⭐⭐भटकंती मनसोक्त⭐⭐



           गुजरात राज्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या अलीकडे मस्तान नाका लागतो. नवीन बांधलेल्या महाकाय फ्लायओव्हर पुलामुळे हा फाटा लक्षात येत नाही. पालघर शहराकडे जायचे असल्यास पुलाच्या सुरूवातीला असलेल्या बायपास रोडवरून डावीकडे वळावे लागते. वाडा-भिवंडीसाठी याच नाक्यावर उजवीकडे जाणारा रस्ता आहे. 

              या रस्त्यावर प्रवास करताना डोंगररांगांत कोहोजगडाचे मनोहर दर्शन होते. अशेरीगड मात्र राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण खिंडीत वसलेला आहे. आपण या दोन्ही गडांची भटकंती करूया………...


⭐कोहोज-अशेरीगड पदभ्रमण⭐

              कोहोजगडावर जाण्यासाठी अंभई गावाच्या अलीकडे असणाऱ्या आंबगावपाशी उतरावे लागते. या गावाच्या वेशीपासुन रानवाटा सुरू होतात.  त्यातून वाट शोधावी लागते. वाटेत बऱ्याच ठिकाणी स्क्री(बारीक खड्यांची सुकी माती) आहे, त्यामुळे चढताना सावध रहावे लागते. धोका पत्करायचा नसेल, तर तिथल्या गावकऱ्यांची मदत घेऊन गड चढावा लागतो. 

               ही चढाई आरामात करायची झाली तर तीन तास लागतात. या वाटेवर (उन्हाळ्यात आलात तर) करवंद, जांभळं भरपुर खायला मिळतात.

               कोहोजगडावर पाऊल ठेवल्यावर मात्र चढाईचा थकवा पळून जातो आणि मन प्रफुल्लित होते. सभोवतालचा परिसर दिसतो. दुरवर हिरव्या डोंगररांगा आणि चिमुकली घरं दिसू लागतात.  

               गडावर असलेल्या गुहेलगत पाण्याची काही टाकी आहेत. दोन टाक्यांत पाणी आहे. पैकी एकात चांगले स्वच्छ-नितळ पाणी आहे. जवळ आणखी एक गुहा आहे. ती वस्तीला योग्य आहे. 

               नंतर पाच-दहा मिनिटे अंतर चढल्यावर कोहोजगडाचा मुख्य माथा लागतो. तेथे काही पडके अवशेष व एक देऊळ आहे. दोन मध्यम आकाराचे, फारसे उंच नसलेले सुळकेही दिसतात. त्यापैकी एकावर सुरक्षेची काळजी घेऊन चढाई करता येते. आम्ही या सुळक्यावर आरोहण करुन परत खाली उतरलो. या ठिकाणी एका पाणवठ्यापाशी थांबून आम्ही स्वयंपाक तयार केला. भात, पापड, केळी, डाळ, पुरी असे छान पदार्थ जेवणात होते. फक्त भाजी नव्हती !

                कोहोजगडाची सफर पूर्ण करुन आम्ही अशेरीगड ट्रेक करणार होतो. त्याप्रमाणे कोहोजगड उतरून बसने हायवेवर आलो. पुढे मेंढवण खिंड लागते. तेथे खडकोण गाव आहे. अशेरीगडाची वाट याच गावातून जाते. आमचे पदभ्रमण तेथुन सुरू झाले. चढाईच्या वाटेवरून डावीकडे अशेरीगड हिरव्या गर्द झाडीत दुरवर दिसत होता. 

                 हा किल्ला आज गाठणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आम्ही गडाच्या पायथ्यापाशी असलेल्या गावात मुक्काम करायचे ठरवले व वाट बदलून गावात आलो. वाटेत भेटलेल्या गावकऱ्यांनी, ‘तुमची मुक्कामाची सोय शाळेत होईल. पुढे सरपंचांचे घर लागेल. त्यांना भेटा. तुमच्या  मुक्कामाचे सांगा.’ असे सांगितले. 

                पुढे शाळा दिसली. जवळ जुने देऊळही होते. आम्ही सरपंचांचे घर शोधले. सरपंच भिवा गणू भेटले. हा भला माणूस होता ! सारी माहिती जाणून घेतल्यावर सरपंच आम्हाला म्हणाले, ‘  अहो, शाळेत लाईट नाही. तेथे कशाला राहताय ? इथे राहा की.’  

                 सरपंचांनी स्वतःच्या घरापाशी एक छोटे घर बांधून ठेवले होते पाहुण्यांसाठी. ते त्यांनी दाखविले. खाण्याच्या व्यवस्थेबद्दल सरपंचांनी विचारणा केली. त्यावर आम्ही, ‘आमच्याकडे सारे आहे. फक्त पाणी, लाकडे आणि एखादी बादली द्या,’ अशी त्यांना विनंती केली. सरपंचांनी  लगेच त्याची व्यवस्था केली. लाईट या ठिकाणी होतीच. मग आम्ही दुपार सारखा छान स्वयंपाक केला. गप्पा मारीत गरमागरम जेवण केले ! हा मुक्काम खुप चांगला झाला.

                दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळे आवरले. छान उजाडल्यावर किल्ल्याची वाट धरली. सरपंच वाट दाखवायला आले होते. ‘अशेरी गडावर पावसाळ्यात जास्त लोकं येतात.’, अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही रमत गमत अशेरीगडाची चढाई केली व दोन सव्वादोन तासात गड गाठला.

                अशेरीगडाच्या प्रवेशद्वाराजवळ एक दगड कोरलाय. यातील शिल्पाला शेंदूर लावला होता. वाटेत एक देऊळही लागते. ते बहामनी राजाचे देऊळ असल्याचे समजले. लाकडाचा मोठा कोरीव स्तंभ असून त्यावर चंद्र, सूर्य व वाघाचे चित्र आहे. सरपंचांच्या सांगण्यानुसार ‘घरातील वडीलधारे वारले की हा स्तंभ बदलला जातो. एरव्ही तसाच ठेवतात.’ अशी माहिती सरपंचांकडून मिळाली.

                 अशेरीगडावर मोठे दगड व जुने अवशेष आहेत. एका ठिकाणी पायऱ्या आहेत. चिमणी क्लाइंबिंग व रॉक क्लाइंबिंग करायला अशेरीगडावर भरपूर वाव आहे. 

                  गडावर जवळपास नऊ-दहा पाण्याची टाकी आहेत. पाणी मात्र दोन तीन टाक्यात शिल्लक होते. गडावर एका बाजूला ओबडधोबड स्वरूपातील गुहा आहे. गुहेपासून थोड्या अंतरावर  पाण्याची छान टाकी आहेत. आम्ही एका टाक्यातील पाणी घेऊन यथेच्छ अंघोळ केली ! नंतर निवांतपणे खीर, सूप, सरबत तयार केले  आणि फरसाण, काकडी, या पक्वान्नांसह जेवणाचा   आस्वाद घेतला.

                 अशेरीगडावर जमेल तसे फोटो काढले व आम्ही गड उतरून परतीच्या प्रवासाला लागलो. सरपंचांचे मनापासून आभार मानले. त्यांच्यासह भेटलेल्या गावकऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही मुंबईची वाट धरली………..

                  या मनसोक्त भटकंतीची खास आठवण म्हणजे, याच भागात वरई- साखरे दहिसर गावामध्ये राहणाऱ्या दिलीप पाटील या माझ्या परिचित मित्राने ट्रेक दरम्यान केलेला आमचा मुक्कामी पाहुणचार.     

                  माझी धाकटी बहीण हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणुन सेवा करीत होती. दिलीप पाटील नावाचा उत्साही तरूण तातडीने त्यांच्या हॉस्पिटलमद्ये ऍडमिट झाला होता. त्याचे हात-पाय शक्तीहीन झाले होते. पुर्णत: विकलांग झालेल्या दिलीपवर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी अथक उपचार सुरु केले. परंतु दिलीप बरा होणे कठीण होते. अधून मधून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याच्यावर पुन्हा उपचार सुरु झाले. 

                   बोलक्या स्वभावाच्या दिलीपने हॉस्पिटलच्या स्टाफला आपलेसे केले. वॉर्डमधल्या पेशंट्सशी दोस्ती आणि गरजूंना मदत करणारा हा उत्साही पेशंट पालघरच्या कोसबाड परिसरातही प्रसिध्द होता. निरक्षरांच्या शिक्षणासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत होता. पालघर-डहाणूच्या दुर्गम भागातील आदिवासींच्या कल्याणासाठी झटणाऱ्या स्वर्गीय अनुताई वाघ यांचा लाडका असलेला दिलीप योगायोगाने माझा मित्र झाला. 

                    सर्व नर्सेस याच्या आया बहिणी झाल्या होत्या. माझी बहिणही त्याची आवडती सिस्टर होती.  दिलीपच्या आजाराबद्दल बहिणीने आधीच सांगितले होते. एका खेपेस त्याला हॉस्पिटलमध्ये फॉलोअपला आणले होते. तेथून पालघरला परत जाण्यापूर्वी दिलीप व्हीलचेअरच्या मदतीने आमच्या घरी आला. बडबड्या स्वभावाच्या दिलीपला आमचा पाहुणचार आवडला. त्याने निघताना आम्हा सगळ्यांना गावी घरी यायचे आमंत्रण दिले. 

                    त्यानंतर डहाणू, पालघरला जाणे झाले की सवड काढून मी मित्र किंवा कुटुंबासह दिलीपच्या घरी जायचो. हा माणूस जेवढा मायाळू तशीच त्याच्या घरातली प्रत्येक व्यक्ती होती. दिलीपकडे गेल्यावर मुक्काम हा ठरलेलाच ! त्याला पेटी, तबला वादनाचा नाद होता. एका रात्री दिलीपच्या घरी नाट्यगीतांची मैफलही रंगली होती. 

                    असा हा उत्साही दिलीप विकलांग अवस्थेत असूनही कधीही उदास राहत नाही. डहाणू येथील एका संस्थेत शिक्षक म्हणून सेवा करतो. गरजूंना मदत करतो. त्याचा एक कविता संग्रह देखील प्रसिद्ध आहे. 

                    गिर्यारोहण करणाऱ्या आमच्यासारख्या दोस्तांना प्रोत्साहीत करणाऱ्या या उत्साही दिलीपला देवाने असेच आनंदी ठेवावे………...


                              :::::::::::::::::::::::::




Comments

Popular posts from this blog

💐💐भटकंती मनसोक्त💐💐

💐💐चित्रपट गप्पा💐💐

🌹🌹चित्रपट गप्पा🌹🌹