश्रम, टाटा जलविद्युत प्रकल्प, श्री गगनगिरी महाराजांचा मठ, दुरशेत-जांभूळ पाडा येथील श्री गणेश मंदिर, आणि त्यापुढे पालीचे श्री बल्लाळेश्वर मंदिर.

            ही ठिकाणे एका दिवसा बघताना घाई होते. तेवढा वेळ नसतो. अशा वेळी काय करावे ? तर, खोपोली शहरापासून फारसा लांब नसणारा श्रीगगनगिरी महाराजांचा मठ इच्छुक पर्यटकांनी अवश्य पाहावा. शांतमय जागेत आणि वाहत्या पाण्यात पाय टाकून काही वेळ मनसोक्त बसण्याचा अध्यात्मिक आनंद तुम्हाला तेथे नक्की मिळेल.

 

                                                            :::::::::::::::::::::::