🌹🌹परिसर🌹🌹
शरीराचे आरोग्य कायम स्वरूपी टिकवायचे असेल, तर प्रत्येक माणसाने योग्य आहार घ्यावा आणि खाण्याचे पथ्य पाळायला हवे, असा सल्ला डॉक्टर मंडळी आपल्या पेशंट्सना नेहेमी देत असतात. शरीराप्रमाणे मानसिक स्वास्थ्यही निरोगी जीवनासाठी आवश्यक असते, हे सुद्धा सर्वमान्य आहे. व्यायाम-खेळ, चांगल्या कला-छंदांची जोपासना व सेवाभावी वृत्ती ही त्रिसूत्री स्वीकारली तर प्रत्येक व्यक्तीचे जीवन आनंदमयी होते हा सर्वानुभव आहे.
यातील पहिल्या सूत्राचा संदर्भ घेऊन प्रत्येकाने दिवसातून किमान एकदा आपल्या परिसरातील उद्यानाला भेट द्यावी, मनसोक्त सैर करावी. खात्रीने सांगतो, तुमचे शरीर अधिक निरोगी राहील आणि मनाची प्रसन्नताही वाढेल.
याची प्रत्यक्ष अनुभूती वेळोवेळी मी घेत आलो आहे. आमच्या परिसरातील उद्यान मला ‘जवळचे’ वाटते. शिवाय कामानिमित्त जेथे कोठेही जाणे झाले व निवांत वेळ मिळाला की मी जवळच्या उद्यानाचा शोध घेतो तिकडे मनमुराद भटकतो.
मुंबई शहरात पूर्व उपनगरामध्ये असे एक निसर्ग उद्यान आहे की जे तुम्हालाही आवडेल. चला, आपण सारे त्या परिसरातची सैर करू या..............
🌹मुलुंड(मुंबई)ची चिरतरुण वास्तू 🌹
🌹डॉ. चिंतामण द्वारकानाथ देशमुख उद्यान🌹
मी मुलुंडवाशी नाही. पण वर्षातून काही महिने कामानिमित्ताने मुलुंड मध्ये खेपा होतात. या उपनगराच्या पश्चिमेला एक जुनी जाणती समाजसेवी संस्था कार्यरत आहे. तिचे नाव महाराष्ट्र सेवा संघ. या संस्थेच्या वतीने दरवर्षी गिर्यारोहकांचे राज्यस्तरीय ‘गिरीमित्र संमेलन’ मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. गिर्यारोहणाचा छंद असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत मीही आहे. दरवर्षी जुलैमध्ये
संपन्न होणाऱ्या या संमेलनाची पूर्व तयारी जवळपास सहा महिने अगोदर करावी लागते. दर बुधवारी मिटिंगच्या निमित्ताने जुने नवे कार्यकर्ते
गोळा होतात.
या कारणाने मुलुंड परिसरात आल्यावर जेव्हा पुरेसा वेळ मिळतो, तेव्हा मी इथल्या ‘सी डी.देशमुख उद्याना’त मनसोक्त फेरफटका मारतो. हे उद्यान. १९८६ सालापासून येथे वसलेले आहे. गेल्या वर्षी मात्र काही महिने ते सुशोभिकरणाच्या कामांमुळे बंद ठेवण्यात आले होते. आता हे उद्यान पूर्वीपेक्षा छान होऊन लोकसेवेसाठी सज्ज झालेय.
‘सी डी. देशमुख उद्याना’चा एकूण परिसर प्रशस्त असून प्रवेशदारापासून सुरू होणाऱ्या निसर्गरम्य वाटिका सुटसुटीत पद्धतीने तयार केल्या आहेत. उद्यानामध्ये ठिकठिकाणी बसायची सोय आहे. मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंड्या, रिंगचे पाळणे, कसरतीचे मनोरे आहेत. मध्यवर्ती ठिकाणी पाण्याचे रंगीत कारंजे देखील आहेत. उद्यानाच्या एका कोपऱ्यात मध्यम आकाराचे उघडे प्रेक्षागृह आणि व्यासपीठ आहे. सुजाण नागरिकांचे सुसंवाद व्हावेत म्हणून तयार केलेल्या या ‘कट्टा व्यासपीठा’चा लाभ एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथले नागरिक सहसा घेत नाहीत, असे जाणवते. त्याऐवजी खट्याळ आणि चोरटी तरुण जोडपी खोड्या मस्करी करीत इथे रेंगाळताना पाहायला मिळतात.
मुलांच्या खेळणे-बागडण्याला कुठलाच निर्बंध उद्यानात नाही, त्यामुळे निर्धास्तपणे छोटी मोठी मुले आपापली खेळणी म्हणजे झोपाळे, घसरगुंडी, मनोरे अडवून खेळत असतात. क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना इथे खेळता येत नाही. हे उद्यान उघडे असण्याच्या वेळेमध्ये सर्व वयोगटातील मुला-माणसांची इथे वर्दळ असते. संध्याकाळी तर उद्यान उत्साहाने गजबजून जाते.
इथे अनेक वृक्ष आहेत. देशी विदेशी पाना-फुलांची रोपटी आहेत. मोठ्या कल्पकतेने सजविलेले प्रवेशद्वार, देखण्या कमानदार वाटिका, ऐसपैस बसायला असलेल्या काळया लादीच्या बैठका, पाण्याचे छोटे तळे, रंगीत कारंजे, ही सारी वैशिष्ट्ये कोणाही फिरस्त्याला मोहात पाडतील अशी आहेत. इथे देखरेख, देखभाल करणारा कर्मचारी वर्ग प्रामाणिक वृत्तीने काम करीत असल्याचे इथल्या नीट नेटकेपणामुळे जाणवते . प्रत्येक उद्यानाबाहेर असणारी फेरीवाले व खाद्य विक्रेत्यांची भाऊगर्दी इथे नसल्याने प्रवेशद्वारी शांत वातावरण असते.
स्वातंत्र्यानंतर आपल्या भारतात जे काही मोजके जाणते सेवाभावी नेते आणि मंत्रीगण होते त्यांमध्ये डॉ. चिंतामणराव देशमुख (सी डी देशमुख) प्रख्यात होते. अर्थशास्त्राचे अभ्यासक व स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची स्मृती जागविणाऱ्या या प्रशस्त आणि चिरतरुण वास्तूला तुम्ही अवश्य भेट द्या..............
☘️☘️☘️☘️☘️☘️





Comments
Post a Comment